अध्याय १६ भाग १

ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी

सार्थ भगवद् गीता अध्याय१६

     दैवासुर संपद्विभाग योग

श्री ज्ञानदेवांनी भगवद् गीतेतील अध्याय१६ मधीलदैवासुर संपद्विभाग योगया अध्यायातील   ते २४ संस्कृत श्लोकांचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन ४७३ ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे. खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे, परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही अवघड वाटू लागली. श्री निवृत्तीनाथांचे परमशिष्य श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहे. हा श्री ज्ञानदेवांचा अमुल्य  कृपाप्रसाद आहे, मनुष्य जीवन जगण्यासाठी अनमोल संजीवनी आहे, किंबहुना संसारसागर पार करण्यासाठी अध्यात्मातील नौका आहे, तिच्या मदतीने संसार करता सावरता आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनसागरातुन तरुन जावे आणि आपल्या जीवनाचे कोटकल्याण साधावे. ही ज्ञानदेवांची  “अक्षरब्रम्ह ज्ञानेश्वरीआत्मसाद करुन जीवनाचे  सार्थक करावे.   

विश्व म्हणजे द्वैत आणि त्याचा आभास म्हणजे ज्ञानरुप प्रकाश या दोन्हीचा अस्त करीत दिव्य किरणे असलेल्या अद्वैतरुपी कमळाचा विकास करणारा अलौकिक सदगुरु सुर्य उदयाला आलेला आहे. त्याला माझा नमस्कार असो.  हा सदगुरूरुपी सुर्य अविद्यारुपी रात्रीवर रुसून अज्ञानरुपी चांदण्या गिळुन टाकतो, आणि ज्ञानी पुरुषाकरिता स्वच्छ असा आत्मप्रकाश ज्या दिवशी आहे असा आनंदमय दिवस उजडवितो, सदगुरूरुपी सुर्य उगवल्यामुळे आत्मज्ञानाच्या दिव्य प्रकाशात जीवरुपी पक्षी देह-अभिमानरुपी घरटयात जातात. ज्याचा उदय झाला असता लिंग-देहरुपी कमळाच्या कोशात अज्ञानाने व विषयांच्या आसक्तीने अडकलेल्या जीवरुपी  भ्रमराची बंधनातुन सुटका होते, तो सुर्यनारायण उगवला आहे. भेदरुपी नदीच्या दोन्ही काठांवर बुध्दी मोहीत करणाऱ्या शास्त्रांदिकांचा विसंगतपणा हीच कोण अडचणीची जागा, त्या जागेत एकमेकांच्या वियोगाने बुध्दी व बोध हे जणु चक्रवाक पक्षी ओरडत असतात, त्या बुध्दी-बोधरुपी चक्रवाक पक्ष्याचें जोडपे, ब्रम्हरुप आकाशात या सुर्याच्या उदयाच्या प्रकाशामुळे एकत्र होवुन समाधान पावतात, ज्या सदगुरुरुपी दिव्य सुर्याने प्रकाशलेल्या पहाटेच्या वेळी भेदांची चोरवेळ नाहीशी होवुन जाते व प्रवास करणारे साधक आत्मानुभवाच्या वाटेने निर्भयपणे चालु लागतात. ज्याच्या विवेकरुपी किरणांच्या संबंधाने सुर्यकांत मण्यातुन निघालेल्या ज्ञानरुपी ठिणग्या प्रज्वलित झाल्या असता त्या संसाररुपी महासिध्दीचा पुर आलेला दिसतो, जो आत्मबोधाच्या माथ्यावर  सोहंम् रुपी माध्यान्हाच्या वेळी आल्यामुळें  देहात्मभावाची म्हणजे मी देह आहे ही भ्रांतीची छाया पायाखाली पडते म्हणजे नाश पावते. (ओवी १ ते १०)

