अध्याय १८ भाग ६

      याप्रमाणे जो मनुष्य आत्मरुपाने जागा झाला आहे त्याला स्वताचे भान नसते किवां लोकांकडेही त्यांचे लक्ष नसते.जो दृश्यासह दृष्टेपणानेही आटुन गेला आहे तो आपल्या इंद्रियाचे समुह काय कर्म करतात हेही जाणत नाही. सागराच्या तीरावर आलेल्या लोंकाना वाटते की मोठया लाटेने लहान लाटांना  गिळुन टाकले आहे तरी पाण्याच्या दृष्टीने पाहीले तर कोणती लाट कोणत्या लाटेला गिळते ते कळत नाही. त्याप्रमाणे पुर्ण पुरुषाला आपल्या स्वरुपाहुन भिन्न असा प्राणीच नाही ज्याला तो मारेल. असे पाहा कि, सोन्याच्या देवीने सोन्याच्या त्रिशुलाने सोन्याच्या महीषासुरांचा नाश  केला, हे सर्व दृश्य भक्तांच्या दृष्टीने खरे भासते, परंतु सोन्याच्या दृष्टीने देवी, त्रिशुल व महीषासुर हे सर्व सोनेच आहे, एखाद्या वस्त्रावर काढलेल्या चित्रातील जल आणि अग्नी हा डोळयाने दिसणारा भास आहे, कारण वस्त्रावर अग्नीची उष्णता आणि पाण्याचा ओलावा हे दोन्हीही  नाहीत. त्याप्रमाणे मुक्त पुरुषाच्या देह प्रारब्ध संस्काराप्रमाणे कर्म करीत असतो परंतु अविचारी लोक त्यालाच “कर्मकर्ता” असे म्हणतात, आणि तो कर्म करीत असता त्रैलोक्याचा नाश झाला किवां आणखीन काही झाले, तरी ते त्या मुक्त पुरुषाने केले असे बोलु नये, सुर्यापुढे अंधार येत नाही मग सुर्य अंधाराचा नाश करतो हे कसे बोलता येईल?  मुळामध्ये आत्मज्ञानी पुरुषाला द्वैतच जिथे दिसत नाही तेथे तो कोणास मारेल?  म्हणुन त्याची बुध्दी पापपुण्याचा गंध जरासाही जाणत नाही. जशी एखादी नदी गंगा नदीला मिळाली तर तिचा अपवित्रपणा नाहीसा होतो.  (ओवी ४४१ ते ४५०)

अर्जुना! अग्नीवर अग्नी पडला तर तो त्याला भाजेल काय?  एक अग्नी दुसऱ्या अग्नीस पोळतो काय? एखादे शस्त्र स्वताच स्वतामध्ये रुतेल काय? त्याप्रमाणे आपल्या स्वरुपाहुन कोणतेही  कर्म तो भिन्न समजत नाही, तेथे त्याच्या बुध्दीला कोणते कर्म कर्तेपणाने लिप्त करेल? म्हणुन जो कर्म, कर्ता व क्रिया ही त्रिपुटी आपणच झाला आहे त्याच्या शरीरादिकांकडुन कर्म घडले तरी त्याने तो बध्द होत नाही. कारण जीवात्मा हा मोठा कुशल कारागीर असुन आपणास कर्माचा कर्ता समजुन दहा इंद्रियांच्या साधनाने पाच हेतु धारण करतो. आणि मग त्या ठिकाणी न्याय किवां अन्याय अशी दोन प्रकारची कर्में करुन क्षणभरात कर्माची भुवने निर्माण करतो, एवढया  मोठया कृत्यास आत्मा हा सहाय्यकर्ता होत नाही, तसेच तो आरंभ करतो असेही म्हणु नये.तो ज्ञानस्वरुप आत्मा केवळ साक्षी असल्यामुळे जीवाच्या ठिकाणी जेव्हा अमुक करण्याकडे जीवाची प्रवृत्ती ज्यावेळी होते तेव्हा आत्म्याला  काही  कष्ट पडत नाहीत कारण देहादी पाच लोकच त्या कर्मप्रवृत्तीचे  ओझे वाहतात, म्हणुन जो केवळ आत्मस्वरुपी झाला आहे त्याला कर्माची बंदीशाळा नाही. परंतु अज्ञानरुपी पटावर जे प्रपंचाचे भ्रमज्ञानाचे चित्र निर्माण झालेले असते, ते चित्र, चित्र काढणारा व चित्रपट ही त्रिपुटी तुला स्पष्ट करुन सांगतो. (ओवी ४५१ ते ४६०)

ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी जगास कारणीभुत आहे आणि आपासुनच कर्माची प्रवृत्ती होते. हे अर्जुना! आता याच त्रिपुटीची वेगवेगळी स्वरुपे स्पष्ट करुन सांगतो, ती एकाग्रतेने श्रवण कर. तर जीवरुपी सुर्यबिबांची श्रोतादिक पाच इंद्रियरुपी किरणे वृत्तीच्या रुपाने देहाच्या बाहेर धावतात आणि शब्द, स्पर्श , रुप, रस, गंध या विषयकमलाच्या पाकळया विकसीत करतात. जीवरुपी राजाचे इंद्रियरुपी लुटारु, खोगीर व लगाम नसलेल्या मनाच्या संकल्परुपी घोडयावर बसतात व पंचविषयी रुपी देशात घुसून सुखदुखरुपी संपत्तीची लुट जीवरुपी राजापर्यत आणतात. हे ज्ञानइंद्रियांच्या द्वारे आपला व्यवहार चालविते व जे ज्ञान जीवाला सुखदुखे अनुभवास लावते, ते ज्ञान सुषुप्तीच्या कालामध्ये जेथे लीन होवुन रहाते, त्या जीवाला ज्ञाता हे नाव आहे, आणि जे आता सांगितले त्याला ज्ञान असे म्हणतात. अर्जुना! अविद्येच्या पोटी जन्मल्याबरोबर जे ज्ञान स्वताला अंतकरण, वृत्ती आणि विषय या तीन ठिकाणी विभागुन घेते. आपल्या धावण्याच्या पुढे शब्दादी ज्ञेयांच्या दगडांचा बांध घालून ते आपल्या मागच्या बाजुस ज्ञातृत्वाची भिंत उभारीत असते, जे ज्ञान, ज्ञाता व ज्ञेय याच्यांमध्ये असल्यामुळे ज्ञाता व ज्ञेय या दोघांच्या व्यवहाराचा प्रकार सुरू असतो, ज्ञेयाची सीमा प्राप्त करुन ज्याची पुढे जाण्याची धाव थाबंते आणि जे ज्ञान सर्व पदार्थाना नावे देते. (ओवी ४६१ ते ४७०)

