अध्याय-५-भाग-३

       ब्रम्हसुखचा अनुभव वेगळया पध्दतीने घ्यावा लागतो पक्षी ज्याप्रमाणे फळाला झोबंतो, तेव्हा भोक्ता, भोग्य आणि भोग ही त्रिपुटी ब्रम्हानंदात नाही कारण त्या अवस्थेमध्ये भोक्तेपणाही विसरावा लागतो. त्या भोगामध्ये वृत्तीची एक अशी स्थिती निर्माण होते कि ती अहंकाराचे वस्त्र दुर सारते आणि मग तो जीव ब्रम्हसुखाला दृढ आलिंगन देतो जसे पाण्यात पाणी टाकले असता ते वेगळे दिसत नाही. तसे त्या आलिंगनात, मिलनात आपलीच आपल्या स्वरूपाशी मिठी पडलेली असते. अथवा आकाशात वायुचा लय झाल्यानंतर आकाश व वायु हे दोन आहेत ही भेदाची भाषा संपुन जाते त्याप्रमाणे ऐक्य अवस्था आणि ब्रम्हसुख ही भेदाची भाषा संपुन फक्त आनंदच स्वरुपाने शिल्लक राहातो.
अशी भेदाची भाषा संपुन जाते आणि मग ऐक्य होते त्या वेळी एकत्वाला जाणणारा दुसरा साक्षी तरी कोण आहे ? म्हणुन हे सर्व बोलणे असु द्या जो प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे त्याबद्दल शब्दांनी काय बरे बोलावे ? आत्मस्वरुपाचे ठिकाणी जे ऐक्य पावलेले ब्रम्हनिष्ठ पुरूष आहेत ते या सुक्ष्म विचारातील वर्म सहज जाणतील.जे अशा सुखाने परिपुर्ण संपन्न झाले आहेत जे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी रममाण झालेले आहेत ते पुर्णपणे साम्यरसाचे ओतलेले पुतळे आहेत असे मी समजतो ते ब्रम्हनिष्ठ पुरूष आंनदाचे प्रतिबिबं आहेत सुखाचे अंकुर आहेत किवां त्यांच्या रुपाने महाबोधाने जणू क्रीडा केलेली आहे ते विवेकाचे संपूर्ण गाव आहे, किवां परब्रम्हम्याच्या ठिकाणचे स्वभाव अथवा ब्रम्हविद्येचे सुशोभित केलेले अवयव ओत ते सत्वगुणातला मुर्तिमंत सात्विकपणा आहेत ते चैतन्याच्या शरीराची बांधेसूद ठेवण आहेत यावर सदगुरु निवृत्तीनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार असु दे. ब्रम्हनिष्ठ पुरूषाची एक-एक लक्षणे किती म्हणुन वर्णन करणार आहेस. (ओवी १३१ ते १४०)

        तु जेव्हा संतांची स्तुती करण्यामध्ये रंगुन जातोस त्या वेळी तुला मूळ कथेची आठवण राहत नाही कारण तू निराकार स्वरुपांसंबंधी प्रेमळ आणि रसाळ भाषा बोलत राहतोस. परंतु आता रसाचा अधिक झालेला विस्तार कमी कर मग गीताग्रंथाच्या अर्थाचा दीप प्रज्वलित कर आणि सतपुरूषांच्या हदयरूपी राउळात मंगलतेची पहाट निर्माण कर. हे  सदगुरु निवृत्तीनाथांचे विचार ज्ञानेश्वरांनी मानले मग  ज्ञानेश्वर म्हणाले, ते श्रीकृष्ण काय बोलले ते आता ऐका. हे अर्जुना! अनंत सुखाच्या डोहात उडी मारून एकदम तळ गाठला.

