अध्याय १७ भाग २

ते तमोगुणाचे सार काढुन निर्माण केलेले पुरूष म्हणजे तामस श्रध्देचे घरच असतात असे जाण. याप्रमाणे सात्विक राजस व तामस अशा तीन प्रकारची श्रण्ध्दा जगामध्ये बनली आहे पण मी हे एवढयासाठी सांगत आहे की हे बुध्दिमान अर्जुना ही जी साथ्तवक श्रध्दा आहे तिचे मनामध्ये जतन करात इतर ज्या दोन सात्विक श्रध्देच्या विरुध्द राजस आणि तामस श्रध्दा आहेत त्यांचा त्याग करावा. धनंजया!  या सात्विक बुध्दीचेजे आचरण करतात त्यांना मोक्षाचा काही बाऊ वाटत नाही, ते सात्विक श्रध्दावान ब्रम्हसुत्रांचे अध्ययन करोत किवां सर्व शास्त्रांचा अभ्यास न करोत त्याज्ञच्या हातामध्ये स्वतंत्रपणाने शास्त्र-सिध्दांत नसोत परंतु जे श्रृति-स्मृतीचे अध्ययन करुन मूर्तिमंत वेद बनतात, आपल्या आचरणाने सर्व जगास पुज्य असतात असे जे कोणी वडील आहेत त्यांची धर्मरुपी आचरण करणारी पाऊले जाणुन जो मनुष्य परम श्रध्देने त्यांच्या पावलांवर पाऊलठेवुन चालतो त्याला त्यांना मिळणारे फळ प्राप्त होते. एक मनुष्य अतिशय श्रमाने दिवा लावतोआणि दुसरा मनुष्य त्याच दिव्याला दुसरा दिवा लावू लागला तर त्या दुसऱ्याला प्रकाश मिळणार नाही काय? अथवा एखाद्या माणसाने अपार र्दव्य खर्चुन मोठे घर बांधले तर तेथे काही वेळ राहवयास आलेला वाटसरु त्या घराचे सुख भोगणार नाही काय? हे असो जो तळे बांधतो त्याचीच तहान पाण्याने भागते इतरांची नाही काय? अथवा स्वयंपाक करणाऱ्यानीच अन्नाने तृप्ती होते आणि इतरांची होत नाही असे आहे काय? (ओवी ८१ ते ९० )

अधिक काय बोलावे?  गौतम ऋषींनी दीर्घ प्रयत्नांनी आणलेली गंगा नदी त्यांनाच पवित्र करते आणि इतर जगाकरता ती सामान्य ओहोळ झाली आहे काय? म्कणुन आपल्या ज्ञानाच्या अधिकाराप्रमाणे ते शात्रांचे अनुष्ठान करतात, त्यांचेप्रमाणे जे श्रध्दावान पुरुष आचरण करतात ते अज्ञानी असले तरी तरुन जातात. ज्यांना, खरोखर शास्त्रांचे अध्ययन तर काहीच नाही व धर्म शास्त्र शिकवण्याची ज्यानी नुसती इच्छादेखील केली नाही इतकेच नव्हे तर शास्त्र जे जाणतात त्यांना आपल्या गावाच्या हद्दीत राहु देत नाहीत वडिलांचे सात्विक आचरण पारुन जे त्यांस वेडावुन दाखवतात, पंडितांना पाहुन जे उपहासाने चुटक्या वाजवितात, आपल्याच अभिमानाने अंगात शस्त्रे खुपसुन रक्त-मांसाने यज्ञपात्रे भरभरुन जळत्या अग्नीकुंडात आहुती देतात लहान बालकाच्या तोंडाला रक्त लावुन नवस केलेल्या देवाला निष्पाप बालकाचे शरीर बळी देतात, कित्येक लोक आग्रहाच्या बळाने शुद्र देवताना श्रेष्ठ मानतात आणि त्यांना प्रसन्न करुन घेण्यासाठी सात दिवस उपास करतात. हे सुज्ञ अर्जुना! ते दुसऱ्याला दिलेले दुखरुपी बीज तामस शरीररुंपी शेतामध्ये पेरतात व त्याच्यापासुन पुढे तेच पीक उगवते, अर्जुना!  