अध्याय-२-भाग-२

अतिशय कोमल असलेल्या हदयरूपी कमळाचे ठिकाणी आणि कारूण्यरूपी संध्याकाळी अज्ञानरूपी सर्प चावला म्हणून भ्रमरुपी विषय उतरत नव्हते. असा विषाचा जालीमपणा पाहून जो केवळ आपल्या कृपादृष्टीने तीव्र विषबाधा दूर करतो तो श्रीकृष्णरूपी गारुडी अर्जुनाच्या रक्षणासाठी धावून आला. तशा त्या शोकाने मोहाने व्याकूळ झालेल्या अर्जुनाजवळ श्रीकृष्ण शोभू लागला आपल्या कृपादृष्टीने आता त्याचे सहजच रक्षण करील.

            श्रीकृष्ण अर्जुनाचे रक्षण करणार आहे हे जाणूनच अर्जुनाला मोहरूपी सर्पाने दंश केला आहे असे मी म्हटले आहे ज्याप्रमाणे सुर्य हा ढगांनी आच्छादित होतो त्याप्रमाणे अर्जुन तेथे मोहभ्रमाने आच्छदित झाला होता असे जाणा ज्याप्रमाणे कडक उन्हामध्ये मोठया पर्वतास वणवा लागतो त्याप्रमाणे अर्जुन दु:खाने जर्जर झाला होता म्हणून जो सहजच नीलवर्ण आहे आणि कृपामृताने सजल असा श्री गोपालरूपी माहठा मेघ कृपेचा वर्षाव करण्यासाठी अर्जुनाकडे वळला त्या ठिकाणी सुंदर दातांची कांती ही जणू काही अधून मधून चमकणारी वीज होती आणि गंभीर बोलणे हाच गर्जनेचा थाट होता आता तो श्रीकृष्णरूपी उदार मेघ कसा वर्षाव करेल त्यामूळे अर्जुनरूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग त्या ठिकाणी ज्ञानाचा नवीन अकुंर कसा निर्माण होईल‍ ती कथा समाधानवृत्तीने श्रवण करा आणि पुढे काय घडते ते पाहाअसे निवृत्तिदास ज्ञानदेव म्हणाले. (ओवी ७१ ते ८० )

           या प्रमाणे संजयाने धृतराष्ट्रास सांगितले तो म्हणाला हे राजा ! तो अर्जुन पुन: शोकाकूल होउन काय म्हणला, ते ऐकू तो खेदयूक्त अंत:करणाने श्रीकृष्णास म्हणाला आता तुम्ही मला भीड घालण्याचा प्रयत्न करू नका या ठिकाणी मी युध्द करणार नाही हे निश्चीत या प्रमाणे एकदम बोलून पुढे काही न बोलता अर्जुनाने मौन धरले ही त्याची अवस्था पाहून श्रीकृष्णास आर्श्चय वाटले.भगवान मनात म्हणाले अर्जुनाने या ठिकाणी काय आरंभिले आहे? अर्जुनाला मुळीच काही कळत नाही आता काय करावे ? आता याला कोण्त्या उपायाने कळेल? याचे धैर्य कसे वाढेल? मांत्रिक ज्याप्रमाणे भूतबाधा घालविण्याचा विचार करतो  किवां रोग असाध्य आहे हे जाणून वैद्य ज्याप्रमाणे शेवटचा उपाय म्हणून अमृतासमान दिव्य औषध ताबडतोब देण्यास सुरवात करतो.

          त्याप्रमाणे दोन्ही सैन्यांमध्ये स्थित असलेला श्री अनंत विचार करु लागला की ज्या कारणाने याला शोक झाला आहे तो भ्रम हा कसा सोडून देईल तो मोह, भ्रम नाहीसा करण्याचा उपाय श्रीकृष्णाने आपल्या मनात आणला आणि सात्विक रागाने बोलण्यास सुरवात केली ज्याप्रमाणे आई रागाने मुलास रागावुन बोलली तरी त्यामध्ये जसे प्रेम भरलेले असते किवां ज्याप्रमाणे औषधाच्या कडूपणात अमृताचा साठा असतो ,वरुन औषध पाहीले ,तर ते अमृत दिसत नाही पंरतु गुणाच्या रुपाने ते नंतर प्रगट होते त्याप्रमाणे वरवर पाहता सात्विक संताप आणि आतमध्ये हितकर अशी वचने बोलावयास ऋषीकेशांनी प्रांरभ केला. (ओवी ८१ ते ९० )

