अध्याय १८ भाग १

ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी

सार्थ भगवद् गीता अध्याय – १८

     मोक्षसंन्यास विभाग योग

श्री ज्ञानदेवांनी भगवद् गीतेतील अध्याय – १८ मधील “मोक्षसंन्यास विभाग योग” या अध्यायातील   १ ते ७८ संस्कृत श्लोकांचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन १८१० ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे. खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे, परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही अवघड वाटू लागली. श्री निवृत्तीनाथांचे परमशिष्य श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहे. हा श्री ज्ञानदेवांचा अमुल्य  कृपा-प्रसाद आहे, मनुष्य जीवन जगण्यासाठी अनमोल संजीवनी आहे, किंबहुना संसारसागर पार करण्यासाठी अध्यात्मातील नौका आहे, तिच्या मदतीने संसार करता सावरता आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनसागरातुन तरुन जावे आणि आपल्या जीवनाचे कोटकल्याण साधावे. ही ज्ञानदेवांची  “अक्षरब्रम्ह ज्ञानेश्वरी” आत्मसाद करुन जीवनाचे  सार्थक करावे. हा ” अठरावा अध्याय ” म्हणजे गीतारुपी रत्नमंदिराचा अर्थरुपी चिंतामणी-कळस आहे, हा कळसाध्याय संपुर्ण गीतादर्शन करुन देणारा मार्गदर्शक अध्याय आहे. समाजामध्ये अशी रुढ आहे की, एखादया मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतल्यास त्या मंदिरातील देवतेचे दर्शन घेतल्याचे फळ मिळते. तसाच येथेही प्रकार आहे, या अठराव्या अध्यायाचे वाचन, मनन, चितंन केले असता संपुर्ण गीताशास्त्र वाचल्याचे फळ प्राप्त होते.

 

हे सदगुरुराया! आपण स्वत: देव म्हणजे स्वयं दिव्य प्रकाश आहात. साक्षात परब्रम्ह आहात. भक्तांसाठी मंगलकारक आहात. जन्म, मरण, वार्ध्यक्य या मेघांच्या समुदायाला पांगविणारे वादळी वारे आहात. हे सदगुरूराया! आपला जयजयकार असो. हे देवा!  तुम्ही सर्वात बलशाली असुन दु:खाचा पुर्णपणे नाश करणारे आहात. आपणच वेद आणि शास्त्ररुपी वृक्षाचे फळ असुन अतिशय लाभदायक आहात. हे अशा गुणसंपन्न निराकार आणि साकार तसेच दृष्टीगोचर आणि दृष्टीअगोचर देवा आपला जयजयकार असो. हे देवा आपण स्वरुपता सर्वरुप आहात. ज्यांनी विषयांचा त्याग केलेला आहे त्यांच्यावर कृपा करणारे आहात काळावरही सत्ता असणारे आपणच आहात. लीलेने काळाच्या क्रिडेस आपणच कारण आहात हे देवाधिदेवा! आपला जयजयकार असो. हे देवा! आपण अचल असुन भक्ताच्या चंचल चित्ताचे आपल्या लिलेने हरण करुन त्याला स्थिरत्व देता. तसेच उत्पत्ती, स्थिती, लय असा सृष्टीचक्राचा क्रम अबाधित ठेवुन आपणास या जगाचा अंत करुन पुन्हा जग निर्माण करण्यास आणि त्याचे पालन पोषण करण्यास तसेच पुन्हा नाश करता  हा तर आपला नित्याचाच खेळ आहे. आपला जयजयकार असो. हे देवा! आपले रुप परिशुध्द असुन आपण आंनदाला सदैव स्फुर्ती देणारे आहात. आपण भक्तांच्या सर्व पापांचे निराकरण करणारे आहात, आपण या सर्व जगाचे कारण आहात, हे देवा आपण स्वयंप्रकाशी आहात आपला जयजयकार असो. जगद् रुपी मेघाचा गर्भ राहण्याचे आकाश, त्रिभुवनाच्या उत्पत्तीच्या आरंभाचा आधारस्तभं आहात. आपण संसारदुखाचा नाश करणारे आहात. आपला जयजयकार असो. आपण निरपेक्ष आणि  शुध्द आहात. आपण अविद्येचा नाश करुन ज्ञानाचा प्रकाश निर्माण करता आणि शम-दमाने कामाचा नाश करणारे आहात.अशा महान देवा आपला जयजयकार असो. आपण आपली निष्काम भक्ती करणाऱ्याच्या अधीन असुन भक्तावर प्रेम करता आपण त्रिविध तापाचा नाश करता आपण ज्ञानरुपी बीजाचे उत्पतिस्थान आहात. आपण कल्पनातीत वस्तुचे कल्पतरु आहात  अशा गुरुराया आपला अखंड जयजयकार असो. ( ओवी १ ते १० )

