अध्याय १८ भाग १०

         त्याप्रमाणे वैराग्याची साधने शास्त्रध्दि अभ्यासाने परिपक्व झाल्यावर आत्मज्ञान प्रगट होते. मग त्या आत्मज्ञानाने अविद्या नष्ट पावतात. ज्याप्रमाणे गंगा सागराला मिळाली, की ती सागररूप होते, त्याप्रमाणे बुध्दी आत्मस्वरूप झली, म्हणजे अद्वैतानंदाची खाण आपोआप उघडली जाते. याप्रमाणे ज्या सुखला वैराग्य हे मुळ कारण असून ‘आत्मानंदप्राप्ती’ हा ज्याचा परिणाम आहे, त्या सुखाला ‘सात्त्विक सुख’ असे बोलले जाते. आणि अर्जुना, विषय आणि इंद्रियांचा संबंध झाला, म्हणजे ते सुख दोन्ही काठांच्या बाहेर जाऊ लागते. सरकारी अधिकारी आपल्या गावात आला असता लोक त्याचे उत्साहाने स्वागत करतात; पण नंतर तो अन्याय करू लागला, की दु:ख होते. कर्ज काढून लग्न मोठया प्रमाणात केले असता बरे वाटते; पण पुढे कर्ज फेडताना दु:ख होते. रोगी माणसास साखर आणि केळी खाताना बरे वाटते; पण रोग वाढल्यावर दु:ख होते बचनागाची गोडी प्रारंभी बरी वाटते; परंतु नंतर त्याचा परिणाम, म्हणजे मृत्यू पाहून अतिशय दु:ख होते. चोराची मैत्री प्रारंभी बरी वाटते; पण पुढे त्याने आपलीच चोरी केली, की दु:ख वाटते. बाजारातील वारंगनेची भेट प्रारंभी सुखकर वाटते पण पुढे रोगाचे दु:ख भोगावे लागते. गारूडयाचे आश्चर्यकारक प्रयोग माणसाची करमणूक करतात; परंतु पुढे फसवणूक झाल्याने दु:ख वाटते. तसेच, विषय-इंद्रियांच्या संबंधाने जीवाला सुख होते; परंतु त्याचा परिणाम दु:खकारक होतो. खडकावर साचलेल्या पाण्यावरील तारकांचे प्रतिबिंब पाहून ती रत्ने आहेत, असे समजून हंस त्यांवर उडी घालतो; पण रत्नांची प्राप्ती न होता तो जसा प्राणास मुकतो, त्याप्रमाणे मिळवलेली सर्व संपत्ती संपते, आयुष्याचा आधार असलेले आरोग्य नाहीसे होते; आणि धन व पुण्य नष्ट होऊन जाते. भोगलेले जे विषय ते स्वप्नाप्रमाणे नाहीसे होऊन जातात; आणि दु:खांच्या राशीत लोळत पडलो, हेच वाटयाला राहते. (ओवी ७९१ ते ८००)

राजस सुख इहलोकी असे आपत्तीच्या रूपाने परिणामाला प्राप्त होते व परलोकात तर ते परिणामी विष होऊनच उतरते. कारण इंद्रियांचे लाड वाढविले असतो धर्माचा हिरवागार मळा खाक जाळून विषयांचा सोहळा भोगला जातो. मग त्या पातकांना थारा मिळून ती बलवान होतात व नरकप्राप्ती करून देतात.ज्या इहलोकाच्या सुखने परलोकी असा घात होतो, विष हे स्वादाने मधुर; परंतु परिणामाने मात्र हरण करणारे आहे, त्याप्रमाणे इहलोकाचे सुख प्रारंभी गोड असून परिणामी ते कडू आहे. अर्जुना, ते सुख खरोखर रजोगुणाचे बनलेले आहे; म्हणून त्या तशा सुखाला तू कधीही स्पर्श करू नकोस. अमली पदार्थाच्या सेवनाने, अभक्ष्य-भक्षणाने व स्वैर स्त्रीच्या संगतीने निर्माण होणारे जे सुख मिळते; किंवा दुसऱ्यास ठार मारण्याने अथवा दुसऱ्याचे धन चोरल्याने अथवा कपटाने हरण केल्याने अथवा भाटांच्या स्तुतीने जे सुख प्राप्त होते; जे आळसाने अथवा झोपेने वाढते, ज्याच्या आरंभी आणि शेवटी आत्मप्राप्तीचा मार्ग विसरला जातो, अर्जुना, ते सुख पूर्णपणे तामस आहे, हे तू जाण. या सुखासंबंधी मी फार वर्णन करत नाही; कारण तमोगुणाची कथा ही सुखाची असणे संभवत नाही. याप्रमाणे सुखाला कारण जे कर्म, तेही तीन प्रकारचे असल्यामुळे त्या कर्माचे फळ जे सुख, तेही तीन प्रकारचे झालेले आहे, ते तुला यथाशास्त्र स्पष्टपणाने सांगितलेच आहे. (ओवी ८०१ ते ८१०)

