अध्याय १८ भाग ७

      त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मज्ञानाच्या आवाराबाहेर मायेचा पसारा घालून जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांचा खेळ क्रमाने दाखवीत असते, अलंकाराच्या रुपाने असणारे सोन जरी लहान मूलानां सोने वाटत नाही त्याप्रमाणे राजस ज्ञानाने जगातील नामरुपांचा म्हणजे द्वैताचा अनुभव येतो. पण त्याला अधिष्ठान असणाऱ्या अद्वैत ब्रम्हयाचा अनुभव येत नाही. मातीपासुन केलेली मडकी आणि गाडगी अज्ञानी माणसाला दाखवली असता त्याला मुळ मातीची ओळख रहात नाही. अथवा दिवा पाहीला असता अग्नीची ओळख राहत नाही. अज्ञानी माणसाला वस्त्र दाखविले असता तंतुची ओळख पटत नाही, अथवा पडद्यावरील चित्रे दाखवली असता त्याला मुळ पडद्याची ओळख नसते. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने विविध प्रकारच्या भुतमात्रांचे  आकार जाणुन ब्रम्ह सर्वत्र समप्रमाणात एकच आहे, ही भावना नष्ट होवुन गेलेली असते. लाकडे प्रज्वलित केल्यावर त्याच्या आकाराप्रमाणे अग्नी निरनिराळा भासतो. अथवा अनेक फुलांच्या योगाने सुगंध जसा भिन्न- भिन्न होतो किवां चंद्राचे प्रतिबिबं पाण्यात पडल्यावर पाणी हलल्यामुळे त्याचे तुकडे होतात असे भासते त्याप्रमाणे पदार्थाचे अनेक प्रकार जाणुन जे लहान-थोर आकार बनले आहेत असे वाटते ते राजस ज्ञान होय. गावाबाहेर वस्ती करण्यास अयोग्य आहे असे वाटसरुस सांगावे लागते, त्याप्रमाणे ज्याचा त्याग करावा अशी तामस ज्ञानाची लक्षणे सांगतो, तीही योग्य प्रकारे समजुन घे. तरी अर्जुना! जे ज्ञान विधीच्या वस्त्रांचा त्याग करुन कोठेही फिरत असते म्हणुन त्या ज्ञानाला पाहण्याविषयी श्रुती त्याचा तिरस्कार करते आणि पाठमोरी होते. श्रुतीच्या अनुरोधाने वाटचाल करणाऱ्या इतर शास्त्रांनी ज्या तामस ज्ञानाला ते निद्यं आहे. असा दोष देवुन म्लेच्छं धर्माच्या डोगंरावर पाठवुन दिले आहे, म्हणजे ज्यांना वाळीत टाकले आहे. (ओवी ५४१ ते ५५०)

