दुराग्रहरुपी हिरण्यास दैत्याने माझी बुध्दीरुपी पृथ्वी काखेत घातली आणि मोहरुपी सागराला खोल पाण्यात मला घेवुन गेला. तेव्हा तुझ्या सामर्थ्याने माझी बुध्दी मुळ ठिकाणावर आली. त्या वेळी तुम्हाला दुसरा वराह अवतार घ्यावा लागला. अशा प्रकारे तुझे माझ्यावर अपार उपकार झाले, त्याचे मी एका वाचेने कसे वर्णन करु? पंचप्राणांच्या आधारे तु माझे रक्षण केलेस, हे देवा ! आत्तापर्यत तु जो उपदेश केलास तो व्यर्थ गेला नाही, या कामी तुला भरघोस यश प्राप्त झाले आहे कारण माझे समग्र अज्ञान नाहीसे झाले आहे. आपले डोळे म्हणजे जणू काही आनंदरुपी सरोवरातील कमळे आहेत ते डोळे कृपा प्रसादाने ज्याला पाहुन ज्याच्यासाठी प्रसन्नतेची मंदिरे तयार करतात, त्या माणसांची आणि मोहाची भेट कधी होईल काय? ही दुबळी गोष्ट काय बोलावी? समुद्राच्या पाण्याने समुद्रात जळत असलेला अग्नी म्हणजे वडवानल जर विझला जात नाही, तर मग मृगजळाची वृष्टी वडवानलाला काय बरे करेल? आणि हे दातारा ! मी तर आपल्या कृपा मंदिराच्या गाभाऱ्यात शिरुन ब्रम्हरसांचे भोजन करीत आहे. तेव्हा आता माझा मोह नष्ट झाला यात काय आश्चर्य आहे? खरोखर तुझ्या चरणकमलांची शपथ घेवुन सांगतो की मी निश्चीत उध्दरलो आहे. कमलपत्राप्रमाणे मोठे डोळे असलेल्या, कोटी सुर्याप्रमाणे तेजोमय असलेल्या महेशा, श्रीकृष्णा, आपणापासुन जे ऐकले ते असे आहे. ही सर्व भुते जिच्यापासुन उत्पन्न होतात आणि जिच्यामध्ये लय पावतात त्या प्रकृतीचे स्वरुप देवाने मला विस्तार पुर्वक सांगितले. (ओवी ६१ ते ७०)
आणि प्रकृतीच्या स्वरुपाचा सर्व हिशोब दिला आणि पुरूषांचे स्वरुपही दाखविले, ज्या पुरूषाचा म्हणजे परमात्म्याचा महिमा पांघरुन वेद हे सवस्त्र झाले म्हणजे वेद ज्ञानाने सुशोभित , संपन्न झाले, वेदस्वरुप शब्दराशी वाढतात म्हणजे उत्कर्ष पावतात, जगतात आणि त्यांच्या पासुन धर्मासारखी रत्ने निर्माण होतात, याचे कारण म्हणजे ती शब्दराशी आपल्या चरणांचा आश्रय करतात, म्हणून हे घडते. याप्रमाणे आपले जे अगाध माहात्म जे अनेक मार्गाने एकत्र जाणण्यास यथायोग्य व आत्मानुभावाने परिपुर्ण आहे, ते आपण मला दाखविलेत. ज्याप्रमाणे आकाशातील ढग नाहीसे झाल्यावर आकाशातील सुर्यामंडळ दिसु लागते अथवा हाताने शेवाळ दुर करुन पाणी दाखविता येते. किवां चदनाच्या वृक्षाला सापाने दिलेले वेढे निघाल्यानंतर त्या चंदन वृक्षाला आलिंगन देता येते, अथवा पिशाच दुर गेल्यावर उरलेले द्रव्य जसे हाती लागते, त्याप्रमाणे ज्ञानाच्या आड जी प्रकृती होती, ती देवाने पलिकडे सारल्यामुळे माझ्या बुध्दीला ब्रम्हस्वरुपाशी स्थिर होता आले. म्हणुन हे देवा आपल्या अलैाकिक शक्तीची माझ्या अंत:करणाला खात्री प्राप्त झाली आहे, परंतु आणखी एक उत्कट अशी इच्छा निर्माण झाली आहे.ती गोष्ट जर मी भिडेमुळे तुम्हाला विचारली नाही, तर मग दुसऱ्या कोणाला बरे विचारण्यास जावु? कारण तुझ्यावाचुन दुसरी विचारण्याची जागा आम्हाला माहीत आहे का? पाण्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या प्राण्यांनी जर पाण्यात उपकाराचे ओझे मानले अथवा बालकाने स्तनपान करण्याविषयी आईची भीड जर धरली तर मग देवा, त्याशिवाय त्याला जगण्याचा दुसरा उपाय आहे काय ? म्हणून भीड अथवा संकोच मनामध्ये न धरता मनात जी इच्छा झाली आहे, ती तुझ्यापुढे मन मोकळेपणाने प्रगट करावी असे वाटते, त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, तुझी काय इच्छा असेल ती सांग. (ओवी ७१ ते ८०)
