हे पाडंवा, आपण केल्या कर्माची फलप्राप्ती व्हावयाची त्याबद्दल जो आपल्या मनात थोडीदेखील इच्छा उत्पन्न होवु देत नाही. अर्जुना, दाई जशी दुसऱ्याच्या मुलाकडे अनासक्त भावाने पाहते त्याप्रमाणे प्रारंभी फळाची आशा सोडुन कर्म करावे. पिपंळाला फळे येतील या आशेने जसे पाणी घातले जात नाही. त्याप्रमाणे फळाची आशा सोडुन कर्मे करावीत, गुराखी दुधाची आशा सोडुन गावातील गोधने सांभाळीत असतो, त्याप्रमाणे कर्मफला विषयीच मन निरिच्छ असावे, अशा निरिच्छ युक्तीने जो कर्म करत असतो, त्याला आपल्या जवळच असणाऱ्या आत्मस्वरुपाचा अनुभव प्राप्त होत असतो, म्हणुन फळाविषयी आसक्ति सोडुन आणि कर्तृत्व-अभिमान सोडुन कर्म करावीत हा माझा उत्तम प्रकारचा संदेश आहे, जो जीव संसाबंधनाने शीणला आहे व जो मुक्तीसाठी प्रयत्नशील आहे त्याने या आज्ञेचे उल्लघंन करु नये. असे माझे वारंवार सांगणे आहे. अथवा अंधार दिसत नाही, म्हणुन त्या रागाने आपल्याच डोळयांत जशी आपलीच नखे खुपसावीत त्याप्रमाणे काम्य कर्माने बंधन होते या द्वेषाने सर्वच नित्य-नैमित्तीक कर्माचा जो त्याग करतो. त्याचा तो कर्म त्याग मी तामस प्रकारचा मानतो, डोके खुप दुखते म्हणुन त्याच्या रागाने ज्याप्रमाणे ते डोकेच तोडुन टाकावे. रस्ता जरी अवघड असला तरी तो पायानी चालुन संपविला पाहीजे, परंतु तसे न करता रस्ता अवघड आहे म्हणुन पायच तोडुन टाकणे योग्य आहे काय? (ओवी १७१ ते १८०)
भुकेने व्याकुळ झालेल्या माणसापुढे गरम-गरम अन्न वाढले आणि त्याला ते सहन न होवुन त्याने ते लाथेने झुगारुन दिले तर त्याला उपाशी रहावे लागेल. त्याप्रमाणे कर्माचे निष्काम बुध्दीने आचरण केले असता कर्माचा दोष नाहीसा होतो, परंतु तामस बुध्दीचा मनुष्य भ्रमिष्ट असल्यामुळे त्याला हे कळत नाही तो आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाटयाला आलेले कर्म टाकुन देतो परंतु तशा त्या तामस त्यागाचा तु विटाळ होवु देवु नकोस. रजोगुणी मनुष्य आपला अधिकार काय आहे हे जाणतो आपले विहीत कर्म कोणते हेही ज्यास माहीती आहे, परंतु कर्म करण्याच्या त्रासाला भिवुन तो कर्म करण्याविषयी कंटाळा करतो. कारण कर्माच्या प्रारंभीचा भाग थोडासा कष्टकारक दिसतो, जशी शिदोरी डोक्यावर वाहतेवेळी जडच लागत असते,जसा निंब खाते वेळी प्रारंभी जिभेला कडू लागतो अथवा हिरडा तुरट लागतो, तसा कर्माचा आरंभ हा कठीण वाटतो. गाय दिसावयास गरीब असते पण शिंगाने त्या मारक्या असतात. शेवंतीची फुले सुगंधी असतात पण त्याच्या वेली काटेरी असतात, अन्न खाताना सुखकारक परंतु स्वयंपाक करताना त्यात भोजनाचे सुख नसते तसे निषकम कर्म हे सुरवातीला अतिशय कष्ट दायक असते म्हणुन तो रजोगुणी तेच ते नित्य-नैमित्तीक कर्म सारखे करीत असता त्यात कष्ट मानतो. वास्तविक पाहता शास्त्राने कर्म करावयास सांगितले आहे म्हणुन तो कर्म करावयास सुरूवात करतो परंतु एखादी अतिशय तापलेली अशी वस्तू हातात आल्यावर हात भाजताच ती वस्तु तो जशी टाकुन देतो. त्याप्रमाणे त्या कर्मापासुन श्रम होवु लागल्यावर ती कर्मे तो मध्येच टाकुन देतो. तो मनामध्ये विचार करु लागतो की देहासारखी उत्तम वस्तु बतिशय मोठया भाग्याने प्राप्त झाली आहे, तर त्या देहाला उपभोगाचे सुख देण्याऐवजी पापी माणसाप्रमाणे आचरणाने का बरे कष्ट द्यावेत? (ओवी १८१ ते १९०)
