अर्जुना, त्याला मी सर्वज्ञ जाणता म्हणतो, आणि जो वेदांतील सिध्दात जाणणाराही आहे तो मला वंद्य आहे. योगापासुन मिळणारे फलही त्यालाच मिळते फार काय सांगावे? जगामध्ये ज्ञान-उपदेशांचा संप्रदाय त्या जीवन्मुक्त पुरुषामुळेच सुरु असतो, आता हे फार बोलणे असु दे, अशा प्रकारे हा संसारवृक्ष अनित्य आहे, असे ज्याने जाणले, तो कोणाकडुन पुर्णपणे कसा वर्णिला जाईल? मग खाली असलेल्या हया संसाररुपी वृक्षाला वरच्या बाजुलाही पुष्कळ शाखा निर्माण होतात, आणि खाली विस्तार पावलेल्या शाखा त्याची मुळे होतात, मग त्या मुळापासुन खालच्या बाजुस वेल वाढुन पालवीचा विस्तार होतो. याप्रमाणे जे आम्ही आरंभी म्हटले आहे तेच अधिक स्पष्ट करुन सोप्या भाषेत सांगतो तरी ऐक. बळकट असलेल्या मुळाने अष्टदा प्रकृती उत्पन्न होवुन वेदरुपी मोठी पाने फुटुन हा संसारवृक्ष वाढतो. परंतु आधी हया वृक्षाच्या बुडापासुन स्वेदज, जारज, उद्भिज्ज, अंडज अशा चार मोठया-मोठया फांदया फुटतात, या चार प्रकारा पासुन पुढे चौ-यांऐशी लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात. त्यावेळी जीवरुपी फांदीला अनेक फाटे फुटतात, सरळ फांदी पासुन आडव्या डहाळया फुटतात त्या वेगवेगळया जाती होत. (ओवी १४१ ते १५०)
स्त्री-पुरुष आणि नंपुसंक असे विविध आकृतीचे घोस स्वाभाविक अनेक कामादी विकारांच्या ओझ्याने इकडे-तिकडे हलु लागतात, ज्याप्रमाणे वर्षा काळ हा नव नवीन मेघांच्या रुपाने पसरत असतो, त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी जगातील विविध आकारमात्रांचा वेल पसरु लागतो. मग शाखेच्या स्वाभाविक ओझ्याने त्या शाखा खाली लवुन एकमेकांत गुंतुन जातात हे त्रिगुणरुपी वारे वाहु लागतो, ते त्रिगुण आतमध्ये वाढल्यामुळे या ऊर्ध्वमुळाच्या वृक्षास खाली, मध्य व ऊर्ध्व असे तीन भेद होवुन फाटे फुटतात. त्यापैकी रजोगुणांच्या लहरी अधिक जोराने वाहु लागल्या की मनुष्यजातीरुप शाखा वाढु लागतात, त्या मनुष्य शाखा वरही नसतात व खालीही नसतात, मधल्या भागात त्यांचीं अतिशय दाटी होवु लागते त्याला आडव्या चार वर्णाच्या फांदया फुटतात, त्याला विधी-निषेधाचे पल्लव असलेल्या वेदवचनांची नित्यनुतन पाने आपापल्या परीने डोलत असतात, तसेच अर्थ व काम याचा विस्तार होवु लागतो, इहलोकांच्या क्षणभंगुर सुखाचे कोंभ फुटतात, त्यावेळी प्रवृत्ती मार्ग वाढावा या हेतुने शुभ अशुभ कर्माचे किती फाटे फुटू लागतात हे काही कळत नाही.त्याचप्रमाणे प्रारब्धाचा भोग संपल्यावर मागची देहरुपी वाळलेली जुनी बुडे पडुन जातात, तोच पुढे नव्या देहाच्या नव्या सालीच्या शाखा निर्माण होवुन वाढू लागतात. (ओवी १५१ ते १६०)
