एखादा पुरुष बुध्दीमान असेल, तर त्याला आत्म्याचे शब्दज्ञान कळेल बुध्दीने तो विश्वामध्ये किती परमाणू आहेत याचा योग्य प्रकारे हिशोब देईल आणि तो सकल शास्त्रातं निपुण होईल, अशी विद्वत्ता असून देखील मनामध्ये वैराग्य नसेल तर सर्वाच्या अंर्तयामी सम प्रमाणात असणारा जो मी त्या माझ्याशी त्याची भेट होणार नाही.त्याप्रमाणे सर्व शास्त्रांचे पाठांतर जरी असेल आणि अंतकरणात जर विषयांचे चिंतन सुरू असेल तर अर्जुना, अशा विषयासक्त लोकांना मी कधी सापडणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. झोपेंत बडबड करणाऱ्या ग्रंथाज्ञानाने संसाराचे बंधंन तुटेल काय? अथवा घरात असणारी पोथी स्वच्छ वस्त्रात गुंडाळुन ठेवली तर ती वाचली असे होईल काय? अथवा डोळे बांधुन जर नाकाला लावले तर त्यांचे मुल्य कळेल काय आणि त्यांचा पाणिदारपणा कळेल काय? त्याचप्रमाणे चित्तामध्ये अहंकार बाळगुन तोंडाने सर्व शास्त्रे जरी पाठ म्हटली तरी आणि कोटयावधी जन्म घेतले तरी माझी प्राप्ती होणार नाही. जो मी एक सर्व भुतमात्रांमध्ये सम प्रमाणात व्यापक आहे त्या माझ्या व्याप्तीचे स्वरुप प्रगट करतो तरी त्याचे श्रवण कर. सुर्यासह ही संपुर्ण विश्वरचना जो प्रकाश दाखवते तो प्रकाश माझा आहे, तो प्रकाश विश्वाच्या उत्पत्तीपुर्वी आणि नंतरही आहे असे जाणावे. हे पंडूसुता! सुर्य हा दिवसा पाणी शोषुन घेतो आणि पुन्हा रात्री पृथ्वीला जो ओलावा पुरवितो त्या चंद्रातील चांदणे माझे आहे असे जाण. जे बाहेरच्या इंधनाचे दहन करणे आणि पोटातील अन्नपदार्थाचे पचन करण्याचे कार्य अव्याहतपणे करीत असते ते अग्नीचे प्रखर तेज माझेच आहे. (ओवी ३९१ ते ४००)
मी पृथ्वीमध्ये प्रवेश केलेला आहे मी तिला आधारभुत झालो आहे, म्हणून मातीच्या कणापासुन बनलेली लहानशा ढेकुळाप्रमाणे असलेली पृथ्वी सागराच्या अफाट पाण्याने विरघळून जात नाही. आणि ही पृथ्वी ज्या अगणित स्थावर-जंगम भुतांना धारण करते, त्या सर्वही भुतमात्रानां पृथ्वीमध्ये प्रवेश करुन मीच धारण करतो. अर्जुना, आकाशामध्ये मी चंद्राच्या रुपाने अमृताचे भरलेले चालते सरोवर झालो आहे. या चंद्राच्या अमृतरुपी सरोवरापासुन अनेक किरणांचा समुदाय सर्वत्र पसरतो, त्या किरणांच्या पाटाने सर्व वनस्पतीचे पोषण मीच करत असतो. अशा प्रकारे सर्व धान्यादिकांचे पोषण करुन विविध प्रकारच्या धान्याची समृध्दी करुन त्या अन्नाद्वारे प्राणीमात्रांचे पोषण करतो. आणि अन्न जरी मी निर्माण केले तरी ते प्राणीमात्रांस कसे पचेल, कि ज्याच्या आधारे जीवास समाधान मिळेल? म्हणून अर्जुना, खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी सर्व प्राणीमात्रांच्या शरीरात नाभिकंदावर आगटी करुन पोटात राहणारा अग्नी मीच झालो आहे. मी प्राण व अपान या जोडभात्याने पोटातील अग्नीला रात्रंदिवस फुकून सदैव प्रज्वलित ठेवतो आणि पोटातील अन्न पचवितो, हे कळत नाही. कोरडे, स्निग्ध, शिजवजलेले व कच्चे असे कसलेही अन्न असले तरी त्या सर्वाचे मीच पचन करतो. अशा प्रकारे मीच सर्व जन आहे संपुर्ण जनांना जगविणारे अन्नरुपी जीवन मीच आहे आणि खाल्लेले अन्न जिरवुन जगण्याचे मुख्य साधन जो जठराग्नी तो देखील मीच आहे. (ओवी ४०१ ते ४१०)
