अध्याय १ भाग २

       (श्रोते वृंदाना विनंती) शरद ऋतूतील चंद्रकलेत असलेले कोवळे अमृत कण चकोरपक्ष्यांची पिल्ले जसे अतिशय मृदू मनाने वेचतात. त्याप्रमाणे श्रोत्यांनी चित्त शुद्ध करून एकाग्रतेने, अत्यंत हळुवारपणे भगवदगीतेचा अनुभव घ्यावा. शब्दांशिवाय या गीतेच्या अर्थाची मनातल्या मनात चर्चा करावी. इंद्रियांना नकळत याच्या अर्थाचा अनुभव घ्यावा. वक्त्याच्या  मुखातुन शब्द प्रकट होण्यापूर्वीच एकरुप होउन राहावे. ज्या प्रमाणे भ्रमर कमल दलाला समजु न देता त्यातील पराग कण करतात. त्याप्रमाणे हा ग्रंथ जाणुन घेण्याची पद्धत आहे. नभामध्ये चंद्रमा उदय पावला, की चंद्र विकासी कुमूदिनी प्रफुल्ल होतात आणि आपले पाण्यातील स्थान न सोडता त्याला आलिंगन देण्याचे परमसुख जाणतात. त्याप्रमाणे शुद्ध, सात्विक आणि स्थिर चित्ताने जो संपन्न आहे, तोच गीतेतील अर्थ जाणू शकतो, असे आम्ही समजतो.

            श्रोते हो अर्जुनाच्या पंक्तीला बसुन गीतेचा अर्थ श्रवण करण्यास जे योग्य आहेत, त्या संतांनी कृपा करून इकडे पुर्ण लक्ष द्यावे. महाराज आपले हदय सखोल आहे, म्हणून मी लडिवाळपणे आपणास लक्ष द्या असे म्हटले. खरोखर ही माझी आज्ञा नाही, तर आपल्या चाणांना स्पर्श करुन मी विनम्रपणाने विनंती केली आहे. ज्याप्रमाणे आपले मूल बोबडे बोलले, तरी  त्याचा स्वभावत:च अधिक संतोष आईवडिलानां होत असतो. त्याप्रमाणे तुम्ही सज्जनांनी माझा अंगीकार करून मला आपले म्हटले आहे त्यामुळे माझयातील उणीवा तुम्ही सहन कराल. त्यासाठी मी स्वतंत्र प्रार्थना करावयास पाहिजे असे नाही. (ओवी ५६ ते ६५ )

           परंतु माझ्या कडून एक अपराध घडत आहे. मी गीतेचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे . म्हणून सांगितलेला अर्थ बरोबर आहे की नाही, याकडे लक्ष दयावे अशी विनंती केली. गीतेचा अर्थ सांगणे फार कठीण आहे. याचा विचार न करता तो अर्थ स्पष्ट करण्यासाठी माझ्या चित्तात व्यर्थ धैर्य उत्पन्न झाले, परंतु सुर्याच्या प्रकाशात काजव्याची शोभा असते काय, एखाद्या टिटवीने समुद्राची अथांग खोली मोजण्याकरता चोच बुडेपर्यत त्यात माप घालावे, त्याप्रमाणे मी जाणकार नसताना गीतेचा अर्थ प्रकट करण्यास प्रवृत झालो आहे, आकाशाला कवटाळायचे असेल, तर त्यापेक्षा विशाल व्हावे लागते. गीतेवर भाष्य करण्यासाठी प्रकांड पांडित्य हवे ,म्हणून मी तर गीतेवर भाष्य करण्यास योग्य नाही असे दिसते.

( गीतेची थोरवी ) एकदा भगवान शंकरांनी गीतेची  थोरवी सांगितली. ते शब्द ऐकुन पार्वतीला आश्चर्य वाटले व पार्वती माता म्हणाली, आपण गीतेची महती विस्तारपूर्वक सांगा. भगवान शंकर म्हणाले , गीतेचे महत्व मी पूर्णपणे जाणू शकत नाही.हे पार्वती तुझे स्वरूप जसे नित्यनुतन आहे,तसे गीतार्थ नित्यनुतन आहे .ज्या सर्वेश्वराच्या योगनिद्रेतील घोरण्यापासुन समुद्राप्रमाणे वेद निर्माण झाले, त्या जगदीश्वर श्रीकृष्णाने स्‍वता जागृतीत गीतेच्या रूपाने वेदार्थाचे सार सांगितले. असे हे गीताशास्त्र अगाध, गहन आहे. या कामी वेदांची ही मती कुंठीत होउन जाते. मी तर लहान आहे. माझी बुध्दी अल्प आहे. मी तर कसा सांगणार. हे अमर्याद असे शास्‍त्र मला कसे बरे आकलन होणार महातेजाला कशाने बरे उजळावे छोटयाश्या चिलटाने आकाश आपल्या मुठीत कसे बरे ठेवावे. पंरतु मला सदगुरू निवृत्ती नाथाचा मोठा आधार आहे. ते मला अनुकूल आहेत .म्हणून मी हे धैर्य करीत आहे. असे ज्ञानदेव म्हणतात.( ओवी ६६ ते ७५ )

          एरवी तरी मी अज्ञानी आहे. माझ्याकडुन भाष्य लिहीताना अविवेक होत आहे. तरी पण संतकृपेचा प्रकाशमान दीप प्रज्वलित होत आहे. लोखंडाचे सोने करण्याचे सामर्थ्य परीसात आहे. किवां अमृताची प्राप्ती झाली की, मृत सुध्दा जिंवत होतो. सरस्वती देवता प्रसन्न झाली, मुक्यालाही भावमधुर वाचा फुटते, असा बदल होण्याविषयी वस्तुचे सामर्थ्य किवां शक्ती कारण आहे, यात आश्चर्य ते काय आहे.