तरी अर्जुना! जे ज्ञान तामस गुणरुपी पिशाच्चाने झपाटलेले असते आणि जे वेडे होवुन पंचविषयांमध्ये सतत गुंतलेले असते. ज्याप्रमाणे एखादे कुत्रे ओसाड गावात सोडलेले असते, त्याप्रमाणे ते ज्ञान विषयांच्या उपभोगाकरता नात्याची आडकाठी मानत नाही आणि कोणत्याही विषयाला  निषीध्द म्हणत नाही. मग ते कुत्रे भुकेने व्याकुळ झाल्यामूळे वाटेल ते खावु लागते, त्याच्या तोंडात जे मावत नाही आणि जे खाल्ले असता तोंड पोळते केवळ त्याचाच ते त्याग करते बाकी इतर सर्व खातच राहाते. उंदीर सोने चोरुन नेताना ते शुध्द आहे का अशुध्द आहे याचा जसा विचार करत नाही आणि  अज्ञानाने बिळात ओढुन नेतो  किवां मांस भक्षण करणारा मांसाचा रंग काळा की गोरा हे पाहत नाही. रानात वणवा लागल्यावर तो जसा बरे-वाईट न पाहता सर्व काही जाळतो, अथवा माशी शरीरावर बसताना ते शरीर मृत आहे का जिवंत आहे याचा विचार करत नाही, तसेच कावळयाला दिसलेले अन्न सुध्दा ताजे आहे अथवा उलटी केलेले किवां सडलेले आहे हे तो बघत नाही. तद्ववत शास्त्राने निषिध्द विषय त्यागावेत आणि  शास्त्राने जे विषय स्विकारले आहेत त्याचा आदराने स्वीकार करावा. असा कोणत्याही विषयांच्या बाबतीत जे ज्ञान विचार करत नाही, जी वस्तु दृष्टीस पडेल तिचा उपभोग घेतो ज्या प्रकारचे विषयभोग असेल त्याप्रमाणे वाटणी करतो तहान भागते म्हणुन तो पाणी पितो परंतु ते पाणी चांगले अथवा वाईट हे त्याला कळत नाही. त्याप्रमाणे जे भक्ष्य-अभक्ष्य निंद्य-अनिंद्य याचा तो विचार करत नाही. आपणास जे आवडेल तेच पवित्र असा ज्याच्या मताचा निश्चय झालेला असतो. (ओवी ५५१ ते ५६०)

जगातील सुंदर स्त्रीयांकडे जो मातृदृष्टीने पाहत नाही, तिचे ठिकाणी जवळीक करण्याविषयी तो तत्पर असतो. जे आपणास द्रव्य देतील, उपयोगी पडतील तेच आपले सोयरे आहेत व देहसंबंध ज्याच्याशी आहेत ते सोयरीकास योग्य नाहीत अशी ज्या ज्ञानाची धारणा असते. काळरुपी मृत्यूला सर्व दृश्य पदार्थ भक्ष्यस्थानीच आहेत अग्नीला सर्व दृश्यमान वस्तु काष्टाप्रमाणेच आहेत त्याप्रमाणे तामस ज्ञानाला संपुर्ण जगच आपले धन असे वाटते. याप्रमाणे संपुर्ण जगत हे उपभोगासाठीच निर्माण केलेले आहे अशी ज्या ज्ञानाची समजुत झालेली आहे त्याला देहाच्या पोषणाशिवाय दुसरा पुरुषार्थ नसतो. आकाशातुन पडलेल्या पाण्याला सागर हाच जसा आश्रय असतो, त्याप्रमाणे ते तामस ज्ञान फक्त पोटाकरताच प्रयत्न करते उदरभरणाशिवाय स्वर्ग-नरकादी आहेत,जर स्वर्ग प्राप्त करायचा असेल तर अधर्मापासुन निवृत्ती आणि धर्म प्रवृत्तीमध्ये वाढ आणि नरकप्राप्तीला कारण धर्मापासुन निवृत्ती व अधर्मप्रवृत्तीमध्ये वाढ ही होय, याशिवाय या ज्ञानास पुर्णपणे अज्ञान असते.  तामसी लोक साडेतीन हातांच्या देहास आत्मा असे मानतात व पाषाणाच्या  प्रतिमेस ईश्वर मानतात यापलीकडे त्यांच्या बुध्दीची धाव जात नाही. म्हणुन त्या तामस ज्ञानाची अशी समजुत असते की केलेल्या कर्मासह मुद्दल आत्माच नाहीसा होतो तेथे मग पुढील फळ भोगण्यास आत्मा कोणत्या रुपाने उरतो, आपण केलेल्या कर्मास ईश्वर साक्षीभुत असुन त्या कर्माची फळे भोगावयास लावतो असे म्हणावे तर सोने, चांदी, आदी वस्तू धातुनी केलेल्या  देवाच्या मुर्ती बाजारात विकल्या असता त्याबद्दल देव आपणास शिक्षा करेल अशी भिती वाटते. गावातील देवतांच्या पाषाणाच्या मुर्ती जर कर्माबद्दल शिक्षा करत नाहीत तर  मुर्ती ज्या डोगंरातील पाषाणाच्या  तयार केलेल्या असतात, ते डोंगर स्वस्थ का बसतात?(ओवी ५६१ ते ५७०)