ते सामान्य वृत्तिज्ञान होय, यात संशय नाही आता ज्ञेयाची लक्षणे सांगतो, ती श्रवण कर. तर शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध हे ज्ञेयाचे पाच प्रकारचे मिथ्या रुप आहे, जसा एकच आंबा दृष्टीस पडल्यावर तो पाच इंद्रियांना वेगवेगळया प्रकारचा भासतो, म्हणजे शब्दाने कानास समजतो, रसाने जिभेला समजतो, रंगाने डोळयास  दिसतो, गंधाने नाकाला समजतो आणि स्पर्शाने तो  त्वचेस जाणवतो. तसे ज्ञेय हे एकच आहे. परंतु आपल्या इंद्रियांच्या द्वारे त्याविषयी वेगळे ज्ञान निर्माण करतो, म्हणुन ते ज्ञेय शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध अशा पाच प्रकारचे होते, सागरास मिळाल्यानंतर नदीचा प्रवास थाबंतो, मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर चालणे थांबते, आणि कणीस तयार झाल्यावर ज्वारी, मका, बाजरी, नाचणी आदी पिकांची  वाढ थांबते, अर्जुना, त्याप्रमाणे  इंद्रियांच्या द्वारे धावणारे वृत्तीज्ञान जेथे संपते तो विषय म्हणजे ज्ञेय होय. धनंजया! याप्रमाणे ज्ञाता,ज्ञान व ज्ञेय यांची लक्षणे तुला सांगितली, ही त्रिपुटी सर्व कर्माच्या प्रेरणेचे कारण आहे, हे तु जाण. अर्जुना! ज्ञान हे ज्ञात्याला जो विषय दाखवतो तोच ज्ञाता त्या विषयाचा प्रिय असल्यास स्वीकार करतो अथवा अप्रिय असल्यास त्याचा त्याग करतो माशाला पाहताच बगळा जसा त्यास धरावयास धावतो अथवा संपत्तीचा ठेवा पाहुन दरिद्री माणुस जसा वेगाने झडप घालतो, किवां सुदंर स्त्रिाला पाहुन कामुक मनुष्य जसा तिच्या मागे धावतो. (ओवी ४७१ ते ४८०)

 

अथवा पाणी जसे उताराकडे धावते, भ्रमर जसे फुलांच्या सुगंधाकडे आकर्षित होतात  धार काढण्याच्या वेळेस वासरु जसे गायीकडे धावते, स्वर्गातील उर्वशीच्या सौदर्याचे वर्णन ऐकुन कामुक लोक जसे स्वर्गातील उपभोग प्राप्त व्हावेत म्हणुन अनेक प्रकारचे यज्ञ याग करतात. पारवा आकाशात उंच उडत असताना पारवीला पाहताच जमिनीवर त्वरेने येतो, मेघांची गर्जना ऐकल्याबरोबर मोर जसा आकाशाकडे उंच उडण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे ज्ञेयाला पाहुन ज्ञाता म्हणजे जीव तिकडे धाव घेत असतो. म्हणुन अर्जुना!  ज्ञान, ज्ञाता व ज्ञेय हे तीनही कर्माच्या प्रवृत्तीला कारणीभुत आहेत. आणि कदाचित तेच ज्ञेय ज्ञात्याला जर अतिशय प्रिय वाटले तर मग ते भोगण्याविषयी त्याला क्षणाचाही विलंब चालत नाही, अथवा कदाचित तोच विषय जर नावडता असेल तर त्याचा त्याग करण्याविषयी त्याला एकेक क्षण युगाप्रमाणे वाटतो, सापाला लाबुंन पाहीला तर नीलमण्याचा हार आहे या विचाराने आनंद होतो आणि जवळ जावुन पाहीले असता तो साप आहे असे लक्षात आले तर मनात भिती निर्माण होते. त्याप्रमाणे ज्ञात्याला प्रिय व अप्रिय हे दोन विषय पाहिल्यावर हर्ष किवां दुख होते आणि मग तो त्याचा स्वीकार अथवा त्याग करण्याच्या क्रियेकडे प्रवृत्त होतो. जो कुस्तीवीर समोर दुसरा मल्ल पाहिल्याबरोबर तो जरी सर्व सैन्याचा अधिपती असला तरी स्वस्थानावरुन खाली उतरुन जमिनीवर कुस्ती खेळण्यास उभा रहातो.  (ओवी ४८१ ते ४९०)

