अध्याय १८ भाग ५

      अर्जुना, तो देवतांचा सर्व समुदाय हे इंद्रियांचे उत्तम होण्याचे कारण आहे असे जाण, असे देव म्हणाले, याप्रमाणे तुझ्या बुध्दीला पटेल अशा पध्दतीने सर्व कर्मे उत्पन्न होण्याची खाण असलेली “पाच कारणे” तुझ्या स्मरणात नेहमी रहातील अशा प्रकारे सांगितली आहेत. त्या कर्माच्या उत्पत्तीविषयी “देह” हे “पहिले” कारण होय, असे मी म्हणतो.  कर्माच्या उत्पत्तीविषयी जसे देह हे पहिले कारण आहे त्याप्रमाणे “कर्ता” हे “दुसरे” कारण होय. हे राजपुत्र अर्जुना, ती मनुष्य देहातील “वेगवेगळी इंद्रियें” या कर्माचे “तिसरे” कारण आहे. असे जाण. “मनुष्य देहातील वेगवेगळया कार्यामुळे निरनिराळी झालेली वायुशक्ती” हेच येथे कर्माचे “चौथे कारण” आहे, असे जाण. आणि सर्व इंद्रियांना भुषण देणारा असा जो अधिष्ठायी देवताचां समुदाय, या पाच निमित्तकारणाने ही पाच कारणरुपी खाण वाढते आणि मग कर्माची  उत्पत्ती होते, ते पाच हेतु देखील आता तुला स्पष्ट सांगतो. जरी अकस्मात वसंत ऋतू आला, तरी त्याच्या योगाने वृक्षानां नवीन पालवी फुटते, नवीन पालवीतुन फुलांचे गुच्छ येतात, आणि फुलापासुन फळे निर्माण होतात. तेव्हा वर्षा ऋतुने मेघांना आणलेले असते मेघापासुन पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे धान्य पिकते आणि ते खाण्याने सुखाचा भोग प्राप्त होतो, किवां पुर्वेस अरुणोदय होतो,  अरुणोदय झाल्यावर सुर्यनारायण उगवतो आणि त्यामुळे संपुर्ण दिवस उजाडतो, अर्जुना ! त्याप्रमाणे मन हे कर्म करण्याचा संकल्प होण्यास कारण आहे , तो संकल्प वाचेचा दिवा लावतो म्हणजे वाचेकडुन बोलण्याची क्रिया करवतो, मग ती वाणीची मशाल प्रकाशाने अनेक वाटा दाखवते, तेव्हा  कर्ता जो जीवाच्या कर्तृत्वबुध्दीने कर्म करु लागला असता त्याच्या कडे कर्तेपण येते, तेथे शरीर, वाणी, मन याचा समुह शारीरीक, वाचिक व मानसिक कर्माला कारण आहे, लोखंडाची एकादी वस्तु तयार करणे झाल्यास ज्याप्रमाणे ती लोखंडाच्या हत्यारांनीच तयार करावी लागते, त्याप्रमाणे हे बुध्दीमान अर्जुना, तंतुच्या ताणामध्ये आडवा तंतु वस्त्र होतो. (ओवी ३५१ ते ३६०)

ज्याप्रमाणे हिऱ्याला पैलु पाडण्याचे काम हिऱ्यानेच करावे लागते, तसे मन, वाचा, देह यांच्या कर्मास मनच कारण आहे, या ठिकाणी कर्माची शरीरादिक कारणे तीच त्यानां हेतु कशी होतील, अशी जर कोणाला शंका येईल तर तो विषय श्रवण करण्याची जे कोणी इच्छा करतात, त्यांनी एकाग्रतेने ऐकावे, सुर्याच्या प्रकाशाला  कारण व हेतु  जसा सुर्यच आहे अथवा ऊसाच्या वाढीला ऊसाचे कांडे निमित्त व उपादान आहे, अथवा वाणीची देवता जी सरस्वती देवी तिची स्तुती करावयाची झाली तर वाणीचाच उपयोग करावा लागतो, अथवा वेदांचे श्रेष्ठत्व वर्णन करावयाचे असल्यास ते वेदांनीच करावे लागते, त्याप्रमाणे शरीर, वाचा व मन ही सर्व कर्माची कारणे आहेत, हे सर्वाना माहीती आहे. परंतु हेच शरीरादिक निमित्त कारणेही आहेत, हेही येथे चुकत नाही, शरीर, जीवात्मा, इंदिये, वायुची क्रियाशक्ती व इंद्रियानुग्राहक देवता या पाच उपादानकारणांनी व याच निमित्तकारणांची नियमपुर्वक एकत्र उभारणी असते,तेव्हा सर्व कर्माची उत्पत्ती होते. हे धनंजया, ते कर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर केले तर  पुण्यकारक होय,  व त्यालाच न्याय कर्म असे म्हणतात, आणि त्याचा हेतु देखील न्यायच होय. ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्याचा लोट साळीच्या वाफयात जिरुन जातो आणि साळी वाढण्यासाठी त्या पाण्याचा खुपच उपयोग होतो, घरी रागावलेला माणुस घर सोडुन बाहेर निघाला व सहजपणे द्वारकेच्या वाटेला लागला तर त्याला चालण्याचे श्रम होतील पण त्याचे प्रत्येक पाऊल वाया जाणार नाही, कारण भगवान  द्वारकाधीशांचे त्याला दर्शन घडेल, त्याप्रमाणे हेतु व कारण यांच्या मिलापाने जे आधंळे कर्म उत्पन्न होते म्हणजे शास्त्राला न जाणता कर्म केले जाते त्याला जर शास्त्राची दृष्टी प्राप्त झाली म्हणजे ते यथासांग झाले, तर त्या वेळेला त्यास न्याय कर्म असे म्हणतात ते पुर्ण कर्म होते. (ओवी ३६१ ते ३७०)

