अध्याय-८-भाग-१

ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी

सार्थ भगवदगीता अध्याय –  ८

अक्षरब्रम्ह योग

श्री ज्ञानदेवांनी भगवदगीतेतील अध्याय  मधीलअक्षरब्रम्ह योगया अध्यायातील ते २८ संस्कृत श्लोकांचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन २७१ ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे. परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही अवघड वाटू लागली. श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहेहा श्री ज्ञानदेवांचा अमुल्य  कृपाप्रसाद आहे, मनुष्य जीवन जगण्यासाठी अनमोल संजीवनी आहे, किंबहुना संसारसागर पार करण्यासाठी अध्यात्मातील नौका आहे, तिच्या मदतीने संसार करता सावरता आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनसागरातुन तरुन जावे आणि आपल्या जीवनाचे कोटकल्याण साधावे. ही ज्ञानदेवांची  “अक्षरब्रम्ह ज्ञानेश्वरीआत्मसाद करुन जीवनाचे  सार्थक करावे.

       पुढे अर्जुन म्हणाला, “अहो महाराज ! आपण ऐकले काय? जे मी विचारले आहे त्याचे निरूपण कृपया आपण करावे, ब्रम्ह म्हणजे काय? कशाचे नाव कर्म आहे, आणि अध्यात्म ज्याला म्हणतात ते काय आहे? हे सांगावे अधिभूत म्हणतात ते कसे आहे ? या विश्वात अधिदैवत कोण आहे? हे मला स्पष्टपणे समजु शकेल अशा पध्दतीने सांगावे. देवा !‍अधियज्ञ तो काय आहे ?  या देहात तो कोण आहे ? या गोष्टी अनुमानाने म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने सिध्द होत नाहीत आणि अंत:करण स्वाधीन केलेल्या पुरूषाकडुन देहावसानाचे वेळी तु कसा जाणला जातोस ? हे शारंगपाणी ! ते जाणणे कसे घडते हे मला ऐकवा”  ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रोतेहो हे पहा, एखादा भाग्यवान मनुष्य चितांमणीच्या घरकुलात झोपी गेला असता त्याचा बरळण्याचाही शब्द वाया जाणार नाही, त्याचप्रमाणे अर्जुनाच्या मुखातुन जी वाक्ये प्रगट झाली त्याच वेळी देव म्हणाले, अर्जुना ! तु काही विचारलेस त्याचे उत्तर श्रवण कर. अर्जुन हा जणू काही कामधेनुचा बछडा आहे आणि तो कल्पतरुच्या मांडवाखाली बसला आहे म्हणुन त्याने आपले मनोरथ पुर्ण व्हावे अशी इच्छा केलीतर त्यात आश्चर्य नाही, श्रीकृष्ण रागावुन ज्याला मारतात जर तो ब्रम्हस्वरुपाला प्राप्त होतो तर मग श्रीकृष्ण कृपादृष्टीने ज्याला उपदेश करतील त्याला काय बरे प्राप्त होणार नाही. ज्या वेळी आपण  श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होवु त्या वेळी आपले अंत:करण कृष्णरुप बनते आणि संकल्परुपी अंगणात ऋध्दि-सिध्दी प्रगट होवुन आपली सेवा करु लागतात. (ओवी १ ते १० )

             असे निस्सीम प्रेम अर्जुनाच्या हदयी अमर्याद आहे  म्हणुन त्याची मनोकामना नेहमी सफल होते या कारणाने अर्जुन आपल्याला ही गोष्ट विचारील असे त्याच्या मनातील विचार श्रीकृष्णाने आधीच ओळखले आणि त्याच्यापुढे ब्रम्हज्ञानरुपी पक्वान्नाचे ताट आयते वाढुन ठेवले कारण की स्तनपान केल्यानंतर दुर झालेल्या मुलाची भुक मातेलाच लागते येऱ्हवी ते लहान बाळ आईला भूक लागली म्हणुन स्वता सांगते काय? म्हणुन कृपाळू गुरूमाउलीच्या ठिेकाणी ब्रम्हामृत पाजण्याची जी प्रकृती दिसते त्यासंबंधी काही आश्चर्य नाही परंतु आता हे वर्णन असो, देव म्हणाले याचे आता श्रवण करा. मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले जे या फुटक्या नाशवंत देहादी आकारात दाटपणे ओतप्रोत भरलेले असुनही कोणत्याही भूत, भविष्य, वर्तमानकाळात गळत नाही, एऱ्हवी त्याचा सूक्ष्मपणा पाहु लागलो तर ते शुन्यच आहे असे वाटते परंतु ते स्वभावाने शुन्य नाही तर सत-चित-आनंदस्वरुप आहे. ते इतके सुक्ष्म आहे की जणू सुक्ष्म आकाशाच्या पदरातून गाळुन घेतले आहे. ते असे अत्यंत सुक्ष्म रुप आहे देहाची शिरशिररीत पिशवी हालविली तरीपण जे त्यामधुन गळत नाही ते परब्रम्ह होय. आणि देहादी आकाराचा जन्म झाल्याने जे जन्माच  विकार जाणत नाही आणि आकाराचा लोप झाला तरी ज्याचा कधीही नाश होत नाही. हे सुभद्रापती याप्रमाणे आपल्या सहज स्थितीत असणारे ज्याला ब्रम्हासारखी नित्यता आहे अशा साक्षिचैतन्याला अध्यात्म म्हणतात. ज्याप्रमाणे निर्मळ असणाऱ्या आकाशाच्या प्रांगणात रंगी बेरंगी मेघांची पटले एकदम कशी स्पष्टपणे दिसु लागतात ते कळत नाही.(ओवी ११  ते २० )