संपूर्ण जगतामध्ये लहान-मोठया ज्या वस्तू आहेत, त्यातली एकही  वस्तू  कर्ता, कर्म आणि कर्म-फल या त्रिपुटावाचून दुसरे काहीच नाही. आणि अर्जुना! पट जसा तंतूंनी गुंफलेला असतो, तशी त्रिपुटी तीन गुणांनी गुंफलेली आहे. म्हणून हे लक्षात ठेव की, प्रकृतीच्या सत्त्वादी गुणांनी बध्द न झालेली अशी कोणतीही वस्तू मृत्यू-लोकात अथवा स्वर्गात नाही. लोकरीशिवाय घोंगडी, मातीशिवाय चिखलाचा गोळा अथवा जलाशिवाय लाटांना उत्पत्ती आहे का? त्याप्रमाणे असा कोणताही प्राणी खरोखर निर्माण झालाच नाही, की जो गुणांशी संबंध न होता जगताच्या रचनेबरोबर निर्माण झालेला आहे. याकरता हे सर्व प्राणिमात्र केवळ तीन गुणांचेच बनले आहेत, असे समज. या तीन गुणांची शक्ती एवढी अफाट आहे की, त्यांनी एका ब्रह्मा, विष्णू व महेश असे तीन देव केले. एका लोकाचे स्वर्ग, मृत्यू व पाताळ असे विभाग पाडले आणि चार वर्ण व त्यांची कर्मे वेगवेगळी  केली. हे चार वर्ण कोणते आहेत, असे जर तू विचारलेस, तर या चार वर्णांमध्ये ब्राह्मण हे मुख्य असुन  अग्रभागी आहेत. इतर जे क्षत्रिय आणि वैश्य हे जे वर्ण आहेत, तेही ब्राह्मणांच्या बरोबरीने मानावेत; कारण ते वेदविरहित कर्माचे अधिकारी आहोत. हे अर्जुना! चौथा जो शूद्र वर्ण आहे, त्याचा वेदांशी अधिकाररूपाने संबंध नाही, तरीदेखील त्यांचा धार्मिक आचार आणि लौकिक व्यवहार हा तीन वर्णांच्या अधीन आहे. (ओवी ८११ ते ८२०)

त्या ब्राह्मणादी तीन वर्णांच्या सेवावृत्तीच्या सान्निध्याने शूद्रलाही चौथ्या वर्णात गणिले आहे. ज्याप्रमाणे श्रीमंत लोक फुलांच्या हारांच्या संगतीने सुताचादेखील वास घेतात, तसे वेदांनी ब्राह्मणांच्या संगतीने शूद्रांचाही वर्णांमध्ये समावेश केला आहे. अर्जुना, अशा चार प्रकाराने चार वर्णांची व्यवस्था झाली आहे. आता त्यांनी करवयाच्या कर्ममार्गाचे स्वरूप तुला सांगतो. ज्या गुणांनी हे चार वर्ण जन्म-मृत्यूच्या कात्रीतून सुटून ईश्वराशी एकरूप होतात, ही परमेश्वराच्या अश्रित असलेल्या प्रकृतिरूप स्वभावापासून उत्पन्न झालेल्या ज्या सत्त्वादी गुणांनी चार वर्णांच्या ठिकाणी चार प्रकारची कर्मे वाटून दिलेली आहेत. जशी वडिलांनी स्वता मिळवलेली संपत्ती स्वताच्या मुलाना वाटुन द्यावी, अथवा सुर्यनारायणाने विविध वाटसरुनां वेगवेगळे मार्ग दाखवावेत अथवा मालकाने आपल्या नोकरांना निरनिराळी कामे वाटुन द्यावीत, त्याप्रमाणे प्रकृतीचे जे गूण त्यांनी कर्माचा विस्तार करुन त्यांची चार वर्णाच्या ठिकाणी विभागणी केली आहे, येथे सत्वगुणाने आपल्या सम-विषम भागाने ब्राम्हण व क्षत्रिय वर्ण निर्माण केले रजागूण आणि सत्वगूण यांच्या मिश्रणाने वैश्य वर्ण उत्पन्न झाला तर रजोगुण आणि तमोगुण यांच्या मिश्रणाने शुद्र वर्ण  निर्माण झाला, हे बुध्दीमान अर्जुना! अशा प्रकारे एकाच मनुष्यप्राणी समुहा मध्ये  चार  गुणांचा चार प्रकारचा भेद केला आहे असे जाण. (ओवी ८२१ ते ८३०)