आता माझ्या व्यापकपणाचे आणखी नवल ते काय सांगावे? या संपुर्ण विश्वात माझ्यावाचुन दुसरे काही नाही. या जगात काही प्राणी सदैव सुखी दिसतात तर काही दुखाने पछाडलेले दिसतात असे कशामुळे होते? ज्याप्रमाणे एखाद्या नगरात एकाच दिव्याने सर्व दिवे पेटवले, तर काही प्रकाशमान होतात आणि काही प्रकाशमान होत नाहीत असे कसे होईल? अशा प्रकारे तर्क-वितर्क तु जर आपल्या मनात करत बसला असशील तर त्याचेही निरुपण ऐक आणि तुझ्या शंकेचे उत्तम प्रकारे निरसन करुन घे या संपुर्ण विश्वात मीच भरुन राहीलो आहे यात तीळमात्र शंका नाही, परंतु प्राण्यांच्या राजस, तामस, सात्विक बुध्दीप्रमाणे मी त्यांस वेगवेगळा भासत असतो जसा आकाशाचा ध्वनिरुप शब्द एकच आहे परंतु विविध प्रकारच्या विशेष वाद्यांतुन निरनिराळे अनेक नादांच्या रुपाने तो बाहेर पडतो अथवा हा जो उगवलेला सुर्य एकच आहे परंतु लोकांच्या कर्मास विविध प्रकारे उपयोगी पडतो.ज्याप्रमाणे जल विविध प्रकारच्या बीज स्वभावाप्रमाणे विविध प्रकारचे वृक्ष निर्माण करते त्याप्रमाणे माझे स्वरुप विविध स्वभावाच्या जीवांमध्ये विविध प्रकारांनी परिणामाला प्राप्त झाली आहेत. अज्ञानी व शहाणा अशा दोन माणसांच्या पुढे नीलमण्यांचा हार पडलेला होता परंतु अज्ञानी माणसाला विवेक नसल्यामुळे मंद प्रकाशात तो हार त्याला सर्परुप भासला त्याला भीती वाटली आणि शहाण्या माणसाने विवेक अवलोकन केल्यामुळे त्याला तो हारच दिसला. एकाच स्वाती नक्षत्रांचे पाणी सारखेच असुन ते शिंपल्यात पडल्यास त्याचे मोती होतात पण सर्पाच्या तोंडात पडल्याने त्याचे विष होते, त्याच प्रमाणे सज्ञान माणसास मी सुखकारक आहे तर अज्ञानी माणसाला मी दुखरुप आहे. (ओवी ४११ ते ४२०)
एरवी सर्व प्राणीमात्रांच्या हदयामध्ये मी अमुक आहे अशी जी बुध्दी रात्रंदिवस स्फुरण पावते ती मीच आहे. परंतु संतांच्या संगतीत राहिले असता योग व ज्ञान यांचा अभ्यास करुप आणि वैराग्याने मुक्त होवुन सदगुरुचरणांची सेवा केली असता याच सत्कर्माच्या योगाने संपुर्ण अज्ञान नाहीसे होते आणि त्यांचा अहंकार आत्मस्वरुपामध्ये लय पावतो हे साधक माझ्या सच्चिदांनंदघन अशा ब्रम्हस्वरुपाला आपेाआप पाहुन माझ्या आत्मस्वरुपाने सर्वकाळ सुखी होतात, अशी स्थिती प्राप्त होण्यास माझ्याशिवाय दुसरा कोण कारणीभुत आहे काय? हे धंनजया! सुर्याचा उदय झाल्यावर सुर्याच्या तेजाने सुर्य पहावा लागतो त्याप्रमाणे मला जाणण्यास मीपणा, अहंकार, पाच कर्मेद्रियें, पाच ज्ञानेंद्रियें, मन, बुध्दी, आदी माझ्या ठिकाणी अर्पण करुन मगच माझा शोध केल्यास मला प्राप्त करु शकतो, परंतु याकरताही मीच कारण आहे. देहाला आत्मा मानणारे अथवा देहाला भोग देणाऱ्या लोकांच्या संगतीत राहुन प्रंपचाचे महत्व ऐकत बसला असता ज्यांचा आत्मभाव देहाच्या ठिकाणी बुडुन गेला आहे ते स्वर्ग व संसार या सुखांच्या प्राप्तीकरता कर्ममार्गाने धावतात,त्यामुळे