           त्याप्रमाणे त्या परिशुध्द व निराकार अशा ब्रम्हाचे ठिकाणी महदतत्व वगैरे भुतभेदाने ब्रम्हाडांचे आकार निर्माण होवु लागतात ब्रम्हरुपी बरड जमिनिवर मुळ संकल्परुपी अंकुर फुटतो आणि त्याचबरोबर ब्रम्हगोलाचे आकार बहरु लागतात त्या एक-एक ब्रम्हांडाच्या आत पाहिले तर ते ब्रम्हांड बीजांनीच म्हणजे मुळ संकल्पांनीच भरलेले दिसते आणि त्या प्रत्येक अंशा पासुन अगणित आदिसंकल्प उत्पन्न होतात हे असो याप्रमाणे सृष्टीचा मोठा विस्तार वाढतो परंतु त्यात दुसऱ्या कोणाशिवाय एक परमात्माच सर्वत्र भरलेला आहे त्याच्या ठिकाणी जणू काही अनेकत्वाचा पुर आला आहे याप्रमाणे त्या ब्रम्हयाच्या ठिकाणी सम-विषमत्व कोठुन आले हे काही कळत नाही. येथे उगीचच स्थावर -जंगम पदार्थ उत्पन्न होतात ते पाहिले असता त्यांना प्रसवणाऱ्या योनीचे लक्षावधी प्रकार‍ दिसतात त्या प्रत्येक योनीत जीवस्वरुपाच्या शाखा किती विस्तारल्या आहेत याची काही गणनाच करता येत नाही. या सर्वाची निर्मीती कोण करतो हे पाहु लागलो तर ते “आहे-नाही” याच्या पलीकडे आहे रुपाने असणारे परब्रम्ह आहे म्हणुन मुळ ब्रम्हांड निर्मीतीचा कर्ता तो दिसत नाही आणि पाहु लागलो तर उपादान कारणही काही दिसत नाही मध्ये कार्य तेवढे आपोआप वाढावयास लागले आहे.अशा प्रकारे कर्त्या शिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी हा तो भासमान असा आकार उत्पन्न होतो असा जो व्यापार त्याला कर्म हे नाव आहे. आता अधिभूत ज्याला म्हणतात तेही थोडक्यात तुला सांगतो ज्याप्रमाणे आकाशात ढग उत्पन्न होतात आणि एकदम लयही पावतात.  (ओवी २१  ते ३० )

