भोजनाच्या वेळी देव माझी प्रेमाने आठवण काढीत होते; परंतु मी भोजनास न जाता अहंकाराने फुगून बसत असे. देवाच्या अंत:पुरात खेळताना माझ्या मनात काही शंका निर्माण होत नव्हती, अंथरूणावर जाऊन मी तुझ्याशेजारी निजत होतो, ‘ए कृष्णा’ म्हणून मी तुला एकेरी नावाने हाक मारीत होतो, इतर यादवांप्रमाणे तुलाही मानीत होतो, तू जाण्यास निघाला असताना तुला शपथा घालीत होतो, मी तुझ्याबरोबर एकाच आसनावर बसत होतो, तुझे बोलणे मी मानत नव्हतो. खरोखर अतिपरिचयामुळे अशा अनेक गोष्टी माझ्या हातून घडल्या. म्हणून हे अनंता, आता कोणत्या-कोणत्या अपराधाचे तुझ्यासमोर निवेदन करावे? मी तर या सर्व अपराधांच्या राशी आहे. याकरिता तुझ्या समक्ष अथवा तुझ्या माघारी मी जे काही अतिवाईट पध्दतीने वागलो, ते अपराध आईच्या ममतेप्रमाणे पोटात घाल. कोणत्या तरी एकादे वेळी नदया गढूळ असे पाणी घेऊन येतात, त्या वेळी समुद्र ते पाणी आपल्या पोटात सामावून घेतो; कारण त्यास दुसरा उपाय नसतो, त्याप्रमाणे प्रेमाने अथवा प्रमादाने देवास जे काही विरूध्द बोललो गेलो असेन, ते बोलणे हे मुकुंदा, आपण सहन करावे. देवाच्या क्षमाभावाच्या स्वभावाने पृथ्वीला क्षमा प्राप्त झाली आहे. ‘क्षमा’ हे नावही मिळाले. ती पृथ्वी या भूतसमुदायास आधार झाली आहे. म्हणून हे पुरूषोत्तमा, तुला विनंती करावी तेवढी थोडीच आहे. तरी ज्याचे गुण जाणणे अशक्य आहे अशा अप्रमेया आपल्या शरणागताला सर्व अपराधांबद्दल क्षमा करा. (ओवी ५५१ ते ५६०)
हे श्रीकृष्णा, आता मी तुझे यथार्थ माहात्म्य जाणले. तुम्ही या चराचराचे उत्पत्तिस्थान आहात. तुम्ही विष्णू , शंकर आदीकरून सर्व देवांचे परमदैवत आहात. वेदांनाही ज्ञान देणारे आद्यगुरू आपणच आहात. देवा, तू अगाध आहेस, सर्व भूतमात्रांमध्ये एकच आणि सर्व ऐश्वर्यादी गुणांमध्ये अप्रतिम आणि अद्वितीय आहेस. तुझ्या बरोबरीचे कोणी नाही, हे सांगावयास कशाला पाहिजे? तू निर्माण केलेल्या अवकाशात सारे विश्व सामावलेले आहे, इतका तु अनंत व्यापक आहेस. तुझ्या बरोबरीचा दुसरा कोणी आहे, असे बोलताना संकोच वाटतो. तेथे तुझ्यापेक्षा अधिक कोणी आहे, यासंबंधी गोष्ट तरी कशी करावी? म्हणून त्रिभुवनात तूच एक महान आहेस; त्यामुळे तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. तुझा अलौकिक महिमा कसा वर्णन करावा, हे मी जाणत नाही. असे म्हणून अर्जुनाने नंतर देवास साष्टांग नमस्कार केला. त्या वेळी त्याला अष्टसात्विक भावाचे भरते आले. अर्जुनाची वाचा सदगदित झाली. तो म्हणाला,”प्रसन्न हो, प्रसन्न हो.मला या अपराधरूपी सागरातून बाहेर काढ. तू विश्वचा सुह्रद आहेस; परंतु तुला संकुचित नत्याच्या संबंधाने सामान्य समजून आम्ही योग्य तो मान दिला नाही. तू विश्वाचा ईश्वर असून तुला सारथी करून तुझ्यावर सत्ता गाजवली. तू वेद-शास्त्र-पुराणांमध्ये वर्णनीय असूनदेखील सभेमध्ये माझे प्रेमाने वर्णन करीत होतास, तरीपण तुझे महत्तव न जाणता मी अहंकाराने अधिकच बोलत होतो. (ओवी ५६१ ते ५७०)
