अध्याय-९-भाग-८

 

षड गुणसंपन्न अशा माझ्या भाग्यरुपी सागराचे  रक्षण करण्याकरिता अर्जुना, अजुनही  ज्यांचा पावलांची खूण मी  आपल्या हदयावर वागवीत आहे. अर्जुना, ज्यांचा क्रोध म्हणजे काळ, अग्नी व रुद्र यांचे वसतिस्थान आहे आणि ज्यांच्या कृपाप्रसादाने ऋध्दि-सिध्दी सहजपणे प्राप्त होतात असे पवित्र आणि पुज्य जे ब्राम्हण जे माझ्या ठिकाणी भक्तीज्ञानाने तत्पर आहेत ते माझ्याशी ऐक्य पावतात, यात सिध्द ते काय करायचे ? चंदनाच्या झाडावरुन वाहणाऱ्या वाऱ्याने स्पर्श केलेली जी जवळची लिंबाची झाडे असतात,तीही निर्जीव असुन सुध्दा  देवांच्या मस्तकावर जाण्यासाठी स्थान मिळवतात,तर प्रत्यक्ष चंदनच देवाच्या कपाळावर तिलकाच्या रुपाने बसणार नाही हे कोणत्या कारणाने मनात आणावे? अथवा तो चंदन देवाच्या कपाळावर जाऊन बसतो हे अनेक प्रकारांनी सिध्द केले, तरच ही गोष्ट खरी ठरणार आहे काय? हलाहल विषाच्या त्रासापासुन देहाला शांत करील, अशा आशेने जेथे भगवान शिवशंकरांनी आपल्या मस्तकावर अर्ध्याच चंद्राचा भार अखंडपणे वाहिलेला आहे, तर मग सर्वागांला शांत करणारा व पुर्ण चंद्राहुन सुगंधाने अधिक असा जो चंदन तो सर्वागावर सहजच का धारण केला जाणार नाही? रस्त्यावरचे पाणी जिच्यात मिसळल्यामुळे सागरात सहजच जाऊन मिळते त्या गंगेला समुद्रावाचुन दुसरी काही गती आहे काय? राजर्षी म्हणजे तत्वज्ञानी क्षत्रिय असोत वा ब्राम्हण असोत, ज्यांच्या क्रियेला व बुध्दीला मीच एक आश्रयस्थान आहे त्यांची मृत्युनंतरची परमगती मीच आहे आणि जिवंतपणाच्या काळातही त्यांचे अस्तित्वही मीच आहे जसे शंभर ठिकाणी तुटलेल्या-फुटलेल्या नावेत बसुन नदी तरुन जाण्यासाठी कसे बरे निष्काळजी राहावे? चारी बाजुंनी  बाणांचा वर्षाव होत असताना आपण उघडया अंगाने कवच न घालता कसे बरे असावे? (ओवी ४८१ ते ४९०)

अंगावर दगड पडत असताना मध्ये ढाल का बरे घालु नये? शरीर  रोगाने ग्रस्त झाले असता औषधे घेण्याविषयी का बरे निष्काळनी राहावे? अर्जुना ! वनात चारी बाजुने वणवा पेटल्यानंतर त्यातुन बाहेर का बरे पडु नये? तसेच दु:खाने भरलेल्या मृत्यूलोकात जन्म घेऊन मला का बरे भजु नये? अरे, मला न भजण्याविषयी  मानवाच्या अंगी असे कोणते सामर्थ्य आहे? त्यांच्या घरी उपभोगाच्या अनेक वस्तु असल्यामुळे ते निष्काळजी झाले आहेत काय?  अथवा मला अंतकरणापासुन न भजता विद्या, तारुण्य यापासुन सुखाचा लाभ होईल, असा प्राण्यांचा भरवसा आहे? खरी परिस्थिती अशी आहे की, जेवढया म्हणुन भोग्य वस्तु आहेत तितक्या देहाच्या सुखाकरिता निर्माण केल्या आहेत, परंतु मानवाचा देह तर मृत्युलोकात काळाच्या तोंडात पडला आहे. अरे बाप रे ! या बाजारात दु:खरूपी मालाची गाठोडी मोकळी सोडली आहेत व तो माल मरणाच मापाने मोजला जात आहे. अशा या मृत्युलाकाच्या शेवटच्या बाजाराच्या वेळी चौऱ्यांशी लक्ष योनी फिरल्यानंतर मिळणारा मनुष्यदेह प्राप्त झाला आहे. हे अर्जुना ! अशा वेळी जीवाला सुख-शांती प्राप्त होईल, अशी कोणती खरेदी करता येईल? विस्तव विझुन गेल्यावर राख फुंकली तर दिवा लागतो काय? अर्जुना !  विषाचा कंद वाटुन त्याचा जो रस  निघेल तो पिळुन घ्यावा आणि त्या रसाचे नाव अमृत ठेवावे तर अशा रसाच्या सेवनाने ज्याप्रमाणे अमर होण्याची इच्छा धरावी. त्याप्रमाणे विषयांपासून मिळणारे जे सुख आहे ते केवळ अतिशय दु:ख आहे परंतु काय करावे? लोक अज्ञानी आहेत त्यामुळे विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे पाय चालत नाही.ज्याप्रमाणे आपले डोके तोडावे व पायाला झालेल्या जखमेवर बांधावे त्याप्रमाणे मृत्यूलोकातील सर्व व्यवहार चालले आहेत. (ओवी ४९१ ते ५००)

