दिव्यांचा झगझगाट पाहुन पतंग किटक हा दिव्यावर झडप घालतो, परंतु तोच दिवा आपणाला भस्म करील हे पतंगाला कळतच नाही. जसा एखाद्या आळशी आणि अज्ञानी मनुष्य झोपेच्या सुखात असताना आपले घर जळत असले तरी तिकडे लक्ष देत नाही, किवां एखादा खादाड मनुष्य विष घालुन शिजवलेले अन्न असले तरी तिकडे लक्ष न देता ते खात असतो, त्याप्रमाणे जगण्याच्या निमीत्ताने हा मृत्यूच आयुष्याचे सोगं घेवुन आला आहे, हे जो रजोगुणापासुन निर्माण होणाऱ्या विषयांच्या सुखामुळे जाणतच नाही.आपल्या शरीराची वाढ, रात्र आणि दिवस याचां उपयोग, विषयसुखाचे महत्व, हे सर्व तो सत्यच आहे असे मानतो., परंतु त्या बापडयास हे समजत नाही की वारांगणा आपणास तन-मन अर्पण करते तेच त्याचे सर्वस्व लुटणे असते तसाच प्रकार या रजोगुणातील सुखात आहे, प्रवास करताना एखाद्या संभवित चोराने केलेले मित्रत्व तेच त्याचे प्राण घेणे असते, अथवा भिंतीवर काढलेल्या चित्राला स्नान घालणे, म्हणजे त्याचा नाश करणे होय. पंडुरोगाने मनुष्य गलेलठ्ठ झाला म्हणजे तो शक्तीमान झाला असे नसुन त्याचे आयुष्य आता संपले असे जाणावे, त्याप्रमाणे खाणे-पिणे, झोपणे याने मोहीत झालेला मनुष्य विषयवृध्दीतच खरी वृध्दी असे समजतो परंतु त्यात खराखुरा नाश भरलेला आहे हे तो जाणत नाही, सुळावर देण्याकरता नेत असलेला मनुष्य समोर सुळ पाहीला की त्याकडे पळत जावु लागला की पावलो पावली तो मृत्यूच्या जवळ जात असतो, त्याप्रमाणे जसजसा देह वाढेल तसे आयुष्य वृध्दीगत होईल व जो जो तो विषयसुखात रमुन जाईल, तसे तसे मरण आयुष्याला अधिकाअधिक जिंकेल, ज्याप्रमाणे मीठास पाण्याने घासले असता ते विरघळत जाते. (ओवी ७४१ ते ७५०)
त्याप्रमाणे दिवसेदिवस आयुष्य कमी-कमी होत जाते आणि मरणकाळ जवळ येतो हा घटनाक्रम अतित्वरेने घडतो परंतु हे त्या अज्ञानी माणसाला माहीत नसते, अर्जुना , अधिक काय वर्णन करावे? विषयांचा उपभोग हा शरीराचा नित्य नवा मृत्यूआहे हे जो विषयांच्या कपटी स्वभावामुळे पाहु शकत नाही, हे महाबाहो अर्जुना, तो अज्ञानरुप देशाचा राजा आहे, या म्हणण्यात काही शंका नाही, विषयभोगांच्या संतोषाने तो त्यापाठोपाठ येणाऱ्या मृत्यूला बघत नाही, तसाच तो तारुण्याच्या संतोषाने वार्धक्याबदृल काळजी करत नाही, डोगरांच्य कडयावरून लोटलेला गाडा अथवा पर्वताच्या शिखरावरुन सुटलेला दगड पुढे काय आहे, हे जसे बघत नाही, त्याप्रमाणे अज्ञानी माणुस पुढे वार्धक्य येणार हे बघत नाही, अथवा अरण्यात आडबाजुच्या ओहोळाला पुराचे पाणी यावे किवां ताकदीच्या मदाने मत्त होवुन रेडा झुंजतो, त्याप्रमाणे ज्याला तारुण्याचा मद चढलेला असतो शरीराचा पुष्टपणा वार्धक्यात कमी होतो सौदर्य कमी होते आणि डोके मानेबरोबर हलु लागते, केस, दाढी पांढरी होते, शरीराची अशी अवस्था होते तरी प्रपंचातील प्रिय वस्तुचा संग्रह करण्याचा मोह कमी होत नाही, पुढे असलेले पदार्थ जसा उरावर आदळेपर्यत आंधळा पुढे काय आहे हे पहात नाही, आळशी माणसाला डोळयावरील चिपडांने संतोष होतो कारण त्याला देहाची स्वछता ठेवण्याचा कंटाळा वाटतो, आजचे तारुण्य भोगीत असताना उद्याचा वृध्दापकाळ येईल याचा जो विचार करत नाही, तो खरोखर अज्ञानी होय. (ओवी ७५१ ते ७६०)
