एऱ्हवी ज्याच्यासंबंधी काहीही न बोलणेच बोलणे आहे सर्व ज्ञान जेथे लोप पावते सर्व प्रकारचे कर्म-व्यवहार बंद पडतात अशी जी वस्तु आहे ते ब्रम्ह मी आहे हे ज्ञानही जेथे अस्ताला गेले आहे , सांगणाराच जेथे सांगणे झाला आहे आणि द्रष्टयासह दृश्य मावळले आहे, बिबं आणि त्याच्यात पडणारे प्रतिबिबं यामध्ये असणारी प्रभा जरी आपणास दिसत नाही तरी ती नाही असे कसे म्हणता येईल? अथवा नाक व फुले या दोहोंच्या दरम्यान जो सुवास असतो तो प्रत्यक्ष डोळयांनी दिसत नसला तरी तो नाही असे म्हणता येत नाही. त्याप्रमाणे द्रष्टा व दृश्य हे नाहीशी झाल्यावर अमुक वस्तु आहे असे कोण म्हणेल? पण तेच अनुभवाने पाहणे म्हणजेच रुप होय. प्रकाशाशिवाय जो प्रकाशरुप आहे नियमांवाचुन जो स्वभावता नियामक आहे, जो आपल्या निरपेक्ष अतिव्यापकपणानेच आकाशाच्या पेाकळीला आपल्या स्वरुपात बसवितो, जो नाद-ब्रम्हयाला श्रवण करण्याची शक्ती देणारा नाद आहे, जो गोडीनेच चाखली जाणारी गोडी आहे जो ब्रम्हानंदाला आनंदाची शक्ती देणारा आहे. जो पुरुष पुर्णतेचा शेवट आहे जो सर्वात श्रेष्ठ आहे जेथे विश्रांतीही शांत झाली आहे जे सुखाला प्राप्त झालेले सुख आहे, जे तेजाला सापडलेले तेज आहे आणि ज्या ब्रम्हरुपी महाशुन्यामध्ये संपुर्ण आकाशादी विश्वशुन्य ही नाहीसे झाले आहे.जो सृष्टीकालामध्ये विश्वाएवढा विकसित झाल्यानंतरही उरला आहे संपुर्ण विश्वाचा लय झाल्यावरही जो त्याच्या पलीकडे असतो जो पुर्ण आहे आणि जो पुष्कळ प्रकारांनी पुष्कळाच्या पेक्षा पुष्कळ आहे. (ओवी ५४१ ते ५५०)
ज्याप्रमाणे शिंप आपण रुपे नसुन अज्ञानामुळे रुप्याचा भास निर्माण करते, अथवा अनेक अलंकारांच्या विविध अवस्थांत सोने लपलेले नसताना जसे लपल्यासारखे दिसते,त्याप्रमाणे तो विश्व न होता या विश्वाला धारण करतो. हे असो पाणी व लाटा यांमध्ये जसा काही भेद नाही त्याप्रमाणे जो उत्तम पुरुष आपण जगाला प्रतीतीस येणारा प्रकाश आहे म्हणजे ज्याच्या सत्तेने संपुर्ण जगत् आहे आणि ज्याच्या प्रकाशाने जग भासते, हे वीर अर्जुना, आपल्या विश्वसंहाररुपी संकोचाला व विश्वउत्पत्तिरुपी विेकासाला जो कारण आहे ज्याप्रमाणे पाण्यात पडणाऱ्या प्रतिबिबांस समग्र चंद्र कारण असतो. ज्याप्रमाणे रात्र व दिवस आला असता सुर्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही त्याप्रमाणे कोणत्याही काळामध्ये कोणत्याही देशामध्ये कोणत्याही कारणाने ज्याचे स्वरुप क्षीण होत नाही, ज्याचे साम्य ज्याच्याशीच आहे असा उत्तम पुरुषासारखा उत्तम पुरषच आहे, त्याला दुसरी उपमा नाही. अर्जुना, तो आपणच आपल्याला प्रकाशित करतो फार काय सांगावे? यांच्यासारखा दुसरा कोणी सत्-चित्-आनंदस्वरुप नाही. क्षर व अक्षर या दोन पुरुषाहुन श्रेष्ठ व उपाधीरहित असा मीच आहे म्हणुन वेद आणि सर्व जगत् मलाच पुरुषोत्तम असे म्हणता पण हे असो अर्जुना, दिव्य ज्ञानसुर्याचा उदय झाल्यानंतर स्वप्न जसे भासत नाही त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर संपुर्ण त्रिभुवन मिथ्या भासते. (ओवी ५५१ ते ५६०)
