अध्याय-९-भाग-४

हे अर्जुना ! आणखीन किती बरे विस्तार करु? माझे कित्येक भक्त माझे कीर्तन करीत विश्वामध्ये संचार करीत असतात. अर्जुना ! किती एक असे आहेत, जे सहजपणे आणि अतिशय तत्परतेने पंचप्राण व मन हे मार्गदर्शन बरोबर घेऊ न बाहेरून यम-नियमांचे कुंपण लावुन आतमध्ये मुळबंधाचा कोट तयार करतात आणि त्यावरती  रेचक, पुरक, कुंभक या प्राणायमरुपी सतत सुरू असणाऱ्या तोफा ठेवतात.त्या वेळी कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वमुख होते आणि तिच्या प्रकाशाने, तसेच मन, प्राण यांच्या बळाने चंद्रामृताचे सतराव्ज्ञया कलेचे तळे‍आपल्या स्वाधीन करुन घेतात. तेव्हा प्रत्याहाराने फार मोठा पराक्रम केला, त्याने काम-क्रोधादी विकारांना नाहीसे करुन टाकले आणि इंद्रियांना बांधुन हदयात आणले, इतक्यात धारणारुपी घोडेस्वारांनी हल्ला करुन शरीरातील पंचमहाभुतांना  एकत्र केले  नंतर त्यांनी संकल्पाचे मन, बुध्दी, चित्त व अहंकार हे सैन्य नाहीसे केले. त्यानंतर ” जिंकले रे जिंकले”असे म्हणून ध्यानाचा नगारा जोराने वाजवला आणि मगस्वरुप ऐक्याचे   एकछत्र तळपु लागले. नंतर समाधीरूप लक्ष्मीचे जे आत्मानुभवरुपी संपुर्ण राज्यसुख, त्या समरसतेने त्यास पटटाभिषेक झाला, असे जाण.असे हे अष्टांग-योगमार्गाने होणारे माझे भजन अतिशय गहन आहे. काही भक्त मला दुसऱ्या प्रकारानेही भजतात, तो प्रकार तुला सांगतो, तो ऐक.वस्त्राच्या दोन्ही पदरांपर्यत जसा उभा व आडवा एकच तंतू असतो, त्याप्रमाणे ते भक्त संपूर्ण चराचरामध्ये माझ्या वाचुन दुसरी कोणतीही वस्तु जाणत नाहीत. ( ओवी २११ ते २२०)

        ब्रम्हदेवापासुन प्रारंभ करुन अखेर चिलटापर्यत मध्ये जे जे काही आहे, ते ते सर्व माझेच स्वरुप आहे असे जाणून मग हा जीव लहान आहे की मोठा आहे असे काही  म्हणत नाहीत तसेच ते सजीव आहेत की निर्जीव आहेत हा भेद देखील जाणत नाहीत. डोळयांना दिसतील, त्या सर्व वस्तू “मी परमात्माच आहे” असे जाणुन साष्टांग लोटागंण घालतात. त्या वेळी त्यास आपल्या चांगुलपणाची काही आठव नसते व समोर असलेले योग्य किवां अयोग्य आहे हेही ते जाणत नाहीत, एकसारखे सर्वाना नतमस्तक होणे हेच त्यांना आवडते.जसे दंच ठिकाणाहुन पाणी पडले, तर सखल भागाकडे ते आपोआप सहज जाऊ लागते, त्याप्रमाणे समोर दिसलेल्या प्राणिमात्रांना नमस्कार करण्याचा त्यांचा सहजच स्वभाव बनलेला असतो. अथवा असे पाहा, फळाने लगडलेली झाडांची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते, त्याप्रमाणे ते भक्त सर्व जीवांपुढे नम्र होतात.  ते नेहमी अहंकार रहित असतात, विनयता हीच त्यांची अनमोल संपत्ती असते “जयजय मंत्राचे ” ते सर्व माझ्या ठिकाणी अर्पण करतात. अशा शुध्द भावनेने नमस्कार करीत असताना, त्यांचे मान-अपमान गळून पडतात, म्हणुन ते अकस्मात सहजपणे माझ्याशी एकरुप होतात. अशा प्रकारे माझ्याशी अखंड होऊनसुध्दा माझीच भक्ती करतात. अर्जुना ! अशा प्रकारे ही सर्वश्रेष्ठ भक्ती मी तुला  सांगितली. आता ज्ञानयज्ञाने जे माझे भजन करतात, त्या भक्तांचे लक्षण श्रवण कर. हे अर्जुना !  ज्ञानयज्ञाने भजन करण्याची पध्दती तु जाणत आहेस, कारण आम्ही या गोष्टी मागे (अध्याय ४ श्लोक ३३ ते  ४२ ) मध्ये तुला सांगितल्या आहेत. तेव्हा अर्जुन म्हणाला, हा देवांचा प्रसादच आहे तथापि, अमृताचे सेवन करणारा कधी पुरे म्हणेल काय? ( ओवी २२१ ते २३०)

