अध्याय-९-भाग-३

ज्याप्रमाणे काविळीने व्यापलेली दृष्टी चांदण्याला पिवळे समजते, त्याप्रमाणे अज्ञानाने व्यापलेली दृष्टी माझ्या निर्मळ स्वरुपाच्या ठिकाणी दोष पाहते. ज्याप्रमाणे तापाने तोंड कडू झाले की दुध हे विषाप्रमाणे कडु लागते, त्याप्रमाणे मी मनुष्य नसताना मला मनुष्य मानतात. म्हणुन हे धनंजया ! तुला  पुन: एकदा सांगतो की तु कदाचित या कथन केलेल्या स्वरुप -ज्ञानाच्या अभिप्रायाला विसरशील बरे, परंतु विसरु नकोस. कारण स्थुल दृष्टीने मजकडे पाहतात त्यांचे ते पाहणे हे न पाहणेच आहे असे समजावे. एऱ्हवी मी स्थुल आहे अशा दृष्टीने माझ्याकडे पाहणारे जे अज्ञानी लोक आहेत, ते आपल्या समजुतीप्रमाणे मला जाणतात परंतु त्यांचे ते जाणणे माझ्या स्वरुपाचा खऱ्या ज्ञानाच्या आड येते. ज्याप्रमाणे पाण्यात पडलेल्या नक्षत्राच्या प्रतिबिबांला पाहुन ती रत्ने आहेत असे समजुन राजहंस पाण्यात शिरुन ती खाण्याच्या इच्छेने पाण्यातील खडकावर आपली चोच आपटुन जसा घात करुन घेतो. असे सांग की ही गंगा आहे असे समजुन मृगजळाजवळ पोहोचुन परत आलो तर कोणते फळ प्राप्त होते? अथवा कल्पवृक्ष समजुन बकुळीच्या वृक्षाचा आश्रय केला, तर इच्छिलेले फळ प्राप्त होईल काय? नीलमण्यांचा दोन पदरी हार समजून जरी सर्पाला हातात धरले किवां रत्न समजुन जर गारगोटया वेचल्या. अथवा धनाचा चकचकीत ठेवा प्रगट झाला आहे असे समजुन खैराचे निखारे पदरात घ्यावेत, अथवा आपली पडछाया पाण्यात पडली आहे हे न जाणता सिंहाने पाण्यात उडी टाकुन प्राणास मुकावे, त्याप्रमाणे ज्यांनी मी परमात्मा देहधारी आहे, असा आपल्या बुध्दीमध्ये निश्चय केला आहे त्यांनी खरा चंद्र आहे असे समजुन जलातील चंद्राचे प्रतिबिबं घेतल्यासारखे आहे.             ( ओवी १४१ ते १५० )

त्याप्रमाणे मी प्रपंचात आहे अशा विचाराने केलेला निश्चय वाया जातो जसा एखादा कांजी पिवुन अमृतापासुन होणाऱ्या अमरत्वाचा लाभ इच्छितो. त्याप्रमाणे ज्याला स्थुल आकार आहे अशा नाशवंत देहाच्या ठिकाणी अविनाशी अशा मला पाहाणाऱ्याला मी कसा दिसेन? कोणी पश्चिम समुद्राकडे जाण्याच्या हेतुने पुर्व समुद्राच्या मार्गाला जाऊ लागला तर त्याला पश्चिम समुद्राचा किनारा कसा बरे प्राप्त होईल? किवां हे अर्जुना ! कोंडा काडूंन त्यातुन दाणे प्राप्त होतील काय? त्याप्रमाणे जन्मादी विकांराना प्राप्त झालेले माझे स्थुल असे शरीर जाणले असता माझे खरे स्वरुप जाणले जाईल काय? फेस पिल्याने पाणी पिल्यासारखे होईल काय? म्हणून मायेने मनोवृत्ती मोहीत होते आणि संभ्रमाने मनुष्य शरीरच माझे खरे स्वरुप आहे असे समजुन या शरीराची जी जन्मकर्मे आहेत  ती माझी कर्मे आहेत असे म्हणतात. या कारणामुळे मी नामरहीत असुनही मला नाम आहे, मी कर्मे करीत नसुनही माझ्या कडून कर्मे घडते, मी देहरहित असुनही मला देह आहे आणि देहधर्मही आहेत, असा आरोप करत असतात. मी निराकार असुनही मला विविध आकार आहेत असे मानतात, मी निरुपाधिक असुनही मला सोळा शास्त्रशुध्द उपचार अर्पण करतात, मला शास्त्रमर्यादेचे बंधन नाही, तरीपण आचारांचा व्यवहार करतात. मी वर्णाच्या पलीकडे आहे पण मला एका विशिष्ठ वर्णाचा समजतात, मी निगुर्ण असुनही मला सगुण मानतात, मला हात-पाय नसतानाही हात-पाय आहेत असे समजतात, मी अनंत असुनही मला विशिष्ठ प्रमाणात समजतात, मी सर्वत्र सम प्रमाणात असुनही माझे राहण्यासाठीचे एखादे ठिकाण आहे असे समजतात, ज्याप्रमाणे अंथरुणात झोपलेला मनुष्य स्वप्नामध्ये वनाची शोभा पाहतो, त्याप्रमाणे मला कान नसतानाही कान आहेत, डोळे नसतानाही डोळे आहेत, गोत्र नसतानाही  गोत्र आहे, रुप नसतानाही रुप आहे, अशी कल्पना करतात.  ( ओवी १५१ ते १६० )