            ज्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व वरवरचे आभासरुप असते आणि न होणे हेच ज्याचे खरे स्वरुप आहे तसेच ज्याला पंचमहाभुते एकत्र येवून रूपाला आणतात जे पंचमहाभुतांच्या आश्रयाने असते  पंचमहाभुतांच्या संयोगाने दिसते  पंचमहाभुतांच्या  वियोगाने जे नष्ट होते नामरुप संबंध वगैरे हे ज्याच्या आश्रयाला राहतात त्या शरीराला अधिभूत असे म्हणतात, जो देहादी प्रकृतीने मिळवलेले भोग भोगतो त्या जीवाला अधिदैव जाणावे जो मन-बुध्दीमध्ये असणाऱ्या चेतनेचा प्रकाश म्हणजे डोळा आहे परंतु तो परमात्म्याहून भिन्न आहे असे वाटत असते याचे कारण म्हणजे तो अहंकाररुपी निद्रेने गाढ झोपी गेला आहे म्हणुन तो संसाररुपी स्वप्नाच्या व्यापाराने कधी संतुष्ट होतो तर कधी क्षीण होतो ज्याला जीव या नावाने स्वभावत:  बोलतात त्याला   पंचमहाभुतांच्या शरीररूपी घरातील  अधिदैव असे जाणावे आता याच शरीररूपी गावामध्ये जो शरीर म्हणजे मी या भावाला नाहीसा करतो तो या शरीरातील अधियज्ञ अर्जुना मी आहे एरवी अधिदैव  व  अधिभूत हे सर्व खरोखर मीच आहे परंतु पंधरादराचे उत्तम कसाचे सोने डाकाला मिळाले  तर ते हिणकस होत नाही का? तथापि त्याचा सोनेपणा मलिन होत नाही आणि ते इतर धातूंच्या रुपाशी एकरुप होत नाही परंतु जोपर्यत ते इतर धातूंशी मिश्रीत आहे तोपर्यत ते हिणकसच म्हटले जाते त्याप्रमाणे  अधिभूत वगैरे हे सर्व अविद्येच्या पडदयाने झाकलेले आहेत म्हणजे या सर्वाविषयी अज्ञान आहे तो पर्यत हे माझ्यापेक्षा वेगळे आहेत असे समजावे.        (ओवी ३१  ते ४० )

        तोच अविद्येचा पडदा दुर केला म्हणजे भेदभावाची मर्यादा नाहीशी होते मग हे एकमेकांना मिळुन तद्रुप झाले असे जर म्हणावे तर प्रारंभी ते दोन होते काय? केसाच्या गुंडाळयावर स्फटिकाची शिळा ठेवली आणि ती जेव्हा डोळयाने वरुन पाहीली जाते त्यावेळी ती भंगली आहे असे वाटते नंतर केस स्फटिकाच्या शिळेखालुन दुर केले तर स्फटिकशिळेचे भंगलेपण काय झाले हे कळत नाही म्हणुन ती शिळा पुन्हा डाक लावुन जोडली गेली आहे काय ? तर  नाही कारण ती स्फटिकशिळा मूळचीच अखंड होती परंतु केसाच्या संगतीने ती भंगल्या सारखी वाटत होती ते केस बाजुला केल्यानंतर ती जशीच्या तशी असते.त्याप्रमाणे अहंभाव गेला म्हणजे जीव आणि ब्रम्हाचे ऐक्य हे मुळचेच आहे. हा प्रकार जेथे घडतो तो  “अधियज्ञ मी आहे”  आम्ही जो हेतु मनात ठेवुन सर्व यज्ञ कर्मापासुन झाले आहेत असे चौथ्या अध्यायात तुला सांगितले आहे तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे आणि नैष्कर्म सुखाचा ठेवा आहे परंतु हे अर्जुना ! तो गुढ अभिप्राय मी तुला स्पष्ट करुन सांगत आहे या अधियज्ञा मध्ये प्रारंभी इंधनाच्या पुर्णपणाने इंद्रियरुपी अग्नी प्रज्वलित केला व त्यामध्ये विषयरुपी द्रव्याची आहुती देवुन आणि मग योगाकरता वज्रासन घालून हीच भुमिका शुध्द करुन त्यावर मूळ बंधमुद्रेचा ओटा करतात, त्याठिकाणी ध्यान-धारणा-समाधीरूपी अग्नीच्या कुंडात बंधत्रयाच्या मंत्रघोषात इंद्रियरुपी होमद्रव्ये भरपुर द्रव्याच्या साहाय्याने यजन करतात. ( ओवी ४१ ते ५० )