           तेव्हा श्रीकृष्ण‍ म्हणाले, “अर्जुना ! तुझी श्रवणाविषयीची आस्था मला बोलते करीत आहे, एरवी हया रणांगणावर आत्मज्ञान सांगण्याची ही वेळ नाही”  तेव्हा अर्जुन म्हणाला,” देवां ! चकोरावाचुन चांदणे नाही, असे कधी होते काय? संपुर्ण जगाला आपल्या शीतल प्रकाशाने शांत करावे हा चंद्राचा स्वाभाविक गुणच आहे, चंद्राचा उदय जगासाठी झाल्यावर चकोरपक्षी आपल्या इच्छेने चंद्राकडे चोच करतात, त्याप्रमाणे आमची विनंती ही कितीतरी थोडी आहे. देवा ! आपण ज्ञान सांगण्याविषयी कृपेचे सागर आहात. महाराज ! मेघ आपल्या उदारपणाच्या वर्षावामुळे जगाची पीडा नाहीशी करीत असतात. वास्तविक पाहता, प्रचंड पावसाच्या वृष्टीच्या मानाने चातकाची तहान ती केवढी असते? परंतु एक चूळभर पाण्याची इच्छा मनात निर्माण झाली, तरी गंगेतच जावे लागते.  त्याप्रमाणे आमची श्रवण करण्याची इच्छा मोठी असो अथवा लहान असो, देवांनी आता ज्ञानाचे स्वरुप विशद करावे.” त्या वेळी देव म्हणाले, आता स्तुती करणे राहु दे, आम्हाला जो संतोष प्राप्त झाला आहे, त्यापेक्षा तो स्तुती करुन अधिक वाढेल, असे नाही. तू उत्तम प्रकारे एकाग्रतेने श्रवण करीत आहेस, त्यामुळे आमचे बोलणे तुझ्याशी सोयरीक करीत आहे. या प्रमाणे श्री हरीने अर्जुनाचा आदराने पुरस्कार करुन बोलावयास सुरुवात केली. तरी तो ज्ञानयज्ञ अशा स्वरुपाचा आहे, या ज्ञानयज्ञामध्ये मूळ संकल्प हा पशू बांधावयाचा खांब आहे, पंचमहाभुते हा प्रचंड मांडव आहे, आणि जीव-ब्रम्हातील भेद हा पशू   आहे, पंचमहाभुताचे शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध हे पाच गुण अथवा पंच ज्ञानेद्रिये आणि  पंच कर्मेद्रिंये, तसेच पंचप्राण ही सर्व यज्ञाची साधन-सामुग्री आहे आणि अज्ञान हे तुप आहे. ( ओवी २३१ ते २४०)

         या यज्ञामध्ये मन आणि बुध्दी यांच्या कुंडामध्ये ज्ञानरुपी अग्नी प्रज्वलित केला असुन सर्व भूतमात्रांमध्ये जे ब्रम्हतत्वरुपाने साम्य आहे, तीच कोणी वेदी म्हणजे यज्ञातील शुध्द केलेला ओटा होय. आत्मानात्म विचार करण्याविषयी जी कुशल बुध्दी, तेच यज्ञातील मंत्र होत. शांती ही स्त्रुस्त्रुवा नावाची  लाकडी पात्र व पळी आहे, आणि जीव हा यज्ञ करणारा यजमान आहे. मग तो जीव अनुभवरुप पात्राने,  आत्मानात्म विेवेकाच्यां महामंत्राने आणि अपरोक्ष ज्ञानरुपी अग्निहोत्रकर्माने जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेदरुपी पशूचा नाश करतो. ज्या वेळी अज्ञानरुपी तुप सरुन जाते आणि यज्ञ करणारा व यज्ञ करणेही थांबुन जाते, जेव्हा जीवरुपी यजमानाचे आत्मानंद रसामध्ये अवभृथ स्नान होते. त्या वेळी पंचमहाभुते, पंचविषय, पंचइंद्रिये, पंचप्राण हे आत्मस्वरुपापेक्षा वेगळी आहेत, असे ज्ञानी समजत नाहीत. आत्मबुध्दीमुळे ही सर्व एकत्र आहेत, असे तो जाणत असतो. अर्जुना ! जसा झोपेमधुन जागा झालेला माणुस म्हणतो की, झोपेला वश होऊन स्वप्नातील ही चित्रविचित्र सेना मीच झालो होतो ना? जागे झाल्यावर तो म्हणतो की, स्वप्नातील ती सेना खरोखर सेना नव्हती, मीच एकटा होतो. अर्जुना ! अशा प्रकारे त्या ज्ञानी पुरुषाला हे जग एकरुप भासत असते. अशी अवस्था प्राप्त झाल्यावर मी जीव आहे ही कल्पना नाहीशी होते. ब्रम्हदेवापासुन कृमी-किटकांपर्यत जे काही प्राणी आहेत, ते सर्व ब्रम्हस्वरुप आहेत अशा ज्ञानाने तो परिपुर्ण होतो, याप्रमाणे यज्ञाद्वारे ते या ऐक्यभावनेने माझे भजन करीत असतात. अथवा भजनाचा दुसरा प्रकार असा आहे कि, हे संपुर्ण विश्व अनादि कालापासुन अनेक स्वरुपाचे आहे कारण जगातील पदार्थ एकासारखे एक नाहीत, तसेच त्यांची नामे-रुपेसुध्दा भिन्न-भिन्न आहेत. म्हणून विश्व हे जरी भिन्न-भिन्न वस्तूंनी भरलेले असले, तरी त्या ज्ञानी भक्ताचे ज्ञान मात्र भिन्न-भिन्न होत नाही, ज्याप्रमाणे अवयव निरनिराळे आहेत, हे खरे, परंतु ते सर्व एकाच देहाचे आहेत. ( ओवी २४१ ते २५०)

