अध्याय-४-भाग-३

        ज्या ठिकाणी कोणत्याही विचारांचा प्रवेश होत नाही कोणत्याही इच्छेचा स्पर्श होत नाही जे द्वैत दोषाच्या संगतीने कधीही लिप्त होत नाही. असे जे अनादिसिध्द, परिशुध्द आणि ज्ञानरूपी यज्ञामध्ये शिल्लक राहिलेले ब्रम्ह असते त्या ब्रम्हाचे ब्रम्हनिष्ठ लोक हे ‘अहं ब्रम्हास्मि’ म्हणजे मी ब्रम्ह आहे या मंत्राचे सेवन करतात म्हणजे ब्रम्हाशी एकरूप होतात. या प्रमाणे यज्ञाचे शिल्लक राहिलेले ज्ञानरूप अमृत प्राशन करून जे तृप्त होउन अमर होतात, ते सहजच ब्रम्हत्व पावतात.जन्माला येउन ज्यांना संयमरूपी अग्नीची उपासना घडत नाही आणि जे योग-यज्ञही करत नाहीत त्या लोकांना विरक्ती माळ घालत नाही. हे अर्जुना! ज्यांचे इहलोका मध्ये आचार, विचार, उच्चार सात्विक नाहीत त्यांना परलोक मिळेल काय? म्हणून त्यांच्याविषयी बोलणे नको.अशा प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले त्यांच्याबद्दल वेदांत उत्तम तऱ्हेने वर्णन केलेले आहे. परंतू त्या विस्ताराची आपणास काय आवश्यकता आहे? ते सर्व यज्ञ शरीर, मन व इंद्रिये यांच्या क्रियांनी उत्पन्न होतात. ते सर्व यज्ञ फलाच्या इच्छेने केल्यास बंधन प्राप्त होते. ते सुत्र जाणले की, कर्मबंधन प्राप्त होणार नाही. हे अर्जुना! ज्याचा मुळ आधार वेद आहे आणि कर्मे सांगितली आहेत  तसेच ज्यापासुन केवळ स्वर्गसुखाचे फळ प्राप्त होते ते द्रव्यादी यज्ञ आहे परंतु सूर्यापुढे जसे नक्षत्रांचे तेज लोपले जाते त्याप्रमाणे सर्व यज्ञ ज्ञानयज्ञाची बरोबरी करू शकत नाहीत परमात्म-सुखांचा ठेवा  प्राप्त करण्यासाठी साधक हे बुध्दीच्या डोळयामध्ये जे अंजन घालण्यास कधीही विसरत नाहीत. (ओवी १५१ ते १६० )

         ते ज्ञान चालू कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे जे कर्मातीत बोधाची खाण आहे.ज्याच्या  ठिकाणी प्रवृत्ती पांगळी होते तर्काची दृष्टी नाहीशी होते. ज्याच्या योगाने सर्व इंद्रिये विषयसंग विसरून जातात ज्या ठिकाणी मनाचे मनपण संपून जाते शब्दाची धाव थांबली जाते ज्यामध्ये जाणावयाची वस्तु ब्रम्ह हे प्रत्यक्ष अनूभवास येते. ते सर्वश्रेष्ठ ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावे असे मनात असेल तर संतांना सर्वभावाने भजावे ते संत म्हणजे ज्ञानाचे घर आहे आणि सेवा हा त्यांच्या घराचा उंबरठा आहे. हे अर्जुना! संतांची मनोभवे सेवा करून त्यांना आपलेसे कर. शरीराने, मनाने आणि जीवाने त्यांच्या चरणी लागावे सर्व प्रकारचा अभिमान सोडून त्यांचे दास्य करावे.ज्या आत्मज्ञाना संबंधी आपणास अपेक्षा असते, त्यासंबंधी आपण प्रश्न केला तर त्याचे उत्तर संत सागंतात ते ज्ञान आपल्या अंतकरणात बिबंले जाते आणि मनात संकल्‍प निर्माण होत नाहीत. संतांच्या उपदेशरूपी उजेडाने निर्भय झालेले चित्त ब्रम्हाप्रमाणे शंकारहित होईल त्या वेळी तन आपल्या सह ही सर्व भूते माझ्या स्वरुपात निरंतर पाहशील.  (ओवी १६१ ते १७० )

