आणि तीच इच्छा अहंकाराच्या बळाला चिकटली असता ती सुप्त मनाला जागृत करते मग ते इंद्रियांकडून व्यवहार करविते याला कर्तृत्व असे म्हणतात. म्हणून क्रिया भोग आणि कर्तृत्व या तिघांचे मुळ कारण प्रकृतीच आहे असे सिध्दांचे राजे श्रीकृष्ण म्हणाले. या तिघांच्या समुदायाच्या रुपाने प्रकृतीच कर्मरुप होते. परंतु ज्या गुणाचा जोर विशेष होइल त्यासारखी ती बनते जे कर्म सत्वगुणांकडुन स्वीकारले जाते त्याला सत्कर्म म्हणतात रजोगुणांपासुन जे कर्म उत्पन्न होते ते मध्यम जाणावे जी तत्वे केवळ तमोगुणां पासुन निर्मान होतात ती निषिद्ध आणि धर्मविरुद्घ कर्मे होत. अशी बरी वाईट कर्मे प्रकृती पासुन होतात व त्या कर्मापासुन सुख दुख प्राप्त होते वाईट कर्मापासुन दुख उत्पन्न होते सत्कर्मापासुन सुख उत्पन्न होते या दोहोंचा उपभोग पुरूषास घ्यावा लागतो. सुख दुख जोपर्यंत उत्पन्न होतात तोपर्यंत प्रकृती क्रिया करते व पुरूषास ती भोगावी लागतात. हा प्रकृती पुरूषाचा संसार विसंगत असा वाटतो कारण बायको म्हणजे प्रकृती मिळवते आणि नवरा पुरुष हा स्वस्थ बसुन खातो. परंतु काय चमक्तार आहे पहा या प्रकृती-पुरूषरुप नवरा बायकोचा कधी संबंध जोडत नाही. कधी त्यांच्यात मेळ ही नसतो परंतु बायको म्हणजे प्रकृती हे जग निर्माण करते. (ओवी ९७१ ते ९८०)
कारण तो पुरुष निराकार असुन उदासीन आहे, कुणाचा त्याच्यांशी संबंधनसुन ते केवळ एकटे आहे आणि जुना-पुराणा असुन जगात जी अतिवृध्द वस्तु असेल तिच्यापेक्षाही वृध्दआहे. त्याला पुरुष हे आडनाव आहे, वास्तविक विचार करुन पाहिले तर ती स्त्री नाही अथवा नपुंसक नाही फार काय सांगावे? त्याच्या स्वरुपासंबंधी कोणतीही एक असा निश्चय होत नाही. त्याला डोळे नाहीत, कान नाहीत, हात नाहीत, त्याला रुप,रंग व नाव काही नाही. अर्जुना , ज्याला कोणतेच अवयव नाहीत, असा तो प्रकृतीचा नवरा असुनही त्याला सुख-दुखाचा भोग मात्र आहे. तो मुळात कर्म न करणारा उदासीन व उपभोग न घेणारा असा जरी आहे, तरी ही पतिव्रता प्रकृती त्याला भोग घेण्यास लावते.ही स्त्रीप्रमाणे पुरूषाला मोहीत करते आपल्या रुपाचा आणि गुणाचा विलक्षण असा खेळ करुन दाखविते. म्हणुन या प्रकृतीला गुणमयी हेच नाव आहे, किबंहुना फार काय सांगावे? मुर्तिमंत गुण म्हणजेच हीच प्रकृती होय.ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य नवे रुप धारण करणारी आहे ती अंगाने संपुर्ण रुप-गुणाची आहे तिच्या रुप-गुणाचा मद जड विश्वाला उन्मत्त करत असतो. सर्व चराचरांची नावे प्रकृतीमुळे प्रसिध्द झालेली आहेत, प्रकृतीमुळे स्नेह प्रेमळ झाला आहे, तसेच इंद्रिये हिच्यामुळे शहाणी झाली आहेत. मन हे नपुंसक आहे परंतु प्रकृती त्याला तिन्ही लोकात फिरवते, याप्रमाणे या प्रकृतीची अलौकिक करणी आहे. (ओवी ९८१ ते ९९०)