मग तो अर्जुन बोलू लागला, देवा तुम्ही मागे ज्या गोष्टी सांगितल्या, त्यांच्या अनुभवाने माझी दृष्टी समाधान पावली आहे, आता ज्याच्या संकल्पाने ही लोकांची परंपरा उत्पन्न होते आणि नाहीशी होते आणि ज्या स्थानास तु “मी” असे म्हणतोस जेथुन ही दोन भुजांची अथवा चार भुजांची रुपे देवाचे कार्य करण्याच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा घेवुन येतोस ते तुझे मुळ स्वरुप आहे. क्षीरसागरातील शेषशयनांच्या आरंभापासुन मत्स्य, कुर्म आदी अवतार घेवून सर्व अवतार कर्म पुर्ण झाल्यावर हे श्रीकृष्णा, गारुडीप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही पुन्हा जाता, उपनिषद ज्याचे गुणवर्णन करतात,योगीजन हदयात स्मरण करुन एकाग्रतेने ज्याचे ध्यान करतात व सनकादिक ज्याला आलिंगन देवुन राहतात, असे जे तुझे अगाध आणि अलौकिक विश्वरुप आहे ते आम्ही कानांनी ऐकले आहे ते आता प्रत्यक्ष पाहण्याकरिता माझे चित्त उतावीळ झाले आहे. माझा संकोच दुर करुन माझी इच्छा काय आहे हे देवाने मला प्रेमाने विचारलेच आहे तर मग मी असे सांगतो की, हीच मला एक तीव्र इच्छा आहे. संपुर्ण विश्वात तूच एक भरलेला आहेस हे प्रत्यक्षपणे माझ्या डोळयांना दिसावे, अशी माझी आंतरीक तीव्र इच्छा आहे. परंतु हे श्रीकृष्णा, तुला आणखीन एक गोष्ट अशी विचारायची आहे की तुझे विश्वरुप पाहण्याची माझ्या अंगी योग्यता आहे की नाही? हे माझे मला समजल नाही, हे का समजत नाही असे जर म्हणाल तर त्यावर माझे उत्तर आहे की रोगी माणसाला आपल्या रोगाचे कारण समजते काय?(ओवी ८१ ते ९०)
इच्छा वाढली म्हणजे उत्कंठा वाढलेला मनुष्य आपली योग्यता विसरुन जातो, ज्याप्रमाणे अतिशय लहान लागलेल्या मनुष्यास मला समुद्रही पुरणार नाही असे वाटते, अशाच तीव्र इच्छेने मला भुल पडली आहे त्यामुळे माझी इच्छा मला आवारुन धरता येत नाही याकरिता ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाची योग्यता जाणते आणि त्याची आस पुरविते, त्याप्रमाणे जनार्दना, माझी योग्यता प्रथम विचारात घ्या आणि नंतर मग विश्वरुपदर्शनाच्या कार्याला प्रारंभ करा. माझा अधिकार असेल तर माझ्यावर ही कृपा करा, एरव्ही माझा अधिकार नसेल तर नाही म्हणुन स्पष्ट सांगा, पंचम स्वराच्या मधुर आलापाने बहिऱ्याला गाण्याचे सुख प्राप्त करुन देता येईल का? मेघ हा चातकासाठी वर्षाव करतो आणि जगासाठी करत नाही असे काही नाही परंतु एवढा वर्षाव झाला, तरी सुध्दा खडकावर झालेला वर्षाव व्यर्थच जातो, चकोर पक्ष्यास चंद्रातुन पाझरणारे अमृत अनाठायी प्राप्त होत असते परंतु तेच चंद्रामृत इतर पक्ष्यांसाठी शपथ घालून कोणी नको म्हटले