अध्याय-३-भाग-३

        ज्या प्रकृतीच्या गुणांपासुन ही सर्व कर्मे निर्माण होतात, तो प्रकृतीचा विकार आत्मज्ञानी पुरूषच्या ठिकाणी असत नाही, ते आत्मज्ञानी देहाचा अभिमान त्यागुन गुण व गुणांपासुन निर्माण होणारी कर्मे यांना ओलांडुन देहाच्या ठिकाणी साक्षित्वाने राहतात. सुर्य ज्याप्रमाणे प्राणिमात्रांच्या बऱ्या वाईट व्यवहाराने लिप्त होउन जात  नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरूषाने देह धारण केला असला, तरी तो देवाकर्मानी बध्द होत नाही. या जगामध्ये जो प्रकृतीच्या चक्रामध्ये सापडुन गुणांना वश होउन वागत असतो. तो कर्माच्या योगाने लिप्त होतो. सात्विक, राजस, तामस गुणाच्या योगाने इंद्रिये आपआपली कर्मे करीत असतात. त्या गुणांनी केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बलात्काराने आपल्याकडे घेतो तो कर्मामध्ये बध्द होउन राहतो.सर्व विहीत कर्मे उत्तम प्रकारे करुन ती मला अर्पण कर, पंरतु चित्तवृती मात्र सदैव आत्मस्वरुपाच्या ठिकाणी स्थिर कर मी या कर्माचा कर्ता आहे ,अमुक फलासाठी मी हे कर्म करीत आहे  अशा प्रकारचा अभिमान तु आपल्या चित्तात निर्माण करु नकोस, तु शरीराच्या स्वाधीन राहु नकोस  सर्व इच्छांचा त्याग कर आणि योग्य काळी सर्व भोगांचा उपभोग घे. आता तु आपल्या हातात धनुष्य घेउन रथावर आरुढ हो आणि समाधानाने वीरवृत्तीचा स्वीकार कर. या जगामध्ये तु आपली किर्ती कर  स्वधर्माचा मान वाढव, आणि या पृथ्वीला दुष्टाच्या भारापासुन तु सोडव. हे अर्जुना ! आता तु सर्व प्रकारचे संशय टाकुन संग्रामाकडे चित्त दे आता या युध्दभुमीवर युध्दावाचुन दुसरे काही बोलु नकोस. हे धनुर्धरा ! या माझ्या निश्चीत स्वरूपाच्या मताचा जे आदराने स्वीकार करतात आणि परम श्रध्देने आचरण करतात, ते देखील सर्व कर्माचे आचरण करूनही, कर्मरहीत असतात, असे तु जाण. म्हणुन हे माझे मत दृढ निश्चयाने आचरण करण्यास योग्य आहे. जे लोक प्रकृतीच्या अधीन होउन व इंद्रियांचे लाड पुरवुन माझ्या या मताचा तिरस्कार करुन त्याग करतात जे माझ्या मताला सामान्य समजतात. त्याच्याकडे अनादर भावाने पाहतात किवां जे वाचाळपणाने याला सामान्य वाणी म्हणतात. ते मोहरुपी अमंली पदार्थाचे सेवन करुन भुलवलेले व विषयरुपी विषाने व्यापलेले आहेत आणि अज्ञानरुपी चिखलात रुतलेले आहेत, असे नि:संशय समज, प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे वाया जाते,अथवा जो जन्मापासुन आंधळा आहे त्याने पाहीलेले प्रमाण मानले जात नाही. किवां चंद्राचा उदय ज्याप्रमाणे कावळयाच्या उपयोगी पडत नाही त्या प्रमाणे अज्ञानी लोकाना हा विचार रुचणार नाही, हे पार्था ! जे लोक परमार्थाच्या विरुध्द आहेत त्याच्याशी आत्मज्ञानाविषयी काही बोलु नये.ज्याप्रमाणे पतंग किटक दिव्याच्या प्रकाशाला सहन करत नाही. त्याप्रमाणे हे लोक दिव्य आत्मज्ञानावर विश्वास ठेवत नाहीत उलट त्याची निंदाच करीत असतात.             (ओवी १९१ ते २०० )