म्हणून अशा प्रकारच्या मृत्यूलोकात कोणाला सुखाची नुसती गोष्ट तरी आपल्या कानांनी ऐकता येईल का? निखाऱ्यांच्या अंथरुणावर सुखाने झोप घेता येईल का? ज्या  मृत्यूलोकात चंद्राला देखील क्षय लागतो, ज्या ठिकाणी सुर्याचा उदय देखील मावळण्यासाठीच होतो जेथे दु:ख हे सुखाचा अंगरखा घालुन जगाला फसवीत असते आणि छळत असते.ज्या ठिकाणी मंगलरुप अंकुराबरोबर त्यावर अमंगलरुप गोष्टीची किड पडत असते, जेथे मृत्यू हा पोटातील गर्भाला देखील शोधत येत असतो. हा मृत्यूलोक असा आहे की जे प्राप्त नाही, त्याचे चितंन करावयास लावतो आणि अशी काळजी करत असतानाच मृत्यू  अकस्मात येतो व कोणत्या गावाला घेवुन जातो, याचा शोधदेखील लागत नाही. अरे अर्जुना !   अनेक वाटांनी शोध घेतला तर  मृत्यूच्या खाईत गेलेल्यांचे एक पाऊलही परत फिरलेले दिसत नाही.  मृत्यू  पावलेल्या लोकांच्या विविध वाचा हीच ज्या मृत्यूलोकातील पुराणे आहेत.या मृत्यूलोकातील नाशवंताचा प्रभाव एवढा विस्तारीत आहे की तो सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रम्हदेवाच्या आयुष्यापर्यत पसरलेला आहे. विश्वातील एक पदार्थदेखील शिल्लक राहत नाही सर्वाचा नाश होतो. हा चमत्कार लक्षात घे.अशा तऱ्हेची ज्या मृत्यूलोकातील वागणुक आहे त्या अशाश्वत मृत्यूलोकात ज्यांनी जन्म घेतला, त्यांच्या निष्काळजीपणाचे मोठे आश्चर्य वाटते. हे लोक परलोकी होणाऱ्या अलौकिक प्राप्तीकरिता एक कवडीदेखील खर्च करीत नाहीत आणि सर्व प्रकारे हानी होणाऱ्या ठिकाणी  कोटयावधी रुपये खर्च करतात. जो विविध प्रकारच्या विषयभोगांच्या विलासात रममाण झालेला असतो तो सध्या सुखात आहे असे म्‍हणतात आणि जो अनेक प्रकारच्या अभिलाषांनी दडपला आहे . ज्याला शहाणा माणुस असे म्हटले जाते. ज्याचे आयुष्य थोडे राहिले आहे आणि ज्याचे शारीरिक आणि बौध्दिक बळ जागच्या जागी जिरुन गेले आहे. आपण त्याला वडील म्हणुन नमस्कार करतो.  (ओवी ५०१ ते ५१०)

लहान मूल जसे जसे मोठे होऊ ‍लागते तसेतसे आई वडील कौतुकाने आणि मजेने नाचतात. परंतू मुलाचे आयुष्य हळुहळु कमी होत आहे याची त्यांना खंतही नसते. वास्तवीक पाहता ते मुल प्रत्येक दिवशी मत्यृच्या अधीन होऊ लागते परंतु असे असूनही आई वडील त्याचा वाढदिवस साजरा करतात आणि ऊत्साहाच्या गुढया उभारतात. अरे एखाद्या मुलास तू मर असे कोणी असे म्हणले तर त्याचे आई वडील हे अशुभ बोलने सहन करत नाहीत परंतु स्वाभावीक पणे ते मुल मरण पावले तर ते रडत बसतात. परंतु असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे हे त्या अज्ञानी लोकांना कळत नाही. सर्प बेडकाला ऊभा गिळत असतो परंतु अशा परिस्थितील देखील तो बेडूक ऊडणाऱ्या माशीला जिभेने घेरीत असतो.अशा तऱ्हेने मृत्युलोकातील माणसे कोणत्या लोभाने इच्छा वाढवतात कोण जाणे. अरेरे ! हे किती वाईट आहे ! मृत्युलोकातील सर्वच काही उलटे आहे. अर्जुना तु जरी दैव योगाने मृत्युलोकात जन्माला आला आहेस तरी सर्व संपत्तीपरीत्याग करुन या संसार बंधनातून बाहेर ये आणि भक्तिमार्गावरून वाटचाल कर. त्या निस्वार्थ भक्तीने तु माझ्या अविनाशी परमधामाला प्राप्त होशील. तू आपले मन माझ्याशी एकरुप करुन माझ्या भज‍नाविषयी अंत करनात प्रेम धारण कर आणि सर्व ठिकाणी मीच आहे हे जाणून मला नमस्कार कर. माझ्या अखंड अनुसंधानाने ज्याच्या मनातील सर्व संकल्प विकल्प नाहीसे होतात त्याला सर्वश्रेष्ठ भजन करणारा म्हणावे. याप्रमाणे माझ्या योगाने तु ज्या वेळी संपन्न होशील त्यावेळी तु माझ्या स्वरुपाशी ऐक्य पावशील. ही माझ्या अंतकरणातील गुह्य गोष्ट तुला सांगत आहे. अरे सर्वांपासुन लपवुन ठेवलेले असे जे आमचे धन तुला प्राप्त झाले आहे. त्यामुळे तु शाश्वत परमसुखी होऊन राहशील. (ओवी ५११ ते ५२०)

