अध्याय १६ भाग ५

        पुण्यकर्माकडे प्रवृत्ती आणि पापकर्माकडे निवृत्ती असावी या विवेकज्ञानाची रात्र म्हणजे त्याचे मन असते. ज्याप्रमाणे कोशकिडा आपले घर बांधण्याच्या नादात त्या घरातुन आत-बाहेर  येण्या-जाण्यासाठी दार ठेवले पाहिजे या कडे लक्ष न देता कोश बांधता बांधता त्यात कोडंला जातो अथवा आपण दिलेले भांडवल परत येईल किवां नाही हा पुढील विचार न करता मुर्ख मनुष्य चोरास कर्जाने पैसे देतो त्याप्रमाणे आसुरी माणसे धर्माची प्रकृती आणि पापांची निवृत्ती हे दोन्हीही जाणत नाहीत तसेच पतीव्रता म्हणजे काय हे स्वप्नात देखील जाणत नाहीत. एकादे वेळी कोळसादेखील आपला काळेपणा टाकेल कदाचित कावळा सुध्दा पांढरा होईल अथवा राक्षसाला देखील अभक्ष्य भक्षण करण्याचा वीट येईल, पण अर्जुना मद्याच्या भांडयाला जशी पवित्रता नसते त्याप्रमाणे आसुरी लोकांनाही कधीच नसते ज्यांना शास्त्रशुध्द कर्माची इच्छा नसते, वडिलांच्या सदाचाराच्या आज्ञेची जे वाट पहात नाहीत, अथवा धर्मशास्त्राने सांगितलेल्या आचाराने वागावे हे आसुरी स्वभावाचे लोक जाणत नाहीत, ज्याप्रमाणे शेळी वाटेल तो पाला  खाते, अथवा वारा वाटेल तिकडे वाहत असतो अथवा अग्नी वाटेल त्या पदार्थाला जाळत असतो त्याप्रमाणे ते आसुरी लोक स्वैराचाराने वागत असतात, व त्याचे सत्याशी नेहमी शत्रुत्व असते. जर विचूं आपली नांगी मारुन लोकांना गुदगुल्या करु शकेल तरच ते आसुरी लोक सत्य भाषण करतील.(ओवी २८१ ते २९०)

        जर अपान वायुतमधुन सुगंध बाहेर येणे शक्य असेल तरच आसुरी लोकांना सत्याची प्राप्ती होवु शकेल, त्याप्रमाणे ते सात्विक आचरण न करता स्वभावताच वाईट असतात, आता आसुरी लोक काय बोलतात, त्याची नवलाई तुला सांगतो. एऱ्हवी उंटाकडे पाहु लागलो असता त्यांचा कोणता अवयव नीट आहे असे सांगता येईल? त्याप्रमाणे आसुरी संपत्तीच्या लोकांची स्थिती आहे परंतु आता प्रसंग आला म्हणुन त्याचें वर्णन करत आहे. धुराडयाचे तोंड धुराचे लोट जसे ओकित असते त्याप्रमाणे आसुरी लोकांचे बोलणे असते, त्यांचे बोलणे सांगण्यासारखे नाही तरीपण स्पष्ट सांगतो, त्यातील आशय जाणुन घे, विश्व एक अनादि स्थान आहे व त्या ठिकाणी ईश्वर हा सर्वात श्रेष्ठ राजा असुन तो विश्वाचा नियंता आहे, तसेच न्याय व अन्याय याचा निवाडा उघडपणे करतात, वेदांच्या दृष्टीने जो अन्याय ठरतो त्याला नरकभोगांची शिक्षा भोगावी लागते आणि वेदांनी ज्याला न्यायी मानले आहे तो स्वर्ग सुख भोगत असतो अर्जुना अशी ही न्याय-अन्याय याचा निवाडा करण्याची जगाची व्यवस्था आहे तिला आसुरी लोक खोटे म्हणतात, ज्यांना यज्ञ करण्याचे वेड आहे ते यज्ञ करुन फसले, जे देवतांच्या प्रतिमा व शिवलिगं यांची पुजा करत बसले तेही फसले भगवे वस्त्र धारण करणारे संन्याशी निष्कारण सर्वसंग परित्याग करुन फसले आणि समाधीत खरे सुख आहे या भ्रमाने योगी फसले अशा प्रकारे कोणतीही साधना न करता देहबुध्दीने बळाने जे जे विषय मिळवता येतील ते मिळवावेत आणि सुखाने रहावे यावाचुन वेगळे पुण्य  आहे तरी कोठुन?  अंगामध्ये शक्ती नसल्यामुळे विषयभोग एकत्र करुन जर त्याचा उपभोग घेता येत नसेल तर ते पाप होय.   (ओवी २९१ ते ३००)

