देव म्हणतात हे पांडवा, तु जो हा लक्षंणाचा समुदाय ऐकलास तो सर्वच अज्ञानाचा भाग आहे असे जाणावे, या अज्ञानभागाचा त्याग करुन तु ज्ञानप्राप्तीविषयी दृढनिश्चयी हो, मग तुला त्या परिशुध्द ज्ञानाच्या योगे ज्ञेयाची प्राप्ती होईल, हे ऐकताच अर्जुनाने ते जाणण्याविषयी प्रबळ इच्छा व्यक्त केली तेव्हा सर्व ज्ञान्यांचा राजा श्रीकृष्ण याने अर्जुनाच्या मनातील भाव ऐकुन जाणुन त्यास म्हटले की आता तुला ज्ञेय म्हणजे माय हे सांगतो, तरी तु एकाग्रतेने श्रवण कर. ब्रम्ह्याला ज्ञेय म्हणायचे , हे एवढयाकरताच की ते ब्रम्ह दुसऱ्या कोणत्याही उपायांनी जाणले जात नाही. आणि हे ब्रम्ह जाणले असता काहीच करावयाचे राहत नाही, त्याचे ज्ञान जाणणाऱ्यास ज्ञेयस्वरुप करते, जे ज्ञेयस्वरुप जाणल्यामुळे संसाराचे कुंपण काढुन टाकुन , म्हणजे संसारास निरास करुन जीव नित्यानंदाच्या पोटात विरुन जातो, म्हणजे नित्यानंदाशी ऐक्य पावतो. ते ज्ञेय असे आहे की, ज्याला कोणी कारण नाही जे कोणापासून उत्पन्न झाले नाही, आणि ज्याला स्वभावताच “परब्रम्ह” असे नाव पडले आहे. जे नाही असे म्हणावयास जावे तर विश्वाच्या आकाराने दिसते आणि ते ब्रम्ह विश्वच आहे असे म्हणावे तर विश्व हा मिथ्या भास आहे, विश्व मायास्वरुप आहे. त्या परब्रम्ह्याच्या ठिकाणी रुप, रंग व आकार नाहीत तसेच पाहण्याचा विषय व पाहणारा ही स्थिती देखील नाही, असे असल्यामुळे ते आहे हे तरी कोणी आणि कसे म्हणावे बरे? (ओवी ८६१ ते ८७०)
आणि जर खरोखरच नाही असे म्हणावे तर महदतत्व, अहंकार वगैरे सारे विश्व कोणाच्या अधिष्ठानावर भासते? कारणावाचुन जसे कार्य नसते, तशी अध्यस्ताची प्रतीती अधिष्ठानावाचुन नसते आणि अधिष्ठानभुत ज्ञेयावाचुन विश्वाचे स्फुरण तरी कसे बरे असु शकेल ? म्हणुन त्या संबंधाने आहे नाही असे काहीही बोलता येत नाही, वाणी मुकी होते, आणि त्या ब्रम्ह्याच्या ठिकाणी विचारांची वाट खुंटते म्हणजे त्यासंबंधाने काही विचार करता येत नाही. ज्याप्रमाणे रांजण, मडकी, परळ या पदार्थामध्ये पृथ्वीच म्हणजे माती जशी त्या त्या आकाराने असते, त्याप्रमाणे जी ज्ञेय ब्रम्हवस्तू आहे, ती सर्व जगात सर्व पदार्थरुप होवुन राहीली आहे. सर्व देशांत सर्व कालांमध्ये भरलेले असल्यामुळे स्थुल व सुक्ष्म वस्तूपासुन तेच क्रिया घडवीत असते म्हणुन त्या क्रियाच त्याचे हात आहेत, या कारणाने त्यास “विश्वबाहु” असे म्हटले आहे, कारण ते ब्रम्ह सर्वस्वरुप होवुन सर्वरुपाने सर्वथा सर्व क्रिया करते अर्जुना, ते ब्रम्ह सहज व्यापक असल्यामुळे विश्व उत्पन्न झाल्यानंतर विश्वाच्या सर्व स्थानांत एकाच वेळी आले आहे, म्हणुन ज्याला विश्वाघ्रि असे नाव आहे, म्हणजे ज्याचे चरण सर्वत्र आहेत असा. सुर्याला अंग व डोळे आदी अवयव नाहीत कारण ते केवळ प्रकाश रुप एकजिनसी पदार्थ आहेत, त्याप्रमाणे जे ब्रम्ह ज्ञानस्वरुप असुन परमार्थता येथे दृष्टावदृष्टा भाव संभवत नाही तरी देखील जीवाची