अध्याय १८ भाग १२

      ज्याप्रमाणे गर्भवती स्त्री मारली असता तिच्या पोटातील गर्भ जसा आपोआप नष्ट होतो त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाला म्हणजे कर्म आणि सर्व कर्माचा समुळ नाश होणे हा जो संन्यास होय तो त्याला प्राप्त होतो, त्यामुळे अज्ञानाचा त्याग केला असता सर्व दृश्य विश्व नसल्यासारखे होते आणि जे जाणायचे आहे ते तो स्वताच आपोआप होतो. स्वप्नामध्ये आपण डोहात पडलो असे आपणास वाटले तरी जागे झाल्यावर आपल्याला डोहातुन बाहेर काढण्याचा  प्रयत्न करावा लागतो काय?  तेव्हा मी माझ्या स्वरुपाला जाणीन ह अनिष्ट स्वप्न नाहीसे होते आता जाणणारा आणि जाणण्याचा विषय या भेदावाचून केवळ ज्ञानरुप आकाश तो झालेला असतो, अर्जुना, आपल्या प्रतिबिंबासहीत आरसा दुर केल्यानंतर ज्याप्रमाणे पाहणारा हा पाहतेपणाशिवाय राहतो त्याप्रमाणे ब्रम्हासंबंधी अज्ञान गेले तर त्याने आपल्याबरोबर ब्रम्हविषयक ज्ञानही नेले तर मग क्रियारहित असे जे केवळ ज्ञानमात्रच उरते, अर्जुना! त्या मुळ ब्रम्हस्वरुपात कोणतेही कर्म नाही म्हणुन त्याला नैष्कर्म म्हणतात. ज्याप्रमाणे वारा शांत झाल्यावर लाट आपल्या मुळच्या समुद्राच्या रुपात रहाते, त्याप्रमाणे ते आपले असलेले मुळचे स्वरुप आपल्याच ठिकाणी स्थिर होवुन रहाते. त्याप्रमाणे अज्ञान नाहीसे झाले असता जीव हा ब्रम्हच आहे आपल्या ब्रम्हस्वरुपात कर्म न होणे जेव्हा सिध्द होते तेव्हा तीच नैष्कर्मसिध्दी होय. ही सर्व सिध्दीत श्रेष्ठ अशी सिध्दी होय.  (ओवी ९७१ ते ९८०)

जे वैराग्य म्हणजे मोक्षफलाने दिलेले तारण होय. कळस बसविल्यावर देवळाचे काम जसे पूर्ण होते; अथवा गंगा नदी सागरास मिळाली म्हणजे तिचे वाहणे जसे थांबते; अथवा सोने शुध्द करत असताना सोळ आणे कस लागला म्हणजे ज्याप्रमाणे शुध्द करण्याची क्रिया बंद होते, त्याप्रमाणे आपले अज्ञान ज्या ज्ञानाने नाहीसे केले, ते ज्ञानही जेव्हा नाहीसे होईल, अशी जी अवस्था त्यापेक्षा परमार्थात काही प्राप्त होणे राहत नाही; म्हणून तिला ‘परमसिध्दी’ असे म्हणतात. पण सदगुरूंच्या कृपेच्या आधारे ज्या कोणी भाग्यवान पुरूषास ही आत्मसिध्दी प्राप्त होते, सूर्यनारायणाच्या उदयाने अंधकारच हा प्रकाशमय होतो किंवा दिव्याच्या संगतीने कापूर हा दिवाच होतो, मिठाचा लहान खडा जलामध्ये मिळताच जसा जलरूप होऊन जातो, अथवा निजलेल्या माणसाला जागे केले असता स्वप्नासह झोप नाहीशी होऊन जाते आणि तो पुरूष जसा आपल्या जागृतीच्या रूपाला प्राप्त होतो, त्याप्रमाणे  दैवयोगाने सदगुरुंनी उपदेश केलेल्या महावाक्याचे श्रवण झाल्यावर जीव आणि ब्रम्ह यातील द्वैत नाहीसे होवुन वृत्ती आत्मस्वरुपी स्थिर होते. मग त्याला काही कर्तव्यकर्म आहेत. असे त्याला कोण बरे म्हणले? आकाश ज्याप्रमाणे सर्वत्र भरलेले असल्यामुळे त्याला इकडुन तिकडे आणि तिकडून इकडे जावे लागते काय? म्हणुन ज्यास आत्मसिध्दी प्राप्त झालेली आहे त्याला काही एक कर्तव्य उरत नाही. परंतु ज्या साधकाला एवढा अधिकार प्राप्त झाला नसेल. (ओवी ९८१ ते ९९०)

