अध्याय १५ भाग ५

       चंद्रसुर्यादी ही त्याच्या प्रखर तेजाने महत्वाला प्राप्त झाली आहेत, ते ज्या स्वरुपाच्या अंधकारात प्रकाशीत होते, तो परमात्मा वस्तु दिव्य तेजाची राशी आहे सर्व भुतमात्रांमध्ये ती सम प्रमाणात आहे ती चंद्रसुर्यानाही प्रकाश देते, या विश्वात चंद्रसुर्याच्या रुपाने परमात्मा वस्तुच्या प्रकाशाचे कवडसे पडले आहेत, म्हणुन चंद्रसुर्यादी तेजस्वी पदार्थामध्ये जे तेज भरलेंले आहे ते परब्रम्हयाचे स्वरुप आहे. आणि त्या विशाल ज्ञानरुप प्रकाशामध्ये चंद्र-सुर्यासह संपुर्ण विश्व लोप पावते,ज्याप्रमाणे सुर्योदय झाला असता चंद्रासह नक्षत्रे लोप पावतात, अथवा जागे झाल्यावर स्वप्नातील सर्व पसारा जसा नाहीसा होतो, अथ‍वा संध्याकाळ झाली असता मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते त्याप्रमाणे ज्या वस्तुचे ठिकाण स्थुल, सुक्ष्म, द्वैत, अद्वैत असा कोणताही मिथ्या भास राहत नाही, ते माझे श्रेष्ठ निजधाम आहे हे तू जाण. ज्याप्रमाणे महासागराला मिळालेल्या नद्यांचे ओघ पुन्हा परत उगमस्थानी वळत नाहीत त्याप्रमाणे ते आत्मज्ञानी निजधामाला आले की परत त्यांना जन्म-मरण या चक्राकडे यावे लागत नाही. मिठाची बनवलेली हत्तीण खाऱ्या पाण्यात घातली कि ती जशी पुन्हा परत हत्तीण होत नाही. ज्याप्रमाणे अग्नीच्या ज्वाला आकाशाच्या पोकळीत गेल्यानतर अग्नीजवळ परत येत नाहीत, किवां तापवलेल्या तव्यावर टाकलेले पाणी जसे नाहीसे होवुन परत येत नाही, त्याप्रमाणे शुध्द आत्मज्ञानाने जे माझ्याशी एकरुप झाले ते पुर्नजन्मापासुन मुक्त होतात. (ओवी ३११ ते ३२०)

     यावर बुध्दीरुपी पृथ्वीचा राजा अर्जुन तो म्हणाला, महाराज आपण मला जे आत्मज्ञान सांगत आहात हा आपला कृपाप्रसाद आहे परंतु माझ्या एका विनंतीकडे देवांनी लक्ष दयावे. जे पुरुष देवाच्या स्वरुपात जावुन मिळाल्यावर पुन्हा जन्माला येत नाहीत ते पुर्वी देवाच्या स्वरुपापासुन भिन्न होते की एकरुप होते? जर ते अनादिसिध्द भिन्न असतील तर ते माघारी येत नाहीत हा आपला विचार असंभवनीय होय. कारण भ्रमर हे फुलामधील मकंरद सेवन करण्यास गेले असता कधी फुले होतात काय?  स्वरुपाने लक्ष्याहुन वेगळे असणारे बाण जसे लक्ष्याला वेधुन पुन्हा वेगळे पडतात तसे ते पुरुष देवाच्या स्वरुपाला स्पर्श करुन देवाशी ऐक्य न पावता पुन्हा माघारी येतीलच अथवा ते पुरुष स्वभावता तुच असशील, म्हणजे त्याचे व तुझे मुळचे ऐक्य असेल, तर मग कोणी कोणाला मिळवायचे?  असे पाहा शस्त्राने‍ शस्त्राचा छेद होतो काय? म्हणुन देवा, ज्याप्रमाणे शरीर व शरीराचे अवयव याचां संयोग अथवा वियोग होतो असे म्हणता येत नाही, त्याप्रमाणे तुझ्याशी अभिन्न जे जीव त्यांच्याशी तुझा संयोग अथवा वियोग होतो असे म्हणता येत नाही. बरे जे सदैव तुझ्या स्वरुपापासुन भिन्न आहेत ते केव्हाही तुझ्या स्वरुपात ऐक्य पावणार नाहीत मग ते माघारी येतात किवां येत नाहीत अशी व्यर्थ समजुत का करुन घ्यावी? ज्याला सर्वत्र मुख आहेत अशा देवा, तुमच्या स्वरुपामध्ये ऐक्य पावल्यावर कोण माघारी येत नाही, हे मला समजावुन सांगा. अर्जुनाने अशी शंका निर्माण केल्यावर ते सर्वज्ञांचे शिरोमणी श्रीकृष्ण आपल्या शिष्याला अध्यात्माचा बोध झालेला पाहुन संतुष्ट झाले. आणि मग म्हणाले, हे महाबुध्दीमान अर्जुना, जे माझ्याशी ऐक्य पावुन पुन्हा जन्माला येत नाहीत ते भिन्न आणि अभिन्न असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. (ओवी ३२१ ते ३३०)

