अध्याय-३-भाग-२

         अरे बाबा ! स्वधर्म जो आहे, तोच नित्य यज्ञ जाण. त्या स्वधर्माचे आचरण केले असता पाप तेथे प्रवेश करत नाही. स्वधर्माचा त्याग केला, तर वाईट कर्म करण्याची इच्छा निर्माण होते आणि वाईट कर्म केले, कि माणूस जन्म मरणाच्या चक्रात सापडतो. म्हणुन स्वधर्माचे आचरण करणे म्हणजे नित्य यज्ञ-याजन करण्या सारखे आहे, जेा असे स्वधर्माचे आचरण करतो, त्याला काही सुध्दा बंधन होत नाही माणुस आपल्या नित्य यज्ञाला चुकला; म्हणुन कर्माने बध्द होउन परतंत्र अशा देहाच्या अधीन होउन पापकर्माने बांधला गेला. पार्था ! याविषयीची मी तुला एक कथा सांगतो, ती अशी की  ब्रम्हदेवाने उत्पत्ती, स्थिती, लय असा सृष्टीचा आकार निर्माण केला. त्यावेळी प्राणी आणि नित्य आचरणाचे धर्म ही दोन्ही त्यांनी बरोबर उत्पन्न केली.परंतु लोक या यज्ञाला जाणत नव्हते, कारण स्वधर्मरुप यज्ञाचे स्वरुप सुक्ष्म आहे, त्या वेळी प्रजेने ब्रम्हदेवाला विनंती केली की  देवा, आम्ही या लोकात कशाचा आश्रय घ्यावा, ते आम्हाला सांगावे, त्या वेळी कमळापासुन ज्याची उत्पत्ती झाली, असा तो ब्रम्हदेव लोकाना म्हणाला, तुम्हाला वर्णानुसार असा स्वधर्म सांगितला आहे, त्याचे आचरण‍ करावे,म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा सहजपणे पुर्ण होतील. याशिवाय तुम्हाला व्रत-नियम करण्याची काही आवश्यकता नाही. अवघड साधना करुन शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही, तसेच तीर्थयात्रेस जाण्याची जरुरी नाही. योगादिक साधने करु नका. सकाम उपासना करु नका. तसेच, मंत्रतंत्रदिक अनुष्ठाने करु नका.          (ओवी ८१ ते ९०)

         स्वधर्म सोडुन इतर देवतांना भजावयाचे  कारण नाही. सर्वदा असे काही करु नका तुम्ही सहजपणे प्राप्त झालेल्या स्वधर्माचरण‍रुप यज्ञाचे आचरण करावे. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री निष्काम बुध्दीने आपल्या पतीची सेवा करते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या स्वधर्माचे निष्काम बुध्दीने आचरण करा. अशा प्रकारे तुम्हाला हाच एक स्वधर्मरुप यज्ञ आचरण्यास योग्य आहे. असे सत्यलोक अधिपती ब्रम्हदेव म्हणाले. जर तुम्ही स्वधर्माचे आचरण कराल, तर हा धर्म कामधेनुप्रमाणे इच्छा पुरविणारा होईल प्रजाजन हो, मग हा स्वधर्म तुम्हाला कधीही सोडणार नाही. या स्वधर्माच्या आचरणाने सर्व देवतांना संतोष होईल ,आणि मग ते तुम्हाला इच्छित भोग देतील. या स्वधर्मरुपी पुजेने सर्व देवतागणांची पूजा केली असता ते देव तुमचा योगक्षेम निश्चीतपुवर्क चालवतील. तुम्ही स्वधर्मद्वारा देवांची भक्ती कराल, तर देव तुमच्यावर संतुष्ट होतील. असे एकमेकांचे एकमेकांवर जेव्हा प्रेम जडेल, तेव्हा तुम्ही जे करु म्हणाल ते सहजच सिध्दीस जाईल. आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पुर्ण होतील. तुम्हाला वाचासिध्दी प्राप्त होईल तुम्हीच आज्ञा करणारे व्हाल. तुम्ही महासिध्दीला काही मागून घेण्या ऐवजी महासिध्दीच तुम्हाला हवे ते मागतील. वसंत ऋुतूचे व्दारात ज्याप्रमाणे वनशोभा ही आपल्या फळपुष्प भाराच्या लावण्याने सदैव वास करीत असते.  ( ओवी ९१ ते १०० )