हे मुकुंदा, असे अपराध मी सांगत बसलो,तर त्याला काही मर्यादा राहणार नाही; म्हणून या अपराधांपासून माझे रक्षण कर. देवा, अशा प्रकारे तुम्हास विनंती करण्याचीदेखील योग्यता माझे अंगी नाही; परंतु लहान मूल जसे सलगीने आपल्या वडिलांशी बोलते, त्याप्रमाणे मी बोलत आहे. पुत्राचे अनेक अपराध झाले असले, तरी वडील त्याचेशी वैर न धरता ते अपराध सहन करतात, तसेच तुही माझे अपराध उदार मनाने सहन कर. मित्राचा उध्दटपणा मित्र जसा आपण शांतपणे सहन करतो, तसे माझे सर्व अपराध सहन कर. ज्याप्रमाणे आपल्या प्रिय मित्राकडून आपला मान-सन्मान व्हावा, अशी कधी कोणी अपेक्षा करत नाहीत, त्याप्रमाणे राजसूय यज्ञामध्ये आपण उष्टी काढलीत, मला त्याबद्दल क्षमा कर. अथवा जिवलग अशा मित्राची भेट झाल्यावर मग आपण भोगलेली जी संकटे, ती त्यास सांगावयास कोणताही संकोच वाटत नाही; अथवा जिने आपले तन-मन सर्व आपल्या पतीस अर्पण केले आहे, अशा पतिव्रता स्त्रीस पतीची भेट झाल्यावर मनातील गोष्ट सांगितल्यावाचून राहवत नाही, त्याप्रमाणे मी तुम्हा स्वामींना अपराधाबद्दल क्षमा करण्याविषयी विनंती केली. परंतु मला आणखी एक गोष्ट विचारवीशी वाटते. विश्वरूप दाखविण्याविषयी मी हट्ट धरला, देवाशी मी लडिवाळपणा केला आणि तो प्रेमळ भक्तांचे मायबाप असलेले तुम्ही हट्ट पुर्ण केला. कल्पवृक्ष अंगणामध्ये जसे कौतुकाने लावावेत, कामधेनूंची वासरे जशी खेळण्याकरिता द्यावीत. (ओवी ५७१ ते ५८०)
मला फाशांच्या ऐवजी नक्षत्रे खेळवयास द्यावीत आणि चेंडूच्या ऐवजी चंद्र द्यावा, यासारखा विश्वरूपदर्शनाचा हट्ट तू माउली सिध्दीस नेला. ज्या अमृताच्या थेबांसाठी देवांनी समुद्रमंथन केले त्या अमृताचा तु चार महिने पाऊस पाडलास आणि जमीन उत्तम रीतीने तयार करुन तिच्या वाफयांत चितांमणीची पेरणी केली. त्याप्रमाणे स्वामी तुम्ही मला कृतकृत्य केले आहे माझे अनेक लाड तुम्ही पुरविेलेत जे रुप साक्षात भगवान शंकरांनी, भगवान विष्णुंनी कानांनीही ऐकले नाही ते विश्वरुप आपण मला दाखविले, हरिहरांना विश्वरुप पाहण्याची गोष्ट कोठुन साध्य असणार? उपनिषदांत देखील ज्याचे दर्शन होत नाही, तो अंतकरणातील गोष्ट आपण माझ्यासाठी उघड केलीत. मल्पाच्या प्रारंभापासुन आजपर्यत माझे अनेक जन्म झाले. त्या सर्व जन्मांचा मी झाडा घेवुन पाहत आहे, परंतु विश्वरुप दर्शनाची गोष्ट कोठे ऐकलेली नाही किवां पाहिलेली