अध्याय-१२-भाग-४

         जो आपणच ब्रम्हरुपाने विश्व झाला, त्याच्या ह्दयातील सर्व प्रकारचा भेदभाव सहजपणे संपुन गेलेला असतो आणि द्वेष-बुध्दीदेखील त्यात किंचितही राहिलेली नसते, आपले आत्मस्वरुप हे त्रिकालाबाधित असुन तेच खरे आहे, ते कल्पांताच्या वेळीसुध्दा नाहीसे होत नाही, हे जाणून जो होवुन गेलेल्या गोष्टीचा शोक करत नाही, ज्याच्या पलीकडे दुसरे कोणत्याही गोष्टीची इच्छादेखील करीत नाही, सुर्याच्या ठिाकणी रात्र किवां दिवस हे दोन्ही घडत नाहीत, ज्याप्रमाणे भक्तींच्या ठिकाणी चांगले अथवा वाईट कर्माचे भोगाचे संस्कार उमटत नाहीत. असा जो केवळ ज्ञानसंपन्न होवुन राहिला आहे, तरीसुध्दा जो माझ्या सगुण रुपाचे भजन करीत असतो त्यामुळे त्याच्यासारखा प्रिय दुसरा कोणताही नातलग नाही, अर्जुना, हे तुला मी खरोखर शपथ वाहुन सांगतो.  अथवा अर्जुना, फक्त आपल्या घरच्या माणसांकरिता उजेड आणि परक्या माणसांकरिता अंधार पाडावा हा भेद दिवा जसा जाणत नाही. जो तोडण्याकरीता कुऱ्हाडीचे घाव घालतो, किवां जो लावणी करतो त्या दोघांनाही वृक्ष जसा समान सावली देतो, अथवा ऊस हा जो पाणी घालुन वाढवितो त्यासच गोड आणि जो चरकात घालुन रस गाळतो त्यास कधी कडु लागत नाही. (ओवी १९१ ते २००)

           अर्जुना, त्याप्रमाणे ज्याचा शत्रु-मित्राविषयी समभाव असतो आणि मान व अपमानाच्या वेळी जो समान वृत्तीचा असतो, अथवा उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही ऋुतूंत आकाश जसे समानच असते त्याप्रमाणे शीत-उष्ण द्वंद्वाविषयी ज्याच्या मनात समान भाव असतो, दक्षिणकडुन आणि उत्तरेकडुन वाऱ्याचे कितीही धक्के बसले तरी  मेरु पर्वत जसा अचल असतो त्याप्रमाणे सुख-दुखाचे कितीही धक्के बसले तरीही जो अचल असतो, ज्याप्रमाणे राजा व रंक यास चांदणे ही समान शीतलता देत असते, त्याप्रमाणे सर्व भुतमात्रांना जो प्रेमाने समान चांदणे देत असतो, ज्याप्रमाणे संपुर्ण जगाला सेव्य जसे एक पाणीच आहे त्याप्रमाणे तिनही लोक या अमतमधुर भक्तीचीच इच्छा करतात, जो आतंरबाहय विषयांचा संबंधत्यागुन आपले जीव-स्वरुप ब्रम्हस्वरुपाशी ऐक्य करुन एकटा असतो, कोणी निंदा केली तरी जो मनाला लावुन घेत नाही स्तुती केली असता जो धन्यता मानत नाही, ज्याप्रमाणे आकाशाला चांगल्या-वाईटाचा लेप लागत नाही, जो निंदा आणि स्तुतीला समान मानतो आणि संसार करताना अथवा वनामध्ये आपली वृत्ती सम ठेवुन वागतो, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बोलुन न बोलण्या सारखे असल्यामुळे तो मौनी झाला आहे, ब्रम्ह स्थितीचा आनंद घेत असता त्यास पुरेसे वाटत नाही, ज्याप्रमाणे पाऊस जरी पडला नाही तरी सागर जसा आटत नाही त्याप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे जरी घडले तरी जो संतोष मानत नाही व इच्छेविरुध्द जरी घडले तरी तो क्रोधायमान होत नाही. (ओवी २०१ ते २१०)