ही प्रकृती म्हणजे भ्रमाचे मोठे बेट आहे, ही मुर्तिमंत व्यापकपणच आहे या प्रकृतीने मोजता न येण्याइतके विकार निर्माण केलेले आहेत, ही प्रकृती कामरुप वेलीचा मांडव आहे व मोहरुपी वनाचा वंसत ऋुतु आहे, हिची दैवी, माया आदि नावे प्रसिध्द आहेत. ही शब्दसृष्टीची वाढ आहे, ही जडाला साकारपणाची झालेली प्राप्ती आहे ही प्रपंचाची सातत्याने धाड घालणारी आहे. चौसष्ट कला आणि चौदा विद्या प्रकृतीपासुन निर्माण झालेल्या आहेत. याच प्रकृतीपासुन इच्छा, ज्ञान व क्रिया प्रसवल्या आहेत, प्रकृतीपासुनच ध्वनी-वर्ण-रुप उत्पन्न झाले आहेत, अशा प्रकारे ही प्रकृती चमत्काराचे घर आहे. फार काय सांगावे? हा सर्व खेळ प्रकृतीचा आहे. ब्रम्हांडाची उत्पत्ती व प्रलय होतात ते एक प्रकारे याच प्रकृतीच्या सकाळ, संध्याकाळ आहेत, ही एक प्रकारची अदभुत माया आहे. हीच प्रकृती एकाकी असणाऱ्या पुरूषाची जोडीदारीन आहे, ही नि:संग पुरुषाची नात्याने पत्नी आहे, हीच प्रकृती निराकारी पुरुषासह संसार करुन विश्वरुपी घरात नांदते. या प्रकृतीच्या सौभाग्याचा महीमा फार मोठा आहे आणि म्हणुनच ही अनावर अशा ब्रम्हाला आवरते. वास्तविक पाहता ब्रम्हाच्या ठिकाणी कोणतेही विकार नाहीत, पण त्याच्या ठिकाणी ही आपण स्वता विकार बनते व सर्व काही आपण होते. त्या स्वयंसिध्द पुरुषाची उत्पत्तीही आपणच होते. त्या निराकाराचा आकार आपणच बनते, त्याच्या राहण्याचे देहरुपी ठिकाणही आपणच होते. (ओवी ९९१ ते १०००)
तसेच हीच प्रकृती पुरूषांच्या अपुर्ण इच्छाही पुर्ण करुन त्यानां पुर्णत: तृप्त करते त्याचप्रमाणे ज्यांना जाती, गोत्र नाहीत त्यांचे कुल, गोत्र, जाती स्वताच होते. त्याअवर्णनीयाचे लक्षण, त्या देशाने, त्या कालाने व रुपाने अमर्याद असणाऱ्या पुरुषाचे माप होते, त्या नसलेल्याचे मन व बुध्दी आपणच होते.त्या निराकाराचा स्थुल आकार त्या निष्क्रीयाच्या क्रिया,अहंकार रहिताचा अहंकार आपणच होते,त्या नाव नसलेल्याचे नाव त्या उत्पत्तिरहिताचा जन्म आपणच होते तसेच कर्म व क्रिया आपणच होवुन राहते त्या गुण नसलेल्यांचे गुण त्या पाय रहिताचे पाय त्या कानरहिताचे कान, डोळे नसलेल्याचे डोळे आपण होवुन रहाते, त्या भावरहिताचे भाव-विकार त्या अवयवरहित पुरुषाचे अवयव होते, फार काय सांगावे, ही प्रकृती त्या पुरुषाचे सर्व काही होते. याप्रमाणे प्रकृती आपल्या व्यापकपणाने त्या अविकारी पुरुषाला विकार वश करते, ज्याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी चंद्राचे तेज लोपले जाते, त्याप्रमाणे पुरुषाचे तेज या प्रकृतीच्यामुळे लोपले जाते, शुध्द अशा सोन्यामध्ये वालभर वजनाचा अन्य धातु मिसळला तर पंधरा दराच्या सोन्याचा कस हा पाच दराचा होतो, पिशाच्च ज्याप्रमाणे सज्जन माणसाच्या अंगात शिरुन त्याला वाईट कर्म करण्यास भाग पाडते अथवा ढग जसे दोन प्रहरच्या वेळी निळयाभोर आकाशात अंधकार करुन सुदिनाचा र्दुदिन करतात. (ओवी १००१ ते १०१०)