त्यांना दुखाचा शेलका वाटा प्राप्त होतो. परंतु अर्जुना! ही स्थिती देखील अज्ञानी लोकांस माझ्याकडुन प्राप्त होते. जसे जागा असलेला मनुष्य स्वप्नाला आणि निद्रेला कारण आहे, परंतु दिवसा काही प्रमाणात ढगांनी आकाश व्यापले म्हणजे उजेड कमी होतो हे देखील जसे उजेडाने समजुन येते त्याप्रमाणे माझे विषयीचे अज्ञान उत्पन्न होवुन प्राणी मात्र विषयांचे सेवन करीत असतात, हे देखील माझ्याच सत्तेने होते. हे धंनजया! निदेला अथवा जागृतीला जसे ज्ञानच कारण आहे त्याप्रमाणे ज्ञानी अथवा अज्ञानी अशा जीवानां मीच मुळ कारणीभुत आहे. (ओवी ४२१ ते ४३०)
हे धर्नुधरा! जसे सर्पाच्या अथवा दोरीच्या भासास दोरीच कारण आहे त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञान यांच्या वाढीस मी सर्वकाळ अधिष्ठानभूत आहे, अर्जुना , याप्रमाणे माझे स्वरुप अत्यंत सुक्ष्म आहे मला वेदांनी जाणण्याचा प्रयत्न केला पण त्यांना माझे समग्र ज्ञान प्राप्त झाले नाही म्हणुन त्यांच्या ऋगवेद, यर्जुवेद, सामवेद, अर्थव वेद अशा चार शाखा निर्माण झाल्या मग त्या चार प्रकारच्या शाखांनी मीच जाणला जातो, हे त्रैकालिक सत्य आहे, ज्याप्रमाणे पुर्वेकडुन वाहणाऱ्या व पश्चिमेकडुन वाहणाऱ्या नद्यांना एक समुद्रच आश्रयस्थान आहे, आणि एकमेवाद्वितीय ब्रम्ह या सिध्दांताजवळ वेद आपल्या शब्दांसह लोपुन जातात.ज्याप्रमाणे गंधयुक्त वाऱ्याला लहरी आकाशात विरुन जातात, त्याप्रमाणे सर्व श्रुती ब्रम्हाला लाजुन निवांत बसतात, वेदज्ञान थांबले जाते आणि त्यावेळी मी सदगुरुंच्या रुपाने प्रगट होवुन वेदांचा यथायोग्य अर्थ प्रगट करतो, नंतर श्रुतीसह सर्व जगत जेथे लय पावते, ते शुध्द असे ब्रम्हज्ञान जाणणारा मीच आहे. ज्याप्रमाणे झोपलेल्या माणसास जागे केले म्हणजे स्वप्नातील द्वैत सारे नाहीसे होवुन जाते तसेच आपले एकत्वही अनुभवास येते, त्याप्रमाणे विश्वाच्यां उपाधीशिवाय जे माझे ब्रम्हस्वरुप आहे त्याचा बोध होण्यास मीच कारण आहे व ते ब्रम्हस्वरुप मीच आहे. वीरा अर्जुना, ज्याप्रमाणे कापुर जळुन गेल्यावर मागे त्यांची काजळीही राहत नाही आणि अग्नीही उरत नाही. त्याप्रमाणे संपुर्ण अविद्या नाहीसे करणारे जे ज्ञान ते देखील जेव्हा का अद्वैत ब्रम्हस्वरुपात बुडुन जाते त्या वेळी ते नाही असे म्हणता येत नाही व आहे असेही म्हणता येत नाही. (ओवी ४३१ ते ४४०)
असे पहा, चोर शोधाच्या मार्गासह संपुर्ण विश्वच चोरुन घेवुन गेला आहे त्या चोराला कोणी व कुठे शोधावे? अशी जी एक शुध्द अवस्था आहे ती मीच आहे. याप्रमाणे मोक्षदायक श्रीकृष्णाने आपल्या उपाधीरहित शुध्द स्वरुपापर्यत आपणच सर्व दृश्य व अदृश्य विश्वातील सर्व पदार्थात कसे व्यापुन आहे हे सांगितले आहे. ज्याप्रमाणे आकाशामध्ये चंद्राचा उदय झाला की क्षीरसागरात त्याचे पुर्ण प्रतिबिंबं दिसु लागते त्याप्रमाणे श्रीकृष्णाने केलेला हा सर्व उपदेश अर्जुनाच्या मनात पुर्णपणे ठसला, चित्रे काढलेल्या भिंतीच्या समोरील भितं चकचकीत केल्यावर त्यामध्ये ज्याप्रमाणे त्या चित्रांचे