आंधळा, कुबडा यानां हिणवणाऱ्या माणसाला माहीती नसते की उद्या त्याची ही तीच गत होणार आहे, अंगावर वृध्दत्वाच्या व मरणकालाच्या खुणा उमटु लागतात, तरीपण ज्याला आपण तरुणच आहोत असा भ्रम असतो, तो पुरुष अज्ञानाचे घर आहे, हे माझे वचन सत्य मान, आणखी काही अज्ञानाची महत्वाची लक्षणे सांगतो ती श्रवण कर. ज्या रानात वाघ आहे तेथुन बैल एक वेळ चरुन नशिबाने घरी परत आला, तर रानातील वाघ आपणास काहीही करत नाही असा विश्वास बाळगुन पुन्हा त्याच रानात चरावयास जातो, अथवा ज्या घरातील संपत्तीवर सर्पाची नजर आहे ती संपत्ती एकाद्याने सुखरुपपणे तेथुन बाहेर आणली तरी त्या संपत्तीवर सर्पाची नाजर असते या गोष्टीवर तो विश्वास ठेतत नाही. त्याप्रमाणे एक-दोन वेळा रोग बरे होवुन आजारी माणुस चागंला झाला तरी हा देह रोगांचे भाडांर आहे हे जो जाणत नाही वैऱ्यांस झोप आली म्हणून आता त्याचे माझ्याशी असलेले वैर संपले असे जो भ्रमाने मानतो, परंतु तोच वैरी जागा झाल्यावर त्यास मुलाबाळांसह मारुन टाकतो, त्याप्रमाणे भुक व झोप चांगली लागते त्यामुळे रोग काही झाला नाही असे समजुन जो वृध्दापकाळातील भावी रोगाची काळजी करत नाही, आणि स्त्री-पुत्राच्या संगतीत दिवस सुखाने जात आहेत आणि उद्योगधंदा वाढत संपत्तीची वाढ होत आहे अशा अहंकाराच्या धुंदीच्या धुळीने ज्याच्या विचाराचे डोळे आंधळे होंतात परंतु त्याच स्त्री-पुत्रांचा वियोग तात्काळ होवु शकतो आणि सर्वच संपत्तीचा काही क्षणातच नाश होवु शकतो, हे पुढील वियोगाचे दु:खाबाबत तो विचारच करत नाही. (ओवी ७६१ ते ७७०)
अर्जुना, तो खरा अज्ञानी आहे. तसेच जो तारुण्यात आपल्या विषयांना आवर न घालता स्वैर भोग देतो तोही तसाच अज्ञानी आहे असे जाणावे, तारुण्यातील मदाने आणि संपत्तीच्या गर्वाने तो भोग्य अथवा अभोग्य यांचा काहीही विचार न करता सरसकट विषय भोगत असतो, शास्त्राने जे करु नये म्हणुन सांगितले आहे ते तो करत असतो जे असंभवनीय आहे ते व्हावे असे मनात आणतो. जे चिंतु नये त्याचे चितंन करतो ज्या गोष्टीचा विचार करु नये अशा संबधी त्याची बुध्दी विचार करते, जेथे प्रवेश करु तेथे प्रवेश करते, जे पाहु नये ते पाहतो,जे घेवु नये ते मागुन घेतो, ज्याला शरीराने व मनाने स्पर्श करु नये त्याला मुद्दाम स्पर्श करतो, जे खावु नये ते खातो, अशा प्रकारे शास्त्रांच्या विरुध्द वागल्याने त्याला संतोष वाटतो, ज्याची संगती धरु नये त्याची संगती धरतो, जेथे आसक्ती ठेवु नये तेथे आसक्ती ठेवतो, ज्या मार्गाचे आचरण करु नये त्या मार्गाचे आचरण करतो, जे ऐकु नये ते ऐकतो, जे बोलु नये तेच मोठयाने बोलत असतो, अशा गोष्टी केल्याने आपल्या हातुन दोष घडतील याचा विचारदेखील तो मनात करत नाही. विहीत कर्म करताना ते कर्म शरीरास व मनास गोड वाटते म्हणून करतो, परंतु कर्तव्य-अकर्तव्याचा विचार करत नाही, कर्माच्या नावाने जो भलतेच कर्म करतो माझ्या हातुन पाप घडत आहे पुढे मला या पापाचे प्रायश्चित म्हणून भयानक नरकयातना भोगाव्या लागतील हे पुढील भवितव्य जो काहीच पहात नाही, त्याच्या आश्रयाने जगात अज्ञान इतके बलवान होते की सज्ञान माणसा बरोबरसुध्दा नाना प्रकारचे आक्षेप घेवून ते संघर्ष करतो. (ओवी ७७१ ते ७८०)
