पाठीराखा-साई- १५

भक्तवत्सल बाबा

 

हरी ॐ बाबा… ! जसा स्वत:च्या मनाचा ठावठिकाणा स्वत: घेवू शकत नाही. जसे अथांग समुद्राचा अंत पाहू शकत नाही. जसे वाऱ्यास धरु शकत नाही. अग्नीचे प्रखर तेज पाहू शकत नाही. आकाशात लखलखणारी वीज कोठून कशी चमकेल, कोठे पडेल सांगू शकत नाही. पाऊस आणू शकत नाही व थांबवू शकत नाही. श्वास घेवू शकत नाही. श्वास देवू शकत नाही. परंतू जो स्वत: शाश्वत आहे. जो जगाच्या प्रत्येक हालचाली संवेदना अजमावू शकतो. असे बाबा या साऱ्यांचे नियंत्रक होते. त्यांचा मानवी सदेह अवतार मानवी कल्याणासाठी आणि पृथ्वीवरील धर्मघडी नीट बसवण्यासाठी होता. भगवान विष्णूंनी ८ अवतार घेतले. या प्रत्येक अवतारात त्या त्या काळात त्यांनी अनेक लीला, चमत्कार केले. असुरांचा नाश केला. बाबाही अवतारी पुरुष होते. त्यांनी मानवदेह धारण करुन शिर्डीत लिंबाच्या झाडाखाली प्रकट झाले. ते स्थान त्यांच्या गुरुचे स्थान होते, असे त्यांनी शिर्डी येथे भैराबाच्या भक्ताच्या अंगात आल्यानंतर त्यांना सांगितले. लिंबाच्या झाडाखाली खड्डा खोदून पाहिले असता काही अंतरावर चार प्रकाशमान समया दिसल्या आणि तप करण्याची जागा दिसली. नंतर ती बंद करण्यात आली. त्या स्थानावर बाबांनी गुरुवारी, शुक्रवारी धूप, दीप करण्यास सांगितले. बाबा शिर्डीत प्रकट झाले ते लोककल्याणासाठी. त्यांनी आंधळे, बहिरे, लुळे, पांगळे, कुष्ठरोगी, पंडुरोगी, जोगी, बैरागी, साधूसंत, भिकारी, गरीब, हिंदू, मुस्लीम असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना सारखेच जवळ केले. ज्या ज्या लोकांना समाजात स्थान नव्हते. ज्यांची समाज उपेक्षाच करायचा. ज्यांना कोणी आधार नव्हता. ज्यांची जगण्याची आशा संपली होती. अशा साऱ्यांना आधार देणारे, दिलासा देणारे, त्यांच्या समस्यांवर ठाम उपाय करणारे परिसरुपी बाबा भेटले. चिंतामणी रुपी बाबा भेटले आणि त्या त्या लोकांचे कल्याण झाले. अशा जनकल्याणामुळेच बाबांचे नाव लोकांच्या तोंडी झाले. जो तो शिर्डी के साई असे म्हणू लागला. या अवलियाने सर्वांना वेड लावले. असा मनमोहन शिर्डीत अवतरला आणि शिर्डीचे भाग्य फळास आले. शिर्डीत भक्तांची मुंग्यांसारखी रीघ लागली. तरीही शिर्डीस तेच जातात ज्यांचे भाग्य उजळले आणि बाबांनी ज्यांना बोलावले आहे. माझे भाग्य थोर मला श्री साईबाबांनी आपले केले आणि वयाच्या १६ व्या वर्षापासून त्यांची सेवा करण्याची संधी दिली आणि मला साईमय करुन टाकले. जिसका कोई नही, उसका खुदा है यारो, याचा वेळोवेळी प्रत्यय दिला. मला अंतरात्म्यातून स्फूर्ती, चेतना देत राहिले आणि माझी पावले योग्य दिशेने पडत गेली. अशा या बाबांची पुण्याई आणि माझ्यावर किती कृपा आहे. यामुळे बाबांनी माझ्याकडून ग्रंथाचे पारायण करुन घेतले. ज्या ज्या वेळी पारायण करण्याची इच्छा झाली. त्यावेळी असे पारायण का होवू शकत नाही? होवू शकते. ती सुप्त इच्छा बाबांनी पूर्ण करुन घेतली. पारायणही झाले. त्यानंतर नाथभक्तीसार हे पारायण कोणतेही अडथळा न आणता करुन घेतले. नाथांच्या लिला, चमत्कार लोककल्याणासाठी होत्या हे समजले. परमसदगुरु श्री दत्तात्रेय महाराज आणि त्रिगुणात्मक त्रिमूर्ती भगवान भोले शंकर यांच्या वरदहस्तानेच नाथांनी सिध्दी प्राप्त करुन घेतली आहे. त्या कशा प्राप्त केल्या याचे इंद्राला सुध्दा कोडे पडले होते. इंद्राने सुध्दा नाथांकडून त्या सिध्दी मिळवल्या. परंतु, सदगुरु, परब्रम्ह साईनाथ हे नाथांचे नाथ आहेत. ते साक्षात भोलेनाथ आहेत. ते दत्तात्रेय आहेत. प्रभु रामचंद्र आहेत . त्यामुळेच बाबांना अष्टमहासिध्दी प्राप्त होत्या. धोतीयोग, पोथीयोग, खंडयोग, समाधी योग बाबा करत असत. सर्वच ग्रंथ त्यांच्या तोंडपाठ होते. माता सरस्वती त्यांच्या जिभेेवर होती. बाबा म्हणजे चालते, बोलते परमब्रम्ह, बाबा म्हणजे जगदगुरु, बाबा म्हणजे कलियुगातील कल्याणकारी देवअवतार. ही खात्री पटली. माझ्या मनातील काही शंका नाथभागवत वाचून माझ्याकडून निरसन करुन घेतल्या. बाबांच्या कृपेने साई सचरित्राचे पारायणरुपात पठण झाले. पारायणाला बसताना त्यापूर्वी षोडषोपचार पूजा करुन पारायणास बसलो. बाबांनी माझ्याकडून नवनाथ भक्तीसार या ग्रंथाबरोबर साई सचरित्राचे पारायणही करुन घेतले. तरीही पारायणानंतर उद्यापन न झाल्याची खंत मनात लागून राहिली. यथावकाश बाबा ते करुन घेतीलच. ग्रंथपारायण त्यांनीच करुन घेतले. पारायण ऐकण्यास माझे मिलट्री रिटायर मित्र श्री. भोसले हे गुरुवारच्या दिवशी अंगतूक भेटण्यास आले आणि म्हणाले, आज माझा उपवास आहे. मी काहीही घेणार नाही. फक्त दूध दिले तरी चालेल. थोडा वेळ माझ्यासमोर देवघरात बसले. मला पारायण वाचन सुरु करण्यास सांगितले आणि आज मला गडबड आहे. तुमचेही पारायण सुरु आहे मी सहजच आलो होतो. नंतर निवांतपणे बसून बोलू. अशा प्रकारे कोणतेही बोलवणे, नियोजन नसताना मित्राच्या रुपात आले आणि मला कृतार्थ केले. ही अगाध करणी सदगुरु साईबाबांचीच. हे सारे बाबांनीच करुन हे मात्र नक्की.