केलेल्या कर्माचे फळ भविष्यात प्राप्त होणार आहे परंतु असे फळ मला नको आहे त्यापेक्षा आज जे आपणास ऐश्वर्य प्राप्त झाले आहे त्याचा उपभोग का बरे घेवु नये? हे अर्जुना! शरीराला होणाऱ्या त्रासाच्या भीतीने जो कर्माचा त्याग होतो त्याला राजस त्याग असे म्हणतात. एरवी त्या रजोगुणामध्ये कर्माचा त्याग घडत असतोच , परंतु त्यागाचे फळ जे मोक्ष तो त्याला प्राप्त होत नाही, ज्याप्रमाणे उतु गेलेले दुध किवां तुप अग्नीमध्ये सहज पडले तर ते होमाच्या उपयोगी पडले असे कधी होत नाही, एखादा माणुस पाण्यामध्ये बुडुन त्याचा प्राण गेला तर त्याने जल समाधी घेतली असा होत नाही, त्याप्रमाणे देहावरती प्रेम ठेवुन जो कर्मावरती पाणी सोडतो त्याला त्यागाचे फळ जो मोक्ष तो मिळत नाही. किंबंहुना, आपले आत्मज्ञानाचा ज्यावेळेस उदय होतो त्याला सुर्याचा उदय झाल्यावर ज्याप्रमाणे सर्व नक्षत्रांचे तेज लोप पावते, अर्जुना! त्याप्रमाणे सर्व क्रिया आत्मज्ञानामध्ये लय पावतात आणि ज्ञानाने झालेल्या कर्मत्यागाने मोक्षप्राप्ती होते. अर्जुना! ती मोक्ष प्राप्ती अज्ञानाने त्याग केला असता होत नाही म्हणून तो खरा कर्म त्याग नसुन त्याला राजस त्याग असे म्हणतात. तरी कोणत्या त्यागापासुन मोक्ष आपल्या घरी चालत येतो हे तुला प्रसंगाने सांगतो, तरी एकाग्रतेने श्रवण कर. तर जो साधक आपल्या अधिकाराप्रमाणे जे सहज आपल्या वाटयाला आलेले कर्म वेदविधीच्या महत्वाच्या वर्णनाने अलंकृत करुन आचरण करतो. (ओवी १९१ ते २००)
परंतु हे कर्म मी करीत आहे अशा कर्तृत्वाच्या आठवणी देखील तो मनातुन त्याग करतो तसेच फळाच्या इच्छेवरही तो पाणी सोडतो.अर्जुना! मातेचा अपमान करुन तिच्याविषयी भोगवासना निर्माण केल्या तर त्या दोन्ही अध:पाताला कारणीभुत होतात. म्हणुन या दोन्हीचा त्याग करावा. ती केवळ माता म्हणुन तिची सेवा करावी याशिवाय दुसरे काही करू नये मुख अपवित्र असते या साठी गायीच्या सर्वागांचा त्याग करावयाचा काय? आपले आवडते फळ आंबा, त्याची साल आणि कोय यामध्ये काहीही रस नसतो हया दोन्ही गोष्टी त्या फळामध्ये आहेत म्हणुन कोणी आंबा टाकुन देईल काय? त्याप्रमाणे कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्माच्या फळाची इच्छा या दोहोनां कर्माचे बंध हे एकच नाव आहे. ज्याप्रमाणे वडील कन्येविषयी विषयवासना टाकून तिचे प्रेमाने संगोपन कर्तव्य म्हणुन करतात, तेव्हा त्यांना दुख होत नाही, त्याप्रमाणे कर्तृत्व-अहंकार व फलाशा टाकुन जो कर्म करतो त्याला दुख होत नाही, त्याला मोक्षरुपी मोठे फळ येते तो हा त्यागरुपी श्रेष्ठ असा वृक्ष आहे, अर्जुना, खरोखर सात्विक त्याग अशी याची जगामध्ये प्रसिध्दी आहे, आता वृक्षाचे बीज जाळुन वृक्षास जसे निर्वश करावे त्याप्रमाणे फलाचा त्याग करुन ज्याने कर्माचा त्याग केला आहे, परीसाचा स्पर्श होताच लोखंडाचा गंज आणि काळेपणा नाहीसा होतात तसे सात्विक त्यागामुळे राजस आण तामस दोन्ही गुण नाहीसे होतात.मग त्या शुध्द सत्व गुणामुळे आत्मज्ञानाचा दिव्यप्रकाश पसरतो जसे सांयकाळ झाल्यावर मृगजळ आपोआप नाहीसे होते. (ओवी २०१ ते २१०)