         ते तेथेच स्थिर होउन आत्मस्वरुप बनले हदयामध्ये शुध्द आत्मप्रकाश पसरला, की संपुर्ण विश्व आपलेच स्वरुप आहे असे जो पाहत असतो तो देहासह परब्रम्ह झाला असे सहज मानता येईल जे खरोखरच परमश्रेष्ठ अथवा अविनाशी व अमर्याद असे ब्रम्हसुख, त्याचे अधिकारी निरिच्छ होतात. जे सुख महर्षीकरिता राखुन ठेवले आहे ते विरक्तांच्या वाटयाला आले व ते सदैव संशयरहित सर्व काळ टिकले आहे.ज्याने आपले चित्त विषयांपासुन हिरावुन घेतले आहे आणि आपल्या स्वाधीन करून ठेवले आहे असे  पुरूष निश्चयाने त्या स्वरुपात लिन झाले असता पुन: पूर्ववत्तीवर येत नाहीत हे पांडुकुमरा! आत्मज्ञानाचे फल असे ते मोक्षरुप परब्रम्ह आहे आत्मज्ञानी पुरूष‍ ते परब्रम्हच होतात असे तु जाण.

       जे पुरूष देह असताना ब्रम्हत्वास कशाने पावेल हे जर विचारीत असशील तर उत्तमच आहे तुला ती साधने सक्षेपाने सांगतो. (ओवी १४१ ते १५०) ज्यांनी वैराग्याच्या आधाराने सर्व विषयांना मनातुन बाहेर घालविले आणि मन अंतर्मुख केले त्यांचा प्राण इडा-पिगंला सोडुन सुष्मनेमध्ये नेला जातो आणि स्वरुपामध्ये दृष्टी मागे वळवुन स्थिर केली जाते. उजव्या  म्हणजे पिगंला आणि डाव्या म्हणजे इडा नाकपुडीतुन वात असलेल्या वायुची गती म्हणजे रेचक-पुरक बंद करुन कुंभक करुन प्राण व अपान यांची सुषुम्नेत समगती म्हणजे ऐक्य करुन चित्तास ते व्योमगामी म्हणजे मुर्ध्याकाशाकडे जाणारे करतात.

         जसे गंगा नदी ही रस्त्यातुन वाहणारे सर्व पाणी आपल्यामध्ये सामावुन घेवुन सागराला मिळते. तेव्हा त्या सागरामध्ये रस्त्यावरचे  अशुध्द पाणी आणि हे गंगेचे शुध्द पाणी असा भेद करता येत नाही. त्याप्रमाणे हे अर्जुना! ज्यावेळी मनाचा प्राण-अपानाच्या निरोधाने मूर्ध्नी-आकाशात लय केला जातो त्या वेळी वैषयिक वासनांची विचारचक्रे आपोआप बंद पडतात. ज्या मनोरुप पटावरती संसाररुपी अनेक प्रकारची चित्रे उमटत असतात तो पटच फाटून जातो ज्याप्रमाणे सरोवर आटल्यावर त्यात प्रतिबिबं दिसत नाही. ज्याप्रमाणे मनाचा मनपणाच आहीसा झला तर तेथे कोणज्याही प्रकारचे  अहंभाव, भ्रम वगैरे कसे शिल्लक राहतील ? म्हणून तो अनुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रम्हरूप होतो.

       जे पुरूष देहधारी असतानाच ब्रम्ह्रस्वरुपाला प्राप्त झाले ते हया योगमार्गाने आले, म्हणुन आम्ही याआधी मार्गविषयक निरूपण केले आहे. ते पुरूष यम, नियम यांचे पर्वत ओलांडून आणि योग-अभ्यासाचा सागर ओलाडुंन मोक्षाला प्राप्त झालेले असतात. त्यांनी आपले अतं:करण पुर्ण शुध्द करुन प्रपंचाला जाणुन घेतलेले असते आणि विश्वाचे सत्य अधिष्ठान जे परब्रम्ह त्याच्याशी ते एकरूप होउन राहीलेले असतात. (ओवी १५१ ते १६०)

        याप्रमाणे जेव्हा श्रीकृष्णांनी योगमुक्तीचा अभिप्राय सांगितला, तेव्हा मर्मज्ञ अर्जुन आश्चर्यचकित झाला. श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनाची अवस्था जाणली व मग ते हसुन अर्जुनास म्हणाले माझे हे बोलणे ऐकुन तुझे चित्त प्रसन्न झाले का ? तेव्हा अर्जुन म्हणाला हे देवा ! मी काही चितंन करुन तुम्हाला विचारावे ते तुम्ही आधीच जाणलेले आहे, तरी आता आपण मागे जे योगासंबंधी सांगितले तेच आता आधिक स्पष्ट करुन सांगावे एरवी सुध्दा असा विचार करा कि, तुम्ही जात योगशास्त्राचा मार्ग सांगितला तो पोहुन जाण्यापेक्षा पायउताराने जाणे जसे सोपे असते. तसा हा अष्टांगयोग सांख्ययोगा पेक्षा सोपा आहे पंरतु आमच्या सारख्या दुर्बलांना  तो राजयोग समजण्यास काही काळ विलंब लागेल.

