श्रीकृष्ण म्हणजे साक्षात मोक्षच होय, तो मोक्ष अर्जुनाजवळ असतानाही त्यावर विश्वरुपाएवढे सर्वस्व त्याच्यां हाती दिले, तरी पण ते विश्वरुप अर्जुनाला आवडले नाही, एखादी वस्तुविकत घेवुन पुन्हा ती वस्तु मला नको म्हणून टाकुन द्यावी अथवा उत्तम प्रकारच्या रत्नाला दोष देत रहावे कन्येला पहावे तिची विचारपुस करावी आणि नंतर ती आवडली नाही असे म्हणावे, तसा हा प्रकार आहे. श्रीकृष्णाने अर्जुनास उपदेशाचा शेलका वाटा जे आपले विश्वरुप ते दाखविले यापेक्षा आणखी प्रेम तरी कसे असावे? सोन्याची लगड मोडुन आपल्या इच्छेप्रमाणे अलंकार बनवावा नंतर तो अलंकार आपणास आवडत नाही म्हणुन पुन्हा तो आटवुन त्याची लगड करावी त्याप्रमाणे शिष्याच्या प्रेमासाठी गुरुंच्या कडुन हा प्रकार झाला पुर्वी कृष्णरुप होते त्याने विशाल असे विश्वरुप धारण केले पुढे ते शिष्याच्या मनाला भीतीदायक वाटले म्हणुन पुर्वीचे कृष्णरुप पुन्हा धारण केले. एवढया मर्यादेपर्यत शिष्याने त्रास दिला, तरी सहन करणारे गुरु कोणत्या ठिकाणी असतील? परंतु देवांच्या मनामध्ये अर्जुनाविषयी आवड का होती हे कळत नाही, असे संजय म्हणाला. मग अखिल विश्व व्यापुन भगवंतानी जे दिव्य तेज प्रगट केले होते तेच पुन्हा त्या कृष्णरुपात साठविले. ज्याप्रमाणे “तत्वमसि” महाकाव्यातील तत्वपदाचा लक्ष्यार्थ ब्रम्हामध्ये समाविष्ट होवुन ऐक्याला प्राप्त होतो अथवा प्रचंड अशा वृक्षाचा आकार लहानशा बीजकणात जसा साठविला जातो. किवां जीवाची जागृत अवस्था जशी स्वप्नातील लहरीनां गिळुन टाकते, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने तो “विश्वरुप योग” आपल्या ठिकाणी सामावुन घेतला, सर्वत्र पसरलेला सुर्याचा प्रकाश जसा सांयकाळी अस्ताच्या वेळी सुर्यबिंबात एकत्र होतो किवां मेघाच्या पंक्ती जशा आकाशात समाविष्ट होतात सागराला आलेली भरती जशी सागराच्याच पोटात प्रविष्ट होते.(ओवी ६४१ ते ६५०)
अथवा असे असेल की कृष्णाकृतीच्या रुपाने जी विश्वरुप वस्त्रांची घडी होती, ती अर्जुनाच्या आवडी साठी उघडुन दाखविली, परंतु उघडुन पाहीली असता ती अर्जुनाला आवडली नाही त्यामुळे पुन्हा पुर्वीसारखी करुन ठेवली, ज्या अतिप्रचंड श्रीकृष्णाच्या विशाल विश्वरुपाने संपुर्ण विश्वाला जिंकले होते तेच कृष्णरुप पुर्वीप्रमाणे सौम्य, सुंदर आणि सगुण साकार झाले, फार काय सांगावे? त्या अतिशय वाढलेल्या विश्वरुपाने पुन्हा पुर्वीप्रमाणे मर्यादीत रुप धारण केले आणि भीतीने ग्रस्त अर्जुनाला आश्वस्त केले, जसा एखादा माणुस स्वप्नात स्वर्गात गेल्यावर अकस्मात स्वप्नातुन जागा झाला तर जेथल्या तेथे असतो, त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे पुन्हा पुर्वीप्रमाणे मर्यादीत रुप पाहुन अर्जुन आश्चर्यचकीत झाला. सदगुरुंची कृपा झाल्यावर प्रपंचाचा सारा विस्तार नाहीसा होतो आणि ब्रम्हज्ञानाचे स्फुरण होते, त्याप्रमाणे विश्वरुप ओसरल्यानंतर अर्जुनाने श्रीकृष्णरुप पाहीले. अर्जुनाच्या मनात असा विचार आला की चतुर्भुज रुपाच्या आड जे विश्वरुप आहे ते नाहीसे झाले, ही फारच चांगली गोष्ट झाली, जसे कळीकाळाला जिकांवे अथवा मोठया वादळ-वाऱ्यातुन सुटुन जावे, अथवा सातसमुद्र पोहुन पार करावे. एवढा मोठा परमसंतोष विश्वरुपाच्या दर्शनाच्या नंतरचे श्रीकृष्णरुप पाहुन अर्जुनाच्या मनात निर्माण झाला, सुर्य मावळल्यानंतर पुन्हा तारे जसे आकाशात उदय पावतात, त्याप्रमाणे अर्जुन सद्य लोकांसहीत पृथ्वी पाहु लागला.(ओवी ६५१ ते ६६०)
जेव्हा तो पाहु लागला, तेव्हा तेच पुर्वीचे कुरुक्षेत्र दोन भागांमध्ये विभागलेले आपले गोत्रज आणि वीर शस्त्रांचा आणि अस्त्रांचा एकमेकांवर वर्षाव करीत आहेत, त्या अनेक बाणाच्यां मंडपाखाली पुर्वी जसा होता तसाच रथ निवांतपणे उभा आहे पुढे सारथी असलेले साक्षात भगवान श्रीकृष्ण असुन आपण रथाखाली उभे आहोत असे अर्जुनाने पाहीले, याप्रमाणे पराक्रमाचा विकास करणाऱ्या अर्जुनाने जसे प्रार्थना करुन पुर्ववत रुप मागितले होते त्याप्रमाणे पाहील्यावर अर्जुन म्हणाला, महाराजा ! आता मी वाचलो असे मला वाटते, विश्वरुप पाहताना माझे ज्ञान बुध्दीला सोडुन आडरानात शिरले होते अहंकारासह देशोधडीला लागले होते, इंद्रीयांनी विषयांचा त्याग केला होता वाचा बंद पडली होती याप्रमाणे देहाची अवस्था झाली होती, आता सर्व इंद्रिये पुर्ववत आपापली कर्मे करु लागली आहेत, देवा ! तुझ्या दर्शनाने वाचलो. देवा ! आपण या रुपाचे मला पुन्हा दर्शन दिले, ते जणू माझ्यासारख्या चुकलेल्या लेकरासं आईने समजावुन ममतेने करविलेले स्तनपान होय, या विश्वरुपी विशाल सागरात जो मी हाताने लाटा मागे सारत होतो, तो मी या आपल्या श्रीकृष्णमुर्तीच्या तीराला लागलो आहे, हे द्वारकापुरीच्या महावीर वल्लभा ! ही भेट नव्हे तर मी जे सुकावयास लागलेले झाड झालो होतो त्या माझ्यावर तु मेघांचा वर्षावच केला आहेस.(ओवी ६६१ ते ६७०)
तहानेने व्याकुळलेल्या मला जणु अमृताचा सागरच भेटलेला आहे, आता मी वाचेन का न वाचेन हा जो अविश्वास निर्माण झाला होता तो पुर्ण नाहीसा झाला आहे, जणु माझ्या हदयरुपी अंगणामध्ये आनंदवेल लावली आहे आता मी आनंदाशी ऐक्य पावलो आहे. हे अर्जुनाचे बोलणे ऐकुन श्रीकृष्ण म्हणाले, तु विश्वरुपाच्या ठिकाणी प्रेम ठेवुन माझ्या सगुण रुपाकडे बघ. तुझे मन विश्वरुपाच्या ठिकाणी ठेवुन केवळ शरीराने माझ्या सगुण रुपाला