अथवा आकाश जसे कोणीकडे दिसत नाही तसा आत्मज्ञानाच्या पुढे संपुर्ण विश्वाचा मिथ्या भासही दिसत नाही. म्हणुन पुर्वकर्माच्या म्हणजे प्रारब्ध कर्माच्या बळाने जी बरी-वाईट कर्मे प्राप्त होतील ती आकाशात जसे ढग उत्पन्न होवुन मावळतात, त्याप्रमाणे त्या आत्मज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने शुध्द कर्मे होतात म्हणुन तो शुभकर्मापासुन होणाऱ्या सुखाने हर्षित होत नाही आणि अशुध्द कर्मापासुन होणाऱ्या दुखाने विषाद पावत नाही, हे शुभ कर्म आहे असे समजुन तो ते हर्षाने करत नाही अथवा हे अशुभ कर्म आहे असे समजुन तो त्याचा द्वेष करत नाही, जागे झाल्यावर स्वप्नात पाहीलेल्या गोष्टीचे कोणी सुख-दुख मानत नाही, त्याप्रमाणे शुभ अथवा अशुभ या कर्माविषयी त्याचे मनात काही विकल्प नसतो, म्हणुन जो पुरुष हे कर्म आणि मी याचा कर्ता अशी द्वैतभावाची वार्तादेखील जाणत नाही. अर्जुना, अशा पुरुषाकडुन जो घडतो तो सात्विक त्याग होय. अर्जुना, अशा प्रकारे कर्माचा त्याग केला म्हणजे ती आपल्याला पुर्णपणे सोडतात आणि अन्य पध्दतीने त्याग केला तर ती आपणास अधिकच बांधुन ठेवतात. बाण सोडण्यात निष्णात असलेल्या अर्जुना, देहाचा आकार प्राप्त झाल्यानंतर जे लोक कर्म करण्याचा कंटाळा करतात ते अज्ञानी होत. मातीचा कंटाळा करुन मडके काय करेल? वस्त्र हे तंतुचा त्याग करुन काय करेल? कारण त्या शिवाय त्यांचे अस्तित्वच नसेल. अग्नीच्या अंगात अग्नीत्व स्वयंसिध्द आहे आणि त्या अग्नीला उष्णतेचा कंटाळा करता येईल काय? किवां दिवा आपल्या प्रकाशाचा द्वेष करील काय? (ओवी २११ ते २२०)
हिगं जरी उग्र वासाला कंटाळला तरी स्वताच अंगी सुगंधितपणा कसा आणु शकेल? अथवा पाणी द्रवपणा सोडुन कसे बरे राहु शकेल? त्याप्रमाणे प्रत्येक प्राणिमात्र शरीराच्या रुपाने जोपर्यत नांदत आहे, तो पर्यत कर्मत्यागाचे वेड तरी काय कामाचे? आपण लावलेले गंध वाकडे लागले तर ते पुन्हा पुसुन चांगले लावु शकतो, पण जर कपाळच वाकडे असेल तर जुने कपाळ काढुन नवे बसवता येईल काय? त्याप्रमाणे ज्या विहीत कर्माचा आपण स्वता आदर केला आहे त्याचां त्याग करायचा झाला तर तर तो करता येतो, परंतु जेथे सामान्य कर्मच देहरुप झाले आहे त्याचा त्याग कसा बरे करता येईल? श्वासच्छवास ही क्रिया झोपी गेल्यानंतरही होतच असते, अशा क्रिया करण्याकरता कोणताही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत, या शरीराच्या निमित्ताने जे कर्म जीवाला चिकटलेले आहे ते जीवंतपणी आणि मृत्यूनंतरही आपले कार्य करतच असते. या विहीत