अथवा माळ हातात घेतल्यावर ज्याप्रमाणे माळेवर झालेला सर्पाचा भास नाहीसा होतो त्याप्रमाणे माझे स्वरुपज्ञान प्राप्त झाल्यावर जगाचा मिथ्या भास नाहीसा होतो. सोन्याचे विविध अलंकार म्हणजे सोनेच आहे असे जो मानतो तो अलंकारपणा मिथ्या आहे व सोने सत्य आहे असे मानतो त्याप्रमाणे अद्वैतरुप मला सत्यत्वाने जाणुन मिथ्या द्वैताला ज्याने दुर सारले आहे मग मीच एक सर्वत्र व्यापक सच्चिदानंद स्वतासिध्द आहे असे जो म्हणतो आणि आपणहुन उत्तम पुरुषाचा भेद न जाणता ऐक्य जाणतो त्याने सर्व जाणले हे म्हणणेदेखील शोभा देत नाही कारण त्याच्याकरता आपणाशी आणि विश्वाशी अभिन्न असलेले ब्रम्ह सर्वत्र असते आणि त्यामुळे द्वैत कोठेही शिल्लक नसते. म्हणुन अर्जुना तोच माझे भजन करण्यास योग्य आहे ज्याप्रमाणे आकाशाला आलिंगन देण्यास आकाशच योग्य आहे. क्षीरसागराला ज्याप्रमाणे क्षीरसागराचीच मेजवानी करणे योग्य होय अथवा अमृत होवुनच असे अमृतात मिसळावे लागते. शुध्द सोन्यामध्ये शुध्द सोनेच मिसळल्यावर त्याला एक किमंत लाभते त्याप्रमाणे माझ्याशी एकरुपता प्राप्त झाल्यावर कल्पित द्वैत ठेवुन माझी भक्ती करता येते. अरे, गंगा जर समुद्राहुन वेगळी असती तर ती समुद्रास कशी मिळाली असती? ज्याप्रमाणे समुद्रावर अनेक लाटां जरी निर्माण होत असल्या तरी त्या समुद्राहुन भिन्न नाहीत, त्याप्रमाणे जो माझे भजन करतो त्याच्यात व माझ्यात काही भिन्नत्व नाही सुर्य आणि प्रभा यांच्यामध्ये जसे ऐक्य असते तसे माझे भजन केले असता माझ्यात व भक्तात काही अंतर रहात नाही. (ओवी ५६१ ते ५७०)
याप्रमाणे गीताशास्त्र सांगावयास सुरुवात केल्यापासुन सर्व शास्त्रांनी प्राप्त होणारा असा उपनिषदरुपी कमलदलातुन गीतारुपी सुगंध सर्वत्र पसरला. जी गीता वेदांचे मंथन करुन महर्षी व्यासमुनीनी ज्ञानरुप हाताने काढलेल्या लोण्याप्रमाणे आहे. जी गीता वेदांचे ज्ञानरुपी अमृताची गंगा आहे. जी आनंदरुपी चंद्राची सतरावी कला आहे.जी विचाररुपी क्षीरसागरातुन प्रगट झालेली नुतन लक्ष्मी आहे. म्हणुन ही गीतारुपी लक्ष्मी आपल्या पदांनी, वर्णाने व आपल्या अर्थाच्या जीवरुपाने माझ्याशिवाय दुसरे काहीच जाणत नाही. लक्ष्मी ही अत्यंत विचारी असल्यामुळे तिने क्षर, अक्षराचे पुरुषत्व कल्पित असल्याचे ओळखले आणि त्याचां निषेध केला मग तिने पुरुषोत्तमाला स्वतासह सर्वस्व अर्पण केले म्हणुन ही जी गीता ऐकली आहेस ती गीता या जगामध्ये आत्मरुप जो मी त्या माझ्या ठिकाणी अनन्य असल्यामुळे पतीव्रता आहे.खरोखर गीता हे नुसत्या शब्द पांडित्याचे शास्त्र नाही, तर ही गीता संसारास जिकंण्याचे एक दुधारी महान शस्त्र आणि अस्त्र आहे. गीताशास्त्रातील प्रत्येक अक्षर न अक्षर आत्मतत्वाला प्रगट करणारे मंत्र आहेत. परंतु अर्जुना! तुझ्यासमोर मी गोपनीय गीतामंत्र सांगितले ते तु माझे गुप्तधन बाहेर काढलेस असा प्रकार झाला. अर्जुना, पुर्वी भगवान भोलेनाथांनी मस्तकावरील जटेमध्ये असलेली गुप्त गंगा प्रगट करण्यास जसे गौतम ऋषी कारणी भुत झाले. त्याप्रमाणे चैतन्यरुपी शंकर जो मी त्या माझ्या मस्तकात जो गीतारुपी गंगेचा ठेवा होता त्याला बाहेर प्रगट करणारे श्रध्देचे भांडार असणाऱ्या अर्जुना, तो गौतम ऋषी तू झालास. आपल्या सुंदरपणाचा अनुभव घेण्यासाठी जसा आरसा समोर घ्यावा लागतो तसे धंनजया, आत्मस्वरुप पहाण्यास गीतारुप आरश्यात पहावे लागते. (ओवी ५७१ ते ५८०)
