अध्याय १८ भाग १९

       आपण ब्रम्हरुप होवुन सर्व प्रकारचे विधीनिषेध नाहीसे करावेत आणि मग पुढील आयुष्यामध्ये निस्सीम सेवा करावी, गंगाही समुद्राची सेवा करण्यासाठी गेली व तिथे पोहाचताच क्षणी ती सागराशी एकरुप झाली त्याप्रमाणे भक्त ज्याची सेवा करण्यासाठी गेला त्याने भक्ताचेच आपल्याशी ऐक्य करुन घेतले, हे श्रीकृष्णा! आपण भेदरहीत आहात सेवा करण्यास अत्यंत योग्य असे माझे सदगुरु आहात म्हणुन हाच ब्रम्हरुप होण्याचा मजवर आपला महान उपकार आहे असे समजा, माझ्या व तुमच्या मध्ये भेदाचा जो पडदा होता तो पडदा दुर करुन माझ्याकरीता तुम्ही सेवेचे सुख करुन ठेवले, सर्व देवांचे तुम्ही राजे आहात  ते मला आज्ञा कराल, त्या मी पाळेन फार काय सांगावे? वाटटेल त्याविषयी तुम्ही मला आज्ञा करा. अर्जुनाच्या या वचनाने देव सुखाने भुलून नाचु लागले व मनात म्हणाल, संपुर्ण विश्वाचे फळ असलेल्या मला देखील हा अर्जुन फलरुप झाला.पुर्ण कलेने युक्त असलेला आपला मुलगा जो चंद्र त्याला पाहुन क्षीरसागराला देखील आपली मर्यादा विसरत नाही काय ? असे सुसंवादाच्या बोहल्यावर श्रीकृष्ण व अर्जुन या दोघांचे ऐक्यतेचे लग्न म्हणजे दोघे स्वरुप-ऐक्यतेला पावलेले पाहुन संजयाच्या हदयात आनंदाच्या लाटा निर्माण झाल्या. त्या आनंदाच्या भरात संजय धृतराष्ट्रास म्हणाला, महाराज आपले भाग्‍य केवढे थोर आहे की  श्री महर्षी व्यासांनी अशा वेळी आपले रक्षण केले. आज तुम्हाला जग पाहण्यासाठी सर्वासारखे डोळे नाहीत त्या तुम्हाला दिव्य दृष्टीने व्यवहारापर्यत आणले आहे. (ओवी १५७१ ते १५८०)

आपण मला रथ चालविण्यासाठी आणि त्याच्या घोडयांची परीक्षा करण्यासाठी सेवक म्हणुन पदरी ठेवले आहे त्या आम्हा सामान्य सेवकाला श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितलेले  अलौकिक ज्ञान महर्षी व्यासांच्या कृपेने ऐकावयास मिळाले, यावेळी युध्दाचा भयानक अनर्थकारी प्रसंग निर्माण झाला आहे दोन्ही पक्षातील सैन्य एकाच कुळातील आहे युध्दामध्ये कोणाचाही पराजय झाला तरी आपणच आपल्याला पराजित केल्याप्रमाणे आहे, परमार्थाला प्रतिकुल अशा भयानक संकटातही मह‍‍र्षी व्यासांचा अनुग्रह एवढा महान आहे की, तो ब्रम्हानंदाचा अनुभव स्पष्टपणे घ्यावयास मिळतो. चंद्रकिरणांनी पाषाणाला स्पर्श केला तर तो जसा सोमकांत मण्याप्रमाणे द्रवत नाही, त्याप्रमाणे या संजयच्या चंद्रासमान शीतल ज्ञानमय बोलण्याने धृतराष्ट्राचे मन द्रवले नाही. एवढे ऐकुनही तो स्वस्थच राहीला. अशी धृतराष्ट्राची अवस्था पाहुन संजयने त्याला अनुकुल करण्याचा प्रयत्न केला नाही तरीपण श्रीकृष्ण-अर्जुनाच्या अमृतमधुर संवादाने अतिशय सुखावल्यामुळे  बोलतच राहीला. आनंदाच्या तीव्र लहरी त्याच्या हदयात निर्माण झाल्या होत्या, म्हणुन तो धृतराष्ट्राला सुखसंवाद सांगत होता, एऱ्हवी हे आनंदाचे बोल ऐकण्याची योग्यता धृतराष्ट्राची नाही हे तो जाणत होता. मग म्हणाला हे कुरु देशाच्या राजा धृतराष्ट्रा , तुझ्या बंधुचा मुलगा अर्थात तुझा पुतण्याचा मोह नष्ट झाला, असे म्हणाला हे बोलणे श्रीकृष्णाला फार गोड वाटले. अहो, पुर्वेकडील सागर आणि पश्चिमेकडील सागर याच्यात नावाचेच अंतर आहे एरवी सर्व जल एकच आहे, त्याप्रमाणे श्रीकृष्ण व अर्जुन देहाच्या रुपाने भिन्न आहेत परंतू सुखसंवादाच्या ठिकाणी  मात्र कोणताच भेद राहीला नव्हता. आरशापेक्षाही स्वच्छ असे दोन पदार्थ  समोरासमोर ठेवल्यावर एकमेकानां एकमेकाचे रुप दिसते. (ओवी १५८१ ते १५९०)