          त्या प्रमाणे सर्व सुखांसहित मुर्तिमंत भाग्यव तुमचा शोध करीत-करीत तुमच्या पाठीमागे येईल. बाबांनो ! अशाप्रकारे जर तुम्ही एकनिष्ठपणाने आपल्या स्वधर्माचे आचरण कराल, तर सर्व ऐश्वर्याने तृप्त होउन तुमच्या मनात विषयांची इच्छा राहणार नाही,याउलट सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होउन देखील जो विषयांच्या गोडीला लुब्ध होउन उन्मत्त इंद्रियाच्या सांगण्या प्रमाणे वागेल आणि स्वधर्म रुपी यज्ञाने संतोष पावलेल्या इंद्रादी देवतांनी जी काही संपुर्ण संपत्ती दिली, त्या संपत्तीच्या व्दारा जो स्वधर्माने ईश्वराला भजणार नाही, जो अग्नीच्या मुखात हवन करणार नाही  देवता पुजन करणार नाही, यथाकाळी परमार्थाच्या मार्गावरुन वाटचाल करणाऱ्यास जो भोजन देणार नाही. जो गुरूभक्ती करणार नाही, अंत:करणापासुन अतिथीचा आदर करणार नाही, मानवजातीला संतोष देणार नाही, अशा प्रकारे जो स्वधर्माचे आचरण करणार नाही, जो संपन्नतेमुळे उन्मत्त ओउन केवळ विषयभोगांमध्ये आसक्त होईल, त्याला मोठमोठे अपाय होतील, त्यामुळे त्याचेजचळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीस्र होईल, त्याला प्राप्त असलेले भोगही तो भोगु शकणार नाही. जसे आयुष्य संपलेल्या शरीरात जीवात्मा राहत नाही किवां उैवहान माणाच्या घरात लक्ष्मी राहत नाही, त्याप्रमाणे दिवा मालविला की प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे स्वधर्म जर लेाप पावला, तर सुखाचा प्रकाश नाहीसा होउन दु;खाचा अंधकार पसरतो.(ओवी १०१ ते ११० )

         याप्रमाणे जो स्वधर्माचा त्याग करतो , त्याचे स्वातंत्र नष्ट होते, प्रजाजन हो ! हे तुम्ही योग्य प्रकारे समजुन घ्या, असे ब्रम्हदेव म्हणाले,म्हणुन स्वधर्माचा जो त्याग करील, त्याला काळच शिक्षा करील आणि हा चोर आहे, असे जाणुन त्याचे सर्वस्व हिरावुन घेईल. रात्र झाली की, ज्याप्रमाणे पिशाच्च संपुर्ण स्मशान व्यापुन टाकतात, त्याप्रमाणे विविध प्रकारची पापे अशा माणसाला पछाडतात. त्याप्रमाणे त्रिभुवनातील विविध दु:खे, नाना तऱ्हेची पातके, सर्व दारिद्रये त्या स्वधर्माने न वागणाऱ्या माणसाजवळ राहतात.प्रजाजन हो ! याप्रमाणे त्या उन्मत्त माणसाला दु:ख भोगावे लागते बाबांनो ! त्याने कितीही आक्रोश केला तरी कल्पांताच्या शेवटपर्यत त्या मोठया  दु:खातुन त्याची सुटका होउ शकत नाही. म्हणुन कोणीही स्वधर्माचा त्याग करु नये आणि इंद्रियांना सैल सोडु नये. याप्रमाणे ब्रम्हदेव प्रजेला समजावुन सांगु लागले, ज्याप्रमाणे एखाद्या जलचराने पाण्याचा त्याग केला , तर त्या क्षणी त्याला मृत्यू येतो. त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग केला तर माणसाचा सर्वनाश होतो. म्हणुन स्वधर्म कधी सोडु नये.म्हणुन तुम्ही सर्वानी स्वधर्माप्रमाणे कर्मे करावीत, हे मी पुन:पु:न सांगत आहे, असे ब्रम्हदेव म्हणाले. जो विहीत कर्मे अनासक्त बुध्दीने करतो आणि आपल्या संपत्तीचा विनियोग स्वधर्मासाठी करतो. जो गुरूची मनोभावे सेवा करतो, स्वगोत्रातील लोकांवर उपकार करतो, अग्नीची पूजा करतो, योग्य प्रसंगी ब्राम्हणांची सेवा करतो आणि पितरांच्या करिता श्राध्दादी नैमित्तीक कर्मे करतो.( ओवी १११ ते १२० )