आपण ठेवलेली वस्तू जशी दिव्याच्या प्रकाशाने सहजपणे दिसते तसे गुणांनी वेगवेगळे झालेले कर्म हे शास्त्र दाखवीत असते. हे श्रवण भक्तीच्या भाग्याचे निधान लाभलेल्या अर्जुना!  कोणत्या कर्माला  कोणते कर्म विहित आहे त्याचे लक्षण तुला सांगतो तरी ते ऐक. ज्याप्रमाणे पत्नी आपल्या पतीशी एकांतामध्ये समरस होते त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या ताब्यात घेवुन बुध्दी आत्म्याशी  ऐक्य पावते, असा जो बुध्दीचा लीनपणा, अंर्तमुखपणा त्याला शम असे म्हणतात. तो सर्व गुणांमध्ये प्रथम असुन त्यापासुन सर्व कर्माचा प्रारंभ होतो, बाह्य ज्ञानेंद्रिये आणि कर्मेद्रियें या धेंडाना, धर्मविधिच्या दंडाने ठोकुन तो अधर्माकडे कधीही जाऊ देत नाही. तो शमाला चालविणारा दुसरा गुण म्हणजे दम होय, तो सर्व इंद्रियांना स्वधर्माकडे घेवुन जातो, तसेच मुल जन्मल्यानंतर सहाव्या दिवशी म्हणजे सटवीच्या रात्री दिवा लावण्याचे जसे विसरले जात नाही, त्याप्रमाणे सदैव ईश्वराचा विचार चित्तात बाळगणे, त्याला तप हे नाव आहे, हे तिसऱ्या गुणांचे स्वरुप आहे, तसेच पापरहित शौच दोन प्रकारचा आहे,मन हे शुध्द भावाने भरले आहे. अर्जुना!  त्याला अंर्तबाहय शौच असे नाव आहे ते  शौच ब्रम्हकर्मातला चौथा गुण आहे, पृथ्वी जशी  सर्व अपराध सहन करते जो गुण तसे सर्व काही सहन करतो. (ओवी ८३१ ते ८४०)