त्याप्रमाणे श्रीकृष्णासह अर्जून देवाला आपल्यासह पाहत होता, आणि श्रीकृष्ण आपल्याला अर्जुनाच्या स्वरुपात पाहत होते, श्रीकृष्ण ज्या ब्रम्हस्वरुपामध्ये देव आणि भक्तासाठी अवकाश पाहत होते. अर्जुनदेखील त्या  ब्रम्हस्वरुपामध्ये आपल्याला व देवाला अशा दोघांनी अवकाशात पाहत होता. यादोघांमध्ये आता कसल्याही प्रकारचा भेद राहीला नव्हता, म्हणुन ते दोघे यापुढे सुखसंवाद तरी काय करणार? कारण ते दोघे एकाच ब्रम्हस्वरुपाने नांदत होते. आता भेदच जर राहीला नाही, तर भेदावर आधारीत असलेली प्रश्नोत्तर घडतील तरी कशाची? आणि प्रश्नोत्तरासाठी भेदच जर शिल्लक राहीला नाही, तर संवादापासुन प्राप्त होणारे ऐकण्याचे सुख कसे बरे प्राप्त होईल? असे द्वैतपणाने बोलत असता सुखसंवादाने द्वैताचा ग्रास करणारे असे जे दोघांचे बोलणे ते मी ऐकले. दोन स्वच्छ आरसे समोरासमोर ठेवले असता कोण कोणाला पाहतो याची कल्पना तरी कशी बरे करावी ?  अथवा एका दिव्यासमोर दुसरा दिवा ठेवला असता कोणाला कोणाचा उपयोग आहे हे कोणी जाणावे? अथवा एका सुर्यासमोर दुसरा सुर्य आला असता हा सुर्य प्रकाशक आणि हा प्रकाश्य असे कोण बरे म्हणु शकेल? श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघे संवादांच्या भरात इतक्या ऐक्यास पावले की त्याचा विचार तेथल्या तेथेच थांबतो. दोन नद्यांचे पाणी एकमेकांत मिसळत असताना दोघांच्या ओघामध्ये मीठ मध्ये ठेवले तर त्या मिठास एका क्षणामध्ये जसे पाणी व्हावे लागते. (ओवी १५९१ ते १६००)