       पण तो विलंब सहन करता येईल. म्हणुन हे देवा !  एक वेळ त्या अष्टांगयोगाचा अनुवाद करावा जरी त्याचा विस्तार झाला तरी चालेल परंतु तो यागमार्ग आरंभापासुन शेवटपर्यत सांगावा तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले असे   का ? तुला योगमार्ग उत्तम प्रकारे आवडला असे दिसते तर मग आम्ही  न सांगण्यास काय  झाले ? तो राजमार्ग आम्ही आनंदाने सांगू तरी तु एकाग्रतेने श्रवण कर, हे अर्जुना! तु ऐकतोस आणि त्याप्रमाणे आचरण करतोस असे असताना आम्ही तुला सांगण्याची कमतरता का बरे करावी ? आधीच मातेचे चित्त आणि त्यात आवडत्या लेकराचे निमित्त झाले तर मग त्या ठिकाणचा प्रेमाचा अदभुतपणा कोण जाणतील ?           (ओवी १६१ ते १७०)

      त्या अदभुत प्रेमाला कारुण्यरूपी जलाचा वर्षाव म्हणता येईल अथवा नुतन प्रेमाची सृष्टी म्हणता येईल परंतु हे असो, श्रीकृष्णाच्या कृपादृष्टीचे वर्णन कोणत्या शब्दांत करावे हे कळत नाही. ही कृपादृष्टी अमृताच्या मुशीत ओतली अथवा प्रेम पिउन मस्त झाली होती, म्हणुन अर्जुना विषयांच्या मोहामध्ये गुंतला असुन तिला बाहेर येता येईना.या कृपादृष्टी विषयी जास्त बोलावे तर कथेचे विषयांतर होईल  श्रीकृष्ण आणि अर्जुन याच्यां अलौकिक प्रेमाचे वर्णन शब्दांनी करता येणार नाही. म्हणुन हा विचार का बरे करावा ? जो ईश्वर आपल्या अनंत स्वरुपाचे मोजमाप आपणच करु शकत नाही तो ईश्वर कोणी बरे आकलन करावा? तरी मागे सांगितलेल्या अभिप्रायावरुन मला वाटते कि श्रीकृष्ण सहज मोहित होउन बलात्काराने अर्जुनास असे म्हणाले की, अरे बाबा ! मी सांगतो ते ऐक,

        हे अर्जुना ! ज्याप्रकाराने तुझ्या चित्ताला पटेल , त्या त्या प्रकाराने तुला कौतुकाने सोप्या मनोरंजन भाषेत सांगेन.तो योग कशाला म्हणतात ? त्या योगाचा उपयोग काय ? आणि त्याचां अधिकार कोणाला प्राप्त होतो ? असे जे योगशास्त्रा संबंधाचे सांगणे आवश्यक आहे ते आता की तुला सांगणार आहे. ते तु एकाग्र चित्ताने श्रवण कर असे म्हणुन श्रीहरी जी कथा सांगणार आहेत ती पुढील अध्यायामध्ये आहे. द्वैत न मोडता श्रीकृष्णाने अर्जुनाला जो राजयोग सांगितला, तो प्रसंग आम्ही स्पष्ट करुन सांगतो. असे सदगुरु निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणाले.      (ओवी १७१ ते १८०)

सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरीचा पाचवा अध्याय भगवंताच्या कृपेने संपन्न!

( भगवदगीता श्लोक १ ते २९ आणि मराठीत भा‌षांतरीत ज्ञानेश्वरी ओव्या १८० )

पुढील अध्याय