उपाधी अंतकरण आणि ईश्वराची उपाधी माया दोन्हीमुळे सर्व विश्वाचा द्रष्टा आहे, म्हणून “विश्वतचक्षू” म्हणजे ज्याला सर्वत्र नेत्र आहेत असा हा प्रकार नेत्र नसणाऱ्याच्या ठिकाणी बोलण्यास वेद तयार झाला, जे ब्रम्ह सर्वाच्या मस्तकावर सर्व प्रकारने अस्ति-भाति-प्रिय रुपाने सदैव नांदते, अशी स्थिती असल्यामुळे त्यास विश्वमूर्ध म्हणजे सर्वत्र मस्तके असलेला असे म्हटले जाते. अग्नीच्या ठिकाणी जसे अग्नीचे स्वरुप तेच मुख असते, तसे ते ब्रम्ह सर्वस्वरुप असल्यामुळे सर्व रुपाने सर्वाचा भोक्ता आहे. (ओवी ८७१ ते ८८०)
या कारणाने त्याला विश्वतोमुख म्हणजे सर्वत्र मुखे आहेत असे श्रुतींच्या बोलण्यात आले. आणि आकाश ज्याप्रमाणे सर्व वस्तुमध्ये ओतप्रोत भरलेले आहे त्याप्रमाणे ज्याला शब्दं-मात्रांच्या ठिकाणी ज्ञानरुप कान आहेत म्हणून आम्ही त्याला सर्वत्र सर्व ऐकणारा असे म्हणतो, या प्रमाणे जे ज्ञेय ब्रम्ह सर्वाना सम प्रमाणात व्यापून उरलेले आहे. हे महाबुध्दीमान अर्जुना ! सुक्ष्म विचार करुन पाहिले तर याप्रमाणे ब्रम्ह्याची व्याप्ती असल्यामुळे श्रुतींनी त्याला “विश्वतचक्षु” असे म्हटले आहे. एरवी ब्रम्ह हे सर्व शुन्याचा शेवट आहे हा सिध्दांतही ज्या ठिकाणी सहन होत नाही, त्या ब्रम्हतत्वाला हात, पाय , डोळे , बोलणे हे कोठे आहे? सागराची एक लाट दुसऱ्या लाटेला गिळुन टाकत आहे असे दिसते, परंतु गिळून टाकणारी लाट गिळून टाकावयाच्या लाटेपेक्षा वेगळी आहे का? त्याप्रमाणे जे खरोखर एकच तत्व आहे तेथे व्यापले जाणारे व व्यापणारे कोठे आहे? परंतु ज्ञेय ब्रम्ह सांगण्यासाठी व्याप्त व व्यापक असे तात्पुरते द्वैत करावे लागते. शुन्य हे जेव्हा दाखवायचे असते तेव्हा एक बिंदु करावा लागतो, त्याप्रमाणे अद्वैत जेव्हा शब्दांनी वर्णन करावयाचे असते तेव्हा द्वैत करावे लागते. अर्जुना ! अद्वैताचे वर्णन करण्यासाठी द्वैताचा उपयोग केला नाही तर गुरु-शिष्याच्या संप्रदायाला अडथळे निर्माण होईल आणि त्यामुळे बोलणेच थांबले जाईल. म्हणुन श्रुतीने द्वैतभावाने अद्वैत निरुपण करण्याची प्रथा सुरु राहील असा मार्ग निर्माण केला आहे.(ओवी ८८१ ते ८९०)
डोळयांना विषय होणाऱ्या विश्वाच्या आकारात जे ज्ञेय ब्रम्ह ज्या प्रकाराने व्यापुन राहीले आहे तो प्रकार आता सांगतो तरी श्रवण कर. अर्जुना ! हे ज्ञेय ब्रम्ह असे आहे की आकाश हे पोकळीत पोकळीच्या रुपाने असते अथवा तंतु हे पटात पटरुप होवुन जसे असतात. हे बघ, रस जसा पाण्यामध्ये पाणी रुपाने असतो अथवा तेज हे जसे दिव्यामध्ये दिव्याच्या रुपाने असते. सुगंध जसा कापराच्या रुपाने कापरात भरलेला असतो आणि कर्म जसे शरीराच्या रुपाने शरीरात दिसते, फार काय वर्णन करावे? अर्जुना ! सोन्याचा तुकडा सोनेच असतो त्याप्रमाणे हे परब्रम्ह सर्वात व्यापक असुन सर्व रुपाने तेच आहे,परंतु ते सोने तुकडेपणामध्ये असते तेव्हा तो सोन्याचा तुकडा आहे असे वाटते पण वास्तविक पाहीले