अध्याय १७ भाग ३

प्रियोत्तम पतीवाचून अन्य पुरूषाविषयी कामभाव निर्माण होऊ द्यावयाचा नाही, हा जसा पतिव्रता स्‍त्रीचा मनोधर्म असतो; अथवा गंगा समुद्राला येऊन मिळल्यावर पुढे जाण्याचा प्रयत्न करीत नाही अथवा आत्मसाक्षात्कार झाल्यावर वेदांचा उपदेश बंद होऊन जातो, त्याप्रमाणे जे लोक स्वत:च्या हिताकडे चित्तवृत्ती लावतात आणि कर्माच्या फळाच्या प्राप्तीकरिता कर्तेपणाचा कसलाही अभिमान शिल्लक ठेवत नाहीत, ज्याप्रमाणे जल हे झाडाच्या मुळांपर्यंत पोचल्यानंतर परत मागे फिरण्याचे जाणतच नाही आणि ते केवळ झाडाच्या अंगात मिळून त्याचे पोषण करते, तसेच जे मनाने व देहाने दृढनिश्चय करून यज्ञ करण्यात निमग्न परंतु त्या यज्ञापासून कोणत्याही फळाची इच्छा करत नाहीत, त्या फळाच्या इच्छेचा त्याग करणाऱ्या आणि स्वधर्मावाचून इतर क्रिया करण्याविषयी विरक्त असलेल्या त्या साधकाकडून सर्व अंगोपांगांनी भूषित जो यज्ञ केलेला असतो, आपले रूप जसे डोळयांनी आरशात पाहावे अथवा अंधारामध्ये तळहातावरचे रत्न दिव्याच्या प्रकाशात जरी पाहावे. सूर्यनारायणाचा उदय झाल्यावर आपल्याला चालवयाचा मार्ग जसा डोळयांना स्पष्टपणे दिसतो, त्याप्रमाणे वेदांमध्ये वर्णन केलेल्या यज्ञविधींचे वर्णन पाहून, त्या यज्ञात ती कुंडे, मंडप, वेदी यांची रचना शास्त्रसिध्द पध्दतीने केलेली असते. यज्ञाला लागणाऱ्या सर्व सामुग्रीची विपुलता असते. स्वत: यज्ञविधीनेच साऱ्या सामुग्रीचीजमवाजमव केली आहे, इतकी ती व्यवस्थित असते. आपल्या अवयवांना शोभतील असे अलंकार धारण केले, म्हणजे ते शोभून दिसतात, त्याप्रमाणे यज्ञाची सर्व सामग्री जिथल्या तिथे व्यवस्थित पध्दतीने मांडतात. (ओवी १७१ ते १८०)

त्या यज्ञाचे शब्दांनी काय बरे वर्णन करावे? जसे काही सर्व अलंकार घातलेली अशी यज्ञविद्याच यज्ञाच्या निमित्ताने ‍ प्रत्यक्ष प्रगटलेली आहे. अशा प्रकारे जो यज्ञ शास्त्रशुध्द विधिप्रमाणे सांगोपांग होतो आणि ज्यामध्ये कोणत्याही फलांची इच्छा नसते, तुळशीच्या झाडाचेपालन कर्तव्यबुध्दीने नीटसे केले जाते, त्या तुळशीच्या झाडापासुन फळांचा, फुलांचा अथवा सावलीचा आश्रय हे काहीही अपेक्षित नसते. अर्जुना, फार काय सांगावे? अशा कर्तव्यबुध्दीने फळाची कसलीही इच्छा न करता जो यज्ञ शास्त्रविधिप्रमाणे केला  जातो तो सात्विक यज्ञ आहे असे जाण. हे वीरेशा अर्जुना! राजस यज्ञाचे स्वरुप असे आहे की हा यज्ञ सात्विक यज्ञाप्रमाणेच व्यवस्थित संपन्न केला जातो परंतु श्राध्दाकरिता राजाला जसे भोजनाचे निमंत्रण द्यावे, जर राजा आपल्या  घरी आला तर त्याचा अनेक कामी आपल्याला उपयोग होईल आणि जगात आपली किर्ती होईल तसेच श्राध्दही राहणार नाही एवढे लाभ होतील, त्याप्रमाणे रजागुणी मनात अनेक फळांच्या इच्छा धरतो  आणि म्हणतो यज्ञामुळे मला स्वर्गप्राप्ती होईल, लोकांत दिक्षीत म्हणुन मान्य होईन आणि यज्ञही संपन्न होईल, याप्रमाणे हे अर्जुना, फळ प्राप्त व्हावे आणि जगात आपले महत्व वाढावे यासाठी जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ होय. पशु-पक्ष्यांच्या लग्नामध्ये कामावाचुन दुसरा जोशी लागत  नाही, त्याप्रमाणे तामस यज्ञाला आग्रक हेच मुळ म्हणजे प्रमाण होय. वारा स्वैर संचारी असल्यामुळे त्याच्या कडुन कोणताही एखादा विशिष्ठ मार्ग चालविला जाणार नाही मृत्यू जर मरण येण्यास मुहूर्त पाहील  किवां अग्नी जर निषिध्द पदार्थास भस्म करण्यास घाबरेल.                  (ओवी १८१ ते १९०)