ज्याला स्वताला पोहता येत नाही आणि जो नावतही बसत नाही त्याची समुद्रात गेल्यावर दुर्दशा होते. (ओवी ९१ ते १०० ) अथवा जो रोगी वैद्यांचा द्वेष करतो आणि लाथांनी दिलेले औषध लंवडुन टाकतो, तो रोगी स्वताच यातना भोगीत बसतो.  अथवा डोळसाच्या द्वेषाने जो आपले डोळे बाहेर काढतो, तो आंधळा होतो आणि माजघरातच बसून राहतो. त्याप्रमाणे त्या असुरांची गती होते. जे असुर धर्मशास्त्रांची निंदा करतात, अज्ञानामुळे स्वैराचारच्या अरण्यात धावत राहतात किंवा जे असुर, कामाच्या आधीन होतात व त्याप्रमाणे आचरण करतात, क्रोधाच्या आधीन होऊन तो क्रोध ज्याला ठार करण्यास लावील, त्याला ठार करतात; एवढेच नव्हे; तर मलाही दु:खरूपी दगडांमध्ये पुरून टाकतात. आसुरी लोक हे स्वत:च्या अथवा दुसऱ्याच्या देहाला जे काही दु:ख देत असतात, ते सर्वही दु:ख देहात जीवरूपाने असलेल्य मला प्राप्त होते. पापी लोकांचा विचार वाणीने बोलू नये; परंतु त्यांचा त्याग करण्याकरता आम्हाला हे बोलणे भाग पडले. प्रेताला स्पर्श करू नये; परंतु स्पर्श करूनच त्याला गावाच्या बाहेर न्यावे लागते. वाईट वागणाऱ्याशी बोलू नये, परंतु गोड बोलूनच त्याला दूर सारावे लागते. फार काय, विष्ठादेखील हातानेच धुवावी लागते. त्याप्रमाणे पापीलोकांच्या संसर्गापासून टाळण्याकरता मी हा अनुवाद करत आहे. म्हणून त्या आसुरी लोकांच्या वर्णनापासून होणाऱ्या दोषांचा लेप लागणार नाही. परंतु अर्जुना, तु त्या पापी जनांना प्रत्यक्ष पाहशील, त्या वेळी त्या पापातून मुक्त होण्यासाठी माझे स्मरण कर. त्या पापक्षालनाला याशिवाय दुसरे कोणतेही प्रायश्चित उपयोगी पडणार नाही. म्हणून जी सात्त्विकश्रध्दा आहे तीच पुन:पुन: सर्वतोपरी उत्तम प्रकारांनी जतन करून ठेवावी.                         ( ओवी १०१ ते ११०) म्हणून ज्या योगाने सात्त्विक श्रध्दा लाभेल, त्याचीच संगत करावी आणि जे अन्न सेवन केल्याने सात्त्विक आहारावाचून दुसरे सामर्थ्यशील कारण नाही. अर्जुना! प्रत्यक्ष पाहा की, एखादा शुध्दीवर असलेला मनुष्य मद्य प्याला, की त्या वेळी तो त्याच क्षणी उन्मत बनून जातो. अथवा वाटेल त्या अन्नाचे सेवन केले, तर वात, पित्तकारक स्वभावाने तो मनुष्य व्यापला जातो. ताप आला असता दही, दुध सेवन केल्याने ताप कमी होईल का? अथवा अमृत सेवन केले असता मृत्यू टळून जातो व विषाचे सेवन केले असता मृत्यू प्राप्त होतो. आपण जसा आहार घेतो, तसाच देहातील रक्त-मांसदी धातूंचा आकार बनतो आणि धातूप्रमाणे अंत:करणातील भाव पुष्ट‍ होत असतो.