जो कोणी साधक तो सदगुरुची वचने ऐकल्याबरोबर ब्रम्हस्वरुप होतो. एरवी ज्याला कमी बुध्दीमुळे महावाक्याच्या श्रवणाने वस्तुरुप होता येत नाही त्याने स्वधर्म रुपी अग्नीमध्ये काम्य व निषिध्द कर्मरुप काष्ठाच्या आधारे प्रारंभी रज, तम हे दोष नाहीसे केले आहेत. शिवाय पुत्र, द्रव्य, स्वर्गादिक लोक या तिन्हीच्या विषयांची इच्छा सेवकाप्रमाणे त्याच्या अधीन होवुन राहिलेली असते. पुर्वी ही इंद्रिये वाटेल त्या निषिध्द विषयांमध्ये जावुन विटाळलेली होती त्या इंद्रियांना शुध्द होण्याकरीता प्रत्याहारीरुपी तीर्थामध्ये खरोखर स्नान घातले. आणि स्वधर्माच्या आचरणाने प्राप्त होणारे फळ ईश्वराच्या चरणकमलावर अर्पण करुन त्याच्या कृपाप्रसादाने अढळ असे वैराग्यपद प्राप्त करुन घेतले. अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार रुप जे ज्ञान ते प्राप्त  होण्यास लागणारी पुर्ण सामुग्री मिळवली. आणि तशात सदगुरुंची भेट झाली व उपदेश करण्याविषयी काही प्रतारणा न करता प्रसन्न चित्ताने उपदेश केला. औषध घेतल्याबरोबर आपणास आरोग्य प्राप्त होते काय? अथवा सुर्य नारायण उदयाला आल्याबरोबर माध्यानकाळ होतो काय? उत्तम जमीन असुन त्यात पाऊसही उत्तम  झाला आणि त्यामध्ये उत्तम बीज पेरले म्हणजे खुप पीक उगवते पण त्यासाठी काही काळ जावा लागतो. सोपा मार्ग असुनही त्यात सज्जन माणसांची संगती मिळाली तर मुक्कामाला सुखाने पोहचता येते ही गोष्ट जरी खरी असली तरी पण प्रवासाचा मार्ग संपवण्यासाठी काही काळ जावाच लागतो ना? ( ओवी ९९१ ते  १००० )

त्याप्रमाणे अंतरंगात विवेकाचा दीप प्रज्वलित झाला वैराग्य प्राप्त झाले शिवाय सदगुरुंची भेट झाली. मग त्या अनमोल उपदेशाने ब्रम्ह हे सत्य आहे आणि त्यावाचुन सर्व प्रपंच भ्रममय आहे हे श्रवण करुन साधकाचाही त्याप्रमासणे असा दृढ निश्चय झाला. असे जे सर्वत्र समप्रमाणात भरलेले सर्वोत्तम परब्रम्ह त्या ठिकाणी मोक्ष हा शब्दही नाहीसा होतो. जे ब्रम्ह जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्था आपल्या पोटामध्ये जिरवुन टाकते असे जे ज्ञान हे ज्या ब्रम्ह्‌याच्या ठिकाणी लय पावते, भेदाच्या सापेक्ष असलेला ऐक्यपणाही जिथे नाहीसा होवुन जातो विषयांपासुन होणारा आनंदाचा कणदेखील ज्या ब्रम्हानंदामध्ये विरघळुन जातो. कोणत्याही प्रकारचे द्वैत शिल्लक न राहता जेथे काही न उरता जे काही शिल्लक असते, परंतु जीवाने त्या ब्रम्हयाच्या ठिकाणी ऐक्यपणने ब्रम्ह होवुन जे राहणे आहे ते साधकाला क्रमाक्रमाने प्राप्त करुन घ्यावे लागते. ज्याप्रमाणे भुकेलेल्या माणसास षडविध पदार्थ वाढले तरी त्याच्या अंगी तृप्ती एकदम प्राप्त न होता  प्रत्येक घासाघासाने तृप्ती मिळत असते त्याप्रमाणे ज्याच्या अंतकरणामध्ये वैराग्य निर्माण झाले आहे आणि विवेकरुपी दिवा प्रज्वलित झाला आहे, तो आत्मस्वरुपी ठेव्यास प्राप्त होतो. तर आत्मस्वरुपाचे सत्-चित्-आंनदरुप ऐश्वर्य भोगण्याची सिध्दी ज्याच्या अंगावर अलंकारासारखी प्राप्त झाली आहे, तो ज्या सुगम साधनांच्या क्रमाने ब्रम्हप्राप्ती करुन घेत असतो त्या क्रमाचे वर्म तुला आता सांगतो, त्याचे श्रवण कर. (ओवी १००१ ते १०१०)