        तेव्हा मायारुपी रात्रच जेथे उरत नाही, तेथे विश्वस्वप्ना सहीत भ्रमबुध्दीरुपी निद्रेची आठवण तरी कोठुन राहणार? म्हणुन अद्वैत ज्ञानाच्या नगरात अमर्याद आनंद दाटुन राहतो. मग सुखानुभवाच्या देण्या-घेण्याचा व्यवहार हळुहळू मंद होवू लागतो, अधिक काय सांगावे? सदगुरु सुर्याच्या दिव्य प्रकाशाने अशा प्रकारे मुक्त कैवल्यस्वरुप भावरुपी उत्तम दिवस प्राप्त होतो. जो सुर्य आत्मस्वरुपी आकाशाचा राजा आहे, नियमीत बोधामृताचा उदय करणारा आहे पुर्वादी दिशांसह उदय व अस्त‍ यांचे अस्तित्व नाहीसे करुन टाकतो, ज्ञानासह अज्ञान नाहीसे करुन शेवटी ज्ञानाचाही लोप करुन आत्मज्ञानाचा दिव्य प्रकाश पसरवितो, फार काय सांगावे?  लौकिक  सुर्याच्या उदयाने होणारा प्रात:काल अधिक आनंददायक असतो. जो सदगुरुरुपी सुर्य दिवस व रात्र यांच्या पलिकडचा आहे, त्या ज्ञानसुर्याला कोणी पाहावे?  त्याला पाहण्याचा विषय करुन पाहणारा जगात कोण बरे आहे, जो दुसऱ्याच्या प्रकाशाशिवाय स्वत: स्वयंप्रकाशी असतोअसे चैतन्यरुपी  स्वयंप्रकाशी सदगुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांना  माझा (श्री ज्ञानरायांचा) त्रिवार नमस्कार असोपरमपुज्य श्री सदगुरूराया हे शब्दांचा विषय कधीच होत नसतात, त्यामुळे त्यांची स्तुती ही लौकिकर्थाने करत आहोत अन्यथा सदगुरूंना शब्द बाधुंच शकत नाहीत. ज्या वेळेस स्तुतीकरण, स्तोत्र व स्तुत्य ही त्रिपुटी नाहीशी होते तेव्हाच ती स्तुती चांगलेपणाला प्राप्त होते त्या तुमची स्तुती करण्यासाठी मध्यमा व पश्यंती या वाचा पोटात घालून नंतर ‘परा’ सह वैखरी वाणी नाहीशी होते. (ओवी ११ ते २०)

       त्या तुम्हालां हे अद्वैत आनंदरुपी सदगुरुराया, मी सेवक या नात्याने स्तुतिरुप अलंकार घालतो, हे अलंकार आपल्या योग्यतेच्या मानाने फारच कमी आहेत तरी आपण कृपेची सावली आणि वात्सल्याची माऊली आहात, या स्तुतीला प्रेमाने स्विकारावे. एखाद्या गरीब माणसाने अमृताचा सागर पाहिल्यावर त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याचा पाहुणचार कसा करावा, याचे भान न रहाता तो जसा  भाजीपाल्यांची मेजवानी करतो, त्या ठिकाणी भाजीपाला हेच पक्वान्न मानुन त्याची पाहुणचार करण्याची इच्छा महत्वाची मानली पाहीजे, कारण तो हर्षाने पाहुणचार करतो, तसेच तेजस्वरुप सुर्याला एकाद्या भक्ताने हातातील काडवातीने ओवाळले तरी त्याची आंतरीक श्रध्दा पाहणेच उचित आहे. लहान बाळास योग्य काय व अयोग्य काय हे जर समजले तर त्याचे बालपण ते कसले? त्याच्या विविध लीलांचे कौतुक पाहुन आईला संतोष होतोच ना? अरे , गावातील नद्यांचे पाणी गंगेला तुडवीत प्रवाहात आले तर त्याला गंगा कधी दुर करते काय?  भृगु ऋषीनीं भगवंताच्या छातीवर लाथ मारली हा किती मोठा जघंन्य घोर अपराध होता तरी परंतु तोच अलंकार म्हणुन भगवंतानी आपल्या हृदयावर गुरुप्रसाद म्हणुन “श्रीवत्सलांछन” चिन्ह बाळगले अथवा अंधाराने भरलेले जग हे सुर्याच्या उदयाने प्रकाशरुप होते त्यावेळी सुर्याने अंधाराला मागे सर असे कधी म्हटले आहे काय?  त्याप्रमाणे तुमच्या ठिकाणी भेदबुध्दीचा तराजु करुन तुम्हालां सुर्याबरोबर पारडयात घालुन तुमची तुलना केली, सदगुरुमहाराज हा माझ्या हातुन अपराध  घडला आहे तरी आपण मला क्षमा करावी. तु ध्यानगोचर नसताना देखील त्यांनी तुला ध्यानांच्या डोळयांनी पाहिले तुझे शब्दांनी वर्णन करता येत नसतानाही वेद-शास्त्र-पुराणांनी तुझे वर्णन करण्याचा प्रयत्न केला, अर्थात त्यांच्यासाठी  आपण जे सहन केले ते आमच्याकरीता सहन कर. तुझे गुणवर्णन माझ्या ह्दयात मावेना म्हणुन मुखातुन ते प्रगट होवु लागले आहे. परंतु असे होणे मी अपराध मानत नाही, माझ्या मनाची शांती होईपर्यत मी आपली स्तुती करणारच. (ओवी २१ ते ३०)

