अध्याय-९-भाग-५

 

आकाशाने सर्व ठिकाणी रहावे, वायुने क्षणभर देखील शांत बसु नये, अग्नीने जाळावे, जलाने वर्षाव करावा. पर्वताने बसलेली आपली जागा सोडू नये, समुद्राने आपली मर्यादा ओलांडु नये, पृथ्वीने सर्व भूतमात्रांचे ओझे वाहावे, ही माझी आज्ञा आहे. माझ्या सत्तेने वेद बोलत असतात,  माझ्या सत्तेने सुर्य प्रकाश देत असतो, माझ्या सत्तेने प्राण हालचाल करत असतो, जगाच्या सर्व कर्माना चालना देणारा प्राण माझ्या अधीन आहे. माझ्या आज्ञेप्रमाणेच काळ हा भूतांना ग्रासतो. अर्जुना ! सर्व पंचमहाभूते ज्याची आज्ञा पाळणारे आहेत, असा जो सर्व काही करण्यास समर्थ, तो जगाचा नाथ मी आहे. तसेच आकाशाप्रमाणे उदासीन राहुन, सर्वद्रष्टा जो आहे तो मी आहे. पांडवा !  याप्रमाणे नामरुपात जो पुर्ण भरला आहे आणि नामरुपांना आधार देखील आहे, तो मी आहे. ज्या प्रमाणे जलातच लाटा उत्पन्न होतात आणि लाटांतही जल असते, त्याप्रमाणे सारे विश्व माझ्यामध्ये आणि मी विश्वामध्ये आहे. जो मला अनन्यभावाने शरण येतो, त्यांच्या जन्म-मरणाचे दुख मी नाहीसे करतो. याकरीता   शरण  येण्यास योग्य मीच एक आहे. त्रिगुणात्मक प्रकृतीच्या गुणांनी मीच एक असुन अनेकपणाने जगातील प्राणिमात्रांत प्राणरुपाने मीच भरलेला असतो. सुर्य जसा हा विशाल सागर आहे किवां हे छोटे डबके आहे असे न समजता कोणत्याही जळात प्रतिबिबिंत होत असतो, त्याप्रमाणे ब्रम्हदेवांपासुन सर्व प्राणिमात्रांत जो जीवरुपाने प्रतिबिबिंत आहे, तो सुह्त मीच आहे. ( ओवी २८१ ते २९०)

पांडवा! संपुर्ण त्रिभुवनाला जीवनरुपी प्रेमाचा ओलावा देणारा मी आहे. त्रिभुवनाची उत्पत्ती, स्थिती व नाश याचे मुळ  म्हणजे मी आहे. बीजापासुन वृक्ष आणि शाखा उत्पन्न होतात, पुढे त्या वृक्षाचा वृक्षपणा बीजात समाविष्ट होतो. त्याप्रमाणे माझ्या आदिसंकल्पापासुन जगाची उत्पत्ती होते आणि आदिसंकल्पात जग लय पावते. याप्रमाणे जगाचे मुळ बीज जो संकल्प, जो सुक्ष्म वासनारुप असतो, तो संकल्प कल्पाच्या अंती जेथे सुक्ष्मरुपाने राहतो, ते स्थानदेखील मीच आहे. कल्पाचा जेव्हा शेवट होतो, त्यावेळी नामरुपेही नाहीशी होतात, चारी वर्ण व देहादी व्यक्तीसुध्दा नाहीशा होतात, जरायूजादी प्राण्यांचे विविध प्रकारचे वर्ग नाहीसे होतात, त्यावेळी कोणत्याही प्रकारचा आकार शिल्लक राहत नाही, त्या वेळी वासनारुप संकल्पाचे संस्कार हे पुन्हा जगाचा आकार रचण्यासाठी जेथे अमर होऊन असतात, ते ठिकाण देखील मीच आहे.  मी सुर्याच्या रुपाने तापत असतो, त्यावेळी पृथ्वी शुष्क होत असते. नंतर मीच इंद्र होऊन वर्षाव करतो, त्यावेळी पृथ्वी जलामुळे पुन्हा सुजलाम् सुफलाम् होत असते.अग्नी लाकडे खातो, तेव्हा लाकडेच अग्नी बनतात,  त्याप्रमाणे मरणारे आणि मारणारे हे दोन्ही माझीच स्वरुपे आहेत, असे समज. याकरिता मृत्युने ज जे घेरलेले आहे, ते देखील माझेच स्वरुप आहे, त्याप्रमाणे अविनाशी म्हणजे न मृत्यु पावणारे, ते तर मीच आहे. आता अधिक बोलून जे सांगावयाचे, ते सर्व एकदाच सांगतो, तरी लक्षात ठेव, सत् आणि  असत् हे माझेच रुप आहे. सत् हे माझे वास्तविक रुप आहे, तर असत् हे माझे परिवर्तित होणारे स्वरुप आहे. म्हणुन अर्जुना,मी जेथे नाही असे कोणते ठिकाण आहे? परंतु प्राणिमात्रांचे दुदैव कसे आहे, ते पहा, मी सर्वत्र सम प्रमाणात असुनदेखील ते मला जाणत नाहीत. ( ओवी २९१ ते ३००)

