या विश्वरुपाला अनेक सुंदर पाय आहेत, अनेक उदरे आहेत, आणि अवयवांचे नाना प्रकारचे रंग आहेत, असे असुनही शोभेचा आवेश दिसत आहे, ज्याप्रमाणे महाकल्पाच्या अंती क्रोधायमान झालेल्या यमाने सर्वत्र प्रलयाग्नीचे तेज प्रज्वलित करावे. किवां त्रिपुरासुराचा शत्रु असणाऱ्या भगवान शिवशंकराची ही जणू विनाशकारक यंत्रेच आहेत, अथवा प्रलयकालीन भैरवांची निवासस्थानेच आहेत, अथवा युगांचा नाश करणाऱ्या काळशक्तीची भुतांना खाण्यासाठी वाढुन ठेवलेली पात्रे पुढे सरसावली आहेत, त्याप्रमाणे जिकडे-तिकडे तुझी प्रचंड मुखे असुन ती अनेक असल्यामुळे कोठेही मावत नाहीत, ज्याप्रमाणे गुहेमध्ये सिहं बसलेले आहेत, त्याप्रमाणे तुझ्या मुखामध्ये रागीट असे भयानक दात दिसत आहेत, जणु काही प्रलयकालीन मृत्यू पावलेल्या प्राण्यांच्या रक्ताने माखलेल्या विक्राळ दाढा तोंडामध्ये दिसत आहेत, हे असो काळाने युध्दाला निमंत्रण द्यावे, सर्वाच्या संहाराने मरण जसे मोजावे, त्याप्रमाणे तुझ्या मुखामध्ये फार मोठा भयानकपणा दिसत आहे. या बिचाऱ्या लोकसृष्टीकडे पाहिले, तर ती कालियांच्या विषारीपणामुळे दुखी झालेल्या यमुनेच्या तीरावर असलेल्या झाडासारखी उदासीन होवुन राहिली आहे, तु जो महामृत्युरुप अथांग सागर आहेस, त्यात त्रैलोक्याच्या जीविताची नौका शोकरुपी प्रतिकुल अशा सोसाटयाच्या वाऱ्याने हेलकावे खात आहे, माझ्या या बोलण्यावर श्रीकृष्ण रागावुन असे म्हणतील की तुला लोकांचे काय वाटते, त्याबद्दल तु काळजी का करतोस? तु माझ्या रुपाच्या ध्यानातुन सुखाचा गोड अनुभव घे.परंतु महाराज ! माझ्या जीवाला कंप सुटला आहे. असे मी एकदम तरी कसे बोलावे? म्हणून मी जगाचे दुख उगीच आडपडद्यासारखे मध्ये उभे केले आहे. (ओवी ३४१ ते ३५०)
ज्या मला प्रलयकाळाचा रुद्र भितो, माझ्या भितीने मृत्यु देखील लपुन बसतो, तो मी आपले रुप पाहुन अंर्तबाहय कापत आहे, अशी तुम्ही माझी अवस्था केली आहे, परंतु हे पाहा, ही एक प्रकारची महामारी आहे परंतु यालाच जर विश्वरुप म्हणायचे असेल तर, आश्चर्यच आहे ही महामारी आपल्या अक्राळविक्राळ स्वरुपाने भयास देखील माघार घ्यावयास लावते. कित्येक क्रोधायमान मुखे जणू काही महाकाळाबरोबर पैजेने लढत आहेत आणि त्यांनी आपल्या मोठेपणाने आकाशाला देखील ठेगंणे केले आहे, ही अफाट मुखे आकाशाच्या मोठेपणाला देखील आकळता येत नाहीत, त्रैलोक्याच्या वाऱ्याला देखील जी वेढता येत नाहीत, ज्या मुखांतील नुसत्या वाफेने अग्नी जळतो आणि या मुखातुन अग्नीचे लोळ कसे बाहेर पडतात, हे कळत नाही, तसेच ही मुखे एकासारखी एक नाहीत, या मुखावरं रंगा-रंगाचे भेद आहे, फार काय प्रलयाच्या वेळी अग्नी देखील याचे सहाय्य मिळवतो. ज्याच्या अंगचे तेज एवढे उग्र आहे की ते त्रैलोक्याची राख करते, त्यालाही मुखे आहेत आणि त्या प्रत्येक मुखात असंख्य दात व दाढा आहेत, जणू काही वाऱ्याला धर्नुवात चढलेला असावा, समुद्र महापुरात पडावा अथवा विषाग्नी वडवानळाचा नाश करण्यास प्रवृत्त व्हावा. अग्नीने जसे हलाहल विष प्यावे किवां आश्चर्य असे की मरण जसे मरण्यास तयार व्हावे, त्याप्रमाणे हया संहारक तेजाला भयानक मुख झाले आहे असे समजा. परंतु ही मुखे किती मोठी आहेत म्हणाल, तर आकाश तुटून पडल्यावर जशी आकाशाला खिडं पडुन राहते, किवां पृथ्वी आपल्या बगलेत घेवुन जेव्हा हिरण्याक्ष दैत्य पाताळात जाण्यास निघाला, त्यावेळी हाटकेश्वराने जसे पाताळाचे विवर उघडले. (ओवी ३५१ ते ३६०)