अर्जुना! त्याला क्षमा म्हणावी,सप्तस्वरातील पंचम स्वर जसा मधात गोड द्राक्षे बुडविल्याप्रमाणे अतिमधुर असतो, त्याप्रमाणे हा पाचवा गुण अत्यंत महत्वाचा आहे, वाकडया-तिकडया  ओघाने जरी गंगा वाहु लागती तरी तिच्या मधील पवित्रपणा सरळच असतो अथवा वाकडया ऊसातील रसाची गोडी जशी सरळ म्हणजे मधुर असते, त्याप्रमाणे आपणास त्रास देणाऱ्या प्राणीमात्रांवरही अत्यंत प्रेम करणे यास आर्जव असे म्हणतात. ब्रम्हकर्मातील हा सहावा गुण आहे. माळी कष्ट करुन प्रयत्नाने वृक्षाच्या मुळाशी पाणी घालत असतो त्याचे हे श्रम त्या वृक्षाला फळे आल्यावर जसे सार्थकी लागतात, त्याप्रमाणे शास्त्रशुध्द कर्माने अंतकरण आंतरबाहय शुध्द करुन परमेश्वराची प्राप्ती करुन घेणे होय. हे निश्चीत पणे जाणणे ते या कर्मात ज्ञान होय. ते ज्ञान ब्रम्हकर्मापैकी सातवा गुण होय आणि ज्ञान हे अशा स्वरुपाचे आहे, हे समजुन घे. शास्त्राच्या सुक्ष्म विचाराने  आणि ध्यानाच्या  साधनेने ईश्वरस्वरुपी जी बुध्दी सत्व शुध्दीच्या वेळी निश्चयाने मिळते, तिला ‘विज्ञान’ असे म्हणतात, ते ब्रम्हकर्मापैकी आठवे गुणरत्न होय, आणि ‘आस्तिक्य’ हा नववा गुण जाणावा, असे पाहा की, राजमुद्रांकितं कोणीही मनुष्य असला तरी त्याची आज्ञा लोक मानत असतात, त्याप्रमाणे वेदांनी कर्म,भक्ती व ज्ञान हे मार्ग स्वीकारलेले आहेत, ते मार्ग आदराने मानणे, त्याला मी ‘आस्तिक्य’ असे म्हणतो, तो ब्रम्हकर्मापैकी नववा गुण होय व या गुणाने ब्रम्ह-कर्म खरे व पुर्ण होते. (ओवी ८४१ ते ८५०)

याप्रमाणे क्षमादिक नऊ गुण ज्या ठिकाणी निदोर्ष दिसुन येतात, ती ब्राम्हणांची स्वाभाविक कर्मे आहेत असे समज. तो ब्राम्हणवर्ग नवरत्नांचा  केवळ सागर आहे, सुर्य जसा सदैव प्रकाशाला  धारण करतो त्याप्रमाणे ब्राम्हणवर्ग नवगुणांरत्नांचा हार  अखंड धारण करतो, चाफयाचे झाड हे चाफ्याच्या फुलांनी सदैव फुललेले असते, बहरलेले असते, चंद्र जसा चांदण्यानी नित्य शुभ्र झालेला असतो, ब्राम्हणाने भाळावर लावलेले चंदन ज्याप्रमाणे आपला स्वाभाविक सुगंध सोडत नाही, त्याप्रमाणे नवगुणरुपी अलंकार हे ब्राम्हणाचे अव्यंग लेणे आहे, हे  अलंकार  ब्राम्हणाचे अंग कधी सोडत नाही, हे क्षत्रिय अर्जुना!  क्षत्रियांचे उचित कर्म आहे ते तुला सांगतो, तरी बुध्दी एकाग्र करुन त्याचे श्रवण कर. जसा सुर्य हा प्रकाशाकरिता इतर कोणाच्याही सहाय्याची अपेक्षा करत नाही, अथवा सिंह हा जसा शिकारीच्या बाबतीत सोबतची अपेक्षा करत नाही, तशा प्रकारे सहाय्याशिवाय स्वयंभु व बलवान असलेला शौर्य तो क्षात्रकर्मातील श्रेष्ठ व पहिला गुण आहे. सुर्याच्या प्रखर तेजाने कोटयावधी नक्षत्रे लोपुन जातात, परंतु तो तेजस्वी सुर्य मात्र त्या चंद्रासहित कोटयावधी नक्षत्रांसह लोप पावत नाही, त्याप्रमाणे आपल्या अचाट पराक्रमाने जगाला आश्चर्यचकित करुन सोडणे आणि कसलाही प्रसंग आला तरी आपण घाबरुन न जाणे असा जो प्रशंसा करण्यास योग्य गुण तेज तो त्या क्षात्रप्रकृतीचा दुसरा गुण होय, धैर्य हा त्या क्षात्रप्रकृतीचा तिसरा गुण होय.  (ओवी ८५१ ते ८६०)