भक्तांचे सर्व मनोरथ पुर्ण करणारे कल्पतरु जे मेघश्याम परब्रम्हस्वरुप श्रीकष्ण ते असे वचन बोलले. असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला, अहो महाराज ऐकता का? भगवान श्रीकृष्ण काय बोलत आहेत. त्याकडे लक्ष द्या असे संजय म्हणाला, त्यावेळी वृध्द धृतराष्ट्र पुराच्या पाण्यात  रेडयासारखा शांत बसला होता. पुढे संजय म्हणाला, आज श्रीकृष्णरुपी मेघातुन अमृताचा वर्षाव झाला परंतु हा धृतराष्ट्र येथे असुनही शेजारच्या गावी गेल्यासारखे आहे. तरीपण हा  आम्हाला अन्नपाणी देणारा मालक आहे म्हणुन अधिक बोललो तर माझी वाणी विटाळेल. परंतु याचा स्वभावच असा आहे मी धन्य धन्य झालो खरोखर माझे भाग्य थोर आहे कारण कुरुक्षेत्राचा वृत्तांत सांगण्याच्या निमित्ताने मुनिराज व्यासदेवांनी भवसागरापासुन माझे रक्षण केले. एवढा मनाचा दृढनिश्चय करुन बोलत असता संजयास असा सात्विक भाव निर्माण झाला की तो त्याला आवरता येईना. श्रीकृष्ण-अर्जुनाच्या सुखसंवादात संजयचे चित्त रममाण  झाल्यामुळे ते स्थिर झाले वाणी जागच्या जागी स्तब्ध झाली. आणि पायांपासुन मस्तकांपर्यत अंगरखा घातल्याप्रमाणे सर्व शरीरावर रोमांच उभे राहीले.डोळे अर्धवट उघडे राहीले आणि त्यातुन आनंदाश्रुचा वर्षाव होऊ लागला अंत:करणात सुखाच्या लाटा निर्माण होऊ लागल्या.त्यामुळे बाहय शरीर कापत राहीले शरीरातील सर्व रोमांचांच्या तळाशी निर्माण झालेले घामांचे थेबं आले, त्यामुळे जणु काही मोत्यांचा अंगरखा घातला आहे. असा तो दिसत होता. अशा प्रकारच्या महासुखामुळे जेव्हा जीवदशेची आटणी होऊ लागली, तेव्हा महर्षी व्यासांनी युध्दाचे वर्णन करण्यासाठी केलेली आज्ञा ती आटणी करु देईना.तेवढयात श्रीकृष्ण-अर्जुनाच्या सुखसंवाद धो-धो करीत संजयच्या कानी पडला त्यामुळे तो पुन्हा देहबुध्दीवर आला.मग ताबडतोब त्याने ऐक्यातील आनंदाश्रु पुसले शरीरावर आलेला घाम पुसला आणि तो  धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज इकडे लक्ष द्या. आता श्रीकृष्णवचनरुप बीजास संजयच्या सात्विकतेचा बिवड मिळाल्यामुळे श्रोत्यांना विविध प्रकारच्या सिध्दांतरुपी पिकांचा सुकाळ होईल. अहो, मन एकाग्र करत थोडे जरी लक्ष दिले तरी आनंदरुप राशीवर बसाल, कारण श्रवणेद्रिंयाला दैवाने माळ घातली आहे. म्हणुन भगवंताच्या विभूतीची जी स्थळे आहेत ती सर्व सिध्दांताचे राजे श्रीकृष्ण अर्जुनाला दाखवतील, असे सदगुरु निवृत्तीनाथांचे परमशिष्य श्री ज्ञानदेव महाराज म्हणाले.

सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय श्री भगवंताच्या कृपेने संपन्न ! (भगवद् गीता श्लोक १ ते ३४ आणि मराठीत भांषातरीत ज्ञानेश्वरी ओव्या १ ते ५३५ )

पुढील अध्याय