भेटण्यासाठी ये, अर्जुना, माझी ही शिकवण विसरलास वाटते. अरे ज्ञानदृष्टी नसणाऱ्या अर्जुना, सोन्याचा मेरुपर्वत जरी हाताशी आला तरी तोही मनुष्याला कमीच वाटत असतो अशी माणसांच्या मनात चुकीची भावना असते, आम्ही तुला जे विश्वरुप दाखविले ते तप करुन भगवान शिवशंकरांना प्राप्त झाले नाही, अर्जुना, अष्टांगयोगाच्या संकंटाना तोंड देवुन योगी शिणतात, परंतु विश्वरुप दर्शनाचा प्रसंग त्यानां देखील प्राप्त होत नाही, ते रुप एकदा तरी पहाण्यास मिळावे असे चितंन करता करता देवांचा काळ देखील निघुन जातो. आशारुप ओजंळ हदयरुप कपाळावर ठेवुन चातक पक्षी जसा मेघांची आतुरतेने वाट पाहत आकाशाकडे बघत असतो, त्याप्रमाणे अतिउत्सुक होवुन देवदेवताही ज्याच्या भेटीची आठो प्रहर इच्छा करतात. (ओवी ६७१ ते ६८०)
परंतु त्यापैकी कोणी माझे हे विशाल विश्वरुप स्वप्नातदेखील पाहु शकत नाही, ते रुप आज तू मात्र अगदी सहजासहजी पाहीलेस, हे अर्जुना, या विश्वरुपाचे दर्शन होण्याचे कोणतेच मार्ग नाहीत अगदी चारही वेद आणि सहा शास्त्रांनीही माघार घेतली परंतु हे अर्जुना, त्याच्याकडे माझ्या विश्वरुपाकडे चालत येण्याचे सामर्थ्य नाही, तू ज्याप्रमाणे माझे विशाल विश्वरुप सुखाने पाहीलेस तसा मी दान आदी कर्मानी दिसण्यासही कठीण आहे, अगदी यज्ञकर्मही करुन मी सापडत नाही. असा जो मी तो एकाच उपायाने सापडू शकेन हे लक्षात ठेव तो उपाय हा की, जेव्हा भक्ती हदयात येवुन चित्ताशी विवाह करेल तेव्हाच हे शक्य आहे. पण ती भक्ती अशा प्रकारची असावी की पावसाच्या जलधारा ज्याप्रमाणे वर्षावाकरिता दुसरी गतीच जाणत नाहीत, अथवा सर्व जलरुप संपत्ती घेवुन गंगा नदी जशी समुद्राचा शोध करीत करीत समुद्राला मिळुन पुन्हा मिळतच रहाते. त्याप्रमाणे अंतकरणातील शुध्द भावाने आणि अखंड प्रेमाने माझ्याशी एकरुप होवुन माझ्यामध्ये संचार करणे यालाच भक्ती असे म्हणतात, ज्याप्रमाणे क्षीरसागर हा काठाला आणि मध्ये सारखाच भरलेला असतो, त्याप्रमाणे मी सर्वत्र सारखाच आहे, (ओवी ६८१ ते ६९०)
याप्रमाणे माझ्यापासुन मुंगीपर्यत किबंहुना सर्व स्थावर-जंगम प्राणीमात्रांच्या ठिकाणी ज्यांना भजन करण्यास कोणताच द्वैतभाव शिल्लक राहत नाही, असे ज्या वेळी होईल, त्याच क्षणी मी विश्वरुप आहे. याची त्यांना जाणीव होईल, आणि ती जाणीव झाल्याबरोबर तसा मी सर्वत्र दिसेन. काष्ठामध्ये घर्षणाने अग्नी उत्पन्न झाल्यानंतर काष्ठ हा शब्दच नाहीसा होतो व ते काष्ठच मुर्तीमंत अग्नी होवुन जाते, तेजाचा राशी असणारा सुर्य हा जोपर्यत उदयास येत नाही तोपर्यत अंधकार हा आकाशरुप होवुन बसतो, आणि तो उदयाला आल्यानंतर एकदम प्रकाशरुप होवुन जातो, त्याप्रमाणे माझा