आठवत नाही. बुध्दीने ज्ञान या विश्वरुपाच्या अंगणापर्यत देखील कधी जात नाही अंतकरणाला याच्याविषयी कलना देखील करवत नाही. अशा स्थितीत ते विश्वरुप डोळयांनी प्रत्यक्ष पाहावे याबद्दलची गोष्ट बोलावयास मी धजलो किंबहुना असे पुर्वी कधीही ऐकले नाही आणि पाहिलेलेही नाही, ते हे आपले विश्वरुप तुम्ही माझ्या डोळयांना प्रत्यक्ष दाखविलेत, त्यामुळे माझे मन आनंदाने भरुन गेले आहे. परंतु आता माझ्या मनात अशी एक इच्छा निर्माण झाली आहे की तुमच्याबरोबर गोष्टी करुन तुमचे सान्निध्य प्राप्त करावे आणि तुम्हालां आलिंगन द्यावे. (ओवी ५८१ ते ५९०)
परंतु आपल्या या रुपात हे मी कसे साध्य करु शकेन? आणि आपणाला आलिंगन जरी द्यावे म्हटले तर ते कोणत्या देहाला द्यावे, कारण तुझ्या स्वरुपाला अंत-पार नाही, सागराशी जलक्रिडा करणे शक्य होणार नाही, याकरीता देवा ! तुझ्या या विराट विश्वरुपापासुन भीती निर्माण झाली आहे, म्हणुन तु आता तुझे हे विराट रुप आवरुन आपले पुर्वीचेच रुप धारण करावे. एखादयाने विनोदाने सारे विश्व द्या असे जरी म्हणाला, तरी तो आपल्या घरीच सुखी असतो. त्याप्रमाणे आम्हास तुझे विश्वरुप पाहील्यानंतर तुझे पुर्वीचेच रुप मनमोहक आणि सुंदर दिसते आणि तेंच तु आम्हाला तुझे चर्तुभुज रुप पाहावयाचे आहे. आम्ही योगाचा अभ्यास केला तरी त्याआधारे तुझे चर्तुभुज रुप पाहावयास मिळणार आणि शास्त्रांचा अभ्यास केला तरी सगुण साक्षात्कार प्राप्त व्हावा असा सिध्दांत आहे, अनेक प्रकारचे यज्ञ करावेत आणि त्याचे फळ म्हणजे चर्तुभुज रुप व्हावे सकल तिर्थाच्या यात्रा केल्या त्यासुध्दा याच करीता, आणि जी जी दाने आदी पुण्यकर्म केली त्यांच्या फळामध्ये तुझे चर्तुभुज दर्शन हेच मुख्य फळ होय. एवढी या रुपाविषयी माझ्या जीवाला आवड आहे आणि तेच पाहण्यासाठी त्वरा झाली आहे तरी माझी आंतरिक तळमळ आपण लवकर दुर करावी, अंतकरणातील सर्व गोष्टी जाणणाऱ्या देवा, संपुर्ण विश्वाला वसविणाऱ्या देवाधिदेवा, मला अतिशीघ्र प्रसन्न व्हावे देवा ! तुझे अंगंकांतीचे किती वर्णन करावे? तुझे रुप निलकमलाला रंगविणारे, आकाशाला निळा रंग लावणारे, इंद्रनील रत्नाला नीलवर्णाचे तेज दाखविणारे आहे. (ओवी ५९१ ते ६००)
प्रभुने आपल्या मस्तकावर धारण केलेल्या मुकूटास मस्तकाच्या सौदर्याने अधिकच शोभा प्राप्त झाली आहे, प्रभुच्या अंगच्या दिव्य प्रभेने शृंगारास अधिकच शोभा येते. आकाशमंडळामध्ये इंद्रधनुष्याच्या वर्तुळात जसा मेघ हा शोभुन दिसतो, त्याप्रमाणे वैजयंती माळेने श्रीकृष्ण शोभुन दिसत होते, कशी ती उदार गदा, की जी असुरांना देखील मोक्षपद देते आणि ते सुदर्शन चक्रदेखील कसे सुंदर की जे सौम्य तेजाने मिरवीत आहे. अधिक काय