एका भांडयातील दुध गरीबांना वाढुन संपले आणि दुसऱ्या भांडयातील दुध ऊतु जावुन संपले. तर दोन्ही भांडयातील दुध खर्च झाले हे खरे पण ऊतु गेलेले दुध खर्च झाले असे म्हणता  येत नाही. त्याप्रमाणे शास्त्र न जाणता केलेले कर्म निष्फळ होत नसेल तर चोरीला गेलेले धन देखील दानधर्माच्या खात्यात लिहावे लागेल. अर्जुना, बावन्न वर्णापलीकडे कोणता मंत्र आहे?  आणि बावन्न वर्णाच्या व्यवहारात उच्चार केल्याशिवाय कोणी माणुस राहीला आहे काय? परंतु वेदमंत्राचा उच्चार कसा करावा याची युक्ती जोपर्यत पुर्ण कळत नाही, तोपर्यत त्या बावन्न अक्षरांच्या उच्चारास मंत्र-उच्चाराचे फळ प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे कारण, हेतु यांच्या योगाने जेव्हा सामान्य् कर्म घडते तेंव्हा ते यथाशास्त्र घडत नाही, तेव्हाही कर्म हे घडतच असते परंतु ते धर्म नीतीने  युक्त होत नसते, म्हणुन ते अन्याय कर्म होय, त्यामुळे समाजात अन्याय घडतो, व पाप निर्माण होते, उत्तम महिमा असलेल्या अर्जुना!  याप्रमाणे याच कारणे असलेल्या कर्माला हे पाचही हेतु आहेत, तर आता या ठिकाणी आत्मा हा  कर्मास कारण आहे काय?  याचा विचार कर,ज्याप्रमाणे सुर्य हा दृश्य पदार्थ न होता डोळयांना व दृश्य पदार्थाना प्रकाशतो, त्याप्रमाणे आत्मा हा कर्माचे कारण आणि कर्म न होताच कर्माचे प्रकाशन करतो, हे वीरेशा अर्जुना! आरसा व प्रतिबिबं हे दोन्ही आपण न होता पाहणारा जसा दोघांचेही प्रकाशन करतो, अथवा सुर्य जसा दिवस-रात्र न होता आपल्या उदयाने दिवस आणि अस्ताने रात्र करीत असतो, त्याप्रमाणे आत्मा हा कर्म आणि कर्ता यापैकी न होता दोघांनाही प्रकाशित करतो. (ओवी ३७१ ते ३८०)