          विविध प्रकारच्या शास्त्रीय अर्थाने मुक्त गीर्वाण-भाषेच्या अधीन होवुन तुझी स्तुती कशी करु? कारण गुण, क्रिया आणि संज्ञा यांपैकी शब्दांनी वर्णन करण्यासारखा कोणताही विशेष तुमच्या ठिकाणी नाही. ज्या ज्या विशेषणांनी तुमचे वर्णन करु जावे ते तुमचे स्पष्ट रुप नाही, हे मी जाणतो म्हणुन तुमचे वर्णन करणे माझ्या मनाला योग्य वाटत नाही. सागर हा आपली मर्यादा सांभाळणारा आहे अशी त्याची प्रसिध्दी आहे. परंतु हा लौकिक जोपर्यत चंद्र उगवला नाही तोपर्यतच आहे. सोमकांत मणी हा आपल्या स्वताच्या उदयाने चंद्रास अर्ध्य देत नसतो तर चंद्रच त्याच्याकडुन ते करवितो. वसंत ऋतु आला की वृक्षाला नवी पालवी कशी फुटते हे समजत नाही. त्याप्रमाणे माझीही स्थिती झाली आहे. असे का बरे समजु नये? सुर्य विकासी कमळ सुर्य किरण  पडताक्षणी संकोच सोडुन विकासीत होते, अथवा मीठ पाण्यात टाकले की पाण्याशी तद्रुप होते. तसेच जेव्हा मी तुमचे स्मरण करतो, त्यावेळी मी माझेपणा विसरतो. आवडीचे भोजन करुन ज्याप्रमाणे एखादा तृप्तीच्या ढेकरांनी व्यापुन जातो. ज्याप्रमाणे हे प्रभु मोह आणि मीपण विसरुन तुमची स्तुती करण्याचा छंद माझ्या वाचेला लागला आहे. ही माझी अशी  स्थिती आपल्यामुळे झाली आहे.  एरवी शुध्दीवर असताना तुमची स्तुती करीन तेव्हा गुण  आणि गुणांतीत यांची तुलना केल्यासारखे होईल परंतु तुम्ही एकरसाची ओतीव मुर्ती आहात, तुमच्या अखंड, अभेद  स्वरुपाच्या ठिकाणी सगुण आणि निर्गुण असा भेद कसा बरे करु?  मोती फोडुन जोडणे बरे की मोती तसेच ठेवणे बरे?  तु मायबाप आहेस,अशा वर्णनात तुझी स्तुती होत नाही, कारण त्या वर्णनात मी  लेकरु आहे, या द्वैतपणाचा विटाळ आहे. (ओवी ११ ते २०)

              महाराज तुम्ही माझे स्वामी आणि मी तुमचा दास आहे असे म्हटले तरी तुमचे ठिकाणी स्वामीत्व आले. ते मी स्तुतीच्या निमीत्ताने कसे बरे बोलेन? कारण दास्यत्वाच्या उपाधीने उष्टे झालेल्या स्वामीत्वाचे काय वर्णन करु? हे प्रभो! तू अंर्तबाहय समप्रमाणात व्यापलेला आत्मा आहेस असे म्हटले तरी अंर्तयामी माझ्या अंतकरणात असलेल्या तुला मी माझ्या पेक्षा वेगळा समजतो असे होईल. म्हणुन हे महाराज, आपली यथोचित स्तुती मला करता येणार नाही, म्हणुन यावेळी मौन धारण करणे मी उचित समजतो. काही न बोलणे हीच आपली पुजा आहे, आणि आपल्यात द्वैतभाव नसणे हेच आपले सानिध्य आहे. विविध प्रकारच्या भ्रमांनी भुलून गेलेला मनुष्य जशी वाटेल तशी बडबड करतो, त्याप्रमाणे मी करीत असलेले हे तुझे वर्णन आहे, तरी गुरूमाऊली तु तू सहन कर, आता माझ्या वाणीच्या विस्तारावर अशी मुद्रा लाव, कि  जिच्या  योगाने मी सांगितलेला अर्थ या सज्जनांच्या सभेमध्ये मान्य होईल त्यावेळी कृपामाऊली सदगुरु श्री निवृत्तीनाथ त्याचे परमशिष्य ज्ञानदेवांना म्हणाले, तु अशी पुन्हा पुन्हा विंनंती करु नकोस, लोखंडाचे सोने होण्याकरीता परीसाचा एकदा स्पर्श झाला की पुन्हा त्यास वारंवार स्पर्श करावा लागत नाही. तेव्हा श्री ज्ञानदेव महाराज त्यांना आदरपुर्वक प्रार्थना करुन म्हणतात, गुरूदेव आपली हीच आज्ञा म्हणजे गुरूप्रसाद आहे तरी श्रोतेहो! आता आपण ग्रंथ व्याख्यानाकडे लक्ष द्यावे. महाराज, हा अठरावा अध्याय म्हणजे गीतारुपी रत्नमंदिराचा अर्थरुपी चिंतामणी-कळस आहे, हा कळसाध्याय संपुर्ण गीतादर्शन करुन देणारा मार्गदर्शक अध्याय आहे. (ओवी २१ ते ३०)

