ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी
सार्थ भगवद् गीता अध्याय – १४
गुणत्रय विभाग योग
श्री ज्ञानदेवांनी भगवद् गीतेतील अध्याय – १४ मधील “गुणत्रय विभाग योग” या अध्यायातील १ ते २७ संस्कृत श्लोकांचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन ४१५ ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे. खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे, परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही अवघड वाटू लागली. श्री निवृत्तीनाथांचे परमशिष्य श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहे. हा श्री ज्ञानदेवांचा अमुल्य कृपा–प्रसाद आहे, मनुष्य जीवन जगण्यासाठी अनमोल संजीवनी आहे, किंबहुना संसारसागर पार करण्यासाठी अध्यात्मातील नौका आहे, तिच्या मदतीने संसार करता सावरता आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनसागरातुन तरुन जावे आणि आपल्या जीवनाचे कोटकल्याण साधावे. ही ज्ञानदेवांची “अक्षरब्रम्ह ज्ञानेश्वरी” आत्मसाद करुन जीवनाचे सार्थक करावे.
हे आचार्य ! तुम्ही सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहात. आत्मज्ञानाची पहाट करणारे सुर्य आहात, विश्वाच्या सुखाचा उदय करणारे आहात, आपला जयजयकार असो.तुम्ही सर्वाचे विश्रांतीस्थान असुन सर्वाच्या ह्दयात अहं ब्रम्हास्मि चे स्फुरण करणारे आहात, आणि विविध प्रकारच्या चतुर्दश लोकरुपी लाटांचा विशाल सागर आहात, तुमचा जयजयकार असो. तुम्ही दिनदयाळ असुन निरंतर करुणेचे सागर आहात ब्रम्हविद्यारुप वधुचे प्रिय पती आहात, जे कोणी तुम्हालां जाणत नाहीत त्यांना हे सर्व दृश्य विश्व खरे भासविता आणि जे कोणी तुम्हाला जाणतात, त्यांना सर्व विश्वात तुम्हीच भरलेले दिसता. गारुडी नजरबंदीच्या खेळात दुसऱ्याची दृष्टी चोरतो, परंतु तो आपल्याला जाणत असतो.
पण सदगुंरुराया, तुझे कौशल्य आश्चर्यकारक आहे जो त्या कौशल्याच्या प्रभावात सापडतो तो आपण आपल्याला ओळखत नाही. सर्व विश्वाला तुच एक अधिष्ठान आहेस, असे असून देखील कोणाला तुझे यथार्थ ज्ञान प्राप्त होते, तर कोणाला माये मुळे तुझ्याविषयी अज्ञान रहाते, असा जो परस्पर विरुध्द दोन खेळ करणारा तु महान जादुगार आहेस, तुला नमस्कार असो. जगात जे द्रवरुप पाणी आहे त्याला तुमच्यामुळे गोडी आली आहे. पृथ्वीला भूतभाराची सहनशीलता तुमच्यामुळे आली आहे. चंद्र आणि सुर्य हे विशाल शिपंल्याप्रमाणे निस्तेज आहेत परंतु त्यांचा जो तिन्ही लोकांवर प्रकाश पडतो, तो तुमच्या तेजाच्या शक्तीचा प्रभाव आहे. तुमच्या अलैाकिक व स्वाभाविक बळामुळे वारा सर्वत्र हालचाल करत असतो, आणि आकाश विशाल दिसले तरी तुमच्या पोटात लपंडाव खेळत असते. फार काय सांगावे? तुमच्या सत्तास्फुर्तीने माया अखिल विश्वाच्या रुपाने भासते, ज्ञानदेखील तुमच्याच शक्तीने चहुकडे पाहते. आता हे वर्णन पुरे ! कारण श्रुतीला देखील तुमचे यथार्थ वर्णन करणे कष्ट कारक वाटते. (ओवी १ ते १० )