तसा जो ज्ञाता म्हणुन असतो, तो विषयाने आसक्त झाला म्हणजे आपणास कर्ता असे म्हणवितो, ज्याप्रमाणे पानावर आयते भोजन करणाऱ्या मनुष्याने ते सुख सोडुन स्वयंपाकाचे कष्ट करण्यास तयार व्हावे, अथवा भ्रमरांनीच फुलांच्या सुगंधाकरीता बाग निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, अथवा सोन्याची परीक्षा करणाऱ्या सोनाराने जसे कसोटी साठी दगड व्हावे, किवां देवांनीच मंदिर बांधावे. तसे विषयांच्या अभिलाषाने ज्ञाता जेथे इंद्रियांचे लाड पुरवितो, तेथे अर्जुना, त्याला कर्ता  असे नाव प्राप्त होते, आणि ज्ञाता आपण कर्ता होवुन जेव्हा ज्ञानाला साधनपण आणतो तेव्हा साहजिकच ज्ञेय हे कार्य  म्हणजे क्रियेचे फळ होत असते, हे सुबुध्दी अर्जुना! ज्ञानाच्या त्रिपुटीला अशा रितीने पालट पडतो जसे डोळयांची दिवसा असणारी शोभा रात्री बदलते म्हणजे दृष्टी जशी मंद होते. किवां प्रारब्ध प्रतिकुल झाल्यावर श्रीमंताचा थाटमाट जसा बदलुन जातो आणि गरीबी येते, पौर्णिमा झाल्यावर चंद्र एकेका कलेने कमी होत जातो. त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड ज्यावेळी पुरविले जातात त्यावेळी ज्ञाता हा कर्तेपणाच्या अभिमानात गुतूंन जातो. त्या वेळेची त्याची लक्षणे आता तुला सांगतो तरी तु श्रवण कर. तर बुध्दी, मन, चित्त, व अहंकार ही अंतकरणाची  चार चिन्हे  आहेत म्हणजे अंतकरणाच्या चार वृत्ती आहेत, अंतकरणाच्या बाहेर त्वचा, कान, नाक, डोळे, जिव्हा, आणि नाक ही पाच प्रकारची  ज्ञानजनक इंद्रिये आहेत, हे तु जाणुन घे. त्या ठिकाणी अंतकरणाच्या वृत्तीमुळे जीवास कर्म करण्याची प्रेरणा होते. ते कर्म करण्यास आपणास सुखकारक वाटले तर अंतकरणाच्या बाहेरची पाच ज्ञानेद्रियें व पाच कर्मेद्रियें आहेत त्यानां जागृत करुन ताबडतोब तो जीव क्रिया करण्यास प्रवृत्त होतो, आणि मग कर्माचे फळ हाती येईपर्यत त्या इंद्रियेसमुहा कडुन खुप कष्ट करुन घेतो. (ओवी ४९१ ते ५००)

अथवा त्या कर्मापासुन जर दुख होईल असे जर वाटले तर त्या कर्माचा त्याग करण्यासाठी त्या दहाही इंद्रियाचा  वापर करतो, ज्याप्रमाणे राजा शेतसारा न देणाऱ्या शेतकऱ्यास रात्रंदिवस राबवितो, त्याप्रमाणे तो दुख पुर्णपणे नाहीसे होईपर्यत इंद्रियांना रात्रंदिवस राबवितो, त्याप्रमाणे त्याग अथवा स्वीकार याविषयी इंद्रियांचे जोखड मानेवर वाहत असताना त्या ज्ञात्यालाच कर्ता असे म्हणतात, हे तु लक्षात  ठेव, कर्त्याने प्रारंभ केलेली सर्व कर्मे करण्याविषयी इंद्रिये ही औताप्रमाणे शक्तीशाली आहेत म्हणुन आम्ही इंद्रियाना करणे असे म्हणतो, आणि हे करण्यासाठी कर्ता ज्या ज्या क्रिया उत्पन्न करतो त्यांनी जे व्यापिले जाते त्यास या जगात कर्म असे म्हणतो, सोनाराच्या बुध्दीने अलंकार जसे व्यापले जातात, अथवा चंद्राच्या किरणांनी चादंणे जसे व्यापले जाते अथवा सौदर्यशक्तीच्या विस्ताराने वेली जशा व्यापल्या जातात अथवा सुर्यराजाच्या प्रभेने सुर्यप्रकाश जसा व्यापला जातो, अथवा गोडीने ऊसाचा रस जसा व्यापला जातो, आकाशाने पोकळी जशी व्यापली जाते, आता हे दृष्टात पुरे. अर्जुना! याप्रमाणे कर्त्याच्या क्रियांनी जे व्यापली जाते, ते कर्म होय, यामध्ये काहीही शंका नाही. (ओवी ५०१ ते ५१०)

