पाठीराखा-साई- २२

 

भक्तवत्सल बाबा

 

हरी ॐ बाबा… !  कृपेची सावली, भक्तांची माऊली. कनवाळू साईबाबा हे भक्तांच्या भक्तीवर प्रसन्न होतात. तन, मन, धन अपूर्ण सेवा केल्यास कलीच्या युगात तात्काळ आपल्या भक्तीचे फळ देणारे साईबाबा आहेत. मी मोठा नशीबवान. लहानपणापासून साईसहवास घडत राहिला. माझी मनोभावे सेवा बाबांनी मान्य करुन घेतली आणि आपल्या ११ वचनापैकी प्रत्येक वचनाची प्रचिती मला पावलो पावली दिली. मी साईमय झालो. माझा परिवार साईमय झाला. बाबांची भक्ती वेळ मिळेल तेव्हा, वेळ मिळेल तशी करणे हेच आमचे काम. त्यामुळे असे कधीच होत नाही की वेळ  मिळत नाही. आज मी जे काही आहे ते सदगुरु साईबाबांच्यामुळे आहे. भविष्यात मी आणि माझा परिवार असणार आहे तो साईमयच असणार आहे. बाबांच्यासारखे परमदैवत असताना मी कोणत्याही गोष्टीची काळजी करत नाही. बाबांच्यामुळेच चिंता मिटतात. बाबांच्या भक्तीचे अनुभव घेता घेता सिध्दहस्त लेखणी बाबांनीच हाती दिली आणि एक पान कसे लिहू करता करता इथपर्यंत आलो. काय ही बाबांची किमया. काय ही त्यांच्या भक्तीची जादू. उपरवाले तेरा जबाव नही असेच माझ्याबाबतीत बाबांनी घडवले आहे. बाबांची भक्ती करताना कितीतरी अनुभव आले. ते चांगलेच होते. संघर्ष करत राहिलो. बाबांचे नाव घेत राहिलो. पडत राहिलो. दुप्पट आवेगाने स्वत:ला सावरत राहिलो. बाबांच्या कृपेने यश मिळत राहिले. बाबांची असिम कृपा हेच माझे या कलियुगात लढण्यासाठीचे अमोघ अस्त्र आणि शस्त्र आहे. बाबांची भक्ती करताना इतर अनुभवाबरोबर सातत्याने एक निराळा अनुभव मला मिळाला. तो म्हणजे एखादी वस्तू खायची इच्छा होते ती इच्छा कधी कधी लगेचच तर कधी कधी दिवसभरात पूर्ण होते. म्हणजेच २४ तासात तो पदार्थ कोणत्याही प्रकारे माझ्यापर्यंत पोहोचतोच. किंवा कोणी कोणाला तरी घेवून ते हजर होते. कधी कधी कोणी बोलावून नेवून तोच इच्छा असलेला पदार्थ खाण्यास देतात. याचा मी कितीतरी वेळा अनुभव घेतला आहे. माझी मनापासून इच्छा झाली की आज अमूक अमूक पदार्थ खावा. अमूक अमूक वस्तू घ्यावी ते सारे तसे तसे होत मी त्या पदार्थाजवळ पोहोचतो. कधी कधी खिशात पैसे नसतात. कधी कमी असतात त्यावेळी दुसरे कोणीतरी घेवून देते किंवा पैसे तरी खिशात येतात. कितीतरी मोठया कामात हाच अनुभव घेतला आहे. ते करावयास घेतले आणि अचानक पैसे कमी पडले. पुढे काय? पुढे श्री साई… दुसरे काय? ते नाम सोपे रे.. बाबांना आर्त मनाने सांगितले ते  पुरे व्हायलाच पाहिजे. परंतु, असे असताना मी मात्र कधीही केव्हाही, अवास्तव, विनाकारण किंवा हट्टाने कसलीच मागणी केली नाही. गरज पडेल तेव्हाच आपल्या ऐपतीप्रमाणे रोजच्या जीवनातील गरज विचारात घेतल्या. कधीही इंद्राच्या ऐरावतीची स्वप्ने पाहिली नाहीत. तसा विचारही केला नाही. असे करु तर ती भक्ती नसून आसक्ती झाली. आणि ती काय कामाची.

