हरीपाठ-भाग-५

अभंग – १८

जो भक्त भगवंताच्या चरित्र्याचा मनापासुन अभ्यास करतो, हरीनाम संकिर्तन करतो आणि नामावाचुन दुसरे काहीही ज्याला चांगले वाटत नाही, अशा माणसाला मोठा लाभ झाला असे समजावे. सफल तीर्थयात्रा झाल्या आणि वैकुंठ प्राप्त झाला असचे समजावे. परंतु आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे जो स्वैर सााना करतो तो या लाभाला अंतरतो, जो भगवंताच्या नामाच्या ठिकाणी स्थिर होतो तोच धन्य होय, ज्ञानदेव म्हणतात मला भगवंताच्या नामात र्गोडी आहे भगवंताच्या नामाचा ठेवा मला प्राप्त आहे आणि रामकृष्ण या नामची मला सतत आवड आहे.

अभंग -१९

ईश्वराच्या नामाचा जप करणे. हेच मानवी जीवनाचे सार आहे असे वेद, शास्त्र पुराणे आणि श्रुती यांचे वचनच आहे. एका भगवंताच्या नामावाचुन प्रेमावाचुन, जप, तप, कर्म आणि धर्म वाया जातत त्यात उगाचच श्रम जातात, जे हरीपाठात मग्न होतात ते शांत होतात तेथेच रमतात, फुलांच्या कळीमध्ये भ्रमर गुंतुन रहातो त्याप्रमाणे ते हरीनामात रमतात. ज्ञानमाऊली म्हणतात, हरीनाम हेच शस्त्र मी धारण करतो, त्यामुळे यम माझ्याच काय पण माझ्या कुळालाही त्रास देत नाहीत मग आम्हाला मृत्यूचे भय का वाटेल?

 

 

अभंग – २०

जे ईश्वराचे भक्त आहेत ते नित्यनेमाने नामस्मरण करुन आपल्या गाठी पुण्यच जोडतात. हेच पुण्य त्यांचा भक्तीचा ठेवा असतो. त्याआधारे त्यांची कितीतरी प्रकारची पापे नष्ट होतात, भगवंताचे नाम हे अनंत जन्मात केलेल्या तपासमान आहे, सर्वात सुगम आणि सोपा असा हा मार्ग आहे. भगवंताच्या नामामुळे योगाचरण, यज्ञ आदी कर्मकांडांची जरुरी रहात नाही, धर्म, अधर्म व माया यांच्या पलीकडे ते नाम साधकाला घेऊन जाते, ज्ञानदेव म्हणतात, हरी हाच यज्ञ, कर्मकांड, नेमधर्म आणि सर्व काही झाला आहे.

अभंग – २१

आपल्या आराध्याचे नामस्मरण करण्यासाठी काही विशीष्ठ अशी वेळ काळ असावीच असे काही नाही, खरतर ईश्वराचे नामस्मरण केल्याने वेळ काळ दोन्हीही शुध्द होतात, नामामुळे सर्व दोषांचे निवारण होते. प्रत्येक जड जीवांचे रक्षण व पालनपोषन करणारा, त्यांना तारणारा हरीच आहे, तो भगवंतच आहे. ज्याने आपली जीभ नामस्मरणासाठी अर्पण करुन तेच आपले सर्वस्व मानले त्या माणसाच्या भाग्याची प्रशंसा करणे कठीण आहे, ज्ञानदेव म्हणतात माझ्याकडुन हरीपाठ सांगोपांग झाला आणि त्यामूळे माझे पुर्वजही सोप्या मार्गाने वैकुंठास प्राप्त होवू शकले,

