पाठीराखा-साई- १९

भक्तवत्सल बाबा

 

हरी ॐ बाबा… !  भगवान सदगुरु शिर्डीपती श्री साईबाबांचा स्वप्नातील प्रत्यक्ष दर्शनाचा आणि माझ्याशी संवाद करण्याचा दृष्टांताविषयी, स्वप्नाविषयी उल्लेख वाचलाच. खरं तर हा कलियुगातील चमत्कार आहे. असे आजकाल क्वचितच होते. लाखो करोडो भक्तांच्या गर्दीत भगवंत भेटीचे पुण्य एखाद्या पुण्यवानालाच मिळते. ते मला मिळाले आणि मी बाबांचा जन्मभराचा ऋणी झालो. बाबांचे ते शब्द. बाबांनी मला धरुन उठवणे हा दर्शन सोहळा. स्वप्नातही प्रथम पादुकांचे दर्शन आणि नंतर बाबांचे दर्शन. मी तर स्वप्नातही ते चरण सोडले नाहीत. माझे डोके त्या चरणावर ठेवून दर्शन घेत राहिलो. बाबांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा अनुभव अशा प्रकारे स्वप्नात घेतला. तर ज्यांनी प्रत्यक्ष दर्शनाचा अनुभव शिर्डीत घेतला असेल ते किती भाग्यवान याची कल्पनाच करवत नाही. बाबांचा हा मनुष्य अवतार अगदी अलिकडचा आहे. तो म्हणजे १८४० ते १९२० दरम्यानचा. म्हणजेच मनुष्याची भक्तीची शक्ती काहीतरी प्रतित शिल्लक  आहे. त्यामुळेच भगवतांने साईरुपात आपला अवतार घेतला. मनुष्यमात्रास याबाबत काही समजले आहे की नाही कोणास ठावूक. या नरदेहाचे सार्थक कशात आहे? या मनुष्य जन्माचे सार्थक कशात आहे? ते न कळाल्यामुळेच कलिच्या मोहपाशात मानव गुंतून पडला आहे. ते नाम सोपे रे अवघेचि गोंविद अशी सहजसुलभ रचना करुन भगवंत प्राप्तीचा नामस्मरणासारखा सोपा मार्ग सुध्दा मनुष्यमात्राने सोडून दिला आहे. जे या मार्गात सहृदय आले त्यांना अर्थातच बाबांच्या हृदयात स्थान आहे. त्या त्या भक्तांचा बाबा अतिशय चांगला सांभाळ करतात. असा आणखी एक अनुभव बाबांकडून मला मिळाला. मी पीएसआय परीक्षेसाठी बसल्यावर जसजसे एकेक परीक्षा पुढे जात होतो. तसतसे मनोमन देवांचे आभार मानत होतो. त्यामुळे देवदर्शनाला जाताना बुध्दीला स्मरेल तसा नवस मी त्या ठिकाणी बोलायचो. की आता पुढील परीक्षा चांगली पास होवू देत मी दर्शनाला येईन. असे नवस बोलून दिवस पुढे पुढे चालले होते. एकदाचा एमपीएसपीतर्फे पीएसआयचा निकाल साईटवर जाहीर झाला. परंतु त्यात माझे नाव नव्हते. निराशा पदरी पडली. पहिली आठ दहा दिवस निकालाच्या ओझ्याच्या दबावात गेलो. या दरम्यान बऱ्याचजणांनी माझी मजा घेतली. मनात म्हणाले असतील बराच उडया मारत होता. पीएसआय होणार म्हणून काय झाले कळाले ना. ते कोणाचे पण काम नव्हे. याबाबतीत मी तरी सध्या मौन बाळगले होते. निकालाबाबत सांशक असल्याकारणाने आयोगास तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर पीएसआय या विषयावर विचार करणे बंद केले. परंतु नवसाचे काय? अधीमधी काय बरे वाईट झाले की ते ध्यानात यायचे. याबाबत बाबांना मात्र माझ्यापेक्षाही जास्त काळजी होती. परंतु मी मात्र ते समजू शकलो नाही. पुढे बऱ्याचदा मनातून असे वाटाय चे की कोटेश्वरला दहिभाताच्या पूजेचा अभिषेक आणि साईबाबांना पोषाख तरी करु. बाकीचे नवसही हळूहळू फेडू. पीएसआय झालो नाही म्हणून काय झाले? नवस रुपात देवाच्या पूजा होतील तर चांगलेच होईल. परंतु हा झाला माझ्या मनातील विचार. या विचाराला मूर्त रुप देता देता दोन तीन महिने गेले. पुढे दिवाळी तोंडावर आली. एक दिवस वेळ काढून दुपारीच बाबांच्या दर्शनाला गोडोली येथे गेलो आणि त्यावेळी नवसाबाबत बाबांना सर्व काही बोलून टाकले तसेच यातून काहीतरी मार्ग दाखवा असे बोलून थोडा वेळ जप करुन मंदिरातून घरी आलो. दुपारचे दोन अडीच वाजले असतील. बाबांच्या भक्तीची प्रचिती घ्या. अनुभव घ्या. बाबा एका अध्यायात स्वत: म्हणाले आहेत, माझा शब्द हे प्रमाण माना. मी माझ्या भक्तासाठी अहोरात्र झटेन. परंतु जो श्रध्देने, निष्ठेने माझी पूजा करतो.