        मी गीतारुपी प्रसाद-अमृताचे अत्यंत आवडीने वर्णन करु लागलो आणि प्रसंगाने आपली सुध्दा स्तुती करु लागलो. तोच माझे भाग्य दुप्पट बळाने भाग्यवान झाले. माझ्या वाणीने पुष्कळ कल्पांपर्यत सत्य बोलण्याचे तप केले त्या तपाचे फळ म्हणजे हे गीतानामक महाद्विप प्राप्त झाले. मी लोकोत्तर पुण्य कर्माचे अंत:करणापासुन आचरण केल त्या पुण्यकर्मानी तुझे वर्णन करणे हे फळ मला देवुन आज ती माझ्या ऋणातुन मुक्त झाली आहेत. महाराज, मी आजवर भयानक जीवदशेच्या अरण्यात सापडलो होतो, मरणाच्या गावांत दु:ख भोगीत बसलो होतो. ती सर्व प्रकारची दुर्दशा आपण नाहीशी केलीत. जी गीता या नावाने सुप्रसिध्द आहे व अविद्येला जिंकुन बलवान झाली आहे, ती गीतारुपी तुझी किर्ती आम्हालां वर्णन करता आली. एकाद्या निर्धनाच्या घरी अकस्मात लक्ष्मी येवुन बसली तर त्याला निर्धन म्हणता येईल काय? अथवा अंधाऱ्या जागेवर दैवयोगाने सुर्यच आल्यावर तो अंधारच या जगाला प्रकाश देत नाही काय ? अंनतरुप देवाच्या समोर विश्व हे परमाणुच्या योग्यतेस येत नाही, तो भक्ताच्या भावासारखा होत नाही काय ? त्याप्रमाणे या गीतेतील भावार्थ प्रगट करणे म्हणजे आकाशपुष्पाचा वास घेण्याची इच्छा केल्याप्रमाणे अशक्य आहे, परंतु तुम्ही समर्थ सदगुरु आहात त्यामुळे माझी ही आंतरीक तीव्र इच्छा पुर्ण केली. म्हणुन महाराज आपल्या प्रेमळ कृपाप्रसादाने मी गीतेतील अगाध असलेल्या श्लोकांतील भावार्थ सांगेन, असे योगीराज श्री ज्ञानदेव म्हणतात. (ओवी ३१ ते ४०)