           श्रीकृष्ण म्हणाले  तू‍ मध्येच युध्द सोडून भलतेच आरंभिले आहेस आज आम्ही हे आश्चर्य पाहत आहोत तू स्वताला ज्ञानी म्हणवितोस ; पंरतु अज्ञानाच्या गोष्टी सोडत नाहीस तुला काही शिकवावे म्हटले तर तू नीतीच्या मोठमोठया गोष्ठी करतोस जन्मांधला वेड लागले तर तो स्वैरपणे सर्वत्र धावत असतो  त्याप्रमाणेच तुझे शहाणपण दिसते. तू स्व‍त: कोण आहेस हे जाणत नाहीस ; परंतु कौरवांबाबत शोक करतोस हे पाहून मला वारंवार आश्चर्य वाटत आहे हे अर्जुना! तुझ्यामुळे त्रिभुवनाचे अस्तित्व आहे का हे मला सागं या अफाट विश्वाची रचना सुत्रबध्द पध्दतीने केली आहे हे काय खोटे आहे?  या विश्वाला चालविणारा सर्वज्ञानी महान देव आहे त्यापासुन पंचमहाभूते प्राणिमात्र निमार्ण होत असतात हे जाणून जे साधू-संत सांगतात  ते काय खोटे आहे काय?  आज यामध्ये काही बदल झाला आहे काय?  विश्वातील जन्म -मरणाचे चक्र तू निर्माण केले आहेस काय? तू मारले तरच त्यांचा नाश हेणार आहे काय? अहंकारा मुळे झालेल्या भ्रमाने तु कौरवाचांचा नाश करावयाचा नाही असे मनात आणले तरी ते चिरंजीव होतील का ? किवां तुच एक मारणारा आहेस आणि बाकी सर्व लोक मरणारे आहेत असा भ्रम तू तुझ्या चित्तात येउ देशील पण तसे करू नकोस हे जग स्वभावत: निर्माण होते आणि नष्ट होते. अनादी काळा पासून हे असेच चालत आले आहे तर मग तू शोक का करतोस हे मला सांग. (ओवी ९१ ते १०० )

           अज्ञानामुळे तुला या गोष्टी समजत नाहीत ज्याची चिंता करू नये त्या गोष्टीची तू चिंता करतोस आधि उलट तुच नीतीच्या गोष्टी आम्हास सांगतोस जे नित्य काय आणि अनित्य काय हे जाणणारे विवेकी लोक असतात ते जन्म आणि मृत्यू याबाबत शोक मानत नाहीत; कारण जन्म आणि मृत्यू हा केवळ भ्रम आहे याची त्यांना जाणीव असते.अर्जुना! आणखी सांगतो ते तू ऐक या ठिकाणी आम्ही तुम्ही आणि हे राजे आदी करुन सर्व  ते सर्वकाळ नित्य असेच राहतील किवां ते लय पावतील ही भ्रांती सोड कारण वस्तुत: या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी मायेमुळे भासमान होतात एरव्ही खरोखर जी आत्मवस्तू आहे ती अविनाशी आहे जसे वाऱ्याने पाणी हालविले त्यामुळे ते तरंगाच्या आकाराचे झाले तर मग तेथे कोण आणि केव्हा जन्माला आले असे म्हणता  येईल? तेच वायूचे हालणे शांत झाले आणि सहजच पाणी सपाट झाले तर आता कशाचा नाश झाला? याचा तूच विचार कर.आणखी असे बघ की शरीर तर एकच असते परंतु वयोमानाप्रमाणे त्यास अनेक अवस्था प्राप्त होतात हा प्रत्यक्ष पुरावा तुच पहा या शरीरावर बालपण उमटलेले असते पुढे तेच बालपण तारुण्यामध्ये नाहीसे होते या अशा एकेक अवस्था बदलतात पण देह तोच असतो त्याचा नाश होत नाही.

