आता त्यागाचे स्वरुप ऐक, मातीचा त्याग केला असता जसा घटाचा त्याग आपोआप होतो तंतुचा त्याग केला असता वस्त्रांचा त्याग होतो, तसेच बीजाचा त्याग केला असता वृक्षाचा त्याग आपोआपच होतो, भितं पाडली असता त्यावर काढलेली चित्रे जशी आपोआप नाहीशी होतात अथवा निद्रेचा त्याग केला असता स्वप्नाचे समुदाय जसे आपोआप नाहीसे होतात, अथवा तळयातील पाणी आटल्यानंतर त्यावरील तरंग आपोआप नाहीसे होतात, वर्षा ऋतु संपल्यावर मेघ जसे नाहीसे होतात, अथवा धनाचा त्याग केला असता विषयभोगांचा त्याग आपोआप होतो, त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते अहंकाराचा त्याग करतात आणि सर्वच संसाराचा देखील त्याग करतात. त्याला त्याग असे नाव आहे. असे यज्ञभोक्ता परमात्मा श्रीकृष्ण यांनी सांगितले तेव्हा त्यागाचे महत्व समजुन घेवुन तो भाग्यवान अर्जुन प्रश्नकर्ता झाला. “महाराज आता शांतीचे लक्षण काय? ते मला उघड करुन सांगा,” त्यावेळी देव म्हणाले, ते सांगतो तरी एकाग्रतेने उत्तम तऱ्हेने लक्ष दे. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी ज्या ठिकाणी नाहीशी होते ती खरोखरच ब्रम्हरुप अशी शांती होय. ज्याप्रमाणे प्रलयकालाच्या जलाचे लोट विश्वाचा पसारा बुडवुन आपणच आपल्या ठिकाणी पुर्णपणे भरुन वाहतो. मग नद्यांचे उगम,प्रवाह, संगम, समुद्र या भेदाचां व्यवहार तेथे रहात नाही. सर्वत्र पाणीच पाणी होते असा जो बोध तो तरी कोणाला होणार? कारण तेथे जलाशिवाय दुसरे काहीच शिल्लक नसते. त्याप्रमाणे ज्ञेयाचा लय झाल्यावर ज्ञातेपणाचाही लय होतो अर्जुना! मग जे शुध्द एकरुप ब्रम्ह उरते ते ‘शांती’चे स्वरुप होय. (ओवी १३१ ते १४०)
आता अपैशुनाचे लक्षण ऐक. उत्तम वैद्य रोगाचां नाश करण्यापुर्वी हा रोगी आपला आहे की परका आहे हा विचार करत नाही वाढलेला रोग लवकर बरा करणे एवढेच तो स्वताचे कर्तव्य मानत असतो, अथवा सदाचारी मनुष्य चिखलामध्ये रुतलेली गाय दुध देणारी आहे की भाकड आहे ते पाहत नाही, तर गायीचे दुख पाहुन त्याचा जीव कासावीस होतो, अथवा पाण्यात बुडत असल्रेला मनुष्य कोण आहे असा दयाशील मनुष्य विचार करीत नाही तर त्याला पाण्यातुन बाहेर काढुन त्याचे प्राण वाचवणे एवढेच तो आपले कर्तव्य मानतो एखाद्या दुष्ट आणि पापी माणसाने पतिव्रता स्त्रीस वस्त्रहीन केले तर सदाचारी मनुष्य प्रथम त्या स्त्रीला वस्त्र नेसावयास देतो व नंतर तीची विचारपुस करतो, तसेच जे अज्ञान व प्रमाद यांनी व्यापलेले आहेत अथवा पुर्वकर्माप्रमाणे जे निद्यंपणाच्या सर्व बाबतीत जखडले गेलेले आहेत, त्यांना आपण स्वता सहाय्य करुन त्यांना दुख देणारी शल्ये विसरावयास लावतात, अरे अर्जुना ! पुढे असलेल्या मनुष्यातील दोष आपल्या निर्दोष दृष्टीने शुध्द करुन मग त्यांच्याकडे अवलोकन करतात, ज्याप्रमाणे शास्त्रविधिपुर्वक पुजा करुन देवाला