गाईच्या पोटात दुध असताना ते जसे पांढरे शुभ्र दिसत नाही, अथवा लाकडामध्ये अग्नी असुनदेखील तो जसा चमकत नाही, अथवा तेजस्वी रत्न वस्त्रांमध्ये गुंडाळुन ठेवले असता त्याचे तेज दिसत नाही, शत्रुच्या अधीन झालेला राजा आणि रोगग्रस्त सिंह जसा शक्तीहीन होतो, त्याप्रमाणे प्रकृतीची वाढ झाली की पुरुषाचे तेज निस्तेज होते, जागृत अवस्थेत असलेल्या माणसाला झोप जशी निद्रेत स्वप्नातील सुख-दुख सहज भोगावयास लावते, त्याप्रमाणे प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे पुरूषाला सुख-दुखरुपी गुण भोगावे लागतात, ज्याप्रमाणे एखादाविरक्त मानवदेखील मोहक स्त्रीच्या रुप-गुणांमुळे कामाच्या पाशात अडकला जातो, जेव्हा पुरुषास गुणांची संगती घडते, तेव्हा तो उत्पत्तिरहित नित्य असुनही त्याच्या अंगावर जन्म-मृत्यूचे घाव आदळतात, परंतु अर्जुना ! हे कसे आहे म्हणशील तर तापलेल्या लोखंडावर घण मारले असता ते घनाचे तडाखे अग्नीला बसतात, तसे हे आहे, पाणी हलत असता चंद्राची अनेक प्रतिबिंबे होतात, त्या मुखाच्या प्रतिबिबांचा दुसरेपणा येतो अथवा कुंकूवावर स्फटिक मणी ठेवला तर तो लाल दिसतो, त्याप्रमाणे गुणांच्या संगतीने हा जन्मरहीत असलेला पुरूष जन्म घेतो असे वाटते, परंतू तो खरोखर जन्म घेत नाही, या पुरुषाला प्राप्त होणाऱ्या उत्तम व वाईट योनी अशा प्रकारच्या समज की ज्याप्रमाणे एखाद्या संन्याशी स्वप्नामध्ये अचानक शुद्र होतो. (ओवी १०११ ते १०२०)
म्हणुन केवळ पुरुषाला जन्माला येणे आणि सुख-दुख भोगणे कदापि संभवत नाही,जन्म आणि भोग या सर्वाकरीता गुणांची संगती हीच मुळ कारण होय. जुईच्या वेलाला जसा आश्रयभुत खांब उभा केलेला असतो, त्या खांबाप्रमाणे हा पुरूष प्रकृतीला केवळ आश्रयभुत आहे, प्रकृतीमध्ये हा उभा आहे, पृथ्वी व आकाश यामध्ये जेवढे अंतर आहे तेवढे अंतर प्रकृती व पुरूषामध्ये आहे, प्रकृतीरुप नदीच्या काठावर मेरुपर्वतासमान हा पुरूष असुन तिच्यामध्ये याचे प्रतिबिबं पडते, परंतु प्रकृतीच्या प्रवाहाने पुरूष कधीही वाहुन जात नाही, प्रकृती उत्पन्न होते व लय पावते परंतु पुरूष हा जसाच्या तसाच असतो, संपुर्ण विश्वाचा हा शासनकर्ता आहे, प्रकृती ही पुरूषाच्या योगाने जगते आणि याच्याच सत्तेने विश्व निर्माण होते, म्हणुन हा प्रकृतीचा भर्ता आहे, अर्जुना, अनंत स्थितीकाळापर्यत सृष्टी उत्पन्न होतात आाणि त्या कल्पांताचे वेळी याच ठिकाणी लय पावतात, हा प्रकृतीचा आणि विशाल ब्रम्हांडाचा स्वामी आहे आपल्या व्यापकपणाच्या मापाने हा प्रपंचाला मोजतो. या देहामध्ये परमात्मा म्हणुन ज्याला मोजतात, तो हाच होय, हे पुर्ण लक्षात ठेव. अरे अर्जुना, प्रकृतीच्या पलीकडे एक तत्व आहे , सत्ता आहे असा जो वेदशास्त्रांचा प्रवाद आहे तो वस्तुता हाच पुरूष होय.जो अशा पुरूषाला यथार्थपणे जाणतो आणि सर्व गुण व कर्मे प्रकृतीची आहेत हेही जाणतो. (ओवी १०२१ ते १०३०)
