अध्याय १५ भाग ७

     त्यावेळी अर्जुन सदगदित कंठाने बोलू लागला, देवा आपले निरुपाधिक रुप सांगा. अर्जुनाच्या या बोलण्याने शारंग नावाचे धनुष्य धारण करणारे श्रीकृष्ण निरुपाधिक रुपाचे वर्णन करण्यकरीता दोन प्रकारांच्या उपाधीने निरुपण करु लागले. आता अर्जुनाने निरुपाधिक स्वरुपासंबंधाने प्रश्न केला असता श्रीकृष्ण येथे उपाधी का सांगत आहेत अशी जर शंका कोणाच्या मनात येत असेल तर, मंथन करुन दहयातुन ताकाचा भाग वेगळा काढणे यालाच लोणी काढणे म्हणत असतात, अथवा सुवर्ण-शुध्दीसाठी किडाळ ज्याप्रमाणे शोधुन वेकळे करावे लागते पाण्यावर आलेले गोंडाळ हाताने दुर केले तर पाणी जसे शुध्द धान्य हाती घेण्यास काय हरकत आहे?  त्याप्रमाणे स्वरुपावरील उपाधी काढली असता सुक्ष्म विचार केला तर जे काही शिल्लक राहते ते शुध्द स्वरुप होय, हे कोणास न विचारताही कळते, त्याप्रमाणे सुशील मुलीला तिच्या पतीचे नाव विचारल्यावर ते न घेता ती लाजुन गप्प रहाते, तेव्हा तेच तिच्या पतीचे नाव समजायचे का? त्याप्रमाणे सर्व शब्द जिथे संपुन जातात ते अवर्णनीच असे शुध्द स्वरुप होय. स्वरुप साक्षात शब्दांनी सांगता येत नाही म्हणुन उपाधीचे वर्णन करणे हेच त्याचे सांगणे होय. म्हणुनच लक्ष्मीपती श्रीकृष्ण प्रथम उपाधी सांगतात. शुध्द प्रतिपदेच्या दिवशी आकाशातील चंद्राची कोर दाखवण्यासाठी जशी झाडाची फांदी दाखवावी लागते, त्याप्रमाणे भगवंताचे निरुपाधिक स्वरुप सांगण्यासाठी हे उपाधीचे बोलणे करावे लागले. (ओवी ४६१ ते ४७०)

     मग श्रीकृष्ण म्हणाले, अरे अर्जुना! ही या संसाररुपी नगरातील वस्ती स्वभावताच सहज आणि अल्प अश्या दोन पुरूषांचीच आहे, ज्याप्रमाणे संपुर्ण आकाशामध्ये दिवस आणि रात्र हे दोघे नांदत असतात, त्याप्रमाणे संसारुपी राजधानीत‍ही हे दोघेच नांदतात. आणखी एक तिसरा पुरुष आहे पहंतु तो या देाघांचे नाव देखील सहन करीत नाही ज्याचा उदय झाला असता तो संसाररुपी गावासह या दोन पुरुषांना खाऊन टाकतो. क्षर-अक्षर यांच्या पलीकडे उत्तम पुरुषाचे ज्ञान झाल्यास क्षर-अक्षर रहात नाही. परंतु त्या तिसऱ्या पुरुषाची गोष्ट राहु दे. प्रारंभी जे या संसारनगरामध्ये राहण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याविषयी तुला सांगतो, ते श्रवण कर, त्यापैकी एक आंधळा,वेडा आणि पंगु आहे. दुसरा पुरुष सर्वागांने परिपुर्ण आहे, पण दोघे ण्काच संसाररुपी गावात राहिल्यामुळे त्यांचा संग जडला आहे त्यापैकी एकाला क्षर पुरुष म्हणतात आणि दुसऱ्याला अक्षर पुरुष म्हणतात. या दोघांनी सारे संसाररुपी नगर व्यापुन टाकले आहे, आता क्षर पुरुष तो कोण? आणि अक्षर पुरुषाचे लक्षण काय आहे? याचे संपुर्ण विवेचन सांगत आहे. अर्जुना!  महदतत्व अहंकारादि कार्यापासून गवताच्या काडीपर्यत सर्व जे काही लहान-मोठे स्थावर-जंगम आहे किबंहुना जे मन-बुध्दीला विषय होते. जेवढे म्हणुन पंचमहाभुतापासुन तयार झाले आहे नाम व रुप यामध्ये जे सापडले आहे आणि जे सात्विक, राजस, तामस या तीन गुणांनी टाकसाळीतुन बाहेर पडणारे आहे. (ओवी ४७१ ते ४८०)