तसा मुखांचा विशाल विस्तार होता, त्यामध्ये जिभेचा आवेश फारच मोठा व आगळा होता, त्यांच्या घासास विश्व देखील पुरे पडणार नाही, म्हणुन देव कौतुकाने एक ही घास खात नव्हते, आणि पाताळातील मोठया सर्पाच्या फूत्काराने विषाच्या ज्वाला जशा आकाशापर्यत पोचतात त्याप्रमाणे पसरलेल्या मुखरुपी दरीमध्ये जिव्हा भासत आहे, प्रलयकाळच्या विजांचे समुदाय एकत्र करुन जसे गगनांचे किल्ले सजवावेत त्याप्रमाणे ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दातांची टोके शोभत आहेत, आणि कपाळांच्या भागांतील खळग्यात भयाला भेडसावणारे डोळे दिसत असुन ते महामृत्युचे प्रवाह अंधारात दडुन बसल्यासारखे दिसताहेत, अशी महाभयाची आवड ठेवुन या रणांगणावर तु कोणती कार्यसिध्दी करीत आहेस, ते कळत नाही परंतु मला मात्र तुझे हे रुप पाहुन मरणाची भीती निर्माण झाली आहे. हे देवा ! मला विश्वरुप दर्शनाचे डोहाळे झाले होते त्या इच्छेप्रमाणे फळही प्राप्त झाले तुझे विश्वरुप डोळयांनी पाहीले बापा माझे डोळे जितके शांत व्हावेत त्याप्रमाणे ते झाले आहेत देवा! शरीर हे मातीचे बनले असल्यामुळे केव्हा तरी जाणारच त्याची चिंता कोणाला आहे? परंतु माझे चैतन्य राहील की न राहील असे मला वाटु लागले आहे, एऱ्हवी भयाने अगं कापत आहे आणि तेच भय अधिक वाढले की मनाला ताप होतो, बुध्दी दचकते अभिमानाचा विसर पडतो परंतु सर्वाहुन वेगळा जो अंतरात्मा जो आनंदाचा अशं आहे, त्यालाही भीतीने जणू काही शहारे आलेत,असे वाटू लागले आहे काय आश्चर्य? मला या विश्वरुप दर्शनाचा छंद लागला होता त्या दर्शनाने माझे ज्ञान देशोधडीस लागले जगामध्ये अशा प्रकारचा गुरू-शिष्य संबंध कदाचितच नांदत असेल. (ओवी ३६१ ते ३७०)
देवा ! आपल्या विश्वरुप दर्शनाने माझ्या अतंकरणात विफलता निर्माण झाली आहे, माझ्या अतंकरणाला सावरण्यासाठी त्याला मी धीर देण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या मना-शरीरातील धैर्य अगदी नाहीसे झाले आहे अशा अवस्थेत हे विश्वरुप डोळयांनी पाहिले हे देवा ! तुम्ही मला गीतेच्या उपदेशामध्ये गुरफटून टाकले आहे, जीव हा विश्रांती घेण्याच्या इच्छेने धावधाव करीत आहे, परंतु त्याला या विराट विश्वरुप दर्शनामुळे कुठेही विश्रांतीसाठी आश्रय मिळत नाही, अशा या विराट विश्वरुप दर्शनाच्या महामारीने चराचरातील प्राण्यांचा जीव गेला आहे, महाराज हे बोलु नये तर काय करावे? आम्ही जगावे तरी कसे? ज्याप्रमाणे महाभयाचे मोठे भांडे फुटावे, त्याप्रमाणे तुझी विशाल अक्राळ-विक्राळ मुखे पसरलेली दिसतात, त्याला प्रलयकाळच्या शस्त्रांची दाट कुंपणे जशी लांबच्या लाबं लावलेली असावीत, त्याप्रमाणे तुझ्या दात आणि दाढांची गर्दी झाली आहे, आणि दोन्ही ओठांनी देखील ती झाकली जात नाहीत, तक्षक हा पुर्ण विषारी असुनही त्याच्या तोंडात जसे विष भरावे, अथवा काळरात्रीत पिशाच्चाचा जसा संचार व्हावा, अथवा वज्राग्नी दाहक असुनही त्याने आणखी अग्नी -अस्त्र धारण करावे. त्याप्रमाणे तुमची तोंडे अतिविशाल असुन त्यातुन आवेश बाहेर प्रगट होत आहे, त्यामुळे आमच्यावर मरणरुपी रसांचे लोंढेच वाहत आहेत की काय असे वाटते.