हे धनंजया ! पुरूष हे रुप असुन प्रकृती ही त्याची छाया आहे, पुरुष जल असुन प्रकृती मृगजळ आहे याप्रमाणे जशी निवड करावी, अर्जुना! याप्रमाणे प्रकृती व पुरूषातील भेद ज्याच्या मनाला स्पष्ट कळाला आहे तो आत्मज्ञानी शरीर-इंद्रियांच्या संबंधाने सर्व कर्मे करीत असला तरी आकाश जसे धुराने मलीन होत नाही त्याप्रमाणे किेंचीतही मलिन न होता तो निर्मलच असतो, जिवंतपणी जो देहाच्या मोहजालात सापडून प्रकृतीच्या अधीन होत नाही तो देह नष्ट झाल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही, असा हा एकच प्रकृती-पुरूष विवेकी मानवावर अलौकिक उपकार करत असतो, परंतु हाच विचार अंतकरणामध्ये तेजस्वी सुर्याप्रमाणे प्रकाशित होण्यासाठी अनेक उपाय आहेत, त्याचे आता तु श्रवण कर. हे अर्जुना ! कित्येक श्रेष्ठ साधक विचाररुपी अग्नीत श्रवण, मनन आणि निदिध्यासरुपी पुटे देवुन आत्मतत्वावरील अनात्मरुपी किटाळ दुर करुन आत्मरुप सुर्वण शुध्द करतात आणि अनात्म्याचे छत्तीस प्रकारचे भेदरुपी हिणकस जाणून आपले शुध्द तत्व निशंकपणे वेगळे करतात. त्या आत्मभावाच्या स्वरुपात आत्मध्यानरुपी दृष्टीने ते आपणच आपल्याला पाहतात कोणी दैववशात सांख्ययोगाने व कोणी आत्मयोगाच्या आधाराने आत्म्याला जाणतात. (ओवी १०३१ ते १०४०)
अशा प्रकारांनी सर्व संसारभय ते खरोखर उत्तमपणे तरुन जातात. पण ते असे करतात की अभिमानाचा त्याग करुन परमश्रध्देने एका सदगुरुच्या उपदेशावर विश्वास ठेवतात. जे शिष्याचे हित-अनहित जाणतात त्याची हानी पाहुन जे करुणेने व्यापले जातात व शिष्याला दुख कशामुळे होते हे विचारुन त्याचे दुख नाहीसे करुन त्याला ब्रम्हसुख प्राप्त करुन देतात. त्या सदगुणांच्या मुखातुन जे जे प्रगट होईल, ते अत्यंत आदराने परम श्रध्देने श्रवण करुन त्यातील भावार्थाशी मनाने व शरीराने तल्लीन होतात, श्रवण हेच आपले सर्व कर्तव्य, प्राप्तव्य असे समजतात, त्यांच्या मुखातून निघणाऱ्या अक्षरांवरुन आपले जीवांचे निबंलोण उतरुन टाकतात. मारुती ज्याच्या ध्वजावर आहे अशा अर्जुना, ते देखील अंती मृत्यूरुप सागरातुन उत्तम प्रकारे पार पडतात. याप्रमाणे परमात्मा जाणण्याचे या मृत्यूलोकामध्ये अनेक मार्ग आहेत असे जाण. पण आता पुष्कळ बोलणे पुरे झाले सर्व अर्थाचे घुसळून काढलेले हे सिध्दांतरुपी लोणी ते तुला देत आहे. त्यामुळे अर्जुना, तुला आयता आत्मानुभव प्राप्त होईल तुला अनुभवाकरता इतर साधनांचे कष्ट होणार नाहीत, म्हणून आता आपण सिध्दांताची व्यवस्थित मांडणी बुध्दीने करु. इतर मतांच्या दुराग्रहांचे खंडण करु आणि शुध्द गर्भित अर्थ विस्ताराने सांगु. (ओवी १०४१ ते १०५०)
तरी क्षेत्रज्ञ या शब्दांचे जे तुला आत्म्याचे स्वरूप दाखवले आणि क्षेत्र या शब्दांचे जे संपुर्ण महाभुतादी प्रकार सांगितले वाऱ्याच्या संबंधाने जशा पाण्यावर लाटा निर्माण होतात त्याप्रमाणे क्षेत्र-क्षेत्रज्ञाच्या परस्पर कल्पित संबंधापासुन सर्व भुतमात्र निर्माण होतात. किवां वीर अर्जुना, सुर्यकिरणे आणि उखर भुमी यांचा संबंध झाला असता मृगजळाचा महापुर जसा प्रत्यक्ष दिसतो अथवा पाऊस पृथ्वीवर पडल्यावर ज्या प्रकारे नाना प्रकारचे अंकुर जमिनीवर उगवतात. त्याप्रमाणे