अध्याय १ भाग ३

         या एकाच्याही फक्त मनात आले , तर या विश्वाचा संहार होउन जाईल .एवढेच काय, एकटे कृपाचार्यदेखील हे कृत्य करू शकतील. येथे विकर्ण महावीर आहे . तो पाहा पलीकडे अश्वत्थामा आहे . काळाला देखील सदैव याची भीती वाटत असते .त्याच प्रमाणे विजयश्री प्राप्त करणारा सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा व त्यासारखे असे आणखीन खुप महावीर आहेत.त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रम्हदेवालाही समजू शकत नाही . हे अस्त्र विद्येमध्ये तरबेज आहेत ,जणू काही मंत्र विद्येचे प्रत्यक्ष अवतारच आहेत . यांच्यापासूनच अस्त्रविद्येचा  प्रसार होउन ती रूढ झाली आहेत. या जगात हे अप्रतिम योध्दे आहेत .त्यांच्या अंगी पुरेपूर बळ ,सामर्थ्य आहे. असे हे सर्व वीर असुन ही ते जीवावरती उदार होउन माझ्या बाजूला येउन मिळाले आहेत .

         ज्याप्रमाणे पतिव्रतेचे ऱ्हदय खुध्द असते , ते मनानेदेखील पतीशिवाय कोणाला स्पर्श करीत नाही ,त्याप्रमाणे या शूरवीरांना मीच सर्वस्व आहे . आमच्या या कार्यापुढे यांना आपल्या जीवाचेदेखील काही वाटत नाही.  ते प्राणांची पर्वा करत नाहीत . ते निस्सीम स्वामीभक्त आहेत . हे सर्व युध्दकलेत कुशल आहेत त्यामुळे जय मिळवून कीर्ती निर्माण करणारे आहेत .क्षात्रधर्म मुळात यांच्यापासूनच निर्माण झाला आहे .या प्रमाणे युध्द कलेत परिपुर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. ते अपार असल्यामुळे त्यांची गणना करता येत नाही.  शिवाय , क्षत्रियामध्ये श्रेष्ठ आणि जगात प्रसिध्द असलेले असे योध्दे जे भीष्माचार्य आहेत, त्यांना सैन्याचे अधिपत्य दिले आहे . (ओवी १०६ ते ११५ )

भीष्माचार्यानी या सैन्याची अशी काही रचना केली आहे की , सुरक्षिततेसाठी जणू काही मजबुत असे किल्लेच उभारलेले आहेत .याच्यासमोर त्रैलोक्य देखील तोकडे वाटते . समुद्र हा मुळातच सर्वाना भीतिदायक आहे आणि त्या समुद्राला जर वडवानळाने साहाय्य केले , तर तो अधिकच भयानक होणार.

           प्रलयकाळचा महान अग्नी आणि प्रलयकाळचा महाभयंकर वारा या दोघांचा जसा संयोग घडावा , त्याप्रमाणे  हा गंगापुत्र आहे . आणि त्याला सेनापती पद मिळालेले आहे . तरी आमच्या सैन्याबरोबर कोण बरे लढु शकेल ? आम्ही वर्णन केलेल्या सैन्यापुढे पांडवांचे सैन्य अपुरे दिसत आहे. शिवाय युध्दातील कौशल्य न जाणणारा भीम हा पांडव – सैन्याचा अधिपती झाला आहे . दुर्योधनाने एवढे बोलुन सैन्याचे वर्णन थांबविले. मग पुन्हा दुर्योधन सर्व सेनाप्रमुखांना म्हणाला, आता आपापल्या सैन्याला सज्ज करा.

            ज्या प्रमुख सेनापतींच्या सत्तेखाली ज्या अक्षैाहिणी सेना आहेत , त्यांनी आपल्या सेनेवर युध्द संपेपर्यत पूर्ण नियंत्रण ठेवावे. विशेष सेनापती म्हणून जे महारथी आहेत. त्यांनी सर्व सैन्यावर देखरेख करावी.तसेच प्रमुख सैनिकांनी भीष्म सांगतील, त्याप्रमाणे वागावे. दुर्योंधन एवढे बोलून द्रोणाचार्यानां म्हणाला, तुम्ही सर्वावर लक्ष  ठेवावे. भीष्माचार्याचे सर्वानी मिळून रक्षण करावे. माझ्याप्रमाणे त्यांना रक्षणीय मानावे. त्यांच्यामुळे आमची सर्व सेना विजय प्राप्त करण्यास समर्थ आहे. दुर्योध‍न राजाचे बोलणे ऐकून सेनापती भीष्माचार्याना संतोष झाला आणि त्यांनी सिंहनादासमान गर्जना केली. ( ओवी ११६ ते १२५ )

