पाठीराखा-साई- १३

भक्तवत्सल बाबा

 

हरी ॐ बाबा… !   शिर्डीला तोच जावू शकतो ज्याला बाबांनी बोलावले आहे. अन्यथा शिर्डीला जाण्याचा कोणाचा, कितीही प्रयत्न असला. कितीही योजना केल्या असल्या तरी त्या सर्व निष्फळच. मागील उल्लेखाप्रमाणे पीएसआय झाल्यावरच शिर्डीस येईन हे नवस वजा मागणे. दोन वर्षांपूर्वीच मी सातारच्या गोडोलीच्या मंदिरात बाबांना सांगून मागे घेतले. बाबा मनात म्हणाले असतील अरे बाळा तू असा नवस बोलून येणार की नाही? हे तू नव्हे मी ठरवणार आहे. त्यामुळे काही दिवसातच एका जिलेबी आणलेल्या कागदात छापील निमंत्रण शिर्डीस येण्याचे मिळाले होते. तरीही पुन्हा शिर्डीस जाण्यासाठी चार वर्षे वाट पहावी लागली. शिर्डीस जाण्याचा संकल्प केला. तरीही अडथळे येत होते. काही केल्या नियोजन होतच नव्हते. ज्यांना ज्यांना मी शिर्डीस जाणार म्हणून सांगितले होते तेच आता उलट शिर्डीस कधी जाणार असा प्रतिप्रश्न करु लागले. मी सातारच्या बाबांच्या मंदिरात जावून लवकर शिर्डी दर्शनाचा योग आणून द्या म्हणून प्रार्थना केली. त्यानुसार गुरुवार २० मार्च २००८ या दिवशी निघालो. गुरुवार असूनही कराड – शिर्डी गाडीत आम्हास चार सीट जागा मिळाली आणि सायंकाळी ५ वाजता शिर्डीस पोहोचलो. बाबांच्या दर्शनासाठी नंबर लावला. साधारण दीड ते दोन तासांनी बाबांच्या समाधी मंदिरात पोहोचलो आणि पंधरा ते वीस मिनिटे बाबांची सुंदर, मनोहर मूर्ती न्याहाळली. बाबांच दर्शन घेवून हळूहळू मंदिराबाहेर आलो. साई सचरित्र वाचनामुळे पोथीमधील उल्लेखीत वस्तू, जागा शोधणे हे माझे काम होते. त्यानुसार नारळ फोडला, उदी घेतले. तात्या कोते पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतले  लिंबाच्या पवित्र झाडाचे दर्शन घेतले. पुढे बाबांनी स्वत: लावलेल्या पिंपळवृक्षाचे दर्शन घेतले. बाजूस असलेल्या शामकर्ण घोडयाचे स्मारक पाहिले तसेच दरवेशाच्या वाघास महादेवाच्या मंदिराच्या ठिकाणी पुरले होते तेही  पाहिले. पुढे जेवणासाठी कूपन घेवून प्रसाद घेतला. लाडू प्रसाद मिळाला. त्यानंतर आवो साई म्हणून ज्या ठिकाणी म्हाळसापतींना बाबांनी भैराबाच्या देवळात दर्शन दिले तेथेे दर्शन घेतले. अशा प्रकारे बाबांनी पूर्ण शिर्डीवारी शिर्डीदर्शन घडवून घेतले. त्यानंतर रात्री त्रिंबकेश्वरला प्रस्थान केले. पुढे त्रिंबक दर्शन घेवून आम्ही पहाटे पहाटे साताऱ्यात पोहोचलो. बाबांच्या कृपेने शिर्डी यात्रा पार पडली याबद्दल बाबांचे शतश: आभार. शिर्डीच्या सार्इंचे आणि त्रंबकेश्वरांचे दर्शन घेवून सातारा येथे पोहोचलो त्यानंतर जंरडेश्वर, कोल्हापूरची अंबाबाई, ज्योतिबा, सांगलीचे गणपती आदी तीर्थस्थळांना जावून आलो. तरीही यमाईदेवीची दर्शन राहून गेल्याची खंत मनात होती. पुढे सुट्टी संपली त्यानंतर पावसाळा सुरु झाला आणि यमाईदेवीचे दर्शन राहून गेले. तरीही एस. टी. स्टँडवर जावून औंध येथे जाणाऱ्या बसेसची माहिती घेतली. एक दिवस यमाई देवीच्या दर्शनास जाण्याचा बेत पक्का केला. मात्र तरीही जाण्याचे राहून गेले. परंतु साई बाबांच्या कृपेने यमाई देवीचे दर्शन झाले. त्या दिवशी सायंकाळपर्यंत कामातच होतो. मात्र अचानक माझा बंगला मी भाडयाने दिला होता. तिकडे चक्कर झाली. तिथे देवघर सोडून सर्व खोल्या भाडयाने दिल्या होत्या. आदल्या दिवशी सायंकाळपासून यमाई देवीच्या दर्शनाचे लागलेले वेध सार्इंनी २४ तासात पुरे केले. देवघरात ठेवलेल्या कपाटातून काही साहित्य आणण्यासाठी गेलो असता अचानक कपाटातून साहित्य काढताना पुणे येथून लॅमिनेशन करुन घेतलेला यमाई देवीचा फोटो समोर आला आणि औंध येथे न जाताही फोटो रुपात सार्इंनी यमाई देवीचे दर्शन घरातच घडवून आणले. देवाची करणी आणि नारळात पाणी या प्रमाणे मनात शुध्द भाव असेल तर देव नक्की भेटतो आणि साई आपल्या भक्ताचे मनोरथ सर्वथा पूर्ण करतात याची प्रचिती दिली.

 

।। हरि ॐ बाबा ।।