तर, सोने हे सोन्यासारखेच आहे. अर्जुना ! पाण्याचा ओघ वाकडा असला म्हणजे पाणी वाकडे दिसते, परंतु पाणी हे सरळच असते, लोखंड तापविले असता लोखंडामध्ये अग्नी येतो, परंतु तो अग्नी लोखंड होत नाही, घटाच्या आकाराने व्यापलेले आकाश घटाप्रमाणे वाटोळे दिसते आणि तेच घराच्या चौकात पाहीले असता ते चौकोनी दिसते, परंतु पोकळी ही कधीसुध्दा घटामध्ये वाटोळी आणि घरात चैाकोनी झालेली नाही.त्याप्रमाणे परब्रम्ह विकांरात व्यापक असुनदेखील विकाररुपाने परिणामाला प्राप्त होवुनही विकारी होत नाही, अर्जुना ! ते परब्रम्ह मन, आदी इंद्रियांप्रमाणे आणि सत्व, रज, तम गुणांप्रमाणे आकारास आले आहे असा भास होतो. (ओवी ८९१ ते ९००)
ज्याप्रमाणे गुळाची गोडी ढेपीत असते परंतु ती ढेपेच्या आकाराची नसते, त्याप्रमाणे गुण व इंद्रिय यांत ब्रम्ह असले तरी ब्रम्हवस्तुमध्ये गुण व इंद्रिये खरोखर नाहीत, हे कपिध्वजा ! दुधाच्या अवस्थेत तुप हे दुधाच्या रुपात असते, परंतु तुपाच्या अवस्थेत दुध नाही. त्याप्रमाणे जे ब्रम्ह या विकारात आहे, परंतु हे विकार नाहीत, असे समज, ज्याप्रमाणे सुवर्णाच्या अलंकाराला विविध नावे आहेत परंतु सुवर्णदृष्टीने ते सोनेच आहे, अर्जुना ! हा सिध्दांत उघड-उघड समजेल, अशा सुलभ मराठी भाषेत सांगावयाचा झाल्यास असे म्हणता येईल की ब्रम्ह हे सर्व गुण, इंद्रिये यामध्ये राहुन गुण-इंद्रियापासुन परमार्थता भिन्न आहे. नाव, रुप, संबंध, जाती, क्रिया, भेद हे सर्व प्रकार आकारास लागु आहेत ब्रम्ह्याच्या ठिकाणी ते नाहीत, ते ब्रम्ह परमार्थता त्रिगुणस्वरुप कधीही नाही, तीन गुणांचा आणि त्याचा पारमार्थिक संबंध नाही परंतु त्याच्या ठिकाणी ते भासमान होतात, अर्जुना ! या कारणावरुन भ्रांत मनुष्याच्या मनामध्ये अशी कल्पना निर्माण होते की तीन गुणांना या ब्रम्हाने धारण केले आहे, परंतु ब्रम्हाच्या ठिकाणी हे तीन गुण आहेत, असे मानने म्हणजे ज्याप्रमाणे ढग आकाशात दृष्टीस पडतात, म्हणून त्यांना आकाश धारण करते अथवा आरशात पाहिले असता जे प्रतिबिबं दिसते, असे म्हटल्याप्रमाणे, अथवा जलाशयातील पाणी सुर्य-प्रतिबिबांला धारण करते किवां सुर्यकिरणांनी मृगजळाला जसे धारण करावे. त्याप्रमाणे निर्गुण परब्रम्ह सर्वाच्या संबंधावाचुन सर्वाना धारण करते, परंतु हे म्हणणे भ्रममुलक असल्यामुळे व्यर्थ आहे. (ओवी ९०१ ते ९१०)
ज्याप्रमाणे एखादा भिकारी मनुष्य स्वप्नामध्ये राजा होवुन एखाद्या राज्याचा उपभोग घेतो, हे स्वप्नात सत्य असले तरी वास्तविक जीवनामध्ये खोटे आहे त्याप्रमाणे निर्गुण ब्रम्ह गुणांला भोगते हे ही व्यर्थ होय, म्हणुन गुणांचा संबंध अथवा गुंणाचा भोग याचा निर्गुण ब्रम्ह्याच्या ठिकाणी संबंध आहे अशी भाषा बोलु नये. हे पंडुसुता , अग्नीचा आकार जरी अनेक प्रकारचा असला तरी त्यातील उष्णता ही ज्याप्रमाणे एक होय, त्याप्रमाणे ब्रम्ह हे चराचर भुतांमध्ये जरी दृष्टीस पडले तरी ते एकच आहे, जे