तो प्रचंड नाद दोन्ही सैन्यात दुमदुमून गेला.त्या नादाचा प्रतिध्वनी आकाशातदेखील मावेना ; आणि आकाशतून पुन पुन्हा नवीन नाद निर्माण होउ लागले . भीष्माचार्यानी आपल्या वीरवृत्तीप्रमाणे त्या पहिल्या नादाबरोबर आपला दिव्य शंख वाजविला. ते दोन्ही महानाद एकत्र झाले , त्यावेळी त्रैलोक्याच्या कानठळया बसल्या. त्या वेळी आता जणू काय आकाश तुटून पडते की काय , असे वाटू लागले.॥१२८॥

           त्या प्रंचड नादामहुळे आकाश भीतीने थडथडू लागले, समुद्रातील लाटा उसळल्या ; आणि सर्व चरावर भीतीने कापू लागले .त्या प्रचंड नादाने डोंगर दऱ्यातून प्रतिध्वनी निर्माण होउ लागले . त्याच वेळी सैन्यात रणवाद्ये वाजू लागली. जिकडे तिकडे विविध प्रकारची रणवाद्ये कर्कश व भयानक स्वरूपात वाजू लागली. बलशाली लोकांना देखील तो महाप्रलय वाटला. नौबती, डंके ढोल,  शंख, मोठमोठया झांजा, कर्णे , इत्यादी रणवाद्यांचा गजर सुरू झाला ; आणि त्यात वीरांच्या भयानक रणगर्जना मिसळुन गेल्या. कोणी युध्दातील वीरश्रीच्या आवेशाने दंड ठोकु लागले आणि अतिशय त्वेषाने युध्दासाठी एकमेकांना हाका मारू लागले . त्यामुळे हत्ती देखील बेफाम झाले आणि त्यांना आवरणे अशक्य झाले. तेथील भित्र्या माणसांचे तर काय सांगावे ? ते कस्पटा प्रमाणे दूर गेले. यमाला देखील  दहशत बसली आणि तो इकडे पाहण्यास तयार होईना. कित्येकाचे तेथेच प्राण गेले , जे धैर्यवान होते,त्यांची दातखिळी बसली. जे नामवंत वीर होते, ते थरथर कापू लागले. ( ओवी १२६ ते १३५ )

         अशा प्रकारचा महाभयंकर वाद्यनाद ऐकून ब्रम्हदेव देखील व्याकुळ झाले .प्रलयकाल जवळ आला, असे देव म्हणू लागले. तो आंकात पाहून स्वर्गलोका मध्ये प्रलयकालाची साशंकता निर्माण  झाली. त्या वेळी इकडे पांडव सैन्यामध्ये काय घडले, ते श्रवण करा. जे का विजयाचे केवळ सार, महातेजाचे भांडार आणि जे वेगाच्या बाबतीत गरूडाची बरोबरी करू शकतील, असे चार घोडे जुंपले असून, पंख असलेला मेरू पर्वत जसा असावा, त्याप्रमाणे ज्याच्या दिव्य तेजाने सर्व दिशा भरून गेल्या आहेत, असा तो अतिवेगवान रथ त्या सैन्यात शोभत होता. अशा त्या रथावर वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण घोडे हाकीत होता. त्या रथाचे गुण काय बरे वर्णन करावेत ? त्या रथाच्या ध्वजस्तंभावर प्रत्यक्ष शंकराचा अवतार मारुती होता.अर्जुनासह रथावर बसलेले श्रीकृष्ण रथाचे सारथी होते. त्या विश्वचालक प्रभूचे नवल पहा.

         प्रभूच्या मनात भक्ताविषयी अतिविलक्षण असे प्रेम आहे ; म्हणून तो विश्वनियंता असून देखील अर्जुनाचे सारथ्य करत होता. त्याने आपल्या भक्ताला पाठीशी घातले आणि सर्व संकटांचे निवारण करण्यासाठी आपण पुढे बसला.त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख सहज लीलेने वाजविला. ज्याप्रमाणे सुर्याचा उदय झाला की नक्षत्रे लोप पावतात, त्याप्रमाणे शंखाचा ध्वनी सर्वत्र घुमत राहिला. त्यामुळे कौरवांच्या सैन्यामध्ये जे वाद्यांचे गजर होत होते , ते कोठे नाहीसे झाले , ते कळाले नाही.  (ओवी १३६ ते १४५ )