          अथवा फांद्या जरी लहान-मोठया असल्या, तरी त्या एकाच वृक्षाच्या असतात व अनेक किरणे दिसली तरी ती जशी एकाच सुर्यापासून निघालेली असतात, त्याप्रमाणे नाना प्रकारच्या व्यक्ती आहेत, त्यांची नावे वेगळी आहेत आणि त्यांची वर्तने भिन्न-भिन्न  आहेत. याप्रमाणे स्वभावत:हा भिन्न असलेल्या विश्वातील सर्व भूतमात्रांमध्ये मला अभेदाने जाणतात. हे पांडवा ! अशा प्रकारे सर्व भूतमात्रे वेगळी आहेत, हे जाणुन जे ज्ञानयज्ञ करतात आणि जे स्वरुपज्ञानी असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भिन्न-भिन्न उरत नाही. अथवा जेव्हा ज्या ठिकाणी जे जे काही ते पाहतात, ते ते सर्व मज ब्रम्हाशिवाय दुसरे काहीही नाही, असाच त्या ज्ञानी भक्तजनांचा सदैव बोध असतो. असे पाहा की, पाण्यातील बुडबुडा जिकडे जातो, तिकडे त्याला पाणीच पाणी भेटत असते, जर तो बुडबुडा विरला तर पाण्यातच नाहीसा होतो आणि जर राहीला तर पाण्यातच राहत असतो. अथवा वाऱ्याने पृथ्वीवरचे धुलिकण वर उडाले, तर ते पृथ्वी कणाहून वेगळे होत नाहीत, आणि  ते वर गेलेले कण पुन्हा खाली आले तर ते पृथ्वीवरच पडतात. त्याप्रमाणे कोणत्याही देशकालामध्ये, कोणत्याही रुपाने, कोणताही पदार्थ असला अथवा नसला तरी त्या ज्ञानी भक्ताच्या  अनुभवाने ते सर्वत्र ब्रम्हरुप आहे असे होऊन राहिलेले असते. जेवढी माझी व्याप्ती आहे तेवढा त्यांचा अनुभवही असतो, याप्रमाणे ते अनुभवाने माझ्याशी एकरुप होऊन अनेक आकारांनी व्यवहार करत असतात. हे धंनजया ! पुर्वेकडे तोंड  केलेल्या कोणत्याही व्यक्तीला उगवता सुर्य जसा सन्मुख असतो, त्याप्रमाणे ते ज्ञानी सदैव विश्वाच्या समोर असतात,ते विश्वरुपाने सर्वत्र कर्म करत असतात. अर्जुना ! त्यांच्या ज्ञानाला आत वेगळा आणि बाहेर वेगळा असा प्रकार नसतो. ज्याप्रमाणे वायु हा आकाशामध्ये सर्वत्र भरलेला असतो. ( ओवी २५१ ते २६०)