          पंतगाने जर दिव्याला आलिगंन दिले तर तेथेच जसे त्याला अचुक मरण येते, त्याप्रमाणे विषयांचा स्वैर उपभोग घेणे हे माणसाच्या नाशाला कारणीभुत होते. म्हणुन जाणकार विचारी माणसाने या इंद्रियाचे लाड कौतुकाने देखील करु नयेत. अरे ! विषारी सर्पाबरोबर कधी खेळता येईल काय ?  किवां वाघाशी ठेवलेला संबंध कधी सिध्दीस जाईल काय ? हलाहल विष प्राशन केले, तर ते पचेल काय हे सांग पाहु ? हे बघ, सहज खेळता-खेळता आग लागली आणि तिच्या ज्वाला भडकल्या, तर त्या सावरता येत नाहीत त्याप्रमाणेच इंद्रियांना विषयांचा लळा जर लागला तर त्याचा परिनाम कधीही चांगला होत नाही.हे अर्जुना ! एरव्ही विचार करुन पाहिले तर शरीर हे प्रकृतीच्या अधीन असलेले दिसुन येते. तर मग या शरीराकरता नाना प्रकारचे भोग का म्हणुन जमवावेत ? आपण अतिशय कष्ट करुन मिळवलेली सर्व संपत्ती, समृध्दी खर्च करुन उत्पत्ती आणि नाश पावणाऱ्या या शरीराचे पालन का बरे करावे ? देहाला नाना प्रकारचे कष्ट देउन दमुन-भागुन संपत्ती प्राप्त करावी आणि स्वधर्माचा त्याग करुन क्षणाक्षणाला बरळणाऱ्या या नश्वर देहाचे पोषण करीत राहावे हे योग्य आहे काय ? हे शरीर पंचमहाभुते एकत्र येउन तयार झाले आहे, शेवटी ते पंचमहाभुतांतच विलीन होणार आहे. त्यावेळी शरीरासाठी केलेले कष्ट कोठे बरे शोधावेत? म्हणुन फक्त देहाचे पोषण‍ करणे हे उघड-उघड आपले मोठे नुकसान आहे हे जाण. याकरीता मानवाने फक्त देहाच्या पोषणाकडेच अंत:करणापासुन लक्ष देउ नये. एरव्ही, इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे विषयांचे सेवन केले तर चित्ताला संतोष प्राप्त होतो हे खरे. (ओवी २०१ ते २१०)

          पंरतु तो संतोष म्हणजे वरुन सात्विक दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे, तो चोर गावाची वेस पार करण्यापर्यत क्षणभर स्वस्थ असतो आणि वनात घात करुन पैसे काढुन घेतो. बाबारे ! विष वरुन मधुर वाटेल चित्तामध्ये खाण्याची आवड निर्माण होईल, पंरतु त्याच्यां परिनामाचा विचार केला तर प्राणांची हानी होते.ज्याप्रमाणे गळाला लावलेले अमिष माशाला बरोबर भुलवते, त्याप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषयांची तीव्र लालसा मानवाला खोटया सुखाच्या आशेकडे प्रवृत्त करत असते. पंरतु त्या अमिषाच्या खाली प्राणाला हरण करणारा गळ आहे, तो आपल्या प्राणाचा नाश करेल हे त्या माशाला अमिषाने गळ झाकला गेल्यामुळे ज्याप्रमाणे कळत नाही, त्याप्रमाणे विषयांची लालसा निर्माण झाली की मानवाची तशीच अवस्था होते विषयांची तीव्र इच्छा धरली तर मानवाला क्रोध रुपी अग्नीत पडावे लागते.ज्याप्रमाणे कुशाग्र बुध्दीचा पारधी हा हरीणाचा घात करण्यासाठी त्याच्या चारी बाजुने  एके ठिकाणी बरोबर आणत असतो, विषयांच्या सुखाचा प्रकार देखील असाच आहे.म्हणुन तु विषयांची संगती करु नकोस. विषयांच्या मागे लागलो तर काम क्रोध निर्माण होतात‍.आणि हे दोन्ही घात करणारे आहेत म्हणुन या विषयांचा आश्रय करु नये  मनामध्ये त्यांचे स्मरण देखील करु नये स्वधर्माची जाणीव कधीही नष्ट होउ देउ नकोस.असे पाहा की, आपला स्वधर्म जरी आचरण्यास कठिण असला तरी त्याचेच आचरण करणे चांगले होय. दुसऱ्याचा धर्म जरी खरोखर दिसावयास चांगला असला,तरी आचरण करणाऱ्यांनी आपल्या विहीत कर्माचेच आचरण करीत राहावे. (ओवी २११ ते २२०)