परंतु देहरुपी अहंकाराच्या मोहाने ज्याच्या बुध्दीने देह म्हणजेच मी असा निश्चय केला आहे, त्यांना आत्म्याविषयी जणु अज्ञानाची मध्यरात्रच झाली आहे, ज्याने चैतन्य, ईश्वर, ब्रम्ह हे सर्व काही  देहालाच मानले आहे. त्याची देह हाच कर्ता आहे, अशी दृढ समजुत होते, आत्मा हाच कर्मकर्ता आहे, असा दृढ निश्चय तो करत नाही, तर तो देहस्वरुप असलेला मीच कर्माचा कर्ता आहे हेच खरे मानत असतो. कारण मी आत्मा कर्मातीत असुन सर्व कर्मानां साक्षीभुत आहे, अशा स्वरुपाचा विचार तो कानाने श्रवण देखील करत नाही, म्हणुन सर्वव्यापक असा जो आत्मा तो देहच होय, असे तो मानतो काय आश्चर्य आहे, पहा, घुबड डोळे झाकुन घेवुन दिवसाला रात्र म्हणत नाही काय? ज्याने आकाशातील  सुर्य कधीच पाहीला नाही, तो डबक्यातील पाण्यात पडलेल्या सुर्याच्या प्रतिबिबांसच सुर्य समजत नाही काय? असा अज्ञानी डबक्याच्या उत्पत्तीने सुर्याची उत्पत्ती आणि डबक्याच्या नाशाने सुर्याचा नाश तसेच कंपाने कंप मानत असतो, झोपलेला मनुष्य जो पर्यत जागा होत नाही, तोपर्यत स्वप्न हे त्याला खरेच भासत असते. जो अंधारात दोरीला साप समजुन घाबरत असतो,त्याला प्रकाशात दोरीचे सत्य समजते आणि तो दोरीला भीत नाही, यात आश्चर्य ते कसले? जोपर्यत कावीळ झाली आहे, तोपर्यत चंद्राचा रंग पिवळा दिसतो कारण असे दिसणे स्वाभाविक आहे. हरीणांनी मृगजळाला पाहुन भुलू नये काय? त्याप्रमाणे शास्त्र आणि सदगुरु यांची नावे उच्चारल्या बरोबर तो त्याचां वाराही आपल्या शिवेला लागु देत नाही, म्हणजे त्यांना तो मुळीच मानत नाही, आणि तो केवळ अज्ञानीपणाच्या जीवावरच जगत असतो. (ओवी ३८१ ते ३९०)

कोल्हा हा ढग पळत असताना चंद्र पळत आहे असे मानतो, त्याप्रमाणे त्याने देहच आत्माआहे अशा दृष्टीने आत्म्याला देहाच्या जाळयात घातले आहे.  अर्जुना!  मग तो जीव अशा माण्याने देहरुपी बंदीशाळेत कर्माच्या पक्क्या गाठीनी जखडला जातो. अरे  हे पहा की, बिचारा पोपट पायाचा चवडा मोकळा असतानाही मी बांधलो गेलो आहे अशा दृढ कल्पनेने नळीवरच बसुन  राहत नाही काय?  म्हणुन परिशुध्द आत्मस्वरुपाच्या ठिकाणी जो प्रकृतीने केलेल्या कर्माचा आरोप करतो तो कल्पकोटीपर्यत कर्मातच गुंतलेला रहातो. ज्याप्रमाणे वडवानल सागरामध्ये असून देखील सागराचे पाणी त्याला स्पर्श करु शकत नाही. त्याप्रमाणे तो कर्मामध्ये असुनही त्याला कर्म स्पर्श करु शकत नाही. जो अलिप्तपणाने कर्म करीत असतो, तो खरोखर कसा ओळखावा? असे विचारशील तर सांगतो, ज्याप्रमाणे दिव्याच्या आधारे पाहीले असता आपलीच वस्तु अंधारात प्राप्त होते. त्याप्रमाणे मुक्त पुरुषांचा सुक्ष्म विचार केला असता आपलीच अनादिसिध्द असलेली मुक्तता आपणास  प्राप्त होते. आरसा जसजसा स्वच्छ करावा, तसतसे आपले प्रतिबिबं त्यामध्ये अधिक स्पष्ट दिसु लागते. अथवा मीठ पाण्यामध्ये घातले असता जसे त्याचे पाणी होते. परंतु बिबं आणि प्रतिबिबं या दोघांना विचारदृष्टीने पाहिले असता  बिबांपेक्षा प्रतिबिबं  नावाचा पदार्थ स्वतंत्र नाही. असेच जाणवते आणि आपले स्वरुप आपोआप दिसते. त्याप्रमाणे आपली हरवलेली आत्मवस्तू आपणासं परत मिळवायची असेल तर संताचा उपदेश समजुन घ्यावा, सर्वकाळ संतांचे वर्णन करावे आणि त्याचेंच गुणगाण नेहमी एकाग्रतेने करावे. (ओवी ३९१ ते ४००)