       जरायुक्त, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज अशी चार प्रकारची ठशाची नाणी ज्या सोन्यापासुन निर्माण होते ज्या द्रव्याने काळा जुगार खेळता येतो, विपरीत ज्ञानाने जे जे काही जाणले जाते अथवा जे जे प्रत्येक क्षणात उत्पन्न होवुन नाहीसे होते. अरे! भ्रांतीरुपी अरण्यात शिरुन जे सृष्टीरुपी अवयव निर्माण करते, थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्याला जगत् असे नाव आहे, जे सातव्या अध्यायात आठ प्रकारच्या प्रकृतीचे वर्णन करुन सांगितलेले आहे आणि तेराव्या अध्यायात जे क्षेत्र म्हणुन त्याचे छत्तीस भाग वर्णन केले आहे, त्या मागील गोष्टी किती सांगाव्यात?  आणि आताच या अध्यायात वृक्षाच्या रुपकाच्या पध्दतीने ज्याचे निरुपण केलेले आहे. ते चैतन्य आपल्या नगरामध्ये वास्तव्य करणारा मी पुरुष आहे असे मानुन स्थूल, सुक्ष्म या रुपाने आपणच या जगात नटलेले आहे ज्याप्रमाणे सिंह आडात आपले प्रतिबिंबं पहातो आणि क्रोधायमान होतो मग आवेशाने आडात उडी मारतो, अथवा आकाशापासुन निर्मान होणाऱ्या जलामध्ये जसे आकाशाचे प्रतिबिबं दिसते तसे मायेच्या उपाधीमुळे चैतन्य जगदाकार बनते, हे अर्जुना!  याप्रमाणे सृष्टीरुप नगरातील साकार ध्येय हेच आपल्या राहण्याचे गाव आहे, अशी कल्पना करुन जीवात्मा आपल्या ब्रम्हस्वरुपाच्या विस्मृतीने स्वस्थ पडुन रहातो, एखाद्या माणसाने स्वप्नामध्ये अंथरुण पाहुन त्यावर निजावे, त्याप्रमाणे देहरुपी नगरामध्ये आत्म्याचे शयन कल्पित आहे असे जाणावे.     (ओवी ४८१ ते ४९०)

       नंतर त्या गाढ निद्रेमुळे मी सुखी आहे, मी दुखी आहे, असे म्हणत तो घोरतो. तसेच ‘मी’ आणि ‘माझे’ असे शब्द गडबडीने मोठयाने बरळतो. ते माझे वडील‍ आहेत, ती माझी आई आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे मी पुर्ण आहे स्त्री, पुत्र, संपत्ती ही माझीच आहेत, हे अर्जुना! अशा स्वपनावरती स्वार होवुन जे चैतन्य ऐहीक व पारलौकिक विषयांच्या रानांमध्ये स्वैरपणाने धावत असते त्या चैतन्याला क्षर पुरुष हे नाव आहे. आता ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात त्या दशेस सारे जगत जीव म्हणते जो मुळ आत्मस्वरुपाच्या विस्मृतीने सर्व भुतमात्रांत संचार करतो, त्या जीवात्म्याला क्षर पुरुष म्हणतात, तो आत्मस्वरुपाने पुर्ण आहे म्हणुनही त्याला पुरुष नाव प्राप्त आहे शिवाय तो देहात निवास करतो म्हणुन त्याला पुरुष म्हणतात, तो भ्रमाने क्षर उपाधीशी तादात्म पावला आहे. म्हणुन तो परमार्थता अक्षर असुनही त्याच्यावर क्षरतेंचा खोटा आरोप आला आहे. ज्याप्रमाणे खळखळ वाहणाऱ्या पाण्यात चंद्रबिबं हालत असलेले दिसते, त्याप्रमाणे अनेक विकांराच्या उपाधीने आत्मा उपाधियुक्त भासत असतो. नंतर‍ तेच हालणारे पाणी नाहीसे झाल्यावर त्याच्यात दिसणारे चंद्राचे प्रतिबिबं नाहीसे होते, त्याप्रमाणे सर्व उपाधीचा नाश झाल्यावर चैतन्य उपाधीरहित दिसते, याप्रमाणे उपाधीच्यामुळे चैतन्यास क्षणिकत्व प्राप्त झाले आहे, उपाधीच्या या नाशवंतपणामुळे यास क्षर असे म्हणतात. (ओवी ४९१ ते ५००)