ज्याप्रमाणे आकाशातील चंद्र आणि नक्षत्रे ही सर्व सागरामध्ये प्रतिबिंबीत होतात त्याप्रमाणे गीतेसह तु आपल्या अंतकरणात मला प्रतिबिंबीत केले आहेस. अर्जुना, तुझ्या ठिकाणचा विविध तापरुपी मळ नाहीसा झाल्यामुळे तु गीतेसह माझे रहाण्याचे ठिकाण झाला आहेस. परंतु अधिक वर्णन काय करावे? माझी मानाची वेली जी ही गीता तिला समर्थ रुपाने जो जाणील तो सर्व प्रकारच्या मोहांपासुन दुर होईल. हे अर्जुना, ज्याप्रमाणे अमृताच्या नदीचे पाणी पिल्यावर जी रोग घालवुन अधिक श्रेष्ठ असे अमरत्व देते, त्याप्रमाणे गीता जाणली असता मोह नाहीसा होतो यात आश्चर्य ते काय आहे? परंतु विशेष म्हणजे आत्मज्ञानामुळे परब्रम्हयाशी एकरुपता येते जे आत्मज्ञान प्राप्त झाले असता सर्व कर्म आपोआप निष्कर्म होते आणि ज्ञानामध्ये कर्माची समाप्ती होते, हे वीरविलासा अर्जुना,ज्याप्रमाणे हरवलेली वस्तु सापडल्यावर त्या वस्तुचा माग काढण्याचे काम संपते, त्याप्रमाणे निष्काम कर्मरुपी मंदिरावर ज्ञानाचा कळस चढतो. म्हणुन ज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषांची कर्मे आपोआप संपलेली असतात असे अनाथांचे नाथ भगवान श्रीकृष्ण म्हणाले. ते श्रीकृष्णाच्या मुखातुन प्रगटलेले ज्ञानामृत अर्जुनाच्या हदयरुपी पात्रात पुर्ण भरुन ओसंडुन वहात होते मग ती ज्ञानामृताची धारा महर्षी व्यासांच्या कृपेने संजयाला प्राप्त झाली. तो संजय धृतराष्ट्राला पिण्यास देत होता म्हणून धृतराष्ट्राचा अंतकाल कठीण गेला नाही. (ओवी ५८१ ते ५९०)
एरवी गीता ऐकण्याच्या वेळी तो अनाधिकारी आहे असे लोकांना वाटते, परंतु मृत्यू समयी गीताज्ञानाचा प्रकाश त्याच्या हदयात निर्माण झाला. द्राक्षाच्या वेलीस पाण्याऐवजी दुध घातले तर व्यर्थ गेले असे वाटते परंतु द्राक्षाच्या वेलीस दुप्पट फळे आली म्हणजें त्याचा योग्य परिणाम झालेला दिसतो. त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या मुखातुन प्रगटलेले अमृतमधुर अक्षरे संजयाने श्रध्देने धृतराष्ट्राला सांगितली. त्या श्रवणाने आंधळा धृतराष्ट्र देखील मृत्यूसमयी सुखी झाला. तेच मी मराठी भाषेच्या रचनेने, सामान्यज्ञानाने मला कळाले, न कळाले तसे आपणासमोर सांगितले. शेवंतीचे झाड एखाद्या अरसिक माणसाने पाहीले तर त्याला त्यामध्ये काही विशेष सौदंर्य दिसत नाही, परंतु त्या झाडामध्ये असलेल्या फुलातील सुगंधावर लक्ष ठेवुन जे त्यातील परागकण घेवुन जातात, ते त्यातील गोडी जाणतात. त्याप्रमाणे मी सांगितलेले सिध्दांत योग्य असतील तेच आपण घ्यावेत आणि जे काही उणे वाटेल तर त्याचां त्याग करावा कारण काही न कळणे हेच बाळाचे लक्षण आहे. लहान मुल जरी अज्ञानी असले तरी आई-वडील त्याचा अज्ञानपणा पाहुन त्याला रागवत नाहीत. उलट त्यांचा आनंद हदयात मावत नाही आणि ते मुलांचे कौतुक करतात. त्याप्रमाणे तुम्ही संत सज्जन माझे मायबाप आहात. त्यामुळे तुम्ही भेटलात की मी तुमच्याशी लडिवाळपणा करणारच! तो लडिवाळपणा या ग्रंथरचनेच्या निमित्ताने केलेला आहे असे आपण जाणावे. श्री निवृत्तीनाथांचे परमशिष्य श्री ज्ञानदेव महाराज असे म्हणतात की आता विश्वव्यापक असे जे माझे परमपुज्य आराध्य दैवत माझे सदगुरु श्री निवृत्तीनाथ त्यांनी ही माझी वाचारुपी पुजा स्वीकारावी अशी प्रार्थना.
सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ श्री ज्ञानेंश्वरी पंधरावा अध्याय श्री भगवंताच्या कृपेने संपन्न!
(श्रीमद् भगवद गीता श्लोक १ ते २० आणि मराठीत भाषांतरीत ज्ञानेश्वरी ओव्या १ ते ५९९ )