अध्याय-२-भाग-१

ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी

सार्थ भगवदगीता अध्याय

सांख्ययोग

श्री ज्ञानदेवांनी भगवदगीतेतील अध्याय  मधील सांख्ययोगया अध्यायातील   ते ७२ संस्कृत श्लोकांचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन ३७५ ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे. परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही अवघड वाटू लागली. श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहेहा श्री ज्ञानदेवांचा अमुल्य  कृपाप्रसाद आहे, मनुष्य जीवन जगण्यासाठी अनमोल संजीवनी आहे, किंबहुना संसारसागर पार करण्यासाठी अध्यात्मातील नौका आहे, तिच्या मदतीन संसार करता सावरता आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनसागरातुन तरुन जावे आणि आपल्या जीवनाचे कोटकल्याण साधावे. ही ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी आत्मसाद करुन जीवनाचे  सार्थक करावे.

(अर्जुनाची शोकअवस्था ) मग संजय धृतराष्ट्रास म्हणाला, ऐका ! तो अर्जुन शोकाकुल होउन रडू लागला. आपल्या कुळातील सर्वाना पाहून त्याच्या मनात विलक्षण स्नेह निर्माण झाला. त्यामुळे त्याचे चित्त कशा प्रकारे द्रवले होते तर ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरघळते वाऱ्याने मेघ हालतात त्याप्रमाणे अर्जुनाचे चित्त धैर्यवान असून देखील करूणेने द्रवले. ज्याप्रमाणे चिखलात रूतलेला राजहंस अगतिक झालेला असतो त्याप्रमाणे अर्जुन हा करूणने दु:खी झाल्यामुळे अगदी कोमेजून गेला होता. पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे अतिमोहाने अतिशय जर्जर झालेला पाहून शारंगधर काय म्हणाले ते ऐका श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! या ठिकाणी असे करणे योग्य आहे का? तु कोण आहेस, आणि काय करीत आहेस याचा प्रारंभी विचार कर.

          हे अर्जुना ! या प्रसंगी तुला काय झाले आहे? कोणता कमीपणा आला आहे? कर्तव्य मध्येच का थांबले? आणि एवढा खेद करण्याचे कारण तरी काय? तू अनुचित गोष्टीकडे लक्ष देत नाहीस कधीही उापले धैर्य सोडत नाहीस; आणि केवळ तुझ्या नामाचा उच्चार केल्याने  अपयश दाही दिशांच्या पलीकडे निघून जाते. अर्जुन!  तू शूरवृत्तीचे स्थान आहेस तू सर्व क्षत्रियांचा राजा आहेस तुझ्या शौर्याचा डंका त्रैलोक्यात गाजत आहे युध्‍दामध्ये तू शंकरांना जिंकलेस निवातकवचांचा ठावठिकाणा नाहीसा करून टाकलास तू अपार कीर्ती केलीस आणि गंधर्वानी तुझे पोवाडे गायिले.        (ओवी १ ते १० )

           तुझ्या पराक्रमाचा विचार केला तर त्रैलोक्यही लहान वाटते हे अर्जुना! असा पराक्रम उत्कृष्ट आहे तोच तू आज या ठिकाणी वीरवृत्तीचा त्याग करून खाली मान घालून रडत बसला आहेस. अर्जुना! तू खरोखर विचारी आहेस परंतु कारूण्याने दीन का बरे झाला आहेस? तूच सांग अंधाराने सुर्याला कधी गिळले आहे काय? तसेच वारा मेघाला कधी भ्याला आहे का? अमृताला कधी मरण आले आहे का? अग्नीला लाकडाने कधी गिळून टाकले आहे का? याचा तू विचार कर किंवा मिठात कधी पाणी विरघळेल का? दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूट विष मरेल काय? बेडूक मोठया नागाला कधी गिळेल काय? कोल्हा स्वताहून कधी सिंहाला झोबंला आहे का? अशा अशक्य गोष्टी कधी शक्य झाल्या आहेत का? परंतु तू मात्र आज अशक्य गोष्ट शक्य करून दाखविलीस.

         म्हणून हे अर्जुना! अजून तरी या हीन गोष्टीकडे लक्ष देउ नकोस मनाला ताबडतोब धीर दे आणि सावध हो तूझे अज्ञानपण सोडून दे उठ, धनुष्यबाण हाती घे युध्दाच्या प्रसंगी तुझ्या या कारूण्याचा काय उपयोग? हे अर्जुना! तू जाणता आहेस ना? मग तू विचार का करत नाहीस? युध्दप्रसंगी दयाळूपण उचित आहे का हे तू सांग बरे? जगन्निवास अर्जुनाला म्हणाले हे युध्दप्रसंगीचे कारुण्य तुझ्या कीर्तीचा नाश करणारे आणि परलोकांला मुकविणारे आहे.  ( ओवी ११ते २०)

