पाठीराखा-साई- ७

भक्तवत्सल बाबा

 

हरी ॐ बाबा… !  काया, वाचा, मनाने बाबांचे व्हा आणि बाबांच्या भक्तीची जरुर प्रचिती घ्या. कलियुगातील कलिचे उत्तर कलियुग अशा या कलियुगात बाबांच्यासारखे संत अतिदुर्मिळ. ज्यांच्या पूर्व जन्माच्या संचिताचे पुण्य होते. अशा पुण्यवंतांना त्यांचा सत्संग लाभला. त्यांना बाबांचा जिवंतपणे अतिदुर्मिळ असा सहवास लाभला. त्यांनी उठता बसता आपल्या जीवनातील वेळ फुकट न घालवता सदैव बाबांच्या सहवासात, सेवेत घालवला व याही जन्मी पुण्यसंचित केले. बाबांचे रागवणे अनुभवले, प्रेमाने जवळ घेवून हंडीतील नैवेद्य स्वत: बाबांनी बनवून त्यांना वाढला. तो त्यांनी खाल्ला. बाबांच्या हातची द्राक्षे, आंबे, भाकरी, चपाती, भाज्या इतर फळे खाल्ली आणि वेळप्रसंगी बाबांचा सटकाही खाल्ला. झाले गेले ते दिवस उरल्या त्या फक्त आठवणी. त्याच आठवणी, बाबांच्या जीवनातील अनमोल प्रसंग, बाबांची पूजाअर्चा, बाबांची दिनचर्या आदी सारेकाही आम्हा पामरांपुढे उभे करुन बाबांना आठवणीच्या रुपाने शब्दबध्द करणारे बाबांचे खटयाळ शिष्य. हेमाडपंत उर्फ गोविंद दाभोळकर सुध्दा साईरुपात आपली ज्योत विलीन करुन गेले. साईमय वातावरणात बाबांचे सतचरित्र वाचताना हे सारं डोळयापुढे उभे राहते. साई सचरित्राचे मराठीत भाषांतर करण्याची आज्ञा सातारचे साईरंग महाराज यांना झाली आणि त्यांनी आहे तसेच बाबांचे चरित्र मराठीत भाषांतरीत केले. माझे परमसौभाग्य की मला हाच अमृताचा ठेवा दोन वेळा वाचण्याचा योग आला म्हणण्यापेक्षा बाबांनीच माझ्याकडून वेळ काढून वाचून घेतले. इच्छा तेथे मार्ग या सुभाषिताप्रमाणे मलाही सचरित्राचा पाठ करता आला. हा पाठ करताना तुमची आंतरिक मनाची ओढ महत्वाची आहे. बाबांनी पहिल्यांदा काही अडचणी आणून पाहिल्या परंतु मी काही नियम लावून वाचावयास घेतलेले साई सचरित्र पहिल्यांदा वाचून पूर्ण झाले. त्यानंतर सर्वसाधारण दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा वाचावयास घ्यावे अशी आंतरिक प्रेरणा बाबांनीच निर्माण केल्यामुळे आपल्या कामाच्या व्यापातून वेळ मिळेल का? याचा विचार न करता वाचावयास सुरुवात केली. पहिल्या वाचनाच्या वेळी मी मिलिट्री सर्व्हिसमध्ये होतो. त्यावेळी पुण्यास होतो. तर दुसऱ्या वाचनाच्या वेळी मी पोलीस नोकरीत सातारा येथे होतो. दोन्ही नोकऱ्या सदानकदा बांधलेल्या अशाच. तरीही बाबांची मर्जी असेल तर काय होवू शकत नाही. दुसरे वाचन सुरु केले. त्यावेळी अचानक मांढरदेवच्या काळूबाई यात्रेसाठी वाई पोलीस ठाण्याला जावे लागले. तेथे पोथीवाचन सुरु केले. चार पाच अध्याय वाचून झाले आणि अचानक मांढरदेव यात्रेसाठी न जाता सातारा हेडक्वॉर्टर येथे आलो. याही ठिकाणी वेळ मिळणे अशक्य होते. परंतु दोन दिवसातच बाबांच्या कृपेमुळे कोयना धरण सुरक्षा गार्ड या ठिकाणी बाबांनीच पाठवले. अर्थातच सामानासहित साई सचरित्र ग्रंंथ घेवूनच मी तिकडे प्रस्थान केले. तेथे बाबांनीच रोज एक याप्रमाणे ५१ अध्याय वाचून घेतले. पुढे संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर येवून ५२ वा अध्याय आणि अवतरणीका वाचून ग्रंथ वाचन पूर्ण झाले. अशा प्रकारे बाबांनी दुसरे वाचन करुन घेतले. मनामध्ये पोथी वाचण्यास घेतली असता आता ती वाचून पूर्ण कशी होणार? ही भीती असताना बाबांनी मात्र नोकरीतही वेळ दिला आणि  पोथीवाचनही पूर्ण करुन घेतले. आता तीच पोथी माझी सुविद्य पत्नी आणि धाकटया भावाची पत्नी वाचत आहेत. त्या दोघीही माझ्यासारख्या साईभक्त आहेत. दुसऱ्यांदा पोथी वाचन करताना अर्थातच तन्मतेने आणि मनपूर्वक वाचली आणि अनुभवली. कोयना धरण या ठिकाणी जंगलामध्ये बाबांनी वाचन करुन घेताना अध्यायातील प्रत्येक वर्णनाप्रमाणे खरोखरच कितीतरी प्रत्यय आले. ते शब्दबध्द करु करुन ठेवावे वाटले तरी ते होत नव्हते. रोजच साई भक्ती करताना आलेले अनुभव लिहून लिहून ठेवू असे चालले होते. कदाचित बाबांची योजना असावी. परंतु परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे घर भरुन वहया, पेन असून काही उपयोग नव्हता. अखेर बाबांची आज्ञा झाली आणि मला लिहण्यास परवानगी मिळाली. त्यामुळेच माझ्या मनाच्या कप्प्यातील साईभक्तीचे अनुभव एकेक प्रसंग आठवून शब्दबध्द होत गेला आणि होत आहे ही बाबांचीच कृपा आणखीन दुसरे काय ?

।। हरि ॐ बाबा ।।