        ज्याप्रमाणे वाऱ्याला जसे राहण्याचे स्थान नसते त्याप्रमाणे तो ठराविक ठिकाणी कायमचे राहण्यासाठी कोणत्याही जागेचा आश्रय करत नाही, संपुर्ण विश्व हे माझे घर आहे, अशी ज्याची निश्चयात्मक बुध्दी झाली आहे फार काय सांगावे, जो सर्व चराचररुप झाला आहे असा तो सत्-चित्-आनंदाशी एकरुप होवुनसुध्दा माझ्या भक्तीची त्याला आवड असते अशा भक्ताला मी आपल्या मस्तकावर मुकूटाप्रमाणे धारण करतो, अशा उत्तम भक्तांसमोर मस्तक नम्र करणे यात काय मोठे नवल आहे?  तिन्ही लोक त्याच्या चरणकमलांचे तीर्थ घेवुन आपणास धन्य मानतात, श्री शंकरांनी माझ्या चरण कमलापासुन निघालेली गंगा मस्तकावर धारण केली त्यामुळे आदर कसा करावा, हे श्री शंकरांना गुरुबुध्दीने शरण जावुन विचारले पाहीजे.परंतु हे वर्णन आता पुरे. देवाधिेदेव महादेवांचे वर्णन करत असताना त्यात माझ्या आत्मस्तुतीचाही संचार होत असतो. याकरिता हे वर्णन नको, असे रमानाथ म्हणाले आणि पुन: सांगू लागले. अर्जुना, मी त्या भक्ताला डोक्यावर धारण करतो. कारण की तो भक्त चौथा पुरूषार्थ जो मोक्ष त्याला आपल्या हातात घेऊन प्रेमभक्तीच्या मार्गाने जगाला मोक्ष देत असतो. तो परमभक्त जगाला मोक्ष देण्याचा अधिकारी असतो तो मुमूक्षु लोकांसमोर बांधलेले मोक्षाचे गाठोडे सोडतो, एवढा महान भक्त जगासमोर पाहण्यासारखा नम्र असतो. (ओवी २११ ते २२०)

       म्हणून त्याला आम्ही नमस्कार करू त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाणीकडून धारण करवू म्हणजे वाचेने त्याचे गुण गाऊ आणि त्याचे कीर्तिरूपी अलंकार कानांकडून धारण करवू म्हणजे कानांनी आम्ही त्यांची कीर्ती ऐकू. असे माझे भक्त आहेत. त्यांना पाहण्यासाठी आम्हाला डोहाळे लागल्यावर मी परमार्थत: अचक्षू असूनदेखील मला डोळे निर्माण होतात. सदैव माझ्या हातात असणाऱ्या कमळाने मी त्यांची पूजा करतो. त्याच्या शरीराला दृढ आलिंगन देण्यासाठी दोन हातांवर दुसरे दोन हात घेऊन म्हणजे चतुर्भुजरूप धारण करून वैकुंठाहून आलो आहे. त्याच्या प्रेमळ संगतीच्या परम आवडीने मी परमार्थत: देहरहित असलो तरी मला सगुणरूप धारण करणे भाग पडले आहे. तो मला इतका प्रिय आहे की त्याला दुसरी उपमाच देता येत नाही. त्याच्याशी आमचे मित्रत्वाचे, सख्यत्वाचे नाते असते यात काय आश्चर्य आहे? परंतु अशा महान भक्ताचे चरित्र जे श्रवण करतात आणि जे अंत:करणापासून अशा त्या भक्ताच्या परमपवित्र चरित्राची प्रशंसा करतात, तेसुध्दा मला प्राणांपेक्षा अधिक आवडतात हे सत्य आहे. अर्जुना, हा प्रस्तुत भक्तियोग संपुर्णपणे तुला सांगितला आहे, अनेक प्रकारच्या योगरुपी धारा या प्रेमळ भक्तिरुपी महासागरात येवुन ऐक्य पावतात, त्या परमभक्तावर मी प्रेम करतो आणि त्याला मस्तकावर धारण करतो, तो  भक्तियोगाचे आचरण करतो, म्हणुन एवढी उच्च स्थिती त्याला प्राप्त झाली आहे.त्या ह्या भक्तीच्या व भक्तांच्या गोष्टी रम्य, अमृतधारेप्रमाणे मधुर, धर्माला अनुकूल अशा आहेत जे जिज्ञासु तिला स्वानुभवाने जाणतात. (ओवी २२१ ते २३०)

