अध्याय-६-भाग-४

        अशा प्रकाराने शरीराच्या बाहेर योग-अभ्यासाची छाया पसरते त्यावेळी आतील मनाच्या चंचलतेच्या संस्काराचा जोर नाहीसा होतो.कल्पना नाहीशी होउन जाते बाहय विषयाकडे धावणाऱ्या मनाची हाव थांबते आणि शरीर आणि मन सहजच शांत होते भुकेचे काय झाले? झोप कोठे निघुन गेली? याची आठवण देखील नाहीशी होवून जाते. त्याचा वेग दिसत देखील नाही. मूळबंधाने कोंडलेला अपानवायू उर्ध्व गतीने माघारी फिरतो आणि सहजच अवघडलेला होउन वर फुगू लागतो. तो अपानवायू क्षोभून बलशाली होतों आणि अडकलेल्या ठिकाणी मोठयाने आवाज करतो तेथेच राहुन तो मनिपुर चक्राला धक्के देतो.

       अशा तऱ्हेने बळावलेली वावटळ पोटात चोहोकडे फिरून ढवळाढवळ करते आणि बालपणापासुन शरीरात साचलेली कुजकी घाण बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते त्या अपानवायूला आत वळण घेण्यास कोठे जागा नसल्यामुळे तो कोठयात शिरतो आणि वात पित्त यांचा थारा राहु देत नाही तो वायु सप्त धातुंची स्थाने ओलांडतो, मेदाचे पर्वत फोडून टाकतो आणि  देहामध्ये हाडांत असलेली मज्जा ओरपुन बाहेर काढतो. तो नाडयांच्या गाठी सोडवुन टाकतो, अवयव शिथिल करतो आणि साधकाला भीती दाखवतो. परंतु साधकाने भिउ नये, तो वायु शरीरात अचानक रोग निर्माण करतो आणि ताबडतोब नाहीसा करतो शरीरातील पृथ्वी व पाण्याचे अंश एकमेकांत कालवितो. (ओवी २११ ते २२०)

        हे अर्जुना! त्यावेळी दुसरीकडे वज्रासनामुळे निर्माण झालेली शरीरातील उष्णता ही कुंडलिनी नावाच्या प्राणशक्तीला जागृत करते. नागिनीच्या पिलाला कुंकवाने स्नान घातल्यावर ते ज्याप्रमाणे वेटोळे घालुन निजते. त्याप्रमाणे ती कुंडलिनी लहानसे साडेतीन वेढे घालुन खाली तोंड करुन सर्पाप्रमाणे झोपी गेलेली असते ती कुंडलिनी म्हणजे जणु काय विजेची वाटोळी कडी, अग्नीच्या ज्वालांची घडी अथवा शुध्द सोन्याची आटवुन तयार केलेली चकचकीत लगड होय. त्याप्रमाणे ती पध्दतशीर संकुचित झालेली नाभी जवळच्या संकुचित जागेत दाटुन बसलेली असते ती व्रजासनामुळे चिमटली जाते आणि जागृत होते.

          त्यावेळी नक्षत्र तुटून पडते वेळी जसे तेजस्वी दिसते अथवा सुर्याने आपले आसन सोडुन खाली यावे अथवा तेजाने वीज अंकुरासह विकसित व्हावे त्याप्रमाणे ती कुंडलिनी शक्ती आपले वेटोळे सोडीत लीलेने अंग मोडीत नाभिस्थाना जवळील स्वाधिष्ठान चक्रावर उठलेली दिसते, सहजच तिला अनेक दिवसांची आणि तशातच वज्रासनाच्या उष्णतेने जागृत केलेली भुक हे एक कारण होते, त्यामुळे ती कुंडलिनी शक्ती आवेशाने सरळच वर तोंड पसरते. अर्जुना! तेव्हा हदयकमळाच्या खाली जो अपान वायु भरलेला असतो त्या वायुच्या सर्वागांला मिठी मारुन पोटात घालते. मुखातील ज्वालेने खालचा-वरचा भाग व्यापते आणि मांसाचे घास खाउ लागते.       (ओवी २२१ ते २३०)

        ज्या ज्या ठिकाणी मांसल भाग असेल, त्यात्या ठिकाणचा घास तिला वरवरच मिळतो आणि नंतर ती राहिलेल्या भागाचेही घास खाउ लागते. मग पायाचे तळवे आणि तळहात यांचा ती शोध घेते. तेथील मांसल भाग खावुन प्रत्ये‍क अंगाच्या सांध्याचा झाडा घेते.ती शक्ती आपली मूळ जागा न सोडता तेथेच राहुन नखांतले सत्वदेखील बाहेर काढते त्वचा धुवुन हाडांच्या सापळयाशी चिकटवुन देते हाडांचे नळे निरपुन घेते शिरांच्या काडयांना ओरपुन काढते तेव्हा बाहेरच्या केसांच्या मुळांची वाढ करपुन जाते. तहानेने व्याकुळ झालेली ती शक्ती रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र या सात धातुंच्या समुद्रात येवुन एका घोटात तो पिवुन टाकते.