प्रतिबिबं दिसते त्याप्रमाणे वैकुंठपती श्रीकृष्ण यांच्या मनातील बोध अर्जुनाच्या अंतकरणात प्रतिबिबींत झाला, अनुभव घेण्यामध्ये श्रेष्ठ असा जो अर्जुन, तो म्हणाला, धन्य धन्य ते ब्रम्हज्ञान की ज्याचे स्वरुप समजु लागलेच की त्याची गोडी वाढतच जाते, महाराज आपण आपले व्यापकपण सांगत असताना प्रसंगानुरुप जे निरुपधिक स्वरुपाचे वर्णन केले तेच निरुपाधिक स्वरुप एक वेळ पुन्हा मला त्यात काही न्युन न ठेवता सांगा. त्यावर द्वारकाधीश श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हा प्रश्न विचारुन भले केलेस. अर्जुना, आम्हाला देखील अध्यात्मासंबंधी बोलत रहावे असे वाटते परंतु काय करावे? या विषयासंबंधी बोलणारा कोणी भेटत नाही. आमची जी निरुपाधिेक स्वरुप वर्णन करण्याची इच्छा ती सफल करणारा तु भेटलास कारण तु अंतकरणपुर्वक तोंड भरुन विचारण्यास प्रवृत्त झाला आहेस. जो आनंद अद्वैत स्थिती प्राप्त झाल्यानंतर अनुभवावा, त्या सुखसंवादाच्या अनुभवाचें साधन तू झाला आहेस. कारण माझ्या स्वरुपासंबंधी प्रश्न विचारुन तु माझा आनंद मला देत आहेस. (ओवी ४४१ ते ४५०)
जसा आरसा समोर आल्यावर आपल्या डोळयांना आपले स्वरुप दिसते, त्याप्रमाणे तु शुध्द अंतकरणाने सुखसंवाद करत आहेस, त्यामुळे तुझ्यात माझेच प्रतिबिबं दिसत आहे हे प्रेमळ अर्जुना, तुला एकादी गोष्ट कळत नाही म्हणुन तू ती विचारावीस आणि मग तुला उत्तर देण्यासाठी आम्ही तयार व्हावे, असा अभिमान येथे नाही हा अंतकरणाचा प्रेमपुर्वक आलाप, संवाद आहे. असे बोलुन श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रेमाने आलिंगन दिले आणि कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहिले, मग देव पुन्हा अर्जुनाला काय बोलले ते श्रवण करा. ज्याप्रमाणे दोन्ही ओठांतुन एकच बोलणे निघते अथवा दोन्ही पायांनी एकच चालणे असते तसे तुढसे विचारणे व माझे सांगणे दोन्ही एकच आहे. देहाच्या उपाधीने माझ्यात व तुझ्यात भेद दिसत असला तरी देाघांत एकच तत्व असल्यामुळे सांगणारा व विचारणारा दोघेही एकच आहेत, अशा रीतीने देवाने मोहाने अर्जुनाला मिठी मारुन ते स्तब्ध राहिले मग बिचकले व म्हणाले हे ऐक्य प्राप्त करुन देणारे प्रेम या रणागंणावर उपयोगी नाही. ऊसाच्या रसाच्या पेयात चव येण्यासाठी मीठ घातले तर ते जसे वाईट होते त्याप्रमाणे आमच्या सुखसंवादात द्वैत उत्पन्न केले नाही, तर आज उमललेले प्रेम उद्या नाहीसे होईल. आम्ही नारायण व अर्जुन हा नर असल्यामुळे आमच्या दोघातं भेद नाही, परंतु आता माझा ऐक्यभावाचे प्रगटीकरण योग्य नाही हे प्रेम माझ्या ठिकाणीच विरुन जाऊ दे. असा विचार करुन श्रीकृष्ण अर्जुनाला एकदा म्हणाले, हे वीर अर्जुना, तु कोणत्या विषयांसंबंधी प्रश्न केला होतास ते पुन्हा एकदा सांग, श्रीकृष्णाने दिलेल्या प्रेममय आलिंगनामुळे अर्जुनाची देह बुध्दी संपुन तो श्रीकृष्णस्वरुपात रममाण झाला होता. तो पुन्हा आपण विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे ऐकण्यासाठी देहबुध्दीवर आला. (ओवी ४५१ ते ४६०)