ज्यप्रमाणे भांडे तापवल्यावर आतले पाणीही तापत असते, त्याप्रमाणे धातूंच्या अनुरोधाने आपली चित्तवृत्ती बनत असते. म्हणून सात्त्विक अन्नाचे सेवन केले असता सात्त्वि‍क भाव निर्माण होतो आणि राजस व तामस अन्नाचे सेवन केले असता त्या दोन गुणांची वाढ होते. तर सात्त्विक आहार कोणता राजस आणि तामस आहाराचे स्वरूप काय, हेही मी तुला आता सांगतो तरी तू आदराने आणि एकाग्रतेने श्रवण कर. सामान्यपणे आहार एकच असताना त्याचे सात्त्विक, राजस, तामस हे तीन प्रकार कसे झाले याचे स्पष्ट कारण सांगतो.(ओवी १११ ते १२० )

भोजन करणाऱ्याच्या रूचीप्रमाणे अन्न तयार केले जाते; आणि भोजन करणारा तर या तीन गुणांचा दास आहे. जीव हा कर्ता-भोक्ता आहे. तो तीन गुणांच्यामुळे स्वभावत: तीन प्रकारांना प्राप्त होऊन तीन प्रकारची कर्मे करीत असतो. म्हणून आहार तीन प्रकारचा आहे. यज्ञदेखील तीन प्रकारचा आहे. तप व दान हीदेखील जी कर्मे आहेत, ती तीन प्रकारची आहेत. प्रारंभी तुला आहाराचे लक्षण सांगतो, असे जे मी म्हटले ते ऐक. ते आता स्पष्ट करून सांगत आहे. जेव्हा भोक्ता जीव दैवयोगाने सत्त्वगुणाकडे वळतो, तेव्हा त्याची मधुर अन्न खाण्याची आवड वाढत असते. जे पदार्थ स्वभावत: रसयुक्त, तसेच स्वभावत: गोड व स्निग्ध असतात व जे पक्व झालेले असतात, जे आकाराने सुबक असतात आणि स्पर्शाने मृदू असतात, जे जिभेवर ठेवले असता चवदार लागतात, जे रसाने भरलेले असून वरून मऊ असतात, जे द्रव्यभावाने संपन्न आहेत आणि अग्नीच्या उष्णतेपासून सुटलेले आहेत, सदगुरूच्या मुखातील महावाक्यरूपी अक्षरे लहान असली, तरी त्यांचा परिणाम महान असतो, त्याप्रमाणे जे पदार्थ थोडेदेखील जरी खाल्ले, तरी अपार तृप्ती पुष्कळ काळ स्थिर राहते. जे अन्न मुखात घातल्यावर गोड लागते, तसे परिणामही गोड असते, त्या अन्नविषयी सात्त्विक मनुष्याचे प्रेम असते. (ओवी १२१ ते १३० )

अशा गुणांनी व लक्षणांनी जे भोजनास योग्य सात्त्विक पदार्थ आहेत, अशा पदार्थांचे सेवन केल्याने नित्य बल वाढत राहते. हे उत्तम बुध्दिमान अर्जुना! दिवसाच्या वाढीसाठी सूर्य जसा कारण आहे, त्याप्रमाणे सत्त्वगुणांचे पालन-पोषण करण्याविषयी हा सात्त्विक आहारच कारण आहे. शरीर व मन यांच्या बलाची वृध्दी या सात्त्विक आहारापासुन होते. मग त्या शरीरात रोगाचा शिरकाव कोठून होणार? हा सात्त्विक आहार जेव्हा सेवन करण्यात येतो, तेव्हा आरोग्य भोगण्याकरिता शरीराचे भाग्यच उदयाला आले, असे आम्ही समजतो. सात्त्विक आहाराचे सेवन केल्याने शरीराला आरोग्य प्राप्त होते, मन प्रसन्न