तर तमोगुंणी पुरुषाच्या आश्रयाला विधिचे बंधन कसे असू शकेल? म्हणुन हे अर्जुना!  तो तमोगुणी पुरुषाचा आचार स्वैरपणाचा असतो. त्याला विधिची चाड नसते. मंत्रांची वगैरे जरुरी लागत नाही, माशीच्या तोंडात जाईल एवढे अन्नही तो देत नाही. त्या ठिकाणी सात्विक आचार संपन्न, ब्रम्ह जाणणाऱ्या पुरुषासंबंधी पुर्ण वैरभाव असतो मग दक्षिणेचा विचार कोठुन  होणार?  आणि अग्नी ज्याप्रमाणे वाऱ्याने वणव्यासारखा भडकतो, ज्याला पुत्र नाही त्याचे घर त्यांच्या भाऊबंदाकडुन जसे लुटले जाते त्याप्रमाणे सर्व द्रव्य व्यर्थ खर्च होवुन त्यामध्ये थोडीदेखील  श्रध्दा नसते असा जो दांभिक यज्ञ, त्याला तामस हे नाव आहे, असे ते लक्ष्मीचे निवासस्थान असलेले श्रीकृष्ण म्हणाले. गंगेचे पाणी एकच असते परंतु त्याला वेगवेगळया मार्गानी घेवुन गेले असता एका मार्गाने अमंगलता प्राप्त करुन देते आणि दुसऱ्या मार्गाने शुध्दता व पवित्रता प्राप्त करुन देते, त्याप्रमाणे तप हे तीन प्रकारचे झाले आहे, राजस अथवा तामस यापैकी कोणतेही तप केले असता ते पाप देते, आणि सात्विक मार्गाने तप केले असता ते उध्दार करुन देते, उत्तम बुध्दी असलेल्या अर्जुना!  तप तीन भेदानी कसे झाले आहे हे तु समजुन घेवु पाहत असलास तर प्रथम तप म्हणजे काय हे तु जाणून घे. तर तप म्हणजे काय याचे स्वरुप मी तुला सांगतो मग ते तीन गुणांनी कसे भिन्न झाले आहे ते नंतर सांगतो, तर शुध्द आणि पवित्र  जे तप ते शाररीक, वाचिक, मानसिक असे तीन प्रकारचे आहे त्याचे आता श्रवण कर.(ओवी १९१ ते २००)