आपणांस सदगुरुंनी दाखविलेला दिव्य मार्ग स्वीकारुन विवेक रुपी तिर्थाच्या तीरावर येवुन त्या तीर्थाचे बुध्दीने मल-विेक्षेपादी मळ धुवून चंद्रग्रहण सुटले असता राहुच्या तोंडातुन बाहेर आलेली चंद्राची प्रभा जशी चंद्राकडुन ऐक्य पावते, त्याप्रमाणे ती शुध्द बुध्दी आपले मुळच्या स्थितीस प्राप्त होते. माहेर आणि सासर दोन्ही कुळे टाकुन पतीची इच्छा करणारी नववधु सप्तपदी झाल्यानंतर आपल्या प्राणप्रिय पतीला जशी अनुसरते. त्याप्रमाणे संसारातील सुखव दुख या दोन्हीचा त्याग करुन ती बुध्दी आत्मचितंनामध्ये रममाण होते, ज्ञानासारखी अंतकरणाातील गुप्त वस्तु सदैव देहाच्या बाहेर विषयांकडे नेवुन शब्दादिक विषयांना इंद्रियांनी फार महत्व दिलेले असते. सुर्याने आपल्या किरणांचे समुदाय मावळतीकडे ओढुन घेतला की मृगजळ आपोआप नाहीसे होतात, तसेच धैर्याने इंद्रियांचा निग्रह करुन त्या साधकाने शब्दादिक पाच विषयांचा निरास केलेला असतो. अज्ञानपणाने अधम लोकांचे अन्न खाल्ले असता ते ओकुन टाकावे, त्याप्रमाणे साधकाने अजाणपणाने इंद्रियांकडुन सेवन केलेले विषय वासनेसह ओकुन टाकलेले असतात, मग विषयांपासुन परत फिरवलेली इंद्रिये आत्मस्वरुपाच्या परमपवित्र गंगेच्या तीरावर आणुन ठेवली याप्रमाणे साधकाने शुध्दीकारक प्रायश्चित केली, सात्विक धैर्याच्या आधराने ती इंद्रिये शुध्द केली आणि नंतर मनाला योगाचा अभ्यास करण्यास लावले त्याप्रमाणे पुर्वकर्माच्या योगाने चांगल्या किवां वाईट भोगांची प्राप्ती झाली असता वाईट भोगाविषंयी तो खेद करत नाही. अथवा प्रारब्धाने अनुकुल विषय आपल्यासमोर आणुन ठेवले तर त्या विषयांचा तो आपल्या मनात अभिलाषा धरत नाही. (ओवी १०११ ते १०२०)