          तसेच माझ्याविषयीच्या श्रध्देचा आदर केल्याने ज्यांचे ठिकाणी भक्तियोग विस्तार पावला आहे, ज्यांच्या अंत:करणात भक्त‍ि स्थिर झाली आहे, आणि जे भक्तियोगाचे आचरण करतात, अशा प्रकारे त्यांच्या मनाची खरोखर अशी स्थिती होते की त्यांना मशागत केलेल्या जमिनीत जसे उत्तम पीक होते, तसे उत्तम प्रकारचे फळ त्यांना प्राप्त होते, परंतु मला परमश्रेष्ठ मानुन भक्तिविषयी अत्यंत प्रेम धरुन, भक्तीला सर्वस्व मानुन भक्तियोगाचा जे स्वीकार करतात अर्जुना, जगामध्ये तेच भक्त आणि योगी आहेत त्यांच्या भेटीची मला अखंड आंतरिक उत्कंठा असते,ज्यांना भक्तीच्या मंगलमधुर गोष्टी ऐकण्याची आत्यंतिक आवड आहे तेच  “तीर्थ” आहे, आणि तेच “क्षेत्र”आहे, जगात तेच एक परमपवित्र आहे, अशा भक्तांचे आम्ही ध्यान करु त्यांची पुजा हीच आमची देवपुजा आहे, अशा नि:स्वार्थ भक्तांशिवाय आम्ही दुसरे काही चांगले मानत नाही, त्यांचा आम्हालां छंद आहे तेच आमचा ठेवा आहेत किबंहुना ते जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हाच आम्हाला समाधान लाभते,  अर्जुना, जे अशा प्रेमळ भक्तांच्या कथा सांगतात कथेचा अनुवाद करतात त्यांनादेखील आम्ही श्रेष्ठ दैवत समजतो, संजय म्हणाला, सर्व जगाला आनंद देणारा, जो जगताचे आदी कारण आहे अशा मुकूंदाने-श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले, राजा धृतराष्ट्रा ! जो श्रीकृष्ण पुर्णपणे निष्कलंक आहे, संपुर्णपणे त्रैलोक्यपालन करणारा आहे आणि शरण आलेल्यासाठी अतिशय प्रेमळ आहे, म्हणुन तो शरण जाण्यास योग्य आहे.   (ओवी २३१ ते २४०)

           इंद्रादिक देवांना सहाय्य करणे हा ज्याचा सहज स्वभाव आहे, तिन्ही लोकांचे लाड पुरविणे हा ज्याचा लिलाविलास आहे, अंतकरणापासुन शरण आलेल्या लोकांचे पालन करणे हा ज्याचा सदैव खेळ आहे, जो धर्माचा रक्षक असल्याने ज्याची अपार किर्ती आहे, जो मोक्षाचे दान देताना उच्च-नीच असा भेद पाहत नाही, कोणाबरोबरही ज्याची तुलना करता येत नाही, अशा अतुल बळाने जो बलाढय आहे, जो प्रेमळभक्तजनानां सुलभ आहे, त्या परमेश्वराकडे जाण्यास सत्य हाच सरळ पुल आहे, जो चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा, सत्य-शिव-सुंदरतेचा अमोल ठेवा आहे, असा जो प्रेमळ भक्तांचा व वैकुंठाचा सार्वभौम राजा आहे तो अलैाकिक निरुपण आहे, त्याचे एकाग्रतेने श्रवण करावे, असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला, ती पुढील रसपुर्ण कथा संस्कृत भाषेच्या मार्गातुन मराठी भाषेच्या प्रतिमार्गात आणली जाईल, तरी श्रोत्यांनी ती आता अत्यंत एकाग्रतेने ऐकावी. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोते हो ! तुम्हां संतांची वाग्यज्ञाने सेवा करावी, हे सदगुरुं श्री निवृत्तीनाथांनी आम्हांला शिकवले आहे. (ओवी २४१ ते २४७)

 

सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरीचा अध्याय बारावा श्री भगवंताच्या कृपेने संपन्न !

( भगवद गीता श्लोक १ ते २० आणि ज्ञानेश्वरी मराठी भाषांतरीत ओव्या १ ते २४७ )

पुढील अध्याय