आहे काय? सुर्योदय झाला तरी डोळयांवाचून तो वाया जातो. तुझे माझ्यावर प्रेम असल्यामुळे तु एकदम विश्वरुप दाखवशील असा मला विश्वास आहे कारण जाणत्या आणि नेणत्या भक्तींविषयी तू नित्य उदार आहेस. खरोखर तुझे औदार्य तुझ्या आधीन आहे ते याचकांच्या आणीन नाही, कोणत्याही वस्तु देत असताना तु पात्र आणि अपात्रतेचा विचार करीत नाहीस, मोक्षासारखी परमपवित्र वस्तुदेखील तू वैऱ्याला दिली आहेस. मोक्ष प्राप्त करणे अत्यंत अवघड आहे परंतु तो मोक्षदेखील तुझ्या चरणांची सेवा करीत असतो, म्हणुन तु त्यास जिकडे पाठवशील तिकडे तो जात असतो. सेवकाप्रमाणे तो तुझी आज्ञा पाळत असतो. जी पुतना राक्षसीन विषाचे स्तनपान करवुन तुला मारण्यासाठी तुझ्याकडे आली होती, त्या पुतनेला देखील तु सनकादिकांच्या बरोबरीने सायुज्य मुक्ती दिलीस.(ओवी ९१ ते १००)
धर्मराजाच्या राजसुय यज्ञामध्ये अनेक देव, ऋषी, राजे जमले असता ज्याने आपणास दुर्वचन बोलुन आपला अपमान केला] अशा अपराधी शिशुपालाला देखील हे श्रीकृष्णा, तु मुक्ती दिलीस उत्तानपाद राजच्या मुलाला म्हणजे ध्रुवाला अढळपद प्राप्त करण्याविषयी इच्छा होती काय? तो एवढयासाठी वनामध्ये आला होता की तुझ्या कृपाप्रसादाने त्याला वडिलांच्या मांडीवर बसावयास मिळेल, परंतु आपण त्याला सुर्य चंद्रादिच्या पेक्षाही श्रेष्ठ अशा स्थानावर बसविले.अशा प्रकारे दु:खी लोकांना उदारपणे आश्रय देणारे आपण एक आहात, मृत्युसमयी आपल्या मुलाला नारायण या नावाने बोलवीत असता अजामेळाला तु मुक्ती दिलीस. हे दातारा! भृगू ऋषीच्या कृत्याचे लांछन न बाळगता आपण त्याचे श्रीवत्सलाछंन चिन्ह तुम्ही आपल्या हदयावर भुषण म्हणुन वागविता. सागरामध्ये वेद बुडविणाऱ्या शंखासुराला आपण मारलेत, पण अजुनही त्याच्या शरीराला म्हणजे शंखाला हातात धरण्याचे आपण विसरत नाही. अशा प्रकारे अपकार करणाऱ्यांवर तुम्ही उपकार केले आहेत आणि अपात्र मनुष्यांविषयीपण तु उदार झाला आहेस. वामन अवतारामध्ये संपुर्ण राज्याचे दान दिले म्हणुन आपण बळीराजाचे द्वारपाल झाला आहात. ज्या गणिकेने तुझी कधी आराधना केली नाही अथवा तुझे गुणवर्णन ऐकले नाही, जी पोपटाला राघवा राघवा म्हणुन कौतुकाने हाक मारत होती, त्या गणिकेला तुम्ही वैकुंठसुखाची प्राप्ती करुन दिली. अशी सामान्य निमित्ते पाहुन तु अपात्र व्यक्तीनांही निजपद प्राप्त करुन दिलेस, असा तु वेगळी प्राप्ती कशी करुन देशील ? जी कामधेनु दुभत्याच्या अधिकारपणाने जगाचे संकट दुर करते, त्या कामधेनुची वासरे भुकेली राहतील काय? म्हणुन मी ज्या विश्वरुप दर्शनाबद्दल विंनंती केली आहे ते विश्वरुप देव मला दाखवणार नाहीत, हे मुळीच खरे वाटत नाही, परंतु ते पाहण्याची मला योग्यता द्यावी. (ओवी १०१ ते ११०)