याप्रमाणे अर्जुना, इष्ट अथवा अनिष्ट भोगांविषयी तो हर्ष अथवा खेद टाकुन पर्वताच्या गुहेत अथवा वनामध्ये रहातो. ज्या ठिकाणी लोकांचा काही गलबला नाही अशा शांत अरण्यामध्ये तो रहातो, त्याच्या शरीराचे अवयव हेच त्याचे सोबती असतात, वनामध्ये तो शम-दमाबरोबर खेळत असतो काही न बोलणे हेच त्याचे बोलणे असते आणि सदगुरुंच्या आठवणीमध्ये किती वेळ गेला याचे त्याला भानही रहात नाही, आपल्या अंगामध्ये शक्ती निर्माण व्हावी अथवा आपली भुक नाहीशी व्हावी किवां चविष्ट पदार्थ खावुन जिभेचे लाड पुरवावेत, या तिन्ही गोष्टीचा तो भेजनाच्या वेळी विचार करत नाही त्याचा आहार थोडा असतो परंतु त्याला अधिक संतोष प्राप्त होत असतो. योगासने करताना, अन्नपचन करताना, जो जठराग्नी त्याला  जर आहार दिला नाही तर तो प्राणाचा नाश करेल याकरिता प्राणाचे रक्षण होईल एवढाच आहार तो घेतो. परपुरुषाने इच्छा केली तरी कुलवती स्त्री जशी त्याला वश होत नाही, तसे तो निदेला किवां आळयाला वश होवुन आपले आसन ढळु देत नाही, सदगुरुला ईश्वराला दंडवत करतेवेळी जो जमिनीला स्पर्श होईल त्या शिवाय तो कधीही जमिनीवर लोळत पडत नाही. शरीराचा व्यवहार करण्यापुरता तो हाता-पायांचा उपयोग करतो, फार काय सांगावे? किबंहुना ज्याने अंतकरण व बाहयइंद्रिये आपल्या स्वाधीन करुन ठेवलेली असतात. हे अर्जुना! जेथे वृत्तीला मनाचा उंबरादेखील पाहु देत नाही, तेथे बोलण्याला संधी कशी मिळेल? (ओवी १०२१  ते १०३०)

अशा प्रकारे काया, वाचा आणि मन हे बाहयप्रदेश जिंकुन त्या साधकाने ध्यानाचे आकाश स्वाधीन केलेले असते. ज्याप्रमाणे आरसा हातात घेतल्यावर आपले स्वरुप स्पष्ट पणे दिसते, त्याप्रमाणे सदगुरुंनी केलेल्या बोधात मी ब्रम्ह आहे असा आपला निश्चय तो पाहत असतो, तो ध्यानाचा प्रकार अशा प्रकारे असतो की ध्यान करणारा तो ध्याता, त्याची जी वृत्ती व त्या वृत्तीच्या  आधारे ज्याचे ध्यान करायचे ती तो त्रिपुटी आपल्या ठिकाणीच पाहत असतो. हे अर्जुना! हे असे करत असताना ध्यान, ध्येय , ध्याता या  तिहीची एकरुपता होईपर्यत ध्यान करावे, म्हणुन तो मोक्षाची इच्छा करणारा आत्मज्ञानाविषयी दक्ष होतो परंतु योगाभ्यासाचा पक्ष पुढे ठेवुन आत्मज्ञानाची प्राप्ती करुन घेतो ती कशा प्रकारे ते ऐक. अर्जुना! गुद आणि शिश्न या दोहोच्या मध्यभागी पायाच्या टाचेने दाबुन मुळबंध योगिक क्रिया तो करतो. बेबींचा भाग आकुंचित करुन ओढियाना, जालंधर बंध आणि मुळ बंध असे तीन बंध हनुवटी, बेंबी आणि शिवण या ठिकाणी करतो, शरीरातील प्राण-अपानादी सर्व वायु प्राणयामाच आधारे एकरुप करतो. त्या वेळी इडा आणि पिगंळा या नाडयामधले प्रवाह थांबतात आणि कुंडलिनी-शक्तीचे उत्थापन करून सुषुम्ना नाडीतून कुंडलिनी-शक्ती वर चढू लागते. ती शक्ती मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुध्द आणि आज्ञा या चक्रांचा क्रमाक्रमाने भेद करते. मग ब्रह्मरंध्रामधील सहस्त्रदलकमलरूपी मेघापासून अमृतवृष्टी होऊ लागते. त्याचा ओघ सुषुम्ना नाडीने मूळबंधापर्यंत येतो. अशा चक्ररूपी पर्वतावर नाचत असलेल्या चैतन्यरूपी भैरवाच्या भिक्षापात्रात मन आणि प्राण यांची खिचडी आणि रोडगा वाढून अशा प्रकारे हा बळकट मेळावा पुढे घालून झाल्यानंतर मागील बाजूस ध्यानदेखील सिध्द केलेलेच असते. (ओवी १०३१ ते १०४०)