त्याचप्रमाणे श्रीकृष्ण व अर्जुन यादोघांच्या सुखसंवादाच्या आठवणीने मीही श्रीकृष्णांशी एकरुप झालो,असे संजय बोलत असताना त्याच्या अंगावर अष्टसात्विक भाव निर्माण झाले आणि आपण संजय  आहोत ही भावना संपुन गेली, जसजसे अंगावर रोमांच उभे रहात होते तसतसे त्याचे शरीर संकुचित होत होते, कांती बदलत होती, आणि एक कंपच स्तभांला आणि स्वेदाला जिकंत होता, अद्वैयानंदाच्या स्पर्शाने दृष्टी ब्रम्हानंदमय होवुन डोळयातुन प्रेमाश्रु ओघळू लागले ते आनंदाश्रु नसून डोळयांना जणू प्रेमाचा उमाळाच आला होता, त्याच्या हदयात काही एक मावेना संजयचा कंठ दाटुन आला, त्यामुळे त्याच्या तोंडातुन शब्द बाहेर पडेना, फार काय सांगावे?  अष्टसात्विक भावाने संजयची बोबडी वळाली, आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या अमृतमधुर सुखसंवादाचा संजय हा चव्हाटाच झाला, त्या सुखाने स्वरुप असे आहे की त्याच्या आधारे सहजपणे हदयामध्ये शांती निर्माण होते, मग संजय पुढे देहभानावर आला,  तेव्हा आनंदाचे भरते कमी झाल्यावर संजय शांततेने म्हणाला, उपनिषदांना देखील जे गुहय माहीत नाही, ते महर्षी व्यासांच्या कृपाप्रसादाने मला ऐकावयास मिळाले, ते परमगुहय ऐकताक्षणी त्या ब्रम्हभावाशी माझी एकरुपता झाली, मी-तु पणाच्या द्वैतासह सर्व जगत ब्रम्हस्वरुपात विरुन गेले, हे सर्व योग ज्या ठिकाणाला येणारे मार्ग आहेत त्या श्रीकृष्णाची वचने व्यासांनी मला दिव्य दृष्टी ज्ञान देवुन ऐकण्यास सोपी केली. (ओवी १६०१ ते १६१०)

अहो महाराज! अर्जुनाच्या निमित्ताने आपणच जणु काही दुसरे अर्जुन बनून आपणासाठी देव जे बोलले, ते श्रवण करण्यासाठी माझे कान‍अधिकारास प्राप्त झाले आहेत, सदगुरुंच्या अलौकिक सामर्थ्याचे मी पामर काय‍‍अधिक वर्णन करु? संजय धृतराष्ट्रास एवढे बोलुन आश्चर्यचकीत झाला व त्यायोगाने त्याची देहस्मृती गेली जशी रत्नांची प्रभा क्षणात चमकते व क्षणात बंद पडते. हिमालय पर्वतावरील सरोवराचे पाणी चंद्राचा उदय होताच गोठुन जाते व ते स्फटिकाप्रमाणे दिसते आणि सुर्याचा उदय झाला की पुन्हा विरघळून पाणी होते. त्याप्रमाणे शरीराच्या स्मृतीच्या योगाने संजय तो संवाद चित्तात धारण करीत असे आणि विस्मृतीच्या योगाने तो संवाद चित्तात रहात नसे. मग त्या आनंदाच्या भरात संजय एकदम उठुन उभा राहीला आणि धृतराष्ट्रास म्हणाला, हे राजा श्रीहरीचे अतिविशाल विश्वरुप पाहुनदेखील तुला हर्ष न होता तु स्वस्थ का बरे बसलास? डोळयांनी न पाहता देखील अद्यापही समोर दिसत आहे, जे आत्ता डोळयासमोर नाही पण जे डोळयांसमोर आहे असे वाटते जे वियरलेरिी सर्व काळ आठवतेच, त्या रुपाला आता मी कसे बरे चुकवु? श्रीहरीच्या महान विश्वरुपाचा चमत्कार पाहुन आश्चर्य करावे पण तो एक मनातील विचार वाहुन नेतो. मी आता अशा श्रीकृष्ण-अर्जुन यांच्या सुखसंवादरुपी त्रिवेणी संगमात मंगल स्नान करून अहंकाराला तिलांजली दिली. त्या वेळी संजयला अलौकिक वचनांची आठवण सेवुन आनंद आवरता येईना. तो स्फुदुंन रडु लागला. त्याचा कंठ सदगदित झाला आणि मुखातुन “श्रीकृष्ण” “श्रीकृष्ण” असे प्रगट होवु लागले.  (ओवी १६११ ते १६२०)