याप्रमाणे रजागुणाचा प्रचंड वारा सुटल्यावर मनुष्यशाखाचे समुह जेव्हा वाढतात तेव्हा त्या शाखासमुहाला मनुष्यलोक असे म्हणण्याचा प्रघात आहे. त्याप्रमाणे एक क्षणभरच तो रजोगुणाचा वारा ओसरु लागला, की तमोगुणाचा अतिभंयकर वारा वाहु लागतो तेव्हा याच मनुष्यशाखेला नीच भोगाची वासना जेव्हा उत्पन्न होते तेव्हा वाईट कर्माच्या डहाळया विस्तारु लागतात, वाईट मार्गाच्या बळकट सरळ फांदया निघुन त्यास प्रमादरुपी पाने व डहाळया फुटतात ऋगवेद, यर्जुवेद आणि सामवेद जे करु नये असे सांगतात त्या निषेधात्मक कृत्ये मनुष्याकडुन केली जातात, दुसऱ्याच्या नाशासाठी जारण, मारण, स्तभंन, मोहन, उच्चाटन, वशीकरण आदी अविचारी,अघोरी कर्मे आगम ग्रंथांनी सांगितली आहेत ती करण्याची इच्छारुपी पानाची वेल विस्तारुन त्यास पुढे अनेक शाखा फुटतात, तेव्हा तमोगुणामुळे मोहीत झालेल्या कर्मभ्रष्टानां चांडाळादी वाईट पापरुपी योनीमध्ये मोठया फांदयाच्या रुपाने जन्मावे लागते,अधर्म जसा वाढेल तसा पशु, पक्षी, डुक्कर, वाघ, विचुं, सर्प आदी आडव्या शाखांचे समुदाय विस्तारतात. (ओवी १६१ ते १७०)
परंतु अर्जुना, काही प्राणीरुपी शाखा अशा असतात की त्यांच्या सर्वागांच्या ठिकाणी नित्य नवा नरकाचा भोग असतो, हा त्यांच्या वाटयाला आलेला कर्मफलाचा भोग आहे, या मनुष्यशाखेमध्ये हिंसां आणि विषयभोग मुख्य असतात वाईट कर्माची संगती तेथे प्रामुख्याने असते ते हिसांदी निषिध्द कर्माचे अंकुर अनेक जन्मोजन्मी वाढतच असतात, तमोगुणरुप माणसे अशी अवस्था भोगत असता पुढे वृक्ष, गवत, लोखंड, माती, दगड अशा जड योनीमध्ये जातात, तेथे शाखाही हयाच आणि फळे तरी हीच होय, अर्जुना! लक्षात ठेव, याप्रमाणे मनुष्यापासुन स्थावरपर्यत खालच्या शाखांची वाढ होत जाते, म्हणुन मनुष्यरुपी ज्या डहाळया आहेत याच खालच्या शाखांची मुळे आहेत असे जाणावे, येथुन संसारवृक्षाचा विस्तार होतो, एरवी वरचे मुख्य मुळ हे मायाविशिष्ठ ब्रम्हाकडे पाहु लागला असता मनुष्यदेह मध्यभागी निर्माण झालेल्या त्या मुख्य मुळाच्या खालच्या शाखा आहेत म्हणजे मनुष्यप्राणी हा मध्यावर असलेल्या शाखा होत. तमोगुण व सत्वगुण यांच्या अनुक्रमे दुष्कर्म आणि सत्कर्म यांनी भरलेल्या शाखा मधल्या शाखेपासुन खाली आणि वर वाढत जातात, ऋगवेद, यर्जुवेद व सामवेद ही तीन वेदरुपी पाने या मनुष्यरुप शाखेशिवाय दुसऱ्या ठिकाणी लागत नाहीत, कारण या तीन वेदांच्या आज्ञेला मनुष्याशिवाय कोणी पात्र नाही, म्हणुन ती मनुष्यशरीराचे मुळे आहेत, इतर सामान्य झाडाविषयी तर असा नियम आहे की फांदया वाढल्या की मुळ दृढ होते आणि मुळ बळकट झाले की फांदयाचा विस्तार होतो. (ओवी १७१ ते १८०)
