अध्याय १५ भाग १

ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी

सार्थ भगवद् गीता अध्याय१५

पुरुषोत्तम योग

श्री ज्ञानदेवांनी भगवद् गीतेतील अध्याय१५ मधीलपुरूषोत्तम योगया अध्यायातील   ते २० संस्कृत श्लोकांचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन ५९९ ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे. खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे, परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही अवघड वाटू लागली. श्री निवृत्तीनाथांचे परमशिष्य श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहे. हा श्री ज्ञानदेवांचा अमुल्य कृपाप्रसाद आहे, मनुष्य जीवन जगण्यासाठी अनमोल संजीवनी आहे, किंबहुना संसारसागर पार करण्यासाठी अध्यात्मातील नौका आहे, तिच्या मदतीने संसार करता सावरता आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनसागरातुन तरुन जावे आणि आपल्या जीवनाचे कोटकल्याण साधावे. ही ज्ञानदेवांची अक्षरब्रम्ह ज्ञानेश्वरीआत्मसाद करुन जीवनाचे सार्थक करावे.

  

आता आपले हदय शुध्द करुन त्या चौरंगावर श्री सदगुरूंच्या पावलाची स्थापना करु. जीव-ब्रम्हैक्यभावाच्या अंजलीत सर्व कर्मेद्रियें-ज्ञानेद्रिंयेरुपी फुलांच्या भावपुर्ण कळया भरुन त्या पुष्पांजलीचे अर्घ्य देवु या. अनन्यभावरुपी स्वच्छ जलाने स्नान घालुन श्रीगुरंचे ठिकाणी एकनिष्ठ असलेली जी वासना तीच जणु चंदन असुन त्या चंदनाचे अनामिकेचे बोट लावु, प्रेमरुपी सुर्वणाच्या घागऱ्या करुन सदगुरुंच्या चरणकमलांत घालू. अनन्य भावाने शुध्द झालेले सदगुरुंविषयीचे प्रेम हीच जणु जोडवी असुन ती सदगुरुंच्या चरणाच्या बोटात घालू. आनंदरुपी सुगंधाने परिपुर्ण भरलेले अष्टसात्विक भावाचे आठ पाकळयाचे उमललेले प्रफुल्लीत कमल श्री सदगुरुंच्या चरणावर ठेवु. त्या ठिकाणी अहंकाररुपी धुप जाळु, निराभिमानाचा दिप ओवाळू आणि ऐक्यभावाने श्री सदगुरुनां आलिंगन देवु. माझे शरीर आणि प्राण या दोघांच्या खडावा करुन त्या श्री सदगुरुंच्या चरणकमलांत घालू आणि भोग व मोक्ष यांचे लिंबलोण त्यांच्या चरणकमलांवरुन ओवाळुन टाकु. मोक्षप्राप्ती करुन देणाऱ्या अशा सदगुरुंच्या चरणकमलांची सेवा करण्यास मी पात्र होवो. अशा परमश्रध्दावान ज्ञानाची योग्यता एवढी वाढते की, तो ब्रम्हस्वरुपी विश्रांती घेतो आणि त्या आत्मज्ञानाच्या योगाने त्याच्या मुखातुन जे शब्द बाहेर पडतात ते अमृतमधुर सागराप्रमाणे असतात.  ( ओवी १ ते १० )