सांगावे? स्वामी ! ते रुप पाहण्यासाठी मी अतिशय उत्कंठित झालो आहे, म्हणुन आपण आपले तेच चर्तुभुज रुप धारण करावे. हे अगाध विश्वरुपाचे सुखसोहळे भोगुन माझे डोळे निवले आहेत आता श्रीकृष्णमुर्ती पाहण्याविषयी मी अतिशय उत्सुक झालो आहे, त्या सगुणाकार नयनरम्य साकार श्रीकृष्णमुर्ती वाचुन दुसरे काही पाहणे माझ्या डोळयांना आवडत नाही, ते जर पाहता आले नाही तर माझे डोळे इतर सर्व रुपानां शुद्र मानतात. आम्हाला भोग किवां मोक्षाच्या ठिकाणी श्रीकृष्णमुर्तीवाचुन दुसरे काही आवडत नाही, म्हणुन पुर्वीसारखा साकार हो आणि आता हा तुझ्या मायेचा पसारा आवर. हे अर्जुनाचे बोलणे ऐकुन विश्वरुप भगवंताला मोठे आश्चर्य वाटले, ते म्हणाले, अर्जुनासारखा अशा प्रकारचा अविचारी दुसरा कोणी मी आजवर पाहीला नाही.अरे ! तुला हा लाभ झाला असता आनंद मानत नाहीस, उलट भीतीने हे काय हेकेखोरासारखे बोलतो आहेस, हे कळत नाही. (ओवी ६०१ ते ६१०)
अरे अर्जुना, आम्ही एखाद्या भक्तावर प्रसन्न झालो, म्हणुन त्याला सर्वस्व देवुन कोणी आपला जीव धोक्यात घालेल का ? परंतु आज तुझ्यासाठी जीवांचे समुदाय एकत्र करुन हे एवढे विशाल विश्वरुप तयार केले आहे, हे तुझ्या प्रेमभक्तीने माझे मन वेडावले आहे म्हणुन पण हे तुला कसे कळत नाही, अरे , हे रुप इतके दिवस गुप्त ठेवुन आज त्याचीं ध्वजाच जगी उभारली आहे. ते हे माझे सर्व माये पलीकडील स्वरुप सर्व अमर्याद वस्तुंपेक्षाही अतिशय अमर्याद आहे, आणि येथुनच श्रीकृष्णादी अवतार झाले आहेत. ते हे विश्वरुप केवळ ज्ञानरुपी तेजाचे बनले आहे संपुर्ण विश्वाला व्यापणाऱ्या या रुपाला कधी अंत नाही ते स्वरुपापासुन कधी ढळत नाही, ते सर्वाचे मुळ आहे, हे अर्जुना ! तुझ्यावाचुन पुर्वी दुसऱ्या कोणीही हे रुप कधीच पाहीले नाही अथवा या रुपा विषयी ऐकले नाही, कारण हे कोणत्याही साधनांनी “अप्राप्य” असे आहे. या रूपापर्यत येण्याचे दिवास्वप्न कित्येक साधंकानी केले ते याची पावले परतले नेति नेति म्हणत आणि वेदांनीही धाडस न करता मौन धारण करणे उचित समजले आणि यज्ञ तर स्वर्गापासुनच परत आले. साधना आणि अभ्यासाद्वारे विश्वरुप पाहण्याचे अतिकष्ट करुन पाहीले, या साठी त्यांनी योगाभ्यास दुर केला परंतु अध्यायन करुन ही या विश्वरुपापर्यत येणे सहजसुलभ नाही. शेवटची मर्यादा गाठलेली सत्कर्मे अतिशय उत्कंठतेने विश्वरुपाच्या दर्शनाच्या प्राप्ती साठी धावली पण त्या बहुतेकांनी मोठया कष्टाने सत्यलोक (स्वर्ग) गाठला. तप करणाऱ्यांनी विश्वरुपाचे ऐश्वर्य पाहिले आणि आपला उग्रपणा उभ्या उभ्याच टाकुन दिला.याप्रमाणे तपादी साधकापासुनही विश्वरुप दर्शन अमर्याद अशा अतंरावर राहीले. (ओवी ६११ ते ६२०)