वेद तुमच्या स्वरुपाचे दर्शन झाले की आम्हाला व वेदांना एका पंक्तीत बसुन मुग गिळुन शांत बसावे लागते. प्रलयकाळात सर्व जलमय झाल्यावर एका थेंबाचा देखील पत्ता लागत नाही, एवढेच नव्हे , तर महानद्यादेखील ओळखता येत नाहीत, सुर्याचा उदय झाल्यानंतर चंद्राचा प्रकाश हा काजव्यासमान होतो,त्याप्रमाणे तुझ्या स्वरुपाच्या वर्णनाविषयी आमची व वेदांची योग्यता सारखीच आहे, जेथे द्वैताचा आधार मोडुन जातो, परा वाणीसह वैखरी बुडून जाते तर मग तुझे वर्णन कोणत्या वाणीने कराव? याकरीता आता तुझी स्तुती करण्याचे सोडुन देवुन तुझ्या चरणकमलांवर मस्तक ठेवावे हेच चांगले, हे गुरू महाराज ! आपण जसे आहात तशाच तुम्हाला मी नमस्कार करतो, माझ्या भांडवलाच्या थैलीची गाठ सोडून माझी बुध्दीरुपी पोतडी भरा आिएा ज्ञानप्रतिपादक भावरुप काव्याचा लाभ करुन देवुन त्या योगाने मला मोठे करा.मग मी गीतेचा भावार्थ सांगण्यास प्रवृत्त होईन आणि विवेकाची उत्तम लक्षणे असलेली सुंदर कर्णभुषणे करुन ती संतांर्पण करीन, महाराज ! माझे मन गीतार्थरुपी ठेवा प्रगट करण्यास समर्थ व्हावे यासाठी तुम्ही आपले कृपारुपी अंजन माझ्या बुध्दी रुपी डोळयात घाला, माझ्या बुध्दीचे डोळे सर्व शब्दसृष्टीला सहज पाहु शकतील अशा परिशुध्द कारुण्यरुपी सुर्यबिंबाच्या रुपाने आपण उदयाला यावे. (ओवी ११ ते २० )
हे प्रेमळाच्या शिरोमणी श्री सदगुरूराया , माझ्या बुध्दीरुपी सुंदर वेलाला काव्यरुपी उत्तमोत्तम फळे येण्यासाठी वो वंसत ऋतु तो आपण व्हावे, आपल्या कृपादृष्टीचा इतका एकच आश्रय असणाऱ्या श्रीसदगुरूराया, तुझा प्रसादरुपी चंद्रमा माझ्या करीता काव्यस्फुर्तीची पौर्णिमा करु दे. महाराज, आपण कृपादृष्टीने पाहिले असता माझ्या बुध्दीरुप सागरात काव्यस्फुर्तीला नवरसांची मोठी भरती येईल. असे ज्ञानदेवांचे नम्र विचार ऐकुन श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज संतोष पावले व म्हणाले, “तु स्तुतीच्या मिषाने द्वैत व्यर्थ वाढवित आहेस. तर आता ही व्यर्थ स्तुती राहु दे , आणि गीतेतील ज्ञान उत्तम प्रकारे स्पष्ट करुन सांग श्रोत्यांच्या गीताश्रवणाच्या उत्सुकतेचा भंग होवु देवु नकोस” हे स्वामी महाराज, मी देखील याच आज्ञेची वाट पहात होतो की तुम्ही श्रीमुखाने ग्रंथातील ज्ञान सांगावयास सुरूवात कर असे म्हणावे, असे ज्ञानेश्वर माऊली म्हणाले. हराळीची मुळे स्वभावताच अंगाने अमर आहे जर तिच्यावर आणखी अमृताचा वर्षाव केला तर मग तिच्या अमरपणाविषयी शंकाच नको, तरी तुमच्या या कृपाप्रसादाने मुळ गीता-शास्त्रांतील पदांचे स्पष्ट पणे आणि चार्तुयाने वर्णन करीन. ते वर्णन ऐकल्यामुळे अंतकरणातील सर्व संशय नाहीसा होवुन श्रवणाची इच्छा वाढेल. (ओवी २१ ते ३० )
माझ्या वाणीतुन उत्तम अमृतमधुर शब्द प्रगट व्हावेत एवढे माझे सदगुरूंच्या चरणाशी मागणे आहे. तरी मागे तेराव्या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुनास अशी कथा सांगितली की, क्षेत्र-क्षेत्रज्ञांच्या संयोगापासुन जग उत्पन्न होते आणि आत्माहा गुणांच्या संबंधाने संसारी झाला आहे, मायेच्या उपाधीने याला सुख-दुख भोगावे लागते परंतु हा आत्मा परमार्थता गुणातीत आहे.तर संघरहित असा जो आत्मा त्याला प्रकृतीचा संघ कसा होतो? क्षेत्र-क्षेत्रज्ञ संयोग कोणत्या स्वरुपाचा आहे? त्याला सुख-दुखे कशी भोगावी लागतात? ते गुण कसे आहेत? किती आहेत? ते जीवाला कोणत्या पध्दतीने बांधतात आणि गुणातीताची लक्षणे कोणती? अशा प्रकारे या सर्व गोष्टीचे स्पष्टीकरण करणे हाच विषय या चौदाव्या अध्यायात आहे. तरी आता त्या वैकुंठवाशी विश्वेश्वरांचा अभिप्राय काय आहे तो या प्रस्तुत चौदाव्या अध्यायात ऐका. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! श्रवण करण्याची सर्व सामुग्री जमवुन या ज्ञानाशी एकरुप व्हावे. आम्ही तुला अनेक प्रकारच्या युक्ती-प्रयुक्त्यांनी हे ज्ञान स्पष्ट करुन दाखविले आहे परंतु अजुनही तुझ्या अंतकरणात याचा अनुभव आला नाही. (ओवी ३१ ते ४० )