           त्याप्रमाणे एका अविनाशी अशा आत्मचैतन्याच्या ठिकाणी विविध शरीरे निर्माण होतात व नाहीशी होतात हे ज्याला समजते त्याला भ्रम मुलक दु:ख कधीही होत नाही. (ओवी १०१ ते ११०) इंद्रियाच्या आधीन झाल्यामुळे मानवाला ते समजत नाही आणि ती इंद्रिये अंत:करणावर आपला अधिकार गाजवितात म्हणून त्याला भ्रम होतो प्रारंभी इंद्रिये विषयांचे सेवन करतात त्यामुळे सुख-दुखे उत्पन्न होतात मग ती सुख दुखे आपल्या संसर्गाने मानवच्या अंत:करणात भ्रम निर्माण करतात. ज्या विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधीही नसते त्या विषयांपासून कधी सुख तर कधी दु:ख निर्माण होते असे पाहा की निंदा आणि स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे कानांनी निंदा ऐकली तर व्देष निर्माण होतो आणि स्तुती ऐकली तर संतोष निर्माण होतो मृदुता आणि कठीणता हे स्पर्श या विषयाचे दोन भेद आहेत परंतु ते त्वचेच्या ठिकाणी भासल्यास संतोषाला आणि खेदाला कारण होतात  तसेच भेसुर आणि सुरेख ही दोन लक्षणे रूप या विषयीची आहेत पण ती डोळयांनी पाहिल्यास अंतकरणाला सुख-दुख निर्माण होते.

            सुगंध आणि दुर्गध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत ते नाकाच्या संयोगाने संतोष आणि विषाद निर्माण करतात. त्याच प्रमाणे रस हा दोन प्रकारचा असतो एकातुन त्रास आणि एकातुन प्रीती निर्माण होते विषयांची संगती ही मानवाला अधोगतीस घेवुन जाते असे पाहा की, माणूस ज्या वेळी इंद्रियांच्या अधीन होतो त्या वेळी त्याला शीतोष्णादी व्दंव्दे प्राप्त होतात ; त्यामुळे तो सुख-दुखांच्या चक्रात सापडतो या विषयां शिवाय जगात दुसरे काहीच उत्तम नाही असा हा इंद्रियाचा स्वभाव आहे. (ओवी १११ ते १२०)

          मृगजळ जसे खरे नसते ते आभासात्मक असते किवां स्वप्नात पाहिलेला हत्ती वगैरे जसा भास असतो त्याप्रमाणे हे विषय आहेत अशा प्रकारे हे विषय अनित्य आहेत म्हणून हे अर्जुना ! त्यांचा तू त्याग कर विषयांची थोडी देखील संगती करु नकोस जो पुरूष विषयांच्या अधीन होत नाही तो सुख-दुखाच्या पलीकडे जातो त्याला पुन: गर्भवास सोसावा लागत नाहीत जो विषयांच्या दुष्टचक्रात सापडत नाही तो सदैव ब्रम्हरुप असतो असे ओळखावे अर्जुना, आता तुला मी आणखी एक गोष्ट सांगणार आहे तत्वज्ञानी संत ते ओळखून त्याचे ग्रहण करतात जसे दूध पाण्याशी एकरुन होउन त्यात मिसळून गेलेले असते तरी पण राजहंस हा पाण्यातुन दुध निवडून वेगळे करतो.

           अथवा सुवर्ण जाणकार लोक अग्नीच्या साहाय्याने हिणकस धातू दूर करुन केवळ शुध्द सोने त्याप्रमाणे निवडून काढतात किवां चतुरपणाने दही घुसळल्या नंतर शेवटी जसे लोणी निघलेले दिसुन येते अथवा फोलकट आणि धान्य एकत्र असुनही वाऱ्यावर धरून ऊफणल्या नंतर ज्याप्रमाणे धान्य खाली राहुन फोलकट उडुन जाते.( ओवी १२१ ते १३०) त्याप्रमाणे सुक्ष्म विचार ज्ञानी लोकांचा अनित्य प्रपंचाच्या ठिकाणी अस्तित्वाचा निश्चय नसतो कारण सत आणि असत या दोहोंचाही निष्कर्ष त्यांनी जाणलेला असतो असे पाहा की, सार आणि असार यांचा सुक्ष्म विचार केला  तर त्यातील असारता ही भ्रांती होय असे जाण आणि सार हे स्वभावत:च नित्य आहे असे जाण हे तिन्ही लोक ज्याचा विस्तार आहे त्याला नाम, वर्ण आकार अशा प्रकारची काही चिन्हे नाहीत तो सर्वकाळ सर्व व्यापक असुन जन्म-मरण रहित आहे त्याचा नाश करू म्हटल्यास त्याचा नाश कधी सुध्दा होणार नाही.