      त्याच्या वक्त्त्वावरुन पौणिमेच्या चंद्राप्रमाणे तेजामय कोटीचंद्र ओवाळून टाकावेत अशी त्याच्या मुखातुन निघणाऱ्या अक्षरांना मधुरता येते, पुर्वेला सुर्याचा उदय झाल्याबरोबर ज्याप्रमाणे सर्व जगात प्रकाशाचे राज्य पसरते त्याप्रमाणे सदगुरुंच्या सेवेने आर्शीवाद लाभलेली वाणी श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी प्राप्त करुन देते. ज्यांच्या वाणीसमोर नादब्रम्देखील फिके पडते, तसेच मोक्षसुखदेखील सदगुरुसेवारुप दैवयोगाने प्राप्त होते, श्रवणसुखाच्या मांडवाखाली सारे जग वसंत ऋतुचा आनंद घेत असते, अशी वाणीरुपी वेल बहारास येत असते. ज्या ब्रम्हाचे वर्णन करताना वेद देखील “नेति-नेति” म्हणुन मौन धारण करतात ते ब्रम्ह त्याच्या शब्दांमध्ये सहज प्रत्यक्ष होते हे आश्चर्य नाही का? जे ज्ञानाला कळू शकत नाही जे ध्यानालाही भेटु शकत नाही, ते ज्ञान व ध्यानाला अविषय असलेले ब्रम्ह त्याच्या शब्दांमधुन सहजपणे प्रगट होते. ज्या वेळी सदगुरुचरणरुपी कमलांच्या सुगंधाची प्राप्ती होते त्या वेळी एवढे परमसौभाग्य वाणीच्या स्वरुपाचा आश्रय करुन राहतात. तरी आता मी अधिक काय सांगू? आज ते परम भाग्य माझ्याच ठिकाणी प्रगट झाले आहे असे दिसते. याचे कारण असे आहे की, माझ्या सदगुरुंचे एकुलते एक तान्हे लेकरू असल्यामुळे त्यांच्या हदयातुन प्रगटणाऱ्या कृपेस मी एकाटाच प्राप्त झालो. चातक पक्ष्यासाठी मेघ जसा आपल्यातील सर्व जलाची वृष्टी करतो त्याप्रमाणे श्रीसदगुरूंनी माझ्यासाठी केले आहे.  ( ओवी ११ ते २० )

      म्हणून माझे रिकामे तोंड काहीतरी बोलू लागले आणि त्या बोलण्यात गीतेसारखे ब्रम्हज्ञानाने परिपुर्ण भरलेले अमृतमधुर शास्त्र सहजपणे सापडले, दैव अनुकूल झाले, तर वाळूची सुध्दा रत्ने होतात, आयुष्य जर सदाचारी असेल तर जीव घेण्यास तयार झालेले शत्रु देखील त्याच्यावर प्रेम करतात, भगवंताच्या मनात जर कोणाच्या भुकेची वेळ सांभाळावी  असे आले, तर शिजवण्याकरता अंगणातले वाळुचे खडे घातले तरी देखील ते अमृताचे तांदुळ होतील,  त्याप्रमाणे सदगुरूंनी कोणाचा अंगिकार केला तर त्याचा संपुर्ण संसार मोक्षरुप म्हणजे आनंदरुप होतो, पांडवाच्या चरित्रामध्ये काही उणिवा असुनदेखील श्रीकृष्णाने ती वैगुण्य त्याच्या कथेस पुराणांची योग्यता आणुन ती सर्व जगताला वंद्य करुन ठेवली नाहीत का?  त्याप्रमाणे सदगुरूं निवृत्तीनाथांनी माझे अज्ञानपण ज्ञानाच्या योग्यतेला आणुन ठेवले. मी अज्ञानी असताना मला ज्ञानी केले. परंतु अशा बोलण्याने फक्त प्रेम‍ अधिकच वाढत असते. शिवाय सदगुरूंचा गुणगौरव वर्णन करण्याची माझ्याकडे प्रतिभा तरी कुठे आहे?  तेव्हा त्या सदगुरूंच्या कृपाप्रसादाने आणि तुम्हा संताच्या चरणांच्या दर्शनाने गीतेचा अर्थ सांगत आहे. तर येथपर्यत कथा सांगण्यात आली आहे की चौदाव्या अध्यायाच्या शेवटी मोक्षदाते भगवान श्रीकृष्ण यांनी असा निर्णय केला की, ज्याप्रमाणे शंभर यज्ञ केले की, स्वर्गाचे ऐश्वर्य प्राप्त होते इंद्रपद मिळते, त्याप्रमाणे ज्याला आत्मज्ञान झाले आहे तोच मला प्राप्त करण्यास समर्थ होतो. (ओवी २१ ते ३०)