         तरी पंधराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व शास्त्रसिध्दात स्पष्ट करुन सांगितले प्रारंभी संसाराचे स्वरुप सांगण्यासाठी वृक्षाचे रुपक केले जाणकार वैद्याने शरीरातील गुप्त रोगांचे प्रगटीकरण करावे त्याप्रमाणे संसाराचे स्वरुप स्पष्ट केले. नंतर क्षर व अक्षर शब्दांनी कार्यकरण उपाधीचे स्वरुप प्रगट केले, अविनाशी असा जो देहातील जीवात्मा तो पुरुष या शब्दाने स्पष्ट करुन सांगितला, त्याने चैतन्याला मायेच्या उपाधीने आकारास आणले, नंतर केवळ परिशुध्द जे आत्मतत्व त्याला उत्तम पुरुष या शब्दाने स्पष्ट करुन सांगितले आत्मप्राप्तीसाठी अत्यंत बळकट असे जे साधन म्हणजे ज्ञान तेही स्पष्ट करुन सांगितले. म्हणुन आता या सोळाव्या अध्यायात निरुपण करण्यासारखे काही राहीले नाही, यापुढे गुरु आणि शिष्य या दोघांत केवळ प्रेमाची देवाण-घेवाण आहे. याप्रमाणे पंधराव्या अध्यायात सांगितलेले सर्व सुक्ष्म विचार ज्ञानी लोकांना समजले परंतु इतर जे मुमूक्षू होंते त्यांची शंका निवारण झाली नाही. हे मर्म जाणणाऱ्या अर्जुना, मला पुरुषोत्तमाला जो ऐक्यभावाने भेटतो, तोच सर्वज्ञ तसेच त्याच्या भक्तीचीही परिसीमा आहे. असे त्रैलौक्य नायक भगवान श्रीकृष्णाने पंधराव्या अध्यायातील शेवटच्या दोन श्लोकांत परमसंतोषाने ज्ञानाचे सुक्ष्म वर्णन केले आहे. हे ज्ञान सर्व संसाराला एका घोटात गिळून टाकते, ते पाहणाऱ्या जीवालाच त्याच्या स्वताच्या आत्मस्वरुपाचे ज्ञान देते आणि जीवास स्वानंद-साम्राज्यावर‍ अधिकारी म्हणुन नियुक्त करते. (ओवी ४१ ते ५०)

      एवढा बलवान असलेला मोक्षाचा उपाय ज्ञानावाचुन दुसरा कोणताही नाही असे श्रीकृष्ण म्हणाले, म्हणुन हा यर्थाथ ज्ञानाचा उपाय सर्व उपायांचा राजा आहे  याप्रमाणे आत्मज्ञानप्राप्तीची इच्छा करणारे जे होते त्यांना परम संतोष होवुन त्यांनी आपले प्राण अत्यंत आदराने ज्ञानावरुन ओवाळुन टाकले, आता असे आहे की, त्या वस्तुबद्दल मनात प्रेम निर्माण होते तीच वस्तु इतर वस्तूंना मागे सारुन मनात पुन्हा पुन्हा येवु लागते, असे प्रेमाचे लक्षणच आहे. म्हणुन जिज्ञासु पैकी ज्यांना कुणाला ज्ञानाचा अनुभव नव्हता, त्यांना ज्ञानाची प्राप्ती करुन घेवुन त्याचे रक्षण कसे करावे हा योगक्षेमाचा विचार स्फुरण पावणारच. म्हणुन तेच अपरोक्ष ज्ञान कशाने प्राप्त होईल व पुढे ते कसे वाढत जाईल हा विचार ही मनात येणारच. अथवा जे यथार्थ परोक्ष ज्ञानाला प्रारंभी उत्पन्नच होवु देत नाही आणि कदाचित ते उत्पन्न झाले तर त्या ज्ञानाला शास्त्राच्या विरुध्द आचरणाकडे प्रवृत्त करते अशी ज्ञानास विघ्न करणारी गोष्ट कोणती आहे, हे जाणणे आवश्यक आहे. मग ज्ञानाला हे विरुध्द असेल त्याला घालवुन टाकू आणि ज्ञानाला जे अनुकूल असेल त्याचा सर्व प्रकाराने विचार करु, तुम्ही सर्व जिज्ञासुंनी मनामध्ये ज्ञानाची इच्छा धारण केली आहे ती पुर्ण करण्यासाठी लक्ष्मीपती श्रीकृष्ण प्रस्तुत अध्यायात उपाय सांगणार आहेत, ज्ञानाची उत्तम वेळेवर प्राप्ती होईल त्याच्या योगाने स्वरुपाची प्राप्ती होईल्‍ अशा त्या दैवी संपत्तीचे वर्णन सांगणार आहेत. आणि ज्ञानाला नाहीशी करुन जी आसुरी संपत्ती राग व द्वेष यांना आश्रय देते, त्या भयानक आसुरी संपत्तीचेही वर्णन भगवान करणार आहेत. (ओवी ५१ ते ६०)

पुढील भाग