            हे अर्जुना! तू शोक करू नकोस पूर्ण धीर धर खेदाचा त्याग कर तुला हा शोक करणे योग्य नाही यामुळे तू आजपर्यत जोडलेली मोठी कीर्ती नाश पावेल तू आता तरी आपज्या हिताचा विचार कर या संग्रामाच्या वेळी तुझ्या कृपाळू पणाचा काही उपयोग नाही हे कौरव आताच तुझे सोयरे झाले काय? तू येथे येण्यापूर्वी या गोत्रजानां जाणत नव्हतास काय? बंधुजनांना ओळखत नव्हतास काय? तर मग करूणेचा व्यर्थ अतिरेक का बरे करतोस? आजचा हा युध्द प्रसंग तुला जन्मल्या पासून नवीनच आहे का? कारण यापूर्वी देखील तुम्हा दोघां मध्ये युध्दाची निमित्ते अनेक वेळा निर्माण झाली आहेत तर मग आजच्या प्रसंगी तू जर चित्तामध्ये मोह ठेवलास तर तुझी असणारी प्रतिष्ठा नाहीशी होईल आणि इहलोकासह परलोकासही तू अंतरशील. तुझ्या मनाचा हा दुबळेपणा तुझ्या कल्याणाला कारणीभूत होउ शकणार नाही.

          कारण  संग्रामाच्या वेळी मनात दुबळेपणा निर्माण झाला तर क्षत्रियांचे अध:पतन होते याची जाणीव ठेव. याप्रमाणे कृपाळू श्रीकृष्णाने विविध प्रतारे बोघ केला ते सर्व ऐकून अर्जुन म्हणाला, देवा !  एवढे समजावून सांगतोस पण प्रारंभी या संग्रामा संबंधी तूच विचार कर. (ओवी २१ ते ३०) हे युध्द नसून खरोखर अपराध आहे हे करण्यास आम्ही प्रवृत्त झालो  तर हा दोष आहे या युध्दाला शास्त्राचा बाध येतो एवढेच नव्हे  तर आम्ही आराध्य देवतांचा उघडपणे उच्छेद करीत आहोत असे पाहा की माताश्री-पिताश्रीची सेवा करून त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावे आणि मग आपल्याच हाताने त्याचां वध कसा बरे करावा? परंतू हे न करता आपल्या वाचेने त्यांची निंदा करावी काय?  भीष्मादिक आमचे गोत्रज आहेत आणि द्रोणादी आमचे गुरू आहेत ते आम्हाला नित्य पूजनीय आहेत भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांचे माझ्यावर अतिशय उपकार आहेत.

           हे देवा!  आम्ही यांच्याविषयी मनाने स्वप्नात देखील वैर धरू शकत नाही  तर मग त्यांचचा प्रत्यक्ष घात कसा बरे करावा? आज सर्वानां काय झाले?  ज्यांच्याकडून आम्ही ज्या शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याच्या आधारे त्यांचाच वध करावयाचा आणि प्रतिष्ठा प्राप्त करायची असे जर होईल तर आमच्या जीवनाला काय बरे अर्थ आहे?  मी अर्जून हा द्रोणाचार्याचा प्रिय शिष्य आहे त्यांनीच मला धर्नुविद्येचे ज्ञान दिले  त्यांच्या उपकाराने मी भारभूत झालो आहे तर मग त्यांचा वध मी करावा काय? अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेने आम्हाला वर प्राप्त झाला त्यांच्या विषयीच मनात पाप आणावे अशा प्रकारचा मी भस्मासुर आहे काय? (भगवान शिवशंकरांनी भस्मासुराला वर दिला होता पंरतु तोच भस्मासुर उन्मत्त होवून त्यानांच मारावयास निघाला होता.)

            देवा! समुद्र गंभीर आहे असे आपण ऐकतो. परंतु त्याचे गांभीर्य वरवरचे आहे; कारण अनेक वेळा तो क्षुब्ध होतो परंतु द्रोणाचार्याच्या मनात राग निर्माण झालेला कधी माहीत नाही. आकाश हे अमर्याद आहे एखादया वेळी त्याचे मोजमापही करता येईल परंतु द्रोणाचार्याचे हदय ज्ञानाने गहन व सखोल आहे त्यामुळे त्याचे मोजमाप करता येणार नाही. ( ओवी ३१ ते ४०) कदाचित अमृतही विटेल किंवा वज्रदेखील फुटेल; पण द्रोणाचार्याच्या मनात विकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या निर्विकार स्वभावात बदल होणार नाही आई प्रेमळ असते असे म्हणतात  ते खरे आहे; परंतु द्रोणचार्याच्या ठिकाणी तूर्तिमंत प्रेम आहे.