कर्माचा त्याग करण्याचा एकच प्रकार आहे तो प्रकार एकाग्रतेने समजुन घे की, कर्म करीत असताना फलाच्या इच्छेच्या आहारी जावु नये. कर्माचे फळ ईश्वराला अर्पण केले की, त्याच्या प्रसादाने आत्मज्ञान प्रकाशित होते, जसे दोरीचे ज्ञान झाले की सर्पाची शंका मनातुन निघुन जाते. तसा आत्मज्ञानाने अज्ञानासह कर्माचा नाश होतो. अर्जुना, असा जेव्हा कर्माचा त्याग करावा तेव्हाच त्याचा त्याग होत असतो म्हणुन याप्रमाणे जा या जगात कर्माचा त्याग करतो तोच महात्यागी होय. एऱ्हवी रोग्याला मुर्च्छा आली असता ज्याप्रमाणे त्याला विश्रांती मिळाली असे लोक म्हणतात. (ओवी २२१ ते २३०)
दांडक्याच्या ऐवजी जसा अंगावर बुक्क्यांचा मार सोसायचा त्याप्रमाणे जो कर्म करताना कंटाळा करतो तो विसावा घ्यावा म्हणुन दुसरे कर्म सुरु करतो. परंतु हे असो ज्याने कर्माच्या फलाचा त्याग करुन कर्मच नैष्यकर्म्य अवस्थेला घेवुन गेला आहे तोच खरा त्यागी होय. अर्जुना! वास्तविक पाहता हे कर्मफल तीन प्रकारचे आहे आणि ते कर्मफळाची इच्छा सोडीत नाहीत त्यांना ते भोगावेच लागते. आपण कन्येला जन्म दिला असुनही कन्यादानाच्या वेळी ती माझी नाही असे म्हणुन वडील उदक सोडतात, त्यावेळी ते तिच्या मोहपाशातुन सुटुन पाणी ग्रहण करणारा जावई तिच्या मोहपाशात अडकतो. जे लोक शेतामध्ये विषारी लागवड करतात, ते त्यातील माल विकुन पैसे कमवुन सुखाने जगतात आणि ते विष पैसे देवुन जे विकत घेवुन खातात ते मृत्यू पावतात. त्याप्रमाणे कर्तृत्व,अहंकाराने कोणी कर्म करो अथवा कर्तृत्व-अहंकार व फलाशा या दोन्हीचा त्याग करुन कर्म करो तथापि कर्म हे कर्मरुपाने दोघांनाही बंधन करु शकत नाही, तर फलरुपाने बंधन करते. वाटेवरुन जाताना पिकलेल्या फळांची जो अपेक्षा जो करतो व ती फळे तोडुन खातो, तो रखवालदाराकडुन पकडला जातो, त्याप्रमाणे साधारण जे कर्म आहे, त्याचे जो फळ घेतो, त्यास कर्म हे बंधन करते. परंतु कर्म करुनही जो फळाची इच्छा करत नाही तो जन्म-मरणाच्या चक्रात सापडत नाही, हे जग तीन प्रकारच्या कर्माचे फळ आहे, देव, मनुष्य आणि स्थावर या सर्वाना जगडबंर असे म्हणतात आणि हे तीनही प्रकार तर कर्मफलाचेच आहेत. तेच कर्मफल एक अनिष्ट आहे एक केवळ इष्ट आहे आणि एक इष्टानिष्ट असे मिश्र आहे, असे फळाचे तीन प्रकार आहेत. (ओवी २३१ ते २४०)
परंतु जे विषयाने आसक्त झालेले आहेत ते अविधिचा स्वीकार करुन शास्त्रनिषिध्द अशा वाईट कर्मामध्ये प्रवृत्त होतात, त्या वेळी त्यांना कृमी, किटक अथवा माती असे वाईट देह प्राप्त होतात, त्यालाच अनिष्ट कर्म फळ असे म्हणतात, आणि जेव्हा स्वधर्माला मान देवुन आपल्या अधिकाराप्रमाणे वेदांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे ज्या वेळेस सत्कर्म केले जाते, अर्जुना! तेव्हा त्यांना इंद्रादिक देवतांचे देह प्राप्त होतात, त्या कर्मफळाची इष्ट म्हणुन प्रसिध्दी आहे. गोड व आंबट हे दोन रस मिश्रीत केले असता या दोहोहुंन वरचढ असा मधुर रस निर्माण होतो. प्राणवायु