       धनासाठी श्रीमंत माणसांचे प्राण घेणे म्हणजे जर खरे पाप असेल तर त्यांच्याकडील सर्व धन आपल्या हाताशी येते ते पुण्य नाही काय? जो बलवान असतो तो दुर्बलांचा नाश करीत असतो हे जर पाप म्हणावे तर मोठे मासे लहान माशाला खातात तर त्यांचे नि:संतान कसे होत नाही? वधु आणि वर उभय कुळांचा शोध करुन शुभ ग्रहांनी युक्त अशा वेळी विवाह केले जावेत हाच जर प्रजेच्या उत्पत्तीविषयी हेतु असते तर पशु-पक्ष्यांच्या ज्या अनेक जाती आहेत त्यांना तर अगणित संतती होते यावरुन विधिपुर्वक केलेला विवाहच प्रजेच्या उत्पत्तीला कारण आहे असे म्हणता येत नाही. चोरीचे धन जर आपल्या घरी आले तर ते कोणाला विष झाले आहे काय? जाराने परस्त्रीगमन केले तर कोणत्या तरी जाराच्या अंगाला कोड फुटला आहे काय? म्हणुन देव या विश्वाचा राजा आहे. तो जीवांना त्यांच्या धर्म-अधर्माप्रमाणे पाप-पुण्याची फळे भोगवयास लावतो आणि या लोकी केलेले कर्म मनुष्यास परलोकी भोगावे लागते, परंतु परलोक आणि ईश्वर दिसत नाही त्यामुळे त्यांच्याविषयी बोलणे व्यर्थ होय. पाप-पुण्य करणारा मनुष्य जर मृत्यू पावला तर त्याची फळे भोगावयास कोण उरतो? स्वर्गामध्ये उर्वशीसह इंद्र जितका सुखी असतो त्याप्रमाणे नरकातील किडा देखील त्यातच संतोष मानत असतात. म्हणुन नरक किवां स्वर्ग हे पाप अथवा पुण्याचे फळ नाही, कारण दोन्ही ठिकाणी कामाचा सुखोपभोग प्राप्त होतो. याकरता स्त्री आणि पुरुषाची जोडपी कामवासनेने एकत्र येतात तेव्हा सर्व जगत जन्माला येत असते. (ओवी ३०१ ते ३१०)

      आणि स्वताला भोगाकरता जे जे लागेल ते ते सर्व कामाकडुन पोसले जाते नंतर परस्परांत द्वेष उत्पन्न करुन कामाचा अथवा जगाचा नाश करतो, याप्रमाणे कामावाचुन जगाचे दुसरे मुळच नाही, असे जे बोलतात, ते आसुरी स्वभावाचे लोक आहेत असे जाणावे. आता हे वाईट बोलणे पुरे याविषयी आम्ही अधिक विस्ताराने बोलणार नाही कारण आसुरी लोकांचे मत वर्णन करताना वाणी निष्फळ होत आहे, आणि ईश्वराच्या तिरस्काराने ती नुसती बडबड करतात इतकेच नव्हे तर ईश्वर नाही हाच एक त्यांचा दृढनिश्चय झालेला असतो, फार काय वर्णन करावे? त्यांनी आपल्या अंगामध्ये उघड उघड धर्मबाहय वागण्याचे व बोलण्याचे पाखंड भरवीत अंतकरणामध्ये नास्तिकपणाचे हाड रोवले आहे. त्यावेळी स्वर्गाविषयी आदरभावना अथवा नरकाविषयी भय भावना या संस्कारांचा अंकुर जळुन गेलेला असतो. हे अर्जुना! मग अपवित्र जलाच्या बुडबुडयाप्रमाणे केवळ क्षणिक असलेलल शरीर त्या शरीररुपी खोडयात सापडुन विषयरुपी चिखलात पुर्ण बुडालेले असते. ज्यावेळी जलचरांचा नाश होण्याचा प्रसंग येतो त्यावेळी त्यांना धरण्यासाठी कोळीलोक डोहावर जमुन जाळी फेकतात, अथवा शरीर पडण्याच्या प्रसंग येतो तेव्हा रोगांचा उदभव होतो विश्वाचे अनिष्ट होण्याकरता जसा धुमकेतुचा उदय होतो त्याप्रमाणे जगाचा नाश करण्यासाठी आसुरी लोक जन्माला येतात. ज्याप्रमाणे अशुभाची पेरणी केली असता अशुभच कोबं येतात, त्याप्रमाणे ते आसुरी लोक पापाचे चालते-बोलते किर्तीस्तभं आहेत. (ओवी ३११ ते ३२०)