याप्रमाणे बुध्दीमान लोकातं शिरोमणी असलेल्या अर्जुना! कर्ता, कर्म आणि करण या तिन्हीची लक्षणे तुला सांगितली.यामध्ये ज्ञाता,ज्ञान व ज्ञेय हे तीन कर्माचे प्रवर्तक आहेत आणि कर्म करण व कार्य हे तीन  कर्मसंचय आहेत अग्नीच ठिकाणी धुर ठेवलेलाच असतो बीजामध्ये वृक्ष लपलेलाच असतो तसेच मनात जशी सर्वकाळ इच्छा जागृत असते, सोने ज्याप्रमाणे खाणीत असते तशी कर्ता क्रिया व करणे  ( इंद्रिये ) ही त्रिपुटी कर्माचे उत्पत्तिस्थान आहे म्हणुन  हे कर्म त्याचे हे फळ तसेच मी त्या कर्मासा कर्ता आहे हा प्रकार जेथे आहे तेथे सर्व प्रकारच्या क्रियांपावुन आत्मा हा अगदी दुर असतो. हे सदबुध्दीधारक अर्जुना, आत्मा हा सर्वापेक्ष वेकळा आहे  हे तुला पुन्हा पुन्हा काय सांगावे? कारण हे तु जाणतोसच. पण तुला हे ज्ञान, कर्म व कर्ता म्हणुन अर्जुना! केवळ ज्ञान, कर्म व कर्ता यावर विश्वास ठेवु नकोस कारण राजस व तामस हे दोन गुण केवळ बांधणारे आहेत व सात्विक गुण बंधातुन सोडविझ्यसास समर्थ आहेत, सात्विक गुणप्रकार तुला माहीत व्हावा म्हणुन सांख्यशास्त्रामध्ये जे गुणांचे प्रकार स्पष्ट पणे प्रगट केलेले आहेत ते तुला सांगत आहे. हे सांख्यशास्त्र विचाररुपी क्षीरसागर आहे. आत्मबोधरुपी कमलास प्रफुल्लीत करणारा चंद्र आहे आणि ज्ञान उत्पन्न करणाऱ्या न्यायादी शास्त्रांचा राजा आहे. (ओवी ५११ ते ५२०)