            शरीर म्हणून जेवढे आहे तेवढे सगळे स्वभावत:च नाश पावणारे आहे म्हणून हे अर्जुना, तू शत्रू बरोबर झुंज द्यावीस तु देहाच्या ठिकाणी  मी असा अभिमान ठेवला आहेस दुसऱ्याच्या शरीरावर हे  माझे आहेत अशी दृष्टी ठेवली आहेस मी मारणारा आहे आणि हे माझे लोक मरणारे आहेत असे तु म्हणत आहेस परंतु अर्जुना तुला सत्य काय आहे याची जाणीव नाही जर तु ज्ञानाने सूक्ष्म विचार करशील तर तु मारणार नाहीस व हे मारले जाणारे नाहीत हे तुझ्या लक्षात येईल ज्याप्रमाणे स्वप्नात जे जे दिसते ते ते स्वप्नातच खरे वाटते मग आपण जागे होउन जेव्हा पाहतो त्या वेळी ते काहीच दिसत नाही. त्याप्रमाणे ही माया आहे तू व्यर्थ या मायेच्या भ्रमात पडला आहेस जसे एखाद्या शस्त्राने देहाच्या सावलीला मारले तर ते शस्त्र देहामध्ये घुसत नाही. ( ओवी १३१ ते १४०)

             किवां पाण्याने भरलेला घडा पालथा केल्यावर त्यातील सुर्याचे प्रतिबिबं नाहीसे झाल्यासारखे दिसते परंतु त्यामुळे मुळ सुर्यावर काहीही परिणाम होत नाही किवां ज्याप्रमाणे आकाश हे मठा मध्ये मठाच्या आकाराचे झालेले दिसले परंतु तो मठ मोडला तरी ते आकाश सहजच आपल्या स्वरुपात असते त्याप्रमाणे शरीर नाश पावले तरी आत्म्याचा नाश कधीही होत नाही. म्हणून बाबा तू भ्रमाने स्वरुपाच्या ठिकाणी जन्म-मरणाचा आरोप करु नकोस ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र नेसतो त्या प्रमाणे चैतन्यनाथ आत्मा जीर्ण देहाचा त्याग करून नवीन देहाचा स्वीकार करत असतो. हा आत्मा उत्पत्तिरहित असून नित्य शाश्वत आहे तो उपाधिरहित असुन अत्यंत शुध्द आहे म्हणून शस्त्रादिकाने याचा छेद करता येत नाही हा प्रलयकालीन पाण्यात देखील बुडत नाही याला अग्नीने जाळणे संभवत नाही तसेच वायूमध्ये देखील याला शूष्क करण्याची शक्ती नाही हा नित्य, स्थिर आणि शाश्वत आहे  हा सर्व ठिकाणी परिपूर्ण पणे भरलेला आहे.

            आत्मा हा तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाही ध्यान आत्म्याच्या भेटीची उत्कट इच्छा करीत असते. हे अर्जुना, हा आत्मा मनाला दुर्लभ आहे म्हणजे तो मनाला जाणता येत नाही हा कोणत्याही साधनाला प्राप्त होत नाही. हे पुरूषोत्तमा, हा आत्मा अनंत आहे. हा आत्मा सत्व, रज, तम या गुणांनी रहित आहे अनादि आहे विकाररहित आहे आणि आकाराच्या पलिकडचा विहार न पावणारा सर्वव्यापी असा आहे. (ओवी १४१ ते १५० )

पुढील भाग