      अथवा शंभर जन्म ब्रम्हकर्म करीत-करीत घालवितो तोच निश्चीतपणे ब्रम्हदेवांचे पद प्राप्त करतो.  किवां डोळस माणसाला जसा सुर्यप्रकाशाचा उपयोग होतो त्याप्रमाणे आत्मज्ञानी माणसास मोक्षप्राप्तीचा आनंद मिळतो. तरी ते आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणाच्याअंगात पात्रता आहे याचा विचार करुन पाहिले असता जगात तोच एक योग्य अधिकारी दिसुन येतो ज्याप्रमाणे भुमीच्या आतमध्ये असलेले द्रव्य डोळयांत अंजन घातले असता दृष्टीस पडते परंतु ते अंजन घालण्यासाठी पायाळु माणूस असावे लागते, त्याप्रमाणे आत्मज्ञानापासुन मोक्ष प्राप्त होतो यात कोणतीही शंका नाही परंतु ते ज्ञान प्राप्त करुन घेण्यासाठी अंतकरण पुर्ण शुध्द करावे लागते, वैराग्याशिवाय ज्ञान टिकणार नाही, असा विचार करुन देवांनी सिध्दातं मांडला आहे, आता ही विरक्तीरुपी कन्या कशा प्रकारची आहे जी स्वता येवुन मनाला वरते, ते सर्वज्ञ श्री हरीने जाणले आहे, अन्नामध्ये विष कालवलेले आहे, हे जेव्हा भोजन करणाऱ्यास माहीत होते तेव्हा तो वाढलेले ताट टाकुन जातो त्याप्रमाणे संसारातील सर्व अनित्यता जेव्हा जाणली जाते त्या वेळी वैराग्य घालवुन दिले तरी ते जात नाही, तर आपण होवुन आत्मज्ञानी पुरुषाच्या पाठीमागे लागते. आता या संसाराचे अनित्यत्व कशा प्रकारे आहे याचे या पंधराव्या अध्यायात श्रीकृष्णाने वृक्षाची उपमा देवुन  वर्णन केले आहे.  (ओवी ३१ ते ४०)

     सहज उन्मळून पडलेले झाड बुड वर व शेंडा खाली असे जेव्हा असते, तेव्हा ते जसे लवकर वाळुन जाते, तसे हे संसाररुपी झाड वर मुळ आणि खाली शाखा असे जरी असले तरी ते लवकर सुकून जाणारे नाही, हे मात्र लक्षात ठेव. याप्रमाणे संसाराविषयी झाडाचे कौशल्याने रुपक करुन भगवंतानी जीवाची जन्म-मरण रुपी संसाराची येरझारा संपवलेली आहे. संसाराचे मिथ्यत्व सिध्द करुन आत्मस्वरुपामध्ये मीपणाचा अंर्तभाव व्हावा, हा या पंधराव्या अध्यायाचा प्रमुख विषय आहे, आता ग्रंथातील हे सर्व उत्तमोत्तम सिध्दातं  विस्ताराने स्पष्ट करुन सांगण्यात येतील, तरी तुम्ही श्रोत्यांनी एकाग्रतेने हा विषय श्रवण करावा, तरी अनंत आनंदाचा समुद्र पुर्ण पौर्णिमेचा चंद्र व द्वारकेचे राजे भगवान श्रीकृष्ण असे म्हणाले,  अरे अर्जुना ! आपण आपल्या ब्रम्हस्वरुपाच्या घरी येताना जे भ्रमरुपी द्वैत समोरुन झपाटणाऱ्या वाऱ्याप्रमाणे प्रतिबंध करीत असते. जे अवाढव्य विशाल विस्तारलेले जगत आहे यालाच संसार असे म्हणतात, या विवेचनात हा संसार नसुन सर्व बाजुनी बळावलेला मोठा वृक्ष आहे असे जाण. परंतु इतर सर्वसामान्य वृक्षासमान खाली मुळे आणि वर फांदया असलेला वृक्ष नाही. हा अलौकिक असा वृक्ष आहे म्हणुन याचे कोणाला वर्णन करता येत नाही, या वृक्षाच्या बुडाशी कुऱ्हाडीने कितीही घाव घातले अथवा मुळाशी अग्नी प्रज्वलित केला तरी हा वृक्ष नाश न पावता वाढतच जातो, सर्वसामान्य झाडे मुळाशी तोडली असता फांदयासह उन्मळुन पडतात परंतु तशी या संसारवृक्षाची गोष्ट नाही, कारण  हा वृक्ष तोडण्यास सोपा नाही. (ओवी ४१ ते ५०)