ईश्वराची  भक्ती करण्याचे अनेक मार्ग शास्त्रात सांगितले आहेत. हिंदू वैदिक संस्कृती प्रमाणे पुजाअर्चा, यज्ञ, याग, जप, तप, होमहवन, कीर्तन, भजन, आवर्तने, सामुहिक प्रार्थना आदी ज्याला जसे घडेल जशी सापडेल, ज्याच्या नशिबात जशी आहे तशी व तितकीच भक्ती कोणत्या ना कोणत्या तरी रुपात करण्यास मिळत असते. ते आपल्या कर्मावर अवलंबून असते. एखादा ब्राम्हण कुटुंबात जन्माला येवून सुध्दा भगवंतांची भक्ती करु शकत नाही. तर एखादा सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला व्यक्ती अन्यन्यभावाने ईश्वराला शरण जावून कीर्तनकार सुध्दा होतो. भक्तीचा महिमा तसाच आहे. जो ईश्वरास शरण जातो. तो वाया जात नाही. त्याचे कल्याण होते. मलाही बाबांचा गोड सहवास मिळाला. गतजन्माची पुण्याइ म्हणून बाबांची सेवा करता आली. लोखंडास जसा परिसाचा स्पर्श होताच त्याचे सोने होते तसेच साईरुपी परीस या लोखंडास लाभला आणि जीवनाचे सोने झाले. अचानकपणे बाबांच्या भक्तीत पूर्णपणे ओढलो गेलो. बाबांच्यामुळे जगण्याची जिद्द मिळाली. जीवनात एक ध्येय ठेवून जगण्यासाठी आपले कोणीतरी मिळाले. उत्तरोत्तर सार्इंची भक्ती वाढत गेल्याने जेवढे दिवस जसे बाबांनी बोलावले. त्या त्या वेळी मी साई मंदिरात हजर झालोच म्हणून समजा. याच काळात गोडोलीच्या साई मंदिरात येणे जाणे वाढल्याने येथील कदम, महाडिक, शिंदे, रानडे, दीपक जॉईल आदी सेवेकरी ओळखीचे झाले. माझी निष्काम भक्ती पाहून त्यांनाही चांगल वाटले. एके दिवशी साताऱ्यात राजवाडा परिसरातून घरी येत असताना साई मंदिरातील साईंचे पुजारी श्री. रानडे यांची भेट झाली. फक्त तोंडओळख होती तरीही दोन चार मिनिटे बोलणे झाले. जाता जाता त्यांनी तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा आरतीच्या अगोदर गोडोली मंदिरात या. तुमच्या हस्ते बाबांची आरती घेवू असे सांगितले. गोडोलीच्या साई मंदिरात साईंची आरती आपण पीएसआय झाल्यानंतरच करायची असे ठरवले होते. परंतु २००५ ते २००८ पर्यंत निकालाचे प्रक्रिया लांबल्याने या सर्व आशा मी सोडून दिल्या होत्या. तसेच यानिमित्ताने बोललेले नवसही फेडणे सुरु केले होते. गोडोलीच्या साई मंदिरातही झुणका भाकरीचा नवस बाबांंना नैवेद्य दाखवून मागे घेतला होता. प्रार्थना केली होती. हे बाबा मी नवसरुपात पीएसआय होण्यासाठी बोललो होतो. साकडे घातले होते. परंतु असा नवस जर आपल्या भक्तीच्या आड येत असेल त्यामुळे मी शिर्डी दर्शनापासून वंचित होत असेन तर हा नवस मी मागे घेत आहे. कृपया मला शिर्डी दर्शन घडवा. मागे लिहिल्याप्रमाणे निमंत्रण एका वृत्तपत्रातून मिळाले होते. त्यानुसार आरतीचाही नवस मागे घेतला होता आणि लवकरच सार्इंची आरती आपल्या हस्ते व्हावी असे वाटत असतानाच बोलाफुलास गाठ पडली आणि श्री. रानडे यांच्याकरवी सार्इंनी माझी आरतीची इच्छा पूर्ण केली. एके दिवशी दुपारी मंदिरातून दर्शन घेवून सभा मंडपात आलो असता मंदिरातील सेवसेवेकरी शिंदे माझ्याजवळ आले आणि आजची दुपारीची आरती तुमच्या हस्ते व्हावी असे म्हणाले. त्यानुसार त्या दिवशीची आरती मी केली. सर्व लोकांमध्ये मागे राहून  आरती करणे, टाळया वाजवणे, कसेही उभे राहणे, इकडे तिकडे लक्ष जावू देणे हे पुढे चालत नाही. ज्या वेळी तुम्ही सार्इंच्या आरतीसाठी पंचारती घेवून उभे असता तेथे तुम्ही पूर्णपणे एकाग्र असावे लागते. येथे सात्विकतेची परीक्षा द्यावी लागते. ही तयारी झाल्यावर साई आरतीस योग्य ठरवतात आणि माझ्यासारखा साई मूर्तीसमोर पंचारती घेवून आरती करण्याचा योग येतो. जे काय आहे ती साई बाबांची कृपा. परंतु बाबांच्या आरतीचे महत्व, महात्म्य आहे. ते आरतीस उपस्थित राहून आरती केल्यावर अनुभवता येते. धन्य धन्य ते साई भक्त ज्यांना सार्इंचे आरती करण्याचे, घेण्याचे परमभाग्य लाभले.