याप्रमाणे ध्यानयोग व हठयोग हे दोन्ही निर्विघ्नपणे आत्मज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याकरिता त्या साधकाने आधीच  वैराग्यसारखा बलवान प्रिय मित्र जोडून ठेवलेला असते. तो प्रारंभापासून ब्रह्मप्राप्तीपर्यंत सर्व भूमिकांवर त्यांच्याबरोबर चालत असतो. पाहावयाची वस्तू दिसेपर्यंत जर दिव्याने डोळयांना सोडले नाही, तर वस्तू दिसावयास काय उशीर? त्याप्रमाणे मोक्षमार्गात प्रवृत्त झाल्यानंतर वृत्ती ब्रह्मज्ञानात लीन होईपर्यंत जर वैराग्य टिकून राहत असेल, तर त्या साधकाच्या साधनाचा विषयांच्या आसक्तीने भंग होईलच कसा? म्हणून जो वैराग्ययुक्त ज्ञानाचा अभ्यास, ज्ञानाची साधना आणि त्याप्रमाणे ज्ञानाचे आचरण करून आत्मप्राप्तीसाठी योग्य अधिकारी झाला, त्याला खरोखर भाग्यवान समजावे. असे वैराग्याचे कवच अंगावर घाजून जो राजयोगरूप घोडयावर स्वार होतो. शिवाय जे जे दृश्य दिसेल, त्यातील लहान-मोठा वगैरे भेद नाहीसा करणारी ध्यानरूपी तीक्ष्ण तलवार विवेकरूपी मुठीत धारण करतो, सूर्य ज्याप्रमाणे अंधारात निर्भयपणाने जात असतो, तसा तो साधक मोक्षरूपी लक्ष्मीला वरण्यकरता संसाररूपी रणात निर्भयपणाने जातो. मोक्षलक्ष्मीकडे जाताना त्याला मध्येच अडविण्याकरता आलेले जे दोषरूपी वैरी, त्यांना ठोकून दूर करतो. त्यामध्ये पहिला देह-अहंकार आहे. (ओवी १०४१ ते १०५०)

हा देह-अहंकार जीवाला एकदाच मारून सोडत नाही. तसेच जन्माला घातल्यावर सुखाने जगूदेखील देत नाहीत, तर जन्म-मरणरूपी चक्रात फिरत ठेवून देहरूपी हाडांच्या खोडयात अडकवून जीवाला नेहमी कष्ट देत असतो. त्या अहंकाराचे राहण्याचे ठिकाण जो देहरूपी किल्ला, त्याचा पाडाव करून तो जिकूंन घेतला. तसेच, बळ हा दुसरा शत्रूदेखील नाहीसा करून टाकला. जो बलरूपी शत्रू विषयांचे नाव ऐकल्याबरोबर चौपट वाढतो आणि सर्व जगाला विषयांशिवाय इतर गोष्टींचे भान राहू देत नाही, त्या आधारे सर्व जगाला मृत अवस्था प्राप्त होते, तो बलरूपी शत्रू विषयरूपी विषाचा केवळ डोहच होय. शिवाय, सर्व दोषांचा राजा, तरीपण ध्यानरूपी तलवारीचा घाव तो सहन करू शकत नाही. शास्त्रशुध्द ध्यानरूपी तलवारीने तो मारला जातो. अनुकूल प्रिय विषयांची प्राप्ती झाली असता त्याला परम संतोष होतो. त्या सुखाची खोळ अंगामध्ये घालून, म्हणजे त्या सुखाचा अभिमान ठेवून तो ‘माझे, माझे’ अशी गर्जना करतो. जो सन्मार्ग चुकवितो आणि मग अधर्माच्या अरण्यात घालून नरकादिरूपी वाघांच्या तावडीत देतो, तो विश्वास देऊन जीवाचा घात करणारा गर्वरूपी शत्रू मारून टाकतो. ज्या कामाचे नूसते नाव उच्चारताच वपस्वी लोकंचादेखील थरकाप उडतो, क्रोधासारखा महान दोष ज्याचा परिणाम आहे आणि जो जो  त्याचे लाड पुरवावेत, तो तो जो अधिक प्रमाणात वाढत असतो, असा जो ‘काम’, पूर्णपणे नाहीसा केल्यावर क्रोधाचाही सहजपणे नाश होतो. ( ओवी १०५१ ते १०६० )

पुढील भाग