असो या लक्षणाबरोबर आणखीन काही लक्षणे या अज्ञानी मनुष्याची आहेत ती तु श्रवण कर, की ज्यामुळे तो अज्ञानी तुला यथार्थपणे समजु शकेल. फुलाच्या नवीन गंधाच्या परागामध्ये भ्रमर जसा आसक्त होवुन गुंतून रहातो त्याप्रमाणे त्याचे संपुर्ण प्रेम घरातच गुंतलेले असते साखरेवर बसलेली माशी जशी उडत नाही, त्याप्रमाणे ज्याचे मन स्त्रीवर अत्यंत आसक्त झालेले असते, बेडुक ज्याप्रमाणे पाण्याच्या कुंडातुन बाहेर पडत नाही, माशी ही शेबंडात गुंतल्यावर त्यातुन बाहेर निघत नाही, जनावर चिखलात पुर्ण देहासह बुडून फसले तर ते बाहेर निघत नाही, त्याप्रमाणे घराच्या आसक्तीतुन तो बाहेर पडत नाही आणि मृत्यूनंतरही तो सर्प होवुन त्या जागेत रहातो. तरुण स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीच्या गळयाला मिठी मारते, त्याप्रमाणे जो आपल्या घराला मोहाने धरुन रहातो फुलातील मधुर रस मिळण्यासाठी ज्याप्रमाणे मधमाशी कष्ट करते, त्याप्रमाणे अतिशय कष्ट सोसुन जो घराचे रक्षण करतो, वृध्दापकाळामध्ये एकुलते एक पुत्ररत्न झाले, तर त्याविषयी जेवढे प्रेम आई-वडिलांना असते, अर्जुना, इतके प्रेम ज्याचे आपल्या घरावर असते आणि ज्याला स्त्रीशिवाय या जगात दुसरी कोणतीही वस्तु प्रिय नसते, त्याप्रमाणे जो काया-वाचा-मनाने स्त्रीवर प्रेम करतो, आणि आपण कोण आहोत आणि आपले कर्तव्य काय आहे हे तो जाणत नाही. (ओवी ७८१ ते ७९०)
ज्याप्रमाणे सिध्द पुरूषाचे चित्त ब्रम्हस्वरुपाशी लीन झाल्यावर त्याचे सर्व व्यवहार थांबतात, ज्याच्या सर्व इंद्रियांची धाव एका स्त्रीविषयांकडेच असते, तो आपली लोकांनी केलेली निंदेकडे लक्षही देत नसतो, स्त्रीच्या चित्ताची जो सदैव आराधना करीत असतो, ज्याप्रमाणे गारुडयाचे माकड गारुडयाच्या छंदाप्रमाणे नाचत असते, तसा स्त्रीच्या छंदाने तो नाचत असतो, स्त्रीच्या सेवेसाठी हवे तेवढे कष्ट करीत असतो, आपल्या इष्ट मित्रांना दुखावतो व तिच्यासाठी भरपुर संपत्ती मिळवतो, स्त्रीला पैसे कमी पडतील म्हणुन दान-धर्म करत नाही, आप्त स्वकियांना फसवितो, आई-वडिलांनी पैसे मागितले असता शिल्लक नाही असे सांगतो, परंतु स्त्रीला उत्तमोत्तम वस्त्रे,अलंकार, भोगसंपत्ती आणुन देतो. ज्याप्रमाणे प्रेमळ भक्त आपल्या कुलदेवतेची अत्यंत एकाग्रतेने उपासना करतो, त्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य स्त्रीची उपासना करत असतो, जे सुंदर व मौल्यवान असेल ते सर्व स्त्रीला अर्पण करतो, इतर कुटूंबियांना देहरक्षणापुरतेही अन्न वस्त्र देत नाही, आपल्या स्त्रीकडे कोणी वाकडया नजरेने पाहीले असता ज्याला युगाचा अंत झाला असे वाटते. (ओवी ७९१ ते ८००)