जेव्हा योगाच्या अभ्यासाने कुंभक होतो,त्याप्रमाणे सत्य व असत्य यांचे मिश्रण झाल्यावर ते त्या दोहोनाही जिकंण्यास कारण होते, म्हणुन पुण्यकारक व पापकारक कर्मे सारख्या प्रमाणात मिळुन जे आचरण होते तेव्हा त्या योगाने मनुष्य जन्म प्राप्त होतो, ते मिश्र फळ होय. असे या जगामध्ये तीन प्रकारची कर्म फळे आहेत आणि जे या कर्मफलाची इच्छा टाकत नाहीत त्यांना जन्म-मरणाच्या चक्रात फिरावे लागते आणि सुख-दुखाचे फळ भोगावे लागते. जिभेची रुची वाढत जात असताना जेवण गोड लागते परंतु अजीर्ण होईपर्यत भोजन केले तर अवश्य मरण प्राप्त होते. पायी चालत असताना चोराशी मैत्री केली तर तोपर्यत चांगली असते जोपर्यत अरण्य लागत नाही, अथवा वारांगणेशी मैत्री तोपर्यतच चांगली असते, जोपर्यत तिच्याशी समागम घडत नाही. (ओवी २४१ ते २५०)
त्याचप्रमाणे देहात प्राण आहे तोपर्यत कर्म करीत असताना कर्तृत्व पणाचा अहंकार असतो पण मृत्यूनंतर त्याची फळे भोगावी लागतात. शक्तीमान व श्रीमंत सावकार कर्जदाराकडे वायदा केलेले पैसे मागावयास आल्यानंतर पैसे घेतल्याशिवाय जसा परत जात नाही त्याप्रमाणे प्राणी मात्रांना केलेल्या कर्माचे भोग त्या त्या वेळेला निश्चीत प्राप्त होतात. कणसातुन बी पडते त्या बीजाला अंकुर येवुन त्याला कणीस येते पुन्हा त्या कणसाचे दाणे जमिनीवर पडतात आणि त्या दाण्यातुन कणसे उत्पन्न होतात, हे जसे सातत्याने चालुच असते. त्याप्रमाणे मागील कर्मफळ भोगत असताना जी कर्मे होतात ती आणखीन दुसऱ्या कर्मफळाना उत्पन्न करीत रहातात. कर्मापासुन फळ आणि फळापासुन कर्म हे चक्र अविरत सुरु असते, ज्याप्रमाणे चालत असताना एक पाय दुसऱ्या पायाला मागे टाकुन पुढे पडतो, अथवा होडी एका तीरावरुन दुसऱ्या तीरावर गेल्यावर तिला प्रत्येक तीर अलिकडचाच होय. कारण प्रत्येक तीरात तीला पलिकडेपणा आहेच, त्या नावेची नदी तरुन जाण्याची क्रिया बंद पडत नाही त्याप्रमाणे फलाच्या उपभोगाला शेवट नाही. कर्मफलापासुन फळभोग व फळभोगापासुन पुन्हा कर्म अशा साध्य-साधनांच्या प्रकाराने फळभोगा विस्तार होतो. याप्रमाणे कर्मफलाचा त्याग न करणारे लोक संसाराच्या मोहजाळात गुरफटले जातात. एऱ्हवी जाईचे फुल ज्याप्रमाणे विकसीत होताक्षणीच सुकते, तसेच ज्याने फलाशेचा त्याग करुन कर्मे केलीच नाहीत असे केले आहे. बीजासाठी ठेवलेले धान्य दररोज पोटासाठी खावुन टाकले तर मग पुढे पेरण्याचा प्रकार बंद होतो त्याप्रमाणे फळाच्या त्यागाने कर्मापासुन निर्माण होणारे जन्म-मृत्यू दुर जातात.निष्काम कर्मयोगाने चित्तशुध्दी होते व गुरुकृपारुपी अमृताच्या तुषारांमुळे प्राप्त झालेल्या आत्मज्ञानामुळे जीव आणि ब्रम्हयातील द्वैतरुपी दारिद्र्य नष्ट होते. मिथ्या जगाच्या आकाराने जे भासते ते जीवाने केलेल्या कर्माचे इष्ट, अनिष्ट व मिश्र या स्वरुपाचे फळ असल्यामुळे ते त्रिविध फळ आत्मज्ञानाने नाहीसे होते आणि या आध्यात्मिक अवस्थेत भोक्ता, भोग्य आणि भोग ही त्रिपुटी देखील नाहीशी होते. (ओवी २५१ ते २६०)