आता या तीन प्रकारापैकी प्रथम “कायिक तप” कोणते हे लक्षात घे तरी ज्याला जो देव आवडत आहे मग तो भगवान शकंर असो अथवा भगवान विष्णू असो, त्या प्रिय देवतेच्या मंदिराकडे जाण्याकरता अथवा दुर देशातील देवतांची  यात्रा-पुजा करण्याकरता पायांना जणू अष्टैाप्रहर भोवरा बांधला आहे देवाने अंगण झाडुन सुशोभित करण्याकरता, पुजासाहीत्य पुरवण्याकरीता आणि देवांची सेवा करण्याविषयी ज्याचे हात शिवशिवतात. शिवलिंग अथवा विष्णूंची मुर्ती पाहिल्याबरोबर जो दंडाप्रमाणे जमिनीवर अंग टाकुन सदभावे नमस्कार घालतो, आणि शास्त्रशुध्द आचरण , विद्या, विनय, आदि गुणांनी जे लोकात आहेत त्या ब्रम्हज्ञानी ब्राम्हणांची उत्तम प्रकारे सेवा करतो जे प्रवासाने शिणले आहेत रोगाने पछाडलेले आहेत संकटाने त्रासले आहेत, त्या जीवांना आपल्या प्रयत्नाने सुखी करतो, सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ असलेले जे माता-पिता यांच्यासाठी शरीराचे लिंबलोण उतरुन टाकतो, आणि संसारासारखे भयंकर दुख ज्याची भेट झाल्यामुळे दुर होते, तो आत्मज्ञान प्रदान करणारा आणि दयावान असणारा सदगुरु याची सेवा करतो, आणि अर्जुना! देहभिमान रुपी मळ नाहीसे करण्याकरीता जो स्वधर्मरुप अग्नीत वेदांची अध्ययनरुपी पुटे (आहुती) देतो, प्रत्येक भुतमात्रांमध्ये समरुपाने परमात्मा आहे अशा भावनेने सर्वाना नमस्कार करतो, सर्व भुतमात्रांची परोपकारांने सेवा करतो परस्त्रीविषयी मातेसमान बुध्दी ठेवुन वारंवार मनाचा निग्रह करतो, आणि स्वताच्या पत्नीविषयी फक्त नावापुरते गमन करतो. (ओवी २०१ ते २१०)

ब्रम्हचारी माणसांने जन्माच्या वेळी मातृस्वरुप असणाऱ्या स्त्रीदेहाला बाल-अवस्थेत स्पर्श करणे प्राप्त असते परंतु तारुण्यावस्थेत संपुर्ण आयुष्य स्त्रीदेहाला स्पर्श होवु न देता सोवळे ठेवावे. गवतामध्ये जीवचैतन्य असते हे जाणून तो ते तुडवीत नाही कुणाला उलट-सुलट बोलुन दुखवत नाही, ज्यावेळी शरीरामध्ये अशा प्रकारच्या आचरणाचा प्रकाश पडतो त्या वेळी शारीरिक तप भरास आले असे जाणावे. अर्जुना!  या सर्व क्रिया देहाच्या अनुरोधाने घडुन येतात, या सर्व क्रियेत शरीर हे मुख्य आहे म्हणुन मी याला “शारीरिक तप” ( कायिक तप ) म्हणतो. याप्रमाणे जे शारीरिक तप आहे त्याचे स्वरुप तुला सांगितले.  आता निर्दोष जे वाड्मय तप आहे. त्याचे तु श्रवण कर. तरी आता असे पहा की, परीस हा लोखंडाचा आकार, वजन थोडेही कमी  न करता ज्याप्रमाणे त्याचे सुर्वण बनवितो, त्याप्रमाणे  ज्याच्या योगाने ऐकणाऱ्याच्या जवळ असणाऱ्या मित्रालादेखील दुख न होता सुख होते असा  ज्या बोलण्यात चांगुलपणा दिसुन येतो झाडाला पाटाचे पाणी जात असते त्यावेळी  जवळचे गवतही ते फुलवित असते तसे एकाला उद्दुशुन जे बोललेले असते त्यापासुन सर्वाचे हीत  व्हावे अमृताच्या देवनदीतील पाणी पिल्याने प्राणी अमर होतो ज्या देवनदीमध्ये स्नान केल्याने पाप नाहीसे होते पवित्र संसारतापापासुन ते मुक्त करते आणि ते अमृतमधुर पाणी पिल्याने गोडीही वाढते, त्याप्रमाणे अज्ञान नाहीसे होवुन आत्मस्वरुपाची अनुभुती येते आणि रुचीमुळे अमृताविषयी जसा वीट येत नाही, त्याप्रमाणे ते बोलणे कितीही ऐकले तरी त्याचा वीट येत नाही.  (ओवी २११ ते २२०)