अविनाशी असुन सुक्ष्म रुपाने सर्व विश्वाला व्यापुन आहे, ते ज्ञेय होय. जे एक असुन सर्व चराचराच्यां आत-बाहेर आहे, जे एक असुन ज्ञानी पुरुषास आत्मरुपाने जवळ आहे, आणि अज्ञानी पुरषास दुर आहे, ते एकावाचुन दुसऱ्या प्रकारचे नाही, क्षीरसागराची गोडी सर्वत्र एकच असते, त्याप्रमाणे ब्रम्ह हे सर्वत्र परीपुर्ण रुपाने आहे. जारज, अंडज, स्वेदज व उद्विज्ज या सर्व निरनिराळया भुतमात्रांच्या ठिकाणी ज्याची अखंड व्याप्ती असुन ते थोडे देखील कमी किवां जास्त झालेले नाही, श्रोत्यांच्या मुखावरील जणू चंदनतिलक असलेल्या अर्जुना ! वेगवेगळया आकारांच्या हजारो घटात चंद्र हा चांदण्यासह प्रतिबिबिंत होवुनही जो घटभेदाने भिन्न होत नाही, मिठाच्या कणांच्या राशीमध्ये खारेपणा जसा एकच असतो, अथवा ऊसाच्या मोळी मध्ये गोडी जशी एक असते, हे उत्तम बुध्दी असणाऱ्या अर्जुना , अनेक प्रकारच्या भुत-समुदायांमध्ये ज्याची एकाच रुपाने व्याप्ती आहे, ते संपुर्ण विश्वरुप कार्याचे कारण आहे. (ओवी ९११ ते ९२०)
ज्याप्रमाणे समुद्रापासुन लाटा निर्माण होतात आणि त्या सर्व लाटांना समुद्र जसा आधार आहे, त्याप्रमाणे संपुर्ण चराचर भुतांचा आकार ज्याच्यापासुन निर्माण झाला, तोच त्या भुतांच्या आकाराला आधार आहे, बालपण, तारुण्य, वृध्दत्व या तिन्ही अवस्थांमध्ये शरीर जसे एकच असते, त्याप्रमाणे जगाची उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही स्थितीत हे ब्रम्ह अखंड समरुपाने असते, प्रातकाल, माध्यानकाल, सायंकाल या दिवसाच्या तिन्ही वेळा एका क्रमाक्रमाने येत-जात असतात परंतु यामुळे आकाशात काही फरक पडत नाही. हे प्रियोत्तम अर्जुना ! जगत्-उत्पत्तीच्या वेळी याच ज्ञेयाला रजोगुणाच्या उपाधीने ब्रम्हदेव हे नाव प्राप्त झाले आणि जगाच्या स्थितीकालात जे ज्ञेय सत्वगुणांच्या उपाधीने विष्णू या नावाला पात्र झाले, मग जेव्हा आकार हरपतो म्हणजे लय पावतो, त्यावेळी या ज्ञेयाला तमोगुणांच्या उपाधीने रुद्र असे म्हटले जाते आणि त्याही राजस, सात्विक व तामस या तीन गुणांचा जेव्हा अत्यंत भाव होतो, तेव्हा ते ज्ञेय सामान्य स्वरुपाने असते, त्यास सर्वविशेष शुन्य असे म्हणतात. आकाशाचे शुन्यत्व गिळुन राजस, सात्विक व तामस या तीन गुणांचा नाश करुन जे शुन्य उरते, तेच महाशुन्य होय. याला श्रुतीवचन प्रमाण आहे, ते अग्नीला प्रदिप्त करणारे आहे, ते चंद्राला अमृत देवुन जागविणारे आहे, तसेच सुर्याचे डोळे देखील ज्याच्या प्रकाशाच्या सहाय्याने पाहतात, ज्याच्या तेजाने संपुर्ण तारांगणास तेज प्राप्त होते, तसेच महातेज ज्याच्या तेजाने तेजस्वी होते, जे महदतत्वादी कारणाचेही कारण आहे, जे बुध्दीलाही ज्ञान देणारी साक्षीरुप बुध्दी आहे, व जे जीवांचे जीव आहे. जे मनाचे मन आहे, डोळयांचा डोळा , कानाचे कान आणि वाचेची वाचा आहे. (ओवी ९२१ ते ९३०)