या करीता श्रुतीने सर्वाच्या पलिकडले म्हणुन जे ज्ञान वारंवार प्रसिध्द केले आहे ते ज्ञान तुला पुन्हा सांगण्यात येईल एरवी आत्मज्ञान हे आपले श्रेष्ठ ज्ञान होय, परंतु ते सर्वाच्या पलीकडे अशा कारणाने झाले की आपण मृत्यूलोकांतील आणि स्वर्गलोकांतील भोग आवडुन ते स्विकारले आहेत, हे ज्ञान अग्नीसारखे प्रज्वलित आहे आणि इतर ज्ञान गवताप्रमाणे आहे, अग्नी हा गवताला जाळतो, म्हणून अर्जूना , सर्व ज्ञानापेक्षा हे ज्ञान अतिउत्तम आहे, असे मी म्हणतो. ज्या ज्ञानाची मजल संसार व स्वर्ग या सुखापलिकडे नसते आणि व्यावहारीक कर्मे आणि यज्ञयाग या भोगप्राप्तीच्या साधनांनाच ते चांगले म्हणते, ज्याला द्वैताशिवाय दुसऱ्या कशाचीही ओळख नसते, ती सर्व इतर ज्ञाने या आत्मज्ञानाने स्वप्नासारखी मिथ्या केली आहेत, ज्याप्रमाणे वायुलहरी आकाशाकडुन शेवटी गिळुन टाकल्या जातात. अथवा सुर्यनारायणाचा उदय झाला असता चंद्रादी नक्षत्रांचे तेज लपले जाते, अथवा प्रलयकाळातील पाण्याच्या क्षोभाने नदीचे काठ नाहीसे केले जातात, त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर इतर सर्व ज्ञाने लय पावतात म्हणुन अर्जुना, याला आम्ही सर्वोत्तम ज्ञान म्हणतो. हे अर्जुना, अनादी काळापासुन आपणाजवळ असणारा मोक्ष या ज्ञानाच्या प्राप्तीने आपल्या हाती येतो. ज्या ज्ञानाच्या अनुभवाने सर्व विचारवंत लोकांनी जन्म-मरणरुपी संसाराला थोडे देखील डोके वर काढु दिले नाही. आपल्या मनाची विषयांकडे धावणारी धाव मागे हटवुन स्थिरता प्राप्त झाल्यावर सहज विश्रांती प्राप्त होते अशी अवस्था प्राप्त झाल्यावर ते देह असुनही इंद्रियांना आवडणाऱ्या गोष्टीचे आचरण करत नाहीत. (ओवी ४१ ते ५० )
मग ते विचारवंत लोक स्थुल व सुक्ष्म देहांचे कुंपन एकदम ओलांडुन माझ्याच योग्यतेला प्राप्त होतात. अर्जुना, ते माझ्याप्रमाणे नित्य आहेत आणि माझ्याच परिपुर्णतेने ते परिपुर्ण आहेत, मी जसा देश-काल-वस्तु मर्यादारहित व नित्य सत्-चित्आनंदरुप आहे आणि सत्याचा सागर आहे तसेच ते होतात. त्यांच्यात व माझ्यात कोणताही भेद रहात नाही. ज्याप्रमाणे मी अंनतरुप आहे त्याप्रमाणे तेही होतात, ज्याप्रमाणे घटाचा नाश झाल्यावर घटाकाश महाकाशास मिळते, अथवा दिव्याच्या मुळ ज्योतीमध्ये दुसऱ्या ज्योती मिळाल्या असता त्या सर्व ज्योती एकरुप होतात त्याप्रमाणे सर्व भेद नाहीसे होवुन माझ्यात आणि त्याच्यात ऐक्य राहते, त्याप्रमाणे अर्जुना , सर्व प्रकारचा द्वैतभाव नाहीसा होवुन “मी” व “तु” हे भेद एकाच पंक्तीला बसुन एकत्रपणे नांदत असतात. याच कारणामुळे ज्या वेळी संपुर्ण सृष्टी उत्पन्न होते, त्या वेळेस अशा आत्मज्ञानी पुरूषास जन्म घ्यावा लागत नाही सृष्टीच्या आंरभी ज्यांना देहाचा आकार घ्यावा लागत नाही त्यांचा प्रलयकाळी नाश कसा होणार? म्हणुन अर्जुना, जे आत्मज्ञानाने माझ्याशी ऐक्य पावले, ते जन्म-मरणाच्या चक्रात सापडत नाहीत, याप्रमाणे अर्जुनासही आत्मज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणुन श्रीकृष्णाने आत्मज्ञानाचा महिमा वर्णन केला. (ओवी ५१ ते ६० )