अशा प्रकारे देव मानला तर तो केवळ पाषाणरुपच जाणला पाहीजे आणि आत्मा तर देहालाच म्हणावे, इतर सर्व पाप-पुण्य हे खोटे आहे, असे आपल्या दृष्ट बुध्दीने समजतो आणि अग्नी प्रज्वलित झाल्यावर जसे पुढे येणाऱ्या सर्व गोष्टीचे भक्षण करतो त्याप्रमाणे जी जी गोष्ट भोगावयास मिळेल त्या वेळी तिचा उपभोग घेण्यातच तो आपले हीत मानतो. चामडयाचे डोळे जगातील जे जे पदार्थ दाखवितात, इंद्रिये ज्या विषयांची गोडी मनाला लावतात, तेच खरे आहे अशी त्या तामस ज्ञानाची निश्चीतपुर्वक समजुत असते. फार काय वर्णन करावे? अर्जुना! अशा प्रकारे नास्तीकपणाची जेथे समजुत वाढलेली पाहशील ते तामस ज्ञान होय. ज्याप्रमाणे धुराची वेल आकाशात जशी व्यर्थ वाढते. भेडांचे झाड वाळलेले असले किवां बहरलेले असले तरी ते उपयोगाला येत नाही ते जसे नुसते वाढुन आपोआप मोडुन पडते, किवां ऊसास लागलेली कणसे अथवा नंपुसक माणसे अथवा निवंडुंगाचे वन जसे निरुपयोगी असतात. अथवा लहान बालकाचे मन जसे चंचल असते, किवां चोरुन आणलेले धन उजळ माथ्याने उपयोगी पडत नाही, किवां शेळीच्या गळयास असलेले स्तन निरुपयोगी असते. त्याप्रमाणे जे ज्ञान निरर्थक असते प्रमाणभुत नसते स्वैराचारी असते त्याला भगवान श्रीकृष्ण तामसी ज्ञान असे म्हणतात. तामस हे अज्ञानरुप असुनही त्याला ‘ज्ञान’ या शब्दाने संबोधले जाते. कारण जन्माने आंधळा असलेल्या माणसाचा डोळा मोठा आहे असे आपण म्हणतो किंवा बहिऱ्याचे  कान मोठे आहेत हे जसे म्हणावयाचे अथवा अंमली पदार्थाला पेय असे म्हणावयाचे त्याप्रमाणे तामस ज्ञानाला ‘ज्ञान’ हे आडनाव आहे.(ओवी ५७१ ते ५८०)

असो याबद्दल आणखी किती बोलावे? असे जे ज्ञान त्यास प्रत्यक्ष तमोगुण आहे असे समजावे, हे श्रोत्यांतील प्रमुख असणाऱ्या अर्जुना! मुळामध्ये एकच ज्ञान असुन ते तीन गुणांनी भिन्न- भिन्न झाले आहे, त्याची यर्थाथ लक्षणे तुला सांगितली आहेत. हे धर्नुधरा! या तीन प्रकारच्या ज्ञानांच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया प्रकाशित होत असतात. पाणी जसे पुढें जाते ओघाला अनुसरते तसा त्याचा प्रवाह बनतो त्याप्रमाणे कर्म हे ज्या ज्ञानाने प्रकाशित होईल तसे सात्विक, राजस आणि तामस होत असते. तसे तीन प्रकारच्या ज्ञानांच्या योगाने तीन प्रकारची झालेली कर्म आहेत त्यापैकी सात्विक कर्माची लक्षणे श्रवण कर. ज्याप्रमाणे पतीव्रतेच्या आलिंगनाने जसा पतीला  संतोष होतो त्याप्रमाणे आपल्या अधिकाराप्रमाणे वाटयास आलेल जे कर्म जो संतोषाने करतो. सावळया रंगाच्या शरीरास जसे चंदन शोभुन दिसते स्त्रीयांच्या नयनकमलास जसे अंजन शोभा देते तसे जे अधिकारारुप नित्य आचरण केले असता भुषण आहे. सोन्याला जसा सुंगध प्राप्त व्हावा, त्याप्रमाणे ते नित्त कर्म करीत असता त्यात नैमित्तीक कर्माची भर  पडली तर ते अधिकच शोभायमान दिसते, जशी शरीराने जीवाने आणि संपत्तीने माता आपल्या मुलांचे रक्षण करते, परंतु मुलाचे पालन करण्याचा केव्हाही कंटाळा करत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्माचे अनुष्ठान काया-वाचा-मनाने करतो परंतु फळाची इच्छा ठेवीत नाही तर सर्व कर्म ब्रम्हापर्ण बुध्दीने करतो. (ओवी ५८१ ते ५९०)

