पाठीराखा-साई- १०

भक्तवत्सल बाबा

 

हरी ॐ बाबा… !  चमत्काराशिवाय नमस्कार नसतो. परंतु, अशीही काही ठिकाणे, काही व्यक्ती संत महात्मे असतात जिथे चमत्कार दाखवावा लागत नाही. तो आपोआप घडतो आणि मग ज्याच्या बाबतीत तो असतो. तो आपोआप नतमस्तक होतो. त्यास अगदी तन, मन, धन त्याठिकाणी अर्पण करावे असे वाटते. त्याला असे का वाटते याचे कारण जिव्हाळा, आत्मियता, सर्मपणात, श्रध्दा आणि सबुरी. जिथे मनाला शांती, समाधान लाभते. तिथे सुख आपोआप येथे आणि असे सुख लाभल्यावर त्यास कोणत्या तरी प्रचितीचा अनुभव येतो. अशी अनुभूती जेव्हा लाभते श्रध्दा वाढीस लागते. तेथे प्रेमही वाढीस लागते. हे सारे आपोआप घडते असे नाही. तर एखादी असामान्य शक्ती हे घडवीत असते. परंतु, त्यासाठी योग यावा लागतो. योग येतो तेव्हाच भोग सपंतात आणि भोग हे भोगावेच लागतात. बाबा सांगतात ते पूर्वजन्माचे असो अथवा या जन्माचे ते भोगल्या खेरीज यातून सुटका नाही. जोपर्यंत ते शक्य नाही. तोपर्यंत असा विरळा संतसंग शक्य नाही. एकदा का संतसंग लाभला की मनुष्याचे जीवन बदलून जाते. संतांच्या चरणी नतमस्तक व्हावे. सदा सत्संग घडावा असे मनोमन वाटू लागते. रोजच्या आचरणात जेव्हा या गोष्टी येतात तेव्हा मनुष्याचे जीवन बदलून जाते. एकमात्र मनुष्य योनी असा जन्म आहे ज्या जन्मामध्ये प्रभुपदाजवळ राहण्यासाठी ते मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करु शकता. कलियुगात श्रध्देने, जपाने, नामस्मरणाने तुम्ही या अशक्य गोष्टी सहजशक्य करु शकतो. यासाठी साईबाबांची भक्ती एक सोपा मार्ग आहे. कितीतरी देवदेवता आहेत. उपदेशपर ग्रंथ आहेत. साऱ्यातून एकच सार आहे. ईश्वर एक आहे. विधीचा विधाता एक आहे. अशा ईश्वराची प्राप्ती करुन घेण्यासाठी विविध भक्तीमार्ग सांगितलेले आहेत. साईनाम या संसार सागरातून आपणास सहजसुलभता देवू शकेल याची प्रचिती आपण वेळोवेळी घेवू शकतो. उक्ती, वाणी, करणी ज्यांची एकच आहे असे भगवान परमब्रम्ह साईबाबांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि मग पहा आपल्या भक्तीची प्रचिती. बाबांच्याजवळ जाण्यासाठी त्यांची भक्ती करणे जरुरीचे आहे आणि हे सर्वांना शक्य नाही. बाबा त्यांनाच आपल्या पायाशी बोलवतात ज्यांचे भाग्य उजळले आहे. त्यांच्याकडूनच ही प्रभुसेवा होते. कितीतरी लोक आहेत. शिर्डीची आस सर्वांनाच असते. परंतु, सर्वच बाबांच्या समाधी मंदिरी जात नाहीत. ज्यांच्या योगात नाही ते मंदिराच्या दारावरुन परत फिरतात तर काही रस्त्यावरुनच बघतबघत जातात. कोणी देवाचे देवळ आहे म्हणून उगाचच नमस्कार करतात. तेथे आत्मियतेचा आणि समर्पणाचा प्रश्नच उद्‌भवत नाही. त्यामुळे जगावेगळा हा प्रचिती देणारा, कणाकणात समाविष्ट असलेला परमब्रम्ह साई अनुभवास येणार नाही. धन्य ते भक्त, धन्य ते शिर्डीवासी ज्यांना बाबांचा अमूल्य आणि अप्राप्य असा सहवास लाभला. सानिध्य मिळाले. बाबांच्या लिला पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळाल्या. आम्ही पामरे आज त्यांच्या समाधी  सहवासातून आज तो आनंद घेवून स्वत:स धन्य मानत आहोत की, कोणत्या तरी जन्मात राहिलेली सेवा बाबांच्या रुपात विधीचा तो विधाता आम्हाकडून करुन घेत आहे.

 

।। हरि ॐ बाबा ।।