          ब्रम्ह जाणणारा मनुष्य जरी गरीब असला तरी त्याने दुसऱ्याच्या घरची पक्वान्ने कशी बरे सेवन करावीत असे अनुचित कर्म कसे बरे करावे? जे ग्रहण करण्यास योग्य नाही त्या अन्नाची इच्छा का बरे करावी ? अथवा इच्छा केलेला विषय प्राप्त जरी झाला तरी सेवन करावे का ? याचा विचार कर. दुसऱ्यांची पांढरी शुभ्र मनोहर घरे पाहुन आपल्या गवताच्या झोपडया मोडाव्यात काय ? आपली धर्मपत्नी रुपाने जरी थोडी कमी असली, तरी तिच्याबरोबर संसार सुखाने करणे आवश्यक आहे. आपला स्वधर्म करण्यास कठीण जरी असला, तसेच तो करताना कितीही आपत्ती आली तरी स्वधर्म हा परलोकी सुख देणारा आहे.अरे दुध आणि साखर याची गोडी प्रसिध्दच आहे  परंतु ज्याच्या पोटात कृमीदोष निर्माण झाला आहे. त्यांनी ते पदार्थ कसे बरे सेवन करावेत ? हे अर्जुना ! असे असुन देखील रोग्याने जर ते पदार्थ सेवन केले, तर त्याचा तो हटटच ठरेल कारण परिणामी ते पदार्थ हितकारी होणार नाहीत. म्हणुन इतरांना जे विहीत आणि आपणास जे अयोग्य कर्म आहे  त्याचे आचरण करु नये. स्वधर्माचे आचरण करीत असताना आपला जीव जरी अर्पण करावा लागला तरी तो या मृत्यू लोकात आणि परलोकात दोन्ही लोकी श्रेष्ठ मानला जातो, देवाधिदेव श्रीकृष्ण ज्यावेळी असे बोलले त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा ! माझी एक विनंती ऐका.  (ओवी २२१ ते २३० )

          आपण जे मला सांगितले, ते मी उत्तम प्रकारे श्रवण केले परंतु आता मला जे काही अपेक्षित आहे ते मी विचारणार आहे. देवा ! असे का बरे घडते ? ज्ञानी पुरुषांची स्थिती देखील भ्रष्ट होउन जाते आणि ते सदाचाराचा मार्ग सोडुन वेगळयाच मार्गाने वाटचाल करीत असलेले दिसतात. जे सर्व काही जाणणारे असतात जे त्याग कशाला करायचा आणि स्वीकार कशाचा करायचा हे देखील जाणतात, ते कोणत्या गुणांमुळे परधर्माचे आचरण करतात ? धान्य आणि कोंडा याची निवड करणे आंधळा माणुस जाणत नाही त्याप्रमाणे कधी-कधी डोळसाचीही अशी अवस्था होते. असे का बरे व्हावे ? जे लोक प्रपंचाच्या संगतीचा त्याग करतात तेच पुन्हा प्रपंचाची संगती करुन देखील तृप्त होत नाहीत. सर्वस्वाचा त्याग करून वना‍त राहीलेले लोक देखील पुन्हा नगरातील लोकांत येउन राहतात. स्वता तर ते पापाला भिउन लपून बसतात, अनेक प्रकारांनी ते पाप चुकवितात, परंतु कोणाच्या तरी बलात्काराने ते पापाच्या चक्रात गुंतले जातात, ज्या लोकांची मने ज्या पापाचा अतिशय त्रास मानुन घेत असतात. तीच पापे त्यांच्या अंतकरणात येउन बसतात, ज्या पापांना चुकविण्याचा प्रयत्न करत असतात  तीच पापे त्यांना शोधत -शोधत येत असतात.अशा प्रकारे पाप करण्याविषयी जो बलात्कार दिसतो, तो कोणाच्या आग्रहामुळे होत असतो. हे ऋषीकेशांनी मला सांगावे असे पार्थ म्हणाला. तेव्हा प्रत्येकाच्या हदयरुपी कमळामध्ये असणारा आत्माराम आणि निरिच्छ असे योगी ज्याची इच्छा करतात तो पुरूषोत्तम श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, या प्रश्नाचे उत्तर सांगतो ते तु ऐक. तर असे पाहा कि, हे जे काम-क्रोध आहेत, त्याच्यां ठिकाणी कृपेचा साठा नाही हे दोन्ही यमासारखे घात करणारे आहेत.  (ओवी २३१ ते २४० )