       जर सुक्ष्म आत्मज्ञानाने पाहीले तर स्वरुपता ते जीव मीच आहेत आणि मीही तेच जीव आहे परंतु वरवर देहादिकांच्या दृष्टीने पाहीले तर ते माझ्याहुन भिन्न आहेत असे वाटते. पाण्यावर निर्माण होणाऱ्या लाटा या पाण्यापेक्षा वेगळया आहेत असे दिसते पण वस्तुता ते केवळ पाणीच होय. सोन्याचे अलंकार पाहील्यावर ते आपणास सोन्याहुन भिन्न आहेत असे वाटतात, परंतु तात्विक दृष्टीने पाहील्यास ते सर्व सोनेच असते. त्याप्रमाणे अर्जुना, ज्ञानदृष्टीने पाहिले असता सर्व जहल माझ्याशी अभिन्न आहेत एरवी त्यांच्यात व माझ्यात जो भिन्नपणा वाटतो तो अज्ञानामुळे होय खरोखर आत्मदृष्टीने पाहिले तर त्या मला दुसरे कोठे काही आहे की जे वेगळे आहे किवां एक आहे असा व्यवहार होवुन त्याच्या आधारे उघड करुन सांगता येईल? जर संपुर्ण आकाश पोटात घालुन सुर्याने सर्व ब्रम्हांड व्यापुन टाकले तर त्या सुर्याचे प्रतिबिबं कोठे उत्पन्न होईल? आणि त्याची किरणे तरी कोठे शिरतील? अर्जुना, कल्पाच्या अंती प्रलयकाळामुळे केवळ नद्यांची पात्रेच भरत असतात काय? म्हणुन विकाररहित जो मी त्या मला भेद व अभेद कोठुन असणार? परंतु पाणी जरी सरळ असुनही पाण्याच्या संबंधामुळे जसे वाकडे झालेले दिसते किवां पाण्याच्या संबंधामुळे एक असणाऱ्या सुर्याच्या प्रतिबिबांच्या रुपाने दुसरेपणा जसा आलेला दिसतो. आकाश हे चौकोनी किवां वाटोळे आहे असे म्हणता येईल काय? परंतु तेच घर व माठ यांच्या उपाधीने चौकोनी किवां वाटोळे दिसते जेव्हा झोपेत स्वप्नामध्ये एकदा माणुस राजा होतो त्या वेळी एकटया माणसाकडुन सर्व जग राजैश्वर्याने भरले जात नाही काय? (ओवी ३३१ ते ३४०)