प्रकृती व पुरुष जणु काही एकमेकांत मिसळलेली दिवस-रात्र आहे. यांना वेगवेगळे करुन दाखवणारे जे सांख्य शास्त्र आहे. ते या तीनही लोकांमध्ये जणू सुर्यच आहे. अशा सांख्यशास्त्राच्या ज्ञानरुप प्रकाशाने, अज्ञानाच्या राशी असलेल्या अमर्याद प्रपंचाचे प्रकृती, महत् तत्व, अहंकार, पंचतन्मात्रा, पंचमहाभुते, पंचज्ञानेद्रिये, पंचकर्मेद्रिये  आणि मन या चोवीस तत्वांच्या मापाने मोजमाप करुन म्हणजे त्यांचा निरास करुन परमात्म्यासह सुखी होवुन राहता येते. अर्जुना, ते सांख्यशास्त्र ज्या गुणभेदाचे वर्णन करते, त्या गुणभेदाचा असा प्रवास आहे. ज्या त्रिगुणांनी आपल्या स्वाभाविक तीनपणाच्या संख्येने सर्व दृयसांना मोजले आहे या विश्वातील सर्व पदार्थ सात्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकारचे केले आहेत, याप्रमाणे सात्विक, राजस आणि तामस या तिन्हीचा एवढा महिमा आहे की या ज्या ज्ञानाच्या भेदामुळे विश्वातील सर्व समुदाय तीन गुणाच्या भेदात सापडलेला आहे ते ज्ञान प्रारंभी तुला सांगतो, कारण आपली दृष्टी शुध्द झाली म्हणजे कोणत्याही पदार्थाचे शुध्द स्वरुप समजते, त्याप्रमाणे शुध्द ज्ञान प्राप्त झाले म्हणजे सर्व पदार्थाचे शुध्द स्वरुप कळु लागते. म्हणुन सात्विक ज्ञान तुला आता सांगतो, तरी एकाग्रतेने तु श्रवण कर, असे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट  देवाधिदेव भगवान श्रीकृष्ण म्हणतात. तर अर्जुना !  ते ज्ञान खरोखर शुध्द सात्विक ज्ञान आहे कि, ज्याला उदय झाल्याबरोबर ज्ञेय हे ज्ञात्यासह लीन होते.ज्या प्रमाणे सुर्य कधीही अंधाराला पाहु शकत नाही अथवा समुद्राला जशी नद्यांची ओळखदेखील नसते, अथवा आपल्या परछायेला आपण धरु लागलो तर ती सापडु शकत नाही.  (ओवी ५२१ ते ५३०)

त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला भगवान जगतगुरु कैलासेश्वर विश्वाधीपती योगीराज पार्वतीपती महादेव यांच्या पासुन ते अखेर तृणापर्यत भिन्न- भिन्न दिसत नाहीत. ज्याप्रमाणे पाटीवर काढलेले चित्र हाताने फिरवुन पाहीले असता चित्रच पुसले जाते, पाण्याने मीठाला धुतले असता मीठ रहातच नाही. जागृत होवुन स्वप्नाकडे पाहीले असता ते स्वप्नच दिसत नाही, त्याप्रमाणे त्या ज्ञानाने विषय पाहु गेले असता ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी नाहीशी होते. जे उरते ते असते केवळ ब्रम्ह आणि ब्रम्ह. ज्या प्रमाणे बुध्दीमान लोक दागिने आटवुन सोने काढत नाहीत कारण दागिन्यांच्या रुपाने ते सोनेच असते, हे ते जाणतात, अथवा लाटा गाळुन पाणी घेत नाहीत कारण लाटांच्या रुपाने पाणीच आहे, हे ते उत्तम प्रकारे जाणतात. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाच हाताला ही दृश्याची गोष्ट लागतच नाही ते ज्ञान सात्विक आहे असे सर्व प्रकारे जाण. आरसा पाहु लागलो असता जसे पाहणाऱ्याला प्रतिबिबं त्यात दिसते तसे ज्ञेय लोटुन प्रत्येक वस्तुचे ठिकाणी ज्ञाता आपले स्वरुपच पाहतो असे तेच ज्ञान सात्विक होय. जे मोक्षरुपी लक्ष्मीचे मंदिर आहे. असो, आता राजस ज्ञानाचे लक्षण एकाग्रतेने ऐक. तर अर्जुना, ऐक जे ज्ञान द्वैताचा आधार धरुन चालते ते ज्ञान राजस होय. भुतमात्रांच्या विचित्रतेमुळे आपण स्वता भेदाच्या स्वरुपाला प्राप्त होवुन ज्या ज्ञानाने ज्ञाता जीवाला खुपच भ्रमिष्टपणा आणलेला असतो, ज्याप्रमाणे जागृतीतील आपल्या खऱ्या स्वरुपाच्या आड विस्मरणाचे दार लावुन झोप ही स्वप्नाचे कष्टमय ओझे डोक्यावर ठेवुन असते. (ओवी ५३१ ते ५४०)

पुढील भाग