या प्रेमाच्या अष्टसात्विक भावाची काहीच कल्पना धृतराष्ट्राला नव्हती, म्हणुन संजयाच्या डोळयातुन प्रेमाश्रु का ओघळतात याचा विचार तो करु लागला. तोच संजयाने स्वताला झालेल्या सुखाचा लाभ आपल्या ठिकाणी स्थिर केकला आणि अष्ट सात्विक भाव शांत होवुन तो देहभानावर आला त्या वेळी धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, या युध्दामध्ये कोण कोणाशी युध्द करत आहे आणि कोणाला चिजय मिळणार आहे ही मला  चिंता आहे ती दुर करुन माझा वेळ जावा म्हणुन महर्षी व्यासांनी तुला येथे बसवले आहे, ते मुख्य कार्य बाजुला ठेवुन तु हे भलतेच काय आरंभिले आहेस. त्या महर्षी व्यासांनी तुला येथे कोणत्या उद्देशाने बसवले आहे, आणि तु या युध्दाच्या प्रसंगी भलतेच काय बोलत आहेस? रानटी माणसास राजमंदिरात आणले तरी त्याला दाही दिशा ओस वाटु लागतात, त्याचे मन तेथे रमत नाही, अथवा दिवस उजाडल्यावर जशी निशाचरास रात्र होते,  ज्याला ज्या गोष्टीचे महत्व काही कळत नाही, त्याला ती गोष्ट विपरीत वाटते, म्हणुन तो सुखसंवाद अप्रसंग आहे, असे त्या धृतराष्ट्राने म्हणणे हे स्वाभाविक आहे, धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, सांप्रत जे युध्द सुरु आहे, त्या युध्दात शेवटी कोणाला विजय मिळणार आहे?  एरव्ही विशेष करुन आमच्या मनाची अशी कल्पना आहे की दुर्येाधनाचा पराक्रम वरचढ असतो. पांडवांचे सैन्य पाहिले असता आमचे सैन्य दिडपट आहे,  म्हणुन खरोखर  दुर्येाधनाचाच विजय होणार आहे, आम्हाला तर असे वाटते, परंतु तुला काय वाटते तुझा तर्क काय आहे, हे आम्हाला कळत नाही तरी तुझे भाकीत काय आहे, हे आम्हाला निर्भयपणाने सांग.   (ओवी १६२१ ते १६३०)

धृतराष्ट्राचे बोलणे ऐकुन संजय म्हणाला, तुम्हा दोघांपैकी कोणाचा जय होईल हे मी जाणत नाही, परंतु जेथे आयुष्य आहे, तेथे जगणे निश्चीत आहे, चंद्र तेथे चांदणे, श्री भगवान महादेव तेथे पार्वती माता आणि संत तेथे खरे काय आणि खोटे काय, हे जाणण्याची क्षमता असणारच. राजा तेथे सैन्य सौजन्य तेथे निस्वार्थी प्रेमसंबंध आणि जेथे अग्नी तेथे दाह करण्याचे सामर्थ्य असणारच. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखाचे स्थान व जेथे सुखशांती तेथे पुरुषोत्तम या गोष्टी असणारच.  वसंत तेथे प्रफुल्लीत वने, प्रफुल्लीत वने तेथे फुले आणि तेथे भ्रमरांच्या अनेक पक्तीं असणारच, जेथे गुरु आहेत  तेथे ज्ञान, तेथे आत्मदर्शन , तेथे पुर्ण समाधान असणारच, जेथे भाग्य, तेथे सुख भोग, जेथे सुखभोग तेथे प्रसन्नता, सुर्य तेथे प्रकाश असणारच, आता हे दृष्टात पुरेत, त्याप्रमाणे धर्म, अर्थ , काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ ज्या नाथामुळे सनाथ आहेत तो भगवान श्रीकृष्ण जेथे तेथे लक्ष्मी असते,  आणि आपल्या पतीसह ती जगन्माता ज्या पुरुषाजवळ असते, तेथे आणिमा, गरिमा, लधिमा, महिमा, प्राप्ति, प्राकाम्या, वशित्व, इशित्व हया आठ महासिध्दी दासी होवुन राहत नाहीत काय? विजयरुप जो भगवान श्रीकृष्ण, तो ज्या पक्षामध्ये स्वता उभा राहीला आहे तिकडेच जय हा निश्चीत असणार. (ओवी १६३१ ते १६४०)