 जर एखाद्या साधकाने काही प्रश्न  केला तर वरील प्रकारच्या लक्षणांने बोलणे असावे, अथवा बोलायचे नसेल तर वेदांचे अथवा हरीचे स्मरण करावे. ऋग्वेदादि वेदांची वाणीरुपी मंदिरामध्ये प्रतिष्ठा करावी, स्वता वेदांचे अध्ययन करुन वेद पाठ करावेत, शिष्यांना शिकवण्यासाठी आपल्या वदनाची वेदशाळाच करावी. शंकराचे अथवा विष्णूंचे दोघापैकी कोणाचे एक नाव वाणीमध्ये सतत रहावे. हे वाचेपासुंन उत्पन्न होणारे “वाचिक तप” जाणावे.  आता मानसिक तप जे आहे तेही सांगतो, आता त्याचे श्रवण कर, असे लोकनाथांच्या नायकांचे नायक जे श्रीकृष्ण ते म्हणाले. लाटांनी सरोवर आणि मेघांनी आकाश टाकले असता अथवा सर्पाने चंदनाचे वन टाकले असता त जसे शांत असते अथवा कलांच्या कमी-जास्त होण्याने जसे चंद्राला ग्रासले तरी मानसिक चिंतेने राजा जसा ग्रस्त होत नाही अथवा मंदराचलानेक्षीरसागर घुसळला असता तो जसा शांत असतो. त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या संशयांच्या जाळयातुन बाहेर पडल्यावर जे मन केवळ आत्मस्वरुपाने शांत राहते, उष्णतेशिवाय जसा प्रकाश असावा, जडत्वापासुन अन्नात रस असावा, अथवा पोकळीवाचुन जसे आकाश असावे, तसे आपले मुळचे स्वरुप जाणुन जो आपला स्वभाव त्यागतो त्याचे थंडीने अंग काकडल्यावर त्याला थंडीची बाधा होवु शकत नाही अचल आणि कंलकरहीत असे चंद्रा‍चे बिबं जसे परिपुर्ण असते तसे आत्मस्वरुपी हे मन स्थिरावलेले असते.                                   (ओवी २२१ ते २३०)

 वैराग्याची इच्छा देखील जेथे नाहीशी झाली आहे आणि मनाचा दाह व भीती जेथे कमी झाली आहे तेथे मन आत्मस्वरुपी स्थिर होते. म्हणुन ज्या मुखाने शास्त्रांचे अध्ययन करायचे ते मुख मौनसंपन्न बनलेले असते, जसे मिठाने आपले वास्तव स्वरुप पाणी त्याला स्पर्श केला असता स्वताला धारण करु शकत ‍ नाही, त्याप्रमाणे ते मन आत्मस्वरुपाच्या प्राप्तीमुळे मनपणाला धारण करण्याचे जाणत नाही, जेथे मनपणाच शिल्लक राहीला नाही तेथे विविध संकल्पादी भाव कसे निर्माण होतील की ज्या भावामुळे ते मन इंदियांच्या मार्गाने धाव घेवुन विषयांच्या गावी पोहचु शकेल? म्हणुन तळहातावर ज्याप्रमाणे केस नसतात त्याप्रमाणे अशा तऱ्हेने तयार झालेल्यामनाच्या ठिकाणी कोणतेही संकल्-विकल्प नसतात. अर्जुना, अधिक काय सांगावे? जेव्हा मनाला अशी अलौकिक अवस्था प्राप्त होते तेव्हा ती “मानस तप” या नावाला प्राप्त होते. असो मानस तपाचे संपुर्ण लक्षण तुला सांगितले आहे ते जाण, असे देव‍ म्हणाले. याप्रमाणे शरीर, वाणी, मन यांच्या भेदाने जे तीन प्रकारांनाप्राप्त झाले आहे ते सामान्य तप तुला सांगितले आहे आता तीन गुणांच्या संगाने हेच तप तीन प्रकारचे कसे होते ते उत्तम बुध्दीने आणि  एकाग्रतेने श्रवण कर. हे ज्ञानवंत अर्जुना, हे जे तूला तीन प्रकारचे तप सांगितले त्याचें श्रध्देने आचरण कर आणि फलाची अपेक्षा धरु नकोस. (ओवी २३१ ते २४०)