अशी स्थिती या मनुष्य-शरीराच्या बाबतीतआहे कर्मे जोपर्यत आहेत तोपर्यत देहाला संसार आहे आणि देह जोपर्यत आहे, तोपर्यत कर्माचा व्यापार नको म्हणता येत नाही म्हणुन मनुष्यदेह ही या संसारवृक्षाच्या खालच्या व वरच्या शाखांची मुळे आहेत, यात सशंय नाही असे या जगाचे जनक भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितले. मग तमोगुणाचे जोरात सुटलेले वादळ शांत झाल्यावर सत्वगुणाचे वारे जोरात वाहु लागते, तेव्हा या मनुष्यरुपी मुळाच्या ठिकाणी सदवासनांचे अकुंर फुटतात व त्याला सतकर्मारुपी कोंब येतात, विकसित होणाऱ्या ज्ञानाच्या योगाने बुध्दीचातुर्यरुपी तीक्ष्ण अंकुर एका क्षणात विस्तार पावतात.बुध्दीचे फोक स्फुर्तीच्या बळाने विस्तार पावतात आणि विवेकाच्या बळाने बुध्दीही ज्ञानरुपी प्रकाशाकडे धाव घेते. त्या मनुष्यरुपी मुळाच्या ठिकाणी धारणशक्तीचा रस जिच्या पोटात आहे जे आदररुपी पानानां सुशोभित आहेत असे सात्विक वृत्तीचे कोंब फुटतात, या मनुष्यरुपी मुळाचे ठिकाणी सदाचाराचे अंकुर एकदम आणि अनेक निर्माण होतात, ते वेदमंत्राच्या घोषाने गर्जना करु लागतात, शिष्टाचार, वेदोक्त आचरण व विविध प्रकारची यज्ञयागादी कर्मे अशी पानांवर पाने फुटतात, याप्रमाणे यम-दमरुपी घोस व तपाच्या डहाळया फुटतात आणि त्या डळाळयांना वैराग्याच्या शाखा विस्तृतपणाने आलिंगन देतात. (ओवी १८१ ते १९०)
जे धैर्याच्या अंकुराने तीक्ष्ण असतात, असे विशिष्ट व्रतरुपी फोक उत्पत्तीच्या वेगाने वर टोक असलेले उंच वाढतात म्हणजे व्रतामुळे वरचे जन्म प्राप्त होतात, या मनुष्यरुपी मुळाचे ठिकाणी जेव्हा सत्वगुणांचा वारा अतिशय वेगाने वाहतो, वेदांचा दाट पाला ब्रम्हविद्येची गर्जना करीत असतो, मग धर्मरुपी एक सरळ शाखा निघते आणि त्या फांदीला स्वर्गादिक फळांची आडफांदी फुटते. पुढे रंगीत तांबडया वैराग्यरुपी शाखेस धर्म व मोक्षाची नित्यनवीन कोवळी पालवी येवुन ती वाढतच रहाते. त्या प्रवृत्तिधर्माच्या शाखेला रवि-चंद्रादी नवग्रह, पितर, ऋषी, विद्याधर हे आडशाखाचे अनेक विस्तार पावतात. याही फांद्यापेक्षा वर उंच-उंच् गेलेल्या इंद्रादिक मोठया फांद्याचे झुपके असुन त्या फांद्याची बुडे फळांनी झाकलेली असतात. मग त्या इंद्रादिक डहाळयांच्या वर तमाने व विद्येने श्रेष्ठ अशा मरिचि, कश्यप, आदी दुसऱ्या शाखा उंच येतात. अशा प्रकारे एकावर एक असा शाखांचा विस्तार आहे. या सर्व शाखांचे मुळ मनुष्यदेह असल्यामुळे हा विस्तार बुडात लहान आहे पण शेडयांला स्वर्गादी फळांचा भार असल्यामुळे मोठा आहे, अर्जुना , यानंतर ब्रम्हदेव-महादेवापर्यत जे कोंब निघतात ते मरिचि, कश्यप, आदी शाखांच्याही वर अनेक फळांचे भार येणाऱ्यां शाखा आहेत.