प्रिय व्यक्ती आपल्या घरी आल्यावर त्याचा पाहुणचार करण्यासाठी किती धनधान्य खर्च होणार आहे अथवा किती उरणार आहे हे जसे स्वभावता त्याच्या लक्षात येत नाही, त्याप्रमाणे सतपुरुषाशी आत्मज्ञानाची चर्चा करताना वेळेचे भान न राहुन आपले नित्य कर्म जरी राहुन गेले तरी खेद निर्माण होवुन मनाला वाईट वाटु देत नाही. अथवा नित्य कर्म जरी  त्याच्या झाले तरी आंनदाने अभिमान करत नाही, अर्जुना! अशा हातवटीने जे कर्म उत्पन्न होते त्याला सात्विक कर्म म्हणावे, हे त्याच्या गुणांवरुन असलेले नाव आहे असे समज. आता राजस कर्माचे लक्षण सांगतो तरी ते श्रवण करताना एकाग्रता कमी करु नकोस. घरी आई-वडिलांच्या बरोबर जो कोणत्याही व्यवहारात नीट बोलत नाही आणि अज्ञानीपणाने जगातील सर्व लोकांचे आदरातिथ्य करतो. अथवा तुळशीच्या झाडाला लांबुनही पाण्याचा शिंतोडा घालीत नाही व द्राक्षाच्या बुडाला मात्र न चुकता दररोज दुध घालतो. त्याप्रमाणे आवश्यक आलेली नित्य-नैमित्तीक कर्मे स्वताच्या हितासाठी आवश्यक आहेत ती करण्याविषयी जो बसलेल्या जागेवरुन उठतसुध्दा नाही. एऱ्हवी काम्य कर्माच्या नावाने देह जरी झिजला अथवा धन जरी खर्च झाले तरी त्याला शीण येत नाही. अरे, दिडपट व्याजाची जेथे प्राप्ती होते त्या माणसास द्रव्य देताना सावकारास तृप्ती होत नाही. शेतामध्ये कितीही बीज पेरले तरी ते पिकांच्या वाढीच्या आशेने शेतकऱ्यास पुरेसे वाटत नाही. परीस प्राप्त झाल्यावर लोखंड विकत  घेण्यासाठी  घरातील वस्तु विेकुन लोखंड घ्यावे, असा विचार करताना लोभी माणुस मनातुन उत्साही असतो.  (ओवी ५९१ ते ६००)