पाहावे बीज पेरुन शेतात पाहण्यासाठी जावि, अतिथीला भोजन वगैरे देवुन मग त्यांचा आर्शिवाद घ्यावा. त्याप्रमाणेच आपल्यातील चांगूलपणाने समोरच्या माणसातील कमीपणा दुर करावा म्हणजे तो मनुष्य सात्विक दिसु लागतो, असे न करता कोणाच्या वर्मावर घाव घालु नये, अथवा त्यांच्या पापकर्माचा उच्चार करुन त्यानां दुखी करु नये. दोषवाचक नामाने त्यांना हाक मारु नये कारण त्यामुळे त्याच्या अंतकरणाला वेदना होतात. (ओवी १४१ ते १५०)
ज्या उपायाने कोणीही मनुष्य वाईट परिस्थितीतुन चांगल्या परिस्थितीत येईल असा उपाय करावा, परंतु त्या दुखी माणसाच्या वर्मावर बोट ठेवु नये. तर अर्जुना! नीच मानवालादेखील उत्तमोत्तम आदरणीय मानावे असे न करता आपल्या वाईट दृष्टीने त्याच्यावर दोषाचा आरोप करु नये, अथवा आपण त्याच्याकडुन काही दोष घेवु नयेत. अर्जुना! हे अपैशुनाचे लक्षण आहे हे तु जाण मोक्षप्राप्तीच्या मार्गाने जाणारे जे मुमूक्षू आहेत, त्यांच्या साठी हे सुखावह असे मुख्य साधन आहे. दया अशी असावी की सोळा कलांनी परिपुर्ण असलेले चंद्राचे चांदणे हा लहान अथवा थोर असा भेदभाव न करता जसा सर्वाना समान शांती देतो, त्याप्रमाणे दुखीतांना होणारे दुख अत्यंत प्रेमभावाने नाहीसे करत असता हा उत्तम आहे, हा अधर्म आहे असा भेद न करणे याला ‘दया’ म्हणतात. या जगामध्ये पाण्यासारखी दुसरी कोणती वस्तू आहे, जी गवत सुकू लागले असता आपल्या स्वताचा नाश करुन आपल्या ओलाव्याने गवताचे संरक्षण करते? त्याप्रमाणे समोच्या प्राणीमात्रांच्या दुखाने कळवळेलेल्या कृपेने दुख नाहीसे करण्याकरता आपल्या जवळचे सर्वस्व दिले तरीपण ते थोडेच दिले असे वाटणे याला ‘दया’ असे म्हणतात. वाहते पाणी पुढे असलेला खड्डा कमी भरलेला असेल तर तो पुर्ण भरल्याशिवाय पुढे सरकत नाही, त्याप्रमाणे दुखाने पीडलेल्या समोरच्या प्राणीमात्रांस संतोष देवुन पुढे जाणे याला दया म्हणतात. पायामध्ये काटा गेला की, त्या क्षणीच मनामध्ये व्यथा निर्माण होते, त्याप्रमाणे समोरचे माणुस संकटाने पोळुन निघाला की जो व्यथित होतो तो दयावान होय. ज्याप्रमाणे पायाला गारवा लागला की डोळयांना शांत वाटत असते त्याप्रमाणे दुसऱ्याचे सुख पाहुन जो सुखावत असतो. (ओवी १५१ ते १६०)
किबंहुना तहानलेल्या जीवासाठी पाणी जसे जगात निर्माण झाले त्याप्रमाणे दुखी-कष्टी लोकांचे दुखच नाहीसे करण्यासाठी या जगात जो राहतो. हे वीरांच्या राजा अर्जुना! असा जो पुरुष तो म्हणजे मुर्तीमंत दयाच होय असे जाण. ही दया ज्याच्या अंतकरणात निर्माण होते त्याचा मी (भगवान श्रीकृष्ण) अत्यंत ऋणी आहे. आता अलोलुप्त्वाचे लक्षण सांगतो, ते समजुन घे. सुर्याचा उदय झाल्याबरोबर कमळाचे फुल उमलते परंतु सुर्य जसा त्याच्या सुगंधाचा उपभोग घेत नाही, ऋतुराज वसंतामुळे अनेक झाडे टवटवीत होतात, वन शोभेच्या अक्षौहिणी सेना विविध