        याप्रमाणे सर्व जीव चैतन्यास ‘क्षर’ असे नाव आहे. असे जाणावे आता अक्षर पुरुषाची उत्तम प्रकारे कल्पना येईल, असे वर्णन करुन सांगतो, अर्जुना!  दुसरा जो अक्षर पुरुष आहे तो मध्यभागी आहे, ज्याप्रमाणे मेरु पर्वत हा पर्वतांच्या रांगेमध्ये मध्यभागी आहे. कारण जसा मेरु पर्वत पृथ्वी, पाताळ व स्वर्ग हया तीन लोकांमुळे तीन ठिकाणी वाटला जात नाही.त्याप्रमाणे  ज्ञान व अज्ञान या दोहोशीं तो संबंध करीत नाही.ते अक्षर मी ब्रम्ह आहे या यर्थाथ ज्ञानाने ब्रम्हयाशी ऐक्य पावत नाही किवां मी देह आहे  ब्रम्हतत्वाहुन वेगळा आहे अशा भ्रमज्ञानाने द्वैताचा  स्विकार करत नाही, जे शुध्द अज्ञान तेच अक्षराचे लक्षण होय. मातीमध्ये पाणी घालुन तिचा गोळा तयार केला तर तिचे मडके बनविण्यापुर्वी मातीपणा तर गेलेला असतो आणि मडक्याचाही आकार नसतो, त्या गोळयाप्रमाणे या अक्षर पुरुषाची मधली स्थिती आहे. समुद्र आटल्यानंतर तेथे लाटा नसतात आणि जलही नसते, त्याप्रमाणे जे अक्षर अव्यक्त अवस्थारुप आहे अर्जुना जागृत अवस्था जावुन स्वप्न अवस्था येण्याच्या मधील जी निद्रेची अवस्था त्याप्रमाणे अक्षराकडे पाहावे त्याला जाणावे. आणि जगाचा कास नाहीसा होतो व आत्मज्ञानाचाही बोध होत नाही या दोहोमधील जी अज्ञानप अवस्था तिला अक्षर असे म्हणावे. अमावस्येला सर्व कला नाहीशा होवुन जे चंद्राचे स्वरुप असते त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञानविरहीत अक्षराचे रुप आहे. सर्व स्थुल-सुक्ष्म उपाधीचां नाश झाल्यानंतर जीवदशादेखील त्या ठिकाणी प्रविष्ट होते फळ पिकल्यानंतर वृक्ष जसा त्या बीजात प्रवेश करतो. (ओवी ५०१ ते ५१०)

        त्याप्रमाणे देहादी उपाधीसह जीव-चैतन्य ज्या ठिकाणी लीन होवुन राहतात त्याला अव्यक्त असे म्हणतात. पुर्ण अज्ञान ज्या निद्रावस्थेत असते तिला ‘बीजभाव’ असे म्हणतात, आणि दुसरी स्वप्न व जागृती-अवस्था तिला ‘फलभाव’ असे म्हणतात. वेदांती ज्या स्थितीला ‘बीजभाव’असे म्हणतात, ते अव्यक्त अक्षर पुरुषाचे राहण्याचे स्थान आहे. ज्या अव्यक्तापासुन निर्माण झालेले भ्रमज्ञान विस्तारीत होवुन जागृती आणि स्वप्न निर्माण झाले आहेत, जे अव्यक्त द्वैत बुध्दीच्या रानात प्रविष्ठ झाले आहे, अर्जुना, ज्या अव्यक्तापासुन जीवत्व ही कल्पना, विश्व या कल्पनेस उत्पन्न करीत उठले त्या दोन्ही कल्पनांचा जेथे लय होतो तो अक्षर पुरुष जाणावा. दुसरा जो क्षर पुरुष म्हणजे जीव हा या विश्वामध्ये देह धारण करतो आणि जागृत व स्वप्न अवस्था याचां उपभोग घेतो. या दोन्ही अवस्था ज्याच्यापासुन उत्पन्न होतात त्या अवस्थेला अज्ञानघन सुषुप्ती असे नाव आहे, जिच्यात ब्रम्हप्राप्तीची उणीव आहे, हे वीर श्रेष्ठ अर्जुना, खरोखर या निद्रा अवस्थेपासुन जर स्वप्न किवां जागृती या अवस्था प्राप्त न होतील तर या अवस्थेस ब्रम्हाची प्राप्ती होईल असे निश्चीत म्हणता येईल परंतु सा निद्रारुपी आकाशामध्ये प्रकृती-पुरुषरुपी ढग येवुन जीव व शरीर यांची वृष्टी होते, हे असो, खाली शाखा असलेल्या या संसाररुपी वृक्षाचे जे मुळ आहे तेच या अक्षर पुरुषाचे स्वरुप होय. (ओवी ५११ ते ५२०)