       किवां शंभर नंबरी सोन्यात किडाळ मिसळल्यावर ते जसे कसास कमी उतरते त्याप्रमाणे परिशुध्द असा जो मी जेव्हा मायेने परिवेष्टित होतो त्या वेळी माझे ठिकाणी जीव व ईश्वर हे भाव निर्माण होतात. जेव्हा आवरणात्मक अज्ञान महत्वाला प्राप्त होते त्या वेळी मी कोण? असा विकल्प निर्माण होतो मग अज्ञानाच्या अवस्थेत मी देह म्हणजे देह असा दृढ निश्चय केला जातो. “शरीर म्हणजे आपण “इतके मर्यादित ज्ञान होवुन व्यापक स्वरुपाहुन ते वेगळे होते तेव्हा मर्यादित झाल्यामुळे जीव हा माझा अंश आहे असे वाटते. वाऱ्यामुळे सागरावर लाटा निर्माण होतात, त्या जशा सागराचा एक लहानसा अंश आहे असे दिसते त्याप्रमाणे हे पंडुसुता, रेहाचा अहंकार निर्माण झाल्यावर त्या देहाचा जो चालक तो या मृत्यूलोकामध्ये जीवरुपी मीच आहे असे वाटते, त्याच जीवाच्या दृष्टीने जो हा अखंड कर्मव्यापार चालतो त्याला जीवलोक असे म्हणतात, अरे ज्या ठिकाणी माणसाचा‍ जन्म होतो व पुढे त्याचा मृत्यू होतो हे खरे म्हणून मानले जाते, त्या ठिकाणाला मी जीवलोक म्हणजे संसार असे म्हणतो. अशा प्रकारच्या जीवलोकामध्ये तु मला अशा सुक्ष्म तऱ्हेने बघ की चंद्र जसा पाण्यामध्ये प्रतिबिबंरुपाने असुनही बिबांपेक्षा वेगळा आहे. अर्जुना, स्फटिकाचा मणी कुंकूमावर ठेवला की लाल दिसतो पण तो स्फटिक वस्तुस्थितीने तसा होत नाही. त्याप्रमाणे मी जीवरुपाने सर्व कर्मव्यवहार करीत असतो अथवा जन्म-मरणरुप संसारचक्रात फिरत असलो तरी पण माझे कर्मरहीतपण खंडीत होत नाही. परंतु मी कर्ता-भोक्ता आहे असे वाटते तो एक प्रकारचा भ्रम आहे, असे समज. (ओवी ३४१ ते ३५०)

         किबंहुना परमार्थता आत्मा नित्य, शुध्द, बुध्द,मुक्त असुनही तो प्रकृतीशी ऐक्य पावुन तिच्या उपाधीने तिच्या धर्माचा अधिकार स्वीकारतो. प्रकृतीचे कार्य असलेली मन, श्रवण किवां कान, त्वचा, डोळा, जीभ, प्राण ही सहा इंद्रिये ती सर्व मीच आहे, असे समजुन कर्मव्यापार करण्यास प्रवृत्त होतात, ज्याप्रमाणे एखाद्या संन्यासी माणसाने आपणच आपली बायको-मुले व्हावे आणि मग त्या कुटूंबाच्या मोहाने इकडे-तिकडे धावावे. त्याप्रमाणे जीवात्मा आपल्या मुळ ब्रम्हस्वरूपाच्या अज्ञानाने आपणच प्रकृतीरुप आहोत असे मानतो आणि त्याच शरीरादि प्रकृतीची विषय-संपादन करुन सेवा करतो, जीवात्मा मनाच्या रथावर बसुन श्रवणेंद्रियांचे द्वारा शरीराबाहेर निघतो, आणि मग शब्दांच्या रानात प्रवेश करतो, तोच प्रकृतीचा लगाम हातात धरुन त्वचेच्या द्वाराने स्पर्शरुपी महाभयानक वनामध्ये जातो. कधी वेगाच्या द्वाराने बाहेर पडुन रुपाच्या डोंगरात स्वैरपणे भटकत राहतो. अशा तऱ्हेने देह आणि इंद्रिये यांचा स्वामी मनाला जवळ करुन शब्दादिक विषयांचे समुदाय भोगतो. (ओवी ३५१ ते ३६०)