विश्वरुप साक्षात्कार झाला म्हणजे देहाच्या ठिकाणच्या अहंकाराची येरझारा संपते आणि अहंकाराचा नाश झाला की सर्व प्रकारचे द्वैत संपुन जाते हे एकाग्रतेने समजुन घे , मग मी आणि तो भक्त आणि हे सर्व विश्व स्वभावताच एक मद्रुप होते, तो भक्त माझ्यात ऐक्यभावाने समरस होतो. जो माझ्या एकटयासाठी अंगावर ओझे वाहतो ज्याला माझ्यावाचुन जगात दुसरे काहीही चांगले वाटत नाही ज्याला इह-परलोक हे सर्व केवळ मीच होवुन राहीलो आहे व ज्याने आपले जगण्याचे ध्येय म्हणजे माझी प्राप्ती होणे हेच निश्चीत केले आहे. जो सर्व भुतमात्रांचे ठिकाणी द्वैतभावाची भाषा विसरला आहे, ज्याच्या ज्ञानाचा विषय केवळ मीच आहे, म्हणुन निवैर होवुन जी जी वस्तु दिसेल ते ते माझेच स्वरुप जाणून जो मला भजतो, अर्जुना असा जो भक्त आहे त्याचे वात-पित्त-कफमय असे तीन धातुंचे शरीर जेव्हा नाश पावते तेव्हा तो देहपतनानंतर मीच होवुन राहतो. संजय म्हणाला, हे धृतराष्ट्रा, ज्याच्या उदरात सर्व विश्व सामावलेले आहे त्यामुळे ज्याचे उदर विशाल आहे, अशा भगवान श्रीकृष्णाने करुणायुक्त वाणीने विश्वरुपाचे आणि भक्तीचे महत्व विशद केले.(ओवी ६९१ ते ७००)
या भगवंताच्या अमृतमधुर उपदेशानंतर तो अर्जुन आंनदसंपत्तीच्या लाभाने महाश्रीमंत झाला आहे, तसेच जगात तोच एक श्रीकृष्ण चरणकमलांची सेवा करण्यात चतुर झाला. अर्जुनाने देवाच्या दोन्ही मुर्ती जेव्हा नीट न्याहाळुन पाहिल्या , तेव्हा त्याने विश्वरुपापेक्षा श्रीकृष्णरुप अधिक लाभदायक आहे असे निश्चयपुर्वक जाणले, परंतु अर्जुनाच्या या विचारास देवाने मान दिला नाही आणि त्याचा निर्णय मानला नाही, कारण विश्वात्मक रुपापेक्षा एकदेशी रुप खरे नव्हे,याचेच समर्थन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी एक-दोन उत्तम अशा युक्ती बोलुन दाखवल्या. त्या युक्ती ऐकुन सुभद्रापती अर्जुन आपल्या मनात विचार करुन तो आता उत्तम प्रकारे प्रश्न विचारण्याची पध्दत अवलंबील ती कथा आता श्रोतेवृंदाने पुढील अध्यायात श्रवण करावी, ही कथा प्रसन्नपणे सुलभ ओवीछंदाने व विनोदबुध्दीने सांगण्यात येईल, तरी ती आनंदाने श्रवण करावी असे श्री निवृत्तीनाथांचे परमशिष्य श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात. शुध्द सदभावांची ओजंळ करुन ओवीरुपी मोकळी सुकोमल सुगंधित फुले विश्वरुपाच्या दोन्ही चरणकमलांवरती मी अपर्ण केली आहेत, असे श्री ज्ञानेश्वर माऊलीनी श्रोतेगणांस सांगितले.
सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरीचा अकरावा अध्याय भगवंताच्या कृपेने संपन्न !
( श्रीमद् भगवदगीता श्लोक १ ते ५५ आणि ज्ञानेश्वरी मराठी भाषांतरीत ओव्या १ ते ७०८ )