अभंग – २२

आपल्या आराध्याचे, भगवंताचे नित्याचे नामस्मरण करणारी माणसे दुर्मीळच आहेत, त्या भक्तांना देवांचे सानिध्य लाभते, जे “नारायण हरी”“नारायण हरी” असे नामजप करतात त्यांना जीवनात कोणत्याही गोष्टीचे कधीच कमी पडत नाही. चारीही मुक्ती त्यांच्या घरी नांदत असतात. ज्यांच्या जीवनात हरी नाही, हरीची भक्तीही नाही, त्यांचे जीवन म्हणेज एक प्रकारचा नरकच समजावा, आणि शेवटी असे लोक नरकात जातात. ज्ञानदेव म्हणतात मी निवृत्तीनाथांना विचारले की मला नामाचे स्वरुप सांगा तेव्हा ते म्हणाले ज्ञानदेवा भगवंताचे नाम आकाशापेक्षाही अत्यतं विशाल आहे. अशा नामाचे स्वरुप मी तुला कशाप्रकारे वर्णन करु शकतो बरे.

अभंग – २३

सात लोक, पाच महाभुते, तीन गुण आणि दहा इंद्रीये असे नानात्वे विश्वामध्ये आढळते, हरीच्या मायेने एकाच तत्वात हे अनेकत्व व्यक्त होत असते, भगवंताचे नाम एकच एक आहे, सर्व साधनांत नामसाधन हे सर्व श्रेष्ठ आहे. तेथे काही कष्ट सायास लागत नाहीत. अजपा जप करतात. त्यात सोह्म हे नामच असते पण तेथे प्राणावर लक्ष केद्रींत करावे लागते मनाचा निग्रह जास्त लागतो. ज्ञानदेव म्हणतात, मला नामाशिवाय जिणेच व्यर्थ वाटू लागते, म्हणून मी नित्य रामकृष्णाच्या नामाचा मार्ग क्रमिला असुन त्यातच नित्य रमून जातो. आणि नामजप करता करता स्वतासही विसरुन जातो. जेथे द्वैतभाव रहात नाही. सारे काही एक होवून जाते.

अभंग – २४

एखादा भक्त जेव्हा जप, तपादी कर्म क्रिया नित्य नेमाने करतो. त्यावेळी त्याच्या मनात हाच भाव असतो क‍ि ज्या भगवंताचे, ईश्वराचे नामस्मरण मी करत आहे तो भगवंत सर्वाघटी भरुन राहीलेला आहे, या भावनेबद्दल सशंय घेतला तर मग मनाची चलबिचल वाढते, तो भगवंत चराचरांत आणि कणाकणामध्ये, जीवाजीवात विद्यामान आहेच ही भावना ठेवुन नित्याची रामकृष्णाच्या नामाची आळवणी करावी. आपली जात, कुलशील, श्रीमंती, गोत्र आदी या अनावश्यक गोष्टीना काही महत्व न देता भक्तीभावयुक्त भगवंताची भक्ती करावी, ज्ञानदेव म्हणतात, माझ्या ध्यानीमनी भगवंताचे नाव आहे, रुप आहे, त्यामुळे नामस्मरण करताना मला असे वाटते की मी या जगातच नाही तर वैकुंठ लोकातच माझे घर आहे,

अभंग – २५

जो भगवंताचा खराखुरा भक्त आहे तो ज्ञानी किवां अज्ञानी असा भेदभाव करत नाही. भगवंताच्या नामाचा उच्चार केल्याने आम्हाला मोक्ष नक्कीच मिळतो हे आम्ही जाणून आहोत. नारायण हरी या नामाचा उच्चार जेथे होत असतो, तेथे कलीकाळाचा प्रवेश निषीध्दच असतो, नारायणाचे नाम आणि त्या नामाचा महीमा असा काही आहे की त्याचे महात्म्याची महती वेदांनाही होत नाही. वेदही याचे वर्णन करताना नेति नेति असेच वर्णन करतात, मग या नामाचा अगाध असा महीमा तुम्हा आम्हा शुद्रांना कसा बरे कळणार?  ज्ञानदेव म्हणतात, मी भगवंताचे नाम सतत घेत राहीलो त्यामुळे मला या पृथ्वीवरच सर्वत्र वैकुंठामधील सुख लाभले आहे.

 पुढील भाग