वरची शाखा ब्रम्हदेव आणि महादेव या रुपाच्या फळाच्या ओझ्याने वरच्या भागातुन दुप्पट प्रमाणात खाली लवलेली आहे जे मुळचे मायाविशिष्ठ ब्रम्ह, त्याला त्यांनी स्पर्श केला आहे, म्हणुन ब्रम्हदेव आणि महादेव हे देखील मायाविशिष्ठ ब्रम्हच मानले गेले आहेत.(ओवी १९१ ते २००)
लौकिक वृक्षाचेही असेच आहे फळांनी लगडलेली जी फांदी असते ती खाली वाकली असता पुन्हा मुळाकडे येते, त्याप्रमाणेच अर्जुना , हा संसाररुपी वृक्ष ज्या ठिकाणाहुन निर्माण होतो त्याच्या मुळाशी ज्ञानाच्या वाढीने पुन्हा लवतो.म्हणुन ब्रम्हदेव आणि महादेव याच्या पलीकडे जीवाची वाढ नाही, तेथुन पुढे वरती ब्रम्हच आहे, परंतु हे असु दे, ब्रम्हादीक कितीही मोठे झाले तरी ऊर्ध्वमुळ जे मायाविशिष्ठ ब्रम्ह म्हणजे ईश्वर, याच्यां बरोबरीच्या तुलनेला येत नाहीत, प्रलयकाळी ब्रम्हादीके नष्ट होतात पण ईश्वर कधीही नष्ट होत नाही.आणखी निवृत्तीमार्गाच्या ज्या वर सनकादी रुपी शाखा आहेत त्या सत्यलोकरुपी फळात आणि मायारुपी फळात न सापडता ब्रम्हाशी एकरुप झालेल्या असतात. याप्रमाणे मनुष्यापासुन सुरवात होवुन ब्रम्हादिक ही ज्याची शेवटची पालवी आहे, अशी ही मनुष्यशाखांची वाढ उत्तम प्रकारे उंचावते अर्जुना, वरचे जे ब्रम्हदिक लोक आहेत त्यांना मनुष्यत्वच मुळ कारण आहे म्हणुन आम्ही मनुष्यत्व ही खालची मुळे आहेत असे म्हटले आहे. याप्रमाणे खाली आणि वर शाखा असलेला व वर मुळ असलेला हा अलौकिक भववृक्ष सांगितला आहे. तसेच मनुष्य हा खालची मुळे कशी आहे याचे सर्व विवेचन तुला सांगितले आहे. आता हा वृक्ष कोणत्या साधनाने मुळासकट उपटुन टाकता येवु शकतो याचे विवेचन तु एकाग्रतेने श्रवण कर. अर्जुना, तुझ्या मनात अशी शंका निर्माण होईल की ज्यायोगे एवढा विशाल विस्तार झालेला संसाररुपी वृक्ष उपटला जाईल एवढे कोणते साधन असेल काय? (ओवी २०१ ते २१०)
कारण ज्याच्या वरच्या बाजुच्या शाखांची वाढ ब्रम्हलोकापर्यत आहे आणि ज्याचे मुळ हे निराकार ब्रम्हात सर्वात वर आहे. या वृक्षाच्या खाली येणाऱ्या फांदया स्थावर-जंगमाच्या तळामध्ये शिरलेल्या असुन दुसऱ्या मनुष्यरुपी मुळांनी हा मध्येच विस्तारलेला आहे असा हा वृक्ष अतिशय बळकट आणि अफाट असुन याचा नाश कोण करेल? असा शुद्र विचार तु जर आपल्या मनात आणत असशील तर तसे करु नकोस. या वृक्षाला उपटुन