जीव या नावाने सर्व काही जे चराचर आहे ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोघांच्या संयोगातुन उत्पन्न होते हे जाण. अर्जुना, या करता आकाराला आलेले सर्वही पदार्थ व प्रकृती यांच्या पासुन भिन्न नाहीत. वस्त्रपणा म्हणजे तंतू नव्हेत तर तंतूलाच तो वस्त्रपणा प्राप्त होत असतो, त्याप्रमाणे तु सुक्ष्म विचाराने सर्व भुतांचे परमेश्वराशी असलेले ऐक्य समजुन घे. एकाच परमेश्वरापासून सर्व भूते निर्माण झालेली आहेत ती सर्व एकच आहेत परंतु ही भुते पाहणाऱ्यास भ्रमामुळे भिन्न-भिन्न रुपाने अनुभवास येतात. या भुतांची नावे भिन्न-भिन्न आहेत प्रत्येकाची व्यवहार करण्याची पध्दती निरनिराळी आहे व सर्वाचे वेषही वेगवेगळे आहेत. अर्जुना, असे पाहुन हा दिसणारा भेद सत्य मानशील तर कोटयावधी जन्मांच्या दुखातुन तुला बाहेर पडता येणार नाही. (ओवी १०५१ ते १०६०)
ज्याप्रमाणे एकाच भोपळयाच्या वेलीला जसा जसा आधार असेल त्याप्रमाणे लांब, वाटोळे व वेडेवाकडे असे भोपळे येतात. बोरीच्या झाडाची फांदी सरळ असली किवां वाकडी असली तरी तिला बोरीचीच म्हणतात, त्याप्रमाणे जीवमात्र भिन्न -भिन्न आकाराचे असले तरी त्यातील आत्मतत्व हे सम आहे. अनेक निखारे जरी असले तरी त्यातील उष्णता सारखीच असते. त्याप्रमाणे अनेक जीवराशीत परमेश्वर हा तोच असतो. अर्जुना, आकाशभर जरी पावसाच्या धारा असल्या तरी त्या सर्व धारांमध्ये पाणी जसे एकच असते त्याप्रमाणे भुताचे आकार भिन्न -भिन्न असले तरी सर्वाच्या ठिकाणी आत्मतत्व हे एकच आहे. पाण्याचा रांजण अथवा पाण्याचा मठ यातील आकाश जरी विविध आकाराचे असले तरी ते आकाशरुपाने एकच असते, त्याप्रमाणे भुतांचा समुदाय भिन्न -भिन्न असला तरी त्यातील परमात्मा समान आहे, सोन्याची बाहुभुषणे आदी अलंकार आटविले तरीपण सोन्याचा कस जसा कायम राहतो, याचे कारण म्हणजे सोने नष्ट होत नाही, त्याप्रमाणे भूतांचा भास हा नाश पावणारा असला परंतु त्यातील सर्वाचा आत्मा हा अविनाशी आहे. याप्रमाणे परमात्मा हा जीव-धर्मरहित आहे व तो सर्वानां व्यापुन आहे याप्रमाणे जो परमात्म्याचे स्वरुप जाणतो तो सर्वज्ञानीमध्ये उत्तम ज्ञानी होय. आणि असा जो सर्व ज्ञानाच्या दृष्टीने डोळस आहे तो स्तुतीला पात्र आहे, तर अर्जुना, तो केवळ परम भाग्यवान आहे, हा देह गुण व ज्ञानेंद्रिये ठेवण्याची धोपटी आहे, वात, पित्त, कफ या धातुंनी हे भरलेले आहे देह हा वाईट आणि भयंकर असा पचंमहाभुतांचा मेळावा आहे, हा देह जणु काही उघड-उघड पाच कर्मेद्रियांच्या रुपाने पाच नांग्या असलेली इंगळीच आहे अथवा पाच ज्ञानेद्रियांच्या रुपाने लागलेली आग आहे. अथवा जीवरुपी सिंहाला सापडलेली हरीणाची कुटी आहे. (ओवी १०६१ ते १०७०)