फुले, पाने, फळे हातात घेवुन स्वागतासाठी पुढे आल्या तरी तो वसंत ऋतु यापैकी कशाचाही स्वीकार करत नाही, अष्टमहासिध्दीसह प्रत्यक्ष लक्ष्मी जरी जवळ आली तरीदेखील महाविष्णु तिकडे लक्ष देत नाहीत, असो हे दृष्टात पुरे. अशी इच्छा मनामध्ये निर्माण न होणे याला अलोलुपता असे म्हणतात. अधिक काय जाणावे, आता मार्दवाचे स्वरुप ऐक, मधमाशीस जसे तिचे मोहोळ सुखकारक वाटते किवां जलचरास पाणी जसे प्रिय असते, पक्ष्यांना (विहंगम) उडण्यास आकाश जसे मोकळे असते, अथवा आईचे आपल्या बाळाविषयी निस्वार्थ प्रेम जसे हळुवार असते अथवा वंसत ऋतुमध्ये मलयागिरीवरुन वाहणारा वारा स्पर्शाने जसा मऊ व सुगंधी असतो, डोळयांना प्रिय वस्तुची अथवा व्यक्तीची भेट झाली असता जसे सुख वाटते अथवा कासवीची दृष्टी जशी तिच्या पिलांना सुखकारक असते त्याप्रमाणे भुतमात्रांशी जो निस्वार्थी प्रेमाने आचरण करतो त्याला ‘मार्दव’ असे म्हणावे. (ओवी १६१ ते १७०)
स्पर्शाने अतिशय मऊ, तोंडामध्ये घातला असता रुचिसंपन्न, नाकास सुगंध देणारा, रुपाने स्वच्छ आणि शुभ्र, असा जो कापुर तो वाटेल तेवढा सेवन केला असता कोणालाही अपायकारक झाला नसता, तर तो मार्दवाच्या उपमेला योग्य झाला असता, जसे आकाश आपल्या पोटात वायु वगैरे महाभुतांना धारण करते, तसेच ते परमाणुमध्येही प्रवेश करते, आणि जसे विश्व आहे तसे ते होते, फार काय सांगावे? असे जगाच्या जीवप्राण्यासाठी जे जगणे त्याचे नाव मार्दव आहे असे मी (भगवान श्रीकृष्ण) अर्जुना! तुला सांगतो. आता लज्जा कोणत्या विषयांची असावी ते ऐक. युध्दातील पराजयामुळे राजा जसा लाजेने कष्टी होतो मान-सन्मानाने जीवन जगणारा मनुष्य दारिद्रयामुळे जसा हीन-दिन होतो एखादा अंतकरणाने शुध्द असलेला संन्याशी वाईट वागणाऱ्या चांडाळाच्या घरी चुकुन आला तर त्याला जशी लज्जा प्राप्त होते.क्षत्रियालां युध्दातुन पळुन जाणे जसे लाजिरवाणे वाटते अथवा एखाद्या पतीव्रता स्त्रीस वैधव्यवाचक नावाने हाक मारणे जसे तिला व्यथा निर्माण करते रुपवान मनुष्यास कोड फुटले तर त्याला जसे लज्जास्पद होते किवां संभावित मानवावर कोणी खोटा आरोप केला तर त्याला जसे मरणप्राय दुख् होते त्याप्रमाणे जीवाने साडेतीन हातांच्या आकाराने जन्माला येवुन जगणे आणि शेवटी प्रेत होवुन मरणे असे जन्ममरणाच्या चक्रात फिरत रहाणे याची लाज वाटते, गर्भातील त्या मेदाच्यां मुशीमध्ये रक्त आणि वीर्य या रसाचा ओतलेला पुतळा होवुन रहाणे ते लाजिरवाणे जगणे होय. (ओवी १७१ ते १८०)