         हे ज्ञानरुपी संपत्तीवर बसलेले विषारी महासर्प आहेत विषयरुपी पर्वताच्या गुहेत रहाणारे महाभयानक वाघ आहेत, आणि भजनमार्गाचे ते मारेकरी आहते. हे देहरुपी किल्ल्याचे प्रचंड दगड आहेत इंद्रियरुपी गावाच्या भोवती असलेले तट आहेत आणि सर्व जगामध्ये भ्रम, अविचार इत्यादी उत्पन्न करण्यात हे प्रबळ आहेत हे काम-क्रोध मनात असलेल्या रजोगुणाचा परिणाम आहे. हे मुळातच आसुरी संपत्ती आहेत आणि अविद्येने त्याचे पालन पोषन केले आहे.हे रजोगुणापासुन उत्पन्न झाले असले तरी तमोगुणांला हे अत्यंत प्रिय आहेत, म्हणून त्या तमोगुणाने प्रमाद व मोह हे आपले निजपद त्यांना दिले आहे. हे मानवाच्या जीवाचे मोठे शत्रु आहेत म्हणुन मृत्यूच्या नगरीत हे श्रेष्ठ मानले जातात. यांच्या फक्त भुकेच्या इच्छेला संपूर्ण विश्व एका घासालादेखील पुरेसे पडत नाही उपभोगांची इच्छा म्हणजे आशा ही त्यांचे नाशकारक व्यवहार चालवीत असते. जी कौतुकाने देखील चौदा भुवने मुठीत धरु शकते, हिच्या मुठीपेक्षा चौदा भुवने देखील लहान आहेत. अशी ही भ्रांती या आशेची लहान बहिण आहे.ही भ्रांती केवळ भातुकला खेळता-खेळता सहजपणे तिन्ही लोक खावुन टाकते. त्या भ्रांतीच्या दासीपणाचे बळावर इच्छारुपी तृष्णा ही जगत असते, हे असो. या काम -क्रोधांना मोहाच्या घरी जादा मान आहे, जो अहंकार आपल्या इच्छेप्रमाणे जगाला नाचवित असतो तो अहंकार यांचेशी देणे-घेणे करतो. ज्याने सत्याचा कोथळा फोडून त्यात असत्याचा पेंढा भरला, तो दंभ या काम-क्रोधांनीच जगामध्ये प्रसिध्दीस आणला आहे.(ओवी २४१ ते २५० )

           या काम क्रोधांनी शांतीरुपी साध्वीला वस्त्रहीन केले आहे आणि मायारुपी स्त्रीला वस्त्रे अंलकारानी सजवले. त्या मायेने सांधुचा समुदाय काम-क्रोधांच्या लहरीनी भ्रष्ट करुन टाकला. यांनी विवेकाचे बळ नाहीसे केले, वैराग्याचा विचार नाहीसा केला आणि शम-दमांची मान जिवंतपणीच मुरगुळुन टाकली.यांनी संतोष रुपी वन तोडुन टाकले धैर्यरुपी किल्ले जमीनदोस्त केले आणि आनंदाची कोवळी रोपे उपटुन टाकली.यांनी ज्ञानाची रोपे खुडुन टाकली, सुखाची सर्व अक्षरेच पुसून टाकली. आणि माणसाच्या हदयात  विविध तापांचे निखारे प्रज्वलित केले.काम-क्रोध हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत ते जीवाबरोबरच जडलेले आहेत या काम-क्रोधाचा आतमध्ये शोध केला, तर ब्रम्हादिकांना देखील  ते सापडत नाहीत. हे काम-क्रोध जीवात्म्याच्या जवळ असतात, ज्ञानाच्या पंक्तीला ते राहात असतात. यांच्या लहरी मोठया प्रमाणात उसळल्या की त्या कोणालाही सावरता येत नाहीत. हे जलाशिवाय माणसाला बुडवून टाकतात, हे अग्नीशिवाय जाळुन टाकतात आणि मानवाला काही समजु न देता ग्रासुन टाकतात. कोणत्याही शस्त्रावाचुन हे काम-क्रोध बरोबर संधी साधुन माणसाला काही समजु न देता मारतात, दोराशिवाय जखडुन टाकतात आणि स्वताला ज्ञानी म्हणविणाऱ्या लोकांना तर पैजेचा विडा उचलुन ते ठार करुन टाकतात.हे चिखलाशिवाय माणसाला पुरुन टाकतात कोणत्याही जाळयावाचुन अडकुन टाकतात हे शरीरात सुक्ष्मरुपाने राहात असल्यामुळे सर्वसाधारण पणे कोणाच्या अधीन होत नाहीत.जसे चंदनाच्या मूळीला सर्प  वेढे घालून बसलेले असतात किवां पोटात असणाऱ्या गर्भाला वारेची गवसणी असते, तसे काम-क्रोध जीवात्म्याला ग्रासलेले असतात.  (ओवी २५१ ते २६० )