सत्य युग, त्रेतायुग, द्वापर युग अशी युगे होवून गेली. तर कलिचे उत्तर कलियुग सुरु आहे. याबाबतचे वर्णन चार वेद, अठरा पुराणे आणि महापुराणे यात आहे. तद्वतच या युगांचा कालावधी पाच हजार वर्षांचा गृहीत धरला आहे. या नंतर प्रत्येक युगाचा अंत होत असतो आणि हा सृष्टी चक्राचा नियम आहे. त्यानुसार कलियुगात कलिचे युग सुरु आहे. या युगात देवांनी, वेदांनी, ऋषींनी वर्णन केल्याप्रमाणे भयंकर अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, धर्माविरोधात आचरण, रुढी, प्रथा, परंपरा, संस्कार, संस्कृती याची पायमल्ली होणार आहे. अज्ञान वाढल्याने देवांचे दर्शन होणार नाही. देव प्रकट होणार नाहीत. हे सर्व कलि घडवून आणणार आहे. पृथ्वीवरील या हाहाकाराचे जगबुडीत रुपांतर होईल. भविष्यवेत्त्याने वरील प्रमाणे सांगितलेले भविष्य असून त्यानुसार मानवाची पावले पडत आहेत. असो. हा कलियुगाचा फेरा आहे. ज्या प्रकारे भयानक वर्णन झाले. त्यानुसार काही बुध्दीवंतांनी, वेदाचार्यांनी देवास विचारले, हे भगवंता, या भयंकर कलियुगात मनुष्य तरणार कसा? त्याच्याकडे पुण्यसंचय कसा होणार? त्याचा उध्दार होणार तरी कसा? यावर भगवंतांनी सांगितले. केवळ नामस्मरण, अखंड नामस्मरण, भगवतांचे हे नामस्मरण मनुष्यास कलियुगात तारु शकेल. वरील माहिती मी ग्रंथात वाचली. त्यावेळी एवढी गांभीर्याने घेतली नसल तरी आजमितीस अनुभवत आहे. याच ओघात साई बाबांच्या सानिध्यात आलो आणि साई नामाची गोड सेवा नामस्मरणातून घडू लागली. अमृताहूनही गोड नाम तुझे देवा असेच सार्इंचे नाव आहे. जो मनापासून नित्य नामस्मरण करतो त्याचा उध्दार केल्याशिवाय साई राहणार नाहीत.साई चरित्रात तसा उल्लेख केला आहे. बाबा म्हणतात, माझी हाडे सुध्दा समाधीतून बोलू लागतील परंतु खऱ्या मनाने नामस्मरण करा. साई पारायणाच्या वेळी वरील प्रमाणे बरेच प्रत्यय मला आले. परंतु त्यावेळी ते शब्दबध्द करता आले नाहीत. परंतु नंतरच्या पारायणाच्या वेळी बाबांनी  ते शब्दबध्द करुन घेतले. सार्इंच्या एका अध्यायातील वर्णनाप्रमाणे दोन भक्त त्यांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत गेले असता बाबा त्यांना विचारतात. रस्ताने येताना काय घडले ? त्यावेळी ते सांगतात की रस्त्यातून येताना दत्तदर्शर्न न घेता आम्ही गडबडीत आपले दर्शन घेण्यास आलो. यावेळी बाबा त्यांना सांगतात जर दत्तात्रेयांचे दर्शन न घेता याल तर मी तुम्हाला पावेन कसा. पारायणावेळी माझ्या बाबतीत हाच योगायोग घडला. पारायण करतेवेळी मी घरातील देवांची पुजा करुन नैवैद्य दाखवून त्यानंतर पारायण सुरु करायचे या काळात आठ दिवस बाबांना दुग्धपंचामृताचे अभिषेक केले. तसेच पारायणाच्या त्या त्या दिवशी त्या त्या देवतेस साई मूर्तीबरोबर अभिषेक करायचो. देव्हाऱ्यातील सर्व देवांना यानिमित्ताने अभिषेक झाले. दोन वेळा दत्त मूर्तीस अभिषेक झाला. परंतु एकदा याच दत्तमूर्तीस अभिषेकास घ्यावे की नको म्हणून चलबिचल झाली. फक्त बाबांनाच अभिषेक करुन लवकर पारायण सुरु करुया. असा विचार केला. परंतु तरीही दत्त मूर्ती आणि बाबांवर अभिषेक करुन मगच वाचन सुरु केले. पारायण सुरु असताना वाचनात वरील उल्लेख आला. दत्तात्रेयांचे दर्शन चुकवून मी तुम्हास पावेन का ही ओळ वाचली आणि मन भरुन आले. तरीही दत्त मूर्तीस अभिषेक करुन पारायण केल्यामुळे मनास समाधान वाटले. बाबांनी आज मला प्रचिती दिली. या कलियुगात आपल्या भक्तीनुसार प्रचिती मिळते. त्यातून देव आहे हे मानावयास लागेल. फक्त मन:पूर्वक, शुध्द भावाने शोधावा लागेल. जास्त अभिलाषा न ठेवता जर भक्ती कराल तर तशी प्रचिती आपोआप येईल. सदगुरु साईंचे पारायण करताना पानोपानी ते अनुभवले. ग्रंथातील कितीतरी थरारक क्षण मनास अद्‌भूत आनंद देवून गेले. जी काय माझ्या हातून पुजाअर्चा पार पडली. बाबांनी ती मान्य करुन घेतली. एक लेखक म्हणून मला हा सन्मान दिला. बाबांची सेवा हा लेखनरुपी अभिषेक करुन करु शकलो हे काय कमी आहे का?

॥ हरि ॐ बाबा ॥