मी अव्यक्त असतानाही मला व्यक्त समजतात, मी इच्छारहित असुनही  मला इच्छा आहेत असे मानतात, मी जो स्वतासिध्द आणि नित्यतृप्त असतानाही मला अनेक गोष्टी समर्पण करुन तृप्ती मानतात, मी व्यापक असल्यामुळे मला पांघरुन घालता येत नाही, तरी पण ते मला अनेक वस्त्रे नेसवितात. मी निराकार आहे तरीपण मला अनेक प्रकारचे अलंकार घालतात. मी सर्व विश्वाला उत्पन्न करतो परंतु दुसऱ्यांनी मला उत्पन्न केले असे  ते मानतात. मी सहज नित्यसिध्द असतानाही माझ्या अनेक मुर्ती घडवितात, मी स्वंयभू असतानाही माझी प्राणप्रतिष्ठा करतात. मी सर्वत्र  सर्वकाळ सम प्रमाणात असतानाही माझे आवाहन आणि विसर्जन करतात. मी  सर्वकाळ स्वतासिध्द व निराकार असताना मला बालपण, तारुण्य आणि वृध्दापकाळ अशा अवस्था आहेत असे समजतात, मी अद्वैत असुनही माझ्या ठिकाणी द्वैत मानतात, मी कोणत्याही कुळात जन्माला येत नसुनही माझ्या अनेक  कुळांचे वर्णन करतात. मी नित्य असतानाही मी मृत्यु पावतो असे मानुन शोक करतात, मी सर्वाच्या अंर्तयामी राहणारा असुनही मला  शत्रु आणि मित्र आहेत असे मानतात. मी स्वरुपभुत आनंदामध्ये सदैव रममाण असतानाही  मला  अनेक सुखाची इच्छा आहे असे म्हणतात. मी सर्वत्र सम प्रमाणात  असताना देखील मी एकाच स्थळी राहतो  असे म्हणतात. संपुर्ण चराचरामध्ये मी आत्मतत्वाने व्याप्त असताना एकाचा कैवार घेतो आणि एकाला रागावुन मारतो असे माझे चरित्र जगामध्ये रूढ करतात. फार काय वर्णन करावे?  अशा प्रकारचे जे मनुष्याचे जे सामान्य धर्म आहेत, तेच माझ्याही ठिकाणी आहेत, असे त्या अज्ञानी लोकांचे विपरीत असे ज्ञान असते. जेव्हा दृष्टीसमोर एखादी मूर्ती पाहतात, तेव्हा तो आकार म्हणजे तो देव आहे, या भावनेने त्याची सेवा करतात. कालांतराने ती मूर्ती भंग पावली, म्हणजे आता या मूर्तीमध्ये देव नाही असे समजुन तिचा त्याग करतात. ( ओवी १६१ ते १७० )