ज्याप्रमाणे कातडयांचे डोळे असतात,डोळयातील बुबुळ देखील सुक्ष्म कातडीचे असते, परंतु त्या कातडयांने दृष्टीलां प्रतिबंध होत नाही, त्याप्रमाणे कर्म करत असुनही जो कर्माच्या चांगल्या वाईट परिणामाने लिप्त होत नाही, आणि जो सर्व कर्माच्या बंधनातुन मुक्त झाला आहे, त्याची लक्षणे कशी असतात, हे मी तुला विचारांने बाहु उभारुन सांगत आहे. हे बुध्दीमान अर्जुना! अनादि जीव, जो अविद्येच्या निद्रेत विश्वरुपी स्वप्नाचा हा व्यवहार करुन सुखदुखाचे भोग भोगीत होता, तो तु ब्रम्ह आहेस हे महावाक्य कानी पडुन सदगुरू-कृपेने बलाने मस्तकावर नुसता हात ठेवुन नव्हे तर जसा थापटुन जागा केला आहे, त्याप्रमाणे धनंजया, तो विश्वस्वप्नासह अविद्यारुपी झोप त्यागुन अद्वैत ब्रम्हानंदाच्या प्रसन्न पणाने जागृत झाला आहे, म्हणजे मी ब्रम्ह आहे  अशा साक्षात्काराच्या अवस्थेवर आला आहे. जेव्हा मृगजळाचे पुर माध्यानकाळात एकसारखे सर्वत्र पसरलेले दिसत होते ते चंद्राची किरणे विस्तारली म्हणजे जसे आपोआप नाहीसे होतात. बालपण निघुन गेल्यावर कोणी बागुलबुवाला भीत नाही,अथवा लाकुड जळुन गेल्यावर जसा स्वयंपाक होत नाही. अथवा जागे झाल्यावर स्वप्न जसे दृष्टीस पडत नाही, तशी अर्जुना! त्या मुक्त पुरुषाकरता अहंकार आणि ममता उरत नाही.अंधार पाहण्यासाठी सुर्य हा कोणत्याही भुयारात शिरला तरी तेथे अंधार जसा रहात नाही. त्याप्रमाणे “मी आत्मा आहे” अशी ज्याला पुर्ण जाणीव आहे, तो ज्या वस्तुकडे पाहील ती वस्तु व त्याची दृष्टीही त्याला आत्मरुपी  दिसेल. (ओवी ४०१ ते ४१०)

ज्याप्रमाणे अग्नी ज्या पदार्थाला लागला तर तो पदार्थ अग्नीरुपच  होतो, जाळणारे व जळणारे असा भेदभाव रहात नाही, त्याप्रमाणे आत्म्याहुन भिन्न भासणारे जे कर्म त्या कर्मामुळे आत्म्यावर जो कर्तेपणाचा आरेाप केला जातो, तो आरोप आत्मज्ञानाने नाहीसा झाल्यावर जे काही उरते, ते शब्दांनी सांगता येत नाही. त्या आत्मस्थिीतीचा जो राजा आहे तो मी देह आहे असे मानील काय? जसे  प्रलयकालाच्यां जलामध्ये छोटे-मोठे असे काही ओघ शिल्लक राहतात काय? मी ब्रम्ह आहे आणि सर्व विश्वात समानरुपाने मीच व्यापुन आहे, अशी व्यापक स्थिीती ज्याची झाली आहे. त्याला देह म्हणजे मी असे वाटेल काय? संपुर्ण जगाला प्रकाशित करणारा सुर्य प्रतिबिंबरुपाने डबक्यात धरुन ठेवता येईल काय? ताक घुसळुन लोणी काढल्यानंतर पुन्हा ताकात घातेल असता ते लोणी पुन्हा ताकात एकरूप होवुन त्याचे दही होईल काय? हे वीरेशा अर्जुना! लाकडातुन अग्नी तयार करुन वेगळा काढल्यावर तो लाकडाच्या पेटीत  कोडुंन ठेवता येईल काय? अथवा रात्रीच्या उदरातुन जो सुर्य बाहेर निघालेला आहे, तो  रात्र अशी गोष्ट तरी ऐकेल काय? त्याप्रमाणे जाणण्याची वस्तु व जाणणारा ज्या ठिकाणी बकरुप पावली आहेत त्याला मी देह आहे किवां देहच आत्मा आहे अशी परिछिन्न अहंता कशी असु शकेल? आकाशाने एका जागेपासुन दुसऱ्या  जागी जावे तर ते तेथे पहिलेच परिपुर्ण भरुन असते म्हणुन ते आपोआपच सर्व ठिकाणी व्याप्त आहे. त्याप्रमाणे मुक्ती प्राप्त केलेल्या पुरुषाने जे कर्म करावे ते स्वभावता तोच असतो म्हणजे ते आत्मस्वरुप असते मग तो मुक्त पुरुष कोणत्या कर्मपणाने गुंतला जाईल? (ओवी ४११ ते ४२०)