        आणि ज्याप्रमाणे अग्नीला मागे-पुढे आलेली वस्तु जाळण्याशिवाय समजत नाही त्याप्रमाणे कोणत्याही माणसाशी विरुध्द वर्तन करणे याशिवाय त्यांना दुसरे काहीच समजत नाही, अर्जुना! हे विरुध्द वर्तन करण्याचे काम ते ज्या उत्साहाने आंरभतात तो त्याचा उत्साहाचा प्रकार ऐक असे ज्यांच्या ह्दयात श्रीलक्ष्मी देवी निवास करते, ते वैकुंठपती श्रीकृष्ण म्हणाले. जाळे कधी पाण्याने भरत नाही, अग्नी कधी लाकडाने तृप्त होत नाही, अशा त्या तृप्त होण्यास कठिण असलेल्या वस्तुसाठी जो प्रथम प्रतीचा हपापलेला आहे असा जो काम त्या कामाचा जीवाभावाने आश्रय करुन अर्जुना! हे आसुरी लोक दंभ आणि अभिमान याचां समुदाय जमवतात, माजलेला हत्ती ज्याप्रमाणे मद्य पाजल्यावर तो अधिकच उन्मत्त होतो त्याप्रमाणे आसुरी लोक मुळचे मदाच्या ताठाने भरलेले असुन त्यात वार्धक्याच्या खुणा शरीरावर आल्याने अधिकच ताठतात. असे लोक दुराग्रही व हट्टी असतात, याशिवाय मुर्खपणाला सहाय्य करणारा त्याच्यासारखा तोच असतो तर मग त्याच्या निश्चयाची स्थिती काय बरे वर्णन करावी? ज्याच्या योगाने दुसऱ्यास पीडा होईल अथवा दुसऱ्याची प्राण हानी होईल ती कर्मे करण्याविषयी ते पक्के वतनदार असतात, आपण केलेल्या अशा कर्माचा मोठा गाजावाजा करतात, व जगातील लोकांना तुच्छ मानतात, त्याचां धिक्कार करतात आणि पैसा मान-सन्मान मिळवण्यासाठी दाही दिशांना इच्छेचे जाळे टाकतात, ज्याप्रमाणे गाय शेतात मोकळी सोडल्यानंतर ती पाहिजे तिकडे चारा खाते, त्याप्रमाणे आसुरांचे वागणे  स्वैर असते ते स्वताच्या आचरणाने पापाला महत्व आणतात, काम, क्रोध, लोभ  या विेकाराच्या सामुग्रीने ते कर्म करीत असतात, जगण्याच्या पलिकडे मृत्यूनंतर आपले काय होईल याची काळजी करतात. (ओवी ३२१ ते ३३०)