अशा प्रकारचे मी मनुष्याचा देह धारण करतो  असे समजतात, त्यामुळे माझ्या परिशुध्द स्वरुपाच्या ज्ञानास त्यांचे विपरीत ज्ञान झाकुन टाकते.या करिता अविवेकी लोकांचे जन्माला येणे व्यर्थ आहे, जसे पावसावाचुन आलेले मेघ व्यर्थ असतात किवां मृगजळाच्या लाटा दिसण्यास दुरूनच बऱ्या असतात. अथवा कुंभाराने बनवलेले मातीचे घोडेस्वार किवां गारुडी विद्येने निमार्ण केलेले अलंकार किवां आकाशात ढगांच्या आकाराने दिसणारी गंधर्वनगरी हे केवळ भासतात, पण व्यवहारामध्ये त्यांचा काहीही उपयोग होत नसतो. निवडुंग सरळ कधी वाढत नाही आणि सरळ वाढला तरीसुध्दा त्याच्यांवर फळ येत नाही, तसेच आत गाभाही नसतो. अथवा शेळीच्या गळयाला स्तन निमार्ण झाले, तरी ते ज्याप्रमाणे व्यर्थ असतात. जसे सावरीच्या वृक्षाला फळ आले तरी ते काटयाने भरलेले असते, त्यामुळे ते घेता येत नाही आणि आतुन कडु असल्यामुळे ते कोणाला देता येत नाही, त्याप्रमाणे हया अज्ञानी लोकांचे जगणे असते म्हणुन ते जे कर्म करतात त्याचा धिक्कार असो. मग हे अज्ञानी लोक जे काही शिकलेले असतात ते शिक्षण माकडाने नारळ तोडावा अथवा अंध माणसाच्या हातात मोती पडावा अशा प्रकारे निरुपयोगी आहे. किबंहुना, त्यांनी अपरिपक्व लहान मुलाच्या हातात दिलेल्या शस्त्राप्रमाणे अथवा अशुध्द बुध्दी असलेल्या माणसास बीजासह शिकवलेल्या मंत्राप्रमाणे निरर्थक असतात. धंनजया ! त्याप्रमाणे त्याचे सर्व ज्ञान व जे काही आचरण असेल ते पुर्णपणे व्यर्थ जाते, कारण त्यांच्या चित्ताला स्थिरता नसते.राक्षसरुपी तमोगुण‍ सदबुध्दीला ग्रासुन विवेकाचा ठावठिकाणा नाहीसा करतो आणि अज्ञानरुपी रात्रीत संचार करतो. त्या प्रकृतीने जे ग्रस्त होतात, ते सदैव चिंता करत असतात शिवाय सहजपणे तामस प्रकृतीच्या मुखात पडतात. ( ओवी १७१ ते १८० )

ज्या राक्षसीची जीभ अनर्थाच्या कानापर्यत ओठ चाटीत बाहेर निघाली आहे, जी राक्षसी प्रमादरुपी पर्वताची दरी आहे, तसेच जी सर्वकाल माजलेली आहे, जिच्या मुखातील द्वेषाच्या दाढा ज्ञानाचा खसखशीसारखा बारीक- बारीक चुराडा करते, जी प्रकृती राक्षसी स्थुल बुध्दीच्या अज्ञानी लोकांना हाडे आणि कातडे यांच्या रुपाने गवसणीसारखी आहे. अशा आसुरी प्रकृतीच्या तोंडात जे लोक बळी होऊन पडले, ते भ्रांतीच्या कुंडात पुर्ण बुडून गेले. याप्रमाणे जे तमोगुणाच्या खोल अशा खळग्यामध्ये पडले ते पुन्हा विचाराच्या हाताला लागतच नाहीत. एवढेच नव्हे, तर ते कोठे जातात, याचा पुन्हा शोधदेखील लागत नाही. आता हे असो. म्हणुन हे निष्फळ वर्णन राहु दे अज्ञानाचे वर्णन कशाला? ती वर्णने वाढवली, की वाचेला व्यर्थ शीण मात्र होणार. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण असे बोलले, त्या वेळी अर्जुन म्हणाला, होय महाराज बरोबर आहे, नंतर भगवान म्हणाले, “जिचे वर्णन केले असता वाणीला सुख प्राप्त होते, ती साधूची परमपवित्र कथा आता ऐक ” ज्या साधूपुरूषाच्या अतंकरणामध्ये मी क्षेत्रसंन्याशी होऊन राहतो, व जे झोपी गेले असता वैराग्य ज्यांची सेवा करते, ज्यांच्या तळमळीच्या सात्विक भावनेत धर्म राज्य करीत असतो, ज्यांचा शुध्द आचरणामुळे धर्माचे रक्षण होते, ज्यांचे मन विवेकाला प्रेमाचा ओलावा देत असते. जे महात्माजन ज्ञानगंगेमध्ये स्नान केलेले असतात, जे परब्रम्हयाच्या प्राप्तीने तृप्त झालेले असतात जे परमशांतीच्या वेलीला जणू नवनवीन पल्लव फुटलेले असतात. ( ओवी १८१ ते १९०)