                त्याचप्रमाणे अर्जुनानेही आपला देवदत्त नावाचा गंभीर आवाज करणारा शंख वाजविला. हया दोन शंखाचा अदभुत नाद जेव्हा एकत्र झाला, त्या वेळी ब्रम्हांडाचे शेकडो तुकडे होतात की काय , असे सर्वाना वाटू लागले. त्यावेळी भीमालाही आवेश आला आणि तो महाकाळाप्रमाणे खवळला. त्याने आपला पौण्ड्र नावाचा महाशंख वाजविला.त्या शंखाचा ध्वनी प्रलयकालचा मेघ गर्जावा, त्याप्रमाणे अतिगंभीर पणाने सर्वत्र पसरला. इतक्यात धर्मराजाने ‘अनंतविजय’ नावाचा शंख वाजविला. नकुलाने ‘सुघोष ‘ आणि सहदेवाने ‘ मणिपुष्पक ‘ शंख वाजविला. त्या महाभयंकर नादाने यम देखील गोंधळून आश्चर्यचकित झाला.

        त्या पांडवसैन्यात द्रुपद राजा, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक वीर, महाशक्तिशाली काशीराज होते. त्याप्रमाणे अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू , पराजित न होणारा सात्यकी , नृपश्रेष्ठ धृष्टद्युम्न ,शिखंडी , तसेच विराट आणि जे जे सेनापती होते , त्यांनी आप-आपले शंख वातविण्यास प्रारंभ केला . त्या शंखाचा महाध्वनी ऐकून शेष व कूर्म देखील दचकून गेले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्यास ते प्रवृत्त झाले. या महान नादामुळे सर्व त्रैलोक्य डळमळू लागले. मेरू व मांदार पर्वत पुढे – मागे हलु लागले आणि समुद्रातील पाण्याच्या लाटा कैलासापर्यत उसळु लागल्या .( ओवी १४६ ते १५५ )

पृथ्वी उलथू पाहत होती .आकाशला मोठमोठे धक्के बसत असल्याने नक्षत्रांचा सडा पडतो की काय , असे वाटू लागले. सृष्टी गेली रे गेली , देव आता निराधार झाले ,अशी सत्यलोका मध्ये एकच आरोळी उठली. दिवसाचा सुर्य स्तब्ध झाला. प्रलय काळाप्रमाणे तिन्ही लोकांत मोठा हाहा:कार झाला . ही परिस्थिती पाहून श्रीकृष्ण विस्मित झाले. कदाचित सर्व सृष्टीचा नाश होईल , हे जाणून त्यांनी विलक्षण ध्वनी शांत केला. त्यामुळे जग सावरले गेले ; नाही तर श्रीकृष्णादिकांनी जेव्हा मोठे शंख वाजविले , त्याच वेळी महाप्रलय होण्याची वेळ आली होती.

        तो महानाद शांत झाला ; परंतु त्याचा प्रतिध्वनी जो मागे राहिला होता , त्यामुळे कौरव सैन्याची दाणादाण उडाली. सिंह हत्तीच्या कळपात गेला, तर त्यांच्या समुदायाचे विदारण करतो , त्याप्रमाणे त्या प्रतिध्वनीने कौरवांची हदये विदीर्ण झाली. तो प्रचंड प्रतिध्वनी ऐकून कौरवांनी उभ्या-उभ्याने धैर्य सोडले , तरी पण एकमेकांना  ‘सावध रे सावध ‘ असे म्हणू लागले. त्या रणागंणावर बलाढय व धैययुक्त महावीर होते. त्यांनी धीर देउन पुन : सैन्याला सावरले. त्यावेळी ते सैन्य युध्द करण्यासाठी ऐदम तयार झाले आणि दुप्पट आवेशाने क्षुब्ध झाले. त्यामुळे त्रैलोक्य देखील क्षुब्ध झालेले दिसू लागले. ( ओवी १५६ ते १६५ )

प्रलय कालाच्या वेळी ज्याप्रमाणे मेघ अखंड वर्षाव करीत असतात, त्याप्रमाणे धनुर्विद्येतील प्रवीण योध्दे बाणांचा अखंड वर्षाव करू लागतात. हे दृश्य पाहुन अर्जुनाच्या मनात संतोष झाला आणि त्याने उत्सुकतेने कौरवांच्या सैन्याकडे पाहिले. त्यावेळी युध्दासाठी सज्ज झालेले कौरव त्याला दिसले .अर्जुनाने सहज लिलेने आपले धनुष्य उचलले. अर्जुन म्हणाला , देवा ! रथ लवकर हाक आणि दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेउन उभा कर. येथे युध्दासाठी जे आलेले आहेत, त्या वीर सैनिकांना मी थोडा वेळ पाहणार आहे , तोपर्यत तु रथ येथे उभा कर. या युध्द भुमीवर सर्व वीर आले आहेत. तरी मला कोणाशी युध्द करावयाचे आहे, ते प्रारंभी पाहिले पाहिजे.