          ज्याची आई कामधेनू आहे.त्याला या जगात दुर्लभ असे काही नाही.म्हणून मी या गीता ग्रंथावर भाष्य करण्यास प्रवृत्त झालो. माझ्या या भाष्यामध्ये काही कमतरता असेल तर ती पुर्ण करून घ्या आणि अधिक असेल तर समजून घ्या. अशी मी तुम्हाला विनंती करत आहे .आता आपण माझ्या भाष्याकडे लक्ष द्या. तुम्ही जसे मला बोलवाल, त्या प्रमाणे मी बोलेन ,सूत्रधार ज्याप्रमाणे दोरी हलवीत असतो , तशी दोरीच्या आधीन असलेली कळसूत्री बाहूली नाचत असते. त्याप्रमाणे मी साधूचां अनुग्रहीत असुन साधूचां निरोप सांगणार आहे.त्यामुळे त्यांनी मला भाष्य करताना हवे तेवढे अलंकृत करावे. तेव्हा सदगुरू निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानदेवा आता विनवणीचे बोलणे थांबवावे आणि गीतेवर भाष्य करण्यास प्रारंभ करावा. सदगुरूंची आज्ञा ऐकून निवृत्तीदास ज्ञानदेवाना  परम उल्हास झाला आणि ते म्हणाले , माझ्या मुखातुन प्रगट होणारे शब्द आपण शांत मनाने श्रवण करावेत. पुत्रांच्या प्रेमाने मोहित झालेला धृतराष्ट्र राजा हा संजयास म्हणाला, हे संजया ,कुरूक्षेत्रावर काय घडत आहे. ती हकीकत मला सांग. (ओवी ७६ ते ८५ )

         ज्या कुरूक्षेत्राला धर्माचे स्थान म्हणतात तेथे पंडूचे पुत्र आणि माझे पुत्र युध्दाच्या निम्मीत्ताने गेले आहेत. तरी ते परस्परात काय करीत आहेत ते मला लवकर सांग. तेव्हा संजय म्हणाला , ज्याप्रमाणे महाप्रलयाच्या वेळी काळाने आपले विशाल तोंड उघडलेले असते , त्या प्रमाणे पांडवाचे सैन्य युध्दासाठी प्रक्षुब्ध झाले आहे. त्याप्रमाणे त्या सैन्याने एकत्रित पणे उठाव केलेला आहे. काळकूट नावाचे विष उसळले, तर त्याला कोण बरे शांत करू शकणार . किवां वडवानल पेटून प्रज्चलित होउन वा-याच्या मदतीने वाढत चालला , तर तो जसा सागरालाही शोषून आकाशाला धडकतो .

          त्या प्रमाणे विविध प्रकारच्या व्युहाचीं रचना करून युध्दासाठी सज्ज झालेले सैन्य महाभंयकर दिसत आहे.ज्या प्रमाणे सिहं हत्तीच्या कळपाला मोजीत नाही ,त्या प्रमाणे ते विशाल सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची काहीच पर्वा केलेली नाही. नंतर दुर्योधन द्रोणाचार्याच्या जवळ येउन म्हणाला, पांडवाचे हे सैन्य युध्दासाठी कसे उसळले आहे ते पाहिले का ? बुध्दीवंत असा जो द्रुपद पुत्र ध्रुष्टधुम त्याने विविध प्रकारचे विशाल व्युह सभोवार रचलेले आहेत. ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहेत. ज्याला तुम्ही शिकविले विद्या देवुन शहाणे केले , त्या ध्रुष्टधुमाने हा सेना सागर सर्वत्र पसरवला आहे , तो आपण पहा . (ओवी ८६ ते ९५)

            आणखी जे शस्त्राअस्त्रात आणि शस्त्रधर्मात अति निपून असे महान योध्दे आहेत .हे शक्तीने आणि महाधैर्याने आणि पराक्रमाने भीम व अर्जुन या सारखे आहेत , त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो .या रणागंणा मध्ये महायोध्दा युयुधान ,विराट राजा आणि महारथ्यांत श्रेष्ठ असा द्रुपद राजा आले आहेत .चेकितान , धृष्टकेतु ,पराक्रमी असा काशीराज ,नृपश्रेष्ठ उत्तमोजा व शैब्व राजा पहा.हा कुंतिभोज पहा ,येथे युधामन्यु आलेला आहे .आणखी हे पुरूजित आदी सर्वच राजे आलेले आहेत , ते पहा. दुर्योधन पुन: म्हणाला, हे द्रोणाचार्य  ! सुभद्रेच्या अंतक:रणाला आनंद देणारा तिचा मुलगा प्रतिअर्जुन असा अभिमन्यू पाहा. शिवाय, द्रोपदीचे पुत्र ही रणांगणात आले आहेत. हे सर्वही योध्दे महारथी आणि शूरवीर आहेत.

          पांडवांच्या सेनेत आणखी किती वीर आहेत, हे मला माहीत नाही ; परंतु असंख्य अपरिचित पराक्रमी वीर येथे जमले आहेत.आता आमच्या सैन्यातील प्रसिध्द असे शुर सैनिक, सेनाप्रमुख जे आहेत, त्यांचीही नावे प्रसंगाच्या अनुरोधाने सांगतो, त्याचे श्रवण करावे. तुम्ही आदी करून जे प्रमुख वीर आहात , त्यांपैकी एक -दोन नावे थोडक्यात सांगतो . पराक्रमाने सुर्यासारखा तेजस्वी असणारा असा हा गंगेचा पुत्र भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला जणू काही सिहांसारखा असणारा हा वीर कर्ण आपज्या सेनेमध्ये आहे . (ओवी ९६ ते १०५ )

 पुढील भाग