त्याप्रमाणे परिनामी अधिक उत्तम फळे मिळणार आहेत हे जाणून करण्यास कठीण असलेली विधियुक्त काम्य कर्म करतो आणि एवढी काम्य कर्म करुन देखील आपण फारच थोडी केली असे तो मानतो. शास्त्रामध्ये जेवढी काम्य कर्मे सांगितली आहेत तेवढी यथाविधी व अट्टाहासाने फळाची इच्छा ठेवणारा माणुस कर्मे करत असतो.आणि केलेल्या कर्माची आपल्या मुखानेच प्रशंसा करतो मी अमुक कर्म केले  सा नावाचा तो सतत उच्चार करतो. अशा रीतीने कर्मठ माणसाच्या मनात अभिमान निर्माण झाला की वडील अथवा गुरु तो मानत नाही, ज्याप्रमाणे कालज्वराने व्याप्त झालेल्या मनुष्यास औषध लागु पडत नाही, तसा अहंकाराने युक्त होवुन फलावर नजर ठेवणाऱ्या मनुष्याकडुन सर्व काही आदराने केले जाते, परंतु कोल्हाटी लोकांचे श्रम त्यांना केवळ पोट भरण्यासाठी उपयोगी पडतात. अफाट श्रम करुन त्यानां दुसरे काही प्राप्त होत नाही. एकाधान्याच्या कणासाठी उंदीर जसा डोंगर पोखरतो. किवां शेवाळ खाण्यासाठी बेडुक जसा सागर ढवळुन काढतो. भिक्षेच्या पलीकडे काही प्राप्ती होत नाही, तरी देखील गारुडी साप वागवत फिरत असतो. एखाद्यालाच कष्ट गोड वाटतात याला काय करावे? असो हे दृष्टात आता राहु दे, परमाणुच्या लाभासाठी जशा पाताळाचा भेद करुन खाली जातात, त्याप्रमाणे स्वर्गसुखाच्या लोभाने जे सातत्याने श्रम करणे आहे ते कष्टकारक काम्य कर्म राजस कर्म होय, असे जाणावे. आता तामस कर्माचे लक्षण श्रवण कर. (ओवी ६०१ ते ६१०)

ते तामस कर्म असे आहे की, जे शास्त्रनिंदेचे आणि लोकनिंदेचे काळे कुळकूळीत घर आहे आणि त्याच्या योगे निषधाच्या जलाचे सार्थक झाले आहे. जे कर्म झाले असता त्यापासुन कोणतेही फळ दृष्टीला दिसत नाही पाण्यावर रेघ मारली असता ती निष्फळ होय, अथवा ताकावरची निवळी घुसळली असता अथवा राखुंडी फुंकली असता अथवा घाण्यामध्ये वाळु गाळली असता या साऱ्या मधुन काहीच निष्पन्न होत नाही. कोंडा किवां भुसा धान्यातुन बाजुला करण्यासाठी वाऱ्यावर धरणे, किवां आकाश भेदण्यासाठी बाण सोडणे किवां वाऱ्याला धरण्यामरता फासा टाकणे, हे सर्व प्रकार जसे व्यर्थ होवुन नष्ट होतात, त्याप्रमाणे ते कर्म केल्यानंतर व्यर्थच जाते, एरवी नरदेहा सारखी अनमोल वस्तु प्राप्त होवुन आणि संपत्ती खर्च करुन जे कर्म केले असता जगाचे सुख नष्ट होते, सरोवरातील अनेक कमळावरुन काटयाचा फास ओढीत नेला असता तो फास आपण स्वताही झिजतो आणि कमळाचाही नाश करुन टाकतो, अथवा पतंग ज्याप्रमाणे दिव्याचा हेवा करुन त्यावर झडप घालतो आणि स्वताचा नाश करुन घेवुन जगासही अंधार देतो, घरातील सर्व धन खर्च झाले तरी चालेल तसेच स्वताच्या देहाचा नाश झाला तरी चालेल परंतु ज्या कर्माने दुसऱ्याला अपाय होईल असे तो कर्म करतो. माशी स्वताला माणसाकडुन गिळवते आणि ती माशी गिळणारा माणुस ओकाऱ्या काढुन काढुन पोटातील खाल्लेले अन्न बाहेर टाकतो. अशा वाईट कृत्याचे स्मरणही तामस कर्म करुन देते. (ओवी ६११ ते ६२०)

पुढील भाग