            समाजामध्ये अशी रुढ आहे की, एखादया मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतल्यास त्या मंदिरातील देवतेचे दर्शन घेतल्याचे फळ मिळते. तसाच येथेही प्रकार आहे कारण या अठराव्या अध्यायाचे वाचन, मनन,चितंन केले असता संपुर्ण गीताशास्त्र वाचल्याचे फळ प्राप्त होते, याच कारणाने श्री ज्ञानदेवांनी या अध्यायास कळसाध्याची उपमा दिली आहे. महर्षी व्यासमुनीनी भगवदगीता रुपी रत्नमंदिरावर हा कळस चढविला आहे. मंदिर तयार झाल्यावर जसे कळस बसविला कि मंदिरास पुर्णत्व येते त्याप्रमाणे  हा अठरावा अध्याय गीताग्रंथ पुर्ण झाला असे दर्शवितो. महर्षी व्यासमुनीनी अतिशय कुशलतेने सुत्रांची रचना केली त्यांनी वेदरुपी रत्नांच्या पर्वतावर आणि उपनिषंदरुपी अर्थाच्या पठारावर गीतामंदिराचा पाया खणण्यास प्रारंभ केला. त्या पठाराच्या जमिनीमध्ये जो धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे भिन्न आकाराचे अनेक दगड-गोटे निघाले, त्यांनी महाभारतरुपी देवालयाच्या भोवती तट बांधला. त्या जमिनीत एक आत्मज्ञानाचा मोठा अखंड दगड निघाला त्यावरील भ्रमसंशयाचे पदर साफ करुन त्याचाश्रीकृष्ण-अर्जुन संवादरुपी उत्तम प्रकारचा चिरा तयार केला ते घडवलेले चिरे मंदिराच्या दर्शनी भागाला लावले, भिंत सरळ येण्यासाठी निवृत्तीनाथरुपी दोरीतुन धर्माचा ओळबां सोडला. ज्या योगाने मोक्ष प्राप्त होईल अशी रचना करुन मंदिराचा उत्तम प्रकारचा आकार साधला, याप्रमाणे मोक्षाच्या रेषेपर्यत उभारणी करत असताना पंधरा अध्यायापर्यत पंधरा थर पुर्ण झाले. याप्रमाणे भुमी पवित्र करण्यापासुन मोक्षाच्या उंचीच्या रेषेपर्यत गीतामंदिराचे काम पुर्ण झाले. त्या मंदिरावर सोळावा अध्याय म्हणजे शिखराच्या गळयावरील डेऱ्याचा आकार होय. सतरावा अध्याय म्हणजे कळसाची बैठक होय. (ओवी ३१ ते ४०)