          कौरव वीर दुष्ट स्वभावाचे असून युध्दासाठी उतावळे झाले आहेत. त्याच्यां राज्यात सुबत्ता असतानाही ते निष्कारण युध्दाची इच्छा करतात. यानां युध्दाची आवड तर आहे ; परंतु संग्रामामध्ये लागणारे धैर्य त्यांच्याजवळ नाही. इतके बोलुन संजय पुढे म्हणाला – हे राजा ! पुढे ऐका.अर्जुनाने इतके सांगितले, त्या वेळी श्रीकृष्णाने रथ हाकला आणि तो दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा केला.ज्या ठिकाणी भीष्म,द्रोण इत्यादी आप्तसंबंधी आणि अनेक राजे समोर उभे होते.(ओवी १६६ ते १७५ )

         त्या ठिकाणी रथ थांबवून अर्जुन संभ्रमाने सर्व सैन्य समुदाय पाहु लागला. अर्जुन म्हणाला, “हे देवा ! बघा ,बघा या रणांगणावर जमलेले आमचेच गोत्रज, भाउबंद आणि गुरू आहेत.” हे ऐकून श्रीकृष्णाच्या मनात क्षणभर आश्चर्य वाटले. ते विचार करू लागले , अर्जुनाच्या मनात काय आले, कोण जाणे ; परंतु हे काही तरी अदभुत आहे .ते सर्वाच्या हदयात विराजमान असल्यामुळे त्यांनी सर्व जाणले. पुढील भविष्यकाळा संबंधी विचार केला आणि त्या वेळी काही न बोलता ते स्तब्ध राहीले .त्या वेळी अर्जुनाने रणांगणावर आपले चुलते, आजोबा, गुरू, बंधू, मामा यांना पाहिले.आपले इष्ट मित्र , मुले हे सर्व जण त्या सैन्यामध्ये आले असल्याचे त्याने पाहिले.आपले जिवलग मित्र,सासरे,नातेवाईक आणि नातू देखील त्या रणांगणात आलेले अर्जुनाने पाहिले. ज्यांच्यावरती त्याने उपकार केलेले होते आणि संकटकाळात ज्यांचे रक्षण केले होते, त्या लहान – मोठया सर्वानाच अर्जुनाने पाहिले. त्यावेळी अर्जुनाच्या मनात एकदम गोंधळ निर्माण झाला. त्याच्या हदयात करूणेचे भाव निर्माण झाले. या कारूण्या मुळेच त्याच्या मनातील वीरवृत्ती संपून गेली. (ओवी १७६ ते १८५ )

       ज्या स्त्रिया उत्तम कुळातील असतात आणि गुणाने व रूपाने संपन्न असतात, त्यांना आपल्या स्वाभिमानामुळे दुसऱ्या कोणत्याही स्त्रियांचे वर्चस्व सहन होत नाही. ज्या प्रमाणे कामाने आसक्त झालेला पुरूष आपल्या स्व -पत्नीला विसरून दुसऱ्या स्त्रिची योग्यता न पाहता वेडा होउन तिच्या लागतो. तपाच्या सामर्थ्याने ऐश्वर्य प्राप्त झाले असता वैराग्यवान पुरूषाची बुध्दी भ्रमित होते, त्याला वैराग्य आणि मोक्ष यांची आठवण देखील राहत नाही, त्या प्रमाणे अर्जुनाच्या हदयात करूणा निर्माण झाली आणि त्याचे पौरूषत्व संपून गेले. ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक मंत्राचा उच्चार करताना चूकला म्हणजे तो जसा भ्रमिष्ट होतो, त्याप्रमाणे अर्जुन अतिमोहाने व्याकुळ झाला.

             अर्जुनाच्या हदयातील धैर्य संपुन गेले आणि हदय करूणेने पाझरू लागले.ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा स्पर्श होताच चंद्रकांत मण्यास पाझर फुटतो.त्याप्रमाणे अर्जुन अतिस्नहामुळे मोहित झाला आणि खेदयुक्त होउन श्रीकृष्णाबरोबर बोलू लागला.अर्जुन म्हणाला, हे देवा ! माझे एैका मी हा सर्व समुदाय पाहीला .येथे मला माझे सर्व गोत्रज दिसत आहेत. हे सर्व जण युध्दासाठी सज्ज झाले आहेत. परंतु त्यांच्या बरोबर आपणास युध्द करणे कसे उचित होईल  ? यांच्याशी युध्द करण्याच्या विचाराने मला काही सुचत नाही. काय होत आहे, हे कळत नाही.माझे मलाच भान नाही. माझे मन आणि बुध्दी स्थिर नाही. (ओवी १८६ ते १९५ )

 पुढील भाग