ज्यावेळी हे त्रिविधतप पुर्णपणे शुध्द अंतकरणाने व आस्तिक्य बुध्दीने व परमश्रध्देने केले जाते त्यावेळी या तपाला ज्ञानी लोक सात्विक तप असे म्हणतात. अथवा तप करण्याच्या हेतुने जगात द्वैताचा प्रसार करुन मोठेपणाच्या शिखरावर बसण्याची जे इच्छा करतात, त्रैलौक्यातील सन्मान आपल्याशिवाय कोणाला मिळु नये सभेमध्ये व भोजनाच्या पंक्तीत आपल्याला प्रथम स्थान मिळावे जगाच्या स्तुतीला आपण पात्र व्हावे  आणि सर्व जगातील लोकांनी आपल्या दर्शनास यावे, लोकांनी आपली विविध प्रकारे पुजा करावी आणि सर्व प्रकारचे भोग आपणासच भोगावयास मिळावे, ज्याप्रमाणे वारांगना ही विविध प्रकारचा शृंगार आपले शरीर विकण्याकरता करते तसे लोक ते तपाचे ढोगं निर्माण करुन आपले स्वरुप लोकासं विकतात, आता हे वर्णन असो, धनाची व मान-सन्मानाची आशा वाढवुन जे अतिशय कष्टाने तप केले जाते‍ त्यास राजस तप म्हटले जाते. परंतु पहुरणी नावाच्या किडयांने ज्या गाभण गुराचे स्तन चोखले असता ती गुरे जसे पुढे दुध देत नाहीत अथवा गुरांनी उभे शेत खाल्ले तर पिकण्यासाठी जसे काही उरत नाही. तसे सर्वत्र आपली प्रसिध्दी पसरावी या हेतुने केलेले तप व त्याचे फळ पाहु गेले तर शेंवटी व्यर्थ होते. अर्जुना, ते तप निष्फळ झालेले पाहुन मध्येच बंद केले जाते, म्हणुन अशा तपाला स्थिरता नसते. (ओवी २४१ ते २५०)

एरवी असे पहा की, अकाली मेघ आकाश भरुन टाकतो आणि ब्रम्हांड फुटेल अशा मोठया गर्जना करतो तरी तो घटकाभर तरी आकाशात राहतो काय? त्याप्रमाणे राजस तप असते जे फळाच्या दृष्टीने व्यर्थ असते आणि आचरणानेही स्थिर नसते, आता यापुढे जे तामस तप आहे, तेही अशा प्रकारचे आहे त्यात किर्ती आणि स्वर्ग या दोघांचीही प्राप्ती होत नाही. अर्जुना, केवळ मुर्खपणाचा वारा मनामध्ये बाळगुन जे आपल्या शरीरास वैरी असे समजतात, पंचाग्नीच्या ज्वाला शरीराला लावल्या जातात अथवा शरीर हे सरपण केले जाते, व पंचाग्नीमध्ये लावले जाते, आपल्या डोक्यावर शेगडी घेवुन गुग्गुळ धुप जाळतात पाठीमध्ये गळ खुपसतात, भोवताली अग्नी पेटवुन त्यामध्ये शरीर जाळतात, श्वासोच्छवास बंद करुन व्यर्थच उपवास करतात, आणि खाली करुन ठेवलेल्या तोंडाने धुराचे घास घेतात, कडाक्याच्या थंडीच्या दिवसात गळयापर्यतच्या थंड पाण्यात उभे रहातात, नदीच्या काठावर उघडया अंगाने बसतात आणि ज्या तपाने आपल्या अंगाचे जिवंतपणीच मांसाचे लचके तोडतात, अर्जुना!  अशा नाना प्रकारांनी शरीरात क्लेशाचे घाव खुपसतात, असले अघोरी तप ते दुसऱ्यांच्या नाशासाठी करतात, आपल्या अंगाच्या वजनाने पर्वतावरुन सुटलेला अवजड धोंडा खाली पडला की त्याचे तुकडे-तुकडे होतात, शिवाय जे त्याच्या आड येतील त्याचाही ते चुराडा करतात. (ओवी २५१ ते २६०)

पुढील भाग