ज्याप्रमाणे लाटा जलाशिवाय आटाव्यात अथवा सुर्यकिरणे दिव्याच्या उजेडाशिवाय दिसु नयेत,  त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्र माझ्याशी एकरुप असुनही त्यांना आपण भगवत् स्वरुप आहोत असे वाटत नाही, हे केवढे मोठे आश्चर्य आहे पहा. या संपुर्ण अफाट विश्वात आत-बाहेर मीच भरलेला आहे, संपुर्ण विश्व माझेच ओतलेले स्वरुपे आहे. परंतु कसे पापकर्म आडवे आले, ते कळत नाही. कारण मी सर्वत्र असुनही “ते मी नाही” असे म्हणतात. अमृताच्या विहिरीत पडल्याने ज्याप्रमाणे एखादा मनुष्य मृत्यूच्या भीतीने ‘आपल्याला बाहेर काढा’, असे म्हणतो, तेव्हा त्या अभागी माणसाला काय बरे म्हणावे ?एक घासभर तरी अन्न मिळावे; म्हणून एक आंधळा रस्त्याने धावत होता. त्या वेळी रस्त्यात पडलेल्या चिंतामणीची त्याला ठेच लागली, त्या वेळी आंधळेपणाने त्याची चौकशी न करता त्याने तो चिंतामणी पायाने दूर लोटला. हे जसे, तसे मनुष्य ज्या वेळी आत्मज्ञानाला सोडून आंधळा बनतो, त्या वेळी त्याची  अशी दुर्दशा होते. म्हणून आत्मज्ञान न जाणता आपण जे जे कर्म करतो , ते ते सर्व करूनदेखील न केल्याप्रमाणे आहे. आंधळ्याला गरूडाचे पंख जरी मिळाले, तरी त्यांचा काय बरे उपयोग? त्याप्रमाणे आत्मज्ञाशिवाय सत्कर्माचे श्रम व्यर्थ आहेत. कसोटीवर घासल्याने शुध्द सोने जसे कळते, त्याप्रमाणे शुध्द वैदिक मार्ग कोणता, हे त्यांच्या आश्रमधर्माच्या आचरणावरून समजू शकते.  ते यज्ञ करू लागले असताना तिन्ही वेद संतोषाने मान डोलवितात आणि त्यांच्यापुढे क्रियादेखील फळ प्राप्तीसह उभी राहते. अशा प्रकारे जे सोमपान करणारे दीक्षित, ते आपणच यज्ञाचे स्वरूप होतात ; परंतु त्यांनी पुण्याच्या नावाने पापच जोडलेले असते.  ते तीनही वेदांस जाणून शंभर यज्ञांनी माझे यजन करतात ; परंतु मला पूर्णपणे विसरून भ्रमाने स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. (ओवी ३०१ ते ३१०)

ज्याप्रमाणे एखादा अभागी गरीब मनुष्य कल्पवृक्षाच्या खाली बसतो आणि आपल्या फाटक्या झोळीला गाठी बांधत असतो; आणि मग अर्जुना ! तो दुर्दैवी पुरूष तेथून भिक्षा मागावयास निघतो. त्याप्रमाणे शंभर यज्ञांनी माझे यजन करून ते स्वर्गातील सुखभोगांचीच इच्छा करतात. तेव्हा ते पुण्य नसून खरोखर पापच नव्हे काय? म्हणून माझ्या प्राप्तीचा आनंद घ्यावा, हे सोडून जे स्वर्गातील उपभोगांच्या मागे लागलेले असतात, हा अज्ञानी लोकांचा पुण्यमार्ग आहे. ज्ञानी लोक स्वर्गातील उपभोगांना मात्र विघ्न व नाश करणारा असे समजतात. एरव्ही नरकातील दु:ख प्राप्त झाल्यावर त्या दु:खाच्या सापेक्ष स्वर्गातील उपभोगांना सुख असे नाव आहे. परंतु या सापेक्ष सुखाशिवायही निर्दोष असा जो त्रिकालबाधित अखंड आनंद आहे ते माझे स्वरूप आहे. हे अर्जुना! माझ्याकडे येण्याला स्वर्ग    आणि नरक हे दोन आडमार्ग आहेत. त्या खरोखर चोरांच्या वाटा आहेत. पुण्य हे ज्यांचे बाहयस्वरुप आहे, अशा पापाने उपभोगासाठी स्वर्गामध्ये येता येते, आणि पाप हे ज्यांचे  बाहयस्वरुप आहे, अशा पापाने नरकामध्ये सहज जाता येते. परंतु ज्यांच्या आधारे माझी प्राप्ती होते, ते शुध्द पुण्य होय. अर्जुना ! सर्व प्राणिमात्र माझ्या स्वरुपामध्ये असताना ज्या कर्माने सच्चिदानंदस्वरुप मी दुरावतो, त्या कर्माला पुण्य असे  म्हटले असता जीभ तुटून पडणार नाही काय? परंतु या प्रसंगी आता हे राहु दे. पाप-पुण्याची चर्चा पुरे याप्रमाणे दिक्षीत माझे यजन करुन स्वर्गातील उपभोगांची इच्छा करतात. मग ज्या पुण्याने माझी प्राप्ती होणार नाही, असे पापरुपण्य प्राप्त करुन त्याच्या आधारे स्वर्गाला येतात. ज्या स्वर्गामध्ये अमरत्व हेच सिंहासन आहे, हत्तीसारखे विशाल वाहन आहे राजधानीचे स्थान अमरावती आहे. (ओवी ३११ ते ३२०)