जरी वरुन आकाश जरी कोसळुन खाली पडले तरी ज्यांची मन किवां बुध्दी विचलीत होत नाही,ते या क्षात्रकर्मातील धैर्य होय, सरोवरातील पाणी कितीही अथांग असले तरी त्याला भेदुन कमळ हे पाण्यावर येवुन विकसीत होते, अथवा आकाश हे उंचीविषयी सर्व पदार्थाना जिकंत असते, तसे विविध प्रकारचे प्रसंग प्राप्त झाले तरी फलरुप जो अर्थ त्याला बुध्दी जिकंत असते, याप्रमाणे अखंड सावधगिरी ठेवणे याला दक्षता असे म्हणतात, तो त्या क्षात्रप्रकृतीचा चौथा गुण होय, आणि बुध्दीमध्ये अलौकिक पराक्रम असणे हा त्याचा पाचवा गुण होय. सुर्यकमळे जशी सदैव सुर्याकडे तोंड करुन उगवत असतात, त्याप्रमाणे तो शत्रुला कधीही पाठ दाखवत नाही, ज्याप्रमाणे गरोदर स्त्री पतीच्या शय्येवर जाण्याचे विविध  प्रकारांनी चुकविते, त्याप्रमाणे युध्दभुमीवर असताना शत्रुला पाठ दाखविण्याचे तो चुकवितो, अर्जुना! ऐक चार पुरुषार्थाच्या वर भक्ती  हा जसा पाचवा पुरुषार्थ आहे त्याप्रमाणे क्षत्रियांच्या आचारातील श्रेष्ठ असा हा पाचवा गुण आहे, वृक्ष जसे उत्पन्न झालेली फळे व फुले लोकांना देण्याविषयी उदार असतो, कोणालाही पाहिजे तेवढे चांदणे जसे घेता  येते, त्याप्रमाणे याचकाच्या इच्छेप्रमाणे जे देणे असते, त्याला अमर्याद दान असे म्हणतात ते क्षत्रियप्रकृतीचे सहावे गुणरत्न होय, आणि आज्ञेचे रहाण्याचे एक स्थान  क्षत्रिय होय.  (ओवी ८६१ ते ८७०)

आपल्या शरीराचे उत्तम प्रकारे पोषण केले असता त्याकडुन अवघड कामेही करुन घेता येतात, त्याप्रमाणे प्रजेचे प्रेमाने उत्तम प्रकारे पालन-पोषन केले असता सर्व प्रजा राजाची आनंदाने आज्ञा पाळते. त्याला ईश्वर भाव असे नाव आहे. जो ईश्वरभाव सर्व सामर्थ्याचे स्थान आहे तो या क्षात्र-प्रकृतीच्या सर्व गुणांचा राजा असा सातवा गुण आहे, ज्याप्रमाणे आकाश हे सप्तऋषीनीं सुशोभीत दिसते,  त्याप्रमाणे शौर्यादिक सात गुणांनी क्षात्रकर्म सुशोभीत असते, अशा प्रकारे त्या सात पवित्र अशा गुणांनी जे कर्म पवित्र झालेले असते, ते क्षात्र-प्रकृतीचे स्वाभाविक कर्म होय, असा जो पुरुष, तो क्षत्रिय नसुन सत्वगुणरुपी सोन्याचा  मेरु पर्वतच आहे, म्हणुन सत्वगुणरुपी क्षत्रिय स्वर्गाला धारण करतो, अथवा सत्वगुणरुपी सागरानी वेष्टित केलेली ही  क्षात्र-प्रकृतीरुप धनधान्याने समृध्द पृथ्वीच आहे, अथवा सात गुणांच्या प्रवाहाने वाहणारी क्षात्रक्रियारुपी गोदावरी गंगा क्षत्रियरुपी महोदधी नावाच्या सागराच्या अंगात सप्तमुखाने संगम पावुन जणु काही विलास करीत आहे, परंतु हे वर्णन राहु दे, अर्जुना!  क्षत्रिय प्रकृतीची  शौर्यादी गुणात्मक कर्मे ही स्वाभाविक आहेत. हे महान बुध्दीमान अर्जुना ! आता वैश्यांच्या ज्या योग्य व शुध्द क्रिया आहेत त्या तुला मी आता सांगत आहे तरी  श्रवण कर. जमीन, बीज, व नांगर या भांडवलाच्या आधारे पुष्कळ नफा मिळवणे हे वैश्यकर्म होय. (ओवी ८७१ ते ८८०)

पुढील भाग