होते, बुध्दीत सत्-चिंतन सुरू राहते, देह-इंद्रियांशी व सर्वांशी सुखाचा विस्तार होतो. सत्-चित्-आनंदाशी सख्य वाढते. आता हे वर्णन असो. याप्रमाणे सात्त्विक आहाराचा परिणाम श्रेष्ठ असून तो शरीराला अंतर्बाह्य सुखी करतो. आता राजस मनुष्याला ज्या अन्नरसाविषयी प्रेम असते, ते तुला प्रसंगानुसार स्पष्ट करून सांगतो. जे प्राण हरण करीत नाहीत, एवढाच काय ते कमीपणा! नाहीपेक्षा जे काळकूट विषाप्रमाणे कडू आहेत अथवा आंबटपणामध्ये जे जिभेला जादा चटका देणारे असतात, कणकेचा गोळा करण्यास जितके पाणी लागते, तितकेच त्यात मीठ घालतो आणि इतर पदार्थांमध्येही तितक्याच प्रमाणात मीठ घालतो.                                    (ओवी १३१ ते १४०)

असे अत्यंत खारट पदार्थ रजोगुणी माणसाला आवडतात आणि गरम-गरम पदार्थ खाण्याच्या निमित्ताने तो जणू तोंडाने आगच गिळत असतो. त्या गरम-गरम पदार्थाच्या वाफेवर टोकवर वात धरली असता तीदेखील प्रज्वलित होईल, इतके गरम-गरम पदार्थ तो भोजन करताना मागत असतो. वावटळीला मागे सारून पहारीच्या टोकाप्रमाणे प्रहार करणारा तिखट पदार्थ तो राजस पुरूष खात असतो. त्यामुळे जखमा न होताही शस्त्राप्रमाणे वेदना होत असतात. जे राखेपेक्षाही कोरडे आणि आतून-बाहेरून तिखटच आहे, असे जिभेला जणू चटका देणारे तोंडी लावणे त्याला आवडत असते. जे पदार्थ खात असताना दात एकमेकांवर आदळतील, ते पदार्थ तोंडात घालताना त्याला संतोष होऊ लागतो. अगोदरच झणझणीत पदार्थ; त्यात त्यांना आणखी मोहरी लावायची! असे पदार्थ सेवन केले असता नाका-तोंडातून वाफा निघतात. हेही असू दे. अग्नीलाही ‘गप्प बैस’ म्हणेल, तशा प्रकारचे अतिशय तिखट व दाहक रायते त्या रजोगुणी माणसाला प्राणापेक्षाही प्रिय असते. याप्रमाणे तोंडला पुरेसे न होऊन तो जिभेने वेडा केलेला रजोगुणी माणूस अन्नाच्या निमित्ताने पोटात भडभडा पेटलेला अग्नीच भरत असतो. त्या राजस रसामुळे त्याच्या अंगाचा दाह निर्माण होतो. त्यामुळे तो जमिनीवर अथवा अंथरूणावर लोळत पडतो, त्याला चैन पडत नाही; आणि पाण्याचे भांडे त्याच्या तोंडापासून सुटत नाही. रजोगुणी माणसाने खाल्लेले ते पदार्थ हे भोजन नव्हे; तर शरीरात रोगरूपी निवांत झोपलेले सर्प जागृत करण्याकरिता मादक पदार्थ पोटात घालणे होय. ( ओवी १४१ ते १५० )