जसे नायटे होतील म्हणून नागांचा नवस कोणी मोडत नाही तसे स्त्रीचे सर्व मनोरथ तो पाळतो. अर्जुना , फार काय वर्णन करावे? त्याला सर्वस्व एक स्त्रीच असते, तिच्यापासुन झालेल्या अपत्यावर त्याचे विशेष प्रेम असते, अरे, स्त्रीच्या स्थावर-जंगम संपत्तीस तो जीवापाड जपतो, तो केवळ अज्ञानाचे मुळ आहे, अज्ञानास त्याच्या योगान बळ आहे असे समज, सारांश म्हणजे तो केवळ अज्ञानाचे रुपच आहे, खवळलेल्या सागरामध्ये नाव मोकळी सोडली असता ती जशी लाटांच्या हेलकाव्यामुळे झोके खात असते, त्याप्रमाणे आवडती वस्तु मिळाली असता तो अहंकाराने सुखाच्या शिखरावर चढतो आणि नावडती वस्तु मिळाली तर दुखाने खाली आपटतो. याप्रमाणे हे महाबुध्दीमान अर्जुना , ज्याच्या चित्तामध्ये फक्त सुख-दुखाची चितां उत्पन्न होत असते, तो अज्ञानी आहे असे समज. त्या अज्ञान्याचीही माझ्या ठिकाणी भक्ती असते, परंतु ती भक्ती माझ्या प्राप्ती साठी नसुन त्याला प्रापंचिक भोग आणि संपत्ती, सुख प्राप्त व्हावेत म्हणुन असते, बहुरुपी माणुस ज्याप्रमाणे वैराग्यांचे सोंग घेतो असे सोंग घेवुन पैसे मिळवण्याचा हेतु असतो, त्याप्रमाणे अशा अज्ञानीने आपली कामे पुर्ण व्हावीत म्हणुन माझ्या भक्तीचे सोंग घेतलेले असते. अथवा जारिणी स्त्री जाराकडे जाण्यास मिळावे म्हणून आपल्या पतीची सेवा करत असते, ज्यामुळे पतीच्या मनात आपल्याबदृल चांगली भावना व्हावी. अर्जुना ! त्याप्रमाणे मला भजण्याची पायरी करुन तो अज्ञानी चित्तामध्ये विषयांची लालसा ठेवतो म्हणजेच केवळ विषयप्राप्तीसाठीच माझी भक्ती, प्रार्थना, भजन करत असतो. (ओवी ८०१ ते ८१०)
माझी भक्ती करुनही जर त्याला ज्या विषयांची लालसा होती ती विषय वस्तु प्राप्त झाली नाही तर देव आणि भक्ती हे सर्व खोटे आहे असे समजून भक्तीचा मार्ग सोडून देतो. ज्या प्रमाणे शेतकरी प्रत्येक वर्षी शेतात वेगवेगळया पीकांची पेरणी करतो, त्याप्रमाणे अज्ञानीही विविध प्रकारचे देवांची पुजा करतो परंतु असे करत असताना मात्र तो अगोदर पुजा करत असलेले देव देवता यानां सोईस्कर रित्या विसरतो, ज्या गुंरुच्या ठिकाणी ऋध्दी-सिध्दी चे भरपुर ऐश्वर्य दिसेल, त्याच्यांकडुन तो गुरुमंत्र घेतो परंतु इतर गोष्टी मात्र समजुन घेत नाही, सर्व प्राणीमात्रांशी तो निष्ठुरतेने वागतो, तो एकच ठिकाणी देव आहे असे मानतो मात्र त्याच्या वागण्यात कधीच एकनिष्ठता नसते. तो माझी मुर्ती तयार करतो आणि घराच्या एका कोपऱ्यात बसवुन आपण इतर देवदेवतांची पुजा करत फिरत असतो, तो घरात माझी पुजा करतो, इच्छित वस्तू प्राप्त होण्यासाठी कुलदेवतेंची पुजा करतो, तसेच श्राध्दपक्षात तो पितरांची पुजा करतो एकादशीच्या दिवशी जशी माझी भक्ती करतो तसेच नागपंचमीच्या दिवशी नागांची पुजा करतो, चर्तुदशीच्या दिवशी दुर्गामातेची पुजा करुन देवीस मी तुझाच भक्त आहे असे म्हणतो, चतुर्थीला गणेशाची पुजा करतो. नित्य-नैमित्तीक कर्म सोडुन देतो आणि नवरात्रीतील देवीच्या अनुष्ठानासाठी बसतो, रविवारी भैरोबा देवाला ज्वारीची भाकरी आणि वांग्याचे भरीत करुन नैवद्य दाखवतो. (ओवी ८११ ते ८२०)