आकाशाशिवाय जशी कोठेही रिकामी जागा नाही, अथवा समुद्राला जसा प्रवाह नाही अथवा ध्रुवाला आपली जागा सोडुन उठुन जाणे शक्य नाही. त्याप्रमाणे मुक्त पुरुषाची व्यापकपणामुळे तशी स्थीती झालेली असते. याप्रमाणे ज्याच्या आत्मानुभवात देहाच्या ठिकाणी असलेला अंहकार विरुन गेला आहे, तरीदेखील देह जोपर्यत आहे, तोपर्यत कर्मे घडत असतात, वारा वाहुन गेला तरी झाडे हालत असतात, अथवा  डबीमधुन कापूर काढुन घेतला तरी कापराचा वास डबीमध्ये शिल्ल्क रहातो, सुमधुर सुरेल गाण्याचा कार्यक्रम संपला तरीपण चित्तातुन त्याच्या लहरी जात नाहीत, ओढयाचे पाणी वाहुन गेल्यावर मागे ओल शिल्ल्क रहाते, सुर्य मावळल्यानंतरही पश्चिम क्षितीजावर सुर्याचे तेज म्हणजे संधीपकाश दिसत असतो. लक्ष्याला भेद केल्यावर सुध्दा जोपर्यत सोडलेल्या बाणात वेगाचा जोर आहे तोपर्यत वेगवान बाण पुढे पुढे जात असतो. अथवा कुंभाराच्या चाकावर तयार झालेले मातीचे भांडे कुंभाराने काढुन घेतल्यानंतरही प्रारंभी चाकाला दिलेल्या वेगामुळे चाक फिरतच रहाते. त्याप्रमाणे देहाचा अभिमान नाहीसा झाल्यावर अर्जुना, देह प्रारब्धामुळे निमार्ण झाला आहे, ते प्रारब्ध देहाला आपोआप कर्म करावयास लावते, आपण पुर्व संकल्प केल्याशिवाय जशी गंर्धव नगरे निर्माण होतात, त्याप्रमाणे आत्म्याच्या प्रयत्नावाचुन देहादी पाच कारणांमुळे सर्व क्रिया आपोआप घडतात. (ओवी ४२१ ते ४३०)

पुर्वजन्मीच्या संस्कारात पाचही कारणे व हेतु विविध क्रिया घडवीत असतात, ते कर्म घडत असताना त्या  कर्मात मग सर्व लगताचा संहार होवो अथवा पुर्वीपेक्षा नवीन उत्तम जग निर्माण होवो, परंतु चंद्रविकसिनी कमळ जसे संकुचित होते आणि सुर्य विकासी कमळ जसे विकसित होते तसे होतच रहाते पण हे दोन्ही प्रकार ज्याप्रमाणे सुर्य पहात नाही, अथवा मेघातून वीज पृथ्वीच्या ज्या भागावर पडते तेथे खड्डा निर्माण होतो. अथवा मेघ जलाची वृष्टी करुन पृथ्वीला आल्हादकारक बनवतो, परंतु या दोन्ही अवस्थांना आकाश जसे जाणत नाही, त्याप्रमाणे आत्मा मुक्त देहात असुनही मी देह  नाही अशा बोधाने असतो. अर्जुना, ज्याप्रमाणे जागा झालेला मनुष्य स्वप्न बघत नाही त्याप्रमाणे देहादिकांच्या कर्मानी सर्व सृष्टी उत्पन्न झाली अथवा नाश पावली तरी देखील तो काही बघत नाही. एरवी जे संसारात गुंतलेले लोक आहेत ते चामडयाच्या देहाने मुक्त पुरुषाच्या देहाकडे  पहात असतात आणि तोच कर्म करणारा आहे असेच मानतात, किवां गवताचे बुजगावणे करुन शेताच्या बांधावर उभे केलेले असते, परंतु कोल्हा त्याला रखवालदार आहे असे मानत नाही का? एकाद्या वेडया माणसाने वस्त्र नेसलेले आहे कि नाही हे जसे इतर लोकांनी जाणावे त्यामुळे  त्याचे भान त्याला नसते, पतीव्रता स्त्री जेव्हा सती जाण्यास निघते तेव्हा तिचे वस्त्र आणि दागिने लोकांना दिसतात परंतु सती जाणाऱ्या स्त्रीस मात्र समोरील चिता दिसत असते, त्या सतीने एवढे मनोर्धेय तयार केलेले असते कि त्या सतीला आपल्या पतीच्या आठवणीशिवाय आपल्या समोरील चिताग्नी किवां तिला पहाणारे लोक हे काहीच दिसत नाही. (ओवी ४३१ ते ४४०)

पुढील भाग