        हे पार्था ! अशा प्रकारे सदगुरूंची कृपा होईल त्या वेळी तुझ्या अंतकरणात ज्ञानप्रकाश उदयाला येईल आणि मोहरूप अंधकार नाहीसा होईल तु पातकाचे आगर, भ्रमाचा सागर किवां संशयाचा मोठा डोंगर जरी असलास तरी ज्ञानशक्तीच्या पुढे हे सर्व लहान आहे इतके या ज्ञानामध्ये सर्व दोषांचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे.निराकार परब्रम्हाची पडछाया म्हणून असणारा हा जो विश्वाचा पसारा तो ज्ञानाच्या प्रकाशाला पुरेसा पडत नाही म्हणजे ज्ञान झाले असता संपर्ण् विश्वभ्रम नाहीसा होउन जातो त्या दिव्य ज्ञानाच्या पुढे मनातील दोष घालविणे म्हणजे काय आहे? पण अशी तुलना करणेही योग्य नाही कारण या जगात याच्यासारखे महान असे दुसरे काही नाही. प्रलयकाळची वावटळ ही त्रैलोक्याची राख आकाशात उडवून देणारी असते तिच्यापुढे अभ्र काय बरे टिकणार आहेत ? अथवा वाऱ्याच्या क्षोभाने भडकला असता जो पाणीसुध्दा जाळून टाकतो तो प्रलयकाळचा अग्नी गवत आणि काष्ठे यांनी दडपला जाईल काय? ज्ञानासंबंधीचे हे बोलणे पुरे ! ज्ञानाने दोष नाहीसे  होतात अथवा नाहीसे होत नाहीत हा प्रश्नच निर्माण होत नाही ज्ञानाचा जो जो विचार करावा तो तो असे दिसुन येते की ज्ञानाच्या योग्यतेची परमपवित्र वस्तु दुसरी कोणतीही नाही. या जगात ज्ञान हे उत्तम आहे या ज्ञानाशिवाय जगात दुसरेही तसेच काय बरे उत्तम आहे ? जसे जगात एक चैतन्य आहे दुसरे काही नाही. सुर्याच्या कसोटीला लावुन पाहता त्याचे प्रतिबिबं जर तेजस्वी आहे असे दिसुन येईल किवां आकाशाला आपल्या कवळयात कवटाळता येउ शकेल.(ओवी १७१ ते १८०)

         किवां हे अर्जुना! पृथ्वीच्या तोलाचा दुसरा वजनदार पदार्थ जर मिळाला तर ज्ञानाला उपमा देणे शक्य आहे. म्हणुन अनेक प्रकारांनी विचार करून पाहिले असता ज्ञानाची पवित्रत ही ज्ञानाच्या ठिकाणीच आहे हे सिध्द होते अमृताची चव इतर रसांहुन निवडुन पाहिली असता ती अमृतासारखीच आहे असे म्हणावे लागते त्याप्रमाणे ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे भाग पडते आता यापेक्षा ज्ञानाचे अधिक महत्व सांगणे म्हणजे व्यर्थ वेळ घालविणे होय. असे श्रीकृष्ण म्हणाले त्या वेळी अर्जुन म्हणाला, आपले हे बोलणे खरे आहे. परंतु ते ज्ञान कसे जाणावे ? असे  अर्जुन विचारणार होता आणि ते त्याचे मनोगत देवाने जाणले देव म्हणाले आता मी सांगतो त्या गोष्टीकडे चित्त दे ज्ञानप्राप्तीचा उपाय मी तुला सांगणार आहे.एकदा का आत्मसुखाची गोडी निर्माण झाली की मन सर्व विषयांसंबंधी विटुन जाते आणि इंद्रियांचे महत्व राहत नाही. जो मनातील इच्छा इंद्रियांना सांगत नाही. प्रकृतीने केलेल्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही ज्याचे हदय श्रध्देने भरून गेलेले असते तो सुखी झालेला असतो ज्या ज्ञानात अखंड शांती असते ते ज्ञान त्याला शोधीत येउन निश्चीत प्राप्त होत असते ते ज्ञान हदयात स्थिर होते आणि त्यापासुन शांतीचा अंकुर उमलु लागतो मग आत्मज्ञानाची वेल मोठया प्रमाणात प्रगट होउ लागते. (ओवी १८१ ते १९०)

