पाठीराखा-साई- ३

ज्योतिषांचे ज्योतिषी बाबा

 

हरी ॐ बाबा… !  सर्वव्यापी, सगुणाच्या आणि निगुर्णाच्या परे असणाऱ्या त्रिकालदर्शी बाबांच्याबद्दल काय लिहायचे. हे लेखणी अन लिखाणप्रपंच माझ्या भक्तीचा गोडवा असला तरी बाबांच्या कृपाछत्राचे प्रतीक आहे. या प्रतिकाला माझ्यासारख्या अज्ञान पामराकडून त्यांनीच शब्दबध्द केल(le) आहे. एरव्ही शब्दांचेही धाडस काय की ते जिभेवर असून तोंडात येतील आणि डोक्यात असून लेखणीतून उतरतील. बाबांच्या चरणी स्वत:स तनाने, मनाने, धनाने वाहून घ्या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. बाबांची भक्ती मला कळायला लागल्यापासून करतोय त्याला २४ – २५ वर्षे होत आली. दिवसेंदिवस अधिक दृढ होतेय ही त्यांचीच कृपा. पावलो पावली त्याची अनुभुती मिळते हे माझे परमभाग्य ! कारगिल येथे नोकरी केल्यामुळे बाबांच्या कृपेने मला पुढची बदली पुणे कॅम्प येथे मिळाली आणि मिलिट्रीत असून सुध्दा घराच्या दोन अडीच तास एवढया जवळ अंतरावर मी बदली होवून आलो. याला बाबांचीच कृपा म्हणायची नाहीतर आणखी काय. बाबांच्या कृपेमुळेच मी बी. ए. ऑनर्स इतिहास विषयातून झालो. पुढे मिलिट्रीत भरती व्हायच्या अगोदर जे फौजदार व्हायचे स्वप्न होते ते मूळ धरु लागले त्यासाठीची ग्रॅच्युएटची अट मी पूर्ण केली होती. इतर अटींची पूर्तता चौकशीअंती होणार होती. कारगिल येथील नोकरी म्हणजे जान बची तो लाखो पाये अशी. त्यामुळे तेथे पूर्ण नोकरीवरच लक्ष केंद्रीत ठेवले असल्यामुळे शिक्षणात खंड पडला. पुढे पुण्यात आल्यावर चाणाक्य मंडलचे अविनाश धर्माधिकारी सरांची भेट घेण्याचे ठरवले. ती झाली नाही. स्टडी सर्कलचे प्रा. आनंद पाटील सर यांची भेट मागितली आणि ती मिळाली. त्यांनी माझ्यासाठी दहा मिनिटे का होईना वेळ दिला. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनानुसार अभ्यास सुरु केला. २८ ऑगस्ट २००५ रोजी पीएसआयची पूर्वपरीक्षा होती. मागील तीन चार वर्षात पीएसआयच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. याच कालावधीत माझी नोकरीची १५ वर्षे पूर्ण होत होती. परंतु लगेचच डिस्चॉर्ज मिळणार कसा? माझा ज्योतिष शास्त्रावर विश्वास असल्यामुळे मी साताऱ्यातील वशिष्ठ मणीशंकर जानी यांच्याकडे माझी पत्रिका घेवून एकटयासाठी भेट मागितली. फोनवर तसेच बोललो असता त्यांनी सांगितले. हा कॉमन प्रॉब्लेम आहे. तुम्ही सर्वांच्या बरोबर या. त्यानुसार मी त्यांच्या ज्योतिष कार्यालयात गेलो असता. त्यांनी पत्रिका पाहून आहे ती नोकरी पुढे सुरु ठेवा. सोडल्यास दुसऱ्या नोकरीसाठी अवघड आहे व तसे होणार नाही, असे सांगितले. त्यामुळे ज्या आधारावर पुढे वाटचाल करणार होतो ती अशी बंद झाली. आता जर पुढे नोकरी केली तर बदली दुसऱ्या ठिकाणी आली असती आणि अचानक पीएसआयच्या परीक्षेला बसता आले नसते. समजा बसलोच आणि पीएसआय परीक्षेची सर्व प्रोसेस पूर्ण होत गेली तरी निवृत्त असल्याखेरीज मला पीएसआयसाठी संधी नव्हती. शेवटी पुणे येथे तोफखाना साईबाबांच्या मंदिरात जावून हे सर्व प्रकरण बाबांच्या कानावर घातले. शिर्डीत नवस बोलून बसलोच आहे. पुढे माझे जे काही करायचे ते तुम्ही ठरवा आणि मनातील योजलेली कामे सफल करा, अशी प्रार्थना दर गुरुवार सुरु ठेवली. एक दोन महिन्यानंतर आश्चर्यकारक पणे बाबांच्या कृपेमुळे डिस्चॉर्जसाठी अर्ज कमांडिंग ऑफिसर यांना सादर केला. त्यांनीही कोणतेही आडेओढे न घेता सही करुन अर्ज ब्रिगेडियर साहेबांकडे पाठवून दिला. ब्रिग्रेडियर साहेबांनी जास्त वेळ न लावता ती फाईल मेजर जनलर साहेबांकडे पाठवून दिली. मेजर जनरल साहेबांनीही कोणताही आक्षेप न घेता डिस्चॉर्जसाठीचा माझा अर्ज मंजूर करुन लेफ्टनंट जनरल साहेबांंच्याकडे परवानगीसाठी पाठवून दिला. तेथून माझी फाईल दिल्लीला रवाना झाली. दिल्लीवरुन डिस्चॉर्जसाठी फाईल मंजूर होवून दोन महिन्यात निवृत्ती मिळवली. आमच्या एस. के. टी. क्लार्कसाठी अवघड असणारे काम परंतु बाबांवर सोपवल्यामुळे दोन वर्षाचे काम दोन महिन्यात झाले. माजी सैनिक म्हणून दाखला मिळाल्यामुळे पीएसआय परीक्षेचा फॉर्म भरता आला. मला पेन्शनही मिळाली आणि पैसेही मिळाले. बाबांनी दाखवून दिले. अरे, ज्योतिषांचा ज्योतिषी मी येथे बसलोय. तू मला माग. मी तुला सारं काही देतो आणि बाबांच्या कृपेने कृपावंत झालो. हा कितीतरी मोठा अनुभव बाबांनी मला दिला. धन्य ते बाबा.

 

।। हरि ॐ बाबा ।।