       ती चिंता पाताळापेक्षा खोल असते आणि जिच्या उंचीला आकाशसुध्दा ठेगंणे पडेल, तिच्या विस्ताराकडे पाहीले असता त्रिभुवन अणुएवढेही भासत नाही, नवीन संन्याश घेतलेल्या मनुष्यास नित्यनियमांची जशी आठवण राहते किवां पतीव्रता स्त्री पतीच्या मृत्यूनंतर सहगमन करते तसे हे लोक असार जे विषय आहेत ते मनामध्ये ठेवुन अखंड आणि अमर्याद चिंता वाढवतात. आसुरी लोक अतिशय विषयासक्त असतात, त्यामुळे स्त्रीने गायिलेले ऐकावे, स्त्रीचे स्वरुप डोळे भरुन पहावे, तिला आपल्या मिठीत घेवुन आलिंगन दयावे. असे त्यांना वाटत असते त्याप सुखावरुन अमृत सुध्दा ओवाळुन टाकावे अशा त्या‍ स्त्रीसुखापेक्षा दुसरे सुख नाही असा त्याच्यां  मनाने निश्चय केलेला असतो स्त्रीच्या भोगासाठी ते पाताळ, स्वर्ग किवां दाही दिशाच्या पलिकडे देखील धावत सुटतात. गळाला लावलेल्या अमिषाच्या आशेने मासा जसा ते खातो आणि गळात अडकतो, तसे हे आसुरी लोक विषयांच्या आशेने मृत्यू पावतात, त्यांना इच्छित वस्तु प्राप्त न करता आणखी  विषंयाची आशा करतच असतात. शेवटी कोशांतील किडयाप्रमाणे स्वतास बंधन करुन घेतात, आणि जी इच्छा वाढलेली असेल ती अपुर्ण राहीली तर द्वेष निर्माण होतो याप्रमाणे असुरांच्यामध्ये काम-क्रोधापेक्षा श्रेष्ठ असा पुरुषार्थ नसतो. अर्जुना! दिवसा कोतवाली करणे, लोकांचे संरक्षण करण्यासाठी गावात फेरफटका मारणे आणि रात्री उशीरापर्यत चौकीवर पहारे करणे याप्रमाणे चौकीदारास जशी विश्रांती नसते. (ओवी ३३१ ते ३४०)

       त्याचप्रमाणे कामाने उंचावरुन लोटले असता ते क्रोधाच्या खडकावर जोराने आपटतात, तरीपण ते पुन्हा विषयांवरच प्रेम करतात, आणि ‍त्यापासुंन निर्माण झालेल्या रागद्वेषामुळे ते कुठेही सामावत नाहीत, त्याप्रमाणे अंतकरणात विषयांची हाव असलेल्याना विषयवासनेचा समुदाय गोळा करावा लागतो. विषय भोगाच्या वासना तृप्त करण्यासाठी द्रव्याची आवश्कता असते विषयभोग भोगण्यासाठी ते भरपुर पैसा मिळण्यासाठी स्वैरपणाने जगाला लुबाडतात. एखाद्याला संधी साधुन मारुन टाकतात. एकाद्याचे सर्व काही लुबाडुन घेतात, व एकाद्याकरता अपायकारक क्लुप्त्या योजतात, पारधी लोक जसे हरीण आदी प्राण्यानां पकडण्यासाठी फासे, पोती, जाळी, कुत्री, ससाणे, चिकटे, भाले घेवुन डोंगरावर जातात, आपले पोट भरण्यासाठी अनेक प्राणी मारुन आणतात, त्याप्रमाणे आसुरी लोक निकृष्ट कृत्ये करुन आणि दुसऱ्याच्या प्राणघात करुन ते द्रव्ये मिळवतात ते द्रव्ये मिळाल्यावर त्याच्यां चित्तास कसा संतोष होतो त्याचे श्रवण कर. तो म्हणतो आज मी बहुतेक सर्वाची संपत्ती आपल्या हाती आणली आहे म्हणुन मी धन्य नाही काय? अशी तो जो जो आपली स्तुती करत असतो, तो तो मनात आणखीन लोकांना लुटण्याची इच्छा बाळगतो, आणि म्हणतो दुसऱ्याचे धन मी लुबाडुन आणेन, जेवढे काही आज मी मिळवले आहे त्या भांडवलावर चराचरामध्ये असलेली स्थावर, जंगम संपत्ती मी हरण करुन आणेन.   (ओवी ३४१ ते ३५०)

पुढील भाग