बाबांची मर्जी असेल तर काय घडते आणि काय घडत नाही हे आपण साई सचरित्रात वाचलेच आहे. शंकराची भक्ती करणाऱ्या भक्ताला शंकराची पिंडच मिळवून दिली. विठ्ठलाची भक्ती करणाऱ्या दासगणूस विठ्ठल शिर्डीत प्रकट करुन दाखवला. एका भक्ताला त्याच्या सदगुरुच्या रुपात दर्शन दिले. एका भक्ताला प्रभु रामचंद्रांच्या रुपात दिसले. एका भक्ताला समर्थ रामदास रुपात दर्शन घडवले. एका भक्ताला त्याचे वडील हाका मारायचे त्या प्रमाणे हाक मारुन जवळ बोलावले आणि दर्शन न घेणारा तो भक्तही बाबांच्या पायाशी पडला. बाबांचे असे कितीतरी चमत्कार, साक्षात्कार आहेत. माझ्या ही मनात नाथांच्याबद्दल आवड होती. का कोणास ठावूक पण नवनाथ कथासार वाचावेसे वाटले. परंतु ते कसे वाचायचे. कोणते पुस्तक वाचायचे. त्यात किती अध्याय आहेत. अशा बऱ्याच शंका होत्या. बाबांनी वेळ येताच या साऱ्या शंकांचे निरसन करुन नाथकथासार घेवून दिला. मी शिखर शिंगणापूर यात्रेच्या बंदोबस्तासाठी गेलो होतो. त्यावेळी दहा  ते बारा दिवसांसाठी आम्ही सर्वजण तेथेच असायचो. बरोबर मोजकेच पैसे असायचे. अशा वेळी ग्रंथ घेण्याचे नियोजन केले आणि ते बाबांनी पूर्ण केले. माझा बंदोबस्त मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या ठिकाणी होता. या ठिकाणी मोबाईलची रेंज असल्यामुळे बोलणाऱ्यांची गर्दी होती. एक दिवस दोन तीन व्यक्ती कोणाला तरी फोन करत होत्या. त्यानंतर त्या पूर्व दरवाजाने देवळात जावू लागल्या. या ठिकाणावरुन सर्वांसाठी प्रवेश बंद होता. त्यामुळे मी त्यांना विचारले. येथून दरवाजा बंद आहे. तुम्ही पुढील दरवाजाकडून जावा. त्यावेळी ते म्हणाले, तुमच्या दहिवडी पोलीस ठाण्याच्या मुख्य साहेबांना फोन लावला आहे. त्यांनीच दर्शन घेण्यासाठी सांगितले आहे. आणखी विचारपूस करता त्यांनी त्यावेळीचे गृहराज्यमंत्री सिध्दराम म्हेत्रे यांच्याकडे कामास असून तुमच्या साहेबांशी त्यांचे बोलणे झाले असून दर्शन करुन देतो पाठवून द्या असे सांगितले आहे. त्यामुळे मी स्वत: त्यांना घेवून मंदिरात गेलो. तेथे स्वत: डीवायएसपी भक्तांची लाईन लावत होते. त्यांना मला भेटलेल्या संबंधित भाविकांबद्दल सांगितले. तेव्हा साहेबांनी सरळ रांगेत या म्हणून सांगितले. मीही त्यांना कसेबसे मध्येच रांगेत उभे करुन एकदाचा सुटलो म्हणून निघून गेलो. त्यानंतर मी पुन्हा पूर्व दरवाजाच्या ठिकाणी आलो असतो. ते दर्शन करुन माझी वाट पहात होते. ते म्हणाले, आता बळीच्या देवळात जायचे आहे. मीही विचार केला आता बळीच्या देवळात कसे ना कसे यांचे दर्शन करुन देवून जवळच हॉटेलमध्ये यांच्यासोबत आपणही चहा पिवून येवू. गर्दीत कसे तरी बळीच्या