ज्या ठिकाणी महासिध्दीची भांडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत व ज्या गावात कामधेनुंचे कळप आहेत. ज्या स्वर्गामध्ये देवतांसमुह चाकर होऊन सेवा करत असतात, जिकडे-तिकडे चिंतामणीचे मार्ग आहेत, जेथे चंद्र चांदणे शिंपीत असतो, ज्या ठिकाणी वाऱ्याप्रमाणे धावणारे सेवक आहेत, स्वता बृहस्पती ज्यामध्ये प्रमुख आहेत असे स्वस्तिवाचन करणारे वैदिक ब्राम्हण जेथे आहेत, जेथे पंक्तीला देवतासमुह आहेत. ज्यांच्या सभोवती लोकपालासारखे राजे आहेत जेथे मान-सन्मार संपादन केलेले घोडेस्वार आहेत, जेथे उच्चै:श्रवा नावाचा इंद्राचा घोडा पुढे चालत असतो. असो, हे वर्णन फार झाले, याज्ञिकांना जोपर्यत पुण्याचा अशं आहे, तोपर्यत ते इंद्राच्या सुखासमान अनेक भोग भोगतात. मग त्या पुण्याचा अभिमान संपुन जातो त्यामुळे अंगावर चढलेली इंद्रपणाची खोटी उटी पुर्णपणे उतरुन जाते आणि मग ते मृत्यूलोकात परत येऊ लागतात. ज्याप्रमाणे वारांगनेच्या साठी जमविलेले सर्व पैसे खर्च झाल्यावर तिच्या घराच्या दाराला स्पर्शदेखील करता येत नाही, त्याप्रमाणे पुण्य संपल्यावर दिक्षीताची अशी लज्जास्पद अवस्था होते, तिचे काय बरे वर्णन करावे? याप्रमाणे ज्यांनी पुण्यकर्म करुन देखील स्वर्गातील उपभोगांचीच इच्छा केली, ते हदयामध्ये असलेल्या मला विसरुन जातात, त्यांचा अमरपणा व्यर्थ जातो आणि शेवटी ते मृत्यूलोकात येतात. (ओवी ३२१ ते ३३०)