जो प्राणांचाही प्रेरक प्राण आहे, गतीचे चरण आहे, व ज्याच्यामुळे क्रियेस कर्तेपणा प्राप्त होतो, अर्जुना! ज्याच्या परमसत्तेने विश्वाला आकार प्राप्त होतो ज्याच्या व्यापकपणामुळे विश्वाचा विस्तार होतो व ज्याच्या संहारक शक्तीने विश्वाचा संहार होतो, जे पृथ्वीस धारण करणारे आहे, जे पाण्याचे जीवन आहे व ज्याच्या तेजाने तेजाला प्रकाश दिला जातो, जे वायुचा श्वासोश्वास आहे, त्या ब्रम्हरुपी पोकळीत आकाश राहीले आहे हे वर्णन असो. सारांश, त्याच्याच प्रकाशाने सर्व विश्व भासते. हे अर्जुना! फार काय सांगावे? जे सर्वत्र आहे परंतु ज्याच्यात सर्व नाही म्हणून द्वैत-भावाला तेथे थोडादेखील प्रवेश नाही, जे पाहिल्याबरोबर दृश्य जगत् व द्रष्टा म्हणजे पाहणारा हे सर्व ऐक्यभावाने एकरूप होतात, अशा अभेद्य स्थितीत ते ज्ञान ब्रम्हच, ज्ञातादेखील ब्रम्हच, ज्ञेयही ब्रम्हच, आणि ज्ञानाने जे कैवल्य प्राप्त होते, तेही ब्रम्हच होय. ज्याप्रमाणे हिशोब संपल्यावर सर्व आकडयाची बेरीज जशी एक होते, त्याप्रमाणे साध्य आणि साधनदेखील ब्रम्हाच्या ठिकाणी ऐक्यास येतात. अर्जुना! ब्रम्ह्याच्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार चालत नाही हे असो ते ब्रम्ह सर्वाच्या ह्दयात वास करते. हे प्रिय अर्जुना! प्रारंभी क्षेत्र कशाला म्हणतात ते महाभुतांपासुन धृतीपर्यत प्रत्येक तत्व वेगवेगळे करुन त्या त्या शब्दांच्या अर्थाचे स्पष्टीकरण करुन दाखविले. (ओवी ९३१ ते ९४०)
अर्जुना! त्याचप्रमाणे त्या क्षेत्रा नंतर तुला उघड दृष्टीने स्पष्ट पाहता येईल अशा रितीने ज्ञानही समजावुंन सांगितले. तसेच तुझी बुध्दी तृप्त होवुन तु पुरे म्हणेपर्यत अज्ञानाच्याही लक्षणांचे विस्तृतपणे कौतुकाने निरुपण केले. आणि आता दृष्टात देवुन ज्ञेय म्हणजे काय हे तुला स्पष्ट करुन सांगितले आहे, अर्जुना! या सर्व गोष्टीचा विचार करुन जे माझ्या प्राप्तीची तीव्र इच्छा करतात ते माझ्या स्वरुपाला प्राप्त होतात, ज्यांनी देहादी परिग्रहांचा त्याग करुन आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला. हे किरीटी , ते भक्त आपले चित्त मला अर्पण करुन आणि माझे चित्त प्रेमाने आपल्याकडे घेवुन मद्रुप होतात. मीच होण्याचा हा भक्तीप्रकार सर्व प्रकारात प्रमुख आहे, हे तु लक्षात घे, आम्ही इतर सर्व साधनांच्या प्रकारापेक्षा हा सोपा भक्तीप्रकार रुढ केला आहे, पर्वताच्या कडयावर चढण्यासाठी जशा पायऱ्या बांधाव्या लागतात, उंच पोकळीत बसण्यासाठी जशी मांचण बाधांवी लागते अथवा डोहातुन तरुन जाण्यासाठी त्यात नाव जशा घालाव्या लागतात. एऱ्हवी हे वीरोत्तमा, सर्वच आत्मा आहे असे जर तुला वर्णन करुन सांगु लागलो असतो तर ते तुला स्पष्टपणे कळले नसते, एकच आत्मतत्व आहे दुसरे काही नाही तरी पण आम्ही त्याचे चार विभाग केले आहेत याचे कारण म्हणजे तुझ्या बुध्दीची असमर्थता आम्ही जाणली आहे. (ओवी ९४१ ते ९५०)