सृष्टीच्या संहाराच्या वेळी निर्माण झालेला प्रलयग्नी आणि सोसाटयाचा वारा हे एकत्र आले, तर काय जळणार नाही? त्याप्रमाणे तुझी संहारक अशी प्रचंड मुखे पाहुन माझे धैर्य नाहीसे झाले आहे. मला दिशाही समजेनात एवढेच काय, मी कोण आहे, याची स्वतालाच जाणीव राहिली नाही. (ओवी ३७१ ते ३८०)
तुमचे विश्वरुप मी डोळयांनी पाहिले तोच सुखाचा काळ आता भिती आणि संकटाचा काळ झाला आहे, तरी देवा! आपण आता हे आपले विराट विश्वरुप आवरावे ही मना पासुन प्रार्थना आहे. तु असे करशील हे जर मला माहीत असते, तर ही गोष्ट मला सांगा असे मी म्हटलेच नसते, आता मात्र या स्वरुप-प्रलयापासुन माझे प्राण वाचव, हे अनंता ! तु आमचा स्वामी आहेस, आता माझ्या जीविताच्या आड कृपेची ढाल धर आणि हा विश्वस्वरुपी मायेचा पसारा पुन्हा आपल्या स्वरुपाच्या ठिेकाणी साठवुन घे. हे देवाधिदेवा ! तुझ्या चैतन्याच्या आधारे सर्व विश्व वसले आहे, हे तु विसरलास काय? उलट तु विश्वाचा संहार करण्याचे कार्य आरंभिले आहेस. म्हणून हे देवराया ! आता त्वरीत प्रसन्न हो आणि आपल्या विशाल मायाशक्तीला आवरुन घे आणि मला या महाभया पासुन वाचव, मी दीनपणे एवढा वेळ काकुळतीला येवुन तुझी विनवणी करत आहे कारण मला या विराट विश्वरुपाची भीती वाटत आहे. देवांचा राजा जो इंद्र त्याच्या अमरावतीवर जेव्हा दैत्यांनी आक्रमण केले त्या वेळी ते आक्रमण एकटयाने मी परतुन लावले, साक्षात काळाला देखील न भिणारा मी आहे, परंतु तुझा हा जो विश्वरुप दर्शन प्रकार आहे तो त्यातील नाही, या ठिकाणी मृत्यूवर देखील मात करुन संपुर्ण विश्वासह आमचा एकच घास व्हावा, असा काहीतरी महा भंयकर प्रकार आहे. प्रलयाची वेळ नसताना देखील तु मध्येच कसा काळाला प्राप्त झालास? त्यामुळे हा बापुडा त्रिभुवन गोल अल्पायुषी झाला आहे असे वाटते. अहो, हे काय विपरीत दैव? विश्वरुप-दर्शनाने शांती प्राप्त व्हावी म्हणुन मी प्रयत्न केला, पण अकस्मात विघ्नच प्राप्त झाले, आता मात्र सारे विश्व बुडू लागले आहे कारण त्याला तु ग्रासु लागला आहेस.(ओवी ३८१ ते ३९०)
आपण आपली अनेक विशाल मुखे पसरुन या सर्व सैन्याला चारी बाजुंनी गिळु लागला आहात, हे मला प्रत्यक्ष दिसत आहे. हे कौरवांच्या कुळातील वीर त्या आंधळया धृतराष्ट्राचे पुत्र नाहीत का? हे देवा ! तुझ्या प्रचंड मुखामध्ये हे सर्व परिवारांसह पाहता-पाहता गेले. कौरवांना सहाय्य करण्यासाठी जे देशोदेशीचे राजे आले आहेत त्यांच्या मृत्यूची वार्ता त्यांच्या घरी जावुन सांगण्यासाठी कोणी एक उरणार नाही. असा तु सर्वाचा सरसकट ग्रास करणार आहेस. गंडस्थळाच्या ठिकाणी मध असणाऱ्या हत्तींचा समुदाय तू तर गटागटा गिळत आहेस. युध्दभुमीवर पसरलेल्या सैन्याला गिळण्यासाठी तु त्या सैन्याला मिठी देत आहेस.