        पण कर्ता-भोक्ता असे हे जीवाचे स्वरुप त्याच वेळी दिसते कि, ज्यावेळी तो जीव एखाद्या शरीरात कर्मानुसार प्रवेश करतो, अर्जुना, एखादा पुरुष ऐश्वर्यसंपन्न ‍व विलासी आहे हे तेव्हाच ओळखता येते, कि जेव्हा तो एकाद्या राजधानीत रहावयास येतो. त्याप्रमाणे जीव ज्या वेळी स्थुल देह धारण करतो त्या वेळी जीवाच्या अहंकाराची वाढ किेवां विषयांच्या इंद्रियांचा धुमाकुळ स्पष्टपणे दिसण्यात येतो, अथवा जीव ज्या वेळी स्थुल शरीराचा त्याग करतो, त्यावेळी त्याला सदैव साथ देणारे मन व इंदियांचे समुदाय, संस्कार, यांना घेवुन जातो, ज्याप्रमाणे अतिथी भोजनास आला असता त्याचा अपमान करुन त्यास जर विन्मुख परत पाठविले तर तो मालकाचे पुण्य घेवुन जातो, किवां दोरा काढुन घेतला तर कळसुत्री बाहुल्यांची गती थांबते. किवां अस्त पावत असलेला सुर्य जसा लोकांची दृष्टी घेवुन जातो अथवा वाऱ्याकडून जसा फुलांचा सुगंध नेला जातो, आता हे दृष्टांत पुरे. अर्जुना त्याप्रमाणे देहराज जीव जेव्हा स्थुल देहातुन बाहेर पडतो त्यावेळी तो मनाबरोबर पाच इंद्रियांचे संस्कार घेवुन बाहेर पडतो. मग इहलोकात अथवा स्वर्गात ज्या ठिकाणी तो देह प्राप्त करुन घेतो त्या ठिकाणी पुर्वी जसा होता तसाच पुन्हा मन व पाच इंद्रियांचा विस्तार करत असतो, अर्जुना, दिवा जसा मालवल्यानंतर तो जसा आपल्या तेजासह नाहीसा होतो तसाच पुन्हा लावला तर नंतर पुर्वी जसा प्रकाश देत होता तसाच प्रकाश देत रहातो, परंतु

अर्जुना, अशा जन्म-मरणाच्या चक्रात अविवेकी पुरुषांच्या दृष्टीने हे वाटत असते. (ओवी ३६१ ते ३७०)

      कारण आत्माच हा देहामध्ये आला आणि आत्म्याने विषय भोगला अथवा देहातुन गेला, हे सर्व अविचारी पुरुष खरे मानत असतो. एऱ्हवी जन्म घेणे अथवा मृत्यू पावणे किवां कर्म करणे अथवा विविध विषयांचा उपभोग घेणे, हें सर्व प्रकृतीचे कार्य आहे पण ती सर्व कार्ये अविचारी मनुष्य आत्म्याच्या ठिकाणी मानतो. परंतु लहानसा देह उत्पन्न झाला आणि देहाच्या ठिकाणी चेतना प्रकट झाली की तेव्हा त्या देहाच्या हालचालीवरुन आत्मा जन्माला आला असे म्हणतात.त्याचप्रमाणे अर्जुना!  त्याच्या संगतीने इंद्रियें आपआपले विषय सेवीत असता जीव उपभोग घेतो असे म्हणतात, नंतर प्रारब्धकर्माने प्राप्त होणारे भोग क्षीण होताच देह आपोआप नष्ट होतो, तेव्हा त्यामध्ये चेतना दिसत नाही. मग त्या वेळी जीव गेला असे म्हणुन ओरडतात, परंतु अर्जुना! वृक्ष हालत असलेला दिसवा तर वारा वाहत आहे आणि जेथे वृक्ष नाही तेथे तो वारा नाही असे म्हणावे काय? अथवा आरसा समोर ठेवुन आपले रुप आरश्यामध्ये पाहीले असता आपण आहोत असे मानावे व आरशात पाहण्यापुर्वी आपले रुप नव्हते की काय? अथवा आरसा बाजूला केल्यावर त्यातील प्रतिबिबं दिसेनासे झाले तर आपले अस्तित्वच संपले असा निश्चय करावयाचा काय? वास्तविक पाहता ‘शब्द’ हा आकाशाचा गुण आहे परंतु अविचारी लोक मेघांची गर्जना झाली असे समजतात,‍ अथवा ढगांच्या गतीचा वेग चंद्राच्या ठिकाणी आरोपिला जातो, चंद्र वेगाने जात आहे असे लोकांना वाटते, त्याप्रमाणे विकार रहित आत्मसत्तेच्या अधिष्ठानावर देह उत्पन्न होतो आणि नाश पावतो, परंतु अविचारी लोक त्यांच्या अज्ञानामुळे उत्पत्ति-नाश हे धर्म आत्म्याचे आहेत असे मानतात.     (ओवी ३७१ ते ३८०)