          त्यामुळे सर्व शरीर खडखडीत कोरडे होउन जाते दोन्ही नाकपुडयातुन बाहेर जो बारा बोटे लांब  वारा वाहत असतो त्याला गच्च धरुन पुन: आत घालते त्या वेळी खालचा अपानवायु वर आकुंचित होतो आणि वरचा प्राणवायु खाली जातो. त्या प्राण-अपानवायुच्या भेटीमध्ये षटचक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात. प्राण व अपान वायु हे दोन्ही त्याच  वेळेस एके ठिकाणी मिळाले असते परंतु ती कुंडलिनी शक्ती क्षणभर तेथे क्षोभलेली असते म्हणून ती त्यांना म्हणते तुम्ही माघारे जा, तुमचे काय काम आहे? अर्जुना ! ऐक. पृथ्वीपासुन निर्माण झालेले शरीरातील जे धातु आहेत ते खावुन ती शक्ती काहीही शिल्लक ठेवत नपही आणि पाण्याचा भाग तर चाटुन पार पुसून टाकते.याप्रमाणे शरीरातील पृथ्वी आणि जल ही दोन्ही भुते ज्यावेळी ती खाते, त्यावेळी ती पुर्णपणे तृप्त होते.मग सौम्य बनते. आणि सुषम्नेजवळ स्थिर होते.         (ओवी २३१ ते २४०)

         त्या वेळी तृप्त होउन ती संतोषाने तोंडाने गरळ ओ‍कते ते गरळ अमृत होउन त्यामुळेच प्राण जगत असतो. शक्तीच्या तोंडातुन तो गरळरुपी अग्नी बाहेर निघतो आणि शरीराला आतुन-बाहेरुन शांत करु लागतो. त्यावेळी शरीराच्या गात्रांची गेलेल शक्ती पुन: येउ लागते नाडीची गती बंद पडते शरीरातील अपान,व्यान, उदान, समान, नाग, कुर्म, कुक्कल, देवदत्त आणि धंनजय हे नउ प्रकारचे वायु नष्ट होतात त्यामुळे तहान-भुक वगैरे शरीराचे धर्म नाहीसे होतात. इडा आणि पिंगळा या दोन नाडया एक होतात. हदयस्थानाची ब्रम्हग्रंथी, कंठस्थानाची विष्णुग्रंथी आणि भ्रुमध्यस्थानी असलेली रुद्रग्रंथी या तीन गाठी सुटतात. तसेच मुलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत, विशुध्दी आणि आज्ञा या चक्रांचे पदर वेगवेगळे होतात.

        डाव्या नाकपुडीतुन वाहणाऱ्या वायुला चंद्र असे म्हणतात आणि उजव्या नाकपुडीतुन वाहणाऱ्या वायुला सुर्य असे म्हणतात, अशा अनुमानिक कल्पनेने ठरविलेले दोन प्रकारचे वायु नाकापुढे कापसाची वात धरुन पाहिले तरी ते सापडत नाहीत. बुध्दीची ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती विरुन जाते. नाकामध्ये गंध घेण्याची जी शक्ती असते ती  कुंडलिनी शक्ती बरोबर सुषम्नेमध्ये प्रवेश करते त्या वेळी वरच्या बाजुस असलेले चंद्रामृताचे तळे हळुहळू कलते होते आणि ते चंद्रामृत कुंडलिनी शक्तीच्या मुखात पडते. त्यामुळे शक्तीरुपी नळीत अमृतरस भरुन जातो आणि तो रस सर्वागांमध्ये पसरत राहतो प्राणवायु जिथल्या तिथेच लय पावतो. तापलेला रस मुशीमध्ये ओतला म्हणजे मुस देखील तप्त होते आणि आतील  मेण आपोआप निघुन जाते. मग ती मुस ओतलेल्या रसानेच भरलेली राहते त्याप्रमाणे ते शरीर एवढे तेजयुक्त दिसते की, जणु काही त्वचेचे पदर पांघरलेले मूर्तिमंत तेजच प्रगट झालेले आहे. (ओवी २४१ ते २५०)