          जेवढा संपुर्ण मी आहे तेवढा त्यांचा संपुर्ण अनुभव असतो. म्हणुन हे अर्जुना ! त्यांनी भजन केले नाही, तरी माझे भजन केल्या प्रमाणेच आहे.  एरवी तरी मी सर्वत्र सम प्रमाणात भरलेला आहे, तर मग कोणाकडे कोठे माझी उपासना होत नाही अस म्हणावे? परंतु संपुर्ण ज्ञानी भक्ताशिवाय अज्ञानी जनांना माझी प्राप्ती होत नाही. परंतु हे असो  सारांश अशा ज्ञानयज्ञाने यजन करणारे असताना ज्ञानी भक्त माझी व्यापक रुपाने उपासना करतात  ते भक्त आणि त्यांच्या भक्तीचे प्रकार हे तुला सांगितले. सदैव जी जी कर्मे होत असतात, ती सर्व माझ्यामध्ये सहज समर्पित होतात, परंतु अज्ञानी लोकांना ते समजत नसल्यामुळे मी त्यांना प्राप्त होत नाही. त्या विश्वव्यापक ज्ञानाचा उदय झाला, तर मुळामध्ये कर्म सांगणारा वेद मीच आहे आणि तो वेद त्याचा उपदेश‍ करतो, तो श्रैात-यज्ञादी मीच आहे. मग त्याच वेदांनी सांगितलेल्या कर्मापासुन जो उत्तम संपुर्ण सांगोपांग वैश्वदेवादी पाच प्रकारचा जो महायज्ञ प्रगट होतो, तोदेखील मीच आहे. देवांसाठी आणि पितरांसाठी अर्पण केलेले अन्न मीच आहे. तसेच विविध प्रकारच्या सोमादी औषधी, तुप व समिधां मीच आहे. यज्ञामध्ये म्हणावयाचे मंत्र आणि यज्ञाकरिता तयार केलेले द्रव्य, हे देखील मीच आहे. हवन करणारा मी आहे, आणि ज्या अग्नीमध्ये हवन करतात तो अग्नीही माझेच स्वरुप आहे. तसेच  अग्नीमध्ये हवन करण्याच्या ज्या ज्या वस्तु, त्या मीच आहे. ज्याच्या अधिष्ठान संबंधाने प्रकृतीपासुन पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, मन, बुध्दी आणि  अहंकार, ही आठ अंगे असलेले जगत् जन्माला येत असते, तो पिता मीच आहे. अर्धनारी नटेश्वराच्या सोंगामध्ये जो पुरूष, तोच स्त्री दिसतो, त्याप्रमाणे या चराचरामध्ये चैतन्यरुपाने मी जसा पिता आहे, तसा प्रकृतिप्राधान्याने मीच माताही आहे. ( ओवी २६१ ते २७०)

             आणि निर्माण झालेले जगत् ज्याच्या आधाराने राहते, ज्याच्या योगाने सत्ता स्फुर्तीच्या आधारे जिवंत असते, तसेच प्रकृतीपुरुष मनाच्याही मन असलेल्या साक्षीच्या ठिकाणी उत्पन्न झाली आहेत, तो विश्वाचा पितामह मी आहे.  आणि जगातील सर्व ज्ञानाच्या वाटा ज्या गावाला येतात, तो परमात्मा मीच आहे. आणि  वेदांच्या चव्हाटयावर ज्याला वैद्य म्हणजे जाणण्याची मुख्य गोष्ट म्हणतात, तेही मीच आहे. ज्या ठिकाणी विविध प्रकारची मते ऐक्यतेस आली, शास्त्रांची एकमेकांशी ओळख झाली, आणि चुकलेली ज्ञाने जेथे एकत्र येऊन मिळाली, असे जे पवित्र स्थान, ते सर्व मीच आहे. ब्रम्हरुपी जीवाला परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाचा हेच अकुंर फुटल्यावर यांचे मंदिर असा जो ओमकार तो मीच आहे. त्या ओमकाराच्या पोटात अ,उ,म, अशी तीन अक्षरे उत्पन्न होतात, की जी उपजतच तीन वेदांना घेवुन प्रगट झाली आहेत. म्हणून ऋग्वेद, यर्जुवेद व सामवेद हे तीन वेद मीच आहे. मुळ परब्रम्हापासुन ओमकार निर्माण झाला, ओमकारापासुन वेद निर्माण झाले. वेदांपासून पुराणे इत्यादी वाड्मये निर्माण झाली, हा सर्व शब्दब्रम्हाचा कुलक्रम आहे आणि तो मीच आहे. असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. संपुर्ण स्थावर-जंगम विश्वप्रलयाचे वेळी ज्या प्रकृतीत साठवले जाते, ती प्रकृती श्रमली असता ज्या ठिकाणी विश्रांती पावते, ती परमगती मी आहे. आणि ज्याच्यामुळे प्रकृती जगते, ज्याने स्वीकारले  असता ती विश्वाला प्रसवते आणि जो जीवाच्या रुपाने या प्रकृतीमध्ये उत्पन्न झालेल्या सात्विक, राजस, आणि तामस, या तिन्ही गुणांचा भोग घेतो, तो विश्वलक्ष्मीचा पती मी आहे. हे पंडुसुता !  मीच त्रैलोक्याचा स्वामी आहे. ( ओवी २७१ ते २८०)

पुढील भाग