देवळात दर्शन त्यांनी घेतले. पुढे चहा झाला. चहाचे बिल त्यांनीच दिले आणि निरोप घेताना दर्शन लवकर घडवून दिल्याबद्दल माझे आभार मानून जाताना माझ्या खिशात काही पैसे ठेवले. मी त्यांना म्हणालो, हे पैसे वगैरे मी काही घेणार नाही. ते म्हणाले , तुम्ही गप्प बसा हो. नाही म्हणता येणार नाही. आणि ते निघून गेले. पुढे रात्रीपर्यंत डयुटी करुन मी रुमवर गेलो असता मला त्या पैशाची आठवण आली. मनात म्हटले बघुया तरी पाच पंचवीस रुपये असावेत. पाहतो तो काय चांगले दोनशे रुपये होते. मला एकदम बाबा आठवले. त्यांनीच पैसे पाठवले आहेत असे समजून मी गप्प बसलो. नवनाथ भक्तीसार घेण्यासाठी जवळ पैसे नव्हते. त्यामुळे बाबांनीच हे पैसे पाठवले. मग उद्याच ग्रंथ खरेदी करायची असे ठरवून यात्रेतील दुकानातून १७० रुपयांची ग्रंथ खरेदी केली. उरलेले तीस रुपये अशाच कामासाठी खर्च करण्याचे ठरवले. पुढे शिखर शिंगणापूर यात्रेत बंदोबस्त झाल्यानंतर जाण्याच्या दिवशी पूर्व दरवाजाजवळील मारुतीच्या मंदिराजवळ असणाऱ्या नागाबाबांचाही निरोप घेतला. नागाबाबा आले त्या दिवसापासून यात्रेच्या शेवटच्या दिवसापर्यंत मारुतीच्या देवळापाशी बसायचे. जायच्या दिवशी त्यांनी जवळ बोलावून म्हणाले, आप उस दिन कुछ पूछ रहे थे । मी म्हणालो, काही नाही. रहने दो. खरं तर त्यांना ज्योतिष वगेैरे काही येते का हे विचारले होते. परंतु ज्योतिषांचे ज्योतिषी साईबाबा असताना मी एवढे कोणाशी विचारत नसे. जाण्याच्या दिवशी मात्र नागाबाबांनी एक पंचमुखी रुद्राक्ष दिला. ते म्हणाले, मै नागा हूँ। नागा बाबा ऐसे किसी को कुछ नही देते । किसीको बुलाते भी नही । लेकीन आपमे कुछ खास बात है। ये रुद्राक्ष आपको दे रहा र्हॅू । कोई एक लाख देने से भी नही दुगां । इसे सांभाल के रखो । मी मनात ठरवले. नागाबाबांना किमान २१ रुपये दक्षिणा द्यावी. तेवढे पैसे मी देवू शकत होतो. तेवढयात नागाबाबा स्वत म्हणाले, देखो आप मुझे ३० रुपये दे देना । याच नागाबाबांना साईबाबांनी पाठवले असे मी मानायचो.परंतु जेव्हा त्यांनी ३० रुपये मागितले तेव्हा बाबांच्याबद्दल आणखीन खात्री झाली. ३० रुपये घेण्याचा आदेश बाबांनीच दिल्यामुळे त्यांनी ११, २१, ५१ आदी दक्षिणा न मागता सरळ ३० रुपये मागून घेतले. ग्रंथ खरेदीसाठी १७० रुपये खर्च झाला. रुद्राक्ष देवून नागाबाबांच्याकरवी ३० रुपये मागून घेतले अशा प्रकारे बाबांनीच २०० रुपये मिळवून दिले आणि ग्रंथ व रुद्राक्ष खरेदी करुन दिला. अशा या बाबांची करणी व कथनी एकच असते. ते भक्तांसाठी किती दक्ष असतात ते भक्तांची इच्छा कशी पूर्ण करतात याचा दृष्टांत दाखवून दिला.

 

।। हरि ॐ बाबा ।।