            त्या बैठकीवर अठरावा अध्याय म्हणजे सहजपणे बसवलेला कळस होय आणि महर्षी व्यासमुनीनी गीता हा ध्वज उभारलेला आहे, म्हणुन मागील पहिल्या अध्यायापासुन सतराव्या अध्यायापर्यत जे अध्याय सांगितले आहेत ते चढत्या भुमीचे आकार आहेत, ते सर्व काम पुर्ण झाल्याचे अठरावा  अध्याय आपल्या ठिकाणी दाखवत आहे. याप्रमाणे आत्मज्ञानी महर्षी व्यासानी  गीतामंदिरातील ज्ञान मोक्षापर्यत आणुन सर्व प्राणीमात्रांचे रक्षण केले आहे कित्येक लोक परम श्रध्देने गीतापठणाच्या प्रदक्षिणा मंदिराच्या बाहेरुन घालतात, कित्येक अधिकारी पुरुषाच्या मुखातुन श्रेातभावाने केलेल्या श्रवणाच्या निमित्ताने सामान्य जन गीतामंदिराच्या छायेखाली बसतात, कित्येक अंतरंगाच्या अधिकाराचे पुरुष एकाग्रतेने श्रवण करीत निदिध्यासाचा विडा-पैसा घेवुन मंदिराच्या आत अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. ते आत्मज्ञानाच्या योगाने परमात्म्याची भेट घेतात परंतु मोक्षरुपी देवालयात अंतरंग  व बर्हिरंग अधिकाऱ्यांची योग्यता सारखीच आहे. श्रीमंत समर्थाच्या पंक्तीला बसुन भोजन केले असता खालच्या व वरच्या लोकाना जशी समान पक्वान्ने खावयास मिळतात, त्याप्रमाणे गीतेच्या पठणाने श्रवणाने आणि अर्थज्ञानाने मोक्षच प्राप्त होतो. हे मर्म जाणुनच हे गीतारुपी वैष्णव मंदिर आहे आणि अठरावा अध्याय हा कळस आहे. असे श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात. आता सतराव्या अध्यायानंतर अठराव्या अध्यायाची निर्मीती कशी झाली हे तुमच्या दृष्टीस पडेल. असे स्पष्ट करुन सांगतो. (ओवी ४१ ते ५०)

            गंगा आणि यमुना यांचे पाणी ओघाकडे लक्ष देवुन पाहीले असता वेगवेगळे दिसते परंतु पाणी या दृष्टीने पाहिले असता ते एकच दिसते अर्धनारी-नटेश्वराच्या रुपामध्ये जसे स्त्री व पुरूष यांचे आकार कायम असुन त्यांचे शरीर मात्र एकच दिसते, शुक्ल पक्षात चंद्राची कला जरी वाढलेली दिसते तरी चंद्राच्या दृष्टीने पाहु गेलो तर तो पुर्णच आहे. त्याच्यावर निरनिराळे थर नाहीत त्याप्रमाणे गीतेचे चार पाद आहेत तसेच एक अध्याय संपुन दुसऱ्या अध्यायास प्रारंभ केंला म्हणुन अनेक अध्याय झाल्यासारखे वाटतात. परंतु गीतेत सांगितलेल्या सिध्दांताची रात मात्र निरनिराळी रुपे धारण करीत नाही अनेक रत्नमणी असले तरीपण त्यांत ओवलेला दोरा जसा एकच असतो अनेक मोती मिळुन एका वळीची माळ तयार केली तर सर्वाची कांती एकच असते तसे शोभेचे रुप एकच असते. फुलांची आणि फुलांच्या हारांच्या पदरांची गणना बोटाने करता येते परंतु त्याचां सुगंध घेवु  लागलो तर गणना करण्याची आवश्कता नाही, त्याप्रमाणे श्लोक व अध्याय याच्यांतील सिध्दांत एकच आहे. गीतेचे श्लोक सातशे असुन अध्याय अठरा आहेत त्यात देवांनी एकाच परतत्वाचे विवेचन केले आहे. सांप्रत माझ्या (श्री ज्ञानमाऊलीच्या ज्ञानेश्वरीतील) अठराव्या अध्यायाचे (श्री निवृत्तीनाथाच्या कृपार्शिवादाने श्री ज्ञानदेवांनी केलेले) निरुपण तुम्ही त्याच धोरणाने श्रवण करावे. (ओवी ५१ ते ६०)