टाकण्याच्या उद्देशाने येथे श्रम ते काय आहेत? बाळाला वाटणारी भीती नाहीशी करण्यासाठी बागुलबुवाला दुर देशाला पळवुन लावावे लागते काय? आकाशात दिसणारा ढगाच्या आकाराचा किल्ला पाडावा लागतो काय? सशाचे शिगं मोडावे लागतो काय? आकाशाला खरोखरच फुल असेल तर मग ते तोडता येईल. त्याप्रमाणे अर्जुना, हा संसारवृक्ष जर खरा नाही तर मग त्याला उपटुन टाकण्याविषयी भीती का बरे असावी? आम्ही ज्या प्रकाराने या वृक्षाच्या मुळांचा आणि शाखांचा विस्तार सांगितला तो वांझ स्त्रीच्या घरात पुष्कळ मुले-लेकरे आहेत असे सांगण्यापैकीच आहे. स्वप्नात जे आपण बोलतो त्याचा जागे झाल्यावर आपणास काही उपयोग होतो काय? त्याप्रमाणे या संसारवृक्षाची गोष्टच व्यर्थ आहे एऱ्हवी याचे आम्ही विस्तारपुर्वक वर्णन केले तसे याचे मायारुपी मुळ बळकट अविनाशी असते आणि तसाच वृक्षदेखील सत्य असतो. तर कोणाच्या पोटी अशी मुले जन्माला येतील, कि जे असा संसाररुपी वृक्ष उपटुन टाकण्यास सक्षम असतील.नुसते फु असे फुकंल्याने आकाश उडुन जाईल काय? (ओवी २११ ते २२०)
म्हणुन हे अर्जुना! जे या संसारवृक्षाचे कथन केले ते मिथ्या आहे. तसे तर जसे राजाला कासवीचे तुप आणुन मेजवानी द्यावे असे होईल. अर्जुना! मृगजळाची जी तळी आहेत ती दुरुनच दृष्टीने पाहावीत नाही तर त्या मृगजळाच्या पाण्याने भात व केळी लावता येतील काय? या संसारवृक्षाचे मुळ जे अज्ञान तेच जर खोटे आहे मग त्याचे कार्य खरे कसे असु शकेल? कारण मिथ्या संसारवृक्ष कसा असेल? आणि हे पहा की, या संसारवृक्षाला नाश नाही असे जे म्हटले जाते ते एका अर्थाने खरेच आहे. जोपर्यत जाग आली नाही, तोपर्यत निदेचा नाश आहे काय? किवां रात्र सरली नाही तोपर्यत पहाट होत काय? त्याप्रकाणे हे पार्थ जोपर्यत विचाराने डोके वर केले नाही म्हणजे ज्ञान उत्पन्न झाले नाही तोपर्यत या संसारुपी अश्वत्थ वृक्षाला नाश नाही, जोपर्यत जोरात वाहणारे वारे शांत राहत नाहीत तोपय्रत समुद्राच्या ठिकाणी तरंगपणा अनंतआहे असेच म्हणावे लागेल. म्हणुन सुर्य जेव्हा मावळतो तेव्हा मृगजळ भासण्याचे नाहीसे होते, अथवा दिवा मालविण्याने दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे संसारवृक्षाच्या मुळ असलेंल्या अविद्येला खावुन टाकणारे ज्ञान जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा त्या संसारवृक्षाचा अंत आहे एरवी नाही. त्याप्रमाणे संसारवृक्ष आरंभरहित आहे, असे जे म्हणतात ते म्हणणे म्हणजे संसारवृक्षवर आरोप नाही तर त्या संसारवृक्षाच्या वस्तुस्थितीला अनुसरुनच ते म्हणणे आहे. (ओवी २२१ ते २३०)