           जसा सुर्य कधी प्रकाशावाचुन नसतो, धुरावाचुन अग्नी असत नाही किवां आरसा धुळीच्या कणांवाचुन असु शकत नाही. ज्याप्रमाणे बी कोडयांने आच्छादलेले असते त्याप्रमाणे काम-क्रोधाशिवाय ज्ञान आम्ही कधी पाहिले नाही. वस्तुत: ज्ञान हे शुध्दच आहे परंतु या काम-क्रोधाने हे झाकले गेलेले आहे, म्हणुन ते प्राप्त होण्यास कठीण झाले आहे.प्रारंभी साधनेने काम-क्रोधांना जिकांवे, म्हणजे आत्माज्ञानाची प्राप्ती होते. परंतु सामान्य माणसाकडुन या काम-क्रोधाचा पराभव संभवत नाही. काम-क्रोधाला जिकंण्यासाठी अंगामध्ये बळ निर्माण केले, तर जेवढे अग्नीला इंधन पुरवावे ,तसे अग्नी अधिकच प्रज्वलित होतो, त्याप्रमाणे अंगातील बळ काम-क्रोधाला उलट सहकार्य करणारे होतात. अशा प्रकारे जे जे उपाय करावेत ते सर्व उपाय हया काम-क्रोधानाच सहाय्य करीत असतात म्हणुन या जगामध्ये ते हठयोग्यांना सुध्दा जिंकतात. या  काम-क्रोधांना जिंकणे अतिकठीण आहे असे बोलले जात असले तरी त्यांना जिंकण्यासाठी एक चांगला उपाय आहे तो पाय तुझ्याकडुन होईल तर तुला सांगतो.या  काम-क्रोधाचे वास्तव इंद्रियाच्या ठिकाणी आहे आणि इंद्रियापासुन कर्माची प्रवृत्ती होते, म्हणुन या इंद्रियावर विजय मिळव.असे झाले म्हणजे मनाची विषयांकडे धावण्यांची क्रिया बंद पडेल आणि बुध्दीतील सर्व प्रकारचे भ्रम नाहीसे होतील. यामुळे या पाप्यांचा आश्रय नाहीसा होईल. हे  काम-क्रोध अंत:करणातुन नष्ट झाले, तर ते नि:संशय गेले असे जाण. जसे सुर्यकिरणा शिवाय मृगजळ रहात नाही. तसे  काम-क्रोध जर नाहीसे झाले ,तर ब्रम्हरुपी स्वराज्याची प्राप्ती होते आणि तो पुरूष आपल्या शुध्द अंत:करणामुळे सुखाच्या राशीचा अनुभव स्वताच घेउ शकतो.हीच सदगुरू आणि शिष्याची गुप्त अशी गोष्ट आहे. हे जीव-ब्रम्हयाचे ऐक्य आहे त्या ठिकाणी स्थिर राहुन तो कधीही ढळत नाही. संजय म्हणाला, ” हे धृतराष्ट्रा राजा ऐक , असे सर्व सिध्दांचा राजा , देवी लक्ष्मीचा पती, देवांचा देव जो श्रीकृष्ण तो या प्रमाणे बोलला.” आता भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा सांगतील,ती कथा ऐकुन अर्जुन काही प्रश्न विचारील. या अनमाल बोलण्याची याग्यता त्यातील रसवृत्ती या सर्व कारणांनी श्रोत्यांना श्रवणसुखची समृध्दी होईल. निवृत्ती महाराजांचे शिष ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात.शुध्द बुध्दीने प्रतिमेचा चंद्र प्रकाशित करुन श्रीकृष्ण-अर्जुनाचा हा सुखसंवाद श्रवण करावा.

सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय भगवंताच्या कृपेने संपन्न !

( भगवदगीता श्लोक १ ते ४३ आणि मराठीत भा‌षांतरीत ज्ञानेश्वरी ओव्या २७६ )

पुढील अध्याय