        मग जिकडे पाहात, तिकडे परम शांतीच शांती दिसू लागते आप पर भाव संपून जातो आणि विचार करूनदेखील शांतीचे पैलतीर समजु शकत नाही.असा हा उत्तरोत्तर वाढत राहणारा ज्ञानबीजाचा विस्तार आहे.त्याचे वर्णन करू लागलो तर तो अपार आहे परंतु हे सांगणे आता पुरे. हे बघ ज्या प्राण्याच्या अंतकरणात अध्यात्माची आवड नाही. त्याच्या जिवंत राहण्यात तरी काय अर्थ आहे? त्यापेक्षा मरण बरे.एखादे सामसूम घर किवां प्राणा वाचुन जसे शरीर त्याप्रमाणे आत्मज्ञान नसलेल्या माणसाचे जीवन भ्रममय असते.  आत्मज्ञानाची प्राप्ती झाली नसली तरीपण त्या ज्ञानाची मनात इच्छा जरी निर्माण झाली तरी ते ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते.उलट ज्ञानाची गोष्ट कशाला करायची? जो मनुष्य आत्मज्ञानाची इच्छादेखील बाळगत नाही तो संशयरूपी अग्नीमध्ये पडला असे समज. एखाद्या रोग्याला अमृतही आवडत नाही अशी अवस्था ज्या वेळी निर्माण होते त्या वेळी त्याला निश्चीत  मरण आले आहे असे समजावे. त्याप्रमाणे जो विषयसुखात रंगुन गेलेला असतो ऐहिक ज्ञानाने जो उन्मत्त असतो तो संशयाच्या चक्रात सापडला असे समजावे . त्याला ऐहिक व पारलौकिक सुख प्राप्त होत नाही. ज्या माणसाला विषमज्वर झालेला असतो त्याला शीत-उष्ण यातील फरक कळत नाही. तो अग्नी आणि चांदणे समान मानतो.  (ओवी १९१ ते २००)

         त्याप्रमाणे खरे आणि खोटे अनुकूल आणि प्रतिकुल हित आणि अहित हे काहीच संशयी माणूस जाणत नाही. जन्मापासुन आंधळा असलेल्या माणसाला ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस कळत नाही. त्याप्रमाणे संशयात अडकलेल्या माणसाच्या मनाला काही पटत नाही. म्हणून संशयासारखे मोठे दुसरे पाप नाही कारण हा संशय प्राण्यांना सर्व नाशाचे जाळे आहे.संशयाचा त्याग कर जेथे आत्मज्ञानाचा अभाव असतो तेथे संशय असतो प्रारंभी त्याला जिकांवे जेव्हा अज्ञानाचा गाढ अंधकार पसरलेला असतो तेव्हा हा संशय मनामध्ये वाढत जातो.म्हणन परमेश्वरा वरील परम श्रध्देचा माग बंद पडतो हा फक्त हदय व्यापुन राहतो. असे नाही तर तो बुध्दीलाही व्यापुन टाकतो त्या वेळी त्याला तिन्ही लोक संशयात्मक दिसू लागतात संशय एवढा जरी वाढला गेला तरी तो एका उपायाने जिंकला जातो उत्तम प्रकारचे ज्ञानखडग जर हाती असेल तर त्या तीक्ष्ण अशा ज्ञानखडगाने हा संशय संपूर्ण नाश पावतो. मग मनातील इतर दोषही नाहीसे होतात. याकरिता हदयात असलेल्या संशयाचा नाश करून हे बलशाली अर्जुना ! तू लवकर युध्दासाठी उठ. संजय धृतराष्ट्रास म्हणाला , राजा एैक सर्वज्ञाचे जनक , जे ज्ञानदीप भगवान श्रीकृष्ण ते अशा प्रकारे मोठया कृपेने  अर्जुनास म्हणाले, तेव्हा भगवान  श्रीकृष्णाच्या आताच्या व मागील बोललेल्या तत्वज्ञानाचा विचार करून अर्जुन  हा समयोचित प्रश्न विचारील.ती एकसंध कथा अनुभवाच्या संपत्तीने व रसाच्या उत्कर्षाने पुढे सांगण्यात  येईल ज्याच्या सात्विकपणा वरून विविध प्रकारच्या आठही रसांची ओवाळणी करावी आणि जो या जगतामध्ये सज्जनांच्या बुध्दीचे विश्रांतिस्थान होय.