मोठमोठया गाडयांवरुन मारा करणाऱ्या तोंफा व सैनिक, पायांनी चालणारे पायदळ यांच्या झुंडी तुझ्या विशाल मुखात एकदम नाहीशा होत आहेत. जी शस्त्रे यमाची भावंडे आहेत आणि ज्या शस्त्रांपैकी एकच शस्त्र सर्व विश्वाला गिळुन टाकेल, अशी कोटयावधी शस्त्रे तु गिळत आहेस. हत्ती, घोडे, पायदळ आणि रथ असा चतुरंग सेनेचा परिवार आणि घोडे जोडलेले मोठामोठाले रथ यांना दात देखील न लावता तु अगदी सहजपणे गिळीत आहेस. या सर्वाना गिळुन तु कसा चांगला धष्ट पुष्ट दिसत आहेस. गंगापुत्र भीष्म यांच्या सारखा सत्य आणि शौर्यामध्ये निष्णात दुसरा कोण आहे? त्यांना आणि ब्राम्हण असलेले गुरु द्रोणाचार्य यांनाही तुम्ही आपल्या विश्वरुपाने गिळंकृत केले. सुर्यपुत्र कर्ण हा देखील आपण गिळुन टाकला, त्याचप्रमाणे आमच्याकडील योध्दांना तर आपण कचरा झाडता त्या प्रमाणे झाडुन टाकले. हे विश्व निर्माण करणाऱ्या विधात्या ! तुम्ही भगवंतानी अनुग्रह केला खरे पण त्यामुळे काय झाले ते पहा, विश्वरुप-दर्शना विषयी मी प्रार्थना केली, परंतु एकप्रकारे मी विश्वालाच मरण आणले आहे. (ओवी ३९१ ते ४००)
मागे थोडया-बहुत प्रकांरानी विभुतींचे कथन केले होतेस हे खरे परंतु कदाचित त्या कथनाप्रमाणे तुझे विश्वरप विशाल नसावे असा भ्रम झाल्यामुळे आपणास ते विश्वरुप दाखवण्यास मी प्रार्थना केली, जे दैवामध्ये भोगावयाचे असते ते कधीही चुकत नाही, भविष्यकाळात घडणाऱ्या घटनेप्रमाणे आपली बुध्दीही तशीच होते, म्हणुन माझ्या कपाळी लोकांनी दोषांचे आरोप करावेत, असा भोग जर पुर्वीच ठरलेला असेल तर तो कसा बरे चुकेल? समुद्रमंथनाच्या वेळी अमृताबरोबर काळकुट नावाचे अतिउग्र विष मंथनातुन प्रगट झाले आणि देवांवर नसते संकट ओढावले पंरतु देवाधिदेव शंभू महादेव यांनी ते प्राशान केले आणि देवांवरील ते घोर संकट संपले. एकप्रकारे ते संकट भोलेनाथांनी निवारण केले परंतु विश्वरुपाच्या या जळत्या निखाऱ्याचे काय? विषाने भरलेले आकाश कोण बरे गिळु शकेल? साक्षात महाकाळा बरोबर कोण झुंज देईल? याप्रमाणे अर्जुन दुखाने कष्टी होता आणि अंतकरणात शोक करत होता, परंतु विश्वरुप दाखवण्याचा देवांचा सांप्रत काय अभिप्राय आहे, हे त्याला कळत नाही. याचे कारण मी अर्जुन कौरंवाना मारणारा आहे. आणि कौरंव हे मरणारे आहेत अशा प्रकारच्या मोहाने त्याचे अतंकरण व्यापुन गेले आहे. वास्तविक पाहता कोणी कोणास मारत नाही, या संपुर्ण विश्वाचा संहार एकटा मीच करणार आहे हेच या विश्वरुपाच्या दर्शनाच्या निमीत्ताने श्रीकृष्णाने प्रगट केले आहे. परंतु देवांचा हा अभिप्राय अर्जुनाला अद्यापही कळला नव्हता, म्हणून तो व्यर्थच दुखाने व्याकुळ होत होता आणि नसलेले भय निष्कारण अर्जुन वाढवित आहे. त्यावेळी अर्जुन म्हणाला, पहा ज्याप्रमाणे हे ढग आकाशामध्ये नाहीसे होवुन जातात, त्याप्रमाणे धनुष्य-कवचांसह दोन्हीही पक्षांचे सैन्य एकदम विश्वरुपाच्या विराट मुखामध्ये नाहीसे झाले. (ओवी ४०१ ते ४१०)