           नंतर मन, प्राण आणि संयम अशा प्रकारच्या यज्ञसंपत्तीच्या समारंभाने धुररहीत ज्ञानरुपी अग्नीला संतुष्ट करतात या प्रकारे योगयज्ञातील कुंड, मंडप, वेदी, मंत्र, तंत्र, हविद्रव्ये हे सर्व ज्ञानाग्नीमध्ये समर्पित होतात या योगाचे पर्यवसान ब्रम्हज्ञानामध्ये होते ते ज्ञानही ब्रम्हस्वरुपात लय पावते आणि ब्रम्हस्वरुपच शेवटी उरते. या ज्ञानप्राप्तीच्या साधनेला अधियज्ञ हे नाव आहे  असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले, त्या वेळी अर्जुन प्रखर बुध्दीमान असल्यामुळे त्याला ही सर्व प्रक्रिया समजली. अर्जुनाने हे सर्व उत्तम प्रकारे जाणले आहे हे देवाने ओळखले आणि ते म्हणाले, अर्जुना ! तु हे एकाग्रतेने श्रवण करत आहेस. हे भगवंताचे बोलणे ऐकुन अर्जुन सुखरुप झाला असे पाहा की लहान बाळाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किवां शिष्याच्या कृतार्थपणाने आपण  कृतार्थ व्हावे. हे जन्म देणारी आई किवां सदगुरु हेच जाणू शकतात. म्हणून अर्जुनाच्या आधी  श्रीकृष्णाच्या अंगी अष्ट‍सात्विक भाव निर्मान होवुन तो मावेना परंतु देवाने तो विचार पुवर्क आवरुन घेतला मग परीपक्व सुखरुपी फळाचा सुगंध जसा असावा किवां शीतल अमृताची लाट जशी असावी त्याप्रमाणे मृदु आणि रसाळ विचार त्यांनी प्रगट केले.  श्रीकृष्ण म्हणाले, श्रोत्यांतील श्रेष्ठ अशा अर्जुना ! ज्ञानाग्नी मध्ये माया नाहीशी झाली की ते ज्ञानही विराम पावते. अरे जे आताच तुला सांगितले होते की ज्याला अधियज्ञ म्हटले आहे त्या अधियज्ञाच्या आधारे जे पुरूष जिवंत असताना मला जाणतात ते मरण काळी ही मलाच जाणतात ज्याप्रमाणे कोणतेही घर आकाशाने भरुन आकाशातच रहात असते त्याप्रमाणे ज्ञानी देहरुपी खोल ब्रम्हज्ञानाने भरुन ब्रम्हज्ञानातच रहात असतो.  ( ओवी ५१ ते ६० )

         अशा या अनुभवाच्या ओवरीतील माजघरात ज्यांना आत्मनिश्चयी शांत झोप आली आहे, म्हणुन त्यांना बाहय विषयांचे स्मरण देखील होत नाही. याप्रमाणे अंर्तबाहय ऐक्यतेमुळे जे मद्रुप झाले आहेत त्यांची  पंचमहाभुतांची देहरुपी कवचे नकळत गळून पडतात जिवंतपणी सर्व कर्म करीत असताना ज्यांना त्या शरीराच्या उभेपणाची जाणीव होत नाही त्यास मग शरीर पडल्यानंतर त्याचे दुख कोणाला होणार? म्हणुन अशा प्रंसगी स्वरुप अनुभवाच्या पोटातील निश्चयरुपी पाणी थोडे देखील हालत नाही, असा आत्मज्ञानी म्हणजे जणु काही ऐक्याची ओतीव मुर्ती आहे. ती नित्यतेच्या हदयात घालुन ठेवली आहे.ती एकात्मतेच्या आंनदसागरात धुवून ठेवली आहे त्यामुळे ती देह सोडण्याच्या वेळी होणाऱ्या दुखाने मलिन होत नाही खोल अशा डोहामध्ये घट बुडाला तर तो आतुन बाहेरुन पाण्याने भरलेला असतो नंतर दैववशाने पाण्यात फुटला तर त्या घटातील पाणी फुटते काय? किवां सर्पाने कात टाकली अथवा उष्णतेमुळे माणसाने अंगावरचे वस्त्र फेडले तर मग त्या माणसाच्या अवयवाची काही मोडतोड होते काय? तसा वरवर असणारा देहाचा आकार नष्ट झाला तरी शरीराशिवाय असणारी ब्रम्हवस्तु  सर्वत्र सम प्रमाणात असते तीच ब्रम्हवस्तु  आपणच झाल्यावर देह त्यागाच्या वेळी निश्चयात्मक असलेली ब्रम्हबुध्दी कशी बरी विचलीत होईल?  म्हणुन या प्रकारे जे मला जाणतात ते देहाचा त्याग करताना माझ्याशी ऐक्य पावलेले असता येऱ्हवी सुध्दा मरण काळ जवळ आला असता अंत:करणात ज्या वस्तुचे स्मरण असते पुढील‍ जन्मी तेच त्याला प्राप्त होत असते. ज्याप्रमाणे कोणी मनुष्य काकुळतीने वाऱ्याच्या गतीने पळताना दोन्ही पावले निसटुन एकदम आडात पडावा.   ( ओवी ६१ ते ७० )

पुढील भाग