        या सर्व विहीत ,उचित अशा यज्ञकर्माच्या रुपाने यज्ञभोक्ता ईश्वराच्या ठिकाणी हवन करुन जे  जे यज्ञशेष सहज राहील, ते सुखा-समाधानाने आपण कुटूंबासह सेवन करतो, त्या यज्ञशेष सेवनामुळे त्याचे सर्व पातक नाहीसे होते. अमृताचे प्राशन केले, की ज्याप्रमाणे महारोग नाहीसा होत असतो, त्याप्रमाणे यज्ञातील अवशेष जो भोगतो, त्याची दु:खे नाहीशी होतात, ज्याप्रमाणे ब्रम्हनिष्ठ माणसाला भ्रांतीपासून बाधा होत नाही, त्याप्रमाणे यज्ञशेष सेवन करणाऱ्यास दोषाची बाधा होत नाही. म्हणुन स्वधर्माचे आचरणाने जे मिळेल, त्याचा विनियोग हा स्वधर्मासाठी करावा. मग जे सहज उरेल, त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. हे अर्जुना ! अशा या नियमाशिवाय अन्य प्रकारे आचरण करु नये, अशी ही पुरातन काळापासुनची कथा श्रीकृष्ण सांगत आहेत. जे आपण म्हणजे देह मानतात आणि विषयांना भोग्य समजतात आणि याशिवाय दुसरे काहीच जाणत नाहीत, खरे तर संपुर्ण जीवन म्हणजे स्वधर्मरुप यज्ञाची साधने आहेत , परंतु भ्रांतीच्या चक्रात सापडलेले लोक हे न कळाल्यामुळे देहाच्या ठिकाणी अहंकार बुध्दी ठेवतात आणि विषयभोगावर लक्ष ठेवतात  इंद्रियांना आवडणारे चविष्ठ पदार्थ ते तयार करतात आणि त्यांचे सेवन करतात, ते पापी लोक जणु काही पातकांचेच सेवन करत असतात, सर्व संपत्ती ही स्वधर्मरुप यज्ञाचे हवनद्रव्य आहे, हे जाणावे , ती संपत्ती स्वधर्मयज्ञाने आदिपुरूषाला अनासक्त भावनेने अर्पन करावी. (ओवी १२१ ते १३०)

         हे सर्व न जाणता अज्ञानी लोक स्वताच्या भोगाकरिता नाना प्रकारचे अन्नाचे पदार्थ निर्माण करतात. ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिध्दीस जातो आणि परमेश्वरही संतोष पावतो, ते हे अन्न सामान्य वस्तुसारखे नाही. म्हणून  या अन्नाला साधारण, सामान्य समजु नये अन्न हे ब्रम्हरुप आहे, हे जाणावे ; कारण ते या विश्वाच्या जीवनाला कारण आहे. अन्नापासुन सर्व प्राणिमात्रांची वाढ होत असते आणि पावसापासुन सर्व ठिकाणी अन्न निर्माण होत असते. त्या पावसाची उत्पत्ती यज्ञापासुन होते, तो यज्ञ कर्मापासुन प्रकठ होतो, कर्माची उत्पत्ती वेदरुप ब्रम्हापासुन होते. हया वेदांची उत्पत्ती अविनाशी अशा ब्रम्हापासुन होते, म्हणुन हे सर्व चराचर विश्व ब्रम्हामध्ये सामावलेले आहे. हे सुभद्रापती अर्जुना ! ऐक, कर्माचे मूर्त स्वरुप जो यज्ञ, या यज्ञामध्ये सर्व वेद तात्पर्यरुपाने निरंतर राहत असतात. हे धनुर्धरा ! याप्रमाणे ही मुळातील कार्यकारण परंपरा तुला या स्वधर्म – यज्ञाकरता संक्षेपाने सांगितली. म्हणुन जो उन्मत्त असलेला मनुष्य या लोकामध्ये उचित अशा या स्वधर्मरुप यज्ञाचे आचरण करत नाही , जो वाईट कर्माचे आचरण करुन इंद्रियाचे केवळ लाड पुरवितो  तो केवळ पापांच्या राशी असुन भुमीला केवळ भार होउन राहीला आहे असे जाणावे.  ( ओवी १३१ ते १४०)