जे  महात्माजन परीणामाला म्हणजे पुर्ण अवस्थेला निघालेले कोंभ आहेत, जे सात्विक धैर्यरुपी मंडपाचे खांब आहेत, जे आनंदसागरात बुडवून काढलेल्या कुंभाप्रमाणे परिपुर्णपणे भरलेले आहेत. ज्यांना भक्तीमधुन एवढा आनंद लाभत असतो की जे मोक्षालाही “दुर हो” म्हणतात, ज्यांच्या कर्माच्या लिलाविलासात निती जगलेली दिसते, ज्यांनी सर्व इंद्रियांच्या ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केले आहेत, ज्यांनी मज विश्वव्यापकाला आपल्या चित्ताची गवसणी केली आहे, असे जे परब्रम्हयाचा अनुभव असलेले महात्माजन दैवी प्रकृतीचे जणू भाग्यच आहेत जे संपुर्ण विश्व माझेच स्वरुप आहे असे जाणुन जे महात्मे हदयामध्ये सातत्याने वाढणाऱ्या प्रेमाने मला भजतात, त्यांच्या मनाला  कोणत्याही प्रकारचे द्वैत स्पर्श देखील करत नाही. हयाप्रमाणे अर्जुना ! ते मीच होऊन माझी अखंडपणे सेवा करीत असतात. त्यांच्या भक्तीची नित्य नूतनता आता सांगायची आहे, ती तू आता श्रवण कर. ते कीर्तनाच्या प्रेमाने देहभान विसरून नाचतात, त्यामुळे त्यांनी प्रायश्चित्ताचे सर्व व्यापार बंद पाडले. तसेच त्या कीर्तनामध्ये पापाचे नाव देखील शिल्लक राहत नाही. यम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह, हया दोघानांही त्यांनी  निस्तेजपणा आणला, तीर्थांना आपल्या स्थानावरुन उठविले,  तीर्थांना पाप नाहीसे करण्याचे श्रेष्ठत्व लाभले होते ते कमी केले, यमलोकांत जाणे, नरकाची शिक्षा भोगणे, हा सर्व प्रकारचा व्यवहार बंद पाडून टाकला. यम म्हणु लागला की, आम्ही कोणाचे बरे नियमन करावे? दम म्हणु लागला की, आम्ही कोणाला बरे जिंकावे? तीर्थे म्हणु लागला की, आम्ही कोणाचे पाप नाहीसे करावे? कारण पाप औषधालादेखील शिल्लक नाही. त्याप्रमाणे ते महात्माजन माझ्या नामघोषांनी विश्वाची दुखे नाहीशी करुन टाकतात आणि सारे जगच ब्रम्हसुखाने भरुन जाते. ( ओवी १९१ ते २००)

ते  महात्माजन पहाट झाल्याशिवाय सर्वाना आत्मज्ञानाचा प्रकाश करुन देतात, अमृताशिवाय सर्व जीवमात्रांचे रक्षण करतात. तसेच विविध प्रकारच योग-साधनेशिवाय सर्वत्र उघडया डोळयांनी परमानंदाचे स्वरुप दाखवतात, कैवल्याचा प्रकाश सर्वाना दाखवीत असताना हा राजा आहे हा गरीब आहे किवां हा लहान आहे हा मोठा आहे असा भेद त्यांच्या मनात नसतो सर्व जगाला ते एकसारखे आनंदाचे आवार होतात. वैकुंठामध्ये जाणारा एखादाच आढळतो, परंतु हया महात्माजनांनी सारे विश्वच वैकुंठमय केले माझ्या नामघोषाचा गौरव करुन त्यांनी सर्वत्र भक्तीप्रेमाचा प्रकाश निर्माण केला. महात्माजनांच्या तेजाला सूर्याच्या तेजाची उपमा देता येत नाही, कारण सुर्याचा अस्त होत असतो त्यांना जर चंद्राची उपमा दिली तर तेही योग्य नाही, कारण चंद्र पोर्णिमेच्या दिवशीच पुर्ण रुपाने प्रगटतो. परंतु महात्माजन सदैव आपल्या स्वरुपाने परिपुर्ण आनंदाने विकसित असतात. मेघ वृष्टी करण्यामध्ये उदार असतो पण तो ओसरतो म्हणुन महात्माजनां त्यांची उपमा देता येत नाही, हे महात्माजन कृपाळू असे सिंह आहेत. जे माझेच नाम एकवेळेला मुखात येण्यासाठी हजारो जन्म माझी सेवा करावी लागते, ते माझे नाम महात्माजनांच्या वाणी पुढे भक्तीप्रेमाने नाचत असते. तो मी वैकुंठातही नसतो, सूर्यबिबां मध्येही एखादे वेळी दिसणार नाही, तसेच योगी पुरूषाशी मने ओलांडुन मी पुढे जात असतो. हे अर्जुना ! अशा प्रकारे मी सर्वत्र हरवलो असलो तरी जेथे माझे भक्त नि:स्वार्थ प्रेमाने नामघोषात रंगुन गेलेले असतात, तेथे माझा शोध घ्यावा म्हणजे मी सापडतो. ते महात्माजन माझे गुण कथन करण्यात असे तृप्त झाले आहेत की, त्यामुळे आपण कोठे आहोत आणि आपला किती काळ भजनात गेला, याची त्यांना वार्ता देखील नसते, ते नामसंकिर्तनामुळे आपणच आपल्या ठिकाणी सुखी होत असतात. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंदं ही नामे ज्या ग्रथांत आहेत, त्या ग्रंथातील मधुर पदे ते सातत्याने गातात आणि आत्मचर्चेमध्येही रंगुन जातात. ( ओवी २०१ ते २१०)

पुढील भाग