        सुर्यासमोर ढगांचे आवरण आले असता त्याचे तेज झाकलेले असते आणि ढग दर गेल्यावा सुर्याला आपला प्रकाश आवरून धरता येत नाही, त्याप्रमाणे शरीरावर त्वचेचा जो कोरडा पापुद्रा असतो तो धान्यावरील कोडयाप्रमाणे निघुन जातो मग स्फटिकाचे मुर्तिमंत स्वयंभू लिंग जसे असावे अथवा रत्नरुप बीजाला जणु अंकुर निघावा त्याप्रमाणे त्या अवयवांच्या तेजाची शोभा दिसते, अथवा संध्याकाळी आकाशात पसरलेले रंगं काढुन जणु ते शरीर बनविले आहे किवां देहातील आत्मज्योतीचे तेजस्वी शिवलिगंच ! केशराने पुर्ण भरलेला आकार अथवा शरीररुपी मुशीत अमृत ओतुन झालेला आकार अथवा मला असे जाणवते की देहाच्या रुपाने मोक्षरुपी शांतीच सर्व अवयवांसह प्रगट झाली आहे योग्याचे शरीर म्हणजे जणु आनंदरुपी चित्रातला रंग अथवा महासुखाचे रुप अथवा संतोषरूपी वृक्षाचे जणु विकसित झालेले रोप होय.

          तो देह म्हणजे जणु सोनचाफयाची मोठी कळी अमृताचा पुतळा अथवा कोवळिकतेचा बहरुन आलेला मळा होय.अथवा शरद ऋुतूतील पोर्णिमेच्या ओलाव्याने प्रफुल्लित झालेले चंद्रबिबंच किवां आसनावर विराजमान झालेले तेजच होय.ज्यावेळी कुंडलिनी शक्ती चंद्रामृत प्राशान करते त्यावेळी शरीर असे तेजमय होते अशा देहाला पाहुन यमदेखील घाबरतो वार्ध्यक्य तर संपुन जाते तारुण्य नाहीसे होते आणि नाहीसे झालेले रसरशीत बालपण प्रगट होते. (ओवी २५१ ते २६०)  येऱ्हवी वयाने तो एवढासा दिसतो परंतु त्याचा पराक्रम नित्यनुतन कळी यावी, त्याप्रमाणे योगी पुरूषाला नवी उत्तम नखे येतात. दुसरे नवीन दातही येतात, परंतु ते फार छोटे असतात जणु काही दोन्ही बाजुंनी हिऱ्यांची पंगत बसली आहे, ज्याप्रमाणे माणिकाचे बारीक कण असावेत आणि ते अणुएवढे असावेत.त्याप्रमाणे सर्व शरीरावर रोमांचाची टोके वर येतात.हाताचे आणि पायाचे तळवे लाल कमळाप्रमाणे लालसर आणि नाजुक होतात डोळे किती स्वच्छ होतात हे काय सांगू? मोत्ये मोठी होउन दाटल्यामुळे लहान शिंपीत मावत नाहीत,म्हणुन जसा शिंपीच्या दोन भागांचा सांधा उकलतो त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या पात्यात माव‍त नाही, आणि त्या पात्यांना व्यापुन बाहेर निघावयास पाहते.

        दृष्टी पुर्वीचीच असते परंतु आकाश व्यापणारी होते. अर्जुना!  ऐक त्या योगी पुरूषाचा देह सोन्यासमान कांतीमय होतो. परंतु देह वायुसमान हलका होतो कारण त्यातील पृथ्वीचे व पाण्याचे अंश नाहीसे झालेले असतात. मग तो योगी पुरूष एका जागेवर बसुन समुद्राच्या पलिकडचे पाहतो स्वर्गातील शब्द ऐकतो आणि मुंगीच्या मनातील भाव जाणतो.तो वायुरूप घोडयावर बसुन फिरतो पाण्यावरुन चालला तरी त्याच्या पायांना पाणी स्पर्श करु शकत नाही, अशा प्रकारे प्रसंगाप्रमाणे त्याला अनेक सिध्दी प्राप्त होतात.  (ओवी २६१ ते २७०)   अर्जुना !  ऐक जी प्राणाचा हात धरुन हदय-आकाशाच्या पायऱ्या करुन सुषुम्नेच्या जिन्याने हदयात आली ती कुंडलिनी संपुर्ण जगताची आई आहे. जी ब्रम्हचैतन्यरुप सार्वभौम राजाची शोभा आहे, जिने विश्वाच्या बीजाच्या कोभांला शीतल सावली केली आहे जी निराकार ब्रम्हाची साकार अशी मुर्ति आहे जी परमात्मा शिव ठेवण्याची करंडी , जी ओमकाराची प्रत्यक्ष जन्मभुमी आहे हे असो ती कुंडलिनी अनाहत चक्रात आल्यानंतर तेथे अनाहत नाद सुरू होतो.