           द्रोणाचार्य हे कारूण्याचे उगमस्थान आहे, सर्व गुणांचा साठा आहे ‍विद्येचा अमर्याद सागर आहे. अशा प्रकारे  ते सर्व गुणांनी श्रेष्ठ असून त्यांची आमच्यावर कृपा आहे तर मग देवा ! तूच सांग,की त्यांचा घात करण्याचा विचार देखील मनात आणता येईल का? अशांना रणांगणात मारून आपण राज्यसुख भोगत जगावे ही गोष्ट माझ्या मनात देखील येत नाही एवढे हे कार्य कठीण आहे,याहून राज्यभोग जरी अधिक श्रेष्ठ असतील तर ते असू देत, त्यापेक्षा भिक्षा मागून जगणे बरे वाटते अथवा देशत्याग करावा किवां गिरिकंदरात जाउन राहावे परंतु यांना मारण्यासाठी शस्त्र हाती धरू नये देवा! नवीन धार लावलल्या बाणांनी त्यांच्या मर्मस्थानी प्रहार करावा आणि त्या रक्तात बुडून गेलेले भोग भोगावेत हे योग्य नाही ते प्राप्त करून तरी काय करावयाचे? ते रक्ताने माखलेले असल्यामुळे त्यांचा उपभोग तरी कसा घ्यावयाचा? याकरिता मला युध्द करण्याचा युक्तिवाद पसंत नाही.

          याप्रमाणे बोलून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे परंतु आपले हे बोलणे श्रीकृष्णास पटत नाही हे त्याने जाणले. (ओवी ४१ ते ५०) ते जाणून अर्जुन मनात कचरला मग पुन: बोलू लागला देवा ! माझ्या या बोलण्याकडे आपण का बरे लक्ष देत नाही ? येऱ्हवी माझ्या चित्तात जे होते ते विचार मी आपणा समोर प्रकट केले  परंतु यापेक्षा काय चांगले आहे हे आपणच जाणता ज्यांचेशी वैर करण्याची गोष्ट ऐकल्यावर आम्ही प्राण त्याग करावा तेच रणंगणावर युध्द करण्यासाठी आमच्या समोर उभे आहेत. आता अशांचा वध  करावा की युध्द सोडुन निघून जावे? या दोन्ही पैकी काय चांगले आहे हे आम्हाला समजत नाही अशा वेळी काय करणे उचित आहे हे आम्हाला स्फुरत नाही कारण माझे चित्त मोहाने व्याकुळ झाले आहे. ज्याप्रमाणे अंधालाने डोळयाचे तेज संपले की जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसत नाही हे  देवा! तशी माझी अवस्था झाली आहे.

           माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे त्यामुळे माझे हित कशात आहे हे मला कळेनासे झाले आहे तरी हे श्रीकृष्णा ! तू आमचे हित लक्षात घेउन  आम्हाला योग्य मार्ग सांग तूच आमचा सखा आहेस सर्वस्व आहेस तूच आमचा गुरू, बंधू आणि  पिता आहेस. तू आमची इष्टदेवता आहेस संकटाचे वेळी तूच आमचा सदैव रक्षणकर्ता आहेस ज्याप्रमाणे गुरू शिष्याला कधी दूर करत नाही किवां समुद्र कधी नद्यांचा त्याग करत नाही त्याप्रमाणे तूही आमचा अव्हेर करु नकोस. ( ओवी ५१ ते ६०)

           जर आई आपल्या लहान बाळास सोडून दूर निघून गेली तर ते बाळ कसे जगु शकेल? हा आशय जाणून माझे विचार ऐक. देवा ! सर्व दृष्टीनी विचार केला  तर तुच एक आम्हास आधार आहेस आत्तापर्यत मी जे बोललो ते तुम्हास योग्य वाटत नसेलतर हे पुरूषोत्तमा ! जी गोष्ट आम्हाला उचित असून धर्माच्या विरूध्द नाही ती आम्हाला ताबडतोब  सांग. हे सर्व स्वकुळ पाहून माझ्या मनात जो शोक निर्माण झाला आहे तो तूझ्या उपदेशा वाचून दुसऱ्या कशानेही जाणे शक्य नाही. या वेळी पृथ्वीचे संपूर्ण राज्‍य जरी प्राप्त झाले किवां इंद्रपद जरी मिळाले तरी माझ्या मनातील मोहाने निर्माण झालेला शोक नाहीसा होणार नाही ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेली बी उत्तम प्रकारच्या जमिनीत पेरली आणि त्यात पाहिजे तेवढे पाणी घातले तरी त्यातून अंकुर उगवत नाही ज्या ठिकाणी आयुष्य सरलेले असेल तेथे औषधाचा काहीच उपयोग होणार नाही तेथे फक्त पामामृतच उपयोगी पडेलत्याप्रमाणे माझ्या मोहयुक्त बुध्दीला सर्व राज्यभोग समृध्दी यांचा उपयोग होणार नाही या वेळी हे कृपा‍निधे ! तुझे कारूण्य हा जिव्हाळाच उपयोगी पडेल.

         जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दुर झाली त्या वेळी अर्जुन असे बोलला;  परंतु पुन: त्याला मायेच्या लहरीने व्यापले विचार केला असता असे वाटते की ही मायेची लहर नव्हती यापेक्षा वेगळेच काही वाटत आहे. महामोहरुप काळसर्पाने अर्जुनाला दंश केलेला असावा. (ओवी ६१ ते ७०)

पुढील भाग