           ज्या वेळी अयाग्य काळी आकाशात जमलेले ढग निरुपयोगी असतात, त्याप्रमाणे हे अर्जुना !  त्या उन्मत्त मनुष्याचे जन्म व कर्म सर्व निष्फळ आहे. शेळीच्या गळयाला असलेले स्तन ज्याप्रमाणे निष्फळ असतात, त्याप्रमाणे जो स्वधर्म -अनुष्ठान करत नाही, त्याचे जगणे निष्फळ असते. म्हणुन पांडवा ! ऐक , हा स्वधर्म कोणीही सोडू नये. सर्व भावाने स्वधर्माचे आचरण करावे, असे पाहा की शरीर जर उत्पन्न झाले आहे  तर मग ओघानेच त्याच्यामागे कर्तव्य कर्म आलेच , तर मग उचित असे कर्म का बरे त्यागावे ? हे अर्जुना !  मनुष्यशरीर प्राप्त झाले असता  जे लोक कर्म करण्याचा आळस करतात  ते लोक अज्ञानी आहेत. जो आत्मस्वरुपामध्ये अखंड रममाण असतो, तो आपला देह -इंद्रियांचे स्वाभाविक कर्म चालु असताना देखील त्यामध्ये ल्रिप्त होत नाही. जो आनंदरूप आत्मतत्वाशी एकरुप होउन कृतकृत्य झालेला असतो , त्याचा सर्व कर्माशी संबंध सहजच तुटलेला असतो. ज्याप्रमाणे  तृप्ती प्राप्त झाल्यावर तिची साधने आपोआप संपुन जातात. त्याप्रमाणे आनंदस्वरुप आत्मतत्वाशी एकरुप झाल्यावर कर्म करण्याचे प्रयोजनच शिल्लक राहत नाही. हे अर्जुना ! जो पर्यत आत्मज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यत कर्मादी साधने करावी लागतात . म्हणुन सदैव फळाची आशा त्यागुन तू उचित अशा आपल्या स्वधर्माचे आचरण कर. ( ओवी १४१ ते १५० )

         हे पार्था ! जे निष्काम बुध्दीने स्वधर्माचे आचरण करतात, ते श्रेष्ठ अशा कैवल्यपदाला प्राप्त होतात. असे पाहा की , कर्माचा मुळीच त्याग न करता , जनकादिकांना मोक्षाचे सुख प्राप्त झाले. हे अर्जुना ! या साठी कर्म करण्याविषयी तु आस्था ठेव, कारण त्या आस्थेपासुन आणखी एक उपयोग होणार आहे. त्या कर्माचे आपण आचरण केले असता या लोकांना तसे आचरण करण्याची सवय लागेल त्यामुळे त्यांना होणारी दु:खे सहजच नाहीशी होतील. असे पाहा , की जे कृतकृत्य झाले आहेत आणि निष्काम स्थितीला पोहोचले आहेत, त्या महान पुरूषांनादेखील लोकांना सदाचाराच्या मार्गाकडे आणण्यासाठी कर्म करावे लागते. आंधळया माणसाला सांभाळुन नेणारा डोळस माणुस हा आंधळया माणसाप्रमाणे सावकाश चालत असतो, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाने सदाचाराने वागुन आणि धर्म आचरुन अज्ञानी माणसास मार्ग दाखवावा.ज्ञानी माणसाने धर्म आचरुन धर्माचा मार्ग सांगितला नाही,तर अज्ञानी माणसाला कसे बरे समजेल ? त्यांनी कोणत्या मार्गाने या धर्माला जाणावे ? या जगा‍त श्रेष्ठ पुरूष जे सतकर्म करतात , त्यालाच लोक धर्म असे म्हणतात आणि सर्वसामान्य लोक त्याचेच आचरण करतात . जगाचा असा स्वभावच आहे, म्हणुन श्रेष्ठ लोकांनी कर्माचा त्याग करू नये. तर जगाच्या कल्याणासाठी धर्माचे आचरण जाणीव पुर्वक करावे लागते. हे अर्जुना ! आता आणखी गोष्टी तुला कशाला सांगू ? मी देखील कर्ममार्गाने वागतो हे प्रत्यक्ष बघ. (ओवी १५१ ते १६० )