          कुंडलिनीला चिकटून राहीलेले  जे बुध्दीचे ज्ञानरुप चैतन्य त्या साक्षिचैतन्यानेच तो अनाहत शब्द किंचीत ऐकलेला असतो.घोषाच्या कुडीत ध्वनी व नादरुपी ओमकाराच्या आकाराची अनेक रूपे उमटतात याची कल्पना केली तर अनाहत नादाचे स्वरुप जाणले जाते कारण या अवस्थेत कल्पना करणारे मन तरी कोठुन आणावे ? अनाहत चक्राच्या ठिकाणी कशाची गर्जना होते हे योगी पुरूषाशिवाय इतरांना कळत नाही. हे अर्जुना ! एक गोष्ट सांगावयाची राहुन गेली जो पर्यत हदय-आकाशातील प्राणाचा नाश होत नाही तोपर्यत नाद असतो म्हणुन तो आकाशात घुमत असतो त्या अनाहतरुपी मेघगर्जनेने हदय-आकाश दुमदुमू लागते तेव्हा ते ब्रम्हस्थानाचे द्वार सहजच उघडले जाते.  अर्जुना! ऐक, त्या ठिकाणी कमळगर्भाच्या आकाराचे जे दुसरे महदाकाश आहे, ज्या ठिकाणी जीवचैतन्य सुखासाठी अतृप्त होउन राहीलेले असते. (ओवी २७१ ते २८०)

          त्या हदयाच्या गुप्त स्थानी म्हणजे हदयाकाशाच्या वर असलेल्या ब्रम्हरंध्रात कुंडलिनी परमेश्वरीने जीवचैतन्याला तेजांची शिदोरी अर्पण केलेली असते. द्वैत ज्याला पाहणार नाही असा बुध्दीच्या भाजीसह हातात घेतलेला उत्तम प्रकारचा नैवेद्य अर्पण केला अशा प्रकारे तिने आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलिनी केवळ प्राणवायुरुपच झालेली असते त्यावेळी ती कशी दिसते म्हणाल, तर जणु काही ती वाऱ्याची पुतळी असावी व तिने सोनसळा नेसलेला असावा आणि नंतर तिने वस्त्र सोडुन ठेवावे किवां वाऱ्याची झुळूक लागुन दिव्याचा प्रकाश एकदम नाहीसा व्हावा अथवा आकाशामध्ये वीज चमकून ती अदृश्य व्हावी त्याप्रमाणे ती कुंडलिनी हदयकमला पर्यत जणु काही सोन्याची सरी अथवा प्रकाशरुपी पाण्याचा झरा जसा वाहत आलेला असतो. त्याप्रमाणे मग त्या कुंडलिनीचा प्रकाशरुपी झरा,त्या पोकळ हदयरुपी जमिनीमध्ये एकदम जिरुन जातो,त्याप्रमाणे शक्तीचे रुप, शक्तीमधेच लय पावते अशी स्थिती झाल्यानंतर तिला शक्ती असेच म्हणतात परंतु वास्तविक तो प्राणच आहे असे जाण परंतु त्या वेळेस त्याला नाद, बिंदु, कला ज्योती असे चारी धर्म नसतात त्या अवस्थेत मनाचा निग्रह, प्राणाचा निरोध, ध्यानाचा प्रयत्न हे काही प्रकार तेथे राहत नाहीत, प्रारंभीच्या काळामध्ये अमुक घ्यावे, अमुक टाकावे हा जो संकल्प असतो तो त्या वेळी त्या अवस्थेत राहत नाही, त्या अवस्थेमध्ये पंचमहाभुतांची पुर्ण आटणी झालेली असते.(ओवी २८१ ते २९०)

पुढील भाग