श्रीकृष्ण माझे डोळे तुझे विश्वरुप पाहु शकतील, असे तुला निश्चीतपणे वाटत असेल तरच तु माझ्या इच्छेचे डोहाळे पुर्ण करावेत. अशी विश्वरुप दर्शनाची विनंती अर्जून जेव्हा पुन्हा पुन्हा करण्याविषयी प्रवृत्त झाला, तेव्हा त्या विनंतीचा भार षडगुणांचा सर्वश्रेष्ठ राजा अशा श्रीकृष्णाला सहन होईना. तो श्रीकृष्णकृपारुपी अमृताने सजल असलेला जणु मेघ आणि अर्जुन हा जवळ आलेला वर्षाकाळ, मग वर्षाव हा निश्चीत होणारच. अथवा श्रीकृष्ण हा कोकीळ आणि अर्जुन हा वसंतऋुतू मग तो कोकीळ मधुर असे कुजन करणारच. अथवा पुर्णचंद्रबिबं पाहुन क्षीरसागर जसा उंचबळत असतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुनाविषयी प्रेमबळाने अधिकच उत्साहीत झाला, मग त्या प्रसन्नतेच्या आवेशाने गर्जना करुन कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना! माझी अमर्याद रुपे पाहा. एकच विश्वरुप पहावे, अशी इच्छा अर्जुनाने आपल्या मनामध्ये केली होती परंतु श्रीकृष्णाने संपुर्ण विश्वच विश्वरुपमय करुन ठेवले. धन्य श्रीकृष्ण , जो अपरिमित उदार आहे, श्रीकृष्णाच्या औदार्यामुळे तो सदैव याचकांच्या इच्छेच्या हजारोपट आपले सर्वस्व देतो. जे विश्वरुप हजार डोळे असणाऱ्या शेषापासुन लपवुन ठेवले, ज्या रुपाचा वेदांनाही थांगपत्ता लागु दिला नाही, सदैव सेवा करणाऱ्या देवी श्रीलक्ष्मी मातेलाही जे दाखवले नाही, ते विश्वरुप आता विविध प्रकारांनी प्रकट करुन हा श्रीकृष्ण विश्वरुप-दर्शनाचे कर्म करु लागले, खरोखर अर्जुनाचे भाग्य अगाध आहे. जागा असलेला माणूस स्वप्नावस्थेत गेल्यावर तो ज्याप्रमाणे स्वप्नातील सर्व वस्तु आपणच बनुन राहतो, त्याप्रमाणे परमात्मा श्रीकृष्ण आपणच अखंड झाले.(ओवी १११ ते १२०)
श्रीकृष्णाने एकदम विश्वरुपाचा आकार प्रकट केला आणि स्थुल दृष्टीने पडदा दुर केला, किबंहुना विश्वरुपाच्या द्वारे त्याने योगाचे ऐश्वर्य प्रगट केले, परंतु हा अर्जुन विश्वरुप पाहु शकेल अथवा नाही याची आठवणसुध्दा नाहीशी होऊन अर्जुनाच्या प्रेमामुळे उतावळे होऊन देव म्हणाले, अर्जुना ! पहा ! पहा! पहा! हे विश्वरुप ! अर्जुना, तु एक विश्वरुप दाखव असे म्हणालास, तर ते एकच विश्वरुप दाखविण्यासारखे होईल? तरी आता माझ्याच व्यापक रुपामध्ये संपुर्ण विश्व सामावले आहे ते पहा. त्या विश्वरुपापैकी काही रुपे रोकडी तर काही लठठ आहेत, तर काही ठेगंणी, तर काही उंच आहेत काही अतिशय विस्तृत तर काही सडपातळ आहेत आणि काहीना तर मर्यादाच नाही, काही न आवरणारी काही प्रामाणिक, काही सक्रिय, तर काही रुपे निष्क्रिय, काही उदासीन, काही प्रेमळ तर काही कुशाग्र बुध्दीची. काही झोपेत घोरत असलेली, तर काही झोपी गेलेली, तर काही शांत, सदाचरणी, तर काही सदैव उन्मत्त , काही स्तब्ध, काही आनंदी, काही मोठयाने गर्जना करणारे, तर काही एकदेखील शब्द न बोलणारे, काही आशा ठेवणारे, तर काही विरक्त, काही जागे असलेले,तर काही झोपी गेलेले, काही संतोषी, काही दु:खी, तर काही एक प्रसन्न आहेत. काहीच्या हातात शस्त्रे आहेत, तर काहीच्या हातात शस्त्रे नाहीत, काही उग्रस्वरुप, तर काही प्रेमस्वरुप, काही भयानक, काही विचीत्र, तर काही लयीत समाधीस्थ, ब्रम्हदेवासारखी काही रुपे जगाच्या उत्पत्तीच्या लीला करणारी, काही सात्विक, इच्छेने जगाचे पालन करणारी विष्णुसमान रुपे, काही शंकरा समान संहार करणारी, काही साक्षीभुत आहेत. (ओवी १२१ ते १३०)