       याला पुरुष का म्हणायचे तर हा स्वरुपाने परिपुर्ण आहे व मायारुपी नगरीमध्ये शयन करतो, म्हणुन त्याला पुरुष म्हणतात. आणि जन्म-मरणरुपी विकारांची येरझारा हा जो एक विपरीत ज्ञानाचा प्रकार आहे तो प्रकार या सुषुप्ती अवस्थेमध्ये समजत नाही, अशी ती मोठी सुषुप्ती अवस्था आहे. याकरीता हा अक्षर पुरुष आहे, असा वेदांतात सिध्दात केला आहे अशा सिध्दांताची महान प्रसिध्दी दिसुन येईल. याप्रमाणे मायेच्या उपाधीने चैतन्य जे जीवात्म्याचे रुप धारण करते, त्याला अक्षर पुरुष असे म्हणतात. आता विपरीत ज्ञानाने या विश्वात उत्पन्न होणाऱ्या ज्या जागृती व स्वप्न अवस्था आहेत, त्या गाढ अज्ञानरुपी तत्वांमध्ये म्हणजे सुषुप्तीमध्ये नाहीशा होतात. जे अज्ञान ज्ञानात बुडुन ज्ञानाच्याही पलीकडे गेल्यावर ज्याप्रमाणे लाकडास लागलेला अग्नी लाकुड जाळुन शेवटी आपणही नाहीसा होतो, याचप्रमाणे ज्ञानाने अज्ञानाला नष्ट केले आणि ब्रम्ह‍ स्वरुपाची प्राप्ती करुन देवुन ते स्वता ही नष्ट झाले  असे मग जे जाणणेपणाशिवाय जाणणे उरले. ते ज्ञान म्हणजे तो उत्तम पुरुष आहे. जो मागे सांगितलेल्या क्षर आणि अक्षर या दोन्ही पुरुषाहुन वेगळा आणि शेवटचा आहे. हे अर्जुना! सुषुप्ती आणि स्वप्न यापेक्षा जागृती जशी अनेक प्रकारांनी वेगळया ज्ञानाची अवस्था आहे.(ओवी ५२१ ते ५३०)

      अथवा किरणे आणि मृगजळ यांच्याहुन सुर्यमंडळ जसे अतिविशाल आणि वेगळे आहे त्याप्रमाणे तो उत्तम पुरुष आहे. हे उदाहरण राहु दे लाकडामध्ये असलेला अग्नी जसा लाकडारुन वेगळा असतो तसा क्षर आणि अक्षर यांहुन तो उत्तम पुरुष वेगळा आहे. कल्पांताच्या वेळी ज्याप्रमाणे समद्राची मर्यादा नाहीशी होवुन सर्वत्र जलमय झाले म्हणजे नदी व नद सर्व एक होवुन जातात. ज्याप्रमाणे प्रलयाचे वेळी अतितेज निर्माण होते आणि रात्र व दिवस गिळुन टाकले जातात, त्याप्रमाणे उत्तम पुरुषाचे ठिकाणी सुषुप्ती व स्वप्न नाही तसेच जागृतीही उरत नाही. मग द्वैत किवां अद्वैत हा भाव रहात नाही असणे व नसणे हे देखील कळत नाही, त्या उत्तम पुरुषाचे ठिकाणी अनुभवदेखील घाबरुन बुडून‍ गेलेला असतो कारण उत्तम पुरुष हा अनुभवाचा विषय नसुन अनुभवस्वरुप आहे. असे जे तत्व आहे, तेच ते उत्तम पुरुष आहे असे जाण. याला इहलोकी परमात्मा असे म्हणतात, अर्जुना, हे बोलणेसुध्दा उत्तम पुरुषाशी ऐक्याला प्राप्त न होता जीवदशेत राहुन बोलावे लागते, म्हणजे जीवात्म्याच्या क्रमाने बोलावे लागते जये अमुक मनुष्य नदीत बुडाला, ही बुडाल्याची वार्ता काठावर उभा असलेला मनुष्य सांगु शकतो,  त्याप्रमाणे अर्जुना, विवेकाच्या तीरावर स्वताला उभा केल्यानंतर कार्यकरण स्वरुप क्षराक्षर पुरुष हा अलीकडचा आहे व कार्यकरणातील उत्तम पुरुष पलीकडला आहे असे बोलणे वेदांना सोपे झाले आहे, नाहीतर उत्तम पुरुषासंबंधी काहीच बोलता आले नसते. म्हणुन क्षर-अक्षर पुरुष हे दोन्ही अलीकडचे आहेत असे पाहुन या उत्तम पुरुषाला पलीकडचे आत्मरुप असे म्हणतात, अशा प्रकारे अर्जुना, परमात्मा या शब्दांने त्या उत्तम पुरुषालाच सुचवितात. (ओवी ५३१ ते ५४०)

पुढील भाग