         मला काही कमी आहे किवां कोणत्या एखाद्या फळाची इच्छा धरुन मी धर्माचे आचरण करत आहे, असे जर म्हणशील पूर्णतेच्या दृष्टीने पाहीले असता माझ्या सारखा दुसरा जगात कोणीही नाही किवां सर्व प्रकारचे सामर्थ्य माझ्या ठायी वसलेले आहे , हे तु जाणतोस सांदीपनी गुरूचां मृत पावलेला मुलगा मी परत आणुन दिला , तो पराक्रम तू पाहीला आहेस .तो मी इतका सामर्थ्य संपन्न असुनही कर्ममार्गाचे आचरण करत आहे. जसा सकाम पुरूष केवळ एका फळाच्या उद्देशाने तत्पर असतो , त्या तत्परतेने मी स्वधर्म करीत असतो कारण सर्व प्राणिमात्र हे आमच्या अधीन आहेत, मी जसे कर्म करतो  तसे ते ही करतात तरी हे लोक कर्मभ्रष्ट होउ नयेत म्हणुन मी सदैव कर्ममार्ग आचरीत असतो. जर आम्ही निरिच्छ होउन आत्मस्थितीत शांतपणे बसुन राहीलो, तर ही प्रजा दु:खातुन कशी बरे तरुन जाईल ? प्रजेने आमच्या मार्गाकडे पाहावे आणि आचरणाची पध्दत समजुन घ्यावी असा प्रकार आहे. त्यामुळे आम्ही जर कर्माचा  त्याग केला तर लोकांचे जीवन सर्व प्रकारे बिघडुन जाईल. म्हणुन या लोकी जो समर्थ आहे आणि सर्वज्ञान संपन्न आहे, त्याने विशेष करुन कर्माचा त्याग कधी करु नये.असे पाहा कि, फळाच्या आशेने सकाम पुरूष जेवढया उत्साहाने कर्माचे आचरण करतो, तेवढया उत्साहाने फलाशा नसलेल्या पुरूषांनीच ही कर्मे करावीत. कारण अर्जुना ! लोकांचे हे आचरण सर्व प्रकारे नेहमी जतन करुन ठेवणे योग्य असते. ( ओवी १६१ ते १७०)

        म्हणुन, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्ममार्गाचे आचरण करुन सर्वाना सन्मार्ग दाखवावा आणि आपण सामान्य लोकाप्रमाणे राहुन आपले जीवन आचरावे आपले अलौकिकत्व सिध्द करण्याचा प्रयत्न करु नये.लहान बालक मोठया प्रयत्नाने आईचे दुध पिते, तो पक्वान्ने कसे बरे खाईल? म्हणुन हे अर्जुना ! ती पक्वान्ने लहान बालकांना देउ नयेत, त्याप्रमाणे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जे कर्म करीत नाहीत, त्यांना कौतुकाने देखील नैष्कर्म्यता सांगु नये. त्यांना सतक्रिया सांगावी  त्यांच्याजवळ सतक्रियेची स्तुती करावी आणि निष्काम पुरूषाने सतकर्माचे आचरण करुन दाखवावे, सतपुरूषाने लोकांच्या कल्याणासाठी जरी कर्म केले, तरी त्याला कर्माचे बंधन लागत नाही. बहुरूप्याने जरी राजा राणीची सोंगे घेतली, तरी पण त्याच्या मनात स्त्री आणि पुरूष हा भाव मुळीच नसतो. लोकांची समजुत मात्र ते तसेच असल्याची होते. त्याप्रमाणे लोकसंग्रहासाठी निष्काम पुरुष जरी कर्म करीत असला तरी त्याला कर्माचे कोणतेही बंधन प्राप्त होत नाही. हे धनुर्धरा ! असे पाहा कि, दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या डोक्यावर घेतले तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का ? तुच सांग. त्याचप्रमाणे प्रकृतीच्या गुणाने जी चांगली -वाईट कर्मे निर्माण होतात त्या कर्माचा ” मीच कर्ता आहे ” असे अज्ञानी माणुस बुध्दीत निर्माण झालेल्या भ्रमाने म्हणत असतो.असा अहंकाराच्या घोडयावर आरुढ झालेला आणि स्वताला‍ मर्यादीत समजणारा मते अज्ञानी आहे, त्याच्या बुध्दीला हे गहन तत्वज्ञान सांगु नये .अर्जुना ! सध्या हा विषय राहु दे. आता तुला मी हिताची गोष्ट सांगणार आहे. तरी चित्त एकाग्र होउन त्याचे श्रवण कर. (ओवी १७१ ते १८०)

पुढील भाग