असा हा शरीराचा प्रकार आहे,तरी देखील अशाश्वतरुपी भावाच्या उदरात, आत्मा नाशवंत नाही, अशा बुध्दीची सुरी कोणी घालीत नाही, तथापि अर्जुना, जो आत्मज्ञानी आहे, तो या देहात असुनही आपला घात करुन घेत नाही आणि शेवटी देहपतन झाल्यानंतर ब्रम्ह-स्वरुपाशी एकरुप होतो, चौऱ्यांशी लक्ष योनीचे जन्म ओलांडुन “ध्यान व ज्ञाना”च्या आधारे “योगी” झालेले लोक आपण स्वताहुन या “ब्रम्हस्वरुपा”तुन कधीच बाहेर पडु इच्छीत नाहीत. अशाच दृढ निश्चयाने ते ब्रम्हस्वरुपात बुडी घेतात, जे परब्रम्ह विश्वाच्या आकाराचा पलिकडचा काठ आहे, जे परावाणीची पलिकडील मर्यादा आहे ते जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलीकडे असलेल्या तुरीयं अवस्थेचे माजघर आहे, ज्याप्रमाणे गंगादी सर्व नद्यां सागराच्या ठिकाणी विश्रांतीला येतात, त्याप्रमाणे मोक्षासह सर्व सदगती येथे विश्रांतीला येतात. जो भूतांचे भेद पाहुन आपल्या बुध्दीचा भेद होवु देत नाही त्याला हे ब्रम्हसुख मोठया प्रमाणात विनासायास प्राप्त होते. कोटयावधी दिव्यांत जसे एकच तेज सारखे असते, त्याप्रमाणे परमात्मा सर्व भूतमात्रांत सत्तारुपाने सारखाच असतो, अर्जुना, अशा समदृष्टीने भूतांकडे पाहत असता जो जीवन जगत असतो, तो खरोखर जन्म-मरणाच्या चक्रात सापडत नाही, जो साम्याच्या बिछान्यावर शांत चित्ताने झोपलेला आहे, त्याला आम्ही भाग्यवान असे म्हणतो, आणि वारंवार त्याचे वर्णन करतो. आणि मन व बुध्दी ज्याच्यांत प्रमुख आहे अशी ज्ञानेद्रियें आणि कर्मेद्रियें यांच्यापासुन होणारी जी कर्मे , ती प्रकृतीच करतेृ असे तो खरोखर पुर्णपणे जाणतो. (ओवी १०७१ ते १०८०)
घरातील माणसे घरात सर्व व्यवहार करत असतात पण घर काहीच करत नाही, आकाशात ढग धावतात, पण आकाश स्थिर असते, त्याप्रमाणे प्रकृतीही आत्म्याच्या प्रकाशाने तीन गुणांनी युक्त होवुन विविध प्रकारचे खेळ खेळते, तथापि, आत्मा हा खांबाप्रमाणे तटस्थ उभा असतो, तो प्रकृतीने केलेले कर्म जाणत नाही. अशा या विचारपुर्वक निर्णयाने ज्याच्या अंतकरणामध्ये ज्ञानाचा उजेड पडला आहे, त्याने आत्म्याला पुर्णपणे जाणले आहे असे जाण. एरवी अर्जुना! मनुष्य तेव्हाच ब्रम्हसंपन्न होतो, जेव्हा वेगवेगळया भूतांच्या आकृतीमध्ये त्याला ब्रम्हरुपाने एकरुपता दिसते. लाटा जशा पाण्यावर परमाणूचे कण जसे पृथ्वीवर अथवा किरणे जशी सुर्यमंडलावर किवां देहाच्या ठिकाणी जसे अवयव अथवा मनाच्या ठिकाणी सर्व संकल्प अथवा एकाच अग्नीच्या ठिणग्या सर्व ठिकाणी दिसतात. त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्र एकाच आत्म्यापासुन उत्पन्न झालेले आहेत, अशी ज्याच्या मनाची खरोखर खात्री झाली आहे, त्यालाच ब्रम्ह-संपत्तीने भरलेले जहाज हाताशी लागते, मग तो जिकडे पाहील, तिकडे त्याला सर्वत्र ब्रम्हस्वरुप दिसू लागते, फार काय सांगावे त्याला अपार आनंदच लाभतो. अर्जुना! अशा प्रकारे प्रकृती आणि पुरूषाचा विचार अनुभवसिध्द दाखले देवुन सांगितला आहे. अरे, चुळ भरावयास जसे अमृत मिळावे अथवा अंजनावाचून डोळयाला जसा धनाचा ठेवा दिसावा, त्याप्रमाणे हा प्रकृती-पुरूष विचाराचा तुला मिळालेला लाभ तेवढयाच योग्यतेचा समजावा. (ओवी १०८१ ते १०९०)