          सतराव्या अध्यायातील शेवटच्या श्लोकामध्ये देव असे बोलले की “ओम तत् सत्” या ब्रम्हनामाविषयी सात्विक श्रध्दा न ठेवता अस्तिक्य बुध्दी सोडुन जी जी यज्ञ, दान, तपे आदी कर्मे केली जातात, ती सर्व व्यर्थ होतात. हे देवाचे बोलणे ऐकुन अर्जुन  आनंदाने डोलु लागला कर्मावाचुन दुसरे काहीच न जाणणाऱ्या कर्मठ लोकांवर देवाने हा दोष ठेवलेला  दिसतो.  तो अज्ञानाने अंध झालेला कर्मनिष्ठ बापडा सर्वत्र सम प्रमाणात व्यापक असणाऱ्या ईश्वराला  पाहु शकत नाही, तर त्यापुढील “ओम तत् सत्” हे एक  ईश्वराचे नाव आहे आणि  श्रध्देने त्याचा उच्चार केला असता मोक्ष प्राप्त होतो, हे त्याला कसे कळणार? अंतकरणातुन तमोगुण आणि रजोगुण गेल्यावर जी श्रध्दा  उरते ती सामान्य प्रतीची असते ती श्रध्दा ब्रम्हनामाकडे कशी बरे प्रवृत्त होईल?  मग शस्त्राच्या तीक्ष्ण टोकाला आलिंगन देणे, उंच बांधलेल्या दोरीवरुन धावत  सुटणे, नागिणीशी खेळणे आदी गोष्टी जशा माणसाच्या मृत्यूस कारणी भुत होतात. त्याप्रमाणे ब्रम्हज्ञानाविषयी श्रध्देवाचुन केलेली कर्मे ही अतिशय भयावह असतात. त्या कर्माची प्रवृत्ती अनेक जन्म देण्याकडेच असते, एवढे भयंकर कुयोग या कर्मामध्ये असतात. कदाचित कर्म ब्रम्ह नामाने यथासांग झाले तर त्या कर्माला ज्ञानाची योग्यता  प्राप्त होते आणि तेच कर्म यथासांग झाले नाही तर कर्म करणारा नरकाच्या घरी जातो. कर्म करणाऱ्याला अशा प्रकारच्या अनेक अडचणी येत असतात, तरी सकाम कर्म करणाऱ्याला मोक्षाकडे जाणे कसे घडेल? असा अर्जुनाने प्रश्न केला. तरी सर्व जीवांचा कर्माचा पराधीनपणा नाहीसा व्हावा सर्व जीवांना कर्मफलांचा त्याग करावा आणि  दोष रहित संन्यासाचा स्वीकार करावा. जेथे कर्म बाधेच्या भयाचे नावदेखील नसते. जन्म-मरण चक्र थांबले जाते असे आत्मज्ञान ज्या योगाने स्वाधीन होते. (ओवी ६१ ते ७०)

           जे ज्ञानाचे आवाहन करणारे मंत्र आहे जे ज्ञान पिकण्याचे उत्तम प्रकारचे शेत आहे अथवा जे ज्ञानाला आकर्षण करणाऱ्या सुत्रांचे तंतु आहेत कर्मसंन्यास आणि कर्म फलत्याग यांचे अनुष्ठान करुन संपुर्ण जग कर्मबधंनातुन सुटावे म्हणुन आता त्याग व संन्यास याविषयी देवास उत्तम रीतीने व स्पष्ट पणे विचारावे. अशा प्रकारे अर्जुनाने विचार करुन त्याग व संन्यास याचे स्पष्टीकरण व्हावे म्हणुन त्यागाच्या संदर्भात प्रश्न केला. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाच्या या प्रश्नाला जे उत्तर दिले तोच अठरावा अध्याय होय. याप्रमाणे कार्यकारण भावाने एक अध्याय दुसऱ्या अध्यायास कारणीभुत होतो. आता अर्जुनाने जे विचारले ते उत्तम प्रकारे एकाग्रतेने श्रवण करा. सतराव्या अध्यायाच्या शेवटी देवाचे बोलणे संपले आता देव पुढे काही सांगणार नाहीत असे ओळखुन अर्जुन मनात खिन्न झाला. वास्तविक पाहाता त्याचा आत्मज्ञानाच्या सिध्दातांविषयी ठाम निश्चय झाला होता. पण देव गप्प बसणार आहेत  हे त्याला सहन होईना, वासरु दुध पिवुन तृप्त झाल्यानंतर गायीने आपल्या पासुन दुर होवु नये असे त्या  वासराला वाटत असते कारण अनन्य प्रेमाचा प्रकार असाच असतो आपल्याला जो  परमप्रिय आहे त्याने काही कारण नसतानाही आपल्याशी बोलावे व आपणास पाहील्यावरही आपल्याकडे पुन्हा पुन्हा पहावे अशी इच्छा दुप्पट वाढते. असा हा प्रेमाचा प्रकार आहे अर्जुन तर प्रत्यक्ष प्रेमाची मुर्ती होतो, म्हणुन देवाने स्तब्ध राहणे त्याच्या मनास बरे वाटेना. (ओवी ७१ ते ८०)

पुढील भाग