सोमवारी बेल घेवुन भगवान शंकरांची पुजा करण्यासाठी देवळात धावतो, याप्रकारे तो भक्त एकटाच अनेक देवदेवतांची थोडी-थोडी उपासना करुन त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. ज्याप्रमाणे गावाच्या वेशीवरील वारांगणा नटुन-थटुन सर्वाना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते, त्याप्रमाणे तो अज्ञानी भक्त थोडा वेळदेखील स्वस्थ न बसता अनेक देवदेवतांची पुजा करत असतो, याप्रमाणे जो भक्त कोणत्याही देवाकडे स्वैरपणे धावत असतो तो अज्ञानाचे मुर्तीमंत रुपच आहे. तसेच पवित्र एकांत स्थाने, शुध्द तपोवने, तीर्थक्षेत्रांच्या तीरावरील पवित्र नद्यां पाहुन ज्याला हे सर्व काही तरी थोतांड आहे असे वाटते तो सुध्दा अज्ञानीच होय. आत्म्याचा साक्षात्कार घडवणाऱ्या ब्रम्हविद्येची हा अज्ञानी निंदा करतो, उपनिषंदाच्या अभ्यासाकडे वळत नाही, योगशास्त्र ज्याला आवडत नाही, अध्यात्मामध्ये ज्याचे मन लागत नाही, आत्मविचार,आत्मज्ञान म्हणुन अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, अशा समजुतीची भिंत पाडून ज्यांची बुध्दी स्वैरपणाने भटकरणारी झाली आहे, तो सर्व प्रकारची कर्मकांडे जाणतो, अठरा पुराणे तोंडपाठ करतो, ज्योतिषशास्त्रात इतका तरबेज असतो की तो जे भविष्य सांगेल तेच घडते, जो कला-कौशल्याच्या कामात अतिकुशल, पाकक्रियेत अत्यंत प्रविण आणि अर्थववेदांचे विधी म्हणजे मंत्रतंत्राचे विविध प्रकार ज्याच्या हातात आहेत. (ओवी ८२१ ते ८३०)
कामशास्त्रात काही जाणावयाचे राहीले नाही, महाभारताचा अभ्यास झालेला आहे, मंत्राचे मुर्तीमंत शास्त्रदेखील त्याच्या स्वाधीन आहे, जो नितीशास्त्र उत्तम जाणतो, वैद्यकशास्त्रात तरबेज आहे, काव्याचा व नाटकाचा रसास्वाद घेण्यास ज्याच्यांसारखा रसिक दुसरा कोणी नाही, स्मृतीचा विचार ज्याला कळत असतो, इंद्रजाल विद्येचे मर्म ज्याने जाणलेले असते आणि वैद्यक शब्दकोश हा तर ज्याच्या बुध्दीची चाकरी करतो. व्याकरणशास्त्रामध्ये अतिशय चतुर आहे, तर्कशास्त्रात फारच पटाईत आहे, परंतु अध्यात्मज्ञानात तो जन्मांध आहे. एका अध्यात्मशास्त्रावाचुन इतर सर्व शास्त्रांत तो प्रवीण असला तरी त्या ज्ञानाचा उपयोग नाही, मुळ नक्षत्रांवर जन्मलेल्या मुलाला आई-वडिलांनी पाहु नये तसे तु त्याच्या कडे पाहु नकोस, जसे मोरांच्या अंगावरील पिसाऱ्यावर डोळे असतात परंतु त्यास दृष्टी नसते, तसे इतर सर्व शास्त्राचे ज्ञान आहे, मरणाच्या वेळी प्राण वाचवण्यासाठी अगदी परमाणुएवढी छोटीशी संजीवनी वनस्पती सुध्दा उपयोगी येते मग गाडाभर इतर वनस्पतीचा काय उपयोग? ज्याप्रमाणे आयुष्याशिवाय सर्व सामुद्रिक चिन्हे उत्तम आहेत अथवा शिर नसलेल्या धडास उत्तम अलंकाराने सजवावे अथवा नवरा-नवरी नसताना वरात काढावी ही शुध्द विटंबना आहे, त्याप्रमाणे एका अध्यात्मज्ञानावाचुन इतर सर्व शास्त्राचे ज्ञान पुर्णपणे अप्रमाण आहे. याकरीता अर्जुना, असे पाहा की ज्या शास्त्रमुढाला अध्यात्मज्ञानाविषयी नित्य जागृती नाही. (ओवी ८३१ ते ८४०)