      आत्मा हा आत्मास्वरुपाच्या ठिकाणी आहे, तो देहाच्या धर्मास फक्त साक्षीभूत आहे या विवेकी दृष्टीने पाहणारे लोक वेगळेच आहेत, ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतुमध्ये सुर्याची प्रखर किरणे मेघपटलांचा भेद करुन पृथ्वीपर्यत येतात त्याप्रमाणे ज्याची दृष्टी देह दिसत असला तरी ज्ञानाच्या आधारे देहाच्या आकारावर थांबत नाही तर देहाचे निरसन करुन देहरुपी खोळीमध्ये आत्मा वेगळा आहे असे पाहतात. विवेकाच्या विस्ताराने ज्याचे ज्ञान आत्मस्वरुपाच्या ठिकाणी स्थिर झाले आहे, तो ज्ञानी आत्मा हा अकर्ता आहे असे जाणतो, ज्याप्रमाणे तारांगणाने भरलेले आकाश समुद्रामध्ये प्रतिबिंबींत झाले तरी ते वरुन तुटुन सागरात पडले नाही, हे निश्चीतपणे जाणता येते. आकाश आकाशाच्या जागी आहे आणि जे सागरात दिसते ते प्रतिबिबं खोटे आहे भ्रमज्ञान आहे त्याप्रमाणे देहाने आत्म्याला गवसणी घातली तरी सुध्दा परमार्थता आत्मा हा असंग आहे असे ज्ञानी जाणतात. खळखळ वाहणाऱ्या लाटांमध्ये चंद्राचे तुकडे-तुकडे झालेले दिसतात पण तोच चंद्र  आकाशात पाहु लागलो तर आपल्या जागी कायम आहे  असे दिसते डबक्यामध्ये पाणी साठले की त्यात सुर्याचे प्रतिबिबं दिसते पण हे पाणी आटल्यावर ते नाहीसे होते पण सुर्य पाहु लागलो तर तो आपल्या ठिकाणी स्थिर आहे, त्याप्रमाणे देह उत्पन्न झाल्यावर व नाहीसा झाल्यावर  मी उत्पन्न होत नाही आणि नाश पावत नाही अशा दृष्टीने ज्ञानी लोक मला जाणतात. मातीचे रांजण तयार केले अथवा मडके तयार केले आणि पुन्हा तोडुन टाकले तरी त्या रांजणात आणि मडक्यात दिसणारे आकाश जसे कायम असते, त्याप्रमाणे आत्मसत्तेवर अज्ञानाने कल्पिलेले हे देह उत्पन्न होतात व नाश पावतात, ही गोष्ट ज्ञानी पुरूष निश्चीतपणे जाणतात. चैतन्यमय आत्मा हा कधी वाढत नाही आणि कमी होत नाही कोणाकडुन काही करवत नाही आणि स्वता काही करत नाही, हे ज्यांना यथार्थ स्वरुपाचे आत्मज्ञान झाले आहे तेच जाणतात. (ओवी ३८१ ते ३९०)

पुढील भाग