फार काय सांगावे? निर्गुण आणि निराकार असलेल्या जीवाने देहाच्या रुपाने नामरुपास येणे यापेक्षा लाजीरवाणे आणखी काय, अशा प्रकारच्या दुर्दशेमुळे देह धारण करण्याचा जो त्रास मानतात त्याची लाज निर्मल पुरुषाला असते परंतु निर्लज्ज पुरुषाला मात्र शरीर धारण करण्याची गोडी वाटते, आता अचापल्याचे लक्षण काय ते ऐक, ज्याप्रमाणे कळसुत्री बाहुल्यांचा दोरा तुटल्यावर त्या बाहुल्यांची हालचाल बंद पडते, सुर्य मावळल्यानंतर पसरलेली किरणे जशी नाहीशी होतात, त्याप्रमाणे ज्यांनी मन जिकंले त्यांच्या ज्ञानेद्रियांचे व्यवहार बंद पडतात, मन आणि प्राण यांचे नियमन केले असता पाच कर्मेद्रियें आणि पाच ज्ञानेद्रिंयें ही दहा इंद्रिये कोणतेही कार्य करण्यास असमर्थ होतात, यालाच ‘अचापल्य’ असे म्हणतात. ईश्वरांच्या प्राप्तीसाठी ज्ञानमार्गाचे मनापासुन अवलंबन केले असता त्याला कोणतीच उणीव पडत नाही. पतीव्रता स्त्री ही पतीच्या मृत्यूनंतर अग्नीप्रवेश करुन मृत्यूसारखा वाईट प्रसंग आला तरी सहगमन करण्यासाठी मागचा-पुढचा विचार करत नाही. त्याप्रमाणे जो आत्मनाथाच्या चितेंमुळे विषयांना विषवत मानुन शुन्याच्या काटेरी मार्गाने ज्यास धावणे आवडते त्याला धर्मशास्त्रात सांगितलेल्या विधिनिषेधांची अडचण अथवा भीड नसते, त्याचप्रमाणे अनेक महासिध्दी प्राप्त झाल्यातरी त्यांचेही त्याला कौतुक वाटत नाही, याप्रमाणे ज्याचे मन आपणहुन सहजपणे ईश्वराकडे धाव घेते त्यास आध्यत्मिक तेज असे म्हणतात. (ओवी १८१ ते १९०)
आता सर्व सहन करणारा मी कोणीतरी श्रेष्ठ आहे असा गर्व निर्माण न होणे त्याला ‘क्षमा’ असे म्हणतात. ज्याप्रमाणे देह सर्व रोमांना वाहुन देखील वाहण्याचे जाणत नाही, आता धैर्याचे लक्षण सांगतो, ते ऐक इंद्रियांचा विषय भोगण्याचा वेग अतिशय वाढला संचित पापकर्माने रोग खवळले प्रिय जनांचा वियोग झाला आणि अप्रिय जणांचा योग प्राप्त झाला, त्या सर्व दुखांचा महापुर एकदम आला तरीपण त्या पुराचे प्राशन करण्यास अगस्ती ऋषीप्रमाणे धीर धरुन त्या दुखांना जो सहन करतो, आकाशामध्ये मोठी धुराची रेषा उंचउंच गेली तरीदेखील वारा एका लहानशा झुळकीने त्या रेषेला गिळुन टाकतो, त्याप्रमाणे पांडवा! आधिभौतिक, आधिदैविक व अध्यात्मिक ही सर्व दुखे एकदम प्राप्त झाली तरी तो त्या सर्व दुखांना गिळुन टाकतो, म्हणजे धैर्ययुक्त विचाराने सहन करतो. याप्रमाणे चित्तात क्रोध निर्माण होण्याच्या वेळी धैर्य कायम ठेवतो, त्याला धृती असे म्हणतात. सुवर्णचा कलश स्वच्छ करुन त्यात गंगारुपी अमृत भरले असता ते जसे सर्व शुध्द असते त्याप्रमाणे ‘शौचा’ चे लक्षण असते, ज्याचे आचरण निष्काम असते आणि ज्याच्या अंतकरणात आत्मान्-आत्म विवेक जागृत असतो, तो मनुष्य अंर्तबाहय शुध्दतेची मुर्तीच बनलेला असतो त्याप्रमाणे ‘शौच’ असते. आता अद्रोहाचे स्वरुप ऐक गंगेचे जल जीवमात्रांचे पाप आणि ताप नाहीसे करीत असते आणि तीरावरील वृक्षांचे पोषण करीत सागराला जसे मिळते सुर्य जसा जगाचा अंधार नाहीसा करतो लक्ष्मीची निवासस्थाने असलेली कमले विकसित करीत सृष्टी सौदर्याची मंदिरे उघडी करीत पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघतो. (ओवी १९१ ते २००)