         तो शांतरस पुढील कथेमध्ये नावीन्यपुर्ण भावाने प्रगट होईल. जे सागरापेक्षा गंभीर आणि अर्थपूर्ण आहेत असे मराठी बोल ऐका. जसे सूर्यबिंब आकाशात छोटे जरी दिसले तरी त्याच्या प्रकाशाला त्रैलोक्यदेखील अपुरे पडते. त्याप्रमाणे मराठी शब्दांची व्याप्ती महान आहे याचा अनुभव येईल किवा कल्पवृक्ष जसा माणसाच्या मनातील इच्छा पुर्ण करतो तसे हे बोल अंतिम सत्य जाणण्याची इच्छा पुर्ण करणारे आहेत यासाठी या शब्दांकडे लक्ष द्यावे. श्रोते हो! यासंबधी अधिक काय सांगावे ? आपण सर्वज्ञ आहात म्हणुन एकाग्रतेने लक्ष द्यावे ही माझी आज्ञा नसून विनंती आहे जशी एखादी स्त्री लावण्य, गुण आणि कुळ यांनी संपन्न व पतिव्रता असावी , त्याप्रमाणे या बोलण्याच्या पध्दतीमध्ये सर्व अलंकार व शांती भरलेली दिसेल आधीच साखर आवडते आणि तीच जर औषधाच्या रूपाने मिळाली तर ती आवडीने पुन पुन का सेवन करू नये ? मलय पर्वतावरील वारा सहजच मंद व सुगंधी असा वाहत असतो त्याला जर अमृताची गोडी प्राप्त झाली आणि त्या ठिकाणी जर सुमधूर स्वर दैवगतीने लाभला, तर तो वारा आपल्या शरीराला स्पर्शाने शांत करतो. गोडीने जिभेला संतोष लाभतो आणि सुमधूर स्वर श्रवण केल्यावर कानांकडून धन्य माझा बाप अशी वाहवा मिळवतो . त्याचप्रमाणे या गीताकथेच्या श्रवणाने होणार आहे.

          एक तर कानाचे पारणे फिटेल आणि दुसरे म्हणजे अनायसे संसारातील दुख पुर्णपणे नाहीसे होईल मंत्राने जर शत्रू मृत्यू पावत असेल तर कमरेला कटयारी का बरे बांधाव्यात? दुधाने व साखरेने रोग नाहीसा होत असेल तर कडूलिंबाचा रस का बरे घ्यावा ? त्याप्रमाणे मनाचा विरोध न करता , इंद्रियांना कोडून दुख न देता केवळ एकाग्रतेने श्रवण केल्यामुळे आयताच मोक्ष प्राप्त होतो. म्हणून उत्कंठतेने मन एकाग्र करून गीतेचा अर्थ श्रवण करावा, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात.

सर्वश्रेष्ठ ग्रथंराज सार्थ ज्ञानेश्वरी चौथा अध्याय भगवंताच्या कृपेने संपन्न !

( भगवदगीता श्लोक १ ते ४२ आणि मराठीत भा‌षांतरीत ज्ञानेश्वरी ओव्या २२५ )

पुढील  अध्याय