त्या मनुष्याचे शरीर म्हणजे जणु अज्ञानाचे वाढलेले बीजच होय, त्याची विद्ववता ही अज्ञानाची वाढत जाणारी वेल होय, तो जे जे बोलतो ती जणू अज्ञानाची फुललेली फुलेच उमलली आहेत, त्याच्या पुण्यालाही अज्ञानाचे फळ आले आहे, आणि ज्याने अध्यात्मज्ञानाला कधीच मानले नाही, त्याने ज्ञेय सत्-चित-आनंदरुप परमात्म्याला जाणले नाही, हे उघड बोलुन दाखवण्याची आवश्यकता आहे काय? नदीच्या अलीकडील काठावरुन जो न पोहताच माघारी जातो, त्याला नदीच्या पलीकडील काठावरील वार्ता कळेल काय? अथवा घराच्या दारातच उबंऱ्यात ज्यांचे मस्तक कापुन पुरले आहे, तो त्या घरातील धन कसे पाहु शकेल? त्याप्रमाणे अर्जुना, ज्याला अध्यात्मज्ञानाची थोडीही ओळख नाही, त्याला ज्ञानाचा अर्थ जे ब्रम्ह आहे ते जाणण्याचा विषय होईल काय? म्हणुन तो अज्ञानी तत्व जाणत नाही, हे तुला विशेष करुन आकडे मांडुन सांगण्याचे कारण नाही. गर्भवती स्त्रीने भोजन केले असता तिच्या उदरातील गर्भाची तृप्ती होते त्याप्रमाणे जी ज्ञानाची लक्षणे सांगितली आहेत त्याच्या विरुध्द ज्या गोष्टी ते ते अज्ञान आहे हे तू निश्चीत समज. आंधळया माणसाला भोजनाचे आमंत्रण दिल्यावर त्याच्याबरोबर दुसरा डोळस माणूस येत असतो, त्याप्रमाणे ज्ञानाची लक्षणे सांगितल्यावर अज्ञानाचे विशेष स्पष्टीकरण करुन सांगण्याची जरुरी नाही. याप्रमाणे ही “अमानित्वादी” मानाची लक्षणे पुन्हा उलट रितीने सांगितली आहेत. (ओवी ८४१ ते ८५०)
कारण ज्ञानाची अठरा पदे उलटी केली असता सहजपणे अज्ञानाची लक्षणे सिध्द होतात, या अध्यायात अकराव्या श्लोकांच्या उत्तरार्धाच्या दुसऱ्या चरणामध्ये श्रीमुंकूदाने कथन केले आहे की ही ज्ञान प्रतिपादक पदे उलटी केली असता ती पदे अज्ञान प्रतिपादक होतात. म्हणून मी या पध्दतीने अज्ञानप्रतिपादक पदांचा विस्तार केला आहे एरवी दुधात पाणी मिसळुन दुध वाढवुन काय करायचे? त्याप्रमाणे उगीच माझी बडबड नाही मी पदांच्या अर्थाची मर्यादा सोडली नाही मुळ श्लोकामध्ये जो अर्थ ध्वनित केला आहे त्या अर्थाचा विस्तार केला, हा अपराध झाला असे समजुन का भितोस? खरोखर हा अपराध नाही, आम्ही जो अभिप्राय गीतारुपी गुहेत झाकुन ठेवला आहे तो तु प्रगट कर असे तुला भगवंतानेच सांगितले आहे ना? देवाचे मनोगत आम्हाला तु स्पष्ट करुन सांगितलेस असे जरी आम्ही म्हटले, तरी तुझे चित्त त्या कारणाने दडपुन जाईल, म्हणुन हे असो दे तुझ्या ज्ञानरुपी विचाराने आम्हास अतिशय समाधान वाटले. कारण तुझ्यामुळे आम्ही ज्ञानरुपी नौकेने श्रवण-सुखाला भेटलो आहोत. आता यानंतर श्रीहरी कृष्णाने जो उपदेश केला, त्याचा अर्थ आम्हाला लवकर कथन करा. संत-सज्जनांनी अशी आज्ञा केल्याबरोबर श्री निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानदेव महाराज म्हणाले की, आता आपण पुढे ऐकावे. (ओवी ८५१ ते ८६०)