ज्याप्रमाणे लहान बाळाला जेवु घालावयाचे असल्यास एकच घास वीस वेळा थोडा-थोडा द्यावा लागतो. त्याप्रमाणे हे ब्रम्हतत्व चार प्रकारांनी तुला स्पष्ट करुन सांगितले आहे. तुझी अवधानशक्ती पाहुन क्षेत्र, ज्ञान, अज्ञान आणि ज्ञेय, असे हे चार भाग केलेले आहेत. अर्जुना, एकच ब्रम्ह तत्व अशा चार भागात सांगुन देखील जर आमचा हा अभिप्राय तुझ्या अनुभवास आला नाही, तर ही तत्व व्यथा आणखी एक वेळा सांगतो. आता त्याचे चार भाग न करता, तसेच ते एकही न मानता, आत्मा आणि अनात्मा या दोन तत्वांचे एकसारखे जोडीने निरुपन करु या. परंतु तु आता एवढे करावेस की आम्ही जेवढे मागु तेवढे तु आम्हाला द्यावेस. ते काय म्हणशील तर तु लक्षपूर्वक कान देवून आम्ही सांगतो एकाग्रतेने ऐक. या श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुन रोमांचीत झाला त्यावेळी देव म्हणाले, तु उत्तम श्रोता आहेस. पण असा हर्षवेगाने उचंबळून जावू नकोस. अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग याप्रमाणे श्रीकृष्णाने आवरुन ते म्हणाले, आता तुला प्रकृतीपुरूष विभाग सांगतो. प्रकृती व पुरूष यांचे ज्यामध्ये विवेचन आहे त्या मार्गाला योगी लोक सांख्यमार्ग असे म्हणतात व ज्याचे संपुर्ण वर्णन करण्याकरता मी कपिलमुनी झालो. तो निर्दोष असा प्रकृती पुरूष विवेक श्रवण कर असे आदिपुरूष भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. चेतन पुरूष अनादी आहे आणि तेव्हापासून प्रकृतीही आहे. ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांची जोड आहे त्याप्रमाणे प्रकृती आणि पुरूष यांची जोडी आहे. (ओवी ९५१ ते ९६०)
छाया ही रूप नव्हे परंतु ती रूपा बरोबर असते तसेच अर्जुना, बी पेरल्यावर त्याचे बरोबर ज्याप्रमाणे कण व कोंडा ही दोन्ही न पेरता उत्पन्न होतात. त्याप्रमाणे एकत्र असलेले व जगाच्या रूपाने प्रकट झालेले अनादिसिद्ध असे प्रकृती आणि पुरूष या दोघांचे जोडपे आहे असे जाणावे. क्षेत्र या नावाने जे सर्व सांगीतले तेच येथे प्रकृती होय असे जाणावे. क्षेत्रज्ञ असे ज्यांना म्हणले आहे तोच येथे पुरूष शब्दाने सांगीतला आहे. अर्थात पूर्वीपेक्षा मी काही वेगळे बोलत नाही. ही केवळ वेगवेगळी अशी नावे आहेत. परंतु निरूपणाचा विषय मात्र भिन्न नाही हे वर्म तु पुन्हा पुन्हा विसरू नकोस. हे पंडुसुता ज्या सत्तेचा कधीही नाश होत नाही तिला पुरूष असे समजावे आणि ज्या सत्तेच्या योगाने सर्व क्रिया घडतात तिला प्रकृती हे नाव आहे. बुध्दी आणि इंद्रिये आणि मन आदी विकारांचा समुदाय आणि सात्विक, राजस, तामस हे तीन गुण. या सर्वांची प्रकृती पासुन उत्पत्ती होते आणि तीच प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला कारणीभूत आहे. जेव्हा क्रिया घडते तेव्हा बुध्दी आणि इच्छा हे प्रथम अहंकाराला निर्माण करतात आणि मग त्या दोघी अहंकाराला सुख दुखांना कारण असलेल्या विषयांच्या नादी लावतात. तीच गोष्ट प्राप्त होण्याकरता जो उपाय करवयाचा त्यास हे अर्जुना कार्य असे म्हणतात. (ओवी ९६१ ते ९७०)