      अर्जुना!  हा वृक्ष अलौकिक असुन याचे आश्चर्य असे आहे की, याची वाढ खालच्या बाजुस आहे. ज्याप्रमाणे सुर्य आकाशात किती उंच आहे हे सांगता येत नाही पण सुर्याच्या किरणांचा समुदाय खाली पसरलेला असतो, त्याप्रमाणे हे संसाररुपी झाड वर मुळ आणि खाली फांदया पसरलेल्या असल्यामुळे विचित्र असे आहे.जसे कल्पांताच्या वेळी  संपुर्ण ब्रम्हाडं जलाने व्याप्त केले होते तद्ववतच या विश्वामधील  सारे काही या वृक्षाने व्यापुन टाकले आहे. सुर्य अस्ताला गेला, की रात्र जशी गर्द अंधकाराने भरुन जाते तसा हा वृक्ष सर्व आकाशात भरलेला आहे. अर्जुना! या संसारवृक्षाचे फळ खाण्याकरिता पाहु लागलो तर याला फळच नाही वास घेण्यास फुलही नाही, जे काही आहे तो हा सर्व वृक्षाच आहे. याचे मुळ आकाशाकडे आहे परंतु हा उपटुन पडलेला नाही या वृक्षाचे मुळ परब्रम्ह आहे. त्यामुळे हा वृक्ष टवटवीत आहे, या वृक्षाची  मुळे वरती आहेत असे म्हटले तर याला पुष्कळ मुळे आहेत,  भराभरा गवताप्रमाणे तसेच पिंपंळाप्रमाणे, वटवृक्षाप्रमाणे हा संसारवृक्ष आहे कारण याच्या पारंब्याच्या आत भरपुर डहाळया आहेत. त्याचप्रमाणे  अर्जुना! या वृक्षास खाली फांदया आहेत असा प्रकार नसुन आकाशाच्या बाजुलाही फांदया विस्तार पावल्या आहेत. (ओवी ५१ ते ६०)

       या विशाल वृक्षाचा विस्तार होण्यास संपुर्ण आकाश आश्रयभुत असुन सर्व वारा या वृक्षाच्या सामर्थ्याने वाहतो, हा वृक्ष उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही अवस्थांच्या रुपात प्रगट झाला आहे, असा हा वर मुळ असलेला विश्वाकार वृक्ष प्रचंड घनदाट प्रमाणात शाखांनी खाली मुख असणे आणि ते पसरणे हे कशामुळे आहे?  त्याच्या शाखाचे स्वरुप काय?  या वृक्षाखाली ज्या मुळया आहेत त्याचे स्वरुप कोणते?  आणि वर ज्या शाखा पसरलेल्या आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत?  या वृक्षास अश्वत्थ हे नाव कशावरुन प्राप्त झाले?  तसेच आत्मज्ञानी पुरूषांनी याचा काय निर्णय केला आहे?  या सर्व गोष्टी तुला उत्तम प्रकारे अनुभवास येतील असे स्पष्ट करुन सांगत आहे. हे  भाग्यवान अर्जुना! हे निरुपण ऐकण्यास तुच योग्य आहेस म्हणुन सर्व इंद्रियांचे कान करुन अंत:करणपुर्वक ऐक. यादवश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णाने असे प्रेममय विचार प्रगट केले तेव्हा अर्जुनाच्या ठिकाणी मुर्तरुपाने अवधान प्रगट झाले. आकाश जसे विशाल असुन त्यास जसे दाही दिशांनी कवटाळले आहे त्याप्रमाणे देवांनी जे विस्तारपुर्वक निरुपण केले ते अर्जुनाच्या श्रोतेपणामुळे कमी पडले. श्रीकृष्णाच्या विचाररुपी सागराला पिवुन टाकणारा हा अर्जुन जणू काय दुसरा अगस्ती ऋषी होय. म्हणुन तो श्रीकृष्णाच्या निरुपणाचा एकदम घोट घेण्याचा प्रयत्न करु लागला. (ओवी ६१ ते ७०)

पुढील भाग