अर्जुन हा विजय या नावाने प्रसिध्द आहे आणिा श्रीकृष्णनाथ स्वभावताच विजयस्वरुप आहेत त्यामुळे लक्ष्मीसहीत विजय त्याच पक्षाचा निश्चीत आहे, अर्जुनाला श्रीकृष्ण व लक्ष्मी यांच्यासारखे माताश्री-पिताश्री असताना त्याने देशातील सर्व दगड चितांमणी का होवु नयेत?  तसेच त्या  देशातील जमिनीला सुवर्णपणा का येवु नये? त्या गावच्या नद्या अमृताने भरुन का वाहु नयेत? यात नवल ते काय? राजा याचा तु  नीट विचार कर, ज्याच्या मुखातुन सहज प्रगटलेले शब्द यांना सुखाने वेद म्हणता येईल आणि देह असताना तो सच्च्दिानंद का होवु नये? ज्याचा पिताश्री  श्रीकृष्ण आणि ज्याची माताश्री लक्ष्मी आहे त्यांच्या अधीन स्वर्ग व मोक्ष ही दोन्ही पदे आहेत, म्हणुन ज्या पक्षामध्ये लक्ष्मी-वल्लभ उभे आहेत, तेथे सर्व सिध्दी हात जोडुन आपणहुन सिध्द आहेत, राजा याच्या पलीकडे मी काही जाणत नाही, मेघ हा समुद्राच्या पाण्यापासुन बनलेला असतो परंतु जगाला उपयोग होण्याच्या दृष्टीने समुद्रापेक्षा मेघ अधिक चांगला असतो तसेच श्रीकृष्णापेक्षाही अर्जुनाचे भाग्य आज अधिक विशेष आहे, लोखंडाला सुवर्णाची दिक्षा देणारा परीस हा गुरु आहे, परंतु जगातील व्यवहारामध्ये सोन्याचाच उपयोग होतो आणि त्याचीच योग्यता अधिक मानली जाते, या दृष्टातांवरुन गुरूपेक्षा शिष्याचा अधिकार मोठा आहे असे जर मानले तर गुरुला कमीपणा येईल, असे कोणीतरी म्हणू शकेल, पण ते योग्य नाही  असे पाहा की, अग्नी हा दिव्याच्या रुपाने आपलाच प्रकाश प्रगट करतो. (ओवी १६४१ ते १६५०)

त्याप्रमाणे देवाच्या शक्तीनेच अर्जुन बलवान आहे, अर्जुनाची स्तुती प्रत्यक्ष देवालाही आवडते, या स्तुतीला फार महत्व आहे,  आपल्या मुलांनी आपणास सर्व गुणांमध्ये जिकांवे अशी वडीलांची तीव्र इच्छा असते त्याच प्रकारे अर्जुनानी आपणास सर्व सामर्थ्यात जिकांवे अशी भगवंताची इच्छा असते आज ती इच्छा सफल झाली. राजा अधिक काय सांगावे? श्रीकृष्णाच्या  कृपेने युक्त जो अर्जुन , तो ज्या बाजुला आहे, तोच पक्ष विजयाचे स्थान आहे याविषयी तुला संशय कशाला पाहीजे? या पक्षाकडे विजय आला नाही तर विजयााचे विजयपण व्यर्थ होवुन जाईल, म्हणुन ज्या ठिकाणी लक्ष्मी, तसेच लक्ष्मीचे पती श्रीकृष्ण आणि पांडुजयाचा सुपुत्र अर्जुन तेथेच विजय असुन ऐश्वर्य आणि भाग्य याचां उदय आहे, महर्षी व्यासांच्या सत्यवचनावरती तुझ्या मनात पुर्ण विश्वास असेल तर माझ्या बोलण्याचा अर्थ अढळ आहे. असे आपण माना. “जेथे तो लक्ष्मीवल्लभ श्रीकृष्ण आहे आणि भक्तकदंब अर्जुन आहे तेथे सुख आणि मंगल लाभांचा वर्षाव आहे हे माझे बोलणे असत्य होईल तर मी व्यासांचा शिष्य म्हणवुन घेणार नाही”. बाहु वर करुन संजयने अशी गर्जना केली. याप्रमाणे संजयने महाभारताचा साराशं एका श्लोकांत आणुन धृतराष्ट्राच्या हाती दिला. ज्याप्रमाणे अग्नी हा किती विशाल आहे हे कळत नाही, परंतु रात्र झाली की सुर्याची उणीव दुर करण्यासाठी वातीच्या टोकावरती ठेवुन घरात आणला जातो.(ओवी १६५१ ते १६६०)

पुढील भाग