त्याला मी कधीच काहीही कमी पडू देणार नाही. नवसाच्या बाबतीत नुकतेच दुपारी बोलून आलो होतो. बाबा पीएसआय झालो नाही म्हणून काय झाले? आपणास संपूर्ण पोषाख करायचा नाही हे काही बरोबर नाही. तो पोशाख मी माझ्या बाबांच्यासाठी करतोय. तसेच भोलेनाथाची दहिभाताची पूजा केली तर तीही भक्तीपोटीच करत आहे. एवढे मानून घ्या. बाकी मी आपणास वचन देतो की इतर कोणतेच नवस मी ग्राह्य धरणार नाही. एवढे वचन मी बाबांना देवून घरी पोहोचलो. घरी आल्यानंतर माझे डोळे आनंदाने डबडबून गेले. मन गहिवरुन आले आणि घरातील बाबांच्या फोटोपुढे दोन आसवे ढाळली सुध्दा. ते कारणच तसे होते. नुकतेच अर्धा तासापूर्वी बाबांच्या देवळात समाधीपुढे नवसाबाबत बोलून आलो होतो. बाबा होनी को अनहोनी और अनहोनी को होनी तो आपही कर सकते हो । यह आपके बाये हाथ का खेल है। हम इंसान तो कटपुतली है । अगर आप चाहे तो मेरा एमएससीआयटी का फेल रिझर्ल्ट पास हो सकता है। तो पीएसआय की लिस्ट क्या चीज है। बनानेवाला भी चक्कर खायेगा. उसका दीमाग भी आपके इशारे पे काम करता है। यहा बडे बडे डॉक्टर कॉम्प्युटर फेल है। असे बरेच काही बाबांच्या मंदिरात समाधीपुढे बोलून घरी आलेला मी जेव्हा घरात गेल्यावर पत्नीने सांगितले मघाशी पोस्टमनने एक पाकीट दिले आहे ते देवाजवळ ठेवले आहे. ते पत्र त्यांना लगेचच द्या. फक्त याच पत्रासाठी मी येथे आलो आहे. ते त्यांच्या नियुक्तीचे पत्र आहे. तो म्हणाला, साहेबांना एवढेच सांगा. पेढे पाहिजेत.  मी पळतच देवघरात गेलो. माझी अवस्था वर्णन करा. कशी असेल. जर असे शब्द ऐकले तर तुमच्या डोळयातून पाणी येईल की नाही? ते तुम्हीच ठरवा. मी स्वत: तो अनुभव घेतोय. खरोखरच ते पत्र माझ्याबाबत आयोगाने गृहमंत्रालयास पीएसआय या पदाबाबत शिफारस केल्याचे पत्र होते. जर त्याच पत्रासाठी पोस्टमन आलो असे म्हणत असेल तर मग ते बाबा नसतील कशावरुन ? तरीही बाबांनी सांगितल्यानुसार कोणतेही काम करण्याअगोदर भाकर तुकडा खा. दोन घोट पाणी प्या आणि मग काम करा. उपाशी पोटी ब्रम्ह म्हणजे मी सापडत नाही. मी ते आठवून दोन घास खाल्ले. त्या पत्रातील साक्षांकन नमुना झेरॉक्स मारुन भरला. ती शिफारस मंत्रालयाकडे जाणार होती. त्यानुसार धाकटया भावास फोन लावला. आ. शिवेंद्रराजे भोसले आहेत का? असे विचारण्यास सांगितले. माझे बंधु दै. पुढारीत होते. त्यांनी तसेच फोन करुन बंगल्यावर बोलावले. आम्ही आ. भोसले यांना भेटण्यासाठी बंगल्यावर गेलो. मात्र शिक्क्याअभावी त्यांची स्वाक्षरी मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी प्राचार्य यशवंतराव पाटणे यांची स्वाक्षरी घेवून शिफारसपत्र स्पीड पोस्टने आयोगास मंत्रालयात पाठवले. अशा प्रकारे बाबांनी माझ्याकडून प्रथम वचन घेतले की उगाचच अवडंबरात पडू नकोस. मला शरण आला आहेस तर इतरत्र नवस बोलून स्वत:स संकटात टाकू नकोस. त्याचबरोबर देवदर्शनानिमित्त सर्व ठिकाणी गेल्यानंतर त्या त्या ठिकाणी बोललले नवस मी ग्राहय धरत नाही. असे माझ्याकडूनच त्यांच्या समाधीपुढे वदवून घेतले. पुढे क्षणाचाही विलंब न लावता. माझ्या घरी पीएसआय नियुक्तीचे पत्र पोहोच झाले. अशी कोणती सेवा जगभरात आहे? ज्या प्रकार एमएससीआयटीचा ईमेल आला नी मी पास झालो तसेच येथेही दुपारच्या वेळी भर उन्हात एक पोस्टमन तात्काळ घरी येतो पत्र देवून जातो. ते पत्र माझ्या नियुक्तीचे होते. मी पत्नीस विचारले, त्या पोस्टमनला कमीत कमी पाण्यासाठी तरी विचारायचे होते. एवढे बोलून तू त्यांना कसे काय ओळखले नाहीस? कोण होते ते? पुढे मी जास्त काही बोललो नाही. कारण ते बाबाच होते. हे मात्र नक्की आणि जो हे ओळखेल तो माणूस कसला ?

 

।। हरि ॐ बाबा ।।