ते या मृत्यूलोकांमध्ये येऊन मातेच्या उदररुपी गुहेत नऊ महीने पुर्ण होईपर्यत मलमुत्राच्या सानिध्यात  उकडुन जातात आणि मग पुन्हा- पुन्हा जन्म-मुत्यूच्या चक्रात सापडतात. अरे ! स्वप्नामध्ये द्रव्याचा साठा सापडला, तरी जागे झाल्यावर तो नाहीसा होतो, त्यापमाणे वेद जाणणाऱ्यांना यज्ञकर्त्याचे स्वर्गसुख हे भासमान आहे असे समजावे. हे अर्जुना! ज्याप्रमाणे धान्य टाकुन नुसता कोंडा उफणावा, हे सर्व जसे व्यर्थ,  त्यापमाणे याज्ञिक हा वेदज्ञ असला,तरी त्याने मला जाणले नाही तर त्याचे जीवन व्यर्थ होय, म्हणुन माझ्या एकावाचुन तिंन्ही वेदांमध्ये सांगितलेली यज्ञकर्मे निष्फळ होत. मला जाणलेस आणि दुसरे काही जाणले नाहीस तरी तु सुखी आणि आनंदी होशील. ज्याने संपुर्ण चित्त मला अर्पण केले आहे, ते ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील बाळ मातेच्या गर्भामध्ये  तिच्या नाळेशी जोडुन स्वतास गुरफटुन शांत आणि सुरक्षित असते आणि तिच्या शिवाय काहीच जाणत नाही. किबंहुना मातेच्या श्वासावरच त्याचा श्वास चालतो. यवढे ती माता आणि बाळ एकरुप असतात, त्यापमाणे जे अनन्य भक्त असतात, ते माझ्यावाचुन  दुसरे काही चांगले नाही हे जाणतात, ते केवळ फक्त जगत राहणे हे जीवन नसुन परमात्मा प्राप्ती  हेच खरे जीवन आहे असे मानतात. अशा प्रकारे एकनिष्ठ भावाने ते माझे सतत चिंतन करीत उपासना करतात, त्यांची सेवा मीच करतो. ते ज्या क्षणी भक्तीभावाने माझ्या प्राप्तीच्या मार्गाला लागले, त्याच क्षणापासुन त्यांच्या योगक्षेमाची चिंता मला  पडलेली असते. त्यांनी जे जे कर्म करावे ते सर्व सफळ करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडलेली असते. ज्याप्रमाणे पंख न फुटलेल्या पक्ष्यांच्या जीवनासाठी पक्षिणीच सारखी प्रयत्न करत असते. तान्हे लेकरु तर आपली तहान-भुक वगैरे काही जाणत नाही पण त्याला हितकर काय आहे  हे जाणुन ते आईच करत असते, त्यापमाणे  जे अनन्य भावाने सर्व जीवन मला अर्पण केले, त्यांच्या सर्व इच्छा  मीच पुर्ण करीत असतो.(ओवी ३३१ ते ३४०)

त्यांना जर माझ्याशी एकरुप होण्याची इच्छा असेल तर ती इच्छा मी पुर्ण करतो अथवा जन्मोजन्मी माझीच सेवा करावी असे त्यांना वाटत असेल तर त्यांच्या व माझ्यामध्ये मी निष्काम प्रेमभावनेच्या लहरी निर्माण  करीत असतो. याप्रमाणे अनन्य भक्त आपल्या मनात जी जी सात्विक इच्छा धरतात  ती ती इच्छा मी पुर्ण करीत असतो आणि दिलेल्या सर्व विषयांचे रक्षणदेखील मीच करतो. हे पांडवा ! ज्याच्या सर्व वृत्तीना मीच काय तो आश्रय आहे, त्याचा सर्व प्रकारचा योगक्षेम वाहण्याचा भार मजवरच असतो. मी सर्वत्र सम प्रमाणात आहे, हे न जाणता अनेक सांप्रदायिक लोक अग्नी, इंद्र, सुर्य, चंद्र यांना मीच जाणुन भजत असतात, तरी पण त्यांचे ते पुजन मलाच प्राप्त होते कारण या साऱ्या विश्वात मीव एक भरुन राहीलेलो आहे परंतु त्यांचे ते भजन शास्त्रशुध्द नसुन चुकलेले असते, भक्तीच्या फळात विषमता निर्माण होते. असे पाहा वृक्षाचया शाखा, पाने वगैरे एकाच बीजापासुन निर्माण झालेली नसतात का? परंतु पाणी घेणे हे मुळाचे काम असल्यामुळे पाणीहे मुळालाच घातले पाहीजे. अथवा दहा इंद्रिये ही एकाच देहाची आहेत आणि त्यांच्यामार्फत सेवन केलेले विषय एकाच अंतकरणापर्यत पोचतात, हे जरी खरे असले, तरीसुध्दा उत्तम पदार्थानी बनवलेली रसयुक्त पक्वान्ने चांगली असली तरी ती कानात कशी बरे भरवावी? फुले आणून ती डोळयांवर कशी बरे बांधावीत?  पदार्थाचा रस हा मुखाने घेतला पाहिजे, फुलातील सुगंध‍ हा नाकानेच घ्यावा लागतो, त्याप्रमाणे इतर देव-देवता जरी माझी रुपे असली तरी त्यांना वेगळे न समजता मी समजुन माझे भजन करावे. हे अर्जुना! मला न जाणता जे भजन होते ते व्यर्थ होय, माझे भजन हे देवतांच्या उद्देशाने होत असल्यामुळे ते वाया जाते, म्हणून माझे भजन माझ्या मुळ रुपाने होण्याचे ज्ञान हेच खरे कर्माचे डोळस ज्ञान होय. ज्ञान हे कर्माचे डोळे आहेत, म्हणून ते र्निदोष असले पाहिजे.(ओवी ३४१ ते ३५०)

 पुढील भाग