म्हणून विश्वरुपाच्या दर्शनाने तु धन्य झाला आहेस हे जाण, ह्या विश्वरुपाची भीती मुळीच बाळगु नकोस आणि या दर्शनाशिवाय दुसरे काहीही चागंले नाही असे मनात आणु नकोस, अरे अमृताचा सागर भरलेला आहे आणि कोणी एकाला तो अकस्मात स्नान करण्यासाठी प्राप्त झाला तर मग या अमृताच्या सागरात आपण बुडुन जावु या भितीने त्याचा त्याग करील काय? अथवा सोन्याचा भला मोठा डोगंर दिसल्यानंतर एवढा मोठा डोंगर कसा घेवुन जायचे असे म्हणुन कोणी सोडुन देईल काय? दैवयोगाने चितांमणी मिळाल्यावर तो गळयात घातला तर त्याचे ओझे होईल म्हणून कोणी टाकुन देतो काय?तसेच कामधेनु मिळाली तर तिला आपण पोसु शकत नाही म्हणून घालवुन देतो काय? चादंणे शिंपीत चंद्र घरी आला असता त्यायोगे उष्मा होतो असे म्हणून कोणी त्याला घराबाहेर हो असे म्हणेल का? अथवा तु सावली पाडतोस म्हणुन पलीकडे जा असे सुर्याला कोणी म्हणेल का? याप्रमाणे विश्वरुपाच्या महातेजाचे ऐश्वर्य सहजच तुझ्या हाती आले असता तुझा जीव कासावीस का व्हावा ? अर्जुना, तु तर अज्ञानी दिसतोस, तुझ्यावर रागवुन तरी काय उपयोग शरीराला आलिंगन न देता तु छायेला आलिंगन देत आहेस, यावेळी तु स्वताचे मन अस्थिर केले आहेस आणि माझ्या साकार अशा चर्तुभुज रुपावर प्रेम करतोस, परंतु माझे ते खरे रुप नाही. (ओवी ६२१ ते ६३०)
म्हणुन हे अर्जुना, अजुन तरी चर्तुभुजरुपा ची आस्था सोडुन दे आणि माझ्या विश्वरुपाची अनास्था करु नकोस. माझे हे विश्वरुप जरी भयानक आणि विशाल असले तरी ते चर्तुभुजरुपापेक्षा अधिक खरे आहे. असा तु पक्का निश्चय कर, जो कृपण मनुष्य आपले मन द्रव्याच्या साठयांजवळ ठेवुन फक्त शरीराने जगात कर्म करीत असतो, किवां पंख न फुटलेल्या अशा पिलांजवळ घरटयात आपला जीव ठेवुन पक्षिणी आकाशात विहार करीत असते, अथवा गाय जरी डोगरावर जरत असली तरी तिचे चित्त जसे घरी बांधुन ठेवलेल्या वासराकडे असते, तसे तुझे प्रेम माझ्या या विश्वरुपावर कायम असुदे. बाकी मनाच्या समाधानासाठी वरवर माझ्या चर्तुभुजरुपाचे ध्यान कर, परंतु अर्जुना, पुन्हा सांगतो की माझे हे एकच म्हणणे विसरु नकोस, माझ्या या विश्वरुपावर अढळ आणि नितांत श्रध्दा ठेव. हे विश्वरुप कधी पाहीले नव्हतेस म्हणून तुला जे भय उत्पन्न झाले आहे त्याचा त्याग कर आणि यावर अखंड प्रेम कर. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना , तुझ्या प्रार्थनेनुसार आणि विनंतीनुसार आता मी तुला पुर्वीचे चतुर्भुज रुप दाखवत आहे, ते तू खुशाल बघ. असे वाक्य बोलत असतानाच देवांनी आपले पुर्वीप्रमाणेच मनुष्यरुप धारण केले यात आश्चर्य नाही, परंतु अर्जुनाविषयी श्रीकृष्णास जे प्रेम होते त्या प्रेमाचे आश्चर्य आहे. (ओवी ६३१ ते ६४०)