त्याप्रमाणे एकमेकांच्या स्पर्धेत रोग एकदम उफाळून उठतात. याप्रमाणे राजस आहारापासून केवळ दु:ख हेच फळ मिळते. अर्जुना, याप्रमाणे राजस आहाराचे वर्णन केले आहे आणि तो आहार घेतल्याने होणारा परिणामही सांगितला. आता तमोगुणी माणसाला जो आहार आवडतो, तोही तुला सांगतो. ते ऐकून तुझ्या मनाला किळस येईल. तर कुजलेले, उष्टे अन्न खाताना यापासून अहित होईल, याचा विचारदेखील तामसी माणसाच्या मनात येत नाही. ज्याप्रमाणे म्हैस आंबोण खाते, त्याप्रमाणे सकाळी शिजविलेले दुपारी अथवा दुसरे दिवशी खाण्याची तामस माणसाला अतिशय आवड असते. अर्धवट शिजलेले अथवा संपर्ण करपून गेलेले आणि ज्यांत काहीच गोडी शिल्लक राहिली नाही, असे पदार्थ तमोगुणी माणूस खात असतो. जे पदार्थ उत्तम तऱ्हेने शिजवून तयार आहे, ज्या अन्नात रस निर्माण झाला आहे, ते ‘अन्न’ आहे, असे त्या तमोगुणी माणसास वाटत नाही. तामस माणसाला रूचिपूर्ण ताजे अन्न जरी प्राप्त झाले, तरी वाघ जसा मारलेल्या पशूला दुर्गंध सुटेपर्यंत थांबतो, त्याप्रमाणे ताजे अन्न शिळे होईपर्यंत, त्याला दुर्गंध येईपर्यंत तो खाण्यासाठी थांबतो.जे अन्न शिजवून पुष्कळ दिवस झाले आहेत, ज्या अन्नाची रूचीही संपलेली आहे, जो अन्न वाळलेले अथवा सडलेले आहे आणि ज्या अन्नात किडेदेखील झाले आहेत, असले अन्नही मुलांनी हातांनी चिखलाप्रमाणे चिवडलेले असले, म्हणजे बायको व मुला-बाळांना बरोबर बसवून अन्नाची सरमिसळ केलेली असते (ओवी १५१ ते १६० )

 अशा प्रकारचे घाणेरडे अन्न जेव्हा तो खातो, तेव्हा त्याला सुखाचे भोजन केले असे वाटते. परंतु अशा खाण्यानेही तो पापी तृप्त होत नाही. मग चमत्कार पहा. ज्या दोषयुक्त वाईट पदार्थांचा शास्त्रांनी सेवन करण्यास योग्य नाहीत, असा निषेध केलेला असतो, त्या अंमली पदार्थांचे व अभक्ष्य भक्षण करण्याविषयी त्या तामसी माणसाची हाव अतिशय वाढलेली असते. अर्जुना, याप्रमाणे तामस अन्न खाणारा माणूस अशा तामसी अन्नाविषयी अंत:करणात इच्छा धारण करतो, तेव्हा त्याचे फळ त्याला दुसऱ्या क्षणालाच मिळते. कारण, ज्या क्षणी तो तोंडात अपवित्र अन्न घालतो, त्याच क्षणी तो पापाला पात्र होतो. पापाला प्राप्त झाल्यानंतरही जो भोजन करतो, ती भोजनाची पध्दत चांगली आहे, असे म्हणू नये; कारण ती एक पोट भरण्याची यातना असते. शिरच्छेद केल्याने काय होते अथवा अग्नीत उडी घेतल्याने काय परिणाम होतो, या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो काय? पण पहा, तसलेही परिणाम तो तामसी सहन करत असतो. म्हणून अर्जुना, तामस अन्न खाल्याने दु:ख प्राप्त होते, हाच याचा परिणाम सांगण्याची आवश्यकता नाही, असे श्रीकृष्ण म्हणाले. आता यानंतर तीन प्रकारच्या आहारांप्रमाणे यज्ञही तीन प्रकारचे आहेत, हे लक्षात घे.‍ मोठेपणमध्ये शिरोमणी असणाऱ्या अर्जुना, त्या तीन यज्ञ-प्रकारांपैकी प्रारंभी